सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 6 : अलिबाग ते बदलापूर व्हाया मुंबई

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
1 Apr 2019 - 10:39 am

19.03.2019

आज शेवटचा दिवस सफरीचा. वडखळ पासून पुढे सुरू असलेली रस्त्याची कामं आणि ट्रॅफिक मध्ये जायची इच्छा होईना. म्हणून आज रेवस जेट्टी वरून भाऊचा धक्का गाठायचं ठरवलेलं. निवांत साडेसातला उठून घर आवरून बाहेर पडायला साडे आठ झाले. मोगलीला काही खरेदी करायची होती. म्हणून त्याला म्हटलं मी पुढे जातो. तू पकडशीलच मला. आणि हो फफे पेढे विसरू नको.

इथून रेवस 24 km. बर्याच दिवसांनी सपाट आणि खड्डे विरहित रस्ता मिळाला होता. 3-6 ने निघालो. झकास वेग मिळाला. अजून ऊन त्रासदायक झालं नव्हतं. हवेत किंचित गारवा होता. एकेक गावं झरझर मागे पडत होती, किहीम, झिराड, मांडवा. रस्त्यात कुठेतरी कॉफी घ्यावी वाटत होतं पण नाही थांबलो. तो मस्त वेग मोडवत नव्हता. रेवस फाटा घेतला आणि थोडे चढ आणि जास्त उतार सुरू झाले. रस्ताही खराब झाला. रेवस 2 km असताना मोगली मला ओलांडून गेला.. ओरडत.. 'मी तिकीट काढतो. तू ये सरळ'. गियर उतरवून परत जोर मारला आणि जेट्टीवर पोचलो. आणि समुद्रात अर्धा km आत गेलेली मुंबई कडे जाणारी लॉन्च दिसली. आता पावणे बारा पर्यंत थांबणं आलं. मिसळ खात, कॉफी चाखत, गप्पा मारत वेळ काढत बसलो. झकास 22चा स्पीड मिळाला होता येताना म्हणून खुश होतो.

एकदाची लॉन्च आली आणि आम्ही टॉप डेकवर पसरलो. ऊन कडकडीत होतं पण वर नेट बांधलेलं होतं त्यामुळे सावली होती. समुद्रावरून येणारा वारा गार होता. त्यामुळे कसाबसा 20 मिनिट जागा राहिलो. काही फोटो घेतले आणि हलकेच झोपेच्या आधीन झालो. जाग आली थेट भाऊचा धक्का एखाद km असतानाच.. या झोपेने सायकल चालवत बदलापूर गाठायची शक्यता संपवली असा आळस भरलेला अंगात. त्यामुळे सखीसोबत रमतगमत cst ला आलो. तिकीट काढून रिकाम्या लगेज डब्यात जागा धरली.

भायखळ्याला डब्यात गर्दी व्हायला लागली. पण अति नव्हती. पण एकूणच बसून बसून कंटाळा आला. त्यात लोकल सुरमई फास्ट म्हणजे ठाण्यांतर स्लो. मग शेवटचा प्रवास परत सायकलवर करायचं ठरवलं. मुंब्र्याला ट्रेन सोडून रस्त्यावर आलो. आणि परत धर हँडल मार पायडल सुरू.

शिळफाट्यापर्यंत ट्रॅफिकने छळ केला पण ते अंतर 7एक km होतं फारतर. आता 20 km बाकी घरापर्यंत. हा माझा नेहमीचाच रपेट करायचा रस्ता. मस्त 22च्या स्पीडने घर गाठलं. वाटेत एक कलिंगड आणि एक लिंबूसरबत थांबे केले इतकंच. अशा तर्हेने 6 दिवसात 548 km प्रवास सायकलवर सफल संपूर्ण झाला..

************

सहा दिवस सायकल भ्रमंती करायला सरोजने जाऊ दिलं याचा आनंद आहे. सुरवात 4 दिवसाची परवानगी काढून केली आणि नंतर हळूच बोलण्यात 6 दिवस म्हणायला लागलो. आता फार कुठे जात नसली तरी ती देखील भटकी आहे.. ट्रेकिंग वगैरे एन्जॉय करणारी आहे. त्यामुळे ही भटकायची ओढ म्हणा वेड म्हणा ती चांगलं ओळखून जाणून आहे.

दुसरं.. रस्त्यात 'ओव्हरटेक करू नका', 'वेग मर्यादा 40' वगैरे सूचना दिसायच्या ज्या मला लागूच नव्हत्या. म्हणजे नियमबाह्य नव्हे पण नियममुक्त असल्याचा फील यायचा. मी निवडलेला रस्ता, मी म्हणेन तिथे हॉल्ट, मला जमेल तितका वेग, असा पूर्ण स्वातंत्र्याचा फील होता. पेट्रोलपंप वरच्या रांगा, आरटीओ चे पोलीस याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू शकत होतो. एकूणच bicycle chain is only chain in the world that sets you free! याचा पुरेपूर अनुभव घेतला.

रोज जगताना आपण कोणत्याही संवेदनेचा दृश्याचा आवाजाचा वगैरे स्वच्छ अनुभव घेतच नाही. त्यावर लगेच विचार, जुन्या आठवणी, अपेक्षा, संलग्न भाव भावना यांचं मोहोळ उठतं सोबत. त्यामुळे भेसळ नसलेला स्वच्छ अनुभव दुर्मिळ होऊन जातो. सायकल चालवत असताना मात्र तस होत नाही. डोकं अलमोस्ट रिकामं राहतं. अनुभव थेट भिडतात.

समोरून वारा वा चढ असेल तर झगडण्यात आनंद, उतार किंवा मागून वारा असेल तर तरंगण्यात आनंद, रस्ता छान असेल तर आनंद असणारच पण नसेल तरी खड्डे चुकवत जायचा चाळा, वेगवेगळी माणसं, त्यांच्या गप्पा, उन्हात भाजून निघायचं मग सावली गाठली की आहा, थंडीत तशीही मजाच..

Being lonely is miserable but being alone is bliss! प्रवास जरी एकट्याने केला असला तरी दर तास दोन तासाने सायकल ग्रुपवरचे साथीदार आणि सिनियर्स, मित्रमैत्रिणी यांच्याशी संपर्क असायचा. त्यांचं, प्रोत्साहन, कौतुक, काळजी सोबत असायची. वाईला डॉ.कैलास वैद्य यांनी प्रेमाने केलेलं आतिथ्य, भ.खे.काका (भटक्या खेडवाला) कशेडी टॉपला मला घ्यायला आलेले, सूरज, अप्पा आणि श्रीनि यांनी काही अंतर मला साथ दिली, मोगली खास माझ्यासाठी अलिबागमध्ये आला. या साऱ्यांमुळे मी alone होतो पण lonely नव्हतो. या सगळ्यांमुळे माझ्यासाठी ही सफर इंग्रजीतली न होता खरोखर आनंदयात्रा झाली.

कुणाशी स्पर्धा नाही, आपण आपल्यापुरत ठरवलेलं उद्दिष्ट आणि पूर्तीचा आनंद. अगदी सहजपणे जमिनीवर आणणारे अनुभव येत असतात. देव्हारे घाटाच्या पायथ्याला त्या नितळ पाण्यात पाय सोडून धनगर आजोबाशी बोलताना प्रवासाबद्दल सांगत होतो. तेंव्हा ते सहज म्हणाले '4 वरसा मागंप्रेन्त केळशी पासून हरिहरेश्वर चालत जायचो यायचो म्हयन्यात 2 डाव. तवा हा डावीकडला रस्ता बरा हुता. आता मायनिंग वाल्यानी वाट लावली. तुमी घाट चडूनच जावा.' म्हातारा सहज 75 पार होता. स्वतःला म्हटलं तू आत्ता जे करतोय ते काहीच नाही यापुढे. मजा करतोय तर मजाच घे. उगा माजू नको.

समाप्त
-अनुप

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Apr 2019 - 10:49 am | प्रचेतस

जबरी झालीय ही सायकलसफर.

लवकरच नव्या सफरीसह पुन्हा या.

मस्तच लिहिलंय. जमलं तर फोटोही टाका.
नाही तर कंकाकांकडे द्या फोटो, ते टाकतील.

अन्या बुद्धे's picture

1 Apr 2019 - 11:15 am | अन्या बुद्धे

मोस्टली आज ऍड होतील फोटोज.. मित्र म्हणालाय तसं.
कंकाका?

यशोधरा's picture

1 Apr 2019 - 11:59 am | यशोधरा

कंजूस काका. ' कंजूस ' आयडी आहे इथे.

अन्या बुद्धे's picture

1 Apr 2019 - 1:27 pm | अन्या बुद्धे

ओहक्के.. इथे अगदी नवखा आहे. फार ओळखी नाहीत..

होतील हळूहळू. इथे बाकीचेही लेखन वाचा. प्रतिसाद द्या. आपली मते नोंदवा. हळूहळू लोक ओळखतील.

सुधांशुनूलकर's picture

2 Apr 2019 - 1:17 pm | सुधांशुनूलकर

अन्या बुद्धे इथल्या काही जणांना ओळखतो - विशेषतः सायकलस्वार्सना

हो, ती शक्यता वाटली होतीच पण त्यांनीच लिहिले आहे ओळखत नाहीत म्हणून सुचवलं :)

वा छान. सहल संपू नये असे वाटत होते.
अशी सफर करायला मिळावी अशी खूप इच्छा आहे.
काही दिवस तरी एकट्याने, कोणत्याच वर्च्यूअल नेटवर्क शी न कनेक्ट राहता जगायचंय.

सुबोध खरे's picture

1 Apr 2019 - 7:55 pm | सुबोध खरे

मी फार दिवस आपल्यासारख्या सफरीची गाजरे खातो आहे. अर्थात हे मला सायकलवर झेपणारे नाही आणि तो माझा पिंडही नाही पण मोटर सायकलवर मात्र करण्याचा विचार फार वर्षपासून आहे.दर रविवारी पहाटे उठून मोटार सायकल वर एक रपेट मारावी असा विचार करतो आहे पण पहाटे उठण्याचीसवय जाऊन फार वर्षे झाली,
आळस हा माणसाचा शत्रू आहे.
बाकी आपल्या सारख्या लोकाना दुरुनच दंडवत

झकास रे... भारी झाली लेखमाला.

पुढील सफरीच्या प्रतिक्षेत..!!

झेन's picture

2 Apr 2019 - 9:39 am | झेन

सफर मस्त , वर्णन पण सुरेख. हा भाग तर लै भारी. तूम्ही इथे नवीन असाल पण लिखाण नवख्या सारखे नाही. पुढील सफरीसाठी शुभेच्छा, उन्हाळ्यानंतरच करा :-)

मार्गी's picture

2 Apr 2019 - 10:27 am | मार्गी

अभिनंदन!! सविस्तर लिहिल्याबद्दल विशेष आभार. तुम्हांला व्य. नि. करतो आहे.

अन्या बुद्धे's picture

2 Apr 2019 - 10:41 am | अन्या बुद्धे

धन्यवाद मंडळी!

सुधांशुनूलकर's picture

2 Apr 2019 - 1:19 pm | सुधांशुनूलकर

सर्व भाग वाचले. आवडले.
प्रत्येक भागाला प्रतिसाद देणं जमलं नव्हतं, म्हणून हा घाऊक प्रतिसाद.

जरा चार ओळी जास्त लिहा...

होऊदे खर्च. ;)

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Apr 2019 - 1:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

सायकल सफर आवडली. तुमच्याबरोबरच आम्हिपण पुढे पुढे चाललोयअसे वाटत होते. साडेपाचशे कि.मी. म्हणजे चांगलाच पल्ला मारला की एकट्याने.

काही वर्षांपुर्वी आम्हि ८ मित्रांनी मिळुन ९ दिवसात कल्याण ते कल्याण अशी अष्ट्विनायक सायकलट्रिप केली होती त्याची आठवण झाली. अशा ट्रिपमुळे आपले अनुभवविश्व समृद्ध होते हे एकदम मान्य. असेच फिरत आणि लिहित राहा.

mayu4u's picture

13 Apr 2019 - 3:40 pm | mayu4u

आणि भारी वर्णन!