रानभाजी - पेव च्या पानांची भजी

जागु's picture
जागु in पाककृती
11 Jul 2018 - 1:45 pm

पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात.पेवचे कंद असतात. त्याला कालांतराने सुंदर पांढरी फुले येतात. पेवची रोपे कोवळी असताना त्याची भाजी व भाजी करतात.

साहित्यः
पेवची कोवळी पाने
बेसन १ वाटी
पाव चमचा हिंग
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
थोडी धना-जिरा पावडर (नसली तरी चालते)
गरजेनुसार मीठ
तळण्यासाठी तेल.

१)पेवचे उगवलेले रोपटे.

२) पाने

३)

पाककृती:
वरील तेल व पाने सोडून सगळे साहित्य एकत्र करावे व थोडे थोडे पाणी टाकून इडलीच्य पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्यात धुतलेली पाने बुडवून घ्यावीत.

बुडवलेली पाने गरम तेलात सोडावीत.

पाने खालून थोडी शिजली वाटली म्हणजे रंग बदलला कि झाऱ्याने पालटावीत.

आता बुडबुडे कमी झाले पाने आत जाऊ लागली कि भजी काढावी. तयार आहे पेवची भजी

महत्वाची टिपः कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेऊ नये.

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

11 Jul 2018 - 3:20 pm | नूतन सावंत

मस्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 3:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं दिसत आहेत ! आमच्या घरी अशीच माठाच्या पानाची भजी बनवतात.

मदनबाण's picture

11 Jul 2018 - 9:36 pm | मदनबाण

बाब्बो !
जागु तै... मला एक सांग कि ही जी फुले असतात त्यात पावसाचे पाणी साचलेले असते, अगदी त्या पाण्याला सुद्धा या फुलाचा विशिष्ठ गंध प्राप्त झालेला असतो. यात बर्‍याच वेळा बारीक काळे किडे असतात. हे असंच तु दिलेल्या फुला बाबतीत आहे का ? मला वाटतं तू जे पेवची रोपे म्हणतीस ती मी माझ्या लहानपणी जंगलात फिरताना त्यातील फुले उचकटुन आणायचो तीच असावीत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)

हे पेव कुठे मिळतं (बाजारात)?

याच प्रकारची ओव्याच्या पानांची भजीही फार आवडतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2018 - 7:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही आणि अनेक प्रकारच्या रानभाज्यांची शेती केली जात नाही. पावसाळ्यात त्या नैसर्गिकरित्या जंगलांत उगवतात व आदिवासी लोक त्या कोकणात विकायला आणतात किंवा गावातले लोक जवळच्या जंगलातून काढून घेत असत. यांच्यात वैविध्यपूर्ण प्रकार आहेत, प्रत्येक भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे... स्वतंत्र पालेभाजी, कडधान्यात किंवा इतर भाज्यांत मिसळून केलेली भाजी, अळूच्या वड्यांसारख्या वड्या, इत्यादी अनेक प्रकार बनवले जातात.

मागे इथेच मिपावर या रानभाज्यांच्या आस्वादांकरिता जाणार्‍या खास सहलीचा एक धागा आला होता.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या अनवट आणि चवदार भाज्यांची आम्ही उत्सुकतेने वाट पहात असू. हा धागा पाहून त्या जुन्या आठवणींनी जीभ खवळली !

II श्रीमंत पेशवे II's picture

12 Jul 2018 - 9:54 am | II श्रीमंत पेशवे II

साधारण पहिला पाऊस झाला कि कि पेव ची झाडे फोफावतात , आमच्या गावी दिसतात पण कधी कुणाला याची भाजी किवा भजी करताना पहिले नाहीये.
पण आता हि पा.कृ. पाहिली ....
गावी गेलो कि नक्की करेन

मस्त रेसिपी .......

श्वेता२४'s picture

12 Jul 2018 - 11:20 am | श्वेता२४

ओव्याच्या व केनाच्या पानाची भजी अशाच पद्धतीने करतो. दारीच असायचा. फोटो फारच सुंदर जागुताई

मस्त भजी ! तोंडाला पाणी सुटले.....

स्पा's picture

12 Jul 2018 - 6:29 pm | स्पा

जबरदस्त

रमेश आठवले's picture

13 Jul 2018 - 2:28 am | रमेश आठवले

मी ७-८ वर्षांचा असताना, आजी अधुन मधुन मला घराच्या समोर असलेलया असलेल्या मंदिराच्या बागेतुन पुईची ( आमच्या घरातले नाव) पाने खुडून आणायला सांगायची आणि मग त्यांची भजी व्हायची. जागुताईंनी टाकलेल्या चविष्ट फोटोनी खूप जुनी आठवण जागी झाली.

निशाचर's picture

13 Jul 2018 - 2:42 am | निशाचर

मस्त!

सगळ्यांचे मनापासून आभार.

कपिलमुनी's picture

13 Jul 2018 - 4:42 pm | कपिलमुनी

टीप फार महत्वाची आहे. अनोळखी माणसांकडून अशा रानभाज्या घेउ नयेत.
आधि थोडी खाउन बघावि . यांची सवय नसल्यने कधी कधी अ‍ॅलर्जी येते .

पावसाळ्यात पेवची ओसाड जागी बरीच झाडे उगवलेली दिसतात ......

एक शंका, कोणास ठाऊक असल्यास सांगावे :-

अमुक गोष्टीचे 'पेव फुटले' ह्या वाक्प्रयोगाचा आणि ह्या 'पेव' भाजीचा काही संबंध असावा का ?

त्याचा संबंध जमिनीखाली माल, विशेषतः हळद टिकाऊपणे साठवण्याची पेवं असतात त्यांच्याशी असावा.

पण हे पेव भरपूर उगवून येत असेल तर हे जास्त चपखल वाटतंय. पेव हा शब्द भाजी या अर्थाने कितपत पसरलेला आहे त्यावरही हे अवलंबून आहे.

राही's picture

1 Aug 2018 - 3:54 pm | राही

पेंव(जुने शुद्धलेखन) म्हणजे धान्य साठवण्यासाठी कोरड्या (अगदी कमी पावसाच्या) जमिनीखाली बांधलेले तळघरसदृश भलेमोठे कोठार. हे शेणाने वगैरे लिंपून इतके सुरक्षित केलेले असे की त्यातले धान्य मुख्यत: हळद वर्षानुवर्षे टिके. मात्र एकदा उघडले अथवा फोडले की मात्र त्यातील धान्य उपसावेच लागे. म्हणजे पेव फुटल्यावर त्या धान्याची लयलूट होई. यावरून पेव फुटणे म्हणजे लयलूट होणे हा वाक्प्रचार आला आहे. याच्या मूळ कन्नड शब्दाचा अर्थ खोल खड्डा असा आहे. (कृ. पां कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तीकोश) ही पेंवे देशावर कमी पावसाच्या सांगली वगैरे ठिकाणीच अधिक करून असत. २००५ च्या प्रलयात अलमट्टी धरणाचा फुगवटा दूरवरपर्यंत तब्बल दोन आठवडे टिकला होता आणि त्यामुळे या पेवांचे पर्यायाने हळदीचे प्रचंड नुकसान झाले आणि तेव्हापासून पेवांना उतरती कळा लागली असे वाचल्याचे आठवते.
मराठीत एका वाक्प्रचाराला जन्म देण्याइतकी पेव ही वनस्पती सार्वत्रिक आणि महत्त्वाची नाही.

रमेश आठवले's picture

3 Aug 2018 - 5:57 am | रमेश आठवले

मी वर दिलेल्या माझ्या प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे आमच्या घरी या पानांना पुई ची पाने असे सम्बोधले जात असे. पेव या पाठभेदामुळे अर्थ भेद झाला असे दिसते.

अनिंद्य's picture

1 Aug 2018 - 4:02 pm | अनिंद्य

@ गवि,
@ राही,

साठवणुकीचे कोठार ह्याअर्थी 'पेव' ऐकले होते, पूर्णार्थ आत्ता कळला :-)

अनेक आभार _/\_

अनिंद्य

II श्रीमंत पेशवे II's picture

2 Aug 2018 - 3:19 pm | II श्रीमंत पेशवे II

यंदाचा रंब्जाजी महोत्सव कधी आहे या बद्दल कोणाला काही कल्पना असेल तर , कृपया त्याचा प्रचार आणि प्रसार करा....

मी यावर्षी या उत्सवाला जाणार आहे

आगाऊ धन्यवाद

त्रिवेणी's picture

4 Aug 2018 - 11:28 am | त्रिवेणी

रानभाजी ४ थे वर्ष

चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l
रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll

या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण आपल्या आदिवासी गावात दर पावसाळ्यात असते.

या अशा गावात गेली ३ वर्षे जनजाती कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते.

आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात. आपल्या सर्व आदिवासी भगिनींना आणि मातांना या भाज्यांचे विविध गुण माहीत आहेत, व त्या विविध प्रकारे शिजवण्यातही पारंगत आहेत.

या अश्या भाज्यांची स्पर्धा घेऊन उत्तम सादरीकरण आणि स्वाद आणि माहिती असणाऱ्या या जनजाती समाजातील स्पर्धकांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले जाते.

वनस्पती शास्त्राचे नामवंत परीक्षक असतात.

पुण्यातून आपण बऱ्याच लोकांना सहल म्हणून या ठिकाणी घेऊन जातो,नाम मात्र शुल्क असते, स्पर्धेच्या ठिकाणी घरटी काही लोकांना चुलीवर शिजवलेले अन्न व रानभाजी, नाचणी सत्व असा आस्वाद घ्यायला मिळतो. जमा केलेल्या शुल्कातील काही रक्कम घरटी कातकरी कुटुंबाला दिली जाते, या निमित्ताने पूर्वीच्या कार्यक्रमातून आहुपे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊन, सहलीस येणाऱ्या पाहुण्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाच्या सोयीतून त्यांना रोजगार मिळाला आहे, व कल्याण आश्रमाची मुळ इच्छा परिपूर्ण झाली आहे.

एकंदरीत या मस्त खुशाल आणि निवांत गारव्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला आवडेल ना!!!

या वर्षीचा रानभाजी उत्सव जुन्नर तालुक्यातील आजनावळे या गावी 11 व 12 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याचे शुल्क ₹2000/- प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.

या वर्षी फक्त एकच रानभाजी उत्सव होणार आहे, कारण विविध आदिवासी भागात या निमित्ताने आपला संपर्क व्हावा, तेथील जीवन अनुभवास यावे, व नवीन ठिकाणांना त्यामुळे होणारा लाभ मिळावा ही प्रामाणिक इच्छा !!!

अधिक माहिती साठी :-
ऋषभ मुथा -9850258408

वैशाली जोशी -9552558197

विजय भालिंगे -9689502350

नारायण ठिकडे-8007062162

नरेन्द्र पेंडसे -7709013232

सचिनकुलकर्णी- 9921574108

या कार्यक्रमासाठी तयारी व अंमलबजावणीसाठी काही स्त्री व पुरुष स्वयंसेवकांची गरज आहे, तेंव्हा ही माहिती प्रसारित झाली की लवकरात लवकर आपली व आपल्या मित्र मैत्रिणींची नावे सहलीसाठी व कार्यकर्ता म्हणून नोंदवण्यासाठी कृपया तयार रहा.

टीप - अशा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तेथील स्वच्छता, शुद्धता यास बाधा न आणता, त्याचे अधिक संवर्धन कसे करता येईल हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

प्लास्टिक पिशव्या/बाटल्या इत्यादी प्रतिबंधित वस्तू सोबत नेण्यास, वापरण्यास व इतरत्र टाकण्यास सक्त मनाई आहे.

जनजाती कल्याण आश्रम,पुणे
ll आदिवासी और शहरवासी, तू मै एक रक्त ll

भारत माता की जय !!!