नमस्कार.
खूप दिवसात पाककृती टाकायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज माझी एक अत्यंत आवडती पाककृती इथे सादर करायचीच हे ठरविले होते. आज तुम्हाला मी सँडविच ढोकळ्याची पाककृती सांगणार आहे.
साहित्य -
तयार इडलीचे पीठ ३ वाटी
बेसन पीठ २ वाटी
सायट्रिक अॅसिड १/२ चमचा+१चमचा मीठ+२ चमचे साखर+१वाटी पाणी हे सर्व विरघळून
१ वाटी साधे पाणी
२ चमचे खायचा सोडा
हिरवी खोबर्याची चटणी (जरा तिखट)
कडीपत्ता, सुक्या मिरच्या,फोडणी चे साहित्य
कोथिंबीर सजावटी करीता
तेल ५-६ चमचे
कृती-
या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा. प्रथम कुकरमधे भात लावतो त्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्यावा. इडलीपात्रात त्या भांड्यात इडली पीठ वाफवत ठेवावे.
तोपर्यंत ढोकळ्याचे पीठ बनवून घ्यावे. बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे. त्याचा पातळपणा भजीच्या पीठापेक्षा थोडा जास्त हवा.
५ मि. नी इडलीचा डबा बाहेर काढून त्यावर चटणी लावावी.
लगेचच डाळीच्या पीठात २ चमचे खायचा सोडा घालावा व एका दिशेने हलवावे. पीठ फसफसून वर येईल. ते लगेच चटणी च्या थरावर ओतावे.
हलके जमिनीवर आपटून एकसमान करावे.
हे सर्व आता मोठ्या आचेवर १५ मिनट वाफवावे. १५ मि.नी गॅस बंद करुन त्यातील ढोकळ्याचे पातेले गार करत ठेवावे.
ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यावा. १/२वाटी पाण्यात चिमुटभर सायट्रिक अॅसिड+ पाव चमचा मीठ व ३चमचे साखर मिक्स करुन ठेवावे. आता ४ चमचे तेलात २ चमचे मोहरी, थोडे जिरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरच्या यांची चरचरीत फोडणी करावी. हळद घालू नये अथवा लाल रंग येईल. फोडणी गार झाल्यावर त्यात मीठ साखरेचे पाणी मिसळावे. आता हे मिश्रण गार झालेल्या ढोकळ्यावर पसरावे.
वड्या पाड्याव्यात. सजावटी करीता वरुन कोथिंबीर पेरावी व खाण्यास द्यावे.
प्रतिक्रिया
22 Jun 2019 - 3:37 pm | वरुण मोहिते
सांगावे लागेल आईला करायला
22 Jun 2019 - 3:50 pm | तुषार काळभोर
ती वरची फोडली लै भारी आहे राव!
22 Jun 2019 - 4:13 pm | श्वेता२४
प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. :)
22 Jun 2019 - 4:57 pm | पद्मावति
फारच मस्तंय हे.
22 Jun 2019 - 5:13 pm | सस्नेह
सुरेख रंगीबेरंगी दिसतोय सॅन्डविच ढोकळा .
22 Jun 2019 - 5:59 pm | श्वेता२४
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
22 Jun 2019 - 7:36 pm | यशोधरा
मस्त दिसतोय इडली ढोकळा.
22 Jun 2019 - 7:38 pm | श्वेता२४
:)
22 Jun 2019 - 7:48 pm | श्वेता२४
तुम्ही मिपावर कांदा लसूण मसाल्याची जी पाककृती दिली आहे. त्याप्रमाणे मसाला केला. चविष्ट झालाय. घरी सर्वांना आवडला. धन्यवाद.
23 Jun 2019 - 2:57 pm | सस्नेह
:)
22 Jun 2019 - 10:25 pm | उगा काहितरीच
छान दिसतोय ढोकळा.
कोथरूड जवळ नारायण खमण ढोकळा नावाचे एक दुकान आहे,तिथे खाल्लाय याच्या जवळपास जाणारा ढोकळा.
22 Jun 2019 - 10:48 pm | चंद्र.शेखर
मस्त. शेवटचा फोटो खास. खोबऱ्याची जरा तिखट चटणी आहे म्हटल्यावर चवीलाही छानच असणार.
22 Jun 2019 - 11:05 pm | जालिम लोशन
चवीला कसा लागतो!
22 Jun 2019 - 11:17 pm | पिंगू
भारीच आहे पाककृती.. आवडली हं..
22 Jun 2019 - 11:21 pm | श्वेता२४
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. जालीम लोशन,हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. इडली+चटणी+स्पंजी ढोकळा अशी हटके चव लागते. तिखट चटणी व तडका नीट जमला पाहिजे.
22 Jun 2019 - 11:22 pm | श्वेता२४
:))
23 Jun 2019 - 4:55 am | कंजूस
हा आहे झटपट (इन्सटन्ट ) ढोकळा. सोडा व साइट्रिक acid घालून कधी तरी करणे ठीक.
पिठं आंबवून केलेलाच खरा. बाकी कृती बरोबर.
23 Jun 2019 - 7:16 am | श्वेता२४
तसाही ढोकळा कधीतरीच खाल्ला जातो. वेळेअभावी हाच करते. पटकन होतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)
23 Jun 2019 - 6:12 pm | नाखु
ढोकळाप्रेमी वाचकांची पत्रेवाला नाखु
ताक ढोकळा पीठ जर इडली सारखे आदल्या दिवशीच बनवायचं असेल तर काय करायचे ते माहीत नाही
23 Jun 2019 - 6:58 pm | श्वेता२४
मी आधी ढोकळा ताक घालून पीठ आंबवत छान करायचे. पण ऐनवेळी पीठ शिजवायला ठेवताना त्यात इनो घालायचे. पीठ फसफसून वर आले की वाफवायला ठेवायचे.
25 Jun 2019 - 2:15 pm | गीतांजली टिळक
इडलीच्या पीठात पण मीठ नाही घातले का?
25 Jun 2019 - 2:22 pm | श्वेता२४
बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे.
असे लिहीले आहे. इडलीच्या पीठात आपण चवीपुरते मीठ घालतोच. त्यामुऴे वेगळ्याने लिहीले नाही. पण यापुढे बारीकसारीकही लिहीण्याची काळजी घेईन. जर कुणी अगदीच नव्याने करणार असेल तर त्या व्यक्तिला या बारीकसारीक माहितीनेही फरक पडतो, याची कल्पना आहे.
23 Jun 2019 - 7:00 pm | श्वेता२४
'ठेवून'असे वाचावे
25 Jun 2019 - 12:35 pm | Namokar
एकदम भारी ..फोटो बघून तोंडाला पाणी सुटले
25 Jun 2019 - 12:50 pm | जॉनविक्क
25 Jun 2019 - 12:58 pm | श्वेता२४
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
28 Jun 2019 - 8:40 am | जुइ
पाकृ आवडली. फोटो छान आले आहेत.
28 Jun 2019 - 10:59 am | श्वेता२४
:))
28 Jun 2019 - 11:43 am | उपेक्षित
हायला एकदम सोप्पा आहे करून पाहायला पाहिजे.
28 Jun 2019 - 9:41 pm | श्वेता२४
नक्की करून बघा.
29 Jun 2019 - 4:05 pm | स्वाती दिनेश
पाकृ छान आहे,फोटोही झकास!
आजच करून पाहिला.चवीला ही छान झाला होता,
स्वाती
29 Jun 2019 - 7:10 pm | श्वेता२४
तुमच्यासारख्या अन्नपूर्णेकडून माझ्यासारख्या नवबल्लवीला मिळालेली कौतुकाची थाप महत्वाची आहे. धन्यवाद.
30 Jun 2019 - 10:39 am | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant
30 Jun 2019 - 4:53 pm | श्वेता२४
:)