पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी

प्रशांत's picture
प्रशांत in भटकंती
26 Mar 2019 - 2:37 pm

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - १ पुणे ते कराड

दिनांक १५ डिसेंबर शनिवार

संध्याकाळी साधारण सात वाजता हॉटेल पंकज कराडला पोहोचलो. सायकली नीट लॉक करून रूम मध्ये पोहोचलो, तोच गुरुजींचा आदेश आला "पोरांनो आधी स्ट्रेचिंग करूया नंतर अंघोळ करून जेवायला जाऊ"

तेवढ्यात सिद्धू पाटलांचा फोन आला "मी कराड पासुन पाच किलोमीटर अंतरावर आहे, ऍसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे BRM (ब्रह्म) क्विट करण्याचा निर्णय घेतोय. मी येतो तोवर माझ्यासाठी रूम बुक करा"

आम्ही सिद्धूची वाट पाहत असताना शैलेशला घरून फोन आला. फोनवर बोलून झाल्यानंतर शैलेशने सांगितले की त्याला आत्ताच कोल्हापूरला जावे लागेल, नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट आहेत म्हणून आताच जाणे गरजेचे आहे. उद्या सकाळी राईडला जॉइन करतो किंवा मध्ये कुठे जाईन करता येईल का ते बघुया. जेवण करून शैलेशने कोल्हापूरची बस पकडली.
शैलेश कराडला सकाळी किती वाजता येईल हे निश्‍चित नव्हतं त्यामुळे सकाळी हॉटेल पंकज मधेच नाश्ता करून निघूया असे ठरवले. शैलेश कोल्हापूरला गेल्यामुळे सिद्धू साठी वेगळी रूम घेण्याची गरज पडली नाही.

दिनांक १६ डिसेंबर रविवार

प्लॅन प्रमाणे आज निपाणीला मुक्काम करायचे होते. नाश्ता करताना आबांनी सांगितले की आपल्याला आज फारच कमी अंतर जायचे आहे. कराड ते कोल्हापूर ४० किलोमीटर आणि तिथून निपाणी ४० किलोमीटर असा आपला एकूण ८० किलोमीटर सायकलिंग करायचे आहे आणि यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चार तास लागतील. तरी आपण शैलेशची वाट बघूया आणि तो आला की आपण निघुया. आबाला सांगितले की अंतर ११० किलोमीटर आहे, मॅप लावून आपण अंतर किती याची खात्री करूया असे म्हटल्यावर आबा म्हणाला "अरे हा माझा नेहमीचा रस्ता आहे इथून मी एका तासात कोल्हापूरला पोहचतो". मग आम्ही सगळे गप्प होऊन नाश्त्यावर ताव मारला. नाश्ता करत असताना शैलेशचा फोन आला तो कराड पासुन पंधरा किलोमीटर अंतरावर होता. आमच्याकडे थोडा वेळ असल्यामुळे आम्ही सायकल ची तपासणी करायचे ठरवले यावेळी सायकल ची सायकलची तपासणी कशी करावी याचे प्रशिक्षण गुरुजींनी दिले. आम्ही कोणीही चैन ऑईल सोबत आणले नाही हे सिद्धूला सांगितले तेव्हा त्याने आमच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघत त्याच्या बॅगमधून ऑईल बॉटल काढून आम्हाला दिली.

1 4

शैलेश कराडला दहा वाजता पोहोचला, आम्ही लगेच बॅग्स सायकलवर लावल्या, फोटो काढले व सिद्धू चा निरोप घेऊन निघालो.
2 3
एक दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर कोल्हापूर ६८ किलोमीटर असा दगड दिसला, आबाला म्हटले बघा कोल्हापूर किती आहे? यावर आबा बोलला गाडीने एकच तास लागतो, सायकलने किती वेळ लागते ते आज बघूया.

शैलेशने सकाळी नाश्ता केला नव्हता त्यामुळे तो पुढे निघाला होता, साधारण एक तास सायकल चालवली असेल शैलेश पेट्रोल पंपाजवळून नाश्ता करत होता. त्याच्यासोबत चहा घेतला व पुढे निघालो.
5
थोड पुढे आल्यावर निपाणी ७४ किमी ची पाटी दिसली. सायकल बाजूला घेतली आणि पाणि पित तिघांची वाट बघत बसलो. चौघे जमल्यावर पुढचा ब्रेक हॉटेल साई इंटरनॅशनलला घेऊ असे ठरवले. आमच्या सायकल सायकल ग्रुप वर हे हॉटेल मधे बायोब्रेक वाल हॉटेल म्हणुन प्रसिद्ध आहे.
6

साई इंटरनॅशनल थांबून फ्रेश झालो, ताक पिवून झाल्यावर थोडा वेळ आराम केला. निघताना पाण्याच्या बॉटल भरून घेतल्या व कोल्हापूरकडे निघालो.
7

आम्हाला उशीर झाल्यामुळे कोल्हापूरला आबाच्या घरी जाणे शक्य नव्हते म्हणून आबाचे आई-वडील भेटायला तावडे होटेल कॉर्नरला येणार होते.
दुपारची वेळ झाली होती आणि भूक पण लागली होती म्हणून आम्ही जवळच तनवानी हॉटेल बघितलं आणि तिथेच आबाच्या आई-वडिलांसोबत गप्पा मारत जेवण केलं.
8

जेवण झाल्यानंतर आबांच्या आई-वडिलांचा निरोप घेतला आणि आम्ही निपाणी कडे निघालो.
2

.

3
कागलच्या दोन किलोमीटर अलीकडे एका बाईकस्वार ने "Good going Prashant" आवाज दिला आणि विचारले ओळखले का? त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे सुरुवातीला ओळखले नाही परंतु थोडावेळ बोलल्यानंतर आवाजावरुन ओळखले. म्हटल बोला मानेसाहेब इकडे कसे काय आणि ते ही गाडीवर?
(अजित माने हे पुण्याला असतात व काही कारणानिमित्त ते कागलला आले होते, आम्ही कन्याकुमारीला जात आहोत हे त्यांना माहिती होते म्हणून खास शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते.) त्यांच्या सोबत फोटो काढून आम्ही लगेच पुढे निघालो कारण साडे चार वाजले होते.
9

कर्नाटकमधे शिरतांना साधारंण ५:३० वाजले असतील

सहा वाजून वीस मिनिट झाले होते निपाणी नगरपालिकेचा प्रवेशद्वार दिसलं त्यावरील "निपाणी नगरीत आपले सहर्ष स्वागत" वाचून आनंद झाला.
10
निपाणी वासियांनी तर आमचे स्वागत फारच उत्साहाने व आनंदाने केले.
आम्ही हॉटेलची चौकशी करत असताना जाधव नावाच्या व्यक्तीला विचारले की सूर्या हॉटेल कुठे आहे? त्यावर कुठून आले आहात कुठे जाणार आहात अशी चौकशी करायला सुरुवात केली तोवर आणखी दोन-तीन लोक जमलेत त्यांनी आम्हाला हॉटेल ऐवजी मठात राहायला सांगितले (उगाच हॉटेलमधे पैसे का घालवता) व मठामध्ये फोन करुन माहिती दिली की पुण्यावरून चार सायकलस्वार येत आहेत त्यांची झोपण्याची व जेवणाची व्यवस्था तिथेच करा. दोघांनी तर चहा प्यायला घरी चला असा आग्रह केला.
आबा आणि गुरुजी पुढे निघाले होते, शैलेश आणि मी चौकात पोहोचेपर्यंत आबा आणि किरण (गुरुजी) "आप्पासाहेब परमाणे" सोबत संवाद साधत होते. सोबत आणखी तीन-चार मंडळी जमली होती. आमच्याकडे अंथरूण-पांघरूण नसल्यामुळे मठात आमची राहायची व्यवस्था होणार नाही असे आप्पांना वाटले म्हणून त्यांनी मठात जाण्याआधी खात्री करून जा असा सल्ला दिला, परंतु आमच्याकडे मठातील नंबर नसल्यामुळे संपर्क साधणे शक्य नव्हते. आमची ही अडचण आप्पांनी लगेच दूर केली त्यांनी कोणाला तरी फोनकरुन मठातील नंबर मिळवला व चौकशी केली. आप्पांचा अंदाज खरा ठरला मठात अंथरूण-पांघुरणाची व्यवस्था नव्हती. आता दुसरीकडे कुठे आमची राहण्याची व्यवस्था होईल का यासाठी आप्पांनी परत चार-पाच लोकांना फोन केलेत.
"एका हॉलमध्ये तुमची झोपण्याची व्यवस्था होऊ शकते. चला.." असे म्हणून आप्पा पुढे निघाले व आम्ही त्यांच्या मागेमागे.
आप्पा अचानक एका छोट्या हनुमान मंदिरासमोर थांबले म्हटले की तुम्ही पाच मिनिट वाट बघा मी थोडी चौकशी करून येतो. आप्पांच्या सोबत गुरुजी आणि आबा ज्या इमारतीमध्ये चौकशी साठी गेलेत तिथून नवरदेव व त्याच्या मागे वराती बाहेर पडले त्यावरून हे मंगल कार्यालय आहे हे समजले. आप्पांनी कार्यालयातील व्यक्तीसोबत गुरुजींची ओळख करून दिली आणि त्याला सांगितले की बाहेरून अंथरूण-पांघरूण आणून झोपण्याची व्यवस्था कर. तोवर आठ वाजले होते आप्पांना घरी जायची गडबड होती त्यांनी आमचा निरोप घेतला व जाता जाता जेवणासाठी गुरुजींकडे पैसे देऊ केले. हे आमच्यासाठी फारच अनपेक्षित होत, यावर काय बोलावे समजत नव्हते. गुरुजींनी त्यांना सांगितले की आम्ही सर्व नोकरी करतोय, आम्ही सायकल हौसेसाठी चालवतो. तरी प्लीज आम्हाला पैसे देऊ नका, आम्हाला आवडणार नाही. तुम्ही जी मदत केली याबद्दल फार फार धन्यवाद.
आप्पा जाताना सांगून गेले की तुम्ही पूजा मध्ये जेवण करा तिथे तुम्हाला चांगले शाकाहारी जेवण मिळेल.

आप्पा गेल्यानंतर आम्ही चर्चा केली व हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला कारण हॉलमध्ये शांत झोप लागणार नाही व एकच टॉयलेट बाथरूम असल्यामुळे सकाळी आवरायला उशीर होईल
12
आता आम्ही परत हॉटेल सूर्या च्या शोधात निघालो. आबांनी त्यांच्या ओळखीच्या कोल्हापूरमधील डॉक्टर मित्राला फोन केला, डॉक्टरांनी हॉटेल शिवला जाण्याचे सुचवले.
आम्ही हॉटेल शिव मधे दोन रूम्स घेतल्या. दोन दिवसाचे सायकलिंग चे कपडे धुतले आंघोळ केली व जेवण करण्यासाठी आबा आणि मी रुमच्या बाहेर पडलो तोच आम्हाला शैलेश रिसेप्शनला भांडताना दिसला. काय प्रकार आहे विचारल्यावर शैलेश बोलला "अरे आम्हाला यांनी डीलक्स रूम दिली" असे बोलून तू रुमची वैशिष्ट्ये सांगायला लागला "बदामी आकाराचा बेड आहे, टॉयलेट-बाथरूमला कळी नाही आणि पाणी सुद्धा नाही" यावर मी बोललो की अरे वाह म्हणजे तुम्हाला हनिमून स्पेशल रूम भेटली.
रिसेप्शन वरील मनुष्य रूम बदलायला तयार नव्हता त्यासाठी तो काहीही कारण सांगायला लागला
"तुम्ही रूम आधी बघायला हवी होती", "डीलक्स रूमचे बिल बनवले त्यामुळे तुम्हाला साधी रूम देता येणार नाही." (साध्या रूम चे पैसे कमी होते)
इत्यादी...

हे एकुन कालच्या रात्री जागूनही आज दिवसभर बरोबरीने निवांत सायकल चालवनारा शैलेश मात्र आता भडकला "अरे रुम व्यवस्थित आहेत कि नाहि हे तु बघायला पह पाहिजे की आम्हि....."

रात्रीचे नऊ वाजले होते, भूक लागली होती आणि आता दुसरीकडे हॉटेल शोधण्याची इच्छा पन नव्हती म्हणून आम्ही रिसेप्शन वाल्याला सांगितले वाटलं तर पैसे डीलक्स रूमचे घे पण दुसरी चांगली रूम दे. तो तयार झाला.

जेवायला कुथे कुठे जायचे? यावर आबा बोलला अरे आप्पांनी सांगितलेल्या ठिकाणी थांबलो नाहि, त्यांनी सांगितलेल्या हॉटेलवर जेवण करु.
मग आम्ही आप्पांनी सुचवलेल्या हॉटेल पूजा मध्ये जेवणासाठी गेलो व व्हे़जथाळी ऑर्डर केली. जेवण अप्रतिम होते व तिथली सर्व्हिसही खूप छान होती. जेवण करून येतांना पान खाल्ले व हॉटेलवर पोहचलो.
11

हॉटेलमध्ये शिरताच रिसेप्शन वरील मनुष्य पैसे घेऊन समोर आला आणि म्हणाला की हे पैसे परत घ्या. आम्ही त्याला विचारतोय अरे काय झालं ? पैसे का परत देतोय ?त्यावर तो म्हटला की मालकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले कि तुम्हि त्यांचे पाहुणे (गेस्ट) आहात तरी तुमच्याकडुन पैसे घ्यायचे नाहित. नंतर आम्हाला समजले की हॉटेलचे मालक आणि डॉक्टर (आबांच्या ओळखीचे) हे मित्र आहेत म्हणून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाही.

सकाळी लवकर निघायचं आहे म्हणून आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या व रूममध्ये जाऊन झोप काढली.

13

P2K: D2- Karad to Nipani Check out my activity on Strava: https://strava.app.link/qgJ7vAv5mV

प्रतिक्रिया

झक्कास सुरू आहे सायकल सफर..!!

प्रत्येक भाग नवीन मेंबराने लिहिण्याचा फॉरमॅटही मस्त.

गवि's picture

26 Mar 2019 - 8:05 pm | गवि

गुड गोइंग.

नैसर्गिक आणि उत्स्फूर्त लेखन.

पुभाप्र.

सायकली रुममध्ये आत ठेवता ना?
---
संध्याकाळी ( चारनंतर) हॅाटेल रुम शोधायची कठीणच असते. गंडवतात. एक तर आपण घाईत असतो.
---

किमिचाही अंतराचा घोळच झाला.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Mar 2019 - 7:02 am | भ ट क्या खे ड वा ला

मस्त वर्णन , अशी लंबी सफर करण्याची मजा काही औरच . त्यात असे जोडीदार म्हणजे सोने पे सुहागा ,दुधात साखर , सायकलिंगच्या भाषेत,चांगला रस्ता दाट सावली वगैरे वगैरे.

प्रचेतस's picture

27 Mar 2019 - 8:37 am | प्रचेतस

आता किमान महिनाभर पुढच्या भागाची वाट पाहाणे आले.

ओडिओ फाइल्स टाका भराभर आणि फोटो अॅल्बमसच्या लिंक्स द्या एकदम. सर्वांचे आवाज येतील, काम पटापट होईल.

वाचते आहे. पुढील भाग जरा लवकर येतील का?

प्रसाद गोडबोले's picture

27 Mar 2019 - 1:17 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम प्रवास वर्णन !

सायकल वर जमणे आता अशक्य वाटते , पण अशी बाई़क राईड करायला हरकत नाही !
@सनावृता, ह्या मान्सुन नंतर साधारण सप्टेंबर महिन्यात करुयात का प्लॅन ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2019 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त वर्णन,
पण कराड ते निपाणी अंतर माहित नसणे खटकले. एवढी मोठी जोखिम?
सहल कोणत्याही पूर्वतयारी शिवाय केली असे वाटले.
जरी थोडक्यात निभावले असले तरी भविष्यात अशा चूका टाळल्या पाहिजेत.
पैजारबुवा,

किरण कुमार's picture

27 Mar 2019 - 2:44 pm | किरण कुमार

दिवसाला ठराविक अंतर कापणे हाच मूळ प्लॅन होता हे अंतर कमी जास्त होउ शकते याची कल्पना होती त्यामुळे कुठेही आधी बुकिन्ग केले नव्हते , जिथे संध्याकाळ होईल तिथे थांबायचे , कधी अंतर दूपारीच संपले तर अजून पुढे सयकल हाकायची असा साधा सोपा प्लॅन होता , एकूण अंतर तेवढे माहित होते त्यामूळे जोखीम नव्हती, कुतुहल आणि सफरीचा आनंदच होता .

किरण कुमार's picture

27 Mar 2019 - 2:46 pm | किरण कुमार

नेहमीप्रमाणे सूंदर .. पुढील भाग लवकर प्रकाशित होईल एवढी काळजी घ्या

सस्नेह's picture

27 Mar 2019 - 3:39 pm | सस्नेह

वाचतेय...
बादवे, कराड ते निपाणी अंतर गुगलून का पाहिले नाही ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2019 - 4:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चक्क प्रशांतने असं ओघवते लेखन करावे, डोळे भरून आले रे...!!

रसत्याने लागलेले काही सांस्कृतिक ठेवे, त्याचे फोटो. तुम्ही मित्र मंडळीच्या मुक्कामी गप्पा, रसत्यातल्या गप्पा. असंही येऊ द्या.

प्रशांतसेठ, नियमित लिहित राहा. लेखन शैली चांगली आहे.

-दिलीप बिरुटे
(प्रशांतचा ग्लासमेट) :)

गवि's picture

27 Mar 2019 - 5:22 pm | गवि

डोळे भरून आले रे...!!

हा रुमाल घ्या आणि पुसा ते डोळे.

या वयोवृद्धावस्थेत बरं नव्हे डोळे सारखे भरुन येणं.

-(हितचिंतक) गवि

या लिखाणाचे पुढचे भाग आले का..?

कंजूस's picture

10 Dec 2019 - 6:43 pm | कंजूस

तुम्ही इथे येतच नाही म्हटल्यावर कोण येणार?

जेम्स वांड's picture

11 Dec 2019 - 7:53 pm | जेम्स वांड

तुमच्या शारीरिक कष्टांवर आणि सायकलिंगवर बोलायची आमची औकातच नाही. नवा भाग नव्या मेंबरनं लिहायचा प्रयोगही उत्तम पण त्यासोबत आगाऊपणा करून सांगतोय थोडं शुद्धलेखन मुद्द्यावर पण लक्ष द्यावे. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं हे खरं पण ह्या अत्युत्तम कंटेंटला चार चांद लावायचे असले तर भाषा पण भारी असली तर डबल मज्जा.

लहान तोंडी मोठा घास बद्दल माफी असावी

(भोचक) वांडो

जेम्स वांड's picture

11 Dec 2019 - 8:03 pm | जेम्स वांड

इथे टाकणे नियमात बसते का नाही कल्पना नाही पण मराठी जालीय साहस-प्रवास-वर्णनात्मक लेखनात बेंचमार्क म्हणाव्या अश्या दोन सफरी/लेखमाला मायबोली ह्या संस्थळावर प्रसिद्ध झाल्या होत्या, मायबोलीकर आशुचॅम्प ह्यांनी लिहिलेल्या ह्या सफरीच्या लेखमाला उत्तम आहेत, वाचल्या नसतील तर इथे त्यातील कन्याकुमारी सफर वाचली जाऊ शकते

हेतू फक्त काहीतरी सकस तुम्हाला विषयानुरूप सुचवायचं असा आहे, किंतु धरू नये, माझा "तुलना" करायचा गुंजभरही उद्देश्य नाही हे आधीच स्पष्ट करतो, बाकी लिंक धोरणात बसत नसेल तर प्रतिसाद उडवला तरी हरकत नाहीच :)