नायगारा-निसर्ग शक्तीचा एक सुंदर अविष्कार

Primary tabs

अभिजित भिडे's picture
अभिजित भिडे in भटकंती
3 Aug 2019 - 4:47 pm

जशी काही लोक आपल्याला जन्मजात सुदैवी वाटतात त्याचप्रमाणे जर सुदैवी देशांची यादी केली तर अमेरिकेचा पहिला क्रमांक लागावा. अमेरिकेवर देवाने जरा जास्तीच कृपादृष्टी ठेवली आहे. विपुल नैसर्गिक संपत्ति, उराशि स्वप्ने बाळगून नशीब आजमावयाला जगभरातून आलेले उच्चशिक्षित मनुष्यबळ आणि त्या ओघाने आलेली आर्थिक राजकीय आणि लष्करी महासत्ता. हे कमी म्हणून की काय निसर्गानेही सौंदर्याबाबतीत सुद्धा काहीही हातचे राखून ठेवलेले नाही‌. नाही तर नायगारा आणि ग्रँड कॅनियन ही दोन नैसर्गिक जागतिक आश्चर्ये एकट्या अमेरिकेत नसती.

तर अशा या अमेरिकेला ऑफिसच्या कामानिमित्याने जायचा योग आला आणि सुदैवाने दोन विकेंड पण मिळाले. तेव्हाच नायगाराचा भुंगा मनात गुणगुणू लागला होता आणि तसंही माझं कामाचे ठिकाण न्यूजर्सीला असल्यामुळे नायगारा तिथून करणे बऱ्यापैकी शक्य होते. अमेरिकेला जाण्यापूर्वीच नायागरा प्रवासाबद्दल ची माहिती पूर्वी अमेरिकेत राहिलेल्या माझ्या मामेबहिणी कडून घेतली होती. त्याप्रमाणे दोन दिवसांची कंडकटेड टूर ऑनलाईन बुक केली.या टूरमधे नायगाराच्या आजूबाजूचा परिसर आणि वाटेतली अजून दोनेक पर्यटन स्थळेही दाखवणार होते. न्यूयॉर्कला चायना टाउनयेथून सकाळी आठ वाजता बस सुटणार होती.सकाळी पाचला उठून आवरून बस ने न्यूयॉर्क आणि तेथून भुयारी रेल्वेने अशी मजल दर मजल करत एकदाचा चायनाटाउनला पावणे आठला पोहोचलो. बस ही वेळेवर सुटली.

अमेरिकेच्या उत्तर राज्यांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर च्या सुमारास पाानझडीच्या आधी बर्‍याच झाडांची पाने पिवळी केशरी लाल असे सुंदर रंग धारण करतात. त्यांना फॉल कलर्स असे म्हणतात. अशा दुतर्फा हळदीकुंकू ल्यालेल्या अरण्यांतून आमची बस जात होती. वाटेत कॉर्निंग ग्लास संग्रहालय,वाटकिंस ग्लेन नॅशनल पार्क, सेनेका सरोवर अशी मानव व निसर्ग निर्मित सुंदर स्थळे पाहून संध्याकाळी आठच्या सुमारास नायगारा सिटी ला पोहोचलो. जगातील सर्वात अधिक गोड्या पाण्याचा साठा असलेल्या पंचमहासरोवरांपैकी (नावे अनुक्रमे सुपिरिअर, मिशिगन,ह्यूरोन, एरिव ओंतरिओ) नायगारा नदी एरी सरोवरातून ओंतरिओ सरोवराला जाऊन मिळते . मिशिगन सोडून बाकीची सरोवरे कॅनडा आणि अमेरिकेची नैसर्गिक सरहद्दही आहेत . त्यामुळे नायगारा धबधबयाचेही अमेरिकेचा नायगारा आणि कॅनडा नायगारा असे दोन वाटे झाले आहेत. अगदीच डावे-उजवे करायचं झालं तर त्यातल्या त्यात अधिक उजवा असलेला घोड्याच्या नालाच्या आकाराचा किंवा चंद्रकोरीच्या आकाराचा भाग हा कॅनडाच्या बाजूस आहे जो अमेरिकेच्या बाजूने तेवढा समोरुन दिसत नाही. पण त्यावर एक उपाय आहे.तो म्हणजे खालून बरोबर समोर दिसेल अशी फेरी बोट सर्विस अमेरिकन बाजूने उपलब्ध आहे .बस पार्किंग पासून प्रत्यक्ष धबधबा पाच मिनीटाच्या अंतरावरच आहे असे गाईडने सांगितले व त्याच्या बरोबर आम्ही बसमधून उतरलो. पण हाय! उतरताच हाड़े वाजवणाऱ्या थंडी आणि भुरूभुरु पावसाने आमचे स्वागत केले. एक दोन डिग्री तापमान असावे.पावसानेही त्यात भर घातली.अपरिहार्य म्हणून एरवी शंभर रुपयात भारतात मिळू शकणारी कामचलावू चायनीज छत्री दसपटीने जास्त पैसे मोजून दात वाजवत आणि चरफडत विकत घ्यावी लागली .मग कशीबशी ती छत्री,कॅमेरा, स्याक असे लटांबर सांभाळत भर पावसात धबधब्याच्या दिशेने निघालो. जसजसा नायगारा जवळ येत होता तसतसा त्याच्या वाढत जाणारा ध्वनी उत्कंठा वाढवत होता. थंडीने म्हणा किंवा भव्यतेमुळे किंवा दोन्ही मुळे असेल कदाचित पण प्रथमदर्शनी जवळजवळ अर्धा मिनिट नुसता दिकमूढ़ होऊन त्या रोषणाईने नटलेल्या जलप्रपाताकडे पहातच राहिलो. सूर्यास्तानंतर तेथे अत्यंत अप्रतिम अशी रोषणाई करतात.निसर्गाचे एकाच वेळी एवढे रौद्र आणि तेवढेच सुंदर असे रूप क्वचितच कोठे पहायला मिळत असेल. नायगारातून पाणी इतक्या प्रमाणात आणि इतक्या जोरात पडते की तुषारांची एक भिंतच तयार होऊन हवेत वर जाते.ही तुषार भिंत अगदी लांबच्या पुलावरून देखील सहज दिसते.उलटपक्षी या तुषारभिंतीमुळेच लांबूनही नायगाराचे निश्चित स्थान ओळखता येते. नायगाराच्या पलीकडे कॅनडाची नायगारा सिटी व त्यातील अनेक कॅसिनो दिसतात. अशा थंडीतही थरथरणाऱ्या हातांनी कॅमेरा संभाळत कसेबसे फोटो काढले आणि बसने अर्ध्या तासावर असलेल्या बफेलो शहरातील एका हॉटेलवर मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी नायगारा नदीच्या काठाकाठाने फॉल कलर्स चे सौंदर्य न्याहाळत ओंटोरिओ सरोवर आणि नायगारा किल्ला येथे आलो.ओंटोरिओसरोवराच्या दुसऱ्या टोकाला दूरवर टोरोंटो शहराची स्कायलाइन दिसते.किल्ला बघून झाल्यावर आता सहलीचे मुख्य आकर्षण असलेल्या म्हणजे मेड ऑफ द मिस्ट फेरी बोट करण्यासाठी परत नायगारा वर आलो.वाटेत कॅनडा आणि अमेरिकेला जोडणारे पूल आणि जलविद्युत प्रकल्प दिसले.मेड ऑफ द मिस्ट फेरी बोट सर्विसची स्वतःचे ऑब्ज़र्वेशन डेक आहे. तिथून उंचीवरून नायगाराचे अतिशय विहंगम दर्शन होते. मग लिफ्टने खाली जाऊन बोटीत बसण्याआधी आम्हाला रेनकोट सारखे काहीतरी घालावयास दिले. धबधब्याच्या पायथ्याच्या पातळीत बोट असल्यामुळे त्याची भव्यता जास्त जवळून पाहता येते. बोटीतून अमेरिकेचा सरळसोट भिंतीसारखा नायगारा आणि कॅनडाचा घोड्याच्या नालेसारखा नायगारा अधिक स्पष्टपणे दिसतो व अनुभवता येतो. अनुभवता येतो म्हणजे आपल्या सह्याद्रीतील पावसाळी ट्रेक करताना mandatorily जसे प्रत्येक धबधब्याखाली उभे राहतो तसे जरी शक्य नसले तरी तुषार भिंतींमुळे थोडे तरी भिजायला मिळते. नायगाराच्या रौंद्र ध्वनीपुढे पुढे दुसरे काही ऐकूच येत नाही. अगदी बायकांच्या गप्पांचा सुद्धा (संदर्भ: पूर्वी वाचलेला एक विनोद ). नायगाराची भव्यता प्रत्यक्ष समोर दिसत असूनही केवळ कल्पनातीत अशीच भासते. जेमतेम पंधरा मिनिटांचा हा फेरी बोटीचा प्रवास आयुष्यभरासाठीचा अविस्मरणीय अनुभव खचितच देऊन जातो.

अशा या नायगाराचा आसमंत याची देही याची डोळा मनात साठवून समाधानाने व काहीशा अनामिक हुरहुरने परतीच्या प्रवासाला लागलो.

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

5 Aug 2019 - 12:38 am | जालिम लोशन

छान

श्वेता२४'s picture

5 Aug 2019 - 4:49 pm | श्वेता२४

फोटो टाकता आले तर बघा.

अनिंद्य's picture

10 Aug 2019 - 10:58 am | अनिंद्य

दर अमेरिका वारीत फक्त 'एकाच' जागेला भेट देण्याची अट असली तर मी नायगारा निवडीन :-)
छान लिहिले आहे, पण फोटो मात्र हवेतच.

नाही तुम्ही इतके छान वर्णन केले, मग फोटोही टाका की राव...
खूप सुंदर वर्णन.....फक्त फोटोंची कमतरता....