राजे – ३

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
4 Jan 2009 - 11:14 am

राजेंची कहाणी सुरू झाली.
“शिबिरानंतरचं वर्ष व्यवस्थित, काही कारणानं स्टेज सुटलं, गर्द, नंतर इंजेक्शन्स, मुंबई, अंडरवर्ल्ड, घोडा, रावसाहेबांशी संबंध, व्यसनांतून बाहेर, रावसाहेबांमुळंच मंत्रालय हे ‘करियर’...” राजे. घोडा शब्दापाशी पिस्तुल, रिव्हॉल्वरची खूण.
फक्त स्वल्पविराम असलेलं हे तुटक शब्दांचं वाक्य. आधीच्या प्रत्येक स्वल्पविरामामध्ये खंत, खिन्नता, अपराधीपणा आणि शेवटच्या करियरवर एक छद्मी हास्य. वाक्य बोलून झाल्यानंतर एक दमदार झुरका.
“एव्हरिथिंग इज कव्हर्ड इन धिस सेण्टेन्स. नथिंग मोअर, नो लेस. वोण्ट जस्टिफाय एनिथिंग, वोण्ट फिलोसोफाईज एनीथिंग. आय यूज्ड द वर्ड करियर व्हेरी केअरफुली. मला ठाऊक आहे तुझं आयुष्य कसं घडत गेलं आहे ते. समोर सरकार आहेत. त्यामुळं जबाबदारीनंच शब्द वापरला आहे. त्याचंही मी समर्थन करीत नाही. मी उगाच व्यवस्थेचा बळी वगैरे म्हणणार नाही स्वतःला. मी त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच.”
ओह. हा माणूस 'ना-ना करते' शैलीत एखाद्या गोष्टीचं समर्थन देऊ शकतो, तत्त्वज्ञानही करू शकतो, हे या वाक्यांतून सहजी लक्षात येत होतं. तो बारकावा माझ्या ध्यानी आला. तोच धागा पुढं त्याला पेटतं ठेवायला उपयुक्त असल्यानं मी म्हणालो, “धिस इटसेल्फ इज अ ह्यूज जस्टिफिकेशन...”
“हाहाहाहाहा.... सरकार, शब्दांत पकडू पाहता, पण मी सापडणार नाही. तुमचे हे उद्योग त्या तिथं वरच्या मजल्यांवर बसतात त्यांच्याकडं,” मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांकडं बोट करत, माझंच माप काढत राजे म्हणाले, “कारण, मी करतोय ते चुकीचं आहे, न-नैतीक आहे आणि म्हणूनच मी त्या व्यवस्थेचा एक भाग आहे हे स्पष्टपणे सांगून टाकतोय. त्याबद्दल मला कोणी काही सजा दिली तर माझी त्याला खुश्शाल तयारी आहे. आणि एरवीही मी ती भोगतोच आहे. हे “विथ पीपल लाईक यू...” हा त्या सजेचाच एक भाग असतो सरकार. रूढ अर्थानं जिला सजा म्हणता येईल ती केवळ व्यवस्थाच देऊ शकते आणि मी त्या व्यवस्थेचाच भाग असल्याने ती सजा मला मिळत नाही इतकं सरळ आहे हे. त्या व्यवस्थेच्या बाहेर राहून संघर्ष करण्यात मला अर्थ वाटला नाही आणि म्हणून मी तिच्यात शिरकाव केला.”
हे जरा उफराटं होतं. टिपिकल राजकारण्यांसारखं. गुन्हा सिद्ध करा, मी सजा घेतो हाच पवित्रा. स्टेज सुटलं म्हणण्याइतकं काही करू पाहणारा हा माणूस असा का विचार करतोय हा प्रश्न टोचून गेला.
"म्हणजे?" संभाषणाची सूत्रं माझ्याकडं आली होती.
"म्हणजे काही नाही. मी फिक्सर आहे. मी इथं कामं करून देतो. भरती, परवाने, मंजुरी, अडलेले कागद सोडवणं, काही कागद अडवणं, काही कामांसाठी सल्लामसलत आणि मार्गदर्शन." सल्लामसलत आणि मार्गदर्शन या शब्दांना दोन्ही हातांच्या अंगुलीनंच अवतरणांची खूण करत राजे म्हणाले.
"किंमत किती?"
"कामाच्या मूल्यावर अवलंबून. रेट मी ठरवत नाही. तो ठरलेला असतो. मी त्यात तडजोड घडवून देतो. कधी हजारांत, कधी लाखात. माझे मला पैसे मिळतात. संबंधितांचे त्यांचे त्यांना पोचतात."
"संबंधित म्हणजे कोणकोण?" माझा प्रश्न.
"सरकार, कायमच आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहाता असं दिसतं," मला पुन्हा एक फटका मारत राजे पुढं म्हणाले, "तिथं त्या मजल्यांवर बसणाऱे, काही अपवाद सोडता सारेच." इशारा मंत्रालयाकडं.
या उत्तरातून माझ्या ज्ञानात फारशी भर पडली नव्हतीच. कारण ते तर जगाला ठाऊक होतं. पण आता या संवादात मला अधिक रस निर्माण झाला होता. कदाचित तिसऱ्या पिचरचा परिणाम असावा तो.
"इंग्रजी संवादकला वगैरे..."
"सरकार, मी अभिनेता आहे. त्यासाठी बरीच कौशल्यं आवश्यक असतात. त्यातलं ते एक."
"मधल्या सगळ्या वाटचालीत ते कुठं जमवलं?"
"विशेष काही नाही. गोव्यात पोचलो होतो. भटक्यांमध्ये होतो काही काळ. तिथं त्यांच्याशी बोलत-बोलत भीड चेपून गेली आपल्या गावरानपणाची. मग त्यांच्याच जोडीने वाचनही सुरू झालं. झपाटल्यासारखं. वेगवेगळे विषय..." यावरून कोणालाही थोडक्यात कल्पना यावी.
"रावसाहेब कोण?"
"ओळखत नाही?" राजेंचा थोडा चकीत भाव, "रावसाहेब इज रावसाहेब. राज्यात त्यांचे हजाराच्या संख्येत एसआय असतील. पीआयही तितकेच. शेकड्यांत मोजता येतील असे एसीपी किंवा डीवायएसपी. कित्येक डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार..." यादी लांबत होती. माझ्यासाठी ही नवी माहिती होती. पण नेमकं कळत नव्हतं.
"इंटरेस्टिंग..." मी.
"अँड फ्रस्ट्रेटिंग टू." राजे.
मला त्या फ्रस्ट्रेशनमध्ये रस नव्हता. लोकांनी स्वतःच्या पायावर धोंडे मारून घ्यायचे आणि मग दुखतंय म्हणून रडत बसायचं, आणि त्यासाठी माझा खांदा देण्याची माझी तयारी नव्हती.
"दुपारचं काम काय होतं शिक्षणमंत्र्यांकडं? साधारण स्वरूप?"
"काही नाही. बीडच्या एका कोपऱ्यात भटक्या-विमुक्तांसाठी एक संघटना काम करते. ती शाळा चालवते. शाळेला अर्थातच मान्यता नाही. दरवर्षी परीक्षा आल्या की, त्यांच्याकडं अॅफिडेव्हिट मागतं शिक्षण खातं. आम्ही अनधिकृत शाळा चालवून चूक केली आहे, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, असं अॅफिडेव्हिट. म्हणजे गुन्ह्याची कबुली. गेली पाच वर्षे संस्था ते देत आली आहे. यंदा पुन्हा तोच प्रश्न समोर आहे."
"पाच वर्षे अॅफिडेव्हिट घेतलं आहे, यंदा कशी काय सूट मिळेल?"
"मिळणार नाही हे मलाही ठाऊक आहे. मला दार किलकिलं करायचं आहे. त्यामुळे सावंतांना थोडं मनूव्हर केलं. त्यांची दोन कामं आहेत माझ्याकडं. त्याबदल्यात त्यांच्याकडं ही मागणी देऊन ठेवली..."
"त्यातून काय होईल?"
"काही नाही. माझी किंमत मी वसूल करेन त्यांच्याकडून. पुढच्या वर्षासाठी त्या संस्थेच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून देईन मी. शाळा अधिकृत होईल. सावंतांच्या आत्ता लक्षात आलंय की, असं अॅफिडेव्हिट मागून दरवर्षी एखाद्या संस्थेकडून गुन्ह्याची कबुली घेणं म्हणजे काय असतं ते. मी नीट समजावून दिलं." समजावून या शब्दावर पुन्हा अवतरणाची खूण दोन्ही हाताच्या अंगुलीनं.
माझ्यातला पत्रकार शांत बसत नव्हता. "तुमचा फायदा काय? की ती संस्थाही काही देणार आहे?"
"छे. ती संस्था मला काय देणार? आणि ती देऊ शकत असली तरी मी घेणार नाही. कारण मला त्याची गरज नाही. पैसे मिळवण्याचे मार्ग इथं खूप आहेत. एक परमीट - परमीट रुमचंच - काढण्यासाठी मदत केली तर मला पन्नास सुटतात."
"अच्छा, रॉबिन हूड."
"नॉट एक्झॅक्टली. आय डोण्ट किल एनीबडी. आय डोण्ट लूट. मी कोणालाही धाकदपटशा दाखवत नाही. मी नियम वाकवतो. कारण एरवीही ते वाकवले जाणार असतातच. ते वाकवण्याचं काम परमीट रुमसाठी होतं. शाळेसाठी होत नसतं. तिथं मी ते आणखी सरळ करतो. मग त्या शाळेला मान्यता मिळते."
“अच्छा! संस्थेची साधनशुचिता...”
“सरकार, त्या संस्थेनं तसंच रहायचं ठरवलं ना, तर वर्षानुवर्षे ही व्यवस्था त्यांच्याकडून फक्त “गुन्हा कबूल”चे अॅफिडेव्हिट घेत राहील. पुढे कधी तरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप होतील. पोरांच्या शिक्षणाची मधल्या मध्ये वाट लागलेली असेल. ही व्यवस्था वाकवावी लागते तसं होऊ द्यायचं नसेल तर, आणि वाकवण्याचं काम करायचं झालं तर साधनशुचितेला काही वेळेस बगल द्यावी लागते... कारण तिथं बोटं तिरकीच करावी लागतात...”
हे तत्त्वज्ञान भयंकर होतं, माझं मन ते स्वीकारण्यास तयार होत नव्हतं. पण राजेंनी समोर ठेवलेलं व्यवस्थेचं चित्र त्यापेक्षा भयंकर होतं. ही व्यवस्था अशा संघटनेला शाळेची मान्यता देणार नाही, त्या भागांत शाळाही नीट चालवणार नाही. लोकांनी भोग भोगतच मरायचं अशी ही व्यवस्था.
"सावंतांचं तुमच्याकडचं काम परमीट रूमशी संबंधित?"
"हाहाहाहाहा. मी आधीच सांगितलंय, मी न-नैतीक आहे. कारण व्यवस्था न-नैतीकच असते. हे तुम्ही एकदा स्वीकारलंत ना सरकार, तर बरेच प्रश्न आपोआप मार्गी लागतात." नाही, नाही म्हणत हा माणूस पुन्हा तत्त्वज्ञान करीतच होता. ते स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती.
बोलता-बोलता बहुदा बीअरच्या प्रभावाखाली आम्ही एकेरीवर आलो होतो. पण एकमेकांना संबोधताना राजे किंवा सरकार हे शब्द आले की मग मात्र अहो-जाहो. गप्पा सुरू राहिल्या पुढं. सहावा पिचर येईपर्यंत.
रावसाहेबांचा काळ आता संपला होता. आता एजंटगिरी सुरू झाली होती वगैरे गोष्टी तटस्थपणे हा गृहस्थ सांगत होता. कुठंही खंत नाही, कसलंही दुःख नाही. आपण करतो ते बरोबर असा दावा नाही, आपलं सारंच कसं चुकतंय याची रडकथाही नाही. आहे हे असं आहे, मी या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच पालूपद.
जेवण करून निघालो.
"किती नंबरला आहात?" आमदार निवासाच्या गेटवर राजेंचा प्रश्न.
दादानं सांगितलं.
"वर या मग माझ्याचकडे. तिथं कोणीही नाही. आपण एकटेच असतो."
"कोणाची आहे रूम?" दादा.
"आपलीच. तुला काहीही राजकीय अडचण होणार नाही. काळजी करू नकोस." त्याचा ठाम सूर.
माझ्या भुवया उंचावल्या.
"काही विशेष नाही. आपण एका संघटनेचे राज्य प्रमुख आहोत. त्या नावावर ती खोली सरकारकडून भाड्यानं अलॉट करून घेतली आहे. त्यामुळं तिथं कोणीही नसतं. माझ्याकडं सहसा गेस्ट नसतात. आले तरी मी त्यांना त्यांच्या-त्यांच्या आमदारांकडं पाठवतो. रुमवर मी एकटाच आणि कधी आले तर तुमच्यासारखे दोस्त."
कसं कुणास ठाऊक, पण दादानं त्यांच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला होता.
(क्रमशः)
राजे - १
राजे - २
राजे - ४
राजे - ५
राजे - ६

वाङ्मयसमाजजीवनमानराजकारणअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jan 2009 - 11:41 am | बिपिन कार्यकर्ते

गाडी वेगात आणि मस्त चालली आहे.

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

4 Jan 2009 - 12:20 pm | घाटावरचे भट

सहमत.

शिवाय क्रमशः क्रमशः म्हणत महिना महिना तंगवणार्‍या सर्वांसाठी एक चांगलं उदाहरणही आहे. काय बिपिनभौ, मी बोल्तो ती बात सच्ची की नै?

थोडीफार आमदार निवास व मंत्रालयाची माहिती असणार्‍याना लगेच आकलन होईल हे सगळे. खुप आवडली.
वेताळ

सुनील's picture

4 Jan 2009 - 4:28 pm | सुनील

ओघवते लेखन. पुढे वाचण्याची उत्सुकता.

ह्या फिक्सर मंडळींबद्दल थोडम जास्तच कुतुहल आहे. अमर सिंगदेखिल मूळचा फिक्सरच!

बाकी क्रमशः म्हणता म्हणता दिवसात ३ भाग टाकलेत. उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक पाचलग's picture

4 Jan 2009 - 6:51 pm | विनायक पाचलग

पुढचे येवु देत लवकर
वाट पाहतोय

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

संदीप चित्रे's picture

4 Jan 2009 - 7:09 pm | संदीप चित्रे

श्रावण,
एकदम सुरेख चाललय... पुढच्य भागाच्या प्रतिक्षेत आहे...

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

ऋषिकेश's picture

4 Jan 2009 - 7:40 pm | ऋषिकेश

भन्नाट!!!.. :)
एकापाठोपाठ एक तीनहि भाग वाचले!.. तुमची लेखनशैली ओघवती आणि वेगवान आहे.. खूप आवडली..
उत्कंठा वाढली आहे.. लवकर येऊ दे पुढला भाग

- ऋषिकेश

शैली मस्त आहे आपली.
कधी पुढचा भाग??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

5 Jan 2009 - 3:28 am | रेवती

पुढचा भाग कधी?

रेवती

अनिल हटेला's picture

5 Jan 2009 - 9:03 am | अनिल हटेला

सही !!!

एका दमात तीनही भाग वाचले...
स्पीड आणी शब्दरचना विशेष आवडली..

=D>

पू भा प्र....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मॅन्ड्रेक's picture

5 Jan 2009 - 3:44 pm | मॅन्ड्रेक

हं ! येउ दे.