आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.
गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले (व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे लागले) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली (ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला आहे) . संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी (मनमोहनसिंग साहेबांसारखा) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले ( व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले ) . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले.
आता बाबासाहेब पुरंदर्यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.
( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण )
पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...
पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.
समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ;) ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....
* क्रमश : *
( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही. पुढचा भाग आजच दुपारी अथवा जास्तीत जास्त उद्या ...
कृपया वाचकांनी माफ करावे. )
प्रतिक्रिया
22 Jun 2009 - 10:28 am | सहज
शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...
हा हा हा :-)
डान्राव पुढचा भाग येउ दे लवकर. :-)
23 Jun 2009 - 6:57 am | मुक्तसुनीत
ह्येच बोल्तू !
लई भारी ! :-)
22 Jun 2009 - 10:32 am | विसोबा खेचर
आयला! डॉन्या पुन्ना फॉर्मात! :)
तात्या.
22 Jun 2009 - 9:52 pm | टारझन
वा वा वा वा !!! छाण छाण छाण छाण ... !!!
डाण्या भयताडा ... कुत्रा चावल्यावानी का करतो बे ? वाचनमात्र र्हायचं नाय तू ..
आठवड्याला तरी किमान एखाद दुसरा लेख टाकायचा ...
बाझवला तिच्यायला ... लेख एकदम छप्परफाड !!!
( डॉणुमित्र) टार्या डॉण
22 Jun 2009 - 10:33 am | जृंभणश्वान
बाबासाहेबांच्या भाषेतला परिच्छेद प्रचंड भारी आहे !
क्रमश: नंतरचे स्पष्टीकरण, वा !
22 Jun 2009 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्राव, तुफान लेख! "क्रमशः"बद्दल तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा"!
22 Jun 2009 - 4:49 pm | चतुरंग
बाबासाहेबांची भाषा अफलातून वापरली आहेस, एकदम फिट्ट!
बाकी हीठिकठिकाणी तोडलेले तारे झक्कास! आनदेव और भी!
(लेखकुकुलावतंससंस्थळप्रतिपालकसंपादकेश्वर)चतुरंग
22 Jun 2009 - 11:55 am | मराठी_माणूस
मस्त!
22 Jun 2009 - 12:13 pm | Nile
आवड्या, काही काही वाक्य एकदम बेस झाली आहेत.
चला पार्श्वभुमी तयार आहे मुद्द्यावर या लवकर! ;)
22 Jun 2009 - 1:19 pm | मसक्कली
आहो येउ द्या लव्कर पुढचा भाग.....
लइ झक्कास लिहिलय यार ......... :)
सहि मामू तुच आहे............... =))
22 Jun 2009 - 1:20 pm | अवलिया
आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही. पुढचा भाग आजच दुपारी अथवा जास्तीत जास्त उद्या ...
कृपया वाचकांनी माफ करावे.
हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु ;)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
22 Jun 2009 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार
हे हे हे आम्हाला वाटले हट मध्ये काढलेले तरुणींचे फोटो वगैरे पण डकवले असतील, तर कसले काय.
श्या !!!
बाकी लेखाचा पहिला भाग उत्तमच, पुभाप्र.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
22 Jun 2009 - 1:34 pm | विनायक प्रभू
परा
त्यांनी 'हट्'म्हटले असेल.
लेख लय भारी
22 Jun 2009 - 2:03 pm | निखिल देशपांडे
डॉनराव सही लिहिले आहे हो.... पुढचा भाग लवकरच येवु द्या
==निखिल
22 Jun 2009 - 3:55 pm | श्रावण मोडक
इतके कंस असूनही लेखन खुसखुशीत झाले आहे. मस्त. येऊ द्या लवकर पुढचा भाग.
22 Jun 2009 - 4:15 pm | धमाल मुलगा
चक्क डान्या आणी लेख राजकारणावर न लिहिता असा सिध्दटवाळ विषयावर?
अहो आश्चर्यम्!!!
चला, डानराव, पुन्हा एकदा आपण खुसखुशीत लिहायला लागलात हे पाहुन आम्ही धन्य जाहलो :)
पण हे सालं क्रमशः कशासाठी हो? च्यायला, आपले प्रतिसाद आणि खरडीच ह्यापेक्षा मोठ्या असतात, विसरलात काय? मांड ठोका आणि व्हा सुरु!!!
येऊ दे अजुन मोठ्ठा धबधबा :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
22 Jun 2009 - 4:26 pm | मनिष
हेच म्हणतो! मस्त सुरुवात झाली आहे, लवकर येऊ दे पुढचा भाग.
अवांतर - ते पुरंदरे स्टाईलने वर्णन करू नका. अर्जुनाच्या बाणासारख पाऊस पडत होता ह्याला पुरावा काय? मुळात अर्जुन होता ह्यालाच पुरावा काय? त्यामुळे हे वगळून पुन्हा लेख प्रसिद्ध करावा ही विनंती मागणी आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करू! ;)
22 Jun 2009 - 5:13 pm | छोटा डॉन
मनिषभौ, आपल्या अवांतरसाठी हा प्रतिसाद ...
ते पुरावे वगैरे गोळा करणे आणि त्यावर काथ्याकुट करुन वाद घालणे हे पढतमुर्खांचे अथवा ठार मुर्खांचे काम, आम्ही दोन्हीही नाही आहोत हे इथे आग्रहाने नमुद करु इच्छितो ...
बाकी आपण कोर्टात जाऊन ह्यावर स्टे ऑर्डर आणु शकता, कोर्टातुन फोलिसांना पुरावे शोधण्याचा हुकुम जारी करण्याची ऑर्डरही आणु शकता.
अन्यथा हे न जमल्यास आमच्या लेखांची प्रिंट्-आउट काढुन त्याची प्रतिकात्मक होळी करण्याचा आपल्याला घटनात्मक हक्क आहे ...
अवांतर : लेख आवडला हे कळवणार्या सर्वांचे आभार ....
दुसरा भाग २४ तासांच्या आत असे आश्वासन देतो ...
अतिअवांतर : लेखनामध्ये साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, तसा आग्रहही नसावा. शुद्ध टवाळकी ह्या हेतुने लिहलेले आहे आणि लिहणार आहे ...
------
(घटनात्मक)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
22 Jun 2009 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण हे करण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रं जमवावी लागतील याची कल्पना असू द्यात. उदा:
१. गेल्या तीन वर्षांचे टॅक्स रीटर्न्स
२. आपले एक फोटो-आय.डी. कार्ड
३. आपले डोमिसाईल सर्टीफिकेट
४. जातीचा दाखला + उत्पन्नाचा दाखला
५. आपण मिपाचे सभासद आहात आणि आपणच मनीष आहात याचा एक दाखला. तात्या अथवा नीलकांतने स्वतःच्या लेटरहेडवर दिलेलं सर्टीफिकेट चालेल.
६. जन्माचा दाखला, अटेस्टेड चालेल.
७. आपल्या गाडीने काहीही अपघात केलेला नाही याचं वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्र
८. आपण जिथे नोकरी करत असाल, शिकत असाल तिथलं बोनाफाईड सर्टीफिकेट. स्वतःचा उद्योग असेल तर त्याप्रमाणे स्वतःचंच अंडरटेकिंग
मुख्य म्हणजे, ही सर्व कागदपत्रं तीन प्रतिंमधे द्यावीत, प्रत्येक कागदपत्रं एका गॅझेटेड ऑफिसरकडून सत्यमुद्रांकित करून आणावीत. व त्यांच्याबरोबर ही सर्व माहिती खरी आहे अशा अर्थाचं तुमच्या स्वाक्षरीतलं एक पत्रंही, तीन प्रतींमधे द्यावं.
डान्राव, २४ तासांच्या आत पुढचा लेख आला नाही, तर तुमच्या घरावर जातीने मोर्चा आणू!
22 Jun 2009 - 5:52 pm | श्रावण मोडक
चारित्र्याचा दाखला? वॉर्डाच्या महिला सभेनं दिलेला, नगरसेवकानं मोहोर उठवलेला आणि तुमच्या भागाच्या पोलीस इन्स्पेक्टरनं सील करून दिलेला. तोही लागेल. :)
22 Jun 2009 - 6:05 pm | बिपिन कार्यकर्ते
चारित्र्याचा दाखला कोणाकडे मागताय मिष्टर मोडक? शक्य आहे क ते? काहीच कळत नाही बॉ तुम्हाला, छ्या: !!!
बिपिन कार्यकर्ते
22 Jun 2009 - 6:10 pm | श्रावण मोडक
जरा धीर धरा. वॉर्डाची महिला सभा, नगरसेवक, पीआय अशा गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आता यांच्याकडून मिळालेल्या दाखल्यावरच्या व्यक्तीचं चारित्र्य काय असतं हे सांगायला थोडंच पाहिजे. छ्या राव, तुम्ही सगळ्या गृहीत गोष्टी उकलून सांगायला लावता. ;)
22 Jun 2009 - 4:20 pm | ऋषिकेश
लेख पावसा इतकाच तुफान आवडला
येऊ दे पुढचा भाग!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
22 Jun 2009 - 6:18 pm | बिपिन कार्यकर्ते
सकलगुणैश्वर्यसंपन्न लेखनाधिपति प्रतिसादकुलभूषण श्रीमंत डानरावसाहेबांसी, हुजुरांचे अनेक मंगल आशिर्वाद.
आपला खलिता पावला. मजकूर वाचोन परमसंतोष जाहला. आपण ये रितीने आपली लेखणी फिरोन लिहिती केली हे पाहून आम्ही खास जातीने आपणास हे पत्र लिहित आहोत. आपणासारख्या धुरंधर राजकारणी चाणाक्ष पुरुषांस आम्ही काय सांगणे? असेच लेखणी चालवून समस्त रयतेचे क्षेम करावे हीच विज्ञापना. अन्यथा आपणांस परिणामांची कल्पना आहेच.
अजून काय लिहिणे. हुजुरांच्या पुढच्या स्वारीसमयी जातीने शिबंदी घेऊन सेवेस हजर राहणे.
श्रीमंत खोबाराधीश्वर बिपिनपंत कार्यकर्ते
लेखनसीमा - मुद्रा
अवांतर: च्यायला डान्या, खरंच रे... असं पुरंदरे शैलीत लिहिणं लै अवघड राव... केव्हाचा ट्राय करत होतो तेव्ह एवढं जमलं. ते पुरंदरे स्वत: कसं लिहित असतील कोण जाणे. ;)
22 Jun 2009 - 6:20 pm | अनामिक
डॉन्राव... सह्ही जमलाय लेख (नमनालाच घडाभर तेल ओतलं तरी!).... पुढचा भाग लवकर टाक रे! नाहीतर अदिती म्हणते त्याप्रमाणे तुझ्या घरावर मोर्चा आणायला कमी करणार नाही....
खरंतर सामान्य माणूस न्याहाळन्याचा छंद म्हंटल्यावर त्या खालच्या परिच्छेदात "गणपत वानी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, अन मनाशिच म्हणायचा की या जागेवर बांधीन माडी...." असं काहीतरी वाचायला मिळेल असं वाटलं होतं.... पण लेख अगदीच खुमासदार झालाय.... पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत...
-अनामिक
22 Jun 2009 - 6:22 pm | मराठमोळा
लेख आवडला!!!! :)
पण नेहमी लेखापेक्षा मोठा प्रतिसाद देणारा डॉन क्रमश: लिहितो याला काय म्हणावे? ;)
बडवा कीबोर्ड आणी येऊ द्या पुढचा भाग लवकर..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
22 Jun 2009 - 6:37 pm | रेवती
सुरुवात तर छान झालीये. शिवकालीन परिच्छेद व्यवस्थित जमला आहे. क्रमश: ची इतकी भिती बसली आहे मनात की स्वप्नं सुद्धा आजकाल क्रमशः पडतात. हे वाक्य अवांतर समजू नये, लेखात क्रमश: शब्द आला आहे.;)
रेवती
22 Jun 2009 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं रेवतीताई, मला तर वाटलं, या डॉन्याने लिहिलं असेल, "सविस्तर लेखासाठी जागा सोडली आहे." ;-)
22 Jun 2009 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरी टोला!!! =))
बिपिन कार्यकर्ते
23 Jun 2009 - 6:51 am | छोटा डॉन
=)) =)) =))
च्यामारी, पिंडी की बेरी, इज्जतकी वाट लगा दी ...!!!
कळतात हो आम्हाला शालजोडीतले.
असो.
दुसर्या भागात तुमच्यासारखे एक कॅराक्टर टाकुन त्याचा आम्ही "सविस्तर समाचार" घेऊ ... ;)
आता बसा ओरडत.
------
( संक्षिप्त ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
22 Jun 2009 - 6:41 pm | मेघना भुस्कुटे
तू-फा-न झालाय! (सामना, असे भारी वाटते, पण आता बास, राईस प्लेट....) खदाखदा हसले...
22 Jun 2009 - 7:53 pm | क्रान्ति
खुसखुशीत पिझ्झा [पक्षी : लेख]! एक्दम धमाल! पुरंद-यांची भाषा तर लईच जबरदस्त!
अवांतरः क्रमशःसाठी काही उपाय नाहीत का?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
22 Jun 2009 - 7:57 pm | घाटावरचे भट
बेष्ट रे!!
22 Jun 2009 - 8:24 pm | शितल
मस्त रे :)
22 Jun 2009 - 10:53 pm | पिवळा डांबिस
सुरवात चांगली झाली आहे...
पण आम्ही फोटोशिवाय सविस्तर प्रतिक्रिया देत नाही!!!
पोरींचा फोटो टाका नायतर पिझ्झ्याचा, ती तुमची मर्जी!
(आम्हाला दोन्ही सारखेच आवडतात!!:))
पण फोटो पायजेलच हाय!!!!
:)
22 Jun 2009 - 11:17 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म..वाचतोय.. वाचतोय..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Jun 2009 - 11:29 pm | संदीप चित्रे
एकदम झ्याक जमलीय.
सुंदर (आवाज असलेली) तरूणी घरी येऊन रस्सम - भात करून देईल असं काहीतरी कर आता :)
23 Jun 2009 - 2:42 am | प्राजु
त्या सुंदर कन्यकांच्या नादात पिझ्झा घरी न्यायला विसरला नाहीत ना? ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jun 2009 - 8:24 am | सुचेल तसं
>>अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली <<
मस्त रे डॉनभाऊ!!! पुढचा भाग येऊ द्या लवकर..