जे सत्य सुंदर सर्वथा....: ६. बीड ते अंबेजोगाई
१७ नोव्हेंबरची पहाट. इन्फँट इंडिया बाल गृहातून निघालो. निघताना दत्ता बारगजे जी व सर्व मुलांनी मला निरोप दिला. पहाटे लवकर उठून अगदी प्रेमाने माझ्यासाठी जेवण बनवलं! डोंगर उतरताना आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य वाटतोय! कालच्या भेटीच्या आठवणी मनात आहेत. आजही मला तुलनेने अगदी कमी दर्जाचा रस्ता लागणार आहे. आज असा तिसरा दिवस आहे जेव्हा सुरुवातीला तीस- पस्तीस किलोमीटरपर्यंत असा रस्ता असेल व नंतर चांगला रस्ता मिळेल. असा विचार करतोय किंवा अशी आशा करतोय की फक्त पस्तीस किलोमीटरपर्यंतच असा रस्ता असावा. आज सुरुवातीला मला मांजरसुंबा घाट पार करायचा आहे. डोंगर उतरून खाली हायवेला आल्यावर लगेचच घाटाचा चढ सुरू झाला. तसा छोटाच घाट आहे, पण ट्रॅफिक जाम आहे. एकदा वाटलं की अडकावं तर लागणार नाही? पण सायकल असल्यामुळे थोडा वेळ ट्रक्सच्या लाईनच्या उजवीकडून पुढे निघालो. आणि जिथे रस्ता अरुंद होता, तिथे डावीकडून रस्त्याच्या काठाने पुढे निघालो. छोटा असला तरी घाट आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त भिती पडलेल्या बारीक काचेच्या तुकड्यांची वाटली. त्यांच्यावरून सायकल चालवताना फार भिती आहे. जर घाटात सायकल पंक्चर झाली तर??.. पण असं झालं नाही. बाजूच्या छोट्या जागेतून पुढे निघालो आणि नंतर तर मंदावलेल्या ट्रक्सनाही ओव्हरटेक करत गेलो. काही मिनिटांमध्येच घाट पार झाला व मांजरसुंब्यात पहिला ब्रेक घेतला.
इथून आता अंबेजोगाईपर्यंत स्ट्रेट फॉरवर्ड रस्ता आहे- सरळ! पण... नेकनूरपर्यंत रस्ता ठीक होता. नंतर मात्र रस्ता जणू गायबच झाला. परत तीच कहाणी- उखडलेला रस्ता! आणि आता दुष्काळप्रवण भागात असल्यामुळे अगदीच रखरखीत प्रदेश. हिरवा रंग सोडून आता सगळा तपकिरी रंग आहे. अर्थात् रोजच्याप्रमाणे आजही रस्त्यावरून बाजूने जाणारे लोक माझी विचारपूस करत आहेत. काही जण तर चहा किंवा नाश्ताही करू सोबत म्हणतात. पण मला त्यांना नाही सांगावं लागतं. काही जण तर उद्धटपणे ऑर्डर दिल्यासारखेही बोलतात, थांब इथे, चहा पाजतो तुला. पण मी त्यांच्यासाठी थांबू शकत नाही. नेकनूर नंतर रस्त्याचा नूर अजिबात नेक राहिला नाही! किंबहुना रस्ताच राहिला नाही म्हणायला हवं. माझा अंदाज होता की, नेकनूरच्या पुढे पंधरा किलोमीटरवर केज असेल. पण ते आणखी तीस किलोमीटर पुढे आहे. आणि रस्ताच नाही आहे. शिवशाही बसेसना इथून जाताना बघून त्यांची दया आली! पण एक गोष्ट चांगली आहे की, पूर्वी जिथे रस्ता होता, तिथे आता नुसती माती आहे व मातीवर सायकल चालवता येते आहे. मध्ये मध्ये प्लॅस्टरही लागतंय. काही काही ठिकाणी दोन फुटी रस्त्याची पट्टी बाकी आहे. पण तिथे गेलो तर बाईकवाले मला बाजूला सरक म्हणत आहेत.
अशा घनघोर रस्त्यावर आज मला नक्कीच जास्त वेळ लागणार. कदाचित तीनही वाजतील पोहचायला. कारण ज्यांना पुढचा रस्ता विचारत होतो, ते हेच म्हणत होते की, पुढेही असाह रस्ता आहे! पंक्चरच्या भितीमुळे हळू जातोय. बिच्चारी सायकल! पण असा रस्ता किंवा अशा रस्त्याचा अभाव पुन: पुन: आठवण करून देतोय की, ज्या संस्था ह्या विषयावर काम करत आहेत, त्यांची वाटचाल किती कठीण असणार. अगदी आव्हानात्मक रस्ता! अशा वेळेस कोणाचा कॉल आला तर माझ्या रिंगटोनचं गाणं वाजतंय- तुम ना जाने किस जहाँ में खो गए! माझी तशीच अवस्था झाली आहे. पण हीच वेळ पेशन्सची आहे. चालत राहा, चालवत राहा! हळु हळु अंबेजोगाई जवळच येतंय. अशा वेळेस जवळून जाणा-या गाडीवर आवडीचं गाणं लागतं, तेव्हा दहा किलोमीटरची सोय होऊन जाते! मनातल्या मनात ते गाणं ऐकत दहा किलोमीटर सहज पार होतात! मनात गाणं ऐकल्यामुळे मनाला एक उद्योग मिळतो व जे ध्यान रस्त्याच्या खड्ड्यांकडे होतं, वेगाकडे होतं ते तिथून बाजूला होतं व थोडा आराम मिळतो. असं जात राहिलो. केजला पोहचायला इतका वेळ लागतोय की, त्याच्या आठ किलोमीटर आधीच ऊसाच्या रसापाशी दुसरा ब्रेक घेतला. मला दिलेला टिफिन इथे संपवला. चहा- बिस्कीटही घेतले.
ह्याच वाटेवर एक गंमत झाली. माझ्याजवळून एक ऑटो रिक्षा गेली व कोणी तरी टाळी वाजवली. मला पहिले वाटलं की, कोणी मला अशी दादच दिलीय. पण ही टाळि एका ट्रान्स जेंडर व्यक्तीने दिली होती! ट्रेनमध्ये आपण नेहमी जशा टाळ्या ऐकतो तशीच टाळी! ट्रान्स- जेंडर लोकही एचआयव्हीची जोखीम असलेल्या गटांपैकी एक आहेत. नंतर काही ठिकाणच्या कार्यक्रमातही त्यांची भेट झाली. अपेक्षेपेक्षा फारच उशीरा केजला पोहचलो. साधं गाव नाही तर हिल स्टेशन असावं अशी केज गावाची वाट बघत होतो! इथे मला एनर्जाल मिळालं. दोन लिक्विड पॅक्स घेतले. पण ते नंतर वापरेन. आणि वनडे मॅचमध्ये ज्याप्रमाणे विराट कोहली बुमराहचा एक स्पेल शेवटच्या डेथ ओव्हर्ससाठी ठेवतो, तसंच मीसुद्धा एक एनर्जाल शेवटच्या पंधरा किलोमीटरसाठी ठेवतो. केजनंतर हळु हळु रस्ता बरा होत जातोय. काही काही जागी जुना रस्ता लागला आणि कुठे कुठे नवीन केलेलाही लागला. आणि पोटात इंधन गेल्यामुळेही पुढचा टप्पा सोपा होत गेला. पण तरीही फक्त दहा- दहा किलोमीटरच्या अंतराकडेच लक्ष देत पुढे जात राहिलो. अंबेजोगाईच्या दहा किलोमीटर अलीकडे चांगला हायवे आला! केजनंतर रस्ता बरा असल्याने तीनच्या ऐवजी दोन वाजताच अंबेजोगाईला पोहचलो.
इथे ग्रामीण विकास मंडळाच्या सय्यद सरांनी स्वागत केलं. संस्थेच्या टीआय युनीटमध्ये (टारगेटेड इंटरव्हेंशन) मोठा कार्यक्रम झाला ज्यात सरकारी कर्मचारी, विहान प्रोजेक्ट, आयसीटीसी काउंसिलर धनराज पवार, पॉजिटीव्ह नेटवर्कचे लोग, आउट रिच वर्कर्स, सेक्स वर्कर्स, पत्रकार हेही होते. सय्यद सरांनी ग्रामीण विकास मंडळाचं काम सांगितलं. मराठवाड्यामध्ये एचआयव्हीवर अनेक वर्षांपासून त्यांची संस्था काम करते. दहा वर्षांपूर्वी ह्या विषयावर काम करणं आणखी कठीण होतं. त्यावेळी एचआयव्ही व्यक्तींची लाईफलाईन ज्याला म्हणतात- एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट) फक्त मोठ्या महानगरांमध्ये उपलब्ध होती. त्या काळी व्हायरसच्या संक्रमणाची लक्षणं फार जास्त झाल्यानंतरच ही ट्रीटमेंट दिली जायची (जसे सीडीफोर काउंट 250 पेक्षा कमी झाल्यावर)| पण आता एचआयव्ही संक्रमण कन्फर्म झाल्यावरच ही ट्रीटमेंट पॉझिटिव्ह व्यक्तीला दिली जाते. सिडीफोर काउंटचा अर्थ म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार संस्थेतील पांढ-या रक्त पेशींच्या एका प्रकाराची संख्या. व्हायरसने शरीरावर किती हल्ला केला आहे, ह्याचा मापदंड ही संख्या दर्शवते. ह्या विषयावर काम करणा-या कार्यकर्त्यांना अनेकदा सामाजिक मानहानीला तोंड द्यावं लागलं आहे. हा विषयच तसा कलंकाच्या नजरेने बघितला जातो. नंतर काउंसिलर धनराज पवार ह्यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. ज्या पॉजिटीव व्यक्ती येतात, त्या ट्रीटमेंटसाठी शक्यतो दुस-या गावी जातात कारण त्यांच्या गावातल्या सरकारी रुग्णालयात ह्या विभागात त्यांना कोणी बघितलं तर लगेच हे सगळ्यांना कळू शकतं. अनेकदा जेव्हा पॉझिटीव्ह व्यक्ती ट्रीटमेंटसाठी पहिल्यांदा येतात, तेव्हा त्या तणावात व निराशेत असतात. त्या वेळी काउंसिलिंग सेंटर्समध्ये एक पद्धत वापरली जाते. त्यांना अपॉइंटमेंट देताना काही वेळ वाट पाहावी लागते. रांगेत उभं राहून ते जेव्हा आपल्यासारख्या इतर लोकांना बघतात, उपचार घेताना बघतात, तेव्हा हळु हळु त्यांना जाणवतं की, मी एकटाच/ एकटीच नाहीय. अनेक जण माझ्यासारखे आहेत आणि ट्रीटमेंटही घेत आहेत. मग त्यांची हिंमत वाढते.
चर्चा छान रंगली आणि कार्यकर्त्यांपासून पत्रकारांनी आपले विचार मांडले. इथे पत्रकारांनी माझ्या सायकल मोहीमेला चांगली प्रसिद्धी दिली. बातमी तर आलीच, पण व्हिडिओही बनवले गेले. कार्यक्रम छान झाला. पण आता मला आरामाची गरज आहे! त्याची व्यवस्था मानवलोक संस्थेत केली आहे. मानवलोक अंबेजोगाईतील विविध सामाजिक विषयांवर काम करणारी अग्रणी संस्था! इथे सोशल वर्क महाविद्यालयही आहे. जर वेळ असता तर संस्थेतले लोक व विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला आवडलं असतं. पण सध्या सुट्ट्या आहेत, शनिवार आहे व उशीरही झाला आहे. त्यामुळे संस्था नीट बघता आली नाही व चर्चाही करता आली नाही. पण संस्थेचा परिसर बघता आला. रिन्युएबल ऊर्जेपासून जल संवर्धनापर्यंत संस्था विविध विषयांवर काम करते. Go to the people, live among them, learn from them, love them; start from what they know; build on what they have हे संस्थेचं विजन छान वाटलं. अशा प्रकारे ह्या मोहीमेतला सहावा दिवस पूर्ण झाला. आज ८६ किलोमीटर झाले व सलग सहा दिवसांनंतर माझी सरासरीही ८६ किमी आहे! वा! इथून माझं होम टाऊन व मोहीमेतला शेवटचा टप्पा- परभणी फक्त एक दिवसाच्या अंतरावर- फक्त ९० किमी दूर आहे. पण मी तिथे सरळ असं नाही तर खूप फिरून म्हणजे एक प्रकारची परिक्रमा करून जाईन!
पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
11 Dec 2018 - 2:59 pm | दीपक सालुंके
Like