संगीत प्र(या)वास

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जनातलं, मनातलं
4 Oct 2023 - 11:24 pm

अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा.

माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो.

प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले. लगेच "मी 'असुर' आहे" असा विनोद केला तर तो फार बाळबोध ठरेल असं मला वाटतं. (तसं एकदा बाळासाहेब ठाकऱ्यांनी लता मंगेशकरच्या 'शिवउद्योगसेने'साठी केलेल्या कार्यक्रमात म्हटलं होतं असं आठवतंय. त्यांना ते शोभून दिसलं होतं.)

सूर गवसण्याआधी 'सूर किती असतात?' हा प्रश्नच अनेक वेळा भाव खाऊन गेलेला मला आठवतोय. माझ्या गाण्याच्या पहिल्या 'क्लासा'त मला (आणि इतरांना) 'सा रे ग म प ध नि सां' पंचवीस-तीस वेळा घोकायला लावल्यावर आमच्या शिक्षकांनी विचारलं होतं -'सांगा - सूर किती?'माझी लगेच हात वर करायची सवय मला नडली होती. मी 'आठ' म्हटल्यावर माझं उत्तर कसं चुकीचं आहे, वरचा 'सां' हा खालचाच 'सा' कसा 'वर' म्हटलेला आहे आणि त्यामुळे सूर सातच आहेत, वगैरे गोष्टींची माझ्या ज्ञानात भर पडली होती.

यानंतर काही वर्षांनी आम्ही घर (आणि संगीत विद्यालय) बदलल्यावर पुन: नवीन ठिकाणी 'सा रे ग म...' घोकायला लागलो होतो. पुन: शिक्षकांनी हाच प्रश्न विचारला होता.'सात' या माझ्या उत्तराला ते फक्त हसले होते. 'बारा' या उत्तरात कसे सगळे एका आवर्तनातले कोमल, शुद्ध आणि तीव्र स्वर येतात आणि त्यामुळे तेच उत्तर कसं बरोबर आहे हे मला आता कळलं होतं.थोडक्यात, संगीतात आपली काही प्रॉपर्टी करायची असेल तर हा या सात-बाराचा (चढ-) उताराच कामी येईल अशी माझी धारणा या गुरुजनांनी करून दिली होती. अर्थात, साध्या प्रॉपर्टीसाठी कर्ज मिळतं. इथे खर्जापासून वर सगळं मुद्दल आपल्यालाच उभं करायला लागतं हा एक दोघांतला मोठा फरक.

शास्त्रीय संगीतापासून सुरुवात करुया. त्याच्या गतीचा 'अगतिक' या शब्दाशी काही संबंध नाही, हेही मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. खरं तर असे अनेक खुलासे करणं भाग आहे.

माझ्या दृष्टीनं काही शास्त्रीय विधानं:

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं.

माझ्या दृष्टीनं काही अशास्त्रीय विधानं:

१. मला शास्त्रीय संगीत आवडतं. इतर संगीत अशास्त्रीय आहे आणि/अथवा अमानुष आहे.

२. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि कळतंही. ज्यांना ते कळत नाही त्यांची करायचीच तर फक्त कीव करावी.

३. मला शास्त्रीय संगीत आवडतं, कळतं, आणि शिवाय त्याविषयी बोलायलाही आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं.

४. मला शास्त्रीय संगीत आवडतं आणि (कळत नसलं तरी) त्याविषयी बोलायला आवडतं. मी किती उच्च आहे हे त्यावरून सिद्ध होतं.

वास्तविक वर दिलेल्या विधानांमधे 'कळणं' ह्या ठिकाणी 'कळतंय असा समज असणं' अशीही एक उपश्रेणी टाकायला हवी. एकंदरित या विधानांमधे शास्त्रीय संगीत याऐवजी वारुणी ('तू वाइन पीत नाहीस? कंबख्त तू ने तो ...'), गाडी ('अरे जर्मन गाड्या म्हणजे...'), मोबाइल फोन ('आय-फोनची सर...') अशा अनेक गोष्टी घालता येतील. मला शास्त्रीय संगीतापासून प्राप्त झालेलं सगळ्यांत महत्त्वाचं ज्ञान हे की आपल्याला काय येतंय हे दाखवण्यापेक्षा आपण ज्याच्याशी बोलतोय त्याला (किंवा तिला) काय येत नाही हे दाखवणं आत्मसात करावं. एखादा गायक 'गोरख कल्याण' म्हणायला लागला तर 'जसराजांचा ऐकलाय का?' असं विचारायचं. बागेश्री म्हणायला लागला तर 'आमिर खान' यांनी 'बागेश्री' 'कानडा' अंगानं म्हटला होता असं म्हणून त्याला नडायचं. कुणी 'येरी आली पिया बिन' म्हटलं तर किशोरी आमोणकरांनी किती वेगळं पेश केलंय हे सांगून त्याला घेरी आणायची. 'कोमल ऋषभ आसावरी तोडी' या रागाचा संपूर्ण उल्लेख करणं म्हणजे अगदीच शाळकरी. त्याला 'कोमल ऋषभ आसावरी', 'कोमल ऋषभ' (वास्तविक हा स्वर आहे) किंवा अगदी 'कोमल' हे श्रोता बघून (?!) संबोधता यायला हवं. मात्र मतमांडणी अगदी आटोपशीर असावी. अलीकडेच एकदा कुणी तरी विचारलं, 'कौशिकी चक्रवर्तीबद्दल काय मत आहे तुमचं?' - 'अगदीच नवशिकी आहे नाही?' मी इतकंच उत्तरलो. आता तो शोधत बसलाय तिला नवशिकी म्हणणाऱ्या मला किती ज्ञान आहे ते.

थोडक्यात, असं केलं म्हणजे आपली सरशी होते. अगदी नाहीच झाली, तरी 'ऐकणाऱ्याची लायकीच नव्हती' हे म्हणायला आपण मोकळे! कारण आपला विषयच महान असतो.

वास्तविक ही विधानं (पहिली चार - 'शास्त्रीय') माझ्या लेखी - कुठल्याही बाबतीत - मग ते मासे असोत की वांगं, क्रिकेट असो की कबड्डी (केवळ गोल्फ किंवा स्नूकर असायची गरज नाही) - लागू पडायला हवीत. संगीताबद्दलच म्हणायचं झालं तर कुठल्याही प्रकारच्या संगीताला (मग ते एकविसाव्या शतकातलं 'बॉलिवूड'चं असो की एकोणिसाव्या शतकातलं नाट्यसंगीत असो) समाविष्ट करणारी असावीत. पण तसं होत नाही, हे खरं.

शिवाय शास्त्रीय संगीतात भ्रमण करण्यासाठी - मग ते श्रोता म्हणून जरी असलं तरी - आपल्याला एक अतिप्रचंड शब्दकोशच शिकायला लागतो. राग किंवा तालांची नावं जाऊ देत. मी फक्त बाकीच्याच शब्दांबद्दल बोलतोय. त्यांची तुलना मला लग्न या आयुष्यातल्या घटनेच्या वेळी जे शब्द आत्मसात करायला लागतात त्यांच्याशीच करता येईल असं वाटतं. एक समजा 'ब' हे अक्षर घेतलं, तर बस्ता, बायको, बाशिंग, बिदाई, बोहला असे अनेक शब्द प्रथम अनुभवायला मिळतात. दुसरं एखादं - समजा - 'म' हे अक्षर घेतलं, तर मधुचंद्र, मानपान, मिरवणे, मंगळाष्टक, मंगळ, मंगळसूत्र, मुंडावळ्या असे अनेक शब्द आपल्या पदरी पडू शकतात. हे शब्द मी बाराखडीच्या क्रमानं (ब/बा/बि/बी...इ. किंवा म/मा/मि/मी... इ.) लिहिले आहेत, घटनाक्रमानं नाहीत, हे अजून एक स्पष्टीकरण. मिरवणूक जरी इतरत्र निघत असली (उदा. गणपतीची, नेत्याची) तरी मिरवण्यासाठी लग्नच (शक्यतो दुसऱ्याचं) हवं. याव्यतिरिक्त अंतरपाट, करवली, केळवण, रुखवत, सप्तपदी, हुंडा असे कित्येक शब्द, आणि 'स्थळ सांगून येणे', 'सूप वाजणे', असे अनेक वाक्प्रचार आपल्याला आत्मसात करायला मिळतात. एवढं झालं तरच लग्नसोहळा ही काय चीज आहे हे कळू शकतं.

'लग्नाच्या साड्या घेतल्या का?' असं म्हणणं चुकीचं आहे, तिथे 'बस्ता'च हवा. तसंच शास्त्रीय संगीतात. इथे 'काल गायकानं कोणतं गाणं म्हटलं?' हा प्रश्न चुकीचा ठरतो. 'काल बुवांनी कोणती बंदिश म्हटली?' असंच म्हणायला हवं. चिज, गत (ही आपली होणारी अवस्था नसते) हे शब्द अवगत नसले तर इथे काम महाकठिण.

मला घराणी ओळखता येत नाहीत. 'किराणा' घराणं हे मारवाड्यांचं असतं अशी माझी लहानपणीच पक्की समजूत झाली होती. ते शास्त्रीय संगीतातल्या घराण्याचं नाव आहे असं कळल्यावर 'गेला बाजार आता भेंडीबाजार हेही कुणी घराण्याचं नाव म्हणेल' असं मी म्हटलं होतं. त्यावर 'आहेच मुळी!' असं उत्तरही मिळालं होतं! शिवाय लता मंगेशकर याच घराण्याची आहे हेही कळलं होतं. गुलाम अली पतियाळा घराण्याचे आहेत हे पुढे माझ्या माहितीत जमा झालं आणि शास्त्रीय संगीताचं आणि सध्याच्या भूगोलाचं फारसं बरं नसावं हे लक्षात आलं. ग्वाल्हेर घराणं शिंद्यांचं आणि इंदूर घराणं होळकरांचं असं इतिहासात वाचलं होतं. त्यातून मग संगीताचा आणि इतिहासाचाही काही संबंध नसतो असं मी अनुमान काढलं. ..आणि त्यावर 'शास्त्रीय संगीताइतकं पारंपरिक आणि अभिजात दुसरं काही नाहीये' असं ऐकून घेतलं. मी या अशा शब्दांना जाम घाबरतो. हे असे शब्द आले, की त्यापुढे लगेच त्या सगळ्यांचा संस्कृतीशी संबंध लावला जातो. मग तिच्या रक्षणाची जबाबदारी आपण कशी घेत नाही हे स्पष्ट केलं जातं.

मला राग येत नाही, असं नाही. (इथे मी परिच्छेद बदलला आहे. यावरून या रागाचा संस्कृतीरक्षणाशी संबंध नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल.. .की आहे? ) शालेय अभ्यासक्रमाच्या जोडीनं छंद म्हणून शिकायच्या(!) काही गोष्टी आपल्या नशिबात येतात. पोहणे, गाण्याचा क्लास लावणे इत्यादी. (माझ्या गाण्याचा आणि क्लास या शब्दाचा संबंध एवढाच काय तो आला.) पण त्या क्लासात मी काही लक्षणगीतं आणि चिजा शिकलो होतो. ओडव, षाडव वगैरे शब्दांनी डोक्यात तांडव केलं होतं. सम, काल (किंवा खाली - मग सम 'वर' का नाही?) या शब्दांपासून पलटे, आलाप, ताना, बोलताना, गत (हा शब्द पुन: आला - तो आपली अवस्था दर्शविणारा नाहीये) अशा अनेक गोष्टी अवगत व्हायला हव्यात, तरच आपली धडगत आहे हे कळून चुकलं.

रागांची नावं हा तर अजून अचाट प्रकार आहे. 'मधमाद सारंग' असं नाव असलेल्या रागात 'ध' वर्ज्य असतो हे शिकताना मला धक्का बसला होता. मग त्याला म आणि ध या दोन्हींचा माद का म्हणायचं असा माझा प्रश्न होता. कुणीतरी मध्येच रागातल्या 'ध' चा 'म' करून नाव बदलण्याआधीच गारद झाला असेल आणि बाकीचे विशारद तसंच गात बसले असतील, असं त्यावर मग मी संशोधनही केलं होतं! सारंगच्या शुद्धीकरणात 'ध'ची भर घालण्याचं महत्कार्य पूर्वीच झालेलं आहे हे मला मागाहून कळलं. बागेश्री आणि भीमपलास अशी नावं असलेल्या रागांचे सूर सारखेच असतात (फक्त चलन वेगळं असतं) हेही त्याच काळातलं अध्ययन. एकंदरित काय, संगीत आणि जीवन या दोन्हींत, चलन जास्त महत्त्वाचं हा उपयुक्त धडा मात्र मला या प्रसंगांतून मिळाला होता.

बागेश्रीला रागेश्री नावाची एक जुळी बहीण आहे. बागेश्रीतल्या कोमल 'ग'चा रागेश्रीत शुद्ध 'ग' होतो. दोघी निशाचर. एक नुसताच श्री नावाचाही राग आहे. पण या नुसत्याच श्रीचे स्वर खूपच निराळे. तो संध्याकाळचा गंभीर राग. त्यामुळे राग पटकन ओळखता नाही आला तर 'कुठला तरी श्री' असेल असं सांगायची सोय नाही. बागेश्री आणि रागेश्रीत माझा नेहमी गोंधळ व्हायचा. बागेश्रीतली 'कौन करत तोरी बिनती पियरवा' ही चिज आणि रागेश्रीतलं 'कौन आया मेरे मन के द्वारे' हे गीत यांनी माझ्या चंचल बालमनात फारच चलबिचल केली होती. बरं दोन्ही गाण्यांचा अर्थही पूर्ण निराळा. एकात 'पिया'ची बोळवण तर दुसऱ्यात प्रियेची आळवणी!

कंसातल्या रागांचं मात्र असं नसतं. तिथे 'कंस अंगाचा राग आहे' हे वाक्य टाकायला मुभा असते. मग त्या कंसांत माल, मधु, चंद्र, गुण दडपता येतात. एवढंच नाही तर हरि, जय इत्यादी नावं आणि जोग वगैरे आडनावंसुद्धा!

किशोरकुमारनं (आणि अन्नू मलिकनंही) संगीताचं शिक्षणच घेतलं नव्हतं अशी चर्चा अनेकदा होत असते. इतकी की असं काही शिक्षण न घेताच गाणं आलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. आता संगीत न येता 'भोले नीचे से' असं तो सुनील दत्तला 'पडोसन'मध्ये कसं म्हणू शकला (पेटीवर सारेगम शिकवत असताना) आणि 'कोई हमदम ना रहा' हे झिंझोटीतल्या एका सुंदर चिजेवर आधारित गाणं कसं संगीतबद्ध करू शकला ही कोडी मला कायम पडत असत (अजूनही पडतात). त्याला राग येत नसेल कदाचित, पण संगीत नक्कीच येत होतं हे माझं अनुमान मात्र अजून अनेकांना पटलं नाहीये. एखादं ज्ञान उमजत नसलं की ते उपजत असतं असं म्हणायचं मी यातूनच शिकलो. त्यामुळे जगात मात्र आपली सोय होते फार. 'मला स्वयंपाकातलं काही कळत नाही, ते ज्ञान उपजतच असावं लागतं', 'मला कुठलाही खेळ येत नाही कारण माझ्या जीन्समधेच तो नाहीये' वगैरे वाक्यं आपल्याला आरामात टाकता येतात. या सगळ्यातून झालेलं सर्वांत मोठं ज्ञानार्जन म्हणजे, 'मला संगीतातलं कळतं' आणि 'मला संगीतातलं काही कळत नाही' या दोन्ही वाक्यांना जगात सारखाच मान आहे या गोष्टीची जाणीव. फक्त कोणतं वाक्य कोणासमोर बोलायचं एवढे उपचार समजले की 'उरलो उपकारापुरता' ह्या नीतीनं फक्त गाण्याचा निर्भेळ आनंद घेता येतो!

हा साक्षात्कार झाला आणि तो सांगावासा वाटला म्हणून हे प्रयोजन. आता माझं ऐकायचं आणि बोलायचं संगीत मी वेगळं केलंय...!

- कुमार जावडेकर

कथाविनोदविचारआस्वादसमीक्षालेखअनुभवमतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

लेखी साक्षात्कार आवडला.
स्वर सात बारा असले तरी आमच्या लेखी अक्षरे आहेत,ऐकू येत नाहीत.
काही गायक बरे गातात एवढं मात्र कळतं. भजनं,आरत्या शा. गायकांपेक्षा साधे गायकच चांगले म्हणतात . ते त्यामध्ये भाव आणतात गायकी ताना घुसडत नाहीत.

मला अनेक वर्षे शास्त्रीय संगीत ऐकताना कानांना गोड वाटे. बुवांकडून एखादी चूक झाली तर ती जाणवे. परंतु संगीताची परिभाषा अगम्यच राहिली. अलीकडे पं. सत्यशील देशपांडे यांचे काही व्हिडीओ युट्युबवर पाहिले/ऐकले, त्यातून हळूहळू गाण्याच्या मागचे शास्त्र आणि गायकाची मनस्थिती समजली. अशी काही समजून घेण्यासाठी सुंदर साधने अजून असतील तर पुढच्या भागात जरूर सांगावीत.

कुमार जावडेकर's picture

7 Oct 2023 - 4:37 pm | कुमार जावडेकर

धन्यवाद!
सत्यशील देशपांड्यांचं 'गाणगुणगान' हे पुस्तक हल्लीच वाचलं. सुंदर आहे, युट्यूबचे बरेच दुवे त्यांनी दिले आहेत.
- कुमार

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Oct 2023 - 2:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोपरखळ्या मारत केलेले लेखन आवडले. संगीत हा मोठा समुद्र आहे. खुद्द भीमसेनजी एका मुलाखतीत म्हणाले होते (बहुतेक मुव्हर्स अँड शेखर्स मधे) की संगीत ईतके प्रचंड आहे की एखाद्या गवयाचे पूर्ण आयुष्य १०-१२ राग शिकण्यात आणि नीट सादर करण्यात निघुन जाते.

त्यामुळे 'मला संगीतातलं काही कळत नाही' हे माझ्या दृष्टीने सुरक्षित वाक्य आहे.

आता वेगवेगळ्या रागांवर आणि गाण्याच्या प्रकारांवर (उदा. ठुमरी,कजरी,होरी,टप्पा,ख्याल्,ध्रुपद्,धमार झालेच तर गण्,गौळण्,नांदी,भजन,वग,किर्तन्,भारुड,पोवाडा) येउंद्या.

आज ( ६ ओक्टोबर,दुपारी चार) झी मराठी चानेल, सारेगमप कार्यक्रम - देवांश भाटे(६) एक गाणं आणि शिवतांडव स्तोत्र कीबोर्डवर.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Oct 2023 - 11:26 am | राजेंद्र मेहेंदळे

धड शाळेतही गेलेला नाही, पण गाण्याची समज केव्हढी

कर्नलतपस्वी's picture

7 Oct 2023 - 10:08 am | कर्नलतपस्वी

सात बाराची कोटी आवडली.
आम्हीं फक्त कानसेन.

नठ्यारा's picture

7 Oct 2023 - 8:23 pm | नठ्यारा

बाळासाहेब जर असुर असतील तर मी संगीतातला बेसूर असून माझी ( बेसुरी ) महत्त्वाकांक्षा भेसूर बनावयची आहे. खंत इतकीच की त्यात शास्त्रीय भेसूर असा वर्ग उपलब्ध नाही. पण प्रयत्न केल्यास कदाचित गवसेल. एकंदरीत या प्रांतीही अफाट मेहनत केल्याविना गत्यंतर नाही. मला कोणी मदत करेल काय?

- नाठाळ नठ्या