"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला"
-- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन"
-- पण मी त्याला म्हणालो की पळ बावळ्या, आत्ता मला खूप गाणी सुचतायत आणि मी एक मोठ्ठी कविता पण लिहीतोय, डिस्टर्ब करू नको तू आत्ता. गण्याची मोठी बहीण लेडीज सायकलवर बसून कॉलेजला जाते, आणि घरी आल्यावर चहा पिऊन नवीन घेतलेल्या मर्फी रेडियोवर मोठ्ठ्याने हिंदी पिच्चरची गाणी वाजवत चष्मा लाऊन कविता लिहीत बसते. गण्याचे बाबा कॉलेजात मराठीचे प्रोफेसर आहेत आणि त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत.
-- नंतर गण्या निघून गेल्यावर मला वाटलं की आपण त्याच्याबरोबर जायला पायजेल होतं, मंजे बेबी आणि सुम्मीला बघायला नव्हे पण फिरणं तब्ब्येतीसाठी बरं असतं, असं साने की कोणतेतरी गुरूजी म्हणायचे असं आजोबा नेहमी म्हणतात म्हणून. तसंच गण्या निघून गेला त्यावरून मला लगेच "ओ जाने वाले हो सके तो लौट के आना" आणि त्यानंतर लगेचच " आ लौट के आजा मेरे मीत" ही गाणी आवडली. तेवढ्यात आपण लिहीताना चुकून 'आवडली' असं लिहीलं हे लक्षात येऊन मग त्याच्यावर काट मारून 'आठवली' असं लिहिलं. (मला लायब्रीतून आणून ना. सी. फडक्यांचं 'प्रतिभासाधन' पुस्तक पण वाचायचंय, ते वाचल्यावर अशा चुका होणार नाहीत असं गण्याच्या चष्मेवाल्या बहिणीनं सांगितलंय)
-- तेवढ्यात आज्जी आली आणि माझा उद्योग बघून म्हणाली की "कागदाची अशी नासाडी करू नये रे बाळा" मग मी तिला म्हणालो की आज्जी मी मोठ्ठा कवी बनणारे आणि दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो पुस्तकावर छापणारे, आणि मराठीचा प्रोफेसर बनून चष्मे लावणार्या मुलींना कविता शिकवणारे" (खरं मंजे मला चष्मिष्ट मुली तश्या विषेश आवडत नाहीत, पण तेंव्हा तसंच सुचलं म्हणून म्हणालो) ... आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे.
-- तेवढ्यात आई आली आणि म्हणाली की बाबू हात धून ये, तुला आवडणारे रव्या-नारळाचे लाडू बनवलेत ते खाऊन अभ्यासाला बैस कसा. हे ऐकून मला आईचा जरा राग आला आणि आपण फुरंगटून बसावं असं वाटलं कारण मला कालच गण्यानं सांगितलं होतं की हिंदी पिच्चरमधे मुलानं काही हुशारीचं काम वगैरे केलं किंवा परिक्षेत पास वगैरे झाला की त्याला त्याची आई गाजरकाहलवा खाऊ घालते आणि म्हणते की "आज तेरे बाबूजी होते तो उनको कितनी खुशी होती" ( गण्याला त्याची चष्मेवाली बहीण कधीकधी पिच्चर दाखवायला घेऊन जाते आणि तिथे मिळणारा क्रीमरोलपण खाऊ घालते. त्याचे बाबा श्रीमंत आहेत असं गण्या सांगतो) पण मग मी विचार केला की तिनं आत्ताच गाजरकाहलवा बनवला तर मी प्रोफेसर बनल्यावर ती काय बनवेल? त्यापेक्षा तसेही आपल्याला रव्यानारळाचे लाडू आवडतातच तर मग तेच खावे की, उगाच कशाला नखरे दाखवायचे.
-- मग कविता लिहीणे थांबवून मी दोन लाडू खाल्ले मग धावत जाऊन गण्याला गाठावे असा विचार करून बाहेर आलो तर बेबी आणि सुम्मी इकडेच येताना दिसल्या म्हणून पटकन एक पुस्तक घेऊन ओट्यावर बसून अभ्यासाचे सोंग करत त्यांच्याकडे चोरून बघू लागलो तर त्या खिदळत काहीतरी बोलत निघून गेल्या पण त्यांच्या बोलण्यात मला 'गण्या' हा शब्द तेवढा स्पष्ट ऐकू आल्यावर मला गण्याचा भयंकर हेवा वाटला आणि त्याचा भयानक राग येऊन आता तो आला की त्याला जोरात गुद्दा मारून पळून जायचं ठरवून मी आत येऊन बघतो तो वहिनीच्या छोट्या बाळानं नेमकी माझ्या कवितेच्या कागदावरच मोठ्ठी शी केली होती म्हणून वहिनी तो कागद गोळा करून फेकायला निघालेली दिसली.
-- झालं, प्रोफेसर बनून चष्मेवाल्या मुलींना कविता शिकवायचं माझं स्वप्न धुळीला मिळालं होतं, आणि त्यातून बेबी आणि सुम्मी गण्यावर मरतात त्याअर्थी आपला आता प्रेमभंग पण झाला असल्याची मला खात्री पटली आणि "आंसू भरी है ये जीवन की राहे" हे गाणं आठवलं. मग प्रेमभंगाचं दु:ख विसरायला दोन लाडू आणखी खाल्ल्यावर जोरात लागली म्हणून अंगणाकडे वळलो पण तेवढ्यात लक्षात आलं की आपण 'अंगणाकडे' हा चुकीचा शब्दप्रयोग केलेला असून आपल्याला 'परसाकडे' असं म्हणायला पाहिजे होतं. तर ती चूक सुधारून मी आत जाऊन बसलो. मग त्यानंतरचं सांगणं असभ्यपणाचं वाटेल म्हणून एवढंच बोलून मी खाली बसतो.
-- आता वाचक म्हणून तुम्ही मला जोड्यानं हाणाल आणि म्हणाल, अबे साल्या येवढी बकवास केली पण धावत कोण आली आणि तिनं कुणाचा मुका घेतला हे तर सांगितलच नाहीस बे. -- तर त्याचं उत्तर असं की मित्रांबरोबर बघून आलेल्या इंग्लिश पिच्चरची ष्टोरी काल रात्री दादा वहिनीला सांगत असताना मी ते हळूच चोरून ऐकलं होतं, तेंव्हा ऐकलेलं हे वाक्य गण्याला सांगायला मी निघणार होतो, तेंव्हाचा हा प्रसंग आहे.
प्रतिक्रिया
1 Sep 2023 - 6:35 pm | Nitin Palkar
जमलाय लंपन ....
1 Sep 2023 - 6:38 pm | कुमार१
वा, मस्त !
1 Sep 2023 - 6:47 pm | अनिल हटेला
फक्कड जमलये..
शेवट येइस्तो विसरलो होतो की नेमका हा धागा कुठल्या विषयावर होता ?
पूर्न एका दमात हा लेख वाचुन झाला,
आवर्जुन प्रतिसाद देणे आले..
धन्यु...
1 Sep 2023 - 9:55 pm | शशिकांत ओक
६०, ७० दशकातील गाण्याचा गोफ, जागतिक कीर्तीच्या चित्रकारीचे रसरशीत दर्शन, डेंकालीच्या जंगलातील टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण, शेवटी रहस्याची फोडणी, झणझणीत मिसळपावची रंगत वाढवणारे धागे कसे काढावेत ते चित्रिगुप्तांकडून शिकावे!
4 Sep 2023 - 5:05 am | चित्रगुप्त
@ शशिकांत ओक- लई मंजे लईच तारीफ करता ब्वॉ तुम्ही (यावरून लगेच 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुन्हे बनाया हे गाणं सुचलं आणि त्यावरून मग.... )
'टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण' हे खासच.
2 Sep 2023 - 5:05 am | कंजूस
फारच ओघवतं झालं आहे मराठीचा अध्यापक होऊ घातलेल्या शाळकरी मुलाचे लेखन. त्या काळात आवडली,आठवली असे शब्द बोलले जात होते - 'क्रश' वगैरे दहा वर्षांपूर्वी वाढलं. म्हणजे लेखनातून काल दिसतो तो असा. कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
2 Sep 2023 - 8:05 am | चित्रगुप्त
बरोबर ओळखलेत. आधी कागदावरच लिहीले होते.
2 Sep 2023 - 8:02 am | चित्रगुप्त
काल रात्री दीड वाजता अचानक जाग आली, आणि कसे कुणास ठाऊक, "ती धावत आली आणि गच्च मिठी मारली" असे शब्द जणू कुणी कानत बोलत आहे, असा भास झाला. अश्या परिस्थितीत कविता सुचते हे अनुभवाने माहीत असल्याने लगेच उठून कागदावर ते लिहीले, तर लगेच पुढल्या ओळी सुचत गेल्या आणि झरझर लिहीत गेलो. 'चष्मावाली बहीण' हे कदाचित झोपण्यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यूट्यूबवर बघत होतो, त्यात रसिका वेंगुर्लेकरची चष्मा घातलेल्या मुलीची भूमिका होती, त्यावरून आले असावे.
-- पन्नास-साठच्या दशकातली हिंदी गाणी तर सतत मना पिंगा घालतच असतात (आणि ऐकत- बघतही असल्यामुळे, आता सॅक्सोफोनचा असा पीस येणार, आता सतार, आता कोंगो, आता बासरी ... असे सगळे माहीत असते) आणि कोणत्याही शब्दावरून सुरू होऊन गाण्यांची लडच्या लड मनात उलगडत जात असते. माझ्या यापूर्वीच्या काही लेखातही अशी गाणी आलेली आहेत.
-- तर या सगळ्या गाण्यांमुळे या कथानकाचा काळ जसा लक्षात येतो, तसाच तो 'दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो' यातून, "त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत" यातून (दोन्ही कुटुंबांच्या एकंदरित आर्थिक परिस्थितीची कल्पना देत) येत रहातो. 'वहिनीच्या बाळानं कवितेच्या कागदावर केलेली मोठ्ठी शी (डायपरपूर्व काळ), 'परसाकडे' हा आता विस्मृत झालेला शब्द, सिनेमातल्या आईने 'गाजरकाहलवा' खाऊ घालणे, वगैरेतूनही तो उलगडत जातो. अर्थात हे सगळे माझ्या लहानपणीचेच असल्याने सहजपणे सुचत गेले. मुद्दाम काही लिहावे लागले नाही.
गंमत म्हणजे "ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" याचे काय करायचे हे अगदी शेवटपर्यंत मलाही ठाऊक नव्हते, आणि अगदी शेवटला परिच्छेद लिहीतानाच ते सुचले, याचे मला आश्चर्य (आणि हुश्य) वाटले.
मोठेपणी मराठीचा प्रोफेसर होण्याची या मुलाची इच्छा 'आवडली' खोडून'आठवली' लिहीणे, 'अंगणाकडे' ऐवजी 'परसाकडे' अशी स्वतंची चूक सुधरावणे, 'प्रतिभासाधन' हे पुस्तक, यातूनही व्यक्त होते आहे, हे मला ते लिहून गेल्यावर जाणवले. 'चष्मेवाल्या' मुलींना शिकवणे' यातून चष्मेवाले विद्यार्थी बहुधा 'स्कॉलर' असतात, आपण त्यांनाही शिकवणे म्हणजे काही 'थोर कामगिरी' करणे असाही अर्थ मला नंतर उलगडला. असो.
नितीन पालकर, कुमार१,अनिल हटेला, शशिकांत ओक आणि कंजूस यांचे प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल अनेक आभार.
2 Sep 2023 - 2:25 pm | विजुभाऊ
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
4 Sep 2023 - 5:09 am | चित्रगुप्त
-- अगदी अगदी. हे चाणाक्ष वाचक असल्याने तुम्ही बरोब्बर ओळखलंय.
2 Sep 2023 - 4:11 pm | बबन ताम्बे
फर्मास बनली आहे कथा. शैली एकदम ओघवती आणि तो काळ एकदम चपखल उभा केलाय. कुमार वयातील घालमेल सुंदर चितारली आहे. आपल्याकडे जे नाही त्याची दिवा स्वप्ने बघायचा तो काळ. कथा अतिशय आवडली.
2 Sep 2023 - 5:10 pm | कंजूस
अगोदर वाटलं होतं की 'भावी' प्रोफेसरांची नात असावी.
2 Sep 2023 - 5:27 pm | विवेकपटाईत
हा! हा! हा! मस्त. बाकी आज सकाळी आरश्यात पाहिले. चेहऱ्यावर लाल लाल डाग दिसत होते. बहुतेक रात्री डंकिणी डासणीने मुके घेतले असावे. एकेकाचे नशीब.
3 Sep 2023 - 9:15 am | निमी
छान जमलय..आणि शिर्षक आकर्षक आहेच.
4 Sep 2023 - 6:50 am | कर्नलतपस्वी
दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा सहजरीत्या आंदोळताना पाहून शोभा गुर्टू यांची प्रसिद्ध बैठकीतली लावणी आठवली.
म्हणजे कसं "देहाची तीजोरी भक्तीचा ठेव " ते" पिकल्या पानाचा देठा",
https://youtu.be/vA6J2-RnRQo?si=8_LMmDX4niI5xqbY
4 Sep 2023 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा..! आवडलं.
-दिलीप बिरुटे
9 Sep 2023 - 7:23 pm | अहिरावण
>>>आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे.
हे आवडलं.
4 Sep 2023 - 5:29 pm | चौथा कोनाडा
वा, मस्त, झकास !
7 Sep 2023 - 9:33 pm | खिलजि
छोटेखानी लिखाण आवडलं तुमचं... फर्मास लीवले आहे...
20 Sep 2023 - 5:53 pm | ज्ञानोबाचे पैजार
झकास लिहिलं आहे, लै म्हणजे लैच आवड्या,
पैजारबुवा,