पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
24 Jun 2009 - 11:24 am

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....भाग-१

टीप : ह्या लेखात कसलेही साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, वेळोवेळी मनात आलेले व्यक्त/अव्यक्त भाव शक्य तितके शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी जमेल तितकी टवाळकी केली आहे.

तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....

*******************************************************

समोरच एका टेबलावर एक मस्त "हम २ हमारे २" वाले कुटुंब बसले होते, त्यांची ऑर्डर अजुन आली नव्हती त्यामुळे त्यांचा मस्त टाईमपास चालु होता. ते २ छोटुले मस्तपैकी (काटेरी चमच्याने) अपडाथपडी खेळत होते, त्याआधी बहुतेक त्यांनी "नॅपकिन्सची सुलभ कस्पटे" हा छोटासा वर्कशॉप केला होता असे दिसते आहे. कारण त्याचे छिनविछीन्न अवशेष टेबलावर दिसत होते. नवरा-बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालुन बसले होते, बहुतेक एकमेकांना "समस" करत असावेत, सॉफ्टवेअर इंजिनीयर असावेत लेकाचे, समोरच बसलेल्या व्यक्तीशी पिंग करुन बोलणे ही तिकडचीच सवय.

एका मोठ्ठ्या टेबलावर एक मस्तपैकी "कॉलेज ग्रुप" बसला होता, बहुतेक पार्टी असावी अन्यथा एका दमात एवढे लोक (स्वखर्चाने)"पिझ्झा हट"ला येणे शक्य नाही. त्यांच्यातला "होस्ट" मी लगेच ओळखला, कारण त्याच्या चेहर्‍यावर जे बॉसने हापीसात अनैतिक काम करताना पकडल्यासारखे भाव असतात ते लगेच ओळखु येतात. मित्रांना पार्टी देणे ह्या प्रसंगाची तुलना एक तर "पगार देऊन स्वतःला शिव्या देण्यासाठी एखादा कोल्हापुरी माणुस नोकरीला ठेवणे" अथवा "उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे" ह्यांच्याशीच होऊ शकते, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही असा हा पार्टीचा प्रकार आहे. गॄपमधल्या काही मुलांचा नैसर्गिक गुणधर्माने पोरींवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न चालु असल्याचे दिसले, बहुदा मग त्यासाठी काही पाचकळ विनोद ( पक्षी : जे आम्ही करतो ते ) करुन हास्यफवारे उडवणे चालु होते. बहुतेक मुलीही आपले (कॄत्रीम)सौंदर्य बेदाग कसे राहिल ह्याची काळजी घेताना दिसत होत्या, हो ना, नाहितर तोंडाने त्या पिझ्झाच कोरडा तुकडा खाऊन नंतर सारखे इवलाश्या नॅपकीनने व (आपल्याच) कोमल हातांनी सारखे आपलेच नाक, कपाळ व गाल साफ करणे ह्याला काय म्हणावे ?
छे, बर्‍याच आठवणी जाग्या होतात अशी दृष्ये दिसली की, अशा पार्ट्यांवर एक स्वतंत्र लेखच टाकु असे म्हणत एक दिवस माझा ट्रकभर लेख लिहतो असे ( नुसतेच ) म्हणणारा डाँ. न्या. खैरनार होणार असे दिसतेय.

तिकडे एका जराश्याच लांब असलेल्या टेबलावर "३ देवियाँ किंवा चार्लिज एंजल्स" बसल्या होत्या. त्यातली एक मुलगी खुपच सुंदर आहे असे आमच्या मित्राचे मत झाले. ( अर्थात त्याच्या सुंदरतेच्या संकल्पना ह्या "बिपाशा बासु, कोयना मित्रा, राखी सावंत, तनुश्री दत्ता" इथंपर्यंतच मर्यादीत असल्याने मला त्याचे जास्त आश्चर्य वाटले नाही. अर्थात कुणाला कशाचे आकर्षण वाटावे ह्याचेही काही लिखीत नियम नाहीत, हवे असल्यास तुम्ही "शायनी आहुजा"चे उदाहरण घेऊ शकता). मात्र त्या ज्या पद्धतीने समोरचे अन्न खात कम चिवडत होत्या ते मात्र नक्की रोचक होते, काट्यावर (वजनाच्या नव्हे, तो विषय वेगळा. इथे फोर्क ह्या अर्थाने ) अडकवलेला पिझ्झा आपल्या मानेची, हाताचे, डोळ्यांची आणि केसांची किती कमाल हालचाल करीत किती नाजुकपणे खावा ह्याचे ते एक उत्तम उदाहारण होते. मला त्यातल्या एका मुलीची दर घासानंतर समोरच्या आरश्यात पाहुन केलेली "लिपस्टीकची अ‍ॅडजेस्टमेंट" हा प्रकार फारच मनोरंजक वाटला, किती जपतात हो मुली ह्या लिपस्टीकला, पण आवडले ( लिपस्टिक नव्हे तर तो प्रकार, अर्थात लिपस्टिक आवडले असल्याचे आम्ही कबुल करणार नाही हे ही आहेच). खरेतर " ((दिवसा)महत्वाची कामे करताना) लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की ;)

तेवढ्यात आमच्या मित्राने "अरे, हिला पाहिलेस का ? ( येडाच आहे लेकाचा, पाहिल्याशिवाय काय आम्ही सोडतोय का ? ) मी ना हिला क्ष ठिकाणी य बरोबर पाहिले होते. च्यायला बहुतेक आपल्याच ब्लॉकमध्ये रहाते" अशी बहुमोल आणि बिन-उपयोगी :( माहिती दिली.
आता माझ्या ह्या रुममेट मित्राबद्दल ४ शब्द सांगणे महत्वाचे आहे ( ओ अ‍ॅडी जोशी, तुमच्या रुमवर झोपायला जागा आहे ना ? मी ८ दिवस तिकडे रहायला येईन म्हणतो ). तो उभा असलेल्या ठिकाणीपासुन १ किमी त्रिज्येच्या परिसरात असणारी प्रत्येक पोरगी त्याने कुठेना कुठे कुणा ना कुणा बरोबर पाहिलेली असते असा त्याचा दावा आहे व दिवसातुन कमीत कमी २० किमी गाडी पळवणे हा त्याचा प्रण आहे. थोडक्यात आख्ख्या बेंगलोरमध्ये त्याने "क्ष" मुलगी व ती पण "य" ह्या ठिकाणी पाहिली नाही ह्या दोन्हीही शक्यता शुन्य आहेत कोणी असा दावा करत असल्यास सरळसरळ तो झरदारी अमेरिकेला मारतात तशा बिनबुडाच्या थापा मारतो आहे हे लक्षात घ्या. आम्हाला फक्त काळजी जेव्हा तो स्वतःच्या लग्नासाठी "मुलगी पहायला" जाईल त्या वेळची आहे कारण खासकरुन आपण "वेगळ्याच कारणासाठी" मुलगी पहात आहोत हे जर त्याच्या लक्षात नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. असो, खुप विषयांतर ( केले किंवा ) झाले.

इथे आम्हाला एक सुपरिचीत दृष्यही दिसले, आपल्या पुण्यात कसे सणासुदीला लोक पारंपारिक पोषाख घालुन, नटुन थटुन सहकुटुंब सहपरिवार असे जे.एम. रोड अथवा तत्सम ठिकाणी हॉटेलात जेवायला जातात व "पंजाबी डिशेस" खातात तसेच इथे एक "कुटुंब" पिझ्झा पार्टी झोडायला आलेले दिसले. कुटुंब हे अक्षरशः कुटुंब होते, म्हणजे पार आजोबा-आजींपासुन ते नातवापर्यंत. काळ फारच वेगाने बदलत चालला आहे खरा, बेंगलोरसारख्या सायबर सिटीत तर फारच वेगाने. आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते, आमची अपेक्षा होती की ते राईस-रस्सम सारखे मस्तपैकी काला करुन खाणार. आज्जीची थोडी पंचाईत झाल्यासारखी दिसत होती पण नातु तिला मदत करताना दिसला व हे दॄष्य फारच आवडले , खरेतर हेवा ही वाटला, खोटे कशाला बोला ?
त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.

बाकी काय इतर दृष्ये नॉर्मल होती, बहुसंख्य पिझ्झा खाण्याच्या कम (लिमीटेड) एकांतात गप्पा मारण्याच्या हेतुने आलेली कपल्स होती, ते आपल्या सुखात दंग होते. त्यांच्या भावनांचा लिखाणाद्वारे बाजार मांडुन त्यांच्या ज्या काही असतील त्या भावनांचा अपमान करण्याचा माझा इरादा विचार नाही ( न जाणो त्या घोळात मी ते अनुभव माझ्या शब्दात लिहताना गाफीलपणे एखादे नाव घेउन बसायचो व नंतर पंचाईट होऊन बसायची ;) )
बाकी इतर "आम्ही पिझ्झा हटमध्ये येऊन पिझ्झा खातो, आय कॅन अ‍ॅफोर्ड इट ...!" असे आव आणुन बसलेले महाभागही होते, ह्या भावनाही पटकन चेहर्‍यावरुन व बॉडीलँग्वेजवरुन वाचता येतात. वारंवार वेटर्सना त्रास देणे, मोबाईल खेळवत बसणे, चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.
त्यांचेही काही खास नाही.
अजुन एक म्हणजे "जाहिरातीतील कुटुंबे" सुद्धा दिसतात, वयाच्या मानाने जरा जास्तच अवखळ आणि अल्ट्रा मॉडर्न लहान मुली, त्यांचे डोक्यात जाणारे फालतु लाड व कौतुके, जणु त्या लहान मुलीची मोठ्ठी बहिणच आहे असा आव आणणार्‍या व इतरांचे लक्ष वेधुन घेण्याच्या पराकाष्ठा करणार्‍या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या त्यांच्या आया व त्यांचे कॄत्रीम लाडेलाडे बोलणे आणि हे सर्व हतबलतेने अथवा कौतुकाने पाहणारा त्यांचा हतबल अथवा मुर्ख नवरा ...
चालायचेच.

मात्र एका गोष्टीचे जरुर कतुक करु वाटते ते म्हणजे तिथल्या "टेक अवे काउंटरवरचा डिलेव्हरी बॉय ( तोच तो , आम्हाला फुक्कट पेप्सी दिलेला)", ज्या चपळाई व सहजतेने तो बर्‍याच गोष्टी अगदी सफाईने हाताळत होता ते पाहुन कौतुक वाटले. रांगेत उभे असलेल्यांच्या ऑर्डरी देणे, नव्या ऑर्डरी घेणे, फोनवरची ऑर्डर व त्यांची लफडी ( पक्षी : आमच्यासारखी ) निस्तारणे, पैशाचे हिशिब संभाळणे, कुणालाच दुर्लक्षीत न करता सर्वांना महत्व देणे, कंटाळलेल्या एखाद्या लहान मुलीला फुगा फुगवुन देणे, जाणार्‍या येणार्‍या गिर्‍हाईकांना योग्य ट्रिटमेंट देत अभिवादन करणे ...
क्लासच, त्याचे जरुर कौतुक आहे...

एकंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वावरणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...

जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे

" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,
पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."

बासच ...!!!!
शेवटी ( वाचकांच्या दृष्टीने काडीइतकी किंमत नसलेला ) आमचा पार्सल पिझ्झा आला व ते घेऊन आम्ही परत आमच्या फ्लॅटवर आलो ...

अवांतर :
जाता जाता पिझ्झा हट प्रशासनाला ( ह्या शब्दाला मिपावर बंदी आहे हे मान्य, पण एक डाव माफी असावी) काही मुलभुत प्रश्न :
१. पिझ्झा हटमध्ये "इंग्रजी" न बोलल्यास शिक्षा म्हणुन पैसा डब्बल घेऊन पिझ्झाच्या बदल्यात आमटी-भात खाऊ घालण्याची शिक्षा आहे का ?
२. नोकरभरती करताना "त्यांचे बोलणे आम्हाला कळत नाही व आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळत नाही" अशी नॉर्थ्-इस्टची पोरं भरती करण्यामागचे रहस्य काय आहे (अर्थात माझा मुद्दा हा प्रांतिक विरोधाचा नाहीच )? कमीत कमी त्यांना स्थानिक भाषा अथवा कमीत कमी इंग्रजी/हिंदीचा स्थानिक अँक्सेंट यांचे ट्रेनिंग कधी देणार ? का ह्या सर्व गोष्टी आपल्या "ग्राहक समाधान व सोईसुविधा" ह्यांच्या कक्षेत येत नाहीत.
एक किस्सा : मागे पुण्यात असल्याच एका प्रकाराला वैतागुन आमच्या एका मित्राने त्या नॉर्थ-इस्टच्या मुलीशी चक्क शुद्ध मराठीतुन प्रश्नोत्तरे करायला सुरवात केली, तीने "तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही" हे सांगितल्यावर त्याने " बरोबर आहे तुझे, माझेही काहीसे असेच होते आहे" असे सुनावले होते
३. गर्दीच्या वेळी दारात उभा असणारा पिझ्झा हटचा कर्मचारी हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमला असतो की गोंधळ वाढवण्यासाठी ?
कमीत कमी २ वाक्ये त्याला व्यवस्थित बोलता यावीत हे महत्वाचे नाही का ?

कैच्या कै अवांतर :
एका गोष्टीसाठी वाचकांची माफी मागतो, एक तर दुसरा भाग द्यायल उशीर झाला व लिहण्याच्या ओघात "टवाळकी" मधुन मध्येच लेख "सिरीयस" कसा झाला ते कळालेच नाही. अर्थात माझ्या मते ह्यात चुक काहीच नाही, हा परफेक्ट शेवट आहे. पण जर कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर माफी असावी ...
आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.
असो. धन्यवाद ..!!!

समाजमौजमजाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

सचीन जी's picture

24 Jun 2009 - 11:31 am | सचीन जी

डान्या लेका, तु फुल टाईम लेखक का होत नाहीस?
सांगीतलं नाही तर कणेकरांच्या नावावर हा लेख सहज खपुन जाईल!
तुला एकदा भेटलच पाहीजे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2009 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, अतिशय सुंदर लेख, कथन, वर्णन आणि माफक चिंतनही! खरंच आवडला दुसरा भाग. त्यासाठी केलेली २४ (+२४) तासांची प्रतीक्षाही सुफळ संपूर्ण.

सांगीतलं नाही तर कणेकरांच्या नावावर हा लेख सहज खपुन जाईल!

डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध.

राहत फतेह अली खानांचं हे गाणं, "मै जहां रहूं..." मलाही आवडतं. ही घ्या त्याची यू ट्यूब लिंक.

श्रावण मोडक's picture

24 Jun 2009 - 3:17 pm | श्रावण मोडक

सोडून बाकी सहमत.

घाटावरचे भट's picture

24 Jun 2009 - 9:47 pm | घाटावरचे भट

>>राहत फतेह अली खानांचं हे गाणं, "मै जहां रहूं..."

जरा थोडंसं त्या हिम्मेश रेशाम्मियालाही क्रेडिट द्या की... त्यानं बांधलंय ते गाणं.

विजुभाऊ's picture

26 Jun 2009 - 2:39 pm | विजुभाऊ

चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.

धन्य .....कै च्या कै रे डोन्या.
बाकी सचिन शी सहमत
सहमत हा शब्द "हस मत" असाही होउ शकतो.

अश्विनि३३७९'s picture

24 Jun 2009 - 11:33 am | अश्विनि३३७९

मनापासून आवड्ला ..
अश्विनि ....

दशानन's picture

24 Jun 2009 - 11:35 am | दशानन

असेच म्हणतो....

छान रे डॉन्या...
तुझी नजर चांगली आहे... आवडले !

थोडेसं नवीन !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Jun 2009 - 11:46 am | घाशीराम कोतवाल १.२

मानल बुवा डानराव तुम्हाला तुमच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटते बसल्या जागेवर सर्वांचे मस्त निरीक्षण केलेत =D>
*************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

अवलिया's picture

24 Jun 2009 - 12:03 pm | अवलिया

हेच म्हणतो. :)

अवांतर -पहिल्यांदा डान्रावांची 'नजर' चांगली असल्याचे सर्टिफिकेट कुणी दिल्याचे पाहिले.

--अवलिया

छोटा डॉन's picture

24 Jun 2009 - 1:56 pm | छोटा डॉन

>>अवांतर -पहिल्यांदा डान्रावांची 'नजर' चांगली असल्याचे सर्टिफिकेट कुणी दिल्याचे पाहिले.
नेहमीप्रमाणेच वैयक्तिक चिखलफेक करणारी प्रतिक्रिया. मिपावर आलेल्या "चान्स पे डान्स्"च्या लोंढ्यात हात धूऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न.
=))
असो, अवलियासाहेबांशी सहमत आहे ... :)

अवांतर :
खरं तर हा भाग-२ अत्यंत गडबडीत व म्हणावी तशी बैठक न जमवता लिहला आहे, काल दिलेल्या २४ तासांच्या डेडलाईनचे पालन काही वैयक्तीक अडचणींमुळे करणे जमले नव्हते, त्याचीच मनाला टोचणी लागुन राहिली होती ...
अर्थातच हा भाग माझ्या मनासारखा उतरला नाही, आत्ता पुन्हा वाचुन पाहिल्यावर तसे कंफर्म झाले ...

तुर्तास जरा गडबडीतच आहे, थोडा वेळ मिळाला की अजुन थोड्या सुधारणा करेन अशी ग्वाही देतो. कंटेन्ट आणि शैली अजुन थोडी चाळायची गरज आहे असे राहुन राहुन वाटते आहे.
असो, वेळ मिळाल्यावर नक्कीच करेन ...

तोवर हा आमचा लंगडा लेख आवडुन घेतलेल्या सर्व मायबाप मिपाकरांचे आभार, तुमच्या कौतुकामुळेच लिहण्याचे प्रोत्साहन मिळले हे नमुद करतो.
अजुन थोडी सुधारणा करुन अजुन तुमच्या अपेक्षा पुर्ण करणारा लेख देईल असे आश्वासन देतो ( डेडलाईनचे आता नाव नका कढु, आधीच पुरता बदनाम आहे ;) )
आभारी आहे ..!!!

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Jun 2009 - 8:35 pm | llपुण्याचे पेशवेll

>>उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे
हम्म. सामन्याचा प्रभाव दिसतो आहे.. :) जसा जसा लेख वाचत जाईन पुढे तसा तसा प्रतिक्रिया देईन.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

स्वाती दिनेश's picture

24 Jun 2009 - 11:55 am | स्वाती दिनेश

डॉन्या, हा भाग जास्त आवडला. मस्त लिहिले आहेस रे..
स्वाती

तात्या विन्चू's picture

24 Jun 2009 - 12:03 pm | तात्या विन्चू

झकास लेख्.....फार उत्तम .....आवडला.....

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

यशोधरा's picture

24 Jun 2009 - 12:04 pm | यशोधरा

छान लिहिले आहेस डान्या.

मनिष's picture

24 Jun 2009 - 12:13 pm | मनिष


कंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...

जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे

" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,
पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."

बासच ...!!!!

मस्त लेख! मलाही असेच निरीक्षण करायची आवड आहे, आणि राहत फतेह अली खानचे ते गाणे म्हणजे तर..........अशक्य आहे! :)

डॉन्या, वरचेवर/रेग्युलर लिहीत जा रे जरा!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jun 2009 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रीमान डानचंद्ररावजीसाहेब,

अतिशय आवडलेलं आहे लिखाण. मजा आली वाचताना. काही विशिष्ट कथासूत्र नसताना देखिल ओघवती भाषा, अचाट निरिक्षणशक्ती, ती लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती आणि गंमतिदारपणे मांडण्याची हातोटी यामुळे वाचताना मजा आली. यातली बरीचशी निरिक्षणे आमच्या स्वत:च्या निरिक्षणांशी तंतोतंत जुळतात हे पाहून "ग्रेट मेन थिंक अलाइक" या वचनाची सत्यता पटली. (काही लोक कुत्सितपणे हसतील या वाक्यावर, पण एकदा ग्रेट मेन्सनी अलाइक थिंक केलं तर मग बाकीच्यांची तमा कशाला बाळगा? हो की नाही? असो. आम्ही पण तुमच्यासारखेच विषयांतरं करायला लागलो.) तर मुद्दा असा की लेखन आवडलेलं आहे. जास्तीत जास्त लिखाण करत जा.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

24 Jun 2009 - 5:29 pm | टारझन

सदर प्रतिक्रिया आमची होती .. ह्यांनी चोरून लावलीये इथे !!!

डाणब्या !! चोच्या .. इकडं यं रं बाबा एकदाचा !@! तुला कंठाशी धरेल म्हणतो :)
डाणरावाच्या काकसमान नजरेला आमचा प्रणामा !! निसर्गाने डाणरावांना हा "नजरा"णा च दिलाय !!

(डाणपंखे) टारझन

यशोधरा's picture

24 Jun 2009 - 12:32 pm | यशोधरा

>>हे पाहून "ग्रेट मेन थिंक अलाइक" या वचनाची सत्यता पटली.

=)) <:P

सुबक ठेंगणी's picture

24 Jun 2009 - 12:39 pm | सुबक ठेंगणी

बाहेरच्या जगातून बाहेर येऊन नकळत पटकन स्वतःच्या मनात पाहिलंच! :)
एक कै च्या कै कस्पट
"लहान मुलाची निरागसता घेऊन "वारणार्‍या" झालंय! :P

सहज's picture

24 Jun 2009 - 12:53 pm | सहज

तुम्ही डॉन आहात!!!!

गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...

एकदम आवडले बॉस.

ऋषिकेश's picture

24 Jun 2009 - 1:43 pm | ऋषिकेश

वा! दुसर्‍‍या भागाची वाट पाहतच होतो..
लेखनशैली आणि निरिक्षणशक्ती दोन्हीला मनापासून दाद! :)

मस्त उतरला आहे लेख.. आता पुढला लेख येऊ दे.. क्रमशः अर्थातच चालेल

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सचीन जी's picture

24 Jun 2009 - 1:59 pm | सचीन जी

डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध.
हे मात्र फारच झालं! कणेकर हे अत्यंत छान लिहितात. डान्याच्या लिखाणावर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो आहे. हवे तर विक्षिप्त ताई, तुम्ही या साठी मिपावर मतदान घेउ शकता!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2009 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कणेकर हे अत्यंत छान लिहितात

हे तुमचं मत असेल, माझं नाही! आणि नाही जुळली आपली मतं तर एवढं काय त्याचं?

पण उगाच काही झालं की उठल्याबसल्या मिपाकर जनतेकडे कौल मागायची पद्धत रूढ होऊ पहात आहे, झाली आहे त्याचाही निषेध! उगाच काहीही काय लोकांना विचारत सुटायचं? कधीतरी स्वतःचा स्वतः विचार करून स्वतःची स्वतः मतं बनवायला काहीही प्रत्यवाय नसावा.
ज्या लोकांना मी धड ओळखतही नाही त्या लोकांना "तुमचं डॉन्याच्या लिखाणाबद्दल काय मत आहे?" हा प्रश्न मी का विचारू?

धमाल मुलगा's picture

25 Jun 2009 - 3:18 pm | धमाल मुलगा

आयला, ए अरे ओय, काय चाल्लंय रे? गपा की जरा.

ज्याला जे आवडतं त्यानं ते वाचावं, पहावं, करावं, खावं, प्यावं....वाट्टेल ते!
का आपापली मतं एकदुसर्‍याशी पडताळायला जाताय?

अवांतरः कणेकर हे डानरावांचे आवडते लेखक! कणेकरांनी लिहिलेलं जवळपास सगळं साहित्य डानराव बाळगुन आहेत असं आम्ही जाणतो :) अगदी, त्यांच्या लेखनातले अर्धविराम, स्वल्पविरामदेखील डानरावांना पाठ आहेत म्हणलं तरी चालेल ;)

अतिअवांतरः डान्या भैताडा, भारी निरिक्षण चाल्लंय हो! आता एखाद्यावेळी एनिग्मामधलंही निरिक्षण येऊ दे ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आनंदयात्री's picture

26 Jun 2009 - 10:03 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो, सहमत आहे.
वॉटरच्या परिक्षणाची वाट पहातोय !!

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jun 2009 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार

हॅटस ऑफ !

उच्च लिहिलयस रे डॉन्या.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मेघना भुस्कुटे's picture

24 Jun 2009 - 4:37 pm | मेघना भुस्कुटे

डॉन्या, सुटला आहेस तू. अफाट सुरेख झाला आहे का लेख. कैच्याकैच आवडला... शेवटासकट.

मसक्कली's picture

24 Jun 2009 - 5:02 pm | मसक्कली

:)
तुझ्या गोट्यान्च(डोळे) निरिक्षण लै झक्कास वट्ल बग........ B)

आनि त्यात्ल्या त्यात ते ............
लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की ............ =)) पुढची तयारि जोर्दार चललि आहे वाट्त... :))

सहि मामु तुच आहेस ;)

बाकि लेख आगदि तुफान झालाय बग........:)

तुझ्या गोट्यान्च (डोळे)विशेश कौतुक.......... ;) =D>

अनामिक's picture

24 Jun 2009 - 5:19 pm | अनामिक

सह्ही जमलाय रे लेख!
(फक्त ते कंस जरा कमी करता आले असते तर अजून मजा आली असती असे वाटले.)

-अनामिक

जृंभणश्वान's picture

24 Jun 2009 - 6:48 pm | जृंभणश्वान

एकदम भारी !

अनिल हटेला's picture

24 Jun 2009 - 7:06 pm | अनिल हटेला

दोन्ही भाग सलग वाचले....

हुच्च लिहीलयेस.......;-)

असेच लिहीत रहा बंगलोरी बाबा :-D

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

एकदा तापलं की काय खरं नसतंय बघ! कसलं लिहिलं आहेस. चाबूक, एकदम चाबूक! B)

(चिलीफ्लेक)चतुरंग

क्रान्ति's picture

24 Jun 2009 - 7:50 pm | क्रान्ति

हा लेख जास्त आवडला. त्यातल्या त्यात आजीपाजोबा आणि मंडळी!
त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.

खूपच खास वर्णन सुखी कुटुंबाचं!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

घाटावरचे भट's picture

24 Jun 2009 - 9:44 pm | घाटावरचे भट

भारी रे डान्या. लेख एकदमच आवडला.

संदीप चित्रे's picture

24 Jun 2009 - 10:31 pm | संदीप चित्रे

मस्त जमलाय लेख.. तुझ्याबरोबर एक पिझ्झा हटची सैर करून आलो :)
>> आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते
च्यायला .. पिझ्झा खायची ही कुठली 'ऑथेंटिक' पध्दत रूढ झालीय तिथे? पिझ्झा स्लाइस हाताने खाल्याशिवाय मजा नाही येत राव :)

तुझं निरीक्षण चांगलं आहे. लिपस्टिक वगैरे सत्राशे साठ भानगडी सांभाळणं बायकांना कसं जमतं ते त्यांचं त्यांनाच माहिती !

आजोबांपासून ते नातवापर्यंत कुटुंब एकत्र पिझ्झा हटमधे पाहून नो वंडर मस्त वाटलं असेल.

रेवती's picture

24 Jun 2009 - 11:49 pm | रेवती

मनोरंजक लेखन!
डॉनच्या नजरेनं वाचक पिझ्झाहटमध्ये निरिक्षण करत असल्यासारखे वाटत होते.

रेवती

शितल's picture

25 Jun 2009 - 11:08 am | शितल

निरिक्षक डॉन राव,
पिझ्झा व्यवस्थित पचला ना. ;)
बाकी मस्त लिहिले आहेसच हे सां. न्.ला.:)

अभिज्ञ's picture

25 Jun 2009 - 1:18 pm | अभिज्ञ

गुड वन.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

दिपक's picture

26 Jun 2009 - 11:26 am | दिपक

भारी लिहलंय डॉनभाऊ... तिथेच बसुन सगळं बघितल्यासारखं वाटलं

:)

विसोबा खेचर's picture

26 Jun 2009 - 2:43 pm | विसोबा खेचर

डॉन्याभाऊ,

उत्तम बॅटिंग रे...

लिहिते रहा, छान लिहिताय

तात्या.

छोटा डॉन's picture

26 Jun 2009 - 3:01 pm | छोटा डॉन

(आता अनायसे धागा वर आला आहेच तर ) प्रतिसाद देणार्‍या, न देणार्‍या, कौतुक करणार्‍या व आपलेपणाने ४ दुरुस्त्या सुचवणार्‍या सर्व वाचकांचे आभार मानतो ...!!!

धन्यवाद मित्रांनो ...!!!

------
(आनंदी) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

लिखाळ's picture

26 Jun 2009 - 8:07 pm | लिखाळ

छान लिहिले आहेस :) असे निरिक्षण करायला मजा येते.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

Nile's picture

27 Jun 2009 - 12:46 am | Nile

मस्त छंद आहे डॉनराव! मला पण असे निरिक्षण करायला फुल्ल मजा येते. येउ द्या अजुन.

पण नातंवंड वगैरे पाहुन हेवा वाटतोय! काय खरं नाही राव तुमचं. ;)

पाषाणभेद's picture

1 Jul 2009 - 3:20 pm | पाषाणभेद

पिझ्झा मस्त झालाय.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

इंटरनेटस्नेही's picture

29 Aug 2010 - 12:35 pm | इंटरनेटस्नेही

दोन्ही भाग आवडले! ललित असावे तर ते असे!

पैसा's picture

29 Aug 2010 - 1:11 pm | पैसा

खूपच छान.

स्वाती's picture

29 Aug 2010 - 6:56 pm | स्वाती

छान लिहिले आहे.

शिल्पा ब's picture

29 Aug 2010 - 9:52 pm | शिल्पा ब

ल अ ई ब हा री ही

नाना चेंगट's picture

13 Jul 2012 - 6:50 pm | नाना चेंगट

आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.

डानरावांचं अजूनही बिनसलेलंच दिसतंय.. बर्‍याच दिवसांत त्यांचे दमदार लेख पहायला मिळाले नाहीत.

अर्थात त्यांना विचारलं तर ते मी सध्या वाचनमात्र आहेत असे सांगून बोळवण करतात.
ठीक आहे.
वाट पाहू.
मिटलेच डोळे तर डान्राव आणि कावळा पाहून घेतील काय करायचं ते... आपल्याला काय !