अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
प्रतिक्रिया
21 Dec 2018 - 5:19 pm | प्रसाद_१९८२
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस खुप झपाट्याने गळतात. हे खरे आहे का?
--
असू शकते,
कारण हॉलिवूड चित्रपटात हॅलमेटधारी बाईकर्स गॅंगचे जे सदस्य दाखवतात, त्यातले बहुतावंशी टकले असतात.
21 Dec 2018 - 7:58 pm | सुबोध खरे
बरेच लोक हेल्मेट घातल्यामुळे केस गळतात अशी तक्रार करतात आणि त्याला अर्ध शास्त्रीय लोक दुजोरा देतात
परंतु वस्तुस्थिती अशी आहे --
आपली डोक्याची त्वचा जर निरोगी असेल तर केस गळत नाहीत.
पण आपल्या केसात कोंडा (DANDRUFF) असेल किंवा हेल्मेट अस्वच्छ असले तर जंतू संसर्ग होऊन केस गळू शकतात.
यासाठी हेल्मेट स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. वरच्या प्रतिसादात दिलेला उपाय करून पाहू शकता.
किंवा हेल्मेटच्या आत मध्ये HAND SANITISER चोळा. यातील अल्कोहोल सर्व जंतूंचा नाश करते आणि हेल्मेट जंतुविरहित होते (पण हेल्मेट स्वच्छ होत नाही ) यासाठी साबणाच्या पाण्याने धुवून उन्हात वाळवणे हा उत्तम उपाय आहे.
पहा --http://www.newindianexpress.com/lifestyle/health/2018/feb/14/clean-helme...
बाकी अनुवांशिक कारणामुळे आपल्याला टक्कल पडणार असेल तर ते पडेलच त्याला हेल्मेट हे कारण देणे चूक आहे.
21 Dec 2018 - 5:47 pm | मार्मिक गोडसे
अपघातप्रसंगी हेल्मेट नसल्यास वैयक्तिक अपघात विमा नुकसानभरपाई देऊ नये.
21 Dec 2018 - 8:01 pm | सुबोध खरे
एखाद्या "माणसाच्या दीड शहाणपणामुळे" त्याचा जीव गेला तरी त्याच्या बायकामुलांना "वाऱ्यावर सोडणे" हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे.
तेंव्हा हे कायद्यात बसत नाही आणि मानवतावादाच्या हि विरुद्ध आहे.
माणसे हेल्मेट घालत नसतील तर त्यांना १०० रुपये दंड करण्याऐवजी त्यांना मोटार सायकल आहे तेथेच सोडून हेल्मेट आणायला लावले तर जास्त लोक हेल्मेट घालतील असे वाटते.
21 Dec 2018 - 8:55 pm | मार्मिक गोडसे
हे दीड शहाणे जेव्हा दारू पिऊन, स्टंटबाजी करताना अपघातात जीव गमावतात किंवा जायबंदी होतात तेव्हा ह्या विमा कंपन्या कोणतीच नुकसान भरपाई देत नाही. तोच न्याय नुसते हेल्मेट घेऊन आरशाला ,हाताला अडकवून गाड्या चालवणार्यांना का लावू नये?
3 Jan 2019 - 11:09 am | प्रकाश घाटपांडे
हेल्मेट घातल्यामुळे जीव वाचला आहे अशी उदाहरणे सापडतील पण हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा अपघात झाला आहे का?
3 Jan 2019 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे
"अपघात टाळण्यासाठी" नव्हे तर, "अपघात झाल्यास डोक्याला कमीत कमी दुखापत व्हावी यासाठी हेल्मेट घालायचे असते", हे पण आत्ता, इतक्या दळणानंतर, सांगायला लागते आहे ?!
संपूर्ण रामायण ऐकल्यानंतर "रामाची सीता कोण?" असा प्रश्न विचारल्यासारखे वाटले !!! =))
3 Jan 2019 - 12:11 pm | प्रकाश घाटपांडे
हे पण आत्ता, इतक्या दळणानंतर, सांगायला लागते आहे ?!>>> होय कारण हेल्मेटला विरोध नसून सक्तीला विरोध आहे हा मुद्दा मध्यवर्ती आहे हे सांगाव लागत. माध्यम देखील ही चर्चा हेल्मेटमुळे होणारी सुरक्षितता या मुद्द्याला मध्यवर्ती बनवतात. ्नियम असल्याने पटत नसले तरी हेल्मेट घातले पाहिजे असे म्हणून हेल्मेट घालणारे पण सक्तिला विरोध करणारे पुण्यात आहेत.
3 Jan 2019 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
हेल्मेट न घालण्यामुळे झालेल्या अपघातांमध्येसुद्धा झालेल्या अधिक धोका/जखमांसाठी, जास्त प्रमाणात सार्वजनिक व्यवस्था वापरली जाते व तिच्यासाठी अधिक संसाधनिक व आर्थिक खर्च होतो. त्या खर्चाला हेल्मेट न घालणार्या नागरिकांचा बेजबाबदारपणा कारण आहे. त्याचा भार हेल्मेट वापरणार्या सुजाण नागरिकांवर पडू देणे अन्याय्य व बेजबाबदारपणाचे आहे.
अश्या बेजबाबदारपणाचा खर्च/टॅक्स भरण्यासाठी ते लोक तयार आहेत काय?
लोकशाही म्हणजे सर्वांना आपल्या मनाप्रमाणे स्वच्छंदपणे वागण्याची मोकळीक नव्हे... तसे करणे लोकशाही नाही तर हट्टशाही किंवा जंगलराज होईल.
एकाच्या अधिकारांमुळे दुसर्याच्या अधिकारांवर गदा येऊ लागते तेव्हा ती सीमा न ओलांडणे, हेच जबाबदार लोकशाहीतील जबाबदार नागरिकाचे महत्वाचे लक्षण आहे. भारतातले लाडावलेले 'तथाकथित अॅक्टिविस्ट', स्वतःचा अहंमन्य दुराग्रह कुरवाळीत*, ही सीमा, नेहमी ओलांडताना दिसतात.
++++++++++
* काही सकारात्मक काम करण्याऐवजी, केवळ विरोधी/नकारात्मक कामाने आपले नाव सतत जनतेसमोर ठेवणे (making their presence felt by nuisance) हे त्यांचे वैशिष्ठ्य (diagnostic characteristic) झाले आहे.
3 Jan 2019 - 3:58 pm | प्रकाश घाटपांडे
अश्या बेजबाबदारपणाचा खर्च/टॅक्स भरण्यासाठी ते लोक तयार आहेत काय?>> लायसन्स विमा व हेल्मेट हे नुकसान भरपाई द्यायची असल्यास आवश्यक करावे. सुरक्षिततेला प्राधान्य द्यायचे की सोयीला हे ठरवता येईल. त्याच भार 'जबाबदार' लोकांवर येणार नाही.
3 Jan 2019 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे, सरळ, सोपा आणि तार्किक उपाय नको; स्थिती अजून गुंतागुंतीची करत राहू... विचारवंतांना खुसपटे काढत जन्मभर दुकान चालविण्यासाठी ऊत्तम ऊपाय. --/\--
3 Jan 2019 - 7:02 pm | सुबोध खरे
हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा अपघात झाला आहे का?
हेल्मेटच्या पुढे असलेल्या वायझर मुळे किडे, दगड किंवा बारीक धूळ डोळ्यात जाणे थांबते.
वेगाने किंवा रहदारीच्या रस्त्यावर अचानक पणे असे झाल्याने आपला तोल जाऊन अपघात होतो असे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे.
मला स्वतःला हेल्मेटचा अनेक वेळेस फायदा झालेला आहे.
एकदा झाडाची बारीक फांदी डोक्यावर पडली तेंव्हा हेल्मेट होते म्हणून माझा तोल गेला नाही.
डोक्याचे संरक्षण झाल्याने तोल जात नसल्यामुळे दुचाकीवर हेल्मेटमुले अनेक अपघात टळतात हि वस्तुस्थिती आहे.
दुचाकीवर हेल्मेट घालणे हे चारचाकीत सीट बेल्ट लावण्याच्या कायद्यासारखेच आहे. यात विरोध करण्यासारखे काय आहे?
पुण्यातील काही लोकांना आपण सर्वात जास्त शहाणे आहोत असा दंभ झाला आहे.
नागरिकांच्या कल्याणासाठी स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध (reasonable restriction) घालणे हा सरकारचा घटनात्मक हक्क आहे
आपल्याकडे लोकशाही म्हणजे "स्वातंत्र्य" नव्हे तर "स्वैराचार" झाला आहे.
3 Jan 2019 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपल्याकडे लोकशाही म्हणजे "स्वातंत्र्य" नव्हे तर "स्वैराचार" झाला आहे.
+१००
हेच लोक "विचारवंत" परदेशांत जाऊन आले की, "काय भारी कायद्याचे राज्य आहे" म्हणून तोंड फाटेपर्यंत स्तुती करत असतात आणि, "आपल्याकडे कधीतरी असे होईल काय?" अशी खंत करत असतात... तिकडचे बहुसंख्य नागरिक कायदा पाळणारे असतात, कायदा पाळू नका असे सांगणार्या "तथाकथित विचारवंतांवर" कायदेशीर कारवाई होते आणि कायदा पाळला नाही तर कायद्याचा बडगा पाठीत बसतो, इकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करतात !
आताच टीव्हीवर पुण्यातल्या हेल्मेटसक्ती* विरोधात उधळलेली विचारसुमने पाहून, माझे काही जगभराचा दीर्घ अनुभव असलेले मित्र (ज्यांच्या ज्या मताला मी विरोध करत असतो), "भारतिय लोक लोकशाहीला लायक नाहीत", असे म्हणत असतात, ते खरे आहे की काय, असा संभ्रम निर्माण झाला. :(
जे आता हेल्मेटला विरोध करत आहेत ते, पुण्यात दुचाकीचालक गाडी किती धोकादायक पद्धतीने चालवत असतात, चौकात सतत चारचाकीला दोन्ही बाजूंनी कट मारून जात असतात, रहदारीतून कसे नागमोडी जात असतात, बेमुर्वतपणे दुचाकी फुटपाथवरून चालवत असतात, सिग्नल तोडून जातात, थांबलेच तर झेब्रा स्ट्राईप्सवर थांबतात आणि पादचार्यांना अडचण करत असतात, इत्यादी गोष्टींबाबबत पूर्णपणे अंध असल्यासारखे बोलत होते. त्यांच्यामते हेल्मेट घालणे हाच जगातला सर्वात मोठा जुलूम आहे ! "हेल्मेट नसल्यामुळे अपघात होऊन माणूस मेला/अपंग झाला तर आम्ही आमचे बघून घेऊ. सरकारला कशाला हवी त्याची काळजी?" असे मतही ठासून सांगितले जात होते. हे सगळे ऐकून हसावे की रडावे कळत नव्हते. :(
याशिवाय, राजकिय पक्ष या घटनेचा आपल्या पक्षाचे नाव घेत पुरेपूर फायदा उठवत आहेत, हे उघडपणे दिसत आहे. आमच्या पक्षाने कशी याआधी हेल्मेटपासून लोकांची सुटका केली होती आणि आताही आमचा पक्ष अजून जोरदार आंदोलन कसे चालू ठेवेल, याबाबत वल्गना चालू होत्या. सर्वात वाईट असे की, एकट्या पुण्यात भारतातील २५% दुचाकी अपघात होतात, हे वार्ताहर सांगत होता तिकडे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नव्हते ! भारतात लोकांच्या बर्यावाईट भावनांना हात घालून, त्यांना आपल्या राजकिय उद्येशांसाठी 'कॅनन फॉडर' बनवणे, हे नेहमीचे झाले आहे. आणि काही लोकांनाही त्यातही मजा वाटते आहे ! :(
++++++++
* खरे तर याला हेल्मेटसक्ती म्हणणे हाच विपर्यास आहे, कारण, खरा प्रकार असा आहे की, "खूप जुन्या कायद्याची पोलिसांनी, असंख्य वेळा पुरेशी पूर्वसूचना देऊन, मगच अंमलबजावणी करणे सुरु केलेले आहे".
4 Jan 2019 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे
* खरे तर याला हेल्मेटसक्ती म्हणणे हाच विपर्यास आहे, कारण, खरा प्रकार असा आहे की, "खूप जुन्या कायद्याची पोलिसांनी, असंख्य वेळा पुरेशी पूर्वसूचना देऊन, मगच अंमलबजावणी करणे सुरु केलेले आहे".>>> हे बरोबरच आहे. या बरोबरच अनेक असे कायदे आहेत ते जुनेच आहेत पण त्याची प्रभावी अंमलबजावणी केली तर अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होइल व वाहतुकही सुरळीत चालेल. त्याची पण अंमलबजावणी करा.
4 Jan 2019 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे
तुमचे उत्तर उपयुक्तते बाबत आहे. उपयुक्तता मान्यच आहे हे चर्चेत वेळोवेळी अधोरेखीत झाले आहेच. प्रश्न हेल्मेट न घातल्याने अपघात होतात का? असा आहे. वाहतुकीचे अन्य नियम न पाळल्याने इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसे इथे काही आहे का? चौकटराजा यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे त्याचे काय? ज्यांना सुरक्षितता हवी आहे ते सक्ती नसतानाही हेल्मेट घालतातच. घरात फरशी वरुन पाय घसरुन पडल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याने मृत्यू होतातच. प्रमाण कमी असेल पण आहे. मुद्दा सरसकट सक्तीबाबतचा आहे.
4 Jan 2019 - 10:20 am | विशुमित
आताच एक ऐक्सीडेंट पाहिला. हेल्मेट होते पण रॉन्ग साइड ने ओवर टेक करत होता. गेला बिचारा.
....
बाकी आजकाल मला हेल्मेट घातल्याने मानेला भयंकर त्रास होतो. ट्राफिक मधे खुप गुदमर्लया सारखं देखील होते.
मी सगळे वाहतुकीचे नियम पाळतो. घिसाड घाई तर बिलकूल नसते.
4 Jan 2019 - 8:05 pm | खटपट्या
मजबूत हेल्मेट पण वजनाला हलके असे बाजारात उपल्ब्ध आहे. ते वापरा. मान दुखणार नाही.
ट्राफिक मधे पुढची काच थोडी उघडी ठेवा. थोडा वेग घेतल्यावर परत काच बंद करा.
मला हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना भयंकर त्रास होतो. जे चष्मेवाले असतात त्यांना हेल्मेट घालताना आणि काढताना चष्मा काढावा लागतो. पण त्यावर उपाय नाही.
4 Jan 2019 - 11:22 am | सुबोध खरे
वाहतुकीचे अन्य नियम न पाळल्याने इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसे इथे काही आहे का?
रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवून उलटे येणे, सिग्नल तोडणे अशा सारखे गुन्हे केल्याबद्दल खरं तर एक हजार रुपये दंड झाला पाहिजे. कारण अशा दीड शहाण्या माणसांमुळे नियमानुसार चालवणाऱ्या वाहकांना नाहक मनस्ताप होतो. सिग्नल सुटला म्हणून एखादा मोटारवाला निघाला आणि अचानक एखादा दुचाकीवाला दुसऱ्या रस्त्यावरून आडवा आला तर ब्रेक दाबेपर्यंत तो दुचाकीवाला आडवा होतो आणि डोके आपटल्यामुळे मरतो (हेल्मेट नसले तर शक्यता २००%) यात मोटारवाल्याची काय चूक असते? पण पुढची काही वर्षे नाहक मनस्ताप टोचणी आणि पैशाची नासाडी होते त्याला जबाबदार कोण?
उलटे येणे, सिग्नल तोडणे यावऱ् कायद्याची कठोर अंमल बजावणी चालू केली तर पोलीस राज्य आहे म्हणून लोक हाकाटी पिटू लागतात.
ढोल ताशे उच्चरवात वाजवणे हा देखील एक अत्यंत उच्छाद प्रकार आहे. त्यावर कार्यवाही करायची कि लगेच स्थानिक गुंड नेते आणि धर्ममार्तंड मोर्चे घेऊन येतात.
आणि अशा लोकाना तथाकथित पुरोगामी समाजवादी विचारवंत लगेच वैचारिक बैठक पुरवतात.
पोलिसांना काम करायचे असले तरी हात पाठीमागे बांधून करावे लागते. त्यामुळे आपल्याकडे "होता है" "चलता है" सारखी मनोवृत्ती झाली आहे.
गम्मत म्हणजे लष्करात हेल्मट घातलेच पाहिजे या नियमाची कठोर अंमल बजावणी होते आणि तेथे कितीही उच्च दर्जाच्या अधिकारी असेल तरी त्याला कमांड मुख्यालयातून "प्रेमपत्र" येते. आणि हे पत्र तुमच्या गोपनीय फाईल मध्ये एक वर्ष राहते. या कालावधीत दुसरा गुन्हा केला तर तुमची बढती थाम्बू शकते किंवा (गेल्या ९० दिवसात झाली असेल तर) झालेली बढती रद्द होऊ शकते.
असे नियम नागरी जीवनात लागू केले तर लषकरी हडेलहप्पी म्हणून त्याची हेटाळणी होते.
लोकशाही म्हणजे रस्त्यावर हगायचे "स्वातंत्र्य पाहिजे" अशी व्याख्या झाली आहे.
4 Jan 2019 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
घरात फरशी वरुन पाय घसरुन पडल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याने मृत्यू होतातच. प्रमाण कमी असेल पण आहे.
आता याचा इथे चाललेल्या चर्चेशी ओढूनताणूनही काही संबंध आहे का?
घाटपांडेसाहेब, असे काहीबाही लिहून, तुमच्या तर्कशास्त्रिय क्षमतेबद्दल, वाचकांच्या मनात, दाट संशय निर्माण करत आहात, हे आपल्या लक्षात येत आहे का? :)
4 Jan 2019 - 7:40 pm | चामुंडराय
>>>> पुण्यातील काही लोकांना आपण सर्वात जास्त शहाणे आहोत असा दंभ झाला आहे.
पुणेकर सहजासहजी कोणालाही डोक्यावर घेत नाहीत.....
मग ते हेल्मेट असो की दुसरं काही.
एक कायप्पा फॉरवर्ड....
3 Jan 2019 - 11:25 am | अभ्या..
एका योगायोगाचे मात्र कौतुक वाटले,
दि. २० डीसेंबरपासून सोलापूर आरटीओने हेल्मेट नसेल तर दंड आकारायला सुरुवात केली. अगदी नाकाबंदी केल्याप्रमाणे १०-१५ ट्राफिक आणि आरटीओवाले थांबून चेक करत होते. इतर जिल्हाधिकारी वगैरे प्रशासन सूत्रांनी हेल्मेटसक्ती आहेच तेंव्हा नागरिकांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे असे स्टेटमेंट पेपरला दिले. ह्या दोन दिवसात कमीतकमी १५० विक्रेते (जे बिहारी आणि राजस्थानी आहेत) रस्त्यावर स्टॉल लावून उभे राहिले. वेगा, स्टीलबर्ड सारखी दिसणारी डुप्लिकेट हेल्मेटे ३५० ते ५०० च्या दरम्यान विकत होते. ज्यावर सीएमएल नम्बरसहित आयएसाअय मार्क आहे. सोलापूरमधील ऑटोमोबाईल दुकानात सुध्दा स्टॉक येण्याआधी हे विक्रेते येऊन, विकून पसार होण्याच्या पण बेतात आहेत. इतक्या तत्परतेने एका दिवसात ४-४ ट्रक भरुन हेल्मेटे बाहेरच्या विक्रेत्यासह कशी येतात? त्यांना कशी खबर लागते? एका ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट वाल्याने तर सांगितले की हि मिलिभगत असते. बोगस हेल्मेट कॉस्ट २०० ते २५० रुपये असते. ते सरासरी ४०० ला विकतात. निम्मा प्रॉफिटमधील वाटा आर्टीओला दिलेला असतो. हे खरे असेल काय?
बाकी सक्तीबाबत आपला काही विरोध नाही. हेल्मेट वापरतोच. लोकांनीही वापरावे पण ह्या सक्तीआधी आरटीओने प्रेशर हॉर्न, कस्टमाईज्ड सायलेन्सर, झेनॉन हेडलाईट, रॅश ड्रायव्हिंग आणि फॅन्सी नंबरप्लेटावर सख्त कारवाई करावी. कंडम रिक्षा, वाळू डंपर आदी वाहनांची कसून तपासणी करावी.
3 Jan 2019 - 11:43 am | प्रकाश घाटपांडे
कुमार केतकरांना योगायोगावर आधारलेल्या कॉन्स्पिरसी थिअरी फार आवडतात.
3 Jan 2019 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे
चर्चेसाठी असा प्रकार घडला असे मानले तरीही...
हेल्मेटचा कायदा अनेक वर्षांपासून आस्तित्वात आहे. पोलिसांनी सक्ती करायला सुरु करण्याअगोदर लोकांनी त्याचे पालन करायला सुरुवात केली असती तर अश्या प्रकारांना मुळातच आळा बसला नसता का?
नागरिकांनी दर वेळेस दुसरीकडे बोट दाखविण्याऐवजी आपण आपली जबाबदारी पाळायचे ठरवले तर भारतातले ९०% गैरप्रकार थांबतील व नागरिकांच्या म्हणण्याला वजनही येईल... एकमेकाकडे बोटे दाखवर राहिल्यास असे प्रकार वाढतच राहतील.
3 Jan 2019 - 12:19 pm | प्रकाश घाटपांडे
हेल्मेटचा कायदा अनेक वर्षांपासून आस्तित्वात आहे. >> वाहतुकीचे अनेक नियम अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी करताना प्राधान्यक्रम ठरवायला नको का? गांभीर्य, तीव्रता, प्राधान्यक्रम, व्यवहार्यता असे अनेक मुद्दे अंमलबजावणी करताना विचारात घ्यावे लागतातच ना? पुणे हे दुचाकींचे शहर आहे.
3 Jan 2019 - 12:24 pm | अभ्या..
हेल्मेटाचा कायदा अनेक वर्षांपासून आज तर इतके दिवस पोलीस का दुर्लक्ष करीत होते? अचानक आली लहर केला कहर अशी का सक्ती? मुद्दा बोटे दाखवायचा नाही पण जर नागरिक अप्रामाणिक असतील तर त्या सिच्युअशनाचा फायदा कुणा चोरासोबत मिलीभगत करून प्रशासनातील व्यक्ती उचलत असेल तर ह्या गैरप्रकाराबद्दल पण बोटे दाखवू नये काय? सिध्द होण्यास अवघड पण नजरेस स्पष्ट कळणारे हे प्रकार गैरप्रकार ह्या सदरात येतच नाहीत काय?
3 Jan 2019 - 7:11 pm | सुबोध खरे
यात योगायोग काय आहे?
लष्करी भरतीच्या ठिकाणी एखाद्या बाजाराच्या जत्रेसारखे विक्रेते, हॉटेलं, पान तंबाखूच्या टपऱ्या एका रात्रीत उभ्या राहिलेल्या आणि भरती संपल्यावर दुसऱ्या दिवशी गाशा गुंडाळलेला दिसू लागतो. हे मी कित्येक वेळेस भारतात बऱ्याच राज्यात (महाराष्ट्रात कोल्हापूर येथे टेम्बलाई वाडी) पाहिले आहे.
एका फोन वरून हे काम होऊ शकतं. तिथल्या विक्रेत्यांना विचारून पहा. हा सर्व धंदा रोखीचा "करप्रणालीच्या बाहेरचा" असल्यामुळे मोठ्या कंपन्यासुद्धा यात सहज सामील होतात.त्यांचे विपणन करणारे अधिकारी याची खबर लागताच "धूमकेतू सारखे" हजर होऊन रोखीत पैसे घेऊन हेल्मेटची डिलिव्हरी देतात.
भारतात अनधिकृत धंदे किती पटकन उभे राहतात ते पाहायचे असेल तर एक जंगी रेव्ह (ड्रग्सची) पार्टी आहे अशी आवई उठवा आणि पहा कसे फटाफट फोन येतात ते. ( अर्थात योग्य ठिकाणी पाणी जिरवले नाही तर पोलिसांचा ससेमिरा पण लागेल)
3 Jan 2019 - 9:42 pm | अभ्या..
डॉक्टर, भरतीची निदान कल्पना असते की येथे, ह्या तारखेला भरणार आहे. तेथे एका दिवसासाठी रात्रीसाठी सगळे विक्रेते येतात, त्यात नवल नाही. विक्रेते कशी डिमांड पाहून माल फिरवतात हे चांगलेच माहीत आहे पण वर्षभर कुठेच न दिसलेले हे विक्रेते इथे ज्या दिवशी हेल्मेटसाठी पकडायला सुरुवात झाली परफेक्त त्या दिवशीच अगदी थोड्या सोलापूरकरांना कळाले. आणि त्यांच्यासाठी हेल्मेटविक्रेते हजर होते. जिल्हाधिकार्याचे निवेदन येण्याआधी पराराज्यातले विक्रेते स्टॉल लावून तयार होते ह्यात आपणाला काहीच वावगे वाटत नसेल तर आश्चर्य आहे.
4 Jan 2019 - 11:24 am | सुबोध खरे
"एका फोन वरून हे काम होऊ शकतं. तिथल्या विक्रेत्यांना विचारून पहा. हा सर्व धंदा रोखीचा "करप्रणालीच्या बाहेरचा" असल्यामुळे मोठ्या कंपन्यासुद्धा यात सहज सामील होतात.त्यांचे विपणन करणारे अधिकारी याची खबर लागताच "धूमकेतू सारखे" हजर होऊन रोखीत पैसे घेऊन हेल्मेटची डिलिव्हरी देतात.
भारतात अनधिकृत धंदे किती पटकन उभे राहतात ते पाहायचे असेल तर एक जंगी रेव्ह (ड्रग्सची) पार्टी आहे अशी आवई उठवा आणि पहा कसे फटाफट फोन येतात ते. ( अर्थात योग्य ठिकाणी पाणी जिरवले नाही तर पोलिसांचा ससेमिरा पण लागेल)"
हे वाचलं नाही का?
4 Jan 2019 - 7:24 pm | अभ्या..
हे तर सांगतोय तर तुम्ही धंदा कसा ते सांगायलात.
लोकांना सक्ती कधीपासून सुरु झालीय हे कळायच्या आत हेल्मेटवाले हजर होतात म्हणजे फोन कुणी केला त्यांना? कशासाठी? म्हणजे ठराविक काळाने असे काही करण्याचा नियम असला तर फायदा करुन देण्याची/घेण्याची खबरदारी कोण घेते? कशासाठी? बरं अगदी म्हात्रेकाकांच्या युटोपियाने जायचे ठरवले तर दोनचार पिढ्या जाणार हे सगळे साने गुर्जी होण्यात, तेम्व्हा सध्या सगळेजण हेल्मेटे घालून फिरले तरी मग सध्याचे खिसे भरण्याचे तंत्र तेही कायद्याचा धाक दाखवून कसे राबवले जाते? दुसरे काहीतरी राबवले जाणारच ना. उद्या गाडी रस्त्यावर फिरण्यासाठी योग्य कंडीशनमध्ये नाही किंवा आहे असे पाहायचा आदेश (पीयुसी/बीएस४ हे त्याचेच रुप आहे. आरटीओ मध्ये असते पण असे चेकिंग. त्याच्या नॉर्मनुसार रस्त्यावरच्या निम्म्या गाड्या बाद होतात.) आला तर तेही पैसे कमवायचे कुरणच ना? त्या लाटा मोजण्यात पण पैसे खाणार्यासारखी कथा झालीय सगळी.
ह्यासाठी रेव्ह पार्टीची गरज कशाला? हेल्मेटसक्तीतच दिसले की कसे अनधिकृत धंदे पटकन उभे राहतात आणि फटाफट फोन जातात ते. आणि इथे पोलीसच सामील असल्याने पाणी योग्य ठिकाणी जिरणार, वळणार आणि ससेमिराहि नाही. धन्य आहे.
4 Jan 2019 - 8:00 pm | खटपट्या
अभ्या सर, तुम्ही सांगितलेले सर्व खरे आहे असे मानले तरी मराठी लोकांना हेल्मेटच्या धंद्यात येउ नका कोण म्हणतय? जे मराठी बेरोजगार आहेत ते हेल्मेट घेउन रस्त्याच्या बाजुला का नाही विकत? आपण करत नाही म्हणून परप्रांतिय येतात.
8 Jan 2019 - 2:17 pm | मोदक
मराठी माणूस आणि धंदा यावर न बोलणेच चांगले..
समोरच्याचा वेळ कसा गृहीत धरायचा, फोन बिन न उचलता टांगणीवर कसे टाकायचे आणि एकंदरच गैरफायदा कसा घ्यायचा याचे मित्र म्हणवणार्यांचे इतके अनुभव आले आहेत की.. आता नाईलाजाने प्रोफेशनल पण परप्रांतीय माणसाकडे कामे द्यावी लागतात.
मित्र म्हणून भेटलास तर चहा पिऊ .. एकत्र जेवायला जाऊ.. पण कामाचे बोलायचे नाही असे एकाला अलिकडेच बजावले आहे.
त्यात अशी अनप्रोफेशनल माणसे संधी मिळाली की उपदेशाचे डोस पाजतात हे बघून तर कीवच येते.
3 Jan 2019 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ प्रकाश घाटपांडे आणि अभ्या..
नागरिकांनी दर वेळेस दुसरीकडे बोट दाखविण्याऐवजी आपण आपली जबाबदारी पाळायचे ठरवले तर भारतातले ९०% गैरप्रकार थांबतील व नागरिकांच्या म्हणण्याला वजनही येईल... एकमेकाकडे बोटे दाखवर राहिल्यास असे प्रकार वाढतच राहतील.
याचे उत्तर वर दिलेले आहे. तरीही अजून जरा इस्काटून सांगायची गरज आहे असे वाटते...
व्हॉटाबाऊटरी करून आपणही समस्येचा भाग होण्यामध्ये आपले बुद्धीचातुर्य खर्च करण्यापेक्षा, तेच बुद्धीचातुर्य वापरून, "आपण सुजाण नागरीक होऊन पोलीस व प्रशासनाला लाज वाटेल असे वागू " असे सांगताना "तथाकथित विचारवंत व जाणकार नागरिक" का दिसत नाहीत बरे ?
सद्या, तथाकथित विचारवंतांचा हेतू, प्रश्न सोडविण्यापेक्षा जास्त, व्हॉटाबाऊटरी करून प्रश्न चिघळत ठेवून आपले नाव माध्यमांत झळकत ठेवण्याकडे आहे, असेच दिसत आहे. हेल्मेटसक्ती बंद झाली की हे विचारवंत गायब होतात आणि नंतर कोणी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली की जोमाने पुढे येतात. या मधल्या भागात नागरिकांचे शिक्षण करणे त्यांची जबाबदारी नसते का? की फक्त नियमांविरुद्ध आंदोलने करून आपले नाव माध्यमांत झळकवणेच त्याचे उदिष्ट्य असते ?! त्यांच्याकडे प्रश्न असतात, व्हॉटाबाऊटरी तर जबरदस्त असते... पण, "स्वतःची/नागरिकाची जबाबदारी + सरकारची जबाबदारी" घेऊन बनवलेले समस्येचे उत्तर मात्र नेहमीच गायब असते ! "सरकारने/दुसर्याने त्याचे १००% काम करावे, मगच आम्ही आमच्या जबाबदारीचा विचार करू" ही रणनिती, समस्या अनंत काळासाठी चिघळत ठेवण्यासाठी, सर्वोत्तम उपाय असते, हेवेसांन. :(
असे तथाकथित विचारवंत लोक सर्वच समाजात असतात. मात्र, जेव्हा त्यांची सोईस्कर री ओढून, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुजाण म्हणवणार्या हुशार नागरिकांकडून केला जातो, तेव्हा ती स्थिती फारच चिंतनिय असते.
4 Jan 2019 - 6:37 am | चौकटराजा
मी स्वतः हायवेवरून जाताना हेल्मेट वापरतो पण कोथिंबीर आणण्यासाठी गर्दीतून वाट काढीत मंडईला जाताना माझ्या डोक्यावर हेलमेट असलेच पाहिजे याला माझा विरोध आहे .जाने वारी १ ला वहातुक पोलिसांशी संवाद झाला. त्यालाही " खाजगीत" सक्ती मान्य नाही . चार दिवस चालेल मग बंद पडेल असे त्याचे म्हणणे पडले.हा धागा इथे २०१४ पासून आहे . प्रतिसाद वाचता असे दिसते की २०१४,२०१६,, २०१८ चा डिसेंबर संपताना ही सक्ती उफाळून आलेली आहे .त्या पोलिसाचे म्हणणे असेच होते की वरून पैसे खाऊन आम्हाला ऑर्डर मिळत असतात सक्तीच्या .मंडईतून जात असता चारचाकी बेल्टला देखीला माझा विरोधच आहे !
4 Jan 2019 - 11:27 am | सुबोध खरे
वरून पैसे खाऊन आम्हाला ऑर्डर मिळत असतात सक्तीच्या
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात यापेक्षा मोठी शोकांतिका नसेल.
4 Jan 2019 - 12:09 pm | विशुमित
काहीही ढाका टाकता राव तुम्ही. पुरोगामी कुठचे.(कृपया हा घ्या).
2014 नंतर वरुन दबाव पैसे खाणे वगेरे वगेरे हे सगळं बन्द झाले आहे.
4 Jan 2019 - 12:23 pm | सुबोध खरे
यात राजकारण आणणे हा भंपकपणा आहे
4 Jan 2019 - 2:34 pm | विशुमित
जेवढी जास्त सक्ती /बंदी तेवढी सरकारी नोकर प्लस राजकारणी गब्बर!
ते हायवे लगतचे वाईन शॉप बंदी, प्लास्टिक बंदी, वाळूबन्दी इव्हन गोवंश हत्या बंदीत ही हे लोक "अच्छा खासा कमा रहे थे /है'.
आहात कुठे ?
====
हेल्मेटसक्ती हे कथित सुधारणावादी जमातीचा निव्वळ फार्स आहे, हेच हळूहळू स्पष्ट होत आहे. इकडे लोकांचे ट्राफिकमध्ये अर्धे पेट्रोल वाया जातंय आणि वरून पोलिसांचा सक्तीचा भुर्दंड! त्यात हे ठीक आहे सिग्नल न पाळल्याने गुन्हा ठरू शकतो, पण हेल्मेट न घालण्याने गुन्हा कसा होतो?
===
डॉ साहेब ..!
बाकी मी फक्त आरसा दाखवला. तुम्हाला कसली अर्शी लागली कुणास ठाऊक? म्हणे राजकारण आणू नका ! असो..
4 Jan 2019 - 6:16 pm | सुबोध खरे
2014 नंतर वरुन दबाव पैसे खाणे वगेरे वगेरे हे सगळं बन्द झाले आहे.
हे वाक्य आपलंच आहे ना?
का काँग्रेस/ राष्ट्रवादी च्या काळात दुचाकीचे अपघात होतच नव्हते आणि आताच व्हायला लागले आहेत.
These data demonstrate that lack of helmet use is significantly correlated with abnormal head CT scans (fractures), admission to the hospital, admission to the ICU, and overall worse TBI severity both in the prehospital and ED environments. These results underscore the importance of wearing helmets during recreational vehicle use and suggest a similar benefit for all recreational activity at high risk of brain impact. We join others in supporting a call for action to implement more widespread injury prevention and helmet safety education and advocacy.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3800611/
असे असंख्य वैद्यकीय पुरावे आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या.
असे बहुतांश अपघात हे तरुण माणसे आणि कमावत्या पुरुषांचे होतात आणि त्यांच्या जाण्याने किंवा कायमचे जायबंदी होण्याने कुटुंबाची वाताहत होते.
They found that bicyclists who ride without helmets are 3 times more likely to die from a head injury than those who wear helmets (adjusted odds ratio [aOR], 3.1; 95% confidence interval [CI], 1.3 - 7.3).
More than three quarters (77%) of the accidents involved motor vehicles and 86% of the victims were men,
https://www.medscape.com/viewarticle/773101
येथे पण आपल्याला राजकारण आणावेसे वाटले हेच दुर्दैव.
5 Jan 2019 - 6:24 pm | विशुमित
2014 नंतरच काही दिसलं की देव भंडारतात.
जाऊ ध्या, तुम्हाला कोटी नाही समजली. असो..
4 Jan 2019 - 7:07 pm | मार्मिक गोडसे
आता आयांनीच चौकाचौकात उभे राहून तरुणांना हेल्मेट साठी भावनिक आवाहन करावे.
25 Jan 2019 - 12:33 am | मोदक
हे बघा..
4 Jan 2019 - 9:12 pm | दादा कोंडके
१. एखादं हेल्मेट सर्टिफाईड आहे हे ओळखता येइल का? असल्यास कसं? जवळ जवळ सर्व वाहतुक पोलिस टोपीसारखं हेल्मेट घालतात.
२. हेल्मेटसक्ती फक्त शहरात की जिल्ह्यात? हद्द व्यवस्थित ठरवता येते का?
३. फक्त शहरात असेल तर, गावांमध्ये का नाही?
४. लहान मुलांना पण सक्ती आहे का? किती वर्षापासून पुढे हेल्मेट घालावं लागेल? त्याच्यापेक्षा लहान मुलांना लागत नाही का?
माझ्यामते हेल्मेट सक्ती करण्याआधी सगळे रस्ते खड्डेमूक्त करणे, अतिक्रमण काढणे, शहराच्या हद्दीतल्या प्रत्येक रस्त्याला पादचारी मार्ग असणे, सगळ्या सिग्नलची दुरुस्ती करणे, झिब्राक्रॉसिंगचे पट्टे मारणे अशी जास्त प्रायोरिटी असलेली कामं आहेत. एका ख्यातनाम डॉक्टरनेही हेल्मेट मुळे केस गळती होते असे सांगितलं होतं. रोजच्यारोज हेल्मेटची स्वच्छता ठेवणं जमतच असं नाही. उन्हाळ्यात तर खूप अवघड आहे. रोज तास तास भर ट्रॅफिकजॅम मध्ये प्रवास करणार्यांना मानेचं दुखणं येतं हे स्वानुभवावरून सांगतो.
अनेक बाईक्सना हेल्मेट ठेवायला स्कूटर्सारखी जागा नसते. दुकानात वगैरे बॅगेज काउंटरवर हेल्मेट ठेउ देत नाहीत. ते घेउन सगळीकडे फिरणं जिकीरीचं असतं. दुसरी व्यक्ती भेटणार असल्यास त्याचं हेल्मेट कुठं ठेवयाचं हा प्रश्न असतो. हेल्मेट बाइकला बाहेर अडकवणं पावसात शक्य नाही. शिवाय हेल्मेटच्या आत च्युइंगम चिकटवणारे विकृत खूप बघितलेले आहेत.
5 Jan 2019 - 12:35 am | सुक्या
पळवाटा काढणे आणि नको ते समर्थन करणे यात भारतीय लोकांचा हात कोणीच धरू शकत नाही. गेले ४ वर्षे हे गुर्हाळ चालू आहे. आतापर्यंत किती तरी लोकांच्या बाइक्स पण बदलून झाल्या असतील. पण हेल्मेट घ्यायला नको. हेल्मेट ला विरोध नाही तर हेल्मेट सक्ती ला आहे हे शुद्ध पळवाट आहे. रस्ते खड्डेमूक्त करणे, अतिक्रमण काढणे, शहराच्या हद्दीतल्या प्रत्येक रस्त्याला पादचारी मार्ग असणे, सगळ्या सिग्नलची दुरुस्ती करणे, झिब्राक्रॉसिंगचे पट्टे मारणे, पथारीवाले हटवणे , कचरा साफ करणे हे गरजेचे आहे .. पण त्याचा हेल्मेट शी काही संबंध नाही.
हेल्मेट ही इन्शुरन्स पोलिसी आहे. ती वापरावी लागू नये हीच अपेक्षा असावी पण यदा कदाचित वापरावी लागली तर आभार माना कि ते तिथे होते.
बाकी भारतीय लोकांकडे खूप रिकामा वेळ असतो. पगड्या , पातेले घालून मोर्चा काढायला खूप वेळ आहे .. पण हेल्मेट घ्यायला .. ते वापरायला वेळ नाही ...
बाकी भारतीय लोकांचा सिव्हिक सेन्स हा बर्याच सुशिक्षित देशांमध्ये टवाळी चा विषय असतो हे वेगळे सांगणे नको. भारतीय लोक शिकलेले आहेत हे कुणीही मान्य करतो पण ते सुशिक्षित नाहीत यावर मी तरी ठाम आहे.
बाकी चालू द्या ...
5 Jan 2019 - 1:30 am | सुक्या
https://indiacode.nic.in/bitstream/123456789/1798/3/A1988-59.pdf
129. Wearing of protective headgear.
5 Jan 2019 - 10:38 am | मार्मिक गोडसे
@सुक्या , शब्दाशब्दाशी सहमत.
5 Jan 2019 - 11:04 am | प्रसाद_१९८२
प्रकाश घाटपांडे यांच्याशी सहमत !
--
या देशात 'बोलने की आझादी, पेहनकी आझादी, रहने की आझादी' इतक्या सर्व आझादी असताना सध्याचे प्रतिगामी सरकार हल्मेटची सक्ती करुच कसे शकते ? हि तर सरळ-सरळ हिटलरशाही झाली. बाईक आमची, डोके आमचे व जीव देखील आमचा मग जे काही बरे-वाईट होईल त्याची जबाबदारी आमची असताना, अश्या तर्हेची हेल्मेटसक्ती करुन भारतीय घटनेने दिलेल्या आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर वर्तमान प्रतिगामी सरकार गदा कशी काय आणू शकते ?
5 Jan 2019 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे
यातला उपहास बाजूला ठेवला तरी अंमलबजावणीतील प्राधान्यक्रम,तीव्रता,व्यवहार्यता,गांभीर्य हे मुद्दे टाळता येत नाही. नियम म्हणजे नियम तो पाळलाच पाहिजे हा मुद्दा गृहीत धरला तरी मान्य नसतानाही केवळ तो नियम आहे म्हणून सुशिक्षितांनी पाळला पाहिजे पण पाळताना त्याची चिकित्सा व्हावी हा मुद्दा अयोग्य वाटत नाहि. जगायचीही सक्ती आहे...
5 Jan 2019 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
अधिक...
बेजबाबदारपणा हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आमच्या बेजबाबदारपणामुळे आम्हाला दुखापत अथवा मृत्यु झाल्यास, सर्व दोष दुसर्यांवर आणि विशेषतः सरकारवर ढकलण्याचा मूलभूत हक्क, भारताचे नागरिक या नात्याने, आम्हाला आहे, म्हंजे आहे, म्हंजे आहेच्च ! (कपाळावर हात मारणारी स्मायली)
7 Jan 2019 - 8:44 pm | खटपट्या
आत्महत्येला परवानगी नाही अजून भारतात. तो गुन्हा आहे.
7 Jan 2019 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
मला वाटते आहे की, प्रसाद_१९८२ यांचा प्रतिसाद उपरोधिक आहे. :)
7 Jan 2019 - 7:34 pm | मदनबाण
आम्ही पुणेरी पगडी घालू पण हेल्मेट नाही म्हणजे नाही ! =)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZERO
7 Jan 2019 - 8:32 pm | सुबोध खरे
गाडी चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले असले तरी
डोके वापरणे अजूनही ऐच्छिकच आहे
काळजी नसावी.
एक पुणेकर ))=((
8 Jan 2019 - 6:44 pm | चौकटराजा
भारत देशांत फूटपाथ , अतिक्रमण ,खड्डे , अशास्त्रीय स्पीडब्रेकर , उघडे मॅनहोल , २४ तास सिग्नलची आवश्यकता , पोलिसांचा वाहतूक नियंत्रणात मनापासून सहभाग यावर सर्व जबाबदाऱ्या सरकारवर आहेत व त्या पार न पाडल्यास सरकारी नोकरांना अमुक एक शासन अशी काही सोय या निमिताने होण्याचे युग सुरू होईल अशी आशा आपण करू या ! कारण देश सर्वाचा आहे तो नुसत्या नागरिकांचा नाही सरकार व नोकर शाहीचा ही आहे !
8 Jan 2019 - 8:10 pm | सुबोध खरे
उघडे मॅनहोल -- यात बरेच वेळेस त्याची लोखंडी झाकणे चोरीस जातात. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेस कळवण्यात जितका उशीर लागेल तितका वेळ ते झाकण लावण्यात जातो. त्यातून त्या गोष्टींची कंत्राटे दिलेली असतात. हे कंत्राटदार आणि खुर्चीचे राखणदार यांचे साटे लोटे असतात. याला मुंबईत अँप निघाले आहे त्यावर तक्रार केल्यास काम बरेच लवकर होते असा अनुभव आहे.
फुटपाथ आणि अतिक्रमण-- यावर कार्यवाही केली तर अतिक्रमण करणारा एक मोठा मतदार गट असल्याने कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होते तेंव्हा ते ठेविले अनंते तैसेचि राहावे या वृत्तीचे असतात.
पोलिसांचा वाहतूक नियंत्रणात मनापासून सहभाग-- यात मुळात भारतात पोलिसांची संख्या हि तळाच्या ५ देशात इतकी कमी आहे. त्यातून एकंदर पोलीस संख्या २२.८ लाख असायला हवी त्यात ५.६ लाख पदे (२५ %) भरली गेलेली नाहीत.
महाराष्ट्रात १ लाख लोकसंख्येसाठी १७० पोलीस आहेत. आणि १०० चौ किमी परिसरा साठी ६४ पोलीस आहेत.
आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवायची हे अजून लफडं
श्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या मुलीला ५२ सुरक्षा रक्षक पुरवले गेले होते
https://indianexpress.com/article/india/maharashtra/rti-says-812-personnel-deployed-for-security-of-84-vips-in-maharashtra/
उरलेल्या तुटपुंज्या संख्येत वाहतूक नियंत्रण शाखेत किती पाठवणार?
२४ तास सिग्नलची आवश्यकता-- २४ तास सोडा हो पुण्यात दिवसा ढवळ्या सिग्नल तोडणाऱ्या माणसांची संख्या एका महिन्यात लाखात जाईल.
बाकी स्पीड ब्रेकर शास्त्रीय कि अशास्त्रीय हे कुणी ठरवायचे?
आपल्या लोकांना शिस्त हि मूलतःच नाही. त्यातून गुन्हे सिद्ध करणे अवघड असते आणि सापडले तरी पोलिसांशी चिरीमिरी देऊन सुटल्यावर लाज वाटण्याऐवजी आपण शेखी मिरवणारे लोक आहोत.नियम पाळण्यापेक्षा तो तोडण्याकडेच आपला कल असतो.
आपण आपले कर्तव्य करतंच नाही पण दोष दुसऱ्यावर ढकलण्यात मात्र सर्वात पुढे आहोत असे नाईलाजाने म्हणावे लागते.
आपल्या लोकांची अमर्यादित लोकशाहीची लायकी तरी आहे का?
18 Jan 2019 - 1:57 pm | डँबिस००७
सरकारवर वचक ठेवायला सशक्त, धोरणी व सामाजीक जाणिव असलेला विरोधी पक्ष असावा लागतो, त्याच प्रमाणे सरकारी नोकरशाही सुद्धा नम्र, कार्यक्षम व सामाजीक भान असलेली असावी, पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही पक्ष या किमान मर्यादेच्या जवळपास सुद्धा येत नाहीत , त्यापुढे त्या दोघांवर वचक / अंकुश असा कोणाचाच राहीलेला नाही , म्हणुनच सुप्रिम कोर्टाला सर्वात दखल द्यावी लागत आहे ,
ह्या वर उपाय म्हणजे जनतेने दबाव गट निर्माण केले पाहीजेत , सरकारवर विरोधी पक्षावर तसेच सरकारी बाबुंवर नजर ठेवली पाहीजे ! सरकार बदलणे तरी जनतेच्या हाती असते पण विरोधी पक्षाला काहीच अंकुश नाही म्हणूनच स्वतः बेल वर बाहेर फिरणारा युवराज देशाच्या पंत प्रधानांना चौकीदार चोर है अस म्हणु शकतो !
18 Jan 2019 - 1:06 pm | Rajesh188
लोकांच्या मनात सरकारच्या हेतू विषयी शंका आहे त्यामुळे हेल्मेट सक्तीला लोकांचं विरोध आहे .
पहिली गोष्ट बाईक बनवणारी कंपनी हेल्मेट का बनवत नाही तशी सक्ती सरकार का करत नाही .
हेल्मेट बनवणाऱ्या कंपनीशी सरकारच लागेबांधे आहेत हा अर्थ आहे का त्याचा ?खूप लोकांची शंका आहे
दुसरा पॉइंट फक्त हेल्मेट नी दुचाकी स्वराचा जीव सुरक्षित असतो की डोक्या बरोबर पाय हात आणि बाकी अवयव सुधा त्याच्याच व्यक्तीच्या शरीराचे अवयव आहेत आणि महत्वाचे आहे त्यांच्या सुरक्षेचं काय .
हेल्मेट न वापरलं तर फक्त न वापरणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येतो बाकी लोकांचं नाही .त्यामुळे तो त्याचा personal प्रश्न आहे .
हेल्मेट पेक्षा दारू पिवून गाडी चालवणे ,
Lane chi शिस्त न पाळणे
अतिवेगाने गाडी चालवणे
सिग्नल तोडणे.
नो एन्ट्री मध्ये प्रवेश करणे .
गाडी चालवण्याचा पूर्ण प्रशिक्षण नसताना गाडी चालवणे
आणि आशा खूप कारण मुळे बाकी लोकांचं जीव धोक्यात येतो आणि हे सर्व गुन्हे खूप गंभीर आहेत .
वरील सर्व कारण मधील ऐका कारणांनी जरी कोणाचा जीव गेला तर तो चालक फाशी सारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी आहे हे न ठरवता .
कोणाला कसलाच त्रास नसलेल्या हेल्मेट का निशाणा बनवला जातो आहे
18 Jan 2019 - 5:05 pm | विशुमित
कोणाला कसलाच त्रास नसलेल्या हेल्मेट का निशाणा बनवला जातो आहे >>>
==>>आंखो देखी-
हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वार, ट्रॅफिक पोलिसांसमोर सिग्नल तोडून गेला पण त्याच्यावर काही कारवाई केली गेली नाही. पण एक बिचारा त्याच सिग्नलला झेब्रा क्रोससिंगच्या पाठीमागे सिग्नल सुटायची वाट पाहत होता, त्याला मात्र मामांनी गपकन पकडलं. गयावया करत होता. "पेट्रोलला पैसे ठेवलेत. पुढचा पगार झाल्यावर नक्की घेणार आहे हेल्मेट."
हुकमाचा तावेदार सोडतंय वय! असो.
21 Jan 2019 - 10:50 pm | Rajesh188
आपल्या कडे गाडी चलवण्या साठी परवाना दिला जातो तसा तो जगात सर्वच देशात दिला जातो .
पण प्रत्येक देशाचे वाहन परवाना देण्याविषयी आसले नियम वेगळे आहेत .
आपल्या कडे वाहन परवाना देताना जुजबी वाहतूक चिन्ह ओळखणे ,थोडी गाडी चालवून दाखवणे आणि डोळ्यांची तपासणी ( पण ही प्रामाणिक पने केली जात नाही फक्त सोपस्कार म्हणून पार पडली जाते )
हयात कुठेच मानसिकता तपासली जात नाही .आता विज्ञान खूप पुढे गेलेले आहे त्याचाच वापर करून गाडी चालवताना ती व्यक्ती कसा विचार करू शकेल हे तपासता येवू शकत .
कारण गाडी चालवताना ती चालवणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर aacident होणे आणि नियम मोडणे अवलंबून आहे .
Simulator var test घेवून आपण ते तपासू शकू .म्हणजे ऐका ठिकाण वरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळेचं बंधन घालून ती प्रवास त्या व्यक्तीला पूर्ण करण्यास सांगणे आणि त्याच दरम्यान रस्त्या वर truck पासून पायी चालणाऱ्या व्यक्तीचे अडधाळे निर्माण करू त्या व्यक्तीचा मेंदू कसा प्रतिसाद देतो आहे आणि अपघात ल karnibhu होणारे निर्णय तो वेळेचं बंधन ही अट पूर्ण होण्यासाठी घेतोय का हे चेक करता येईल .आणि परवाना नाकारता येईल .
आस्याच प्रकारची परीक्षा प्रश्न बदलून घेता येईल त्यामुळे चांगली mature मानसिकता असणाऱ्या लोकांचं परवाना मिळेल .आणि त्या व्यक्ती नक्कीच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या असतील
27 Jan 2019 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे
30 Jan 2019 - 3:16 pm | मोदक
व्वा...
आता सीटबेल्टला विरोध, सर्वप्रकारच्या इन्श्युअरन्सला विरोध, गाडी चालवताना मुक्त मोबाईल वापर चळवळ आणि कोणतेही नियम पाळण्याला विरोध असे नवीन नवीन विरोध शोधून काढा आणि घोषणा द्यायला सुरू करा.
व्हिडीओ दिसत नाहीये. सरकारचा हात असेल याच्या मागे.
आणि हो.. सरकारी दडपशाहीला विरोध म्हणून इंटरनेट बंदी चळवळही सुरू करा.