महिला दिन शुभेच्छा

.

वर्डप्रेस की ब्लॉगर? कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे?

Primary tabs

onlinetushar's picture
onlinetushar in तंत्रजगत
13 May 2019 - 3:54 pm

ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्‍न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्‍न पडला होता. याविषयी मी माझ्या ब्लॉगवर लिहलेला लेख इथं 'मिसळपाव'च्या वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहे.

वर्डप्रेसचे ही दोन प्रकार आहेत.

१. wordpress.com २. wordpress.org

यापैकी पहिले वर्डप्रेस हे एक प्रकारे ब्लॉगर सारखेच आहे. दुसरे वर्डप्रेस ओपन सोर्स आहे. आपण दुसरे वर्डप्रेस व ब्लॉगर याविषयी बोलणार आहोत.

१) मालकी

ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. परंतू यावरील कंटेंटची सर्व मालकी ही गुगल कडे असते. गुगल त्याला वाटेल तेव्हा ही सेवा बंद करू शकते. याउलट वर्डप्रेस हे सेल्फ होस्टेड असल्याने आपल्याला हव्या त्या होस्टींगवर ठेवता येते. यामुळे यावरील कंटेंटची मालकीही पुर्णपणे आपल्याकडे असते.

२) कंट्रोल

ब्लॉगरवर ठरावीकच पर्याय उपलब्ध असून यात काही बदल हवे असल्यास ते शक्य नाही. ब्लॉगरसाठी मोजक्याच थीमस उपलब्ध आहेत. अनऑफीशील उपलब्ध असणार्‍या थीमस देखील हव्या तितक्या उपयोगी नाहीत. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने यात आपण हवे ते बदल करू शकतो. एखादे फीचर हवे असल्यास लाखो फ्री व पेड प्लगइन्स उपलब्ध आहेत. टेक्निकल माहीती असेल तर स्वतःचे हवे तसे प्लगइन्स तयार करणे देखील वर्डप्रेसमध्ये शक्य आहे.

३) सुरक्षा

ब्लॉगर सोबत तुम्हाला गुगलची मजबूत सुरक्षा मिळत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. वर्डप्रेस सेल्फ होस्टेड असल्यामुळे याची जबाबदारी आपल्यावर येते. सध्या तरी अनेक होस्टींग कंपन्या या सुविधा मोफत अथवा अतीशय अत्यल्प मोबदल्यात देतात. यासाठी काही प्लगइन्स देखील उपलब्ध आहेत. यामुळे याची खुप चिंता करण्याची गरज नाही.

४) खर्च

ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. यासाठी आपल्याला एक रूपयाही मोजावा लागत नाही. वर्डप्रेस होस्टींगसाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात. प्रीमीयम थीम्स, प्लगइन्स हवे असल्यास हा खर्च वाढू शकतो.

५) सपोर्ट

ब्लॉगरसाठी विशेष असा काही सपोर्ट उपलब्ध नसला तरी वर्डप्रेससाठी फोरमच्या माध्यमातून मोफत सपोर्ट उपलब्ध आहे. वर्डप्रेस फोरमसोबतच होस्टिंग व थीमस कंपन्या स्वतःचा वेगळा सपोर्ट देखील देतात.

६) सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन

ब्लॉगर गुगलचे प्रोडक्ट असल्याने सर्च इंजिन रंकिंगमध्ये फायदा होतो हा समज मला तरी खोटा वाटतो. उलट वर्डप्रेसमध्ये सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशनसाठी विविध प्लगइन्स उपलब्ध असल्याने खूप टेक्निकल माहिती नसली तरी सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन करता येते.

७) भविष्य

२३ ऑगस्ट १९९९ रोजी Pyra Labs या कंपनीने ब्लॉगर सेवा सुरु केली. २००३ मध्ये गुगलने Pyra Labs विकत घेतले. तेव्हापासून यात कोणतेही विशेष अपडेटस करण्यात आले नाही. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने वेळोवेळी अपडेट व नविन फीचर्स येत असतात. याचमुळे वर्डप्रेस जगातील सर्वात पंसतीचा सीएमएस ठरला आहे. केवळ ब्लॉगीगसाठी मर्यादित असणारे वर्डप्रेस आता बिझनेस, ई-कॉर्मस यासाठी देखील वापरण्यात येत आहे. जगातील जवळपास ३०% वेबसाईटस वर्डप्रेसवर आहेत.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 May 2019 - 5:21 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण धागा.

ब्लॉगिंग करायचे ठरवल्यास याचा खुप उपयोग होइल.

धन्यवाद !

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 12:37 am | शशिकांत ओक

विविध विषयाला वाहिलेले सध्या माझे 18च्या वर ब्लॉग्ज ब्लॉगपोस्टवर आहेत. त्यात एकसुरी पणा मला जाणवतो. पण वापरून वापरून हाताळायला तो बरा पडत आहे. आपल्या विचारांवरून वर्डप्रेसचा ओपन सोर्स पर्याय जास्त वैविध्य पूर्ण असेल तर तिथे ही काही सादर करायला काय हरकत आहे....
ब्लॉगर वरून पोस्ट डायरेक्ट ओपन सोर्स वर्डप्रेसवर सादर करायला काही युक्ती असतील तर सांगा म्हणजे कामे पटापट होतील.

नमस्कार शशिकांतजी,

ब्लॉगर (ब्लॉगस्पॉट) वरून वर्डप्रेसवर कसं स्थलांतरित करायचं याविषयी मी माझ्या ब्लॉगवर एक लिहला आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही तो वाचू शकता यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. यानंतरही काही अडचण असल्यास निसंकोच संपर्क साधा.

https://www.onlinetushar.com/blogger-to-wordpress-in-marathi/

चौथा कोनाडा's picture

14 May 2019 - 5:19 pm | चौथा कोनाडा

वाह, खूप छान, ऑनलाईनतुषार !

टप्प्याटप्प्याने तपशीलवार माहिती दिलीय. खूप उपयोगी.

onlinetushar's picture

19 May 2019 - 5:53 pm | onlinetushar

माझे इतर ब्लॉग वाचण्यासाठी माझ्या https://www.onlinetushar.com/ या ब्लॉगला नक्की भेट द्या.

सोन्या बागलाणकर's picture

14 May 2019 - 5:05 am | सोन्या बागलाणकर

उत्तम लेख!

शिवाय वर्डप्रेस मध्ये मालकी तुमची असल्याने तुम्हाला ऍडव्हर्टायझिंगचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ब्लॉगरमध्ये तुम्ही फक्त गूगल ऍडस वापरू शकता पण वर्डप्रेसमध्ये बॅनर ऍड, टेक्स्ट लिंक्स, गूगल ऍडस, अफिलिएट लिंक्स असे अनेक पर्याय वापरू शकता. अर्थात जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगमधून कमाई करायची असेल तर.

माझा स्वतःचा वर्डप्रेस ब्लॉग मी गेली दिड वर्षे लिहितो आहे. आता मला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. मला जाहिराती साठी सूचना वगैरे येतात पण माहिती नसल्यामुळे मी त्यात लक्ष घालत नाही. आपण जर सांगितलेत तर बरं होईल.

koolamol.wordpress.com

माझा स्वतःचा वर्डप्रेस ब्लॉग मी गेली दिड वर्षे लिहितो आहे. आता मला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. मला जाहिराती साठी सूचना वगैरे येतात पण माहिती नसल्यामुळे मी त्यात लक्ष घालत नाही. आपण जर सांगितलेत तर बरं होईल.

koolamol.wordpress.com

शशिकांत ओक's picture

15 May 2019 - 9:48 pm | शशिकांत ओक

अॅड साठी माहिती दिली व मार्गदर्शन लाभावे हा मूळ उद्देश आहे. मी ते फी देऊन आपल्या कडून शिकून घेऊ इच्छितो.
बाय द वे आपण माझा लेटेस्ट मसाजिस्ट धागा पाहिला नाहीये का पहा आणि आपला अभिप्राय टाका ना.

शशिकांत ओक's picture

15 May 2019 - 9:49 pm | शशिकांत ओक

अॅड साठी माहिती व मार्गदर्शन लाभावे हा मूळ उद्देश आहे. मी ते फी देऊन आपल्या कडून शिकून घेऊ इच्छितो.
बाय द वे आपण माझा लेटेस्ट मसाजिस्ट धागा पाहिला नाहीये का पहा आणि आपला अभिप्राय टाका ना.

अमोलजी आणि ओकसाहेब,

वर सांगितल्याप्रमाणे वर्डप्रेस ब्लॉगमध्ये ऍड्सचे विविध पर्याय आहेत. त्यात तुम्ही कुठला पर्याय निवडता हे तुमच्या साईटवर रोज किती लोक येतात त्यावर अवलंबून आहे.

गुगल ऍड्स - वापरायला आणी सेट करायला अतिशय सोपा असा हा पर्याय आहे. यासाठी गूगल ऍडसेन्स अकाउंट बनवा. एकदा तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह झाले कि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ऍड्स डिझाईन करून त्याचा कोड तुमच्या ब्लॉगवर टाकू शकता जेणेकरून त्या ऍड्स तुमच्या साईटवर दिसतील. याशिवाय एक ऑटो ऍड्स नावाचा प्रकार आहे ज्यामुळे गूगल तुमच्या ब्लॉगच्या डिझाइनप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍड्स स्वतःहून निवडतं आणि तुमच्या ब्लॉगवर दाखवतं.

गूगल ऍडसेन्स जरी पॉप्युलर असलं तरी जर तुमच्या साईटवर दरदिवशी काही हजार लोक येत असतील तरच हा ऑप्शन फायदेशीर आहे कारण गुगल - पे पर क्लीक म्हणजे जेवढे लोक ऍडवर टिचकी देतील त्याप्रमाणात तुम्हाला पैसे मिळतील - या तत्वावर चालते. त्यामुळे जरी तुमच्या साईटवर रोज १०००० लोक येत असतील तरी सगळेच ऍडवर क्लिक करतीलच असं नाही. शिवाय गूगल प्रत्यक्ष कमाईतून तुम्हाला खूपच कमी प्रमाणात तुमचा वाटा देते.

बॅनर ऍड्स - दुसरा पॉप्युलर पर्याय म्हणजे तुमच्या ब्लॉगवर वेगवेगळ्या जाहिरातीचे बॅनर दाखवणे. ब्लॉग हा एक प्रकारे रिअल इस्टेट असल्यामुळे तुम्ही त्यावरची काही जागा जाहिरातदारांना भाडेतत्वावर वापरायला देऊ शकता. या प्रकाराचा मोठा फायदा म्हणजे किती पैसे आकारायचे ते तुम्ही ठरवता. शिवाय त्या बॅनरवर किती लोक टिचकी देतात यावर हि किंमत अवलंबून नसते. त्यामुळे तुम्हाला ठराविक रक्कम मिळत राहू शकते. शिवाय साईटवर बॅनर कुठे आहे त्यानुसार त्याची वेगवेगळी किंमत असते. उदा. टॉप बॅनर (मनूच्या जवळ) हा सर्वात महाग असतो कारण त्याला जास्त लोक पाहू शकतात पण लेखाच्या खालचा बॅनर तितका महाग नसतो.

affiliate मार्केटिंग - हा अजून एक पॉप्युलर पर्याय आहे. या मध्ये तुम्ही एखाद्या मोठ्या ब्रँडचे भागीदार बनता, उदा. ऍमेझॉन. आता तुम्ही तुमच्या ब्लॉगमधून लोकांना काही वस्तू विकत घ्यायला सांगत असाल तर तुम्ही तुमची affiliate लिंक वापरून ते प्रॉडक्ट विकत घ्यायला सांगू शकता. जर कोणी तुमची लिंक वापरून प्रॉडक्ट घेतलं तर ऍमेझॉन तुम्हाला ठराविक कमिशन देतं. तुमच्या ब्लॉगवर येणारे लोक कोण आहेत त्यावर या पर्यायाची उपयुक्तता अवलंबून आहे. उदा. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर असाल तर तुम्ही सांगितलेलं हॉटेल किंवा ट्रॅव्हल बॅग विकत घेऊ इच्छूक लोक जास्त असतील पण जर तुम्ही राजकारण किंवा सामाजिक बाबींवर लिहीत असाल तर तुम्ही कुठली प्रॉडक्ट्स रेकमेंड करता यावर मर्यादा येते.

पेड रिव्यूज - चौथा पर्याय आहे पेड रिव्यूज अर्थात तुम्ही काही प्रॉडक्ट्स वापरता आणि त्याबद्दल लिहिता. यासाठी प्रॉडक्ट कंपनी तुम्हाला पैसे देते. उदा. तुम्ही फोटोग्राफर असाल आणि तुम्हाला बऱ्यापैकी ऑडियन्स असेल तर सोनी किंवा निकॉन तुम्हाला त्यांच्या एखाद्या लेटेस्ट कॅमेराला वापरून त्याबद्दल रिव्यू लिहिण्याबद्दल पैसे देते. affiliate मार्केटिंग प्रमाणेच यातही तुम्ही कुठल्या प्रकारचे ब्लॉगर आहात यावर बरंच काही अवलंबून असतं. यासाठी तुम्हाला फोटोग्राफर किंवा गॅजेट गुरूच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फूड ब्लॉगर असाल तर तुम्हाला एखादे रेस्टॉरंटही पेड रिव्यू साठी पैसे देऊ शकते किंवा तुम्ही चित्रपट रसिक असाल तर एखादे मीडिया हाऊस तुम्हाला त्याबद्दल लिहायला सांगू शकते.

वर फक्त काही निवडक आणि पॉप्युलर पर्याय दिले आहेत. वर्डप्रेस ऍडवरटायझिंग हा एक स्वतंत्र विषय आहे आणि यावर एक पूर्ण लेखमाला बनू शकते.

उपाशी बोका's picture

16 May 2019 - 2:46 am | उपाशी बोका

वर्डप्रेसवर थेट मराठीत टायपिंग कसे करायचे ते सांगू शकाल का? ते इंग्रजीत होत आहे.

महासंग्राम's picture

17 May 2019 - 9:57 am | महासंग्राम

गुगल इनपुट टूल वापरून तुम्ही वर्डप्रेस वर मराठीत लिखाण करू शकता. GOOGLE INPUT TOOL असं सर्च करा तिथे जो पहिला ऑप्टशन येईल त्यावर टिचकी मारून तुम्ही इनपूट टूल तुमच्या संगणक लॅपटॉप वर डाऊनलोड करू शकता आठ ब्राऊझर एक्सटेंशन घेऊ शकता.

माझ्या माहितीप्रमाणे GOOGLE INPUT TOOL आता बंद झाले आहे. त्याऐवजी तुम्ही मायक्रोसॉफ्ट भाषा https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx हे नवीन टूल वापरू शकता.

महासंग्राम's picture

20 May 2019 - 1:58 pm | महासंग्राम

तुषारजी सुरु आहे अजून क्रोम स्टोअर वर पण उपलब्ध आहे. खाली लिंक देतोय.

https://www.google.com/inputtools/

मंदारजी क्रोम एक्सटेन्शन आहे परंतु ते ऑफलाईन काम करत नाही.