मानस - धुळवड
स्थळ: गोंदवले
दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस!
वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची
श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप. सगळीकडे देखरेख करावी लागते.
पावणे पाचची घंटा होते आणि समाधी मंदिरात भूपाळ्या सुरू होतात.
" उठी उठी बा महाराजा.."सुरू होते आणि महाराज मनोमन त्यांच्या लाडक्या रघुराईला नमस्कार करत , "जानकी जीवन स्मरण जय जय राम!!! हो हो उठलो रे बाबा!" अस म्हणत उठून बसतात!
"शिंचा.. हा डावा गुडघा जरा जास्तच कुरकुर करू लागलाय" असे स्वतःशीच पुटपुटत गुढग्यावर हात ठेवत उठून बसतात. जरा दम खात नाहीत तोवर,"उठी उठी सद्गुरूमाय..." अशी आळवणी सुरू होते.
"हो हो, येतो रे बाहेर! रामाच्या काकड्याला जायचं आहे ना!! " अस म्हणत राममंदिराकडे निघतात. रामाचा काकडा करून आल्यावर, इकडे समाधीवरच्या गोपाळकृष्णाला लोणीसाखरेचा प्रसाद दिला गेला आहे. काकडा करून उपस्थित मंडळी लोणी साखर प्रसादासाठी बाहेर रांग लावत आहेत. काही मंडळी समाधी मंदिराच्या सभागृहातच बसून पंचपदी सुरू होण्याची वाट बघत आहेत. दिवस थोडा वर येतो, वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. "दीन हाका मारी.. पासून सुरु झालेली पंचपदी समाप्त होत आली आहे आणि मंदिरात आता 'धनी दयाळा.. गोविंदा' सुरु झाले. पुरुष मंडळी तल्लीन होऊन 'वारकरी फुगडी' घालत आहेत. श्रीमहाराज योगसमाधीमध्ये प्रसन्न मुद्रेने बसले आहेत, मधेच धनी दयाळा..ये धावत परमानंदा' ऐकून डोलत आहेत.
इतक्यात... समाधीच्या वर असलेल्या गोपाळकृष्णाच्या मंदिरात काहीतरी हालचाल.. काहीतरी चुळबुळ सुरु झाली आहे... कोणाच्याच नजरेत आली नाहीये अजून! पाहता पाहता हालचाल वाढली, इतका वेळ मान तिरकी करून पाहत असलेल्या कृष्णाने एकावर एक असलेला पाय सरळ केला अन् अलगद आपली मान सरळ करून खांद्यावर असलेला शेला कंबरेला बांधला आहे. आणि त्यात आपली बासरी खोचून मस्तपैकी हात वर करून , "खूप वेळेपासून एका पायावर उभे राहून अवघडलो बुवा "असे म्हणत आळस दिला आहे.
डोक्यावर मयुरपूच्छ खोचलेला जरीचा फेटा , कपाळावर चंदनाचे उभे गंध, अंगात निळाशार अंगरखा त्यावर वक्षावर रुळणारे रत्नजडीत माळा अन् त्यात कौस्तुभ मणी, कंबरेला पितांबर .. त्यावर रत्नजडीत मेखला.. पायात चांदीचे तोडे.. असे हे सावळे रूप बघता बघता चौथर्यावरून उतरून .. दार उघडुन बाहेरही आले. ...अन् आता पायऱ्यांवरून उड्या मारत तो ही यांच्यात सामील झाला.
कल्पना करा... ते साक्षात परब्रम्ह असे पायऱ्यांवरून पीतांबराच्या निऱ्या सांभाळत उड्या मारत खाली येतंय.. काय दृश्य असेल ते! आणि उपस्थित सर्वांच्या आनंदाला, उत्साहाला उधाण आले. काय गडबड झाली म्हणून श्रीमहाराजांनी योगसमाधीतून डोळे उघडले आणि आता मात्र महाराजांना राहवले गेले नाही. प्रसन्न मुद्रेने आपल्या योगसमाधीतून बाहेर आले आहेत.
कृष्णाने त्यांच्या हाताला धरून फुगडी खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला एका हाताची, नंतर दोन हातांची केव्हा झाली समजले ही नाही. आसमंतात सगळीकडे उल्हास भरून राहिला आहे. आणि एक क्षण असा आला हा कान्हा प्रत्येकाबरोबर फुगडी खेळतांना दिसू लागला आहे. प्रत्येकाला वाटते आहे.. माझ्यासोबत हे लडिवाळ रूपच आहे.
बरं, याने अशी काय जादू केली की इथे दुसरा पुरुष कोणी नाहीच. सगळ्याच गोपी. आणि खाली पाहावे तर पावले मात्र एकाचीच दिसत आहेत.
महाराज तर आज महाराज राहिलेच नाही. त्यांना आनंदाचे भरते आलेय. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत आहेत. सर्वत्र प्रेमाचा पूर वाहतोय. गिरकी घेता घेता जरा जोरात फुगडी झाली की महाराज, सद्गदित स्वरात म्हणत आहेत," अरे कान्हा, अरे घननीळा, अरे शामसुंदरा... हळू रे जरा.. केवढी जोरात गिरकी घेतोय! आता काय म्हणावे, या नटखट कान्हाला! बघ, तुझा शेला सुटला रे... मुकुट सांभाळ हो, तिरपा होतोय. आणि समोरून? समोरून फक्त निरागस बालकाच्या खळखळून हसण्याचा आवाज!
आता 'गोविंद राधे गोविंद" टिपेला सुर पोहचला आहे. सगळे जण त्या श्रीहरीच्या भोवती नाचू लागले. हसत खेळत कंबरेवर हात ठेऊन उंच उंच उड्या मारत आहेत.
शेवटी खूप खूप मनसोक्त खेळून दमलेला कान्हा हळूच आपल्या शेल्याने चेहऱ्यावर आलेले घर्मबिंदू पुसत खाली बसतो. सगळे अवतीभवती कोंडाळे करून बसतात.
महाराज गुडघ्यावर हात ठेवून उठतात आणि म्हणतात, "कान्होबा, आता सर्वांनी नाश्ता करा बरं.. माझ्या बुवाला सांगतो तुम्हाला चुरमा लाडू आणि दूध काला द्यायला.
त्याच्या हातचे चूरमा लाडू खाऊन तर बघा... उगाच नाही ही त्यांना लाडू बुवा म्हणत!"
बुवा लगोलग प्रसाद बनवायला घेतात. अवघ्या काही वेळातच प्रसादाची पाने येतात. आज सर्वांनी समाधी मंदिरातच बसून प्रसाद घ्या बरं!
सगळे गोलाकार बसतात.. केळीच्या पानावर द्रोणामध्ये दूध काला, केळी, लाडू वाढायला महाराज स्वतः जातीने उभे आहेत. ब्रम्हानंद बुवांनी आणलेल्या कढईतून प्रसाद वाटत आहेत.
आणि कान्होबा? तो तर विचारूच नका..
दामा, सुदामा, श्रीदामा, वसुदामा, किंकिणी, सुबल, या सगळ्या बालपणीच्या सवंगड्यांमधे इतका रंगलाय कि समोर काय वाढलेय तिकडे लक्ष नाहीये. महाराज हळूच त्याच्या पानाजवळ येतात," आता थोरले राम मंदिरात जायचंय बरं आपल्याला..तिथे रंग खेळायचेत ना? थोरले रामराया केव्हापासून तुमची वाट बघत आहेत. लवकर लवकर आटपा.." म्हणत महाराज स्वतः कान्हाला घास भरवत आहेत. कान्होबा आता शहाण्यासारखं मान डोलवत खातोय. मनापासून आवडलाय त्याला दूध काला आणि चुरमा लाडू.आणखी मागून मागून घेतोय. आता समाधानाने पोटावर हात फिरवत हात धुवायला उठतो. श्रीमहाराज, स्वतः त्याच्या हातावर पाणी टाकायला उभे राहतात.
कान्हा त्याचा सुंदर, नाजूक फुगीर गुलाबी तळहात पुढे करतो.. महाराज हळुवारपणे त्याचे हात धुवून देतात आणि त्यांच्याच धोतराच्या सोग्याने त्याचे हात, नाजूक जिवणी पुसून देतात.
सगळे जण समाधी मंदिराच्या बाहेर निघत नाहीत तोवर राधामाई तिच्या ललिता, विशाखा, चंपकलता, इंदूलेखा आदी सख्यांसह पहिल्या प्रवेशद्वारावर पोहचली आहे, अशी वर्दी येते. मग काय कान्हा अपार आनंदाने नाचू लागतो. महाराज स्वतः ब्रम्हानंद बुवा, रामानंद ,आनंदसागर , भाऊसाहेब महाराज, प्रल्हाद महाराज आपापल्या मंडळींना घेऊन स्वागतासाठी निघालेले आहेत. आलेल्या समस्त स्त्रीवर्गाला, आईसाहेब, जिजीमाय आणि गोंदवल्यातील स्त्रियांकडून ओवाळण्यात येते. हारतुरे घालून वाजत गाजत राधाराणी आत येतात. त्यांना स्थानापन्न करून ब्रम्हानंद बुवा सर्वांना गोड केशर गुलाबअर्क मिश्रीत थंडगार दूध देतात. . अरेच्चा पण या सर्वांचा केंद्रबिंदू कान्हा कुठे आहे? तो तर केव्हाच या मंडळीतून सटकलेला असतो. त्याला आता राधाराणीची गंमत करण्याची लहर आलेली असते. . हळूच आपल्या सवंगड्यांना विविध रंगाच्या बादल्या भरायला सांगून स्वतः मात्र तिला चकवण्यासाठी कान्हा गोशाळेत गाईंना भेटायला गेलेला असतो. जाता जाता, तुळशी वृंदावनातून दोन तीन मंजिरी खुडून केसात लावायला विसरत नाही. राधाराणी आल्या आल्या सर्वांना त्याचा ठावठिकाणा विचारते. कुठे लपला बरं हा?म्हणून सखयांसहित शोधायला सुरुवात करते. स्वागतकक्ष कार्यालय, पुस्तक विक्री केंद्र, कोठीघर, अन्नपूर्णा स्वयंपाकघर, ब्रम्हानंद मंडप, चिंतामणी, प्रल्हाद, आनंदसागर सगळ्या सगळ्या इमारती बघून झाल्या. सगळीकडे एकच शोध सुरु होतो. अगदी तिकडे सांडव्यावरचे ग्रंथालय, आनंदसागर, रामानंदांचे समाधीस्थळ ही पाहून झाले. शेवटी थकून राधामाई आपल्या गोऱ्या गुलाबी कपाळावरचा घाम पुसत आईसाहेब मंडपात येऊन बसलेली आहे.
आणि तेवढ्यात...हो तेवढ्यात, बासरीचे मंजुळ सूर गोशाळेकडून येऊ लागतात.
श्रीमहाराज तिला हसत हसत गोशाळेकडे बघून नजरेनेच खुणावतात. कान्हा या गोधनाशिवाय राहू शकेल काय?
सगळे त्याच्या ओढीने तिकडे धाव घेतात. तर कान्हा आपला गाईंच्या घोळक्यात तल्लीन होऊन एक पाय दुसऱ्यावर टाकून बासरी वाजवत उभा आहे. सगळ्या गायी त्याच्याकडून लाड करवून घेत आहेत. आता बासरी पुन्हा कंबरेच्या शेल्यात खोचून तो गायिंवरून मायेने हात फिरवतोय .
आता राधामाईला हि त्याची गंमत करण्याची लहर येते. गुपचूप मागून जाऊन ती त्याचे डोळे झाकते. तिचे हात काढत, हसत हसत हा नटवर हसत हसत तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो," ए वेडाबाई,तुला काय आज ओळखतो मी? युगानुयुगे आपण सोबत आहोत. तू चौकात असतांना तुझ्या नुपूरांच्या आवाजानेच मी ओळखले होते की माझी राधा येतेय. माझ्याशिवाय कशी राहू शकशील तू?' दोघेही खळखळून हसतात.
अरे, बाहेर मंडळी आपली वाट बघत आहेत. असे म्हणत राधा त्याला हाताला धरून ओढतच बाहेर आणते.
आणि अचानक सर्व बाजूंनी पिचकाऱ्यानी रंगाच्या पाण्याची बरसात आणि रंगांची उधळण त्यांच्यावर सुरु होते. कान्हाचे सवंगडी सर्वांवर पाण्याचा मारा करत आहेत. आता सगळी सूत्र कान्हा हातात घेतो. आणि एक पिचकारी घेऊन राधेच्या मागे पळू लागतो. राधा पूर्ण परिसरात पळतेय ..तिच्यामागे पिचकारी घेऊन कान्हा. .. अगदी विहंगम दृश्य. शेवटी कान्हा राधेला भिजवतोच. राधा डोळ्यात गेलेले पाणी पुसत लटक्या रागाने बघते. तेव्हा तिच्या नकळत कान्हा पुन्हा सप्तरंगांची उधळण करतो.
आणि संपूर्ण आसमंत या सप्तरंगाने भरभरून जातोय. आता प्रत्येक बादलीजवळ कान्हा आणि सवंगडी उभे राहून पिचकारी घेऊन तयार आहेत.
श्रीमहाराज आणि मंडळी सर्वांना विचारण्यात येत, कोणाला कुठला रंग हवा. कोणी हिरवा, कोणी पिवळा तर कोणी निळा,,,, आपापला आवडता रंग सांगतेय. आणि त्या त्या रंगाच्या पिचकार्यानी चहूबाजूंनी त्यांच्यावर मारा करण्यात येतोय.
श्रीमहाजांची पाळी येते. महाराज म्हणतात," हे काय विचारणे झाले कान्होबा? तुझ्याच रंगात रंगू दे म्हणजे झालं. आणि असा रंग लागू दे कि या जन्मात काय सृष्टीच्या अखेरस्तोवर निघणार नाही." कान्हा हातातली पिचकारी टाकून श्रींना घट्ट मिठी मारतो, हेच उत्तर कान्हाला अपेक्षित होते ना?
सगळे रंग खेळून दमलेले आहेत. श्रीमहाराज सर्वांना नवीन वस्त्र, दागदागिने घालण्यास देतात.सालंकृत तयार होऊन थोरले रामाच्या आमंत्रणाला मान देऊन तिथे भोजन प्रसादाला जायचं आहे ना!
ब्रम्हानंद बुवांच्या या मार्गदर्शनाखाली थोरल्या राम मंदिरात भोजन प्रसादाची चोख व्यवथा लागलेली आहे.
सगळे सजून धजून निघतात आणि मोगऱ्याच्या हारांनी सजलेली पालखी येते. त्यात राधा- कृष्णाला अत्यंत आदराने बसवून, स्वतः महाराज त्या पालखीचे भोई होतात.
सूर्य चांगलाच डोक्यावर आला आहे. पायाला चटके बसत आहेत. महाराज त्याची पर्वा न करता "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात पालखी उचलतात. पण बुवांना महाराजांचा हा स्वभाव माहित आहे. त्यांनी आधीच व्यवस्था केलेली आहे. पालखी समोर पटापट पाट मांडले जातात,... मागचे उचलून पुढे ठेवले जातात.
श्रीराम जयराम जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी' च्या गजरात पालखी पुढे जातेय.
थोरले राममंदिराच्या आवारात पालखी येते.
संपूर्ण मंदिराच्या रस्त्यावर घरोघर स्त्रियांनी सुवासिक जल शिपंडून रांगोळ्या,फुलांच्या रांगोळ्या घालून परिसर सजवला आहे. आज रामरायाकडून रंग लावून घ्यायचा आहे भई!
सर्व स्त्रीपुरुष नटूनथटून मंदिरात रामाच्या दर्शनाला येत आहेत. परिसर फुलून गेलेला आहे.
आणि जरीकाठ असलेले पांढरीशुभ्र वस्त्र परिधान केलेले रामराया, सीतामाई , सिंहासनावर विराजमान आहेत.आणि आज रामाने चक्क कृष्णाचा वेश परिधान केला आहे.. डोक्यावरच्या फेट्यामधे मयूरपंख खोचलेले, चेहऱ्यावर कृष्णसारखे नटखट भाव, कंबरेला शेला,अश्या वेषात तर लक्ष्मण नेहमीप्रमाणे रामाच्या बाजूला पण थोडं मागे , अन् नेहमी समोर उभा असलेला मारुतीराया आजही तसाच नम्रपणे झुकून रामाच्या बाजूला उभा आहे.
समोर विविध रंगाची ताटे, फुलांची ताटे, मोगऱ्याच्या फुलांच्या वेण्या ठेवलेल्या आहेत.
दर्शनास येणाऱ्या प्रत्येक पुरुषास रामराया हळूच समोरच्या ताटातील रंग उचलून गालाला लावतात. काय करणार ते पडले मर्यादा पुरुषोत्तम ना!
समोर स्त्री असेल तर सीतामाई तिच्यावर फुले उधळतात आणि मोगर्याचा गजरा प्रत्येकीस भेट देत आहेत.
लक्ष्मण हातातील अत्तरदाणीने प्रत्येकावर गुलाबजल शिंपडत आहेत. सम्पुर्ण मंदिरात मोगरा, गुलाब, निशिगंध, बकुळ अश्या सुवासाचा दरवळ आहे.
श्रीमहाराज राधाकृष्णाला घेऊन येत असल्याची वर्दी आधीच रामरायाला मिळाली आहे. आज प्रथमच विष्णूचे सातवा आणि आठवा अवतार यांची कलियुगातली भेट आहे. रामाला आनंदाचे भरते आले आहे.
स्वतः रामराया सीतामाई उठून उभे राहिले आहेत.
रस्त्यापासून मंदिरापर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. राधा-कृष्ण हातात हात घालून हळुवारपणे पावले टाकत त्यावरून येतात. मंदिरात प्रवेशकर्ते झाल्याबरोबर तुतार्यांच्या आवाजाने त्यांचे स्वागत केले जाते .. आणि हसत हसत सीतामाई, रामराया सामोरे येतात. चौघांची गळामिठी होते. हे अभूतपूर्व दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावतात.
कान्हाचा गालगुच्चे घेऊन रामराया मोठ्या भावाप्रमाणे ( हो मोठ्या भावाप्रमाणेच - सातवा अवतार ना!) , इतकी युगे गेल्यावर कलियुगात , गोंदवल्यात भेटायची तुझी ईच्छा होती, होय ना रे कान्हा? कान्हा हसत हसत त्यांचे बोट धरून चालू लागतो. कान्हाला हाताला धरून सिंहासनावर ते आपल्याजवळ बसवतात. सीतामाईही राधेला आपल्या शेजारी बसवतात.
रामराया कान्हाच्या गालाला हळुवारपणे गुलाबी रंगाने बोटे उमटवतात. तर सीतामाई राधेच्या केसात गजरा माळते.. हे दृश्य पाहून सगळेच सद्गदित होतात. श्रीमहाराजांनी तर यांना कुठे ठेवू न कुठे नको असे झालेय!
पाद्यपुजनाची तयारी होते. रत्नजडीत चौरंग मांडले जातात.. त्यात सुवर्णपात्र ठेवून महाराज आईसाहेबांसोबत सपत्नीक एकेकाचे चरण अलगद पात्रात ठेवून हळुवारपणे आधी शुद्ध जलाने, धुत आहेत. हळुवारपणे आपल्याच कफनीला पुसून परत पाय ठेवण्याच्या , रेशमी कपडा असलेल्या मंचावर ठेवत आहेत. नंतर दूध ,पंचामृत व इतर सुगंधी द्रव्याने सिद्ध केलेल्या जलाने
श्रीमहाराज आणि मंडळी या चौघांचे चरण प्रक्षालन करत आहेत.
फार हृद्य सोहळा आहे हा! हे पाहताना आपण आपल्याही नकळत डोळ्याच्या कडेला जमा झालेले पाणी पुसून घेतोय.
समोर बसलेले चौघेही अत्यंत प्रेमाने श्रींची ही लगबग बघत आहेत तर प्रेमातिशयाने श्रींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
आता श्रींनी चौघांच्या चरणायुगुलावर सुवासिक चंदनाने स्वस्तिक काढले आहे,त्यावर हळदीकुंकु वाहिले आहे. सोनचाफाची फुले वाहिली आहेत. आणि आता श्री महाराज सर्वांपुढे लोटांगण घालत आहेत.
सभोवताली असलेली सगळी मंडळीही नमस्कार करत आहेत.
आतून महाराजांचे लाडके ब्रम्हानंद बुवांनी स्वयंपाकघरातून भोजन प्रसाद तयार असल्याची वर्दी दिली आहे.. पाठोपाठ सुग्रास अन्नपदार्थांचे सुवास दरवळू लागला आहे. पाने, पाट पाणी मांडले जाऊ लागले आहे.. समया, अगरबत्ती, पानाभोवती रांगोळ्यांनी सगळे भोजनगृह सजले आहे.
काय काय आहे आज भोजनाला?
सुवासिक आंबेमोहर तांदुळाचां भात, वरती पिवळे धम्मक वरण, वरून साजूक तुपाची धार, काजू घालून केलेला मसाले भात,दहीभात, पिस्ता, बदाम, घालून केलेली गव्हाची खीर , पुरणाचे कडबु, बिरड्याची उसळ,कोशिंबीर, मिरचीचे पंचामृत,दहीवडे , बेसन लाडू , गुलाबजाम, जिलेबी, घेवर, मैसुरपाक, मालपुवा, अमसूलाचे सार... अन् अजून काय काय!आज बुवांच्या पाककौशल्याला विलक्षण बहर आलेला आहे.
श्रीमहाराज सर्वांना आग्रहाने एकेकाला हाताला धरून आणून बसवत आहेत.
"जय जय श्रीराम, जय जय श्रीराम " च्या जयघोषात वाढपी वाढत आहेत. अन् वदनी कवळ घेता.. सुरू होते!श्लोक संपल्यावर सगळे भोजनास सुरुवात करतात. स्वतः महाराज बेसनलाडू घेऊन तर बुवा कडबू घेऊन एकेकाला आग्रहाने वाढत आहेत.बुवा मागोमाग कडबुवर साजूक तुपाची धार सोडत आहेत.
रामराया सीतामाई, राधा कृष्ण सगळे हास्यविनोद करत भोजनाचा आस्वाद घेत आहेत. सर्व कसे तृप्त तृप्त दिसत आहेत! पंक्तीवर पंक्ती उठल्या!
भोजन आटोपले, रामराया कान्हा विडा चघळत शतपावली करत आहेत, तर सीतामाई, राधामाई तक्क्यालोडला टेकून एकमेकींचे क्षेमकुशल पुसण्यात व्यग्र!
आता राहिलेली मंडळी भोजनाला बसली.
श्रीमहाराज आणि बुवा अजून जेवले नाहीत बरं! अगदी शेवटची व्यक्ती जेवेपर्यंत महाराज कसे जेवतिल?
तरीही बुवांनी महाराजांना या पंक्तीला जेवायला बळजबरी बसवलेच!
श्रींचे जेवण ते किती! थोडफार खाऊन महाराज उठतात. या चौघांच्या वामकूक्षीची व्यवस्था लावायला हवी ना?
श्रींच्या शयनकक्षात रामराया अन् कान्हाची व्यवस्था होते. तर आईसाहेबांच्या शयनकक्षात सीतामाई, राधामैय्याची!
महाराज स्वतः जातीने लक्ष घालत आहेत.
रघुराई, कान्हा दोघे डाव्या कुशीवर पहुडतात.. अन् महाराज हळूच कक्षात प्रवेश करतात. हळुवारपणे रामाच्या अन् कृष्णाच्या पायाला तेल लावून चोळत आहेत.
"देवा, किती खेळलात आज.. पाय दुखले ना! " असे मनोमन पुटपुटत दोघांना झोप लागेस्तोवर महाराज तिथे बसून आहेत. मग अलगद त्यांचे पाय खाली ठेवून, दरवाजा बंद करून बाहेर येतात.
महाराज बाहेर येऊन मंदिरात ठेवलेल्या त्यांच्या कोचावर बसतात. आज त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान विलसते आहे.
या सर्वात आपण कुठे आहोत? आपण त्यांच्या पायाशी बसून हे सगळ 'याची देही याची डोळा' बघायला मिळाल्याच्या आनंदात... महाराजांचे आभार मानत... त्यांच्या पायावर डोके ठेवतो. अन् आपल्या डोक्याला श्रींच्या हाताचा स्पर्श जाणवतो. सद्गदित होत महाराज म्हणतात, "सतत रामनाम घे हो बाळ! नामाला घट्ट धरून ठेव. नामच तुम्हाला तारून नेणारे आहे, तुम्ही नाम घ्या... मी तुमचा हात रामाच्या हातात नेऊन देईन! "
... आणि तेवढ्यात दुरून समाधी मंदिरातून कानावर शब्द येतात, "ओम विश्वं विष्णूर्वशटकारो भूत भव्यभवतप्रभू... "
अरेच्चा, समाधी मंदिरात संध्याकाळी साडेचार वाजेचे विष्णूसहस्त्रनाम सुरू झाले वाटतं!
...किती वेळपासून आपण इथ समाधी मंदिरात बसलो आहोत कुणास ठाऊक!!
********
थोडे संदर्भ इकडे तिकडे झाले असतील... पण जे मनात आलं ते उतरवत गेले!
प्रतिक्रिया
4 Apr 2024 - 10:58 am | diggi12
सुंदर
4 Apr 2024 - 11:14 pm | राजेंद्र मेहेंदळे
मानसपूजा याहुन काय वेगळी असते हो? तुम्ही तिथे बसुन केली आणि आम्ही ईथे बसुन सगळे अनुभवले तुमच्या नजरेतुन. गोविंद राधे गोविंद!!
17 Apr 2024 - 11:22 am | आर्या१२३
मन:पूर्वक धन्यवाद लोकहो!! ___/\___