हंपीची हुलकावणी भाग १

Primary tabs

kool.amol's picture
kool.amol in भटकंती
25 Jan 2019 - 12:11 am

मला हंपीला जावं असं कधी वाटलं हे नक्की आठवत नाही. फक्त एक आठवण आहे ती म्हणजे दहावीला असताना इंग्रजीला आम्हाला पुष्करणी असा धडा होता तेव्हा पुष्करणी आणि हंपी ही दोन्ही नावं खूप आवडली होती. पुष्करणी ह्या प्रकाराला आमच्या इकडे बारव असं अगदीच बोजड म्हणायची पद्धत आहे त्यामुळे हे संस्कृतप्रचुर नाव आवडून गेलं. त्यानंतर हंपी तस विस्मरणातच गेलं. त्याच दुसरं कारण म्हणजे माझी दांडगी विस्मरण शक्ती! ही हंपीने दिलेली पहिली हुलकावणी. यथावकाश बारावी आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात अस्मादिक गुंतुन राहिले. जेव्हा नोकरी नामक बेड्या अडकल्या तेव्हा माझ्यातला विस्मरणात गेलेला भटक्या पुन्हा गवसला आणि सुरू झाली भटकंती! त्यातलीच एक सतत प्रकट होणारी इच्छा म्हणजे हंपीला जाणे पण काही केल्या योगच जुळून येईना. बाकी ठिकाणी भटकंती जोरात सुरू होती. काही सजातीय म्हणजे भटके मित्र मिळून खूपच गंभीरतेने प्लॅन केला पण तोदेखील हुकला. यावेळेस मित्रांनी हुलकावणी दिली. तो नाद सोडून दिला मग. काही दिवसांनी परत एकदा तिची आठवण आली. यावेळेस एकटाच निघालो. मुक्काम कोल्हापुरात करायचं ठरलं. पण पुण्यातच मामला फिस्कटला. मला अगदीच अल्लाउद्दीन खिलजी झाल्यासारखं वाटलं. पुन्हा काही दिवस असेच गेले आणि मग एके दिवशी 'ती'घटना घडली. सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलंच असेल मी कशाबद्दल बोलतो आहे ते. माझं लग्न ठरलं. चक्क हैदराबादची पोरगी चालून आली आणि मित्रांनी 2 मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळले. मी तेव्हादेखील मेव्हण्याला विचारलं की इथून हंपी किती दूर आहे, कोणी गेलं होतं का वगैरे. तिथून हंपीला गवसणी घालण्याचे प्रयत्न देखील फसले. आता मात्र मला खिलजी, तुघलक यांच्या रांगेत जाऊन बसल्यासारखे वाटले. हताश अवस्थेत असताना एका अनपेक्षित क्षणी मेव्हण्याचे लग्न ठरले आणि मला विलक्षण आनंद झाला. एक तर तो बिना लग्नाचा आनंदात आयुष्य जगत होता हे मला बघवत नव्हते त्यामुळे तो आनंद तर होताच पण मुख्य म्हणजे त्याची बायको हुबळीची आहे त्यामुळे हंपीला जाण्याचं आता जवळपास निश्चित झालं. मागच्या ऑगस्टमध्ये त्याचा साखरपुडा ठरला आणि मी लगेच त्याच्या 2 दिवस आधीच हंपीला जाणार आहे असे जाहीर करून टाकले. बायको आली तरी फार अडचण नव्हती पण तिला तिथे काही फारसं आकर्षक आहे असं काही वाटल नव्हतं कारण ती लहानपणीच तिथे जाऊन आली होती. ह्यामुळे मी एकटाच जाणार हे निश्चित झाले आणि मी तयारीला लागलो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. बायको आधीच माहेरी गेली असली तरी तिला अचानकच बरे वाटेनासे झाले त्यामुळे नाईलाजाने सासुरवाडीला जावे लागले. आमच्या लग्नाला फार दिवस झाले नसल्यामुळे अनुभवात कमी पडलो आणि फसलो असे बऱ्याच जणांचे मत पडले. बायकोने तिथे गेल्यावर आता मला बरे वाटू लागले आहे असे सांगितले आणि तू आला आहेस तर आपण सोबतच जाऊ असे सांगून गाडीच्या चाव्या हातावर ठेवल्या. त्या चाव्या जणू काही मला वाकुल्याच दाखवत होत्या. जाताना वाटेत 2 वेळेस हंपीच्या पाट्या दिसल्या आणि मला भडभडून आले. ही हुलकावणी फारच जीवाला लागली. त्यानंतर मात्र मी चंगच बांधला की 2018 मध्ये मी हंपी बघणारच. बायकोच्या ह्या फसवणुकीचा मी मनातल्या मनात अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि दिवाळीला सासुरवाडीला न जाऊन त्याचा सूड उगवण्याचा निश्चय बायको घरी नसताना करून टाकला. पण पुन्हा एकदा नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दिवाळी नंतरच्या आठवड्यात माझं एक काम दिल्लीला होतं पण ते अचानक रद्द झालं. बायको आधीच हैदराबादला गेली होती ती म्हणाली की मग इकडेच येऊन जा. न जाण्याचा निश्चय आडवा येत होता त्यामुळे काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होऊन बसले. तेव्हा मी अशी अट ठेवली की मी एक दिवस हंपीला जाऊन येईन हे कबूल असेल तरच मी येतो. ती तात्काळ तयार झाली पण आधीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे मी तिलाच तिकीट काढायला सांगून ते तिकीट माझ्या मोबाईलवर मागून घेतले आणि मगच हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेत पाय ठेवला. यावेळेस मात्र हंपी नजरेच्या टप्प्यात आली. तिला गवसणी नक्कीच घालणार होतो. कशी ते पुढच्या भागात सांगतो.

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

25 Jan 2019 - 12:15 am | पद्मावति

:) वाचतेय. पु.भा.प्र.

कंजूस's picture

25 Jan 2019 - 7:20 am | कंजूस

लेकिन हंपी बहोत दूर है।
इथून तरी.

यशोधरा's picture

25 Jan 2019 - 8:09 am | यशोधरा

सुरुवात आवडली

अनिंद्य's picture

25 Jan 2019 - 11:26 am | अनिंद्य

@ kool.amol,

हंपी मलाही अनेक वर्षे हुलकावणी देत असल्यामुळे एकदम रिलेट झाले :-)

पु भा ल टा.

प्रचेतस's picture

25 Jan 2019 - 12:00 pm | प्रचेतस

पटापट लिहा पुढचा भाग.
हंपीने प्रचंड आनंद दिला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2019 - 12:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात. पुभाप्र.

पर्यटन हे तिथे आजुबाजुला राहणारे मित्र, नातेवाइक ( असले तरी) यांच्या भरोशावर कधीच करायचं नसतं. एवढंच काय ते काही माहिती देतील हासुद्धा भ्रम असतो.

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2019 - 1:29 pm | चौथा कोनाडा

मस्त. खुसखुशीत !
झालीय निर्माण उत्सुकता, पुढच्या भागा बद्दल.

टाकणे लवकर भाग पुढचा
( सोडणे गॅप परिच्छेदांमध्ये सुवाच्यतेसाठी, कृपया)

उपेक्षित's picture

25 Jan 2019 - 2:56 pm | उपेक्षित

वाचतोय...

दुर्गविहारी's picture

25 Jan 2019 - 7:34 pm | दुर्गविहारी

छान लिहीताय ! पु. भा.ल.टा.

kool.amol's picture

26 Jan 2019 - 1:37 pm | kool.amol

सर्वांचे आभार. मी एकच दिवस तिथे होतो पण थोडा अभ्यास करून गेलो होतो त्यामूळे तिथल्या स्थानांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न पुढच्या भागात नक्की करेन. हंपी हे मला स्थळ न वाटता तो एक अनुभव वाटला. तुमच्या सूचना लिखाणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. हंपीवर खूप जणांनी खूप काही लिहिलं आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं देण्याचा मानस आहे. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे हुरूप नक्कीच वाढला आहे.

कंजूस's picture

26 Jan 2019 - 6:57 pm | कंजूस

अनैगोंडी का काय ते नदीपलीकडच्या डोंगरावर आहे ते पाहता नाही आले कारण वाहन नव्हते. तिथे काय आहे?

मी देखील ते पाहू शकलो नाही. पण बहुदा तिथे देखील एक मंदिर आहे.

मी देखील ते पाहू शकलो नाही. पण बहुदा तिथे देखील एक मंदिर आहे.

शशिकांत ओक's picture

29 Jan 2019 - 9:11 pm | शशिकांत ओक

हंपी 'हसीना' असेल असे वाटून राहिले आहे...! सांगा कशी आहे ती.

kool.amol's picture

30 Jan 2019 - 11:50 pm | kool.amol

हो ती हसीनाच आहे, प्रत्येक भागात जमेल तसं वर्णन करणार आहे, तिच्या ह्या हुस्नच.

कंजूस's picture

31 Jan 2019 - 5:26 am | कंजूस

मिस् हंपी?
ब्लॅागमध्ये फोटो आहेत ना त्याची लिंक देणे.