पिंजारी - १

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
6 Feb 2009 - 10:39 am

काही वर्षांपूर्वी, उन्हाळ्यात केव्हा तरी, एक फॅक्स...
"नवी गावं आपल्या कामाला जोडून घेतेय. येशील का? पेवलीपासून सुरवात. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, राहून गेलं..."

रजनीनं पेवलीत पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा त्या गावात दुफळी पडल्याचं तिला दिसलं होतं. दुफळी म्हणजे माणसांच्या संदर्भातील नव्हे. गावातून एक ओहोळ जात होता. पुढं तो खाली एका नदीला मिळत होता. या ओहोळाच्या दोन्ही बाजूंना गाव वसलं होतं. ही ती दुफळी.
बचत गट, बालशिक्षण असं काम सुरू करून सहा वर्षे होत आली होती. या काळात काही गावं संस्था-संघटनेला जोडली गेली होती. पहिल्या वीस गावांमध्ये केवळ तेथील लोकांच्या जोरावर उभ्या केलेल्या कामांतून काही गोष्टी पदरी पडल्या होत्या. त्यातच एक म्हणजे बालहक्क समितीकडून मिळालेला अनौपचारिक बालशिक्षणाचा प्रकल्प. त्या जोरावर आणखी काही गावं जोडून घेणं शक्य झालं होतं. आता आणखी विस्तार रजनीला खुणावू लागला होता. त्यामुळं आजवर संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिघावर असलेली गावं जोडून घेण्याचा हा प्रयत्न. त्यातून पेवलीत प्रवेश.
पेवलीचे गुलाबसिंग याआधी रजनीला भेटले होते. "गुलाबकाका". खरं तर, बऱ्याच ते काळापासून 'गावी ये' असं म्हणत होते, ते आजवर जमलं नव्हतं. आता जमलं. तेही पुढच्या गावाला जाण्याचा नेहमीचा वाकडा रस्ता टाळून सरळ रस्त्यानं पण थोडं चालत जाण्याचा निर्णय केल्यानं. गावात आल्यानंतर रजनीला ते चालणं सार्थकी लागल्यासारखं वाटलं. चाळीस उंबऱ्याचं गाव. म्हणजे संघटना उभी करण्यासाठी तसं कठीणच. कारण घरांची संख्या जितकी जास्त, तितका हितसंबंधांचा गोंधळ. उत्तरेला एक मोठी डोंगररांग. त्याच रांगेतून येणारा ओहोळ, आणि तो मिळायचाही त्याच रांगेतून येणाऱ्या नदीला. दक्षिणेकडून गावात शिरलं की, पहिल्या घरापासून डोंगराच्या दिशेनं असलेल्या जमिनीच्या सुमारे दीडेक मैलाच्या विस्तारात शेती. अधूनमधून बऱ्यापैकी टिकलेला झाडोरा. मोह, आंबा, साग. शेती आणि घरं हे अद्वैतच. त्यामुळं एकगठ्ठा वस्ती हा प्रकार नाहीच.
दुपारच्या सुमारास गुलाबकाकांच्या घराच्या पडवीत रजनी पोचली; त्यांनी बाज आणून बाहेर टाकली. पाणी आलं.
"रामराम ताई. आधी जेवून घे. मग लोक येतील. मग बोलू." गुलाबकाकांनी लोकांना सांगून ठेवलेलं असावं. रजनीच्या चेहऱ्यावर समाधानाची थोडी लाट आली. पाणी घेऊन ती थेट घरात शिरली.
दारातून आत पाऊल टाकलं तसा आधी सामोरा आला अंधार. बाहेरच्या कडक उन्हातून आल्यानं डोळे सरावण्यासाठी थोडा वेळच लागला. मग तिचं लक्ष गेलं. नीट सारवलेली जमीन. मोठ्या विस्ताराची खोली. मध्यभागी दोरीच्याच पाळण्यात एखादं बछडं असावं. तिनं पुढं नजर टाकली. तिशीच्या आसपासची तरुणी समोर आली. हात जोडून नमस्कार करत आणि मनापासून हसत. रजनीनंही हात जोडले आणि पुढं होतं त्या तरुणीचे जोडलेले हात हाती घेतले आणि मग गळाभेट झाली.
"मी पिंजारी," आवाज दमदार होता.
ही काकी नक्कीच नाही. काका पंचेचाळीशीच्या आसपास आहेत. रजनी विचारात होती तितक्यातच आतून आणखी एक बाई पुढं आल्या. पुन्हा तेच. हात जोडून दिलखुलास हसत नमस्कार वगैरे.
तितक्यात गुलाबकाका आत आले. "ताई, ही माझी बाई, वेरली. ही पिंजारी. आपल्या डोंगऱ्याची मुलगी."
अच्छा, रजनीला काही तरी अंधुकसं आठवलं. ती विचारात पडली, पण पहिल्या क्षणात काही आठवेनासं झाल्यावर तिनं तो नाद सोडला. काही असेल तर पुढं कळेलच ही नेहमीची वृत्ती. तेवढ्यात काकींनी जेवण वाढल्याचं सांगितलं. जेवण आटोपून सारे बाहेर आले. अंगणातून लोकांचे आवाज यायला सुरवात झाली होती.
रजनी खुश होती. गावातील पहिल्याच बैठकीला पन्नासच्या आसपास उपस्थिती. त्यातही वीसेक महिला. संघटनेच्या ताकदीचं खरं मर्म त्यांच्यातच. गुलाबकाका सुरवातीला बोलले. रजनी कोण वगैरे त्यांनी सांगून घेतलं. संघटनेच्या जोडीनं संस्थेमार्फत सुरू असलेली धान्यबँक, बचतगट यासारखी कामं याविषयी रजनीची सहकारी उर्मिला बोलली. आणि मग रजनीकडं सूत्रं आली.
"मी भाषण करणार नाही. कारण मी भाषण करत नाही. मी तुमच्याशी बोलणार आहे," अलीकडं ठेवणीत आलेली ही तीन वाक्यं. रजनीला ठाऊक होतं, एकदम तिन्ही वाक्यांचा परिणाम तसा होत नाही. तरीही ती ही वाक्यं तशीच बोलते. मग पदर खोचून घ्यायचा आणि गावातल्या म्होरक्याकडंच मोर्चा वळवायचा. इथंही तेच. गुलाबकाकांकडं पहात तिनं सांगितलं, "काका, तुम्हीच गावाची माहिती द्या. गाव किती मोठं आहे, लोकसंख्या किती आहे, शेती कशी होते, पाणी कुठून येतं, रेशन आहे का, शाळा आहे का..." हे प्रश्न हेच ठेवणीतलं अस्त्र. जरी म्होरक्याला बोलायला सांगितलं तरी, आता गावातला प्रत्येक जण बोलू लागतो आणि त्यातही महिला वर्ग भले आपल्याला उद्देशून नाही, पण ऐकू जाईल अशा आवाजात कुजबूज करू लागतोच. या गावात वेगळं काही होण्याचं कारण नव्हतं.
थोडा वेळ गेला आणि बायकांच्या घोळक्यातून अचानक गाण्याचे सूर उमटले. रजनीनं तिथं पाहिलं. एकच सूर नव्हता, इतरही काही त्यात मिसळत होते. मुख्य सूर मधून येत होता आणि तो चेहरा तर इतर चेहऱ्यांच्या आड होता.
"पुढं ये. सगळ्याच या. आपण सगळे गाणं म्हणूया," रजनीचं हे आवाहन पुरेसं नव्हतं. काहीच हालचाल नव्हती, पण बोल सुरू होते. पुरूष मंडळींना तोंड त्या दिशेला करण्यास सांगत ती स्वतः घोळक्याकडं गेली आणि चमकली. मघा दमदार वाटलेला आवाज आता गाण्याचा आवाज झाला होता. तिला पुढं आलेलं पाहून पिंजारी लाजली आणि थांबली. रजनीनं पुढं होऊन तिच्या शेजारीच जागा करून घेत बसकण मारली आणि सांगितलं, "म्हण गाणं."
पिंजारीनं पुन्हा आरंभापासून सुरू केलं. आणि पंधरा मिनिटांत रजनीला गावाची एक वेगळीच सैर घडवून आणली. गाणं उत्स्फूर्तच होतं. या भागातील महिलांच्या अंगी असलेला एक वेगळाच गुण हा. बोलता-बोलता रचना करतच गाणं गात जायचं. त्यातून आपली जीवनकहाणी मांडायची. पिंजारीनं तेच त्या दिवशी त्या गाण्यात केलं होतं. तिनं पेवलीपासून - पेवली म्हणजे या गावाला जिचं नाव मिळालं ती नायिका, या गावाची संस्थापक; तिची कहाणीही विलक्षणच! - तर पेवलीपासून सुरवात करून आजच्या घडीपर्यंतचा गावाचा प्रवास पिंजारीनं मांडला त्या गाण्यातून; मग पेवलीच्या मुलानं लावलेलं एक झाड, त्यातून उभं राहिलेलं आणि पुढं कापलं गेलेलं जंगल, गावाचं जगणं आणि तिचं जगणं, त्यातल्या हाल-अपेष्टा, त्यातली सुखं-दुःखं असं सारं काही त्या गाण्यामध्ये आलं आणि पुढं रजनीला आणखी काही समजून घेण्याची गरज राहिली नाही. पुढच्या प्रक्रिया होण्यास केवळ गावकऱ्यांच्याच होकाराची आवश्यकता होती.
मानव मुक्ती वाहिनीची आणखी एक शाखा त्यादिवशी स्थापन झाली. पेवलीत.
(क्रमशः)

वाङ्मयकथासमाजजीवनमानअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

6 Feb 2009 - 1:02 pm | विंजिनेर

पेवली सुद्धा ह्या निमित्ताने मी पहिल्यांदाच वाचली. छान कथा आहे.
काथ्याकूट म्हणून नव्हे तर एक कुतूहल म्हणून विचारतो - पेवली काल्पनीक का प्रत्यक्षात आहे कुठे?
पिंजारी-२ लवकर येउद्या. वाट पाहतो आहे.
पुलेशु

प्राजु's picture

8 Feb 2009 - 2:33 am | प्राजु

मी ही तिथे पलिकडे हे दोन्ही लेख वाचले होते.
पिंजारी -२ ची वाट पहाते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

10 Feb 2009 - 10:27 pm | धनंजय

माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे :
पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५
-