शिक्षणाच्या आईचा घो

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in काथ्याकूट
14 Dec 2018 - 12:45 am
गाभा: 

रविवार आंबट गोड.

शनिवारी लेकीचा दुसर्या टेस्टचा निकाल लागला.निकाल म्हणजे ॲक्च्युली निकाल.मागच्या एक्झामला ज्या विषयांत कमी मार्क्स होते त्यात यंदा जास्त आणी ज्यात जास्त होते त्यात कमी ?

निकालून बाहेर पडल्यावर काहीच न बोलता आमची वरात घराकडे निघाली.बारा वाजले असतील घड्याळातले आणी माझ्या चेहऱ्यावरचे.पाच मिनीट शांतता होती.साधारण दोन किलो मिटर नंतर मागुन हळुच आवाज आला "बेयर ,भुक लागलीये"
च्ययाला ! हिच्या भविष्याच्या काळजीने माझं सगळंच आटलय आणी हिला भुक लागते ?

"काय खाणार ?" मी
"हं ! बेयर आपण अन्नपुर्णात जाउ .मटर पनिर आणी बटरनान खायचय .मस्त असतं तिथलं" मांजर बोलली.

" बब्या ! आभ्यासाचं मनावर घे रे प्लिज " आम्ही
"अंsss ! बेयर ,बारा वाजलेत आणी मला भुक लागलीय आधी जेउयात मग घरी गेल्यावर बघु" मांजर

"ओके" आम्ही

टरटरीत जेवण करुन घरी गेलो तर मांजर शांतपणे चेंज करुन झोपुन गेली.

आज रविवारी सकाळीही दहा वाजेपर्यंत ढाराढुर.कसंबसं उठवुन मी संतापात बडबड करायला सुरुवात केल्यावर मांजर आवरुन अभ्यासाला बसली.तासाभराने पुन्हा पहिले पाढे पंचावन .

शांतपणे टिव्ही अॉन करुन माझं ब्लड प्रेशर वाढवलंच.पुन्हा बोंबाबोंब.
शेवटी कंटाळुन पाच वाजता घराबाहेर चालता झालो .अर्धा तासात फोन " बेयर ! तु कुठंयस ? मला बोअर होतय."

झक मारत होतो तिथुन परत आलो आणी मांजरीला घेउन बाहेर पडलो.
"बब्या थोडा अभ्यास कर ना रे " मी

"बेयर ! सकाळपासुन तुझं ऐकुनही मी माझा मुड चांगला ठेवलायआता उगाच बोअर करु नको. मी माझं करीअर ठरवीन आणी ते चांगलच असेल.सारखं अभ्यास करुन मला अशक्त बकरी बनायचं नाहिये.आता गप मॕक डी ला चल" मांजर

बेयर फ्लॕट

प्रतिक्रिया

जानु's picture

14 Dec 2018 - 11:44 am | जानु

लय भारी!!!!

सिरुसेरि's picture

14 Dec 2018 - 12:08 pm | सिरुसेरि

खल्लास .. नादच नाही .

पद्मावति's picture

14 Dec 2018 - 12:49 pm | पद्मावति

:) मस्तच.

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2018 - 5:27 pm | चौथा कोनाडा

बाबौ !

अन वर परत "आता गप मॅक-डी ला चल"

बेयर, कसं व्हायचं तुमचं ?

प्रमोद पानसे's picture

14 Dec 2018 - 6:38 pm | प्रमोद पानसे

हा हा !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2018 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

बेयर स्ल्येड ! :)

टवाळ कार्टा's picture

14 Dec 2018 - 10:39 pm | टवाळ कार्टा

ख्याक

श्वेता२४'s picture

15 Dec 2018 - 7:11 pm | श्वेता२४

मांजर सुसाट :D

प्रमोद पानसे's picture

15 Dec 2018 - 9:48 pm | प्रमोद पानसे

भयंकर सुसाट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2018 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं मीही अवस्थेतून जातोय. फिस भरतोय, पोरगं अभ्यासही करतंय
आणि मार्क काही मला शांत झोपू देत नाहीत.

आता पुढच्या वेळी चांगले मार्कस घेतो या आशेवर आमचा संवाद सुरु आहे.

-दिलीप बिरुटे
(पालक)

प्रमोद पानसे's picture

15 Dec 2018 - 9:50 pm | प्रमोद पानसे

Hmmmm

खिलजि's picture

15 Dec 2018 - 8:14 pm | खिलजि

माझी दोन्ही पोरं याच वळणावर आहेत ... अंतिम निकाल जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा माझ्या कपाळात असतात .. कारण शाळेचा अत्याचारी नियम .. शेवटच्या परीक्षेत एका जरी विषयात फेल झाला तर पालकाने त्याला जवळजवळ पंधरा वीस दिवस नित्यनेमाने शाळेत आणून सोडणे आणि खरं सांगू हे मी मागची दोन वर्षे अगदी ना चुकता करतोय .. मागच्या वर्षी थोरले बाळराजे , इतिहासात फार उलथापालथ करून आले .. इतिहास असा काही वळवला कि विचारू नका .. पेपर तपासणार्याने माझे कां उपट उपट उपटले ..
मी मास्तरला म्हंटल , घराण्याचा एव्हढा मोठा इतिहास पाठीशी असताना कुठे माशी शिंकली ते कला नाही ओ .. पुढील वेळेस योग्य ती काळजी घेतली जाईल .. मग काय नित्य नेमाने , मी त्याला शाळेत सोडायचो आणि साडे तीन तासांनी आणायला जायचो .. इथे माझ्या कामाच्या आयचा घो मात्र पुरेपूर झाला .. त्याच्या आदल्या वर्षी साहेब ऐन परीक्षेला आजारी पडले तेव्हाही तसेच ..
आता बघू पुढे काय वाढलंय ते ...
शाळेने मला वाटत , कार्टून व्यक्तिमत्वावर इतिहासाचा पेपर छापावा ,, निदान पहिली ते सातवीच्या विध्यार्थ्यांसाठी तरी हे करावे .. म्हणजे शिन चॅन ची आई कोण बहीण कोण बाबा काय करतात , डोरेमॉन नक्की कोण डॉरेमोन कोण ? हे असे प्रश्न इतिहासात आले कि बघा थोरले बाळराजे परीक्षेत कसे चमकून उठतील ते /// अर्रे येऊन येऊन येणार कोण ,, आमच्याशिवाय हाय तरी कोण .. मी मग आनंदाने पेढे वाटेन ..यासाठी कि निदान माझ्या कामाचा तरी आयचा घो होणार नाही ..

प्रमोद पानसे's picture

15 Dec 2018 - 9:49 pm | प्रमोद पानसे

डोंट वरी

आल इज वेल

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2018 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

मागच्या वर्षी थोरले बाळराजे , इतिहासात फार उलथापालथ करून आले .. इतिहास असा काही वळवला कि विचारू नका

आँ, आता तर तुम्हाला काळजीच नको. असे करण्याची हातोटी असणारी माणसे राजकारणात फार वर जातात आणि त्यासाठी कोणत्याही औपचारिक शिक्षणाची गरज नाही. किंबहुना, असे औपचारीक शिक्षण घेतलेले अनेक ब्युरोक्रॅट्स आणि उद्योगवीर त्यांच्या पुढेमागे करत असतात ! :) ( हे उघड सत्य आहे, तरीही, हघ्याहेवेसांन)

धर्मराजमुटके's picture

15 Dec 2018 - 8:38 pm | धर्मराजमुटके

बेयर म्हणजे ?

प्रमोद पानसे's picture

15 Dec 2018 - 9:50 pm | प्रमोद पानसे

टेडी बेअर

अस्वल

प्राणीमात्रांकडून लई अपेक्षा ठेवू नका.
______________________

मिपा हलकं केलंत बऱ्याच दिवसांनी!!

भारी , आमच्याकडे लेकीने चांगला अडीच लाखाला चुना लावलाय , डिझाईन परीक्षांच्या तयारीसाठी . ड्रॉईंग खूप चॅन आहे पण आपटी कोण करणार ? तरीही आहेच,मी बघेन माझं मी ...

प्रमोद पानसे's picture

16 Dec 2018 - 11:12 pm | प्रमोद पानसे

आयला ! मला वाटलं बेंड फक्त माझ्याच बुडावर आलय ,.

नाही हो नाही, एकाच बोटी चे प्रवाशी आपण

मीच एकटी आहे का कि जिला हे दोन्ही लेख विचित्र वाटतायत. मला हे कबूल आहे कि मुलांना सांभाळणं अवघड असतं, पण आई वडील फार आरामशीर घेतायत असं कोणालाच वाटतं नाहीये का? किंवा किमान त्यांना त्यांची जबाबदारी वयानुरूप घ्यायला लावावी असं वाटत नाहीये का.

मी आत्तापासून माझ्या मुलाला त्याच्या कपड्याच्या घड्या करायला (किमान मी केलेल्या घड्या त्याच्या कपाटात नीट ठेवायला सांगते), किमान त्याची कामं त्याने करावीत / प्रयत्न तरी करावा हे शिकवायचा प्रयत्न करतीये. हे दोन्ही लेख वाचून आता मी जरा विचारात पडल्ये :P . प्रत्येकाची पालकत्वाची कल्पना वेगळी असते हे मान्य आहे. मुलांचं नशीब असेल तर त्यांचं सुद्धा सगळं चांगलं होईल हे पण मान्य आहे.

पण माझं मी बघेन हे सांगणाऱ्या मुलाला (वय किमान १८ हे गृहीत धरलंय), सगळंच तूच बघ माझ्याकडे गप्पा मारायला ये फक्त हे उत्तर देणारे पालक दिसताच नाहीयेत. मला वाटायला लागलाय कि मीच जास्त विचार करतीये :(.

टीनएज मधील मुलांबरोबर संवाद चालू ठेवण्यासाठी हे सगळं कर्ण भाग आहे असं वाटायला लागलाय

सुबोध खरे's picture

18 Dec 2018 - 9:33 am | सुबोध खरे

वीणा ताई
मुलांनीं स्वतःची कामे स्वतः करायला पाहिजेत हा आपला आग्रह अतिशय योग्य आहे.
मुलांना स्वातंत्र्य देणे हेही योग्य आहे परंतु ते किती द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे मुलांच्या मनावर बिंबवून ठेवणे आवश्यक आहे.
पण प्रत्येक वेळेस गुण चांगले मिळवलेस तर हे देईन ते देईन हि लालूच दाखवणे चांगले नाही.
केवळ मुलाने परीक्षेत उत्तम गुण मिळवले म्हणजे त्यांनी कसंही वागलं तरी चालतं समजणारे पालक कमी नाहीत.
किंवा आगाऊ पणे बोलणे म्हणजे हुशारी असं समजणारे पालकही कमी नाहीत.
पौगंडावस्थेतील मुलांना पालकांपेक्षा आपले मित्रच जास्त बरोबर वाटत असतात. शिवाय उंची वाढली म्हणजे आपल्याला अक्कल आली असे समजणारी मुले पण सर्वत्र दिसतात. परंतु तुम्ही कळकळीने एखादी गोष्ट सांगत असता ती त्याच्या पर्यंत पोहोचते हि पण वस्तुस्थिती आहे. पालथ्या घड्यावर पाणी असे वाटत असले तरी थोडे तरी आत झिरपतेच.फक्त हे सांगणे "जास्तीत जास्त २ मिनिटात" आटपता आलं पाहिजे. कारण या कालावधी नंतर मुले "लक्ष देणे" सोडून देतात. तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी कितीही हिताच्या असल्या तरी त्या समजून घेण्याची "बौद्धिक उंची" त्यांनी गाठलेली नसते.
मी मुलांना कोणतीही गोष्ट बळजबरीने करण्यास भाग पडण्यापेक्षा समजावण्याचा प्रयत्न करत असे. समजलं तर ठीक नाही तर सोडून द्यायचं.
माझं म्हणणं एकच असे कि मी "वरिष्ठ" आहे म्हणून मी बरोबर आहे असे नाही तर चुका करण्याचा आणि त्यतून शिकण्याचा माझा अनुभव तुमच्या पेक्षा बराच जास्त आहे. ( I have more experience at being wrong than you).
काही काळानंतर मुलांना लक्षात यायला लागतं कि आपला बाप आपण समजत होतो तितका मूर्ख नाही.

झेन's picture

18 Dec 2018 - 9:13 pm | झेन

- "जास्तीत जास्त २ मिनिटात" आटपता आलं पाहिजे.

- चुका करण्याचा आणि त्यतून शिकण्याचा माझा अनुभव तुमच्या पेक्षा बराच जास्त आहे.

बाकी आपण फक्त प्रयत्न करू शकतो.

पिलीयन रायडर's picture

18 Dec 2018 - 1:13 pm | पिलीयन रायडर

माझंही तुमच्या सारखंच झालंय. मी फार शिस्तप्रिय वगैरे नाही. बऱ्यापैकी निवांत व्यक्ती आहे. तरीही मला ह्या दोन्ही लेखात काही तरी खटकतं आहे. इतकं मी मुलांच्या मनावर सोडून देत नाही... अर्थात वयानुरूप असतं म्हणा ते ही. माझं पोरगं आत्ताशी 6 वर्षाचं आहे, अजूनतरी मैत्रीण असल्यासारख्या गप्पा तो मारत नाही माझ्याशी. आई म्हणूनच बोलतो. मी सुद्धा आई सारखीच वागते. कदाचित मोठा झाला की वरच्या लेखातील approach जास्त effective असेल.. तरीही...

प्रमोद पानसे's picture

18 Dec 2018 - 1:21 pm | प्रमोद पानसे

सगळं तुच बघ ,इथे फक्त गप्पा मारायला ये

एवढं स्वातंत्र्य दिलं तरी मन स्वस्थ बसु देतच नाही.अधुन मधुन आठवण करावी लागते.

यशोधरा's picture

27 Dec 2018 - 2:50 pm | यशोधरा

मला तर पालक स्वतःचा इगो गोंजारत आहेत आणि उगाच मुलांच्या नावाने बिल फाडत आहेत, असं वाटतं आहे. मुलं व्यवस्थित स्वतःबद्दल प्लानिंग करून असणार आहेत आणि पालक उगाच तडतड करत आहेत.

शांत रहा. मुळात पालकांना कितपत स्वयंशिस्त आहे की मुलांना लावायला बघत आहेत? मुलं बघूनच शिकतात सहसा. तेव्हा ती काय पाहून शिकत आहेत, असा प्रश्न पडतोय मला.

आणि मुलं हुशार आहेत ना

यशोधरा's picture

27 Dec 2018 - 2:52 pm | यशोधरा

*आणि मुलं हुशार आहेत नक्कीच, नपेक्षा पालकांना इतका कॉम्प्लेक्स देऊच शकणार नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2018 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

इथली बरीच मुलं पालकांना "मॅनेज" करत आहेत, असं मी पूर्वीच म्हटलं आहे ! :)

मात्र, पालकांना "मॅनेज" करताना मुले स्वतःच्या जीवनात कोणत्या मार्गाने जात आहेत, हे काळजी करण्यासारखे आहे. कारण, आपल्यावर प्रेम करणार्‍याला व आपली चिंता करणार्‍याला, सेंटिमेंटल ब्लॅकमेल करून मॅनेज करणे, तसे फारसे कठीण नसते. बाहेरच्या जगात असे करण्याची सवय असलेल्यांना त्याची किंमत चुकवावी लागली नाही, तरच आश्चर्य.

हो, खरे आहे एक्का काका, पण हे समजण्याइतकी प्रगल्भता वा विचारांची खोली मुलांकडून आत्ताच कशी अपेक्षित करता येईल? त्यांना आत्ताच हे समजले तर त्यांना पालकांची गरजच नाही ना. :)

एकूण लेख व प्रतिसाद पाहिले असता, क्लासला पैसे मोजले आहेत, म्हणजे आपले काम झाले आणि आता पुढचे काम पाल्याचे असा सुर दिसतो आहे तो अधिक भीतीदायक आहे. मांजर, अभ्यास कर म्हणून मांजर अभ्यास करत नसेल, तर मांजराचा अभ्यास काय आहे, कसा आहे, कंटाळवाणा आहे का, असल्यास का, तो interesting बनू शकतो का ह्यावर टेडी अस्वलाने काही चिंतन केलेय का नुसतेच हायबरनेट करतेय अस्वल, अस्वलच जाणे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2018 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

"मुलांचे योग्य तेवढे लाड करणे" आणि "त्यांना पांगळे बनवणार्‍या अतीलाड करण्याच्या आहारी जाणे" यातील सीमारेखेचे ध्यान ठेवले नाही तर मग मुलांना बिघडवून त्यांचे भवितव्य आपणच बिघडवले आहे, हे पालकांनी समजावे... पचवायला कठीण पण कटू सत्य !

योग्य पालकत्व म्हणजे मुलांच्या सगळ्या इच्छा व हट्ट पुरे करणे नाही तर, त्यांच्या योग्य तेवढयाच गरजा व इच्छा पुर्‍या करून, त्यांना पुढचे जीवन स्वतःच्या जबाबदारीवर व्यतीत करण्यासाठी तयार करणे असते. ते करताना, वेळप्रसंगी कठोर होऊन, वाईटपणाही स्विकारावा लागतो. जे पालक हे करण्यास कचरतात, ते त्यांच्या पाल्यांचे दीर्घकालीन नुकसानच करत असतात.

विशुमित's picture

22 Dec 2018 - 11:00 am | विशुमित

Home Schooling,
मला हा पर्याय अपिलींग वाटला.
मिपकरांचे मत जाणू इच्छितो!
...
https://www.loksatta.com/mumbai-news/homeschooling-in-india-1810145/

आमच्या कडे पण दीड दोन लाखाला.
बारावीला हट्टाने इलेक्टृओनीक्स घेतले,
सी ई टी , जे ई ई वगैरे साठी भरपूर फीसवाले क्लासे लावले.
डिसेंबर नंतर बाळाचा उत्साह मावळला.
इंजिनीरींग करायचे नाही , आय आय टी वगैरे नकोच.
दहावीला ९२ टक्के होते.बारावीला ते बहत्तर झाले. ( हे ही खूप्च म्हणायचे)
सीईटी चा निकाल काय लागला हे विचारले तर महाराज उत्तरले की जे करायचे नाही त्याचा निकाल तरी कशाला पहायला जायचे.
धन्य..... झालो.
मायला आमच्या वेळेस आमच्या बापसावाला असे उत्तर द्यायची हिम्मत असती तर ( हेवा वाटतोय बाळराजांचा )
असो. निदान ग्रॅज्यूअ‍ॅट तरी हो या धृवपदावर बाळाने बी एस सी ला अ‍ॅडमिशन घेतली आहे .
पुढे जे होईल ते त्याचे त्याला भोगायचे आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते. त्याला आपण देवू केलेले पाणे आवडत नसेल तर त्याने तेच प्व्यावे हा अट्टहास कशाला.

यशोधरा's picture

27 Dec 2018 - 2:56 pm | यशोधरा

विजूभाऊ, तळ्यात उतरून पोहोल्याशिवाय मुलाला कसे समजेल की त्याला विषय आवडतात की नाही? तरीही डिसेंबर नंतर त्याला समजले म्हणजे लवकर लक्षात आले ना? एकदम फी ना भरता, 3 ते 4 महिन्यांची अशी फी क्लास ला भरता येते. तशी भरली असती, तर चालण्यासारखे आहे.

आजकालची मुले पूर्वीसारखी झापड मनोवृत्तीची नाहीत ह्याचे तुम्हाला कौतुक वाटत नाही का?

बी एस सी नंतर करीयर नसते, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मोठ्ठा गैरसमज आहे आणि तो लवकरात लवकर दूर व्हावा.

विशुमित's picture

27 Dec 2018 - 3:20 pm | विशुमित

तुमचा प्रतिसाद वाचुन आताच टेंशन आले.