तर मिपाकरांनो , आज आपण सर्व एका आगळ्यावेगळ्या , काही प्रमाणात नकोश्या वाटणाऱ्या या मरणावर बोलूयात . कदाचित हा विषय , मला माहित नाही पण याआधी इथे चर्चिला गेलाही असेल पण मी बोका साहेब गेल्यापासून ते आजपर्यंत तोच विचार मनात घोळवत आलोय ...
जगण्याचं कारण इथे प्रत्येकाकडे असतं किंबहुना ते असावंच लागतं, तेव्हा कुठे जगणं जीवन बनतं . पण मरणाबद्दल काय ? त्याच्या बद्दल कुणाकुणाला काय वाटतं ..
मला विचाराल तर मला मरणाकडून फार सुंदर अपेक्षा आहेत .. वयाची अठ्ठाविशी ओलांडण्यापूर्वी मला सीमेवर वीर मरण पाहिजे होतं पण आता ते शक्य नाही . कारण मी ती वयोमर्यादा ओलांडल्यामुळे कुठल्याही सैनिक/पोलीस भरतीसाठी पात्र ठरत नाही .
आता निदान कुढत कुढत अक्षरशः कुणावरतरी ओझं बनून मरायचं नाही आहे . मला मरण हे नैसर्गिक आलेलं आवडेल . कुठलातरी असाध्य आजार होऊन, औषधे खाऊन , मरणासन्न होऊन मरायचं नाही आहे .
मला मरण्यापूर्वी किमान पन्नास झाडं लावून त्यांचं यथासांग संगोपन करायच आहे . ती पूर्णपणे जोमात वाढलेली बघायची आहेत.
रक्तदान करायचं आहे . आतापर्यंत दहावेळा केलेलं आहे . त्यामध्ये सात वेळा मी माझ्या आईसाठी दिलेले आहे आणि तीन वेळा मित्रांसाठी . पण किमान शंभरी गाठायची आहे . आणि मेल्यानंतर माझ्या वापरण्यायोग्य अवयवांचे दान , कुणातरी गरजूला .
मागील गेले तीन वर्षे , आईच्या आजारपणापासून मी नित्यनेमाने वाशीखाडीपुलावर उभा राहून दोनशे रुपयांचा खाऊ समुद्रात अर्पण करतो . सुरुवातीला मी वीस रुपयांचा खाऊ द्यायचो , आता वाढत जाऊन ते दोनशे रुपये झालेले आहेत . आशा आहे कि ते असेच वाढत जाऊन लवकरच दोन हजार रुपये व्हावेत .
चिक्कार दानधर्म करायचा आहे आणि समाधानाने वर जायचे आहे .
तर पन्नास झाडे , रक्तदान , अवयव दान ( मरणोत्तर ) आणि दानधर्म आणि वाराच्याकडून बक्षीस म्हणून एक सुखासीन मरण पाहिजे . कसं ते त्याने ठरवावं पण त्याआधी निदान कर्णाच्या बाजूला नसलो तरी एक पाऊल मागे असावं .. हीच त्या विधात्याकडून अपेक्षा आहे ..
मला मिपाकरांच्या मरणाबद्दलच्या संकल्पना ऐकायला आवडतील .. जेणेकरून मीही ठरवेन कि मरण कसं असलं पाहिजे .. कृपया आपला अभिप्राय इथे नोंदवावा आणि हो उद्या मी नसणार आहे तेव्हा मी आपले अभिप्राय परवा वाचेन बरं का आणि त्यावर प्रतिसादेन . नाताळाच्या आगाऊ शुभेच्छा सर्वाना .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
24 Dec 2018 - 9:50 pm | Nitin Palkar
एक सुखासीन मरण पाहिजे .... ही सर्वांचीच इच्छाअसते आणि त्यात वावगे काही नाही.
मरणोत्तर अवयव दानाबद्दल... नैसर्गिक मृत्यू नंतर केवळ डोळे आणि त्वचा दान करता येते. तसेच संपूर्ण मृतदेह वैद्यकीय कॉलेजांना शिक्षणासाठी दान करता येतो.
मस्तिष्क मृत्यू (ब्रेन डेड) अवस्थेत, हृदय, यकृत, मूत्रपिंडे ही प्रामुख्याने दान करता येतात. यासाठी जवळच्या नातेवाईकांची इच्छा आणि शिघ्र निर्णय, कृती आवश्यक असते.
26 Dec 2018 - 3:23 pm | नितिन सोनवने
बरोबर आहे.
26 Dec 2018 - 3:33 pm | खिलजि
हि चांगली माहिती दिलीत पालकर साहेब .. धन्यवाद मला मस्तिष्क मृत्यूबद्दल माहित नव्हते ..
9 Jan 2019 - 7:56 pm | Nitin Palkar
_/\_
9 Jan 2019 - 7:56 pm | Nitin Palkar
_/\_
25 Dec 2018 - 1:33 am | जयंत कुलकर्णी
....माणसाच्या किंवा कुठलाही सजीव आणि त्याचा मृत्यूबद्दल थोरोने किती सुरेख विचार मांडले आहेत ते पहा... त्याने एका ठिकाणी म्हटले आहे, एखाद्याच्या मृत्यूमुळे वाईट वाटणे हे नैसर्गिक आहे पण आपण मृत्यूवर प्रेमच केले पाहिजे... शेवटी त्याने निसर्ग आणि मृत्यू याबद्दल जे भाष्य केले आहे ते निव्वळ अप्रतीम आहे. फॉलचे उदाहरण देऊन त्याने मृत्यूतूनही कसा आनंद मिळवता येतो हे सांगितले आहे.. जेव्हा तो म्हणतो आपण मृत्यूवर प्रेम केले पाहिजे तेव्हा त्याला हेच अभिप्रेत असावे...
“माणसाचा मृत्यू ही खरे तर किती सरळ साधी गोष्ट आहे! पण माणसाला ते मान्य नाही. निसर्गाने जे काही गमावले आहे ते सगळे त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात परत मिळते. पण मृत्यू सुंदर आहे आणि जेव्हा आपण त्याच्याकडे एक अपघात म्हणून न पाहता एक सृष्टी नियम म्हणून पाहातो तेव्हा तो जन्माइतकाच सर्वसाधारण असतो. मृत्यूत विशेष असे काही नाही. माणसे इथोपियात मरतात, माणसे इंग्लंडमधे मरतात आणि विस्कॉनसिनमधेही मरतात. आणि शेवटी या जीवसृष्टीत अमरत्वाचा मक्ता घेऊन कोण मागे उरले आहे? या वर्षी दिसते ते गवत आणि दिसणार्या वनस्पती या काय मागच्या वर्षातील आहेत का? निसर्गातील गवताचे प्रत्येक पाते, फांदीवरील प्रत्येक पान हे ऋतूबदलात आनंदाने धारातिर्थी पडते आणि तेवढ्याच आनंदाने परत फुटते. ऋतुचक्रातील चार महिन्याची ती करामत असते. मृत वाळलेली झाडे, सुकलेले गवत व वनस्पती या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग नाहीत का? आहेत ! शिशिरातील रंग बदललेली मनाला भुरळ पाडणारी झाडे शेवटी मृतवत होणार्या पानांच्या रंगामुळेच प्रेक्षणीय आहेत ना?
खरे तर ते दृष्य म्हणजे नोव्हेंबरच्या वार्याने निसर्गाच्या कॅनव्हासवर चितारलेल्या वेदनाच असतात की ! तरी पण आपण त्याचा आनंद लुटतो.”
हेन्री डेव्हिड थोरो - त्याच्या जर्नलमधे.
माझ्या
" वॉल्डन व हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र. '' या पुस्तकातून.
- जयंत कुलकर्णी
26 Dec 2018 - 6:43 pm | चित्रगुप्त
@जयंत कुलकर्णी साहेब,
फार पूर्वी दुर्गा भागवत यांनि अनुवादिलेले 'वॉल्डन काठी विचार विहार' वाचले होते. तुमचे पुस्तक अजून प्रकाशित व्हायचे आहे का ? झालेले असल्यास कुठे मिळेल ? कळवावे.
26 Dec 2018 - 8:11 pm | खिलजि
जयंत साहेब , खरंच इतकं सोपं आहे का ? मला माझेच उत्तर मिळत नव्हते म्हणून तर मी या प्रगल्भ मंचावर हा मुद्दा उपस्थित केला , जेणेकरून अजून इतर काही उत्तर मिळतील .. पण अजूनही ती मला मिळालेली नाही आहेत आणि जोपर्यंत ती मिळणार नाहीत तोपर्यंत त्याचा पाठपुनराव करत राहणे , हा माझा पिंड आहे .. या मंचव्यतिरिक्त इतर कुठेतरी वादविवाद करण्यात येईल . पण शक्यतो मी माझ्या मित्रांबरोबर ह्या गोष्टी करणार नाही . कारण त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे निराळा आहे .. ते एकेक क्षण स्वतःसाठी , मजेसाठी जगतात आणि मला ते करायचे नाही आहे . मी ते शोधतोय जे मला अजून सापडलेच नाही आहे .. ते जेव्हा मिळेल तेव्हाच " जीवन आणि मरण " कळेल.
27 Dec 2018 - 5:44 am | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
मृत्युला आपण फारच महत्व देतो. ती बाब एवढा विचार करण्याइतकी नाही. असो.... हे खरंच सोपे आहे. कदाचित आपल्या वयातील फरकामुळे यातील सोपेपणाची पातळी कमी जास्त होत असेल. पण विचार केलात तर तुम्हालाही पटेल की ते फार सोपे आहे... जो मरतो त्याच्यासाठी तर निश्चितच...
27 Dec 2018 - 4:43 pm | खिलजि
मला वाटते कुलकर्णी साहेब , आपण जिवंतपणी मृत्यूचा विचारच करत नाही . अंत कसा असावा याचा विचार निदान अंगात बल असताना तरी व्हावा , असे मला वाटते . " नैसर्गिक मृत्यू" हा तर एक विचार झाला पण कधीकधी आपल्या बाळगलेल्या तत्वासाठी पण तो येऊ शकतो .. त्याचीही तयारी असणे गरजेचे आहे
25 Dec 2018 - 1:39 am | अर्धवटराव
वृक्षं संगोपन, दानधर्म वगैरे गोष्टींमुळे जगणं सुंदर आणि समाधानकारक होईल... पण मृत्यु सुखासीन कसा होईल ?
25 Dec 2018 - 5:40 am | जयंत कुलकर्णी
वृक्षासंदर्भात आपण जे लिहिले आहे ते माझ्या प्रतिसादास उद्देशून लिहिले आहे असे मी समजतो. जर तसे नसेल तर खालील ओळ वाचली नाही तरी चालेल...
- माझी विनंती आहे थोरोचे म्हणणे आपण काळजिपूर्वक वाचावे....
25 Dec 2018 - 5:51 am | अर्धवटराव
नाहि. ते मूळ लेखातल्या संदर्भात आहे.
26 Dec 2018 - 3:32 pm | खिलजि
प्राचीन काळापासून एक गोष्ट अगदी निरंतरपणे चालत आलेली आहे .. त्यामागे कुठलेही विज्ञान नसावं असं माझं ठाम मत आहे .. आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही जमिनीत पेराल तेच उगवणार .. तांदूळ पेरले तांदूळ येणार आणि गहू पेरले तर गहू . याच मताचा अंगीकार मी काही वर्षांपूर्वी केलेला आहे . ते म्हणजे तुम्ही निर्मल मनाने दुसर्याला येनकेन प्रकारे समाधान दिलेत तर तुम्हालाही समाधानाचं मिळणार , दुसरे काही नाही .
अजून एक मी जैविक कचरा करत नाही . मी पार्ले जी ची बिस्किटे विकत घेतो आणि प्रत्येक पुडा फोडून समुद्रात टाकतो . तो पुड्याची वेष्टने मात्र रस्त्यावर तशीच पडलेली असतात .. पण हा मुद्दा उचलून एक प्रकारे आपण चांगलेच केले .. यापुढे मी ती वेष्टने गोळा कारेन आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकत जाईन . धन्यवाद ..
26 Dec 2018 - 9:20 pm | अर्धवटराव
हि पॉलिसी जगण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. पण मृत्यु वेगळी बाब आहे. मृत्यु जर दैनंदीन जीवनाचा भाग झाला तरच त्याच्या समाधानी एक्झीक्युशनची प्रॅक्टीस करता येईल.
27 Dec 2018 - 4:30 pm | खिलजि
का बरे ? मला नाही बुवा असे काही वाटत .. कारण जर आपण काही चांगलं केलं तर शेवटही आपला चांगलाच होईल .. आणि शेवट म्हणजेच आपला मृत्यू .
28 Dec 2018 - 2:04 am | अर्धवटराव
तुम्ही झाडांची काळजी व्यवस्थीत घेतली, खत-पाणि नीट केलं तर तुमची बाग सुंदर बनेल... पण त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारणार नाहि. आरोग्याकरता तुम्हाला व्यायाम, डायट वगैरेची काळजी घ्यायला लागेल. तसंच मृत्युचं आहे.
तसं बघितलं तर आपली प्रत्येक कृती एकुणच जगण्यावर परिणाम करत असते. पण विशिष्ट रिजल्ट करता विशिष्ट प्रोसेसच केली पाहिजे.
25 Dec 2018 - 10:45 am | सुबोध खरे
तारुण्यात मृत्यू हे एक सुंदर काव्य असतं
चाळिशीनंतर ते एक रुक्ष गद्य होऊन जातं.
हि वस्तुस्थिती मी अनुभवलेली आहे. एका ठिकाणी मी ते लिहिलेलं सुद्धा आहे. https://www.misalpav.com/node/34838
जसं जसं वय पुढे सरकत जातं तशी जगण्याची इच्छा बळावत जाते. कारण जगात जगण्यासाठी बरंच काही आहे आपल्याला करण्यासारख्या असंख्य गोष्टी करायच्या राहिल्या आहेत आणि आपल्या हातात दिवस कमी राहिलेले आहेत हि वस्तुस्थिती प्रखरपणे पुढे येत राहते
16 Jan 2019 - 11:19 pm | चित्रगुप्त
@सुबोध खरे:
............ गेल्या काही वर्षांपासून अगदी हेच अनुभवत आहे.
25 Dec 2018 - 11:47 am | जेम्स वांड
एखादं आयडियल , एखादं तत्व, एखाद संकल्पना डिफेन्ड करत मरणे आवडले असते, पण नेमकं काय करायचं ती कल्पना नसल्यामुळे मी आज बऱ्यापैकी समाधानी साधारण माणसाचे आयुष्य जगतो आहे, संकल्पना-तत्व डिफेन्ड करत मारायचं सीन आधी सुस्पष्ट झालं असतं तर मिलिटरीत भर्ती झालो असतो आता काही उरलेलं नाही, आमची मौत म्हणजे सिव्हीलीयन मौत असणार आमच्यासारख्यांच्या मौतीला कोणाला काही फरक पडत नसतोय, त्यामुळे ती कशीही आली तरी पालखी आली म्हणायचं अन कटायचं इतकंच विचाराधीन अन हातात आहे
26 Dec 2018 - 4:39 pm | खिलजि
वांड साहेब, तुम्हालापण माझ्यावाणी सैन्यात जायचं होत हे ऐकून आनंद झाला .. असो , जे तुमचं झालंय तेच इथे माझंपण झालंय .. सैन्यभरती हे आता स्वप्नच उरलंय.
25 Dec 2018 - 11:54 am | प्रकाश घाटपांडे
परमसखा मृत्यू: किती आळवावा.
मला वाटत आपल्याला हवा तसा मृत्यू हवा असेल तर आत्महत्या हाच पर्याय असावा. अनेक गोष्टी पराधीन असतात.
25 Dec 2018 - 12:07 pm | कुमार१
या मुद्द्यास जोरदार पाठींबा आहे .
25 Dec 2018 - 12:14 pm | nanaba
मागील गेले तीन वर्षे , आईच्या आजारपणापासून मी नित्यनेमाने वाशीखाडीपुलावर उभा राहून दोनशे रुपयांचा खाऊ समुद्रात अर्पण करतो . सुरुवातीला मी वीस रुपयांचा खाऊ द्यायचो , आता वाढत जाऊन ते दोनशे रुपये झालेले आहेत . आशा आहे कि ते असेच वाढत जाऊन लवकरच दोन हजार रुपये व्हावेत .
>> please samudra t baherun jaivik kachara takalyane kahihi punya prapta honar nah hyachi khatri balaga.
Nadit tar nakoch nako. Nadiche gatar hotey.
25 Dec 2018 - 12:24 pm | विनिता००२
चालता बोलता मरण यावे....आणि पटकन हवा तो दुसरा जन्म घेवून ह्या जन्मात केलेल्या चूका...सरळमार्गी, भिडस्त, मुल्ये बाळगणारी वगैरे सर्व सोडून मस्तमौला जगावे असे वाटते :)
25 Dec 2018 - 1:43 pm | सुबोध खरे
मग आजच आत्ताच सुरुवात करा की.
त्या जुन्या विनिता गेल्या समजायचं.
त्यासाठी हे सुंदर जीवन संपवायची काय आवश्यकता आहे?
26 Dec 2018 - 2:47 pm | विनिता००२
:) :) कितीही म्हटले तरी इतका काळ जपलेले असेच सोडता येत नाही.
दुसरा जन्मच घ्यायला लागेल आता! :)
25 Dec 2018 - 2:13 pm | वकील साहेब
कोपर्निकस की कोण तो ज्याने सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते अस सांगितल. कसं काय जमलं बुवा त्याला हे अस करायला. एवढ्या विशालकाय पृथ्वीवर उभा राहूनच (म्हणजे बाहेर अंतराळात कुठेही न जाता ) तो पृथ्वीची गती तठस्थ पणे मोजू शकला. रोज सूर्य पूर्वे कडून पश्चिमे कडे जातांना बघूनही शतकानुशतके चालत आलेला समज खोडून काढू शकला. तसं काही आपण करायला शिकलो तर फार बर होईल. म्हणजे आपल्या "स्व" मधून बाहेर येऊन आपणच आपल्याकडेच तठस्थ पणे बघू शकलो तर आपण आपल्या जीवनाच मूल्यमापन अधिक चागल्या रीतीने करू शकू.
या लेखाच्या निमित्ताने एक विनोद आठवला.
एक जख्खड म्हातारी पोटाची खळगी भरण्यासाठी लाकडे तोडायला जंगलात जाते. कशीबशी थोडीफार लाकडे तोडून त्याची मोळी बांधते. सावकाश कमरेत ताठ होत पदराने कपाळावरचा घाम पुसते. उन लाही लाही करत असत. घसा कोरडा पडला होता. पाणी पिण्यासाठी जवळ कुठे झिरा सुद्धा नव्हता. जिवंत राहण्याच्या या संघर्षाला कंटाळून ती देवाचा आर्ततेणे धावा करते. "देवा घे बाबा बोलवून या म्हातारीला लवकर. आता नको हे जगणं. नको रे बाबा नको नको."
इतक्यात यम तिथे प्रकट होतो. म्हातारीला म्हणतो, "मी यम आहे तुला न्यायला आलो आहे. चल लवकर" त्यावर म्हातारी म्हणते, "ते मरणाचं नंतर बघू आता आलाच आहेस तर आधी मोळीला हात लाव अन मला डोक्यावर उचलून दे बघू. "
जगण्याची अभिलाषा कोणाला सुटली आहे. आपण प्रत्येक जण कधीना कधी जाणार आहोत हे माहित असताना सुद्धा आयुष्याचा एक मोठा कालखंड विशेष करून तारुण्याचा आपण असा जगत असतो की आपण कधी म्हातारे होणारच नाही आहोत. आणि आपल्याला मरण कधी येणारच नाही. पण ते अटळ आहे. मग जर ते अटळ आहे तर त्याला समाधानाने समोर जायला हवं.
समाधानाने समोर कस जाता येईल ? तर गांधीजी म्हणत कि आपली मृत्यू पूर्वी आपले सर्व दोष नष्ट करा. इतकच जरी केलत तरी पुरेस आहे. अधिक पुण्य गाठीशी बांधण्याची गरजच नाही. फक्त आपल्यातले दोष शोधून नष्ट करा.
पण ते कसे सापडतील ?
त्यासाठीच तर कोपर्निकसची नजर पाहिजे.
25 Dec 2018 - 7:20 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मलाही खूप वेगवेगळ्या पद्धतीने मृत्यू यावा असे वाटते.त्यापैकी चांगले गीत ऐकत, निसर्गाच्या सानिध्यात, नर्मदेच्या तीराशी,परिक्रमा करताना मृत्यू यावा हे प्रकर्षाने वाटते.
26 Dec 2018 - 4:31 pm | खिलजि
भाग्यश्री ताई किती सुंदर कल्पना केलेली आहे .. मला फार फार आवडली .. निसर्गसानिध्यात मृत्यू येणे म्हणजे किती पुण्य असावे लागते गाठीशी , याची कल्पनाच ना केलेली बरी . पण हे नर्मदा परिक्रमा आवडलं बरे का .. माझाही ते एक स्वप्न आहे ..बघू कधी पूर्ण होतंय ते .. छान
25 Dec 2018 - 8:28 pm | झेन
कुणाला, केंव्हा आणि कसे मरण येणार हे माहीत नसल्याने जगण्यात मजा आहे.
आधीच शेवट माहिती असेल तर सस्पेन्स चित्रपट कोण एंजॉय करेल.
25 Dec 2018 - 8:30 pm | झेन
कुणाला, केंव्हा आणि कसे मरण येणार हे माहीत नसल्याने जगण्यात मजा आहे.
आधीच शेवट माहिती असेल तर सस्पेन्स चित्रपट कोण एंजॉय करेल.
25 Dec 2018 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
कधीच मरणार नाही असे समजून जीवनातील उद्येशे ठरवा; पण, उद्याच मरणार आहे असे समजून ती प्रत्यक्षात यावी यासाठी प्रयत्न करा. बाकी सगळे होणार ते होईलच, पण, ते आपल्याला हवे तसे वळवायचा प्रयत्नही केला नाही, ही खंत मनात असणे, यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.
26 Dec 2018 - 10:20 am | चौकटराजा
मूळ म्हणजे आपण जगतो तो एका भास आहे की तेच सत्य . पूर्व जन्म वा पुनर्जन्म या केवळ बाष्कळ बडबडी यावर अनेक वाद आहेत. ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार अर्थ लावावा . पण मृत्यो येऊ नको असे विनविती सारे परंतु मनी ही सर्वसाधारण वस्तुस्थिती असते.अपवाद ज्यांनी आत्महत्त्या करण्याचा पक्का विचार केला आहे ते मात्र ना मृत्यूला घाबरतात वा जीवन सुंदर आहे याकडे आकर्षित होतात .मरण हे अध्यात्मिक ,आधिदैविक व अधिभौतिक कारणांचा एकत्रित परिणाम असते. ज्यावेळी तुम्ही मानसिक वा शारीरिक पातळीवर जगायला लायक नाही असा निश्कर्श निसर्गात निघतो त्यावेळी मरण येते. वैद्यकीय भाषेत " मेजर शॉर्टेज ऑफ ऑक्सीजन तसेच एन्ड ऑफ व्हायटल फोर्स अशी काहीशी व्याख्या मरणाची करता येईल . मानसिक जगात कशासाठी ( परिसराचे आकर्षणाचा अभाव ) व कुणासाठी ( नात्यातील आकर्षणाचा अभाव )जगायचे असा प्रश्न निर्माण झाला की ....... वैद्यकीय कारणे घडण्याची वाट पाह्यली जात नाही !
26 Dec 2018 - 8:01 pm | खिलजि
चौरा साहेब , हे तुमचे वाक्य मला खूप भावले "" मरण हे अध्यात्मिक ,आधिदैविक व अधिभौतिक कारणांचा एकत्रित परिणाम असते."" पण हे पटले नाही "" ज्यावेळी तुम्ही मानसिक वा शारीरिक पातळीवर जगायला लायक नाही असा निश्कर्श निसर्गात निघतो त्यावेळी मरण येते. ""
मला या दुसऱ्या वाक्यशीच तर उर्वरित आयुष्य लढायचे आहे .. मी सध्यातरी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप खंबीर आहे असे मला वाटते . ती सारी वरच्याची कृपा असे सध्या म्हणूया .. कारण मी जिथे जिथे सांधला गेलोय ते दुवे अजूनही तसेच भक्कम स्थितीत आहेत आणि पुढेही राहतील अशी प्रार्थना आहे .. त्यातला एक दुवा " माझी आई " ती जेव्हा कायमची गेली तेव्हा खूप रिक्त झालो होतो , काही इच्छाच उरली नव्हती .. कशातच रस नव्हता , कधीकधी बराच वेळ खाऊ दिल्यनानंतरही तिथेच पुलावर उभा राहायचो .. सुस्साट पाळणाऱ्या गाड्यांकडे बघत राहायचो आणि मग हताशपणे कामावर रुजू व्हायचो .. मी आता दोन दोन पिशव्या भरून पुढे घेऊन येतो आणि निवांतपणे ते काम करत असतो .. खूप समाधान मिळते , ते करताना .. आणि फक्त एकाच मागतो मुलाबाळांना भरपूर बुद्धी आणि शक्ती दे .. स्वकर्तुत्वाने घराण्याचं नाव जगभर , ते दोघेही जगभर करू देत ..
26 Dec 2018 - 10:05 pm | चौकटराजा
त्या वाक्याचा मतितार्थ असा की निसर्गातील नाशाचे पॅरामीटर पुरे झाले की मानव काय सकलाचाच नाश होतो .जड सृष्टीत मानसिकतेचा भाग येत नाही इतकेच .अधिभौतिक कारण त्यांनाही लागू ! उदा प्रचंड उल्का धरेवर आदळली तर हिमालय हिमालय राहाणार नाही . मृत्यू म्हणजे रूपांतर हे त्यासाठीच म्हणतात . वासांसी जिर्णानी यथा विहाय ....वगैरे .
26 Dec 2018 - 10:43 am | विजुभाऊ
आत्महत्या करणाराना मरायचे नसते. त्याना वेदनेपासून सुटका हवी असते.
पण आत्महत्या हा बहुतेक चाम्गला पर्याय असावा.
आपल्या नंतर काय होईल याचा विचार केला नाही तर ती सहज जमायला हवी.
रामाने, सीतेने , देखील आत्महत्या केली होती.
स्वतः होउन सती जाणे , प्रायोपवेशन करणे , जिवंत समाधी घेणे हे आत्महत्येचेचसमाजमान्य प्रकार.
सतीला बांबूनी सरणावर ढकलणे ही सामाजीक हत्या.
( अगदी मॉडर्न शब्दात सांगायचे तर बार्बेक्यूकरण )
26 Dec 2018 - 3:01 pm | मुक्त विहारि
पण "मरण" निद्रेत असतांना यावे, इतपत माफक अपेक्षा...
इच्छामरणाचा कायदा लवकरात लवकर यावा, हीच त्या प्रभू चरणी प्रार्थना.....
26 Dec 2018 - 3:45 pm | जागु
चांगला विषय आहे.
26 Dec 2018 - 3:45 pm | खिलजि
मी जे पण सध्या जीवन जगात आहे त्याबद्दल माझ्या अर्धांगिनीला बिलकुल कल्पना नाही आहे .. तिला जर हे कळले कि आपला नवरोबा समुद्रात तीनशे रुपये सहज बुडवतो तर बिच्चारी अर्धी व्हायची .. पण तुम्हाला खरे सांगू , हे जेव्हापासून चालू केलंय ना , तेव्हापासून एक समाधान चेहऱ्यावर असतं . कुठेही मार्गावर अडकत नाही कि धडपड नाही .. सगळं काही एकदम सुरळीत .. धन्यवाद त्या विधात्याचे ज्याने हे सुंदर जीवन दिले आणि दान करण्यासाठी दोन हात दिले . दानातच सर्व आहे मित्रानो . दान करा आणि झोळीत जीवनाचे रहस्य पडून घ्या .
झाडे लावण्याचे म्हणाल तर एक पिंपळ आणि एक नारळ सध्या फार फार उत्तुंग झालेले आहेत .
त्यामध्ये पिंपळाची गोष्ट फार मजेशीर आहे .. लग्नाआधी एका ज्योतिषाने मला दररोज पिंपळाला एक तांब्या पाणी घालायला सांगितले होते . पिंपळ आमच्या राहत्या घरापासून जरा दूरच होता .. ते सूर्याला अर्ध्या देऊन मग सोवळे नेसून तिथपर्यंत जाणे म्हणजे फार दिव्य काम होते . मग एक उपाय केला समोरच एक खड्डा खणला आणि त्यात त्या पिंपळाची छोटी फांदी लावली आणितिला एक बादलीभर पाणी रोज घालायचो .. हळूहळू त्याला पाळावी फुटली आणि त्याचा आता ढेरेदार वृक्ष झालाय .. एका शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने लगेच तिथे स्वतःच्या पक्षाच्या नावाने कट्टा घालून दिलाय . बरीच लोक तिथे सकाळ संध्याकाळ बसलेली असतात . ते बघून बरे वाटते ..
मी मागे या संस्थळावर एक कविता लिहिली होती , तिची आज प्रकर्षाने आठवण आली म्हणून ती पुन्हा प्रकाशित करत आहे ..
अजून कुणाची आहे का काही बाकी ?
एक रुपया असला तरी , सांगा बरं का नक्की
ऋण सारं फेडायचं आहे
हसतमुखानं वर जायचं आहे
नको रोष कुणाचा
नको दोष तो कसला
करेन काका मामा
मिळो तोष मजला
हास्य पेरायचे आहे
सुख उगवायचं आहे
दुःख कापून सारं
पुण्य कमवायचं आहे
सारी उधारी फेडून
हसत वर जायचं आहे
सिद्धेश्वर विलास पाटणकर
26 Dec 2018 - 5:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी जे पण सध्या जीवन जगात आहे त्याबद्दल माझ्या अर्धांगिनीला बिलकुल कल्पना नाही आहे .. तिला जर हे कळले कि आपला नवरोबा समुद्रात तीनशे रुपये सहज बुडवतो तर बिच्चारी अर्धी व्हायची .. पण तुम्हाला खरे सांगू , हे जेव्हापासून चालू केलंय ना , तेव्हापासून एक समाधान चेहऱ्यावर असतं . कुठेही मार्गावर अडकत नाही कि धडपड नाही .. सगळं काही एकदम सुरळीत .. धन्यवाद त्या विधात्याचे ज्याने हे सुंदर जीवन दिले आणि दान करण्यासाठी दोन हात दिले . दानातच सर्व आहे मित्रानो . दान करा आणि झोळीत जीवनाचे रहस्य पडून घ्या .
इथे थोडा मतभेद आहे. जी वस्तू निर्माण करण्यासाठी मानवी संसाधन खर्च झाले आहे, ती निसर्गात कोणत्याही फायद्याविना केवळ नष्ट होण्यासाठी टाकून देणे, हे काही पटले नाही.
त्या ऐवजी, तेवढीच रक्कम जित्याजागत्या माणसांच्या उपयोगी होईल अशी खर्च करणे माझ्या मते जास्त योग्य आणि जास्त समाधानकारक होईल. उदा: तितकीच रक्कम माहितीतल्या एखाद्या मुलाच्या शिक्षणाला मदत म्हणून देणे, एखाद्या विश्वासू अनाथालयाला भेट देणे, किंवा काही काळ ती रक्कम साठवून अनाथालयातील मुलांना त्यांच्या नेहमीच्या जेवणापेक्षा जरा जास्त चांगले जेवण देणे, इत्यादी... असे केल्यास त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंद, तुमचे समाधान द्विगुणीत-त्रीगुणीत करेल.
निसर्गासाठीच काही करायचे असेल तर, ती रक्कम वृक्षवर्धनासाठी खर्च करणे केव्हाही दीर्घकालीन उपयोगी व दीर्घकालीन समाधानकारक ठरू शकेल. बिस्किटे फेकण्यापेक्षा, तेवढ्याच किमतीचे खत तुमच्या घराशेजारील/सोसायटीतील झाडांना घातलेत तर त्यांच्याकडे पाहून तुमचे मन रोज समाधानाने भरून येईल.
26 Dec 2018 - 7:46 pm | खिलजि
बरोबर आहे तुमचे म्हणणे म्हात्रे सर .. माहितीतील एक अनाथालय आमच्या सायन येथे आहे . तेथे मी काही प्रमाणात दानही दिले आहे . कपडे म्हणा किंवा मुलाच्या वाढदिवसाला शिक्षणाचे साहित्य .. आनंद तर भरपूर मिळवला आहे . पण हे झाले अधूनमधून केलेले दानधर्म .. मला खरे सुख तर समुद्रात , खाऊ घालून मिळते .. आणि वृक्षसंगोपनात तर मी आमच्या कामाच्या ठिकाणीही निरनिराळी बहुपयोगी झाले लावली आहेत .. त्यामध्ये निलगिरी , कडुलिंब , जास्वंद आणि कृष्णकमळ हे प्रामुख्याने आहेत .. उरलेल्या जागी पानफुटीची लागवड केलेली आहे .. खतपाणी सुरुवातीला करायचो पण आता आमच्या मालकांनी तेथे नियमित तत्वावर माळी काकांची नेमणूक केलेली आहे .. त्यामध्येपण मीच पुढाकार घेतला होता .. त्यानुषंगाने माळी काकांचे घरही चालते आणि त्यांनाही आनंद मिळतो ..
मी वर जे नमूद केले आहे ते माझे नित्यकर्म आहे आणि गरजूना मदत हि मी यथायोग्य करतच असतो. त्यात काहीच शंका नाही . कितीतरी वेळा मी त्याबद्दल माझ्या घरच्यांकडून ओरडाही खाल्ला आहे . एका चांगल्या मित्राची नोकरी सुटली . तो निर्व्यसनी होता , हे महत्वाचे .. त्यात त्याला मुलेबाळे .. त्याने मदतीसाठी हात पसरले , मी त्याला चक्क पन्नास हजार रुपये दिले . हे सर्व मी माझ्या बायकोला सांगून केले म्हणून ठीक , कारण मला आठवतंय , मी तो महिना अक्षरशः कसाबसा ढकलला होता कारण आईचेही उपचार चालू होते . ते पैसे अजूनही मला परत मिळालेले नाही आहेत आणि मला त्याचे सोयरेसुतकाही नाही आहे . तो जेव्हापण येतो , भेटतो चहापाणी होते आणि न निघून जातो . मी हि त्यावर भाष्य करत नाही पण आमची सौ बऱ्याचदा विषय काढून थकली आहे .. असो , अशी कितीतरी वेळा मदत मी केलेली आहे आणि पुढेही करत राहीन .. एक मात्र चांगला अनुभव पाठीशी आलाय तो म्हणजे , कदाचित या मदतीमुळेच , मी माझ्या आईचे उपचार तिला हव्या त्या ठिकाणी करू शकलो .. तिथे मी कुठलीही माघार घेतली नाही आणि माझ्या मित्रांनी मला त्यावेळेस भरपूर मदत केली म्हणून तर मी ते आजारपणाचे शिवधनुष्य व्यवस्थितपने उचलू शकलो .. हे सर्व मला वाटत लोकांच्या आशिर्वादामुळेच झाले सर अजून दुसरे काही नाही असे मला वाटते ..
26 Dec 2018 - 7:44 pm | सुबोध खरे
आता ढेरेदार वृक्ष झालाय .
उत्तम
माणसाने केलेल्या कामापेक्षा त्याने लावलेला वृक्ष बहुधा जास्त वर्षे टिकतो. -
श्री व्यंकटेश माडगूळकर
26 Dec 2018 - 8:14 pm | खिलजि
धन्यवाद खरे साहेब...
26 Dec 2018 - 4:21 pm | खिलजि
म्हात्रे सर ,, आपले म्हणणे एकदम रास्त आहे बरं का .. आणि मी त्याच तत्वावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करत आहे . ध्येय ठरलेले आहे .. मनाची उन्मनी अवस्था गाठणे आणि तीही लवकरात लवकर .. त्यासाठी स्वतःकडे जे जे जास्त आहे त्याचा निर्मल मनाने त्याग करणे , हे कदाचित त्या अवस्थेतील पहिले पाऊल असावे . तरीही कधी कधी अहंभाव डोकावतोच . कधी कधी समोरच्याचे , मागणाऱ्याचे मला नाटक वाटते आणि मी चक्क दुर्लक्ष करतो. उभे गेल्यावर वाईट वाटते पण मी असे का करतो याचे उत्तर मात्र मला मिळत नाही .. जर खरंच स्वतःकडे काहीच राखायचे नसेल तर या सर्व गोष्टींना तेथे थाराच नसायला हवा .. तो अजूनही आहे म्हणजे बरीच घोडदौड बाकी आहे .. आणि अशा आहे , सुखासीन मरण हवे असेल तर या मार्गातील बर्याच गोष्टी पादाक्रांत करणे क्रमप्राप्त आहे ..
26 Dec 2018 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
"दान कर, दर्यामे डाल" हे वचन तुम्हाला माहित नाही का ?
ते तर तुम्हाला एकदम चपखलपणे लागू होते. "समुद्र/नदीत टाकलेल्या बिस्किटांचे काय होईल, समुद्र/नदी/जलचर त्याचे काय करतील?" याचा विचार न करता तुमचे मन समाधानाने भरत आहे असे तुम्हीच म्हणता... मग, "मदत केलेल्या माणसाचा काय हेतू होता?" हा विचार मनात आणावाच कशाला?
किंबहुना, कोणतेही तथाकथित दान करताना असा विचार मनात आला तर ते दान नसून काही पूर्वग्रह/अपेक्षा मनात धरून दिलेली देणगी ठरते. हेच पूर्वग्रह/अपेक्षा असणे देणार्याच्या मनात असमाधान निर्माण करते. तुम्ही नदी/समुद्राला विचारत नाही ना? मग माणसांना का?
27 Dec 2018 - 4:54 pm | खिलजि
म्हात्रे सर , मी आतापर्यंत केलेल्या कर्मामध्ये कुठलाही दूषित दृष्टिकोन ठेवलेला नाही .. तसे असते तर माझ्या आणि मित्रांच्या भेटीगाठी झाल्याचं नसत्या .. अहो ती मदत फक्त गृहमंत्र्यांचे संमतीने केली होती म्हणून थोडे घरातील वातावरण कलुषित झाले पण आता ते पूर्णपणे निवळले आहे .. असो ,, मला मरणाबद्दल किंवा कसे जगावे जेणेकरून अंत सुखाचा होईल , याबद्दल जाणून घ्यायचे होते .. बरेच मार्गदर्शन झाले आणि विचारमंथनहि ..
हो मला त्या वर बसलेल्याकडून फार अपेक्षा आहेत .. त्याने हे माझे ऐकलंच पाहिजे .. मला माझा अंत एकदम शांत पाहिजे .. निवांत
आपल्या सर्वांचा मी आभारी आहे .. धन्यवाद चूभूद्याघ्या
26 Dec 2018 - 4:29 pm | खिलजि
या चर्चेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाग घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार .. कुमारसाहेब, विजुभौ , घाटपांडे साहेब आणि मुवि काका , आपण सर्वांचा स्वेच्छा मरण आणि आत्महत्या याकडे जास्त ओढा आहे . मला एक प्रश्न विचारायचा आहे , जर स्वेच्छा मरण हे कायदेशीर मान्य झाले तर हे जग सोडून जाण्याची योग्य वेळ कोणती आणि कशी निवडाल ? नाही म्हणजे कधी कधी होते काय कि एखादा दिवस वाईट असतो पण सर्वच वाईट असतात असे नाही .. येणारा किंवा नव्याने उगवणार सूर्य कधी कधी आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येतो . तर ती जाण्याची वेळ कशी निवडावी ? यावर काही प्रकाश पडू शकतो का ?
26 Dec 2018 - 4:54 pm | यशोधरा
ही सगळी माहिती तुम्ही कशासाठी गोळा करत आहात? कुतूहल म्हणून विचारते.
पारलेंच्या पुड्यांची वेष्टणे तुम्ही समुद्रातच फेकता का? फेकत असल्यास, तसे करू नका. फेकत नसाल, तर कुठे फेकता? रस्त्यातच का? तर तसेही करू नका. एखाद्या सुका कचरा टाकू शकू, अशा कचरा कुंडीत टाका. तशी कचरा कुंडी आसपास नसेल, तर घरी घेऊन जा व घरातील कचरा कुंडीत टाका.
समुद्रामध्ये बिस्किटे टाकता हे ठीक आहे की नाही कल्पना नाही ( म्हणजे तो जैविक कचरा आहे की नाही) पण ते जाणून घ्या का? म्हणजे तो कचरा असल्यास पुढे टाकु नका, अशी विनंती. इथेही अपडेट करा बिस्किटे जैविक कचरा असल्यास, म्हणजे आम्हांला सुद्धा कळेल.
27 Dec 2018 - 9:52 am | विजुभाऊ
अगतीक अवस्थेत जाण्यापेक्षा. आनंदाच्या, आयुष्याच्या सर्वोच्च क्षणी मरण यावे. कारण त्या नंतर उतरतीच लागते.
आयुष्यात काहितरी मिळाले आहे, आपल्यावर किणीही अवलंबून नाही / आपल्या जाण्याने त्यांना फारसा आर्थीक ताण जाणवणार नाही. अशा वेळेस जाणे चांगले.
साधारणतः वयाची साठी हा योग्य माईल स्टोन ठरवता येईल.
सर्वसामान्य माणूस म्हणुन तोपर्यंत सर्व सांसारीक कर्तव्ये पार पाडलेली असतात. मुले बाळे आपल्यावर अवलंबुन नसतात, आपणही त्यांच्यावर अवलंबून नसतो.ब्याम्केत थोडीफार शिल्लक पडलेली असते. जगण्याचा थोडाफार आनंद घेऊन झालेला असतो.
जगण्याचे ओझे होईल इतके कशाला जगायचे.
आपण मेल्यावर या जगात कोणीतरी नाव घेईल हा अट्टाहास कशाला करायचा. ते करायचे असल्यास जे काही दान वगैरे करायचे ते आयुष्य संपवायचे त्या पूर्वी सहा महिन्यात करून टाकायचे.
स्वतःच्या अंत्यसंस्काराला पुरेल इतकी कॅश घरात ठेवून खुशाल बाय बाय करायचा.
कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर त्याला कंटाळा येईल इतके दिवस आपण कधी रहातो का? तसेच या जगाचे.
27 Dec 2018 - 5:03 pm | मुक्त विहारि
उगाच हाल-हाल होऊन मरण्यापेक्षा, शांतपणे ह्या जगाचा निरोप घेणे, कधीही उत्तमच...
17 Jan 2019 - 5:09 pm | NiluMP
कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर त्याला कंटाळा येईल इतके दिवस आपण कधी रहातो का? तसेच या जगाचे. -- झकास
26 Dec 2018 - 7:25 pm | खिलजि
अहो नाही ओ यशोधरा ताई .. ती बिस्किटे माशे आणि कावळे यथेच्छ ताव मारून खातात .. एकदा मी पाल्रे जी सोडून दुसरी चॉक्लेटवली बिस्किटे आणली होती तर त्यांना कावळ्यांनी तोंडही लावले नाही .. याचा अर्थ ते फक्त खाण्यायोग्य वस्तू असेल तरच खातात , हे माझे निरीक्षण आहे . आणि हो वर म्हंटल्याप्रमाणे मी याआधी बिस्कीट पुड्याची वेष्टने रस्त्यावर फेकून देत होतो पण आता ते थांबवणार आहे . ती सर्व गोळा करून कचरापेटीत टाकत जाईन .
हि सर्व माहिती मी गोळा करत नाही आहे , लोकांचा मृत्यूबद्दल काय दृष्टिकोन आहे ते बघतो आहे . प्रत्येक जीव हा त्याला सामोरा जाणार आहेच पण त्याआधी त्याने कसे जगावे किंवा त्याला कवटाळण्याआधी काय काय करावे जेणेकरून ते सुसह्य होईल हे तपासतो आहे .. बाकी काही नाही
26 Dec 2018 - 7:32 pm | सुधीर कांदळकर
मी नेहमी गमतीने म्हणतो. कार्यालयात प्रथमोपचार पेटी, औषधे इ. माझ्याकडे असे. कोणी डोकेदुखीची गोळी मागितल्यावर मी बंदुकीची चालेल का म्हणून विचारीत असे.
जन्म ते मृत्यू हा एक प्रवास मानला तर शैशव, विद्यार्जन, अर्थार्जन, विवाह, संतती, मुलांचे शिक्षण, मुलांच्या अर्थार्जनाला सुरुवात आणि मुलांचे विवाह हे या प्रवासातले मु़ख्य टप्पे मानता येतील.
हे सर्व टप्पे पार करण्यापूर्वी मृत्यू ओढवल्यास अवलंबितांची ओढाताण होऊ शकते. असा मृत्यू कविकल्पनांना मागे सारून दुःखदच म्हणावा लागेल.
मी हे सर्व टप्पे आता पार केल्यामुळे मृत्यूला सामोरे जाण्यास मुक्त आहे. कोणताही गंभीर आजार मला झाल्यास मी कोण्तीही उपाययोजना न करता अन्नपाण्याचा त्याग करून स्वतःचे जीवन संपविणार आहे. तसे सर्व जवळच्यांना सांगितले आहे. प्राणांतिक आजार झाल्यावर उपाययोजनेत पैसे उधळणे मला बरोबर वाटत नाही. स्वा. सावरकरांनी हीच पद्धत अवलंबिली होती.
समुद्रात काही टाकणे हे टाकणार्याला जरी भावनिक समाधान देणारे असले तरी ते वृथा आहे, त्याचा कुणालाही उपयोग होत नाही वा गेलेल्या व्यक्तीची स्मृती देखील मागे राहत नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर दशक्रिया, श्राद्ध इ. विधीत व्यर्थ खर्च न करता स्वकीयांपैकी गरजू विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती ठेवली होती. आमच्या गावी काही व्यक्तींनी आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ गावच्या ग्रंथालयाला घसघशीत रकमांची नवी पुस्तके विकत घेऊन दिली आहेत.
अर्थात ही माझी वैयक्तिक मते आहेत, तीच श्रेष्ठ असा माझा बिलकुल दावा नाही.
26 Dec 2018 - 9:32 pm | Rajesh188
चांगलं मरण आल पाहिजे ही तर सर्वांची इच्छ्य असते त्यात काही वाईट नाही.पण हे आपण कसं आयुष्य जगतो ह्यावर अवलंबून आहे हे लोक विसरतात .योग्य आहार,योग्य व्यायाम,निरोगी विचार ,निगेटिव्ह पूर्ण टाळणे हे सर्व ज्याला जमलं तो निरोगी जगाला .आपलं होतंय काय जवानी,आणि बालपण आपण आपल्या मर्जीने जगतो बालपण मध्ये जाणीव नसते आणि तरुणपणात जवानीची नशा .आरोग्य ची आठवण येते 30 वर्ष ओलांडल्यावर मग डाएट काय व्यायाम काय त्याचा काही फायदा नाही .मराठी म्हण करून करून दमला आणि देवपुजेला लागला देव पावण्याची बिलकुल शक्यता नाही
26 Dec 2018 - 8:56 pm | वीणा३
जिवंत असे पर्यंत जेवढा जमेल तेवढा करायचं, जास्त त्रास करून घ्यायचा नाही कारण कितीही केलं तरी काहीतरी राहिलं अशाच वाटेल.
माझ्या आई-बाबानी देहदान चा फॉर्म भरून ठेवलाय आणि जवळच्या सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलाय कि फॉर्म इथे आहे त्याच्यावर फोन करा. १०-१२ व करायचं नाही, केलं तर आमचा आत्मा भटकत राहील. अगदीच विचित्र वाटत असेल तर आमच्या १० व्य ला सगळ्या नातेवाईकांना पत्ते खेळायला बोलावं आणि आईस क्रीम खायला दे. आईस्क्रीम आणि पत्ते हा दोघांचा आवडता प्रकार.
अवांतर - मला ना मेल्यावर भूत व्हायचंय आणि ४-५ लोकांच्या घरी जाऊन त्यांची भांडी पाडून दार-खिडक्या उघड्या करून यायचंय. आणि जे काय जग बघायचं राहिलाय ते वरून बघायचंय, तिकीट बुक करा, हॉटेल बघा, कपडे पॅक करा काय कटकट नाही :P
27 Dec 2018 - 9:53 am | विजुभाऊ
मायला . लैच्च भारी की. बकेट लिस्ट मधे अॅड करायला हवं हे
27 Dec 2018 - 4:48 pm | खिलजि
एक नंबर लिवलंय ,, विना तै .. लय आवडलंय .. भारी
27 Dec 2018 - 6:26 am | सुधीर कांदळकर
लिहायच्या राहून गेल्या.
१. माझा मेडिकल इन्शुअरन्स आहे.
२. माझ्या कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण करण्याआधी मला न उचलल्याबद्दल निसर्गाचे आभार.
३. एका वेगळ्या विषयावरच्या लेखाबद्दल लेखकाचे आभार.
27 Dec 2018 - 9:56 am | टर्मीनेटर
या वाक्यांशी १००% सहमत.
बाकी जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याबद्दल विचार न करता "अपना हर दिन ऐसे जियो...जैसे के आखरी हो..." या गाण्या प्रमाणे मजेत जगात राहावे :)
27 Dec 2018 - 4:56 pm | खिलजि
प्रत्येकाला व्यनि करण्याऐवजी , समस्त मंडळींचे इथेच आभार मानतो .. धन्यवाद
27 Dec 2018 - 8:45 pm | मालविका
पण अजूनही मला समुद्रात बिस्किटे टाकणे विचित्र वाटते . मी खूप भावनिक विचार नाही करत म्हणून असेल कदाचित पण तेच बिस्कीट पुडे गरजूना देणं जास्त बरोबर वाटत . मानसिक समाधान हे कारण कितीही बरोबर असलं तरी हे म्हणजे शंकराच्या पिंडीवर दुधाच्या पिशव्या ओतायच्या नि बाहेर कोणीतरी दुधाशिवाय तडफडतोय त्याबद्दल हळहळायचं . याला अर्थ नाही . अर्थात प्रश्न सर्वस्वी तुमचा आहे .
27 Dec 2018 - 9:03 pm | खिलजि
अहो मालविका ताई , मी जेव्हा पुलावर उभा असतो तेव्हा तिथे रस्त्यावर फिरणारे गरीब लोकही येतात कि मागायला . मी खुशाल देतो त्यांना , पाहिजे तेव्हढे . आणि उरलेले समुद्रात टाकतो . मासे आणि चिमणी कावळे यांचेही बघायला नको का .. तेव्हढेच नाही तर मी माझ्या हॉलपासून बेडरूममपर्यंत दररोज पाण्याची भांडी भरून ठेवलेली असतात . नेहेमी तिथे कबुतरे, चिमण्या , साळुंक्या , कावळे आणि पोपटही येतात बरे का .. अहो मला हेच तर म्हणायचे आहे , सुख द्यायचे आणि तेच परत मिळवायचे .. या एकाच तत्वावर मी विश्वास ठेवून चाललेलो आहे सध्या . बघू पुढे काय होतंय ते ..
27 Dec 2018 - 9:44 pm | यशोधरा
कबुतरे जर हॉल, बेडरूम वगैरे ठिकाणी येत असतील तर तिथे इतर कोणीही पक्षी फिरकणार नाही. कावळे कबुतरांच्या जवळही फिरक त नाहीत. साळुंकी एक वेळ ठीक. चिमण्या पण येणार नाहीत, कबुतरे असली तर.
27 Dec 2018 - 10:32 pm | टर्मीनेटर
कबुतरांचा त्रास तर सर्वत्र जाणवायला लागला आहे आज काल आणि मी तरी त्या गोष्टीसाठी त्यांना खाद्य घालणाऱ्यांना जवाबदार ठरवतो...अरे तुम्हाला आवड असेल तर कुत्र्या-मांजरा प्रमाणे पाळा कि तुमच्या घरात का उगाच त्यांना दाणे देऊन दुसऱ्यांना त्रास देता!
28 Dec 2018 - 10:12 am | मुक्त विहारि
काय बोलणार?
28 Dec 2018 - 4:08 pm | खिलजि
अहो यशोधरा ताई . मला तुमचे हे म्हणणे पटले नाही बरे का .. कारण मी स्वतः सुट्टीच्या दिवशी निरीक्षण केलेले आहे . कबुतरे, कावळे चिमण्या आणि साळुंक्या सर्व जण आलटूनपालटून येत असतात .. खास करून कावळ्यांनी त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे स्वयंपाक खोलीच्या खिडकीवर ताबा संगीता आहे . तिथे चिमण्यांची येतात . आणि कबुतरे मात्र हौलच्या खिडकीत आढळतात . मी सर्व खिडक्या मोकळ्या ठेवल्या असल्याने कुणीही तिथे स्वतःचंही कुटुंबे थाटली नाही आहेत . फक्त प्रत्येक खिडकीत एक टाइल ठेवलेली आहे , त्यावर दानपाण्याची व्यवस्था असते . ज्या काही अक्षता ( देवाला वाहिलेले तांदूळ ) मी सकाळी प्रत्येक टाईलवर टाकतो , ते कबुतरे आणि चिमण्या येऊन टिपून जातात .. दुसरे काही नाही ..
28 Dec 2018 - 5:52 pm | यशोधरा
हॉल, बेडरूममध्ये येणारे पक्षी आता खिडकीवर गेले, प्रगती आहे :)
खिडकीशी पक्षी येऊ शकतात, खाणे रोज ठेवत असाल तर.
आम्ही सुद्धा ठेवतो आणि तिथे सन बर्डस, बुलबुल पासून तुम्ही उल्लेखिलेले सगळे पक्षी येतात, फक्त हॉल, बेडरूम, स्वयंपाक घर इथे येत नाहीत. नाही म्हणायला कावळे प्रयत्न करू पाहतात, कधी कधी.
असो. :)
29 Dec 2018 - 3:14 pm | खिलजि
यशोधरा ताई , मला खिडकीमध्ये येणाऱ्या पक्ष्यांबद्दलच बोलायचे होते .. माझ्या घरात कुठलाही पक्षी येत नाही .. कबुतर किंवा कावळा आला तरीही माझा छोट्या त्यांना बाहेर तत्पर हुसकावून लावतो किंवा आरडाओरडा तरी करतो ..
30 Dec 2018 - 11:35 am | यशोधरा
तुम्हीच लिहिले होते बरं का दादा. म्हणून म्हटले. असो.
आता जे काही लिहिले आहेत, की खिडकीपाशी पक्षी येतात, ते पटण्याजोगे आहे. अगोदर लिहिलेले तसे नव्हते. लिहिण्याच्या उत्साहाच्या भरात असे लिहिले गेले, असे समजते, काय? पक्ष्यांची वागायची एक पद्धत असते, त्या बाहेरचे काही सांगितलेत तर ते पटण्याजोगे नाही, इतकेच.
28 Dec 2018 - 10:34 am | वेडसर
इतकेच सांगू शकेन की मरणाइतका अन्य कुणी सच्चा सखा नाही. मरणाहून अधिक शाश्नत, सत्य असे अन्य काहीही नाही.
28 Dec 2018 - 4:15 pm | खिलजि
टर्मिनेटर साहेब , हा जो कबुतरांचा त्रास होतो ना त्याला आपणच जबाबदार आहोत .. जर आपण आपापल्या खीडक्या नीट मोकळ्या ढाकळ्या ठेवल्या तर मला वाटते कबुतरे तिथे संसारच मांडणार नाहीत . स्वतः बघितलेले आहे म्हणून सांगतो . आमच्या इथे लोकांनी कबुतरे येऊ नये म्हणून , जाळ्या लावलेल्या आहेत आणि बरीच अडगळ तिथे मांडून ठेवलेली आहे . मी टॉप फ्लोअरला राहत असल्याने माळ सर्व व्यवस्थित दिसते . होते काय कि , त्यातील बर्याच जाळ्या कालांतराने खराब होतात आणि कबुतरांना म्हणा किंवा चिमण्यांना म्हणा तिथे आयते बस्तान मांडायला वाव मिळतो .. पिलावळ वाढली तर आणि उडून गेली तर ठीक पण काही कारंणाने कावळ्यांनी हल्ला चढवला तर तिथे त्या अडगळीतच घाण होते आणि मला वाटत सणासुदीखेरीज आजकाल कोण अश्या ठिकाणी साफसफाई करत नाही . तेव्हा मग पुढे सर्व घाणीचे साम्राज्य चालू होते .. बाकी मी जे काही करतो ते माझे नित्यकर्म म्हणून करतो आणि पुढेही करत राहीन . धन्यवाद
28 Dec 2018 - 10:42 pm | चित्रगुप्त
स्वतःपुरते बोलायचे झाले तर असे काहीतरी करत असताना अचानक मरण यावे, असे वाटते:
.
28 Dec 2018 - 10:52 pm | चित्रगुप्त
बिस्किटे समुद्रात टाकण्याची आयडिया एकदम भारी. ती बिस्किटे मैद्याची-अर्थात ग्लुटेनयुक्त असल्याने खरेतर मुलांनीच काय, कोणीही खाऊ नयेत.
29 Dec 2018 - 8:19 am | चौकटराजा
मी डेस्क टॉप समोर बसलो आहे . यु ट्यूब वर नय्यर चे गीत नटखट मधुबाला सादर करतेय ... हावडा ब्रीज ये "क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया .. . अन माझे व निसर्गाचं दिल वेगळं राहत नाही ,,,, मान डेस्कवर कलते ......शांतपणे ... बायको स्वयंपाक घरातून येते .." अहो जेवायला चला ...... आय ऍम नो मोअर ... !
29 Dec 2018 - 3:12 pm | खिलजि
जब्बरदस्त कल्पना .. मला आवडली .. मलाही वाटते कि मरण्याआधी माझ्या प्राणप्रिय बायकोला माझी काही कृष्णकृत्ये सांगून मरावं .. वरच्याने एक मुभा दिली पाहिजे , ती हि कि निदान काही मिनिटे आधी तरी कल्पना यावी कि मी जाणार आहे आणि ती शेजारी असावी . तिने काही बडबड करण्याआधी मी तिला सर्व सांगून टाकावे आणि अचानक एक तीव्र कळ आली पाहिजे आणि खेळ खल्लास .. कशी वाटली कल्पना ..
29 Dec 2018 - 8:17 pm | सुबोध खरे
कृष्णकृत्ये करू नयेत, केली तर लपवू नयेत आणि लपवली तर कधीही उघड करू नये.
मरताना बायकोला आपली कृष्णकृत्ये सांगितली तर बायकोला आपल्या बद्दल काय वाटेल याचा विचार करून पहा.
ती फारच वाईट असतील तर बायको आपला द्वेष करणार असेल तर मरताना तिला दुःख देऊन काय मिळवणार?
आणि तेवढी वाईट नसतील तर आता आपल्या मनावर आपण ओझं बाळगताय ते तिला आजच सांगून मोकळे व्हा.
2 Jan 2019 - 1:51 pm | खिलजि
खरंय , तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे .. विचार केला जाईल यावर , धन्यवाद साहेब .. अमूल्य मार्गदर्शनाबद्दल
1 Jan 2019 - 12:05 pm | उगा काहितरीच
मी कमावलेले ९९% पैसे मला हवे तसे खर्च करून (१% अंत्यविधीसाठी शिल्लक ठेवून) मरावेसे वाटेल. कसं आहे ना , प्रत्येकाच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. काही सुप्त आकर्षण असतात जसेकी दारू , सिगारेट , गांजा , कुठल्या जागेवर जाणे (हिमालय , काशी , कुठले देवस्थान वा कुठला किल्ला दुर्गम जागा वगैरे ) नर्मदा परिक्रमा , पंढरपुरची वारी , वेगवेगळ्या देशातले पदार्थ खाणे , कुठले तरी संगीत ऐकणे , कोणते तरी चित्र डोळे भरून पहाणे , कुण्यातरी व्यक्ती बरोबर वेळ घालवणे , काहीतरी वस्तू खरेदी करणे ,याशिवायही भरपूर काही इच्छा असू शकतात पण काही कारणांमुळे मुख्यतः समाजाचे अदृश्य जोखड असल्यामुळे पूर्ण करायच्या राहून जातात. तर अश्या माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून मरण आलेले आवडेल. मग पन्नाशीत का साठीत का चाळीसीत त्याने फरक पडणार नाही.