किकलीच्या मध्ययुगीन परिसरात

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
1 Sep 2015 - 3:55 pm

रेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो.

पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत. ह्या चंदन वंदन शिवाय ह्या परिसरातील इतर किल्ले म्हणजे केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, कमळगड, पाण्डवगड, अजिंक्यतारा, रोहिडा ही भोज शिलाहार ह्याची निर्मिती. ह्यांतील उंचीने कदाचित सर्वाधिक चंदन वंदनच असावेत.

चंदन वंदनला जाण्यासाठी किकलीतूनच पुढे ३ किमी असलेल्या बेलमाची गावात जावे लागते. ह्या बेलमाच्या पण दोन. एक खालची बेलमाची तर दुसरी किंचित उंचीवर असलेली वरची बेलमाची. आमचा उद्देश मात्र चंदन वंदन सर करण्याचा नसून किकली गावातले मध्ययुगीन मंदिर पाहण्याचा तसेच तिथले मोठ्या संख्येने असलेले वीरगळ बघण्याचा होता.

किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्‍या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.

चंदन- वंदन

a
मंदिर प्रवेशद्वार
a

प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर

a

प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्‍यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.

उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
a

गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
a

मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.

सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.

ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.

मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.

भैरवनाथ मंदिर, किकली
a

मुखमंडप
a

मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत.

मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल

a-a--a--a

गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल

a--a--a--a

मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक

a

मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
a

ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.

प्रसवा
a

चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.

सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.

सभामंडपाचे प्रवेशद्वार
a

प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.

प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
a

गज व शरभ
a

प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील नक्षीकाम
a

सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.

सभामंडपाची रचना

a

हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.

आभासी शिल्प
a

याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.

छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.

ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्‍या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.

वामनावतार
a

त्रिविक्रम

a

रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.

रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
a

राम हनुमानाची भेट
a

सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
a

रामहस्ते वालीवध
a

हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
a

हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
a

रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.

हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
a

हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.

a

शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.

शिवतांडव १

a

शिवतांडव २
a

कलशपूजन करणारे हंस
a

खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.

पौराणिक शिल्प
a

स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.

हरिहर

a

नर्तकी
a

अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट

a

दर्पणसुंदरी

a

सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.

छतावरील नक्षीकाम

a

ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार
a

गर्भगृहे
a

गर्भगृहे
a

मंदिराचा अंतर्भाग

a

ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागात फेरफटका मारायला निघालो. एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्‍याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.

मंदिराचा बाह्यभाग
a

इतक्यात पाऊस धूम धूम कोसळू लागला आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारत आलो.

कोसळता पाऊस
a

दिपमाळा
a

मंदिरातून बाहेर आलो. आता किकली गावाकडे निघालो. किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.

काही वीरगळ

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

a

खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव.
पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली पाहूनच आम्ही पुढे निघालो.

आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2015 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

मी आगोबा बरोबर - ज्यांचं मूळ नाव वल्ली हेच्च आहे.. :-/ आणि प्र चेतस हे ज्याच्या व्यक्तित्वाची झळाळी हरण करणारं (अश्या माणसाकरता भाषा ऐति हासिक'च वापरली पायजे. ;) ) नाव आहे ..अश्या एका छळू हत्ती (या ट्रीपवर्णनात चिडवणारच्च मी :-/ तिथे एक हत्तीपण होता ना! :-/https://lh3.googleusercontent.com/-Wl5TCUH_CkY/Veg_9pbu-TI/AAAAAAAAIe4/C8ktkCnD-zY/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520012.jpg ल्लुल्लुल्लु :-/ ज्जा! ) बरोबर गेल्या दोन वर्षात पाहिलेली जेव्हढी मंदिरं लेण्या इत्यादी आहेत.त्यातली ही पण सफर यादगार ठरली. किकलीचं मंदिर उत्कृष्ठ आहेच. पण माझं आकर्षण होतं..ते तिथले वीरगळ आणि ती विहिर. विहिर,खोल तळी,सौंध,रात्रीच्या वेळी दिसणारे नदीचे संथ गूढ गंभीर डोह..(तुळापूर-भीमा..भामा..संगम..पौर्णिमेची रात्र,फुलमून चे त्यात पडणारे प्रतिबिंब..कडक थंडी..आणि संप्पूर्ण नि:शब्द वातावरण.. आहाहाहा!) हे सगळं मला विशेष आवडणारं.. तेच या नियोजित भटकंतीत असल्यानी मी भरपूर उत्साहीत होतोच.

किकली हे नाव आगोबाकडून ऐकलं,आणि मला ते एखाद्या ग्रामीण हिंन्दि शिनुमातलं असणारं गाव,असं नावावरुन वाटायला लागलं..अर्थात तिथे गेल्यावर ते तसच सार्थही ठरलच. प्रथम ते मंदिर मग ते एक गाव वीरगळांचे.

मंदिर
मला एंट्रीपासूनच का कोण जाणे बहाद्दूरगडावरच्या देवळांचा तिथे फिल यायला लागला. आत गेल्यावर ते जमिनीतून शिल्प उभं राहिल्याची प्रचीती. एखादा चिलखतधारी हत्त्यारबंद सैनिक लांबून दृष्टीस पडावा,आणि आपण खिळावं..असच या सार्‍या जुन्या मंदिरांच प्रथम दर्शन असतं. मग आपण हळूहळू कुतुहलानी मंदिराजवळ जातो.. या मंदिरावर बाहेरून फारशी कोरीवकामगिरी आणि शिल्पकला आढळत नाही,पण आत मात्र भरपूर खजाना दडलेला आहे. वस्तुतः ह्या जागेत हा एक छोटासा मंदिर समुह आहे.. हे त्या मंदिरा बाजुच्या एका पडक्या आणि दोन तीन पूर्ण गेलेल्या केवळ जोत्याची रचना पहायला शिल्लक असलेल्या आकृत्यांवरुन कळत. https://lh3.googleusercontent.com/-1AAzCJlSIKg/VehA-AzRuvI/AAAAAAAAIfE/Gd9zKyPk8D8/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520048.jpg
मग आमची नित्याप्रमाणे आधी एकंदर काय काय आणि किती इथे आहे? अशी एक रेकि घडली.आणि मग आंम्हाला आगोबानी मंदिराच्या वेंट्रीपासून ते आतल्या शिल्प आणि छतापर्यंत अगदी सटीप माहितीसह मंदिर घुमवलं ;) ते सगळं कसं ते मी नीट सांगू शकत नाही,तो (आध्यात्मासारखाच ;) ) आगोबाबरोबर अनुभवण्याचा विषय आहे.
ही तिथली मला लैच आवडलेली एक मूर्ती
https://lh3.googleusercontent.com/-kB_O34v83yc/VehBpF1e30I/AAAAAAAAIfU/Zda43M-oYhs/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520046.jpg
आणि हे एक जिवंत शिल्पं.. ;)
कॅमेरागणेश,(आता ;) ) प्रकाशककिसनदेव्,आणि.... असो! ;)
https://lh3.googleusercontent.com/-DSOkCq5C55Y/VehE07p4tOI/AAAAAAAAIf8/y3O19Foc-nc/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520040.jpg
मधे एक ज्जोर्रात पावसाची सर पडून गेली आणि मग आंम्ही भुरभुरणार्‍या पावसात वीरगळ शोधबोध मोहिमेवर बाहेर पडलो https://lh3.googleusercontent.com/-XHqe-rYlFak/VehDz6eJBjI/AAAAAAAAIfo/ptfntTLlQjA/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520050.jpg
मला तर त्या गावात वीरगळ बघत फिरताना कुंभारवाड्यात दिवाळीत फिरायचो..मातीची चित्र घ्यायला..तो फिल आला.. ह्या-रंगातले त्या-ढंगातले
पहा वीरगळ या गावातले
माहिती याची असो कि नसो
स्तंभीत होऊन व्हा रे त्यातले
अशीच अवस्था होते.. काहि काहि नेहमीचे तर काहि चांगले ( फक्त ;) ) माझ्या उंचीचे ..जिकडे तिकडे वीरगळच वीरगळ..
(इथेले वीरगळाचे फोटू आणि एक माहिती क्लिप रात्री - लावण्यात येइल..अत्ता टैम नै..अप्लोडींग आणि लाविंगला :-/ )
अर्थात हे वीरगळ पाहुन निघताना..तिथेही एक जिवंत झँटम्याटीक शिल्प मला गावलच ;)
https://lh3.googleusercontent.com/-dkQtZjwnEoE/VehFpy3K2tI/AAAAAAAAIgI/ogSHMjSoAgo/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520060.jpg
आणि हे पोपटही त्यांच्या घर'ट्यांसह लक्षवेधी
https://lh3.googleusercontent.com/-npTRuK3WBu0/VehHIPhJFfI/AAAAAAAAIgo/arQ63m9sN5w/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520058.jpg

आणि मग हे वीरगळ पाहुन आम्ही निघालो.. ते त्या मराठा स्थापत्य रचनेमधल्या एका अद्भुताकडे..........

.........................................................विहिरिकडे........................................................
https://lh3.googleusercontent.com/-MTua6zsaI90/VehJZ0S1K7I/AAAAAAAAIg8/WJo-xgu-olQ/s640-Ic42/vaee%252520parisar%252520trip%252520me%252520valli%252520ganesha%252520kisan%252520065.jpg

मी-सौरभ's picture

4 Sep 2015 - 12:54 pm | मी-सौरभ

गुरुजी

चैतन्यमय's picture

3 Sep 2015 - 11:09 pm | चैतन्यमय

श्रीयुत प्रचेतस (पूर्वाश्रमीचे वल्ली) यांचे धागे मी नेहमीच वाचत असतो. या माणसाने पुरातत्व विभागाच्या खात्यात असायला हवे. कोण जाणो, कदाचित असतीलही. :)

राही's picture

4 Sep 2015 - 8:28 am | राही

तुलनेने कमी ज्ञात अशा एका ठिकाणाचे अत्यन्त सुंदर वर्णन आणि तितकेच सुंदर फोटो.
लेख दोनदा वाचला. आणखी एकदा वाचावा लागेल समग्र आकलना साठी.
धन्यवाद

अंतरा आनंद's picture

4 Sep 2015 - 1:29 pm | अंतरा आनंद

सुंदर फोटो तेवढाच छान लेख आणि एकापेक्षा एक सुंदर माहितीपूर्ण प्रतिक्रिया.

बबन ताम्बे's picture

4 Sep 2015 - 6:45 pm | बबन ताम्बे

माझ्या लहानपणी आमच्या गावात असे विरगळ काही देवळांच्या आजूबाजूला पाहील्याचे आठवतात.
आता गायब झालेत.

अभ्या..'s picture

6 Sep 2015 - 7:01 pm | अभ्या..

प्रचेतस राव
एक छोटीशी शंका आहे. बहुतांशी वीरगळाच्या प्रथम भागात शिवाची पक्षी पिंंडीची पूजा करताना तो वीर दाखवलाय. फक्त शैवपंथीयात ही परंपरा होती का? दुसर्‍या कुणा देवतेचे पूजन करतानाचे वीरगळ नाहीत का?

मी तरी शिवपिंड सोडून दुसऱ्या कुठल्या देवतांचे पूजन करताना वीर बघितलेले नाहीत. काही ठिकाणी शिवपिंड न दाखवता फ़क्त कलश आहे. कलशाभिषेक. तर एका ठिकाणी वरच्या पट्टिकेत शिवपिंडीच्या पूजेऐवजी शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी कावडीतून पाणी आणणारा वीर पाहिला आहे. शिव हे संहाराचे प्रतिक तर विष्णू हा पालनकर्ता. पूर्वापार चालत आलेल्या समजुतींनुसार मनुष्य मृत्युनंतर कैलासवासी होतो. वैकुंठवासी नाही. ह्याला अगदी कट्टर वैष्णव लोक अपवाद आहेत. वारकरी पंथात मनुष्य मेल्यावर वैकुंठवासी होतो असे मानले जाते. तुकोबांचेच उदाहरण घे ना.

वीरगळांवरचे शिवपिंडीचे पूजन हे वीर मेल्यानंतरचे स्वर्गस्थ अथवा कैलासवासाला गेल्याचे मानण्यात येते म्हणून येथे शिवपिंडीचे पूजन.

अजून एक कारण म्हणजे इथल्या राजवटी शिलाहार, राष्ट्रकूट मुख्यत: शैव होत्या. तर चालुक्य, यादव शैव वैष्णव अशा दोन्ही देवता मानत होते. किंबहुना शैव वैष्णव असा भेदाभेद फारसा नव्हता. मात्र जनमानसात शिव दैवताचा प्रभाव हाच विष्णूपेक्षा अधिक झिरपलेला होता आणि आजही तो तसाच आहे. साहजिकच शिवपिंडीचे पूजन मोठ्या प्रमाणावर व्ह्यायचे. कट्टर वैष्णवांनी शिवपिंडीला पर्याय म्हणून तसाच शाळीग्राम आणल्याचे तुला माहितच असेल.

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2015 - 8:49 pm | बोका-ए-आझम

वल्ली एक शंका. वीरगळ हे वीरवरचं अपभ्रंश होऊन झालेलं रुप आहे का?

प्रचेतस's picture

6 Sep 2015 - 8:52 pm | प्रचेतस

नाही.
मूळ कन्नड शब्द 'वीरकल्लू' ह्या शब्दाचे हे अपभ्रष्ट स्वरुप आहे. कल्लू म्हणजे शिळा अथवा दगड.

कन्नडमध्ये आदरार्थी संबोधायचे असेल तर गळ्/गळु लावतात.(असे वाटते)
प्रचेतसगळु, संपादकगळु असे. मी कन्नड पोस्टरवर अशा बर्‍याच कानडी महोदयांना गळु लावलय. ;)

सूड's picture

8 Sep 2015 - 8:06 pm | सूड

गळु =))

लेख बर्‍याच प्रयत्नांनंतर आत्ता लोड झाला ब्राउजरमध्ये. झटकन आधी वाचनखूण साठवून ठेवली.

लेख अप्रतिमच, कोल्हटकरांचे प्रतिसादही माहितीपूर्ण.

बारा मोटांच्या विहिरीवरच्या आगामी लेखाच्या प्रतीक्षेत.

लय भारी ल्हेलय राव किकलीच्या देवळाव. देवळाचा जिरनोद्धार आत्ता आत्ताच झालाय. सरकारी मान्स आलती, एका एका दगडाव नंबर टाकुन कोड दिऊन परत बसावताना जितला दगड तितच बसावलाय.
दस-याला लय भारी आसतय किकलीत आजुन. जांबची चिलाई देवी न किकलीचा भैरुबा भैन भाव, त्यांची भेट आसतीय ओढ्यावर.
किल्लाय कानाय त्यची १ कथा हाय. किल्ल्याव जवा आक्रमण झालत ना तवा सगळा किल्ला रिकामा केला पन १ म्हातारी लय तयार हुती, ति किल्ल्यावच राहीली. म्हातारी दररोज ५० पतरावळ्या खरकाटं लाऊन किल्लावरन खाली टाकायची, आस करुन तिन लय दिवस किल्ला लढावला.
आजुन १ सांगत्यात कि किल्ल्यापसन ती पार क्रिष्णा नदीपरेंत भुयार हुत पयल्यांदा, लिंब गोव्याकड जाताना यक बुवासायबाचं देवाळ लागत बारक तितल्या आंब्याखाली लय म्होट्ट खळं पडल तेजात आत बांधकामाचं भुयार हुतं. मान्स म्हनत हुती तिच भुयार आसल पन खरं खोट न बघताच भुयार मुजवुन टाकलं राव मन्सांनी़

एएसआय ने टाकलेले नंबर तिथल्या कित्येक दगडांवर दिसून येतात. पुढे शेरी लिंबला जाताना जांबवरूनच गेलेलो. वाटेत गोव्याच्या अलीकडे एका लहानशा घुमटीपाशी एक भग्न वीरगळ आहे.

ती किल्ल्यावरच्या पत्रावळींची गोष्ट रामसेजच्या लढ्यासंदर्भात वाचली होती. मावळ्यांनी असा आभास निर्माण केला होता.

नया है वह's picture

9 Sep 2015 - 5:17 pm | नया है वह

प्रचि सुद्धा छान!

प्रभू-प्रसाद's picture

13 Sep 2015 - 11:55 am | प्रभू-प्रसाद

श्री वल्ली यान्चा माहितीपुर्ण लेख आवडला. या मन्दिराचा नेमका निर्मीती कालखन्ड कोनता असावा ?
श्री कोल्हटकर यान्चे प्रतिसाद छान आहेत.
आमच्या सोलापुर हत्तरसन्ग कुडल येथे असेच सुन्दर मध्ययुगीन शिव मन्दिर आहे.
बादवे - कोल्हापुर की सातारा जवळ ४/५ मजली महाल विहिरी बद्द्ल कोणास माहिती असल्यास जरुर सादर करावी.

पियुशा's picture

13 Sep 2015 - 2:26 pm | पियुशा

वल्ली दा , सगळा तुझ्या " प्रचेतस " नावाने कन्फुज होतात इन टु ब्र्याकेट वल्ल्या लिव ब्घु ;)
धागा लै भारी १ न. :) आमच्यासार्ख्याना अशा ठीकाणी जाउन शष्प कळनार नाही बर झाल तु आहेस मिपावर, असाच फिरत रहा नी आम्हाला असेच ऐतिहासिक ठॅव्याची ओळख करुन देत जा पु. प्रा. प्र. :)

स्वाती दिनेश's picture

14 Sep 2015 - 12:21 pm | स्वाती दिनेश

फार सुरेख लेख..
स्वाती

कपिलमुनी's picture

15 Sep 2015 - 4:52 pm | कपिलमुनी

एक नंबर आहे !

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:57 pm | दिपक.कुवेत

काय अभ्यास आहे रे तुझा. सॉरी पुर्ण लेख नाहि वाचला (वाचून तरी काय कप्पाळ कळणार म्हणा!). तुझ्या चिकाटी आणि जिद्दीला सलाम. फोटो आवडले (कळले नसले तरी)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2018 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, भैरव ओळखायचा कसा ? आमच्याकडे ''बहीरोबा''म्हणून ओळखला जाणारा हाच असावा.

घरात साप निघू नये म्हणून बहीरोबाची वाळू घरात ठेवायची पद्धत मी ऐकली आहे, त्यावरुन हा भैरवनाथ शोधावा वाटला.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 6:33 am | प्रचेतस

बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, सर्परूपी दागिने, हाती कपाल, वाहन कुत्रा ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

दिपस्तंभ's picture

8 Sep 2018 - 2:14 am | दिपस्तंभ

छान माहिती

बऱ्याच दिवसानंतर हा लेख पाहताना नकाशा उघडला तर एक रणदुल्लाबाद नावाचे एक गाव या किल्ल्याच्या उत्तरेस दिसले. नावावरून याचा संबंध शहाजीराजे यांचे हितचिंतक आणि आदिलशाहीतील तालेवार सरदार रणदुल्लाखान याच्याशी असेल असे वाटते. कुणाला याबद्दल काही माहिती आहे का?

त्या परिसरात रणदुल्लाबाद, इब्राहिमपूर, अरबवाडी अशा नावांची गावे आहेत, ती अफझल खानाच्या प्रतापगड स्वारी घ्या काळातली. कारण या परीसरात अफजल खानाचा सैन्य तळ होता.

वल्ली बुवा- परत एकदा या किकली गाव पहायला. गावातील पोरांनी इतरत्र पडलेले वीरगळ नीट ओळीने मांडून इतिहास जपला जाईल असे केले आहेत.