*****************************
कंजूस यांचे सर्व लेखन इथे पाहा
*****************************
मोढेरा - पाटण - आबू
गुजरातचे पर्यटनाच्या दृष्टीने तीन ढोबळ भाग करता येतील. सौराष्ट्रातील पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले धार्मिक पर्यटन, कच्छमधले नैसर्गिक रण, आणि राज्यात पसरलेली पुरातन कलाकौशल्य असलेली देवळे,मशिदी वगैरे. सापुतारा हे हिल स्टेशन तसे पाहिले तर नाशिकला जवळ असल्याने महाराष्ट्राचेच म्हणता येईल. तरंग हिल हे एक नव्याने उदयाला येत आहे. अहमेदाबाद,गांधीनगर,वडोदरा,सूरत या मोठ्या शहरांमध्येही बरेच पाहण्यासारखे आहे. पुढे दगदग झेपेनाशी झाली की या शहरांत फिरायचे हे ठरवून टाकले आहे.
गुजरात पर्यटनाच्या जाहिरातीत मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची राणी की वाव,सिद्धपूरचे बिंदूसरोवर तीर्थ दाखवतात ते एकदा पाहावे असा विचार करून नकाशे, रेल्वे टाइमटेबल उलगडले. अहमेदाबाद,मेहसाणा,सिद्धपूर,पालनपूर,आबू रोड(राजस्थान) हे एकाच रेल्वेमार्गावर आहे आणि या स्टेशनांवर सोयीच्या वेळी गाड्या थांबतात. मेहसाणापासून मोढेरा,पाटण, सिद्धपूर आणि वडनगर पंचवीस -पस्तीस किमी परिसरांत आहे. मेहसाणा ते आबूरोड जाण्यासाठी अहमेदाबाद_अजमेर इंटरसिटी इक्सप्रेस ( १०:२० - १३:१०) आहे. आबूरोड ते मुंबई गाड्या आहेत.
तीन आरक्षणं करून टाकली.
१) दादर ते भुज गाडीने मेहसाणा(१२९५९),
२) मेहसाणा ते आबूरोड (१९४११),
३)आबू रोड ते बान्द्रा ( १९७०८).
मेहसाणा मुक्काम तीन दिवस, माउंट आबू अडीचदिवस. सीजन ऑक्टोबरला सुरू होतो, सेप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॅाटेल बुकिंग आगावू करण्याची गरज नसते त्यामुळे ते केले नाही.
( पुण्याहूनही येण्याजाण्यासाठी चांगल्या रेल्वे आहेत. इतर पर्यटक मेहसाणाला मुक्काम करत नाहीत. अहमेदाबाद येथे थांबून कार भाड्याने घेऊन / आयोजित सहल करून परत जातात. )
फोटो १
नकाशा १
फोटो २
नकाशा २
या बाजुच्या गाड्यांत उगाच गडबड गोंधळ नसतो. आरडाओरडा, पोलिस खिडक्या बंद करायला लावतात तसला गोंधळ नसतो. प्रवासी शातपणे बसून गप्पा मारतात. सूरत स्टेशनाचे सर्व फलाट रात्रीही खचाखच भरलेले दिसतात. अहमेदाबाद स्टेशन फारच गचाळ आहे याचे आश्चर्य वाटते.
पहिला प्रवास वेळेत होऊन मेहसाणात पोहोचलो. रेल्वेमार्ग आणि हाइवे (NH14/27) चिकटूनच आहेत. जुनं शहर आणि सिटि बस स्टँड पूर्वेस आहे. लॅाजटाइप एकदोन हॅाटल्स दिसली. पश्चिमेस राधनपूर सर्कल, मोढेरा सर्कल, मेहसाणा बस पोर्ट हे एकदोन किमीटरात आहे. इथे जनपथ,भाग्योदय वगैरे हॅाटेलस आहेत(राधनपूर सर्कल). ठीकठाक आहेत पण व्हॅल्युफॅारमनी नाहीत. एसी रुम पंधराशे रु. एका ठिकाणी राहिलो आणि तयार होऊन मोढेरा सर्कलपाशी आलो. मेहसाणा बस पोर्ट हा डेपो उत्तम आणि स्वच्छ आहे. बाजुलाच असलेले जैन मंदिर अवश्य पाहा. इथे भरपूर रुम्स धर्मशाळेच्या आहेत पण फक्त जैनांसाठी. जेवण चहा नाश्ता कुणालाही मिळतो. उत्तम शाकाहार.
मेहसाणा डेपो/मोढेरा सर्कलहून भरपूर बसेस, शेअर टॅक्सीज मोढेरा (२५किमी) जाण्यासाठी मिळतात. रस्ता उत्तम, ७०च्या स्पीडने वाहने जातात. ट्राफिक नाहीच. मोढेरा हे छोटेसे गाव आहे. इथे इतके सुंदर सूर्यमंदिर असेल यावर विश्वास बसत नाही. मोठे आवार पुरातत्व खात्याने बाग करून छान ठेवले आहे. आवाराबाहेरच्या शेतात मोर,वानरे आहेत. मंदिरासमोर मोठा पायऱ्यांचा तलाव आहे. सूर्याच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर असल्या तरी गाभाऱ्यात नाही. शैव शिल्पे नाहीत. शेषशायी विष्णु आहे. खांब सुंदर आहेत. मोढेराहून बेचारजी मंदिर आणखी पंधरा किमी दूर आहे. तिथे गेलो नाही.
फोटो ३
मोढेरा पाटी
मोढेरा सूर्यमंदिर
video 860x480, size 22 MB, 00:57:00
फोटो ४
सूर्यदेव
दुसरे दिवशी रविवारी सिद्धपूर आणि तिसरे दिवशी सोमवारी पाटणला जाऊन येण्याचे ठरवले होते. सकाळी साडे आठला बसने निघालो. साडे नऊला सिद्धपूरला ( सिध् पूर) सर्कल स्टॅापला उतरलो. हाइवे आणि गुजरात एसटी ( स्वच्छ नसल्या तरी) हवेशिर ऐसपैस मोकळ्यया असल्याने प्रवास आरामदायी आहे.
रिक्शाने बाजारात उतरलो. रेल्वे ओवरब्रिजवरून गावात जावे लागते. इथे बोहरा समाजाच्या हवेली आहेत. सर्व हवेल्या बंद आहेत, मालक अमेरिकेत अथवा दुसऱ्या शहरांत राहतात.
फोटो ५
सिद्धपूर बोहरा हवेली १
फोटो ६
सिद्धपूर बोहरा हवेली २
बाजारातून दहा मिनिटे चालल्यावर रुद्र महालय आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र आहे. दोन चार महिन्यांपूर्वी इथे दंगा झाल्यावर १४४ कलम लावले आहे. पुरातन खाते अधिक एक पोलीस आहे.
आम्हाला पर्यटक म्हणून आत सोडले.
बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ही विवादास्पद वास्तू घोषित केली गेली होती कारण इथे पूर्वी मशीद होती म्हणतात.
फोटो ७
रुद्र महालय कमान
अशा बऱ्याच कमानी होत्या आणि आत रुद्र महालय नावाचे शिवालय. दोनच कमानी राहिल्या आहेत.
येथून एक वळसा घालून मागे गेल्यावर सरस्वती नदीचे विशाल पात्र दिसते. आता कोरडेच होते. या तीरावर एक महादेव आणि मुक्तिधाम स्मशान आहे. ( साताऱ्याच्या संगम माहुलीसारखे यास महत्त्व आहे.) नदीपलीकडे अजून दोन महादेव आहेत. तिथून रिक्शा करून दुसऱ्या एका रेल्वेपुलावरून परत हाइवेवरच्या बिंदु सरोवर नाक्यापाशी आलो. पुलावरून सिद्धपूर रे स्टेशन दिसते.
बिंदु सरोवर हे मोठे आवार आहे. संपूर्ण लाल दगडाच्या फरशीने झाकले आहे. स्वच्छ आणि सुंदर जागा - हाइवे टच. या जागेला पौराणिक महत्त्व आहे. कनिलमुनि आणि कर्दम ऋषींनी इथल्या कुंडापाशी आईचे श्राद्ध केले होते. कुंडास मातृतीर्थ प्रसिद्धी मिळाली आणि श्रद्धाळू इथे आइचे श्राद्ध करतात. त्यांच्यासाठी पंचवीसेक लाल दगडातल्या मेघडंबरी बांधलेल्या आहेत. एकामध्ये आठजण बसू शकतात. पितृपंधरवडा दोन दिवसानंतर सुरू होणार होता तरीही पंधरा ठिकाणी विधी सुरू होते. गुजरात सरकारने २१ कोटी रु खर्च करून ही जागा सुंदर करून टाकली आहे. फोटोस बंदी आहे. एक म्युझिअम आहे त्यातला साडेचारफुटी काळ्या दगडातला विष्णु अप्रतिम! आवारात कर्दमेश्वर महादेव आहे. या रस्त्यावर एकूण पाच महादेव आहेत, खास काही नाही. सिद्धपूर परिसर बारापर्यंत पाहून झाला. हे एक विधिक्षेत्र असल्याने आणि सिद्धपुरात निम्मी वस्ती बोहरांची यामुळे हॅाटेल्स नाहीत. एका ठिकाणी फक्त भजी मिळाली.
पाटणला जाण्यासाठी वीस रु/ सीट शेअर टॅक्सी मिळाली. अठरा किमी अंतर आहे. रस्ता उत्तम. पाटणचा पटोला साड्यांचा बाजार आणि राणी की वाव पाहण्याचा उद्देश होता परंतू बाजार रविवारी बंद असतो हे कळले. पण त्यामुळे ट्राफिक नसते हे रिक्शावाल्याने सांगितले. पाटण बस स्टँड नवीन पाटणमध्ये आहे आणि राणी की वाव जुन्या पाटणमध्ये पाच किमी आतमध्ये. दुसऱ्या रिक्शाने तिथे पोहोचण्याअगोदर पोटपुजा करून घेतली.
फोटो ८
राणी की वाव पाटी
राणी की वाव ( व्हिडिओ )
00:01:30 ; SIZE 39 MB ; 848x480( व्हिडिओ )
फोटो ९
वामन
गुजरातची जुनी राजधानी पाटनगर / पाटण होती. नंतर आक्रमणानंतर त्याची नासधूस झाली. स्वातंत्र्यानंतर वडोदरा करण्याचा विचार होता परंतू अहमेदाबाद झाली आणि त्यानंतर सध्याची गांधीनगर. जुन्या पाटण गावाचा रस्ता आल्यावर विटांनी बांधलेली वीसपंचवीस फुट उंच तटबंदी आणि दरवाजे दिसतात. राणी की वाव परिसर मोठा सुंदर राखला आहे. बाग आहे आणि भितींबाहेर मोरपण आहेत. जमिनीच्या आत चाळीसपन्नास फुट पायऱ्या उतरून विहिर आहे. परंतू पूर्ण शेवटपर्यंत जाऊ देत नाहीत. आतल्या भिंतींवर तीनचारशे मोठ्या मूर्ती आहेत.
फोटो १०
घोडेस्वार
फोटो ११
पद्मपाणि
फोटो १२
वराहावतार
फोटो १३
नागकन्या
फोटो १४
राम
शैव शिल्पे नाहीत. दशावतार, नायिका इत्यादि. खाली उतरू तसे फार गरम होते. राणी की वाव'च्या मागेच सहस्रलिंग नावाचे शिल्पसमुह आहेत. तेही जमिनीत वीसफुटी चरात आहेत आणि खूप पसरलेले आहेत. उकाडा वाढलेला आणि परतीची रिक्शा मिळणार नाही साडेपाचनंतर या विचाराने लगेच निघावे लागले. पाटण स्टँडवरून मेहसाणा जाणाय्रा बसेस बऱ्याच आहेत. उत्तम रस्त्यांमुळे पाऊण तासात हॅाटेलवर परतलो. ( पाटण_चणसमा_मेहसाणा ३५ किमी )
वडनगर हे पंतप्रधान मोदी यांचं जन्मगाव मेहसाणापासून पूर्वोत्तर चाळीसेक किमी दूर आहे. शिवाय तिथे काही पुरातन शिल्पेही आहेत. बौद्धकालीन किंवा नंतरची शिल्पे आहेत. त्यापैकी एक विशेष म्हणजे तोरण. याचे चिन्ह आणि नाव गुजरात पर्यटन खाते - हॅाटेल्ससाठी घेतले आहे. तिसरे दिवशी हे पाहून नंतर आबूरोडला ट्रेनने जायचा प्लान होता. ती अजमेर एक्सप्रेस रोज रद्द करत होते, उकाडाही वाढला म्हणून सकाळी बसने आबूला जायचे ठरवले.
सकाळी बस स्टॅापला कळले की राजस्थान सरकारच्या बसेसचा संप चालू आहे त्यामुळे थेट आबूरोड बस जात नाही, थोडी दोन किमी अलिकडे चेकपोस्टपर्यंत सोडतात. हाइेमुळे प्रवास सुखद झाला. मग आबूरोड ते माउंट आबू जाण्यासाठी शेअर टॅक्सी (चार सीटसचे तीनशे रु) मिळाली. अठ्ठावीस किमी अंतराचे( स्पेशल) इंडिकावाल्याने पाचशे सांगितले. [[ नेरळ _माथेरान सात किमीचे ओम्नीवाले ३६० रु घेतात.]]
माउंट आबू हिल स्टेशन होण्याअगोदरपासून अर्बुदा पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे आणि काही राजपुतांचे मूळस्थान. हजार पंधराशे मीटरस उंचीवर पसरले आहे. एक टोक गुरुशिखर १७२० मीटरस उंचावर आहे. वर लगेच गारवा जाणवू लागला. टॅक्सीत उतरल्यावर हॅाटेल एजंट पुढे सरसावले. जवळची दोन उगाचच पाहिली. रुम्स चांगल्या होत्या आणि मेन रोडवरच. पूर्वी एकदा(२००१) हॅाटेल सुधीर (राजेन्द्र मार्ग) येथे राहिलो होतो तिथेच गेलो. हजार - सोळाशेत छान रुम्स होत्या. बरेचजण ओनलाइन बुकिंगवाले होते. याच रुम्स दसरा ते दिवाळी सुटीत चार -सात हजारला जातात.
माउंट आबू एक दिवसात उरकण्याची, 'करण्याची' जागा नाही. इकडे रेंगाळायचे. सुप्रसिद्ध दिलवाडा जैन मंदिर, नकी तलाव, सनसेट पॅाइंट या भटकायच्या विशेष जागा दोन किमीटरांत आहेत. शिवाय खरेदी असतेच.
फोटो १५
इम्पोरिअमच्या बाहेर मूर्ती तशाच ठेवून जातात.
फोटो १६
शिवसेनेचा फ्ले क्स
फोटो १७
नक्की /नखी लेक
फोटो १८
Life jacket
नक्की लेकमध्ये बोटिंग नको वाटेल कारण लाइफ जाकिट्स अशी फेकलेली असतात.
रोज वेगळ्या रेस्टॅारंटात खायचे. दालबाटी हा मुख्य प्रकार होता, प्रत्येकठिकाणी थाळ्यांत बाट्या ठेवलेल्या दिसायच्या त्या आता गायब झालेल्या. पंजाबी,चाइनिज पदार्थांची मागणी वाढली आणि दालबाटी मागे पडली. दोनचार ठिकाणी रबडी दिसली परंतू ही माउंट आबूचं वैशिष्ट्य नाही, ते आबूरोड स्टेशनपरिसराचं. दक्षिणी इडली डोशासाठी अर्बुदा अजूनही सर्वोत्तम. गुजराथी थाळीसाठी सरस्वती, गुजराती भोजनालय. सकाळी बटाटे,टमाटे,कान्दे भरलेले टेम्पो वर येऊ लागतात. रेस्टारे त्यावरच चालतात ना.
रोज संध्याकाळी साडेसहा ते आठ तीन राजस्थानी कलाकार गाणं( फ्री) सादर करण्यासाठी हॅाटेलवर ठेवले होते. पण कुणीच येत नव्हतं. बिचारे. टिव्हिपुढे सगळे फिके झाले. शंभर रुपयांत फुल डे टुअरमध्ये साताठ जागा दाखवतात साडेनऊ ते चार.
तीन दिवस पटकन संपले आणि नऊला हॅाटेल सोडून माउंट आबू_ आबूरोड_अंबाजी एसी स्लिपर बसने (१५० रु) अंबाजीला आलो. ( आबूरोड_अंबाजी १८ किमी) हे गुजरातमध्ये आहे. नुकतीच भाद्रपद अष्टमी ते पौर्णिमा जत्रा संपली होती. गर्दी ओसरलेली. हे देऊळ पुरातन आहे परंतू सतत बदल करत असतात.मूळचे संगमरवरी पण आता त्यास सोनेरी पत्र्याने वरपासून मढवले आहे. ( अंबाजी = महालक्ष्मी). आम्ही मागच्या दाराने पटकन पाहून आलो. मेन गेटकडून मोठा लोंढा होता. बाजारात ओडिशाची छेनापोडी चांगली मिळाली. तीन वाजेपर्यंत आबूरोड स्टेशनच्या वेटिंगरुममध्ये पावणे पाचच्या गाडीसाठी तयारीत राहिलो. परिसरात आणि स्टेशनवर रबडी विकणाऱ्यांचे खूप ठेले होते. रबडी खाऊन तिकिटं पाहात होतो तेव्हा घोषणा झाली "मारवाड भागात रुळाचे काम चालू असल्याने गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत." आलिया भोगासी पुन: रबडी घ्यावी लागली, कँटिनमध्ये जेवणही झाले. शेवटी पावणेदहाला वेळेवर पाच तास उशिरा गाडी आली. पधारों मार्हो देस पुन्हा एकदा जाणारच.
फोटो लिंक्स
(आणखी फोटो दिल्यास धागा लवकर लोड होणार नाही म्हणून लिंक्स देत आहे.)
राणी की वाव ३६०° , २७ एमबी, 00:01:14
सूर्यमंदिरावर बाहेर मोजकीच शिल्पे आहेत. आतमध्ये फार नाहीत. खांबांवरची झिजलेली आहेत किंवा साधी नक्षी आहे.
प्रतिक्रिया
3 Oct 2018 - 12:32 pm | अनिंद्य
@ कंजूस,
मोढेरा, पाटण आणि आबू - छान टापू निवडलाय तुम्ही. शिल्पांचे फोटो A1
.....माउंट आबू एक दिवसात उरकण्याची, 'करण्याची' जागा नाही. इकडे रेंगाळायचे. .... + १
पाटण आणि आबू फिरलो आहे पण मोढेरा दोनदा हुकले माझे :-(
सिद्धपूरच्या गल्लीचा फोटो अगदी युरोपात शोभेल. दृष्ट लागू नये म्हणून साचलेल्या पाण्याची तीट असावी :-) असेच खूप सुंदर पण बंद घरे असलेले एक छोटेसेच गाव भरुचजवळ आहे, बहुतेक 'खरच' असे नाव आहे.
पु ले शु,
अनिंद्य
8 Oct 2018 - 4:13 am | निशाचर
भरुचबद्दल माहित नव्हतं. राजस्थानातल्या शेखावती हवेल्यांचे फोटो बघितले आहेत. अप्रतिम फ्रेस्कोज आहेत.
माझं आबू हुकलंय :(
3 Oct 2018 - 5:44 pm | श्वेता२४
छान,सहज आणि ओघवतं वर्णन. वाचनखूण साठविली आहे. पुढेमागे गुजरात फिरायचा योग आला तर तुम्ही दिलेली ही विस्तृत माहिती खूपच उपयोगी पडेल. फोटोसुद्धा खूप सुंदर
3 Oct 2018 - 5:59 pm | सूड
घोडेस्वारापेक्षाही मला तो कल्की वाटतोय.
3 Oct 2018 - 6:24 pm | अथांग आकाश
फोटो आणि व्हीडीओ छान!
शिल्पे विशेष आवडली!
3 Oct 2018 - 6:26 pm | कंजूस
होय कल्कीच तो. दशावतार चित्रेच आहेत.पद्मपाणि बुद्धही. शिल्पे ठसठशीत आणि बरीचशी अभंग असल्याने छान वाटते. इतर पायऱ्यांच्या विहिरीत वटवाघळे आणि कबुतरांचा उच्छाद असतो ( उदा बुंदीची राणी की वाव) तसा इथे नाही.
3 Oct 2018 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर भटकंतीवर्णन आणि देखणे फोटो. कंकाकांचा लेख म्हटल्यावर हे असे नसले तरच आश्चर्य !
4 Oct 2018 - 8:32 am | प्रचेतस
ओघवतं, सहजसुंदर वर्णन.
मोढेरा मंदिराची अजून काही छायाचित्रे हवी होती. राणी की वाव मधला घोडेस्वार म्हणजे कल्की. क्र. १३ छायाचित्र हे नागकन्येचे नसून विषकन्येचे. अप्रतिम त्रिभंग.
4 Oct 2018 - 9:18 am | टर्मीनेटर
छान वर्णन. शिल्पे खूपच सुंदर आहेत.
4 Oct 2018 - 3:28 pm | कंजूस
मोढेराची आणखी चित्रे लिंक्स स्वरुपात लेखात शेवटी वाढवली आहेत.
5 Oct 2018 - 7:17 pm | प्रमोद देर्देकर
सुंदर वर्णन आणि माहिती.
7 Oct 2018 - 2:27 pm | शलभ
सुंदर लेख.
मी पण 15 ऑगस्ट दरम्यान गुजरात ट्रिप केली माझ्या गाडीने. अहमदाबाद मध्ये मित्राकडे राहिलो. साबरमती आश्रम, अक्षरधाम, सिद्दि सय्यद ची दगडी जाळी, फिरते हॉटेल पतंग मध्ये रात्रीचे जेवण, त्यातून दिसणारा साबरमती रिव्हर फ्रंट आणि शहराचा नजारा, त्याबरोबर मोढेरा आणि पाटण, पाटण मध्ये पाटोळे साडीचे मेकिंग आणि इतिहास असं एका शॉप मध्ये दाखवतात, ते पण बघण्यासारखं. आम्हाला मोढेरा मध्ये गाईड मिळाला नाही, पाटण मध्ये मिळाला. दोन्हीकडची म्युझियम बंद होती, काहीतरी सरकारी सुट्टी होती. रस्ता मस्त आहे.
7 Oct 2018 - 4:35 pm | कंजूस
@ शलभ, पाटण दुकानाची आणखी माहिती द्या. पुढे कोणी जाईल तर त्यास उपयोगी पडेल.
18 Oct 2018 - 1:26 am | शलभ
पाटण गावातच वाव ला जायच्या रस्त्यावर एक म्युझियम आहे. त्याच्या समोरच पटोला हाऊस म्हणून दुकान कम म्युझियम आहे. 10 रुपये प्रवेश फी आहे. मालकांपैकीच एका व्यक्तीने पूर्ण माहिती दिली. खालच्या मजल्यावर एक हातमाग आहे, त्यावर एक साडीचे काम चालू होते. ऐतिहासिक फोटो, वेगवेगळ्या देशातील साडीचे, कपड्याचे नमुने, वेगवेगळे साडीचे प्रकार, पटोला साडी बनवायची प्रोसेस असं सगळे आहे. साडीच्या किमती 1.5 लाखापासून सुरू होतात. आम्ही घ्यायचा विचारच करत होतो पण 2 वर्ष वेटिंग ऐकून सोडून दिला विचार ;) आणि दुसऱ्या मजल्यावर गेलो नाही. बाकी पाटण ला गेल्यावर ह्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.
8 Oct 2018 - 4:03 am | निशाचर
मस्त झाली भटकंती. फोटो खूप सुंदर आहेत. गुजरातेत लवकरच फिरण्याचा प्लॅन आहे, तेव्हा माहितीचा उपयोग होईल.
आबूला जायला तुम्ही दिलेल्या रेल्वेमार्गावरच अजून पुढे जोधपूर येतं. त्यामुळे आबूसाठी तोही पर्याय चांगला आहे. काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या भटकंतीत जोधपूरहून अबू रोडचं आरक्षण केलेलं असूनही आबूला जाता आलं नव्हतं :(
16 Oct 2018 - 2:41 pm | चौकटराजा
मोढेरा हे ठिकाणं मी गेले वर्षी पाहिले . मला व आमच्या कुटुंब सदस्यांना ते आवडले. माउंट अबू हे ही सुंदर ठिकाणं आहे. ते मी अनके वर्षांपूर्वी पाहिले . दिलवारा मंदीर लाजवाब अगदी ताज पेक्षा सरस. गुरूशिखर हे प. भारतातील सर्वात उंच ठिकाण इथेच आहे . मिपाकरांनी ही दोन्ही ठिकाणे आवश्य पाहावीत .
22 Oct 2018 - 6:59 pm | शान्तिप्रिय
सर्व छायाचित्रे आणि माहिती उत्तम