जे सत्य सुंदर सर्वथा....: ७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)
१८ नोव्हेंबरची पहाट, आज प्रवासाचा सातवा दिवस. आज रविवार आहे आणि टप्पा तसा छोटा आहे. आज ७५ किलोमीटर सायकल चालवायची आहे व सतत अनेक दिवस सायकल चालवत असल्याने हे फक्त ७५ वाटत आहेत. एक पेडल मारल्यावर जशी सायकल आपोआप पुढे जाते, एका पेडलचा मूमेंटम जसा दुस-या पेडलला मिळतो, तसाच आता अनेक दिवसांचा मूमेंटम माझ्याकडे आहे. भिती फक्त एकच आहे की, आजच्या रूटवरही रस्ता काही प्रमाणात कमी दर्जाचा आहे. ठीक सव्वा सहाला अंबेजोगाईतून निघालो. यशवंतराव चव्हाण चौकात काल स्वागत झालं होतं, तिथून लातूरच्या रस्त्याला लागलो. शहरातून बाहेर निघेपर्यंत तर रस्ता चांगला आहे, पण पहिलं वळण आलं, तेव्हा रस्ता अगदीच कामातून गेलेला दिसला. पण इथल्या लोकांनी सांगितलं की, लवकरच चांगला रस्ता येईल, कारण ह्या रस्त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. तसंही मी आत्तापर्यंत असे भीषण रस्ते बघितले आहेत की, कसाही रस्ता असो, मला फरक पडेनासा झाला आहे. सवयच झाली आहे आता. त्यामुळे दगडी वाटेवरूनही आरामात पुढे निघालो. दूरवरून गिरवली सबस्टेशनचा परिसर व अंबेजोगाई- परळी रस्त्यावरचं टीव्ही टॉवर बघितलं! लहानपणी इथे अनेकदा आलो होतो, त्या आठवणी दूरदर्शनाने जीवंत झाल्या! थोडसं पुढे गेल्यावर दोन लेनचा मस्त हायवे सुरू झाला. आता लातूरपर्यंत असाच हायवे मिळणार.
आज मला तिस-या बाल गृहाला विझिट करायची आहे. लातूरच्या जवळ हसेगांवला असलेलं सेवालय! हायवे चांगला असल्यामुळे आरामात पुढे जातोय. लातूर जवळ येतंय. तीन दिवस सलग भीषण रस्ते अनुभवल्यानंतर आज मख्खन रस्ता! सायकल चालवण्याचा पुरेपूर आनंद घेत न थांबता पुढे निघालो. आज बहुतेक चार तासांमध्येच पोचेन. फक्त रेणापूरला एक ब्रेक घेतला. लातूर जवळ आलं आहे. आज लातूर हे माझ्या प्रवासातलं असं पहिलं शहर असेल जिथे सायकलचं चांगलं दुकान आहे. पहिले तीन दिवस तर मला टायर बदलण्याची तीव्र इच्छा होती. पण त्यानंतर सलग तीन दिवस पंक्चर झालं नाही. आणि हेही कळालं की, जे सलग दोन दिवस पंक्चर झाले होते, ते एकाच तारेच्या तुकड्यामुळे झाले होते. त्यानंतर अनेक भयावह रस्ते लागूनही पंक्चर झालं नाही. त्यामुळे सध्या तरी नवीन टायर घेण्याचा विचार केला नाही. फक्त सतत टायर प्रेशरवर लक्ष ठेवतो व दररोज थोडी हव भरतो; सतत टायर चेक करत राहतो. त्यामुळे टायर बदलण्याची गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रयत्नामध्ये मानसिक प्रक्रिया सर्वांत मोठी असते. म्हणजे ह्या १४ दिवसांच्या व ११६५ किलोमीटर सायकल प्रवासामध्ये शरीराबरोबर मनाचाही तितकाच वाटा आहे. आता इतके दिवस पूर्ण झाल्यानंतर मानसिक दृष्टीने हे खूपच सोपं झालंय. किंबहुना मानसिक दृष्टीने तर प्रवास पूर्ण झाल्यात जमा आहे. फक्त execution part बाकी आहे. त्यात काही अडचणी येतील, एकदा- दोनदा पंक्चरचं गालबोट लागेलही, पण सर्व आरामात जमणार आहे. इतका मूमेंटम मला मिळाला आहे. आज थोडे ढगही असल्यामुळे ऊन्हाच्या त्रासापासून आराम मिळाला आहे.
लातूरमधून जाताना एक गंमत झाली. सायकलीच्या बाजूने एक जण गेला आणि त्याने सांगितलं, "म्या बी केलोय." एक क्षण मला कळालं नाही. पण मग कळालं की, माझ्या टीशर्टवर असलेल्या प्रश्नाला त्याने उत्तर दिलं! 'मी एचआयव्ही तपासणी केली आहे, तुम्ही?' हा तो प्रश्न! लातूरच्या पुढे औसा रोडवर बुधोडा गावापासून टर्न घेतला. इथून गदी अंतर्गत गावं सुरू झाली. अनेकदा रस्ता विचारत हसेगांवच्या दिशेने वळालो. हे तसं लातूरच्या जवळंच आहे. पण रस्ता वळून वळून जातोय. पण मस्त रस्ता आहे! छोटी गावं असूनही शानदार रस्ता! हिप्परेसोगा सारख्या गावांच्या नावावरून कर्नाटक सीमा जवळ असल्याचं जाणवतं आहे. वाटेत रस्ता विचारण्यात थोडा वेळ लागला. पण पाच तासांमध्येच हसेगांव, सेवालयला पोहचलो. आज ७५ किलोमीटर झाले व ७ दिवसांमध्ये ५८९ किलोमीटर झाले. खरं तर अजून विश्वास बसत नाहीय! पण आजच्या व्हिजिटनंतर अर्धा प्रवास पूर्ण होईल!
सेवालय कँपसवर आल्यावर मुलांनी व सेवालयचे संस्थापक रवी बापटलेजींनी उत्साहाने स्वागत केलं. आधीच्या लेखांमध्ये ज्यांचा उल्लेख केला होता ते डॉ. पवन चांडक सर नेहमी सेवालयात येतात. सेवालयसाठी मदतीचे संकलन करतात. त्यांनी इथल्या मुलांना दोन सायकलीही दिल्या आहेत. त्यामुळे इथे माझ्या सायकल प्रवासाबद्दल फार उत्साह आहे. लातूर जिल्ह्यात एचआयव्हीवर काम करणारे सरकारी लोक व विहान प्रोजेक्टचे लोकही इथेच भेटायला आले. माझ्या सोयीसाठीलातूरच्या सरकारी रुग्णालयाच्या ऐवजी ते इथेच आले. अर्थात् आज रविवार असल्यामुळे संख्या कमी आहे. आधी त्यांच्यासोबत चर्चा झाली. माझ्यामुळे अनेक दिवसांनी ते सेवालयात येत आहेत. त्यांच्या चर्चेत कळालं की, आता प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही एचआयव्ही तपासणी केली जाते. एचआयव्ही असणा-या लोकांना लवकरच सरकारी बसचा मोफत प्रवास करता येणार आहे. काही वेळ ही चर्चा झाली. सेवालयच्या इतर कार्यकर्त्यांशीही बोलणं झालं. त्यानंतर रवी बापटलेजींना सेवालयच्या दुस-या कँपसमधल्या बांधकामाकडे जायचं होतं. मी आंघोळ करून आराम सुरू केला. सेवालयात अनेक कुट्या आहेत, एका कुटीत मी मुक्काम केला.
हॅपी इंडियन विलेजमध्ये सुरू असलेलं बांधकाम
दुपारच्या आरामनंतर संध्याकाळी सगळ्यांना भेटायला तयार झालो. रवीजी सेवालयाच्या दुस-या कँपसमध्येच आहेत, त्यामुळे इतरांशी बोलणं झालं. आज जो कँपस दिसतोय तो मोठ्या संघर्षानंतर उभ्या राहिलेल्या कामाचं उदाहरण आहे. रवीजी मुळात पत्रकार होते. पत्रकारिता क्षेत्रात चांगलं करिअर सुरू होतं. तेव्हा एक दिवस त्यांना कळालं की, एका गावात एचआयव्ही असलेला मुलगा अतिशय वाईट स्थितीत आहे. तेव्हा ते त्याला बघायला गेले. त्याची अवस्था फार बिकट होती. शब्दात सांगता येणार नाही अशी स्थिती होती. सर्वांनी त्याला अस्पृश्य मानून वाळीत टाकलेलं होतं. त्याच्या शरीरात जखमांमध्ये किडे झाले होते. शरीर हाडं हाडं उरलं होतं. नंतर त्याचा मृत्यु झाला तेव्हा अंतिम संस्कारही होऊ शकत नव्हता. कारण लोकांचे समज होते की, अशा व्यक्तीचं दहन केलं तर आपली जमीनही 'बाधित' होईल किंवा त्याच्या धुरामुळेही आपल्याला संसर्ग होईल!! अशा परिस्थितीत रवीजी पुढे आले व त्यांनी ह्यावर काम करण्याची जवाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घेतली. नंतर ह्या विषयासाठी आपलं उत्तम सुरू असलेलं करीअर सोडून दिलं. आपल्या स्वप्नांची राख केली. काही लोकांच्या मदतीने हळु हळु हे काम सुरू झालं. एका सद्गृहस्थांनी हसेगांवमधली जमीन दिली. त्यावेळी इथे उघडा बोडका डोंगर होता. पण अनेक नि:स्वार्थी लोकांच योगदान व समाजातल्या चांगल्या लोकांच्या मदतीने हळु हळु इथे काही मुलांसाठी व्यवस्था उभी राहिली. पण हे सर्व होताना आसपासच्या गावातून तीव्र विरोध होत होता. काही लोकांनी इथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. इमारतीचं बांधकाम तोडून टाकलं. त्यावेळी रवीजींनी मोठ्या मनाने पोलिस कंप्लेंट न करता समजुतीने व संवादाने विषय सोडवण्यावर भर दिला. लोक तुटायला नकोत, हा भाव त्यात होता. हळु हळु लोकांना हे काम कळत गेलं. आणि जिथून लोक कामात अडथळे आणण्यासाठी येत होते, तिथूनच आता कार्यकर्तेही येऊ लागले. ह्या कामासाठी अनेक हात हवे होते, ते जवळच्या गावांमधून येण्यास सुरुवात झाली. सेवालयच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून हे ऐकायला मिळालं.
ह्या संस्थेचं काम बघताना परत परत हेच वाटतंय की, जेव्हा एखादा माणूस स्वत:च्या बळावर, स्वत;ला गाडून घेऊन एखाद्या मार्गावर चालू लागतो, तेव्हा हळु हळु अकेला न राहता काफीला बनत जातो, कारवाँ बनत जातो! ह्या संस्थेचं काम इतकं मोठं आहे की, अशा धावत्या भेटीत ते बघता येणार नाही. आणि कार्यकर्तेही कँपसमध्ये आहेत तसेच इतरही अनेक आहेत. नंतर हॅपी इंडियन व्हिलेज (एचआयव्ही) नावाच्या सेवालयच्या दुस-या कँपसमध्ये गेलो. इथे मोठी इमारत बांधली जात आहे. अठरा पेक्षा जास्त वयाची मुलं व अन्य कार्यकर्ते इथे राहतात. हॅपी इंडियन व्हिलेज एका प्रकारचं पुनर्वसन केंद्र आहे. अठरा पूर्ण झालेली जी मुलं बाल गृहात राहू शकत नाहीत ते इथे राहतात व सेवालयच्या कामात योगदानही देतात. समाज व कुटुंबात पुनर्वसन होईपर्यंत मुलं इथे राहू शकतात. सर्वांना शिक्षण, पोषण, आरोग्य देखभाल, एआरटी उपचार इ. बरोबरच वेगवेगळी कौशल्येही शिकवली जातात.
हॅपी इंडियन विलेजमधील दृश्य
मुलांशी भेटताना ह्याचं उदाहरणही बघायला मिळालं. मुलं न थकता दिवसभर डान्सची प्रॅक्टीस करत आहेत. १ डिसेंबरला जागतिक एड्स निर्मूलन दिनाला त्यांहा म्युझिक शो होणार आहे! सेवालयच्या मुलांनी हॅपी म्युझिक शोद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुलांना वेगवेगळी कौशल्ये शिकवताना एकदा इथे नृत्य शिक्षिका आल्या होत्या. त्यांनी मुलांचा ऑर्केस्ट्रा बनवला. नंतर मुलांनी त्यात खूप उत्साह घेतला व पुढे शिकत गेले. त्यांचं कौशल्य बघून त्यांचा एक गट बनला. गेल्या तीन वर्षांपासून इथले मुलं हॅपी म्युझिक शो करतात. समाजापुढे येऊन आपलं कला- कौशल्य दाखवतात. सेवालय ह्या प्रकारे लोकांपर्यंत जातं. अनेक जण सेवालयसोबत जोडले जातात. तसेच सेवालयच्या कामांसाठी निधीही उभा होतो. ह्या म्युझिक शोजमधून काही प्रमाणात आज सेवालय स्वयंपूर्ण होत आहे. हे एक अतिशय अपूर्व उदाहरण आहे. जी मुलं समाजाच्या नजरेत अस्पृश्यांप्रमाणे होती, समाजाने नाकारलेली होती, तीच मुलं आज स्वयंपूर्ण झाली आहेत व त्यांच्यात आत्मविश्वास ओसंडून वाहतोय! क्रांती ह्याहून काय वेगळी असू शकेल? ह्या मुलांच्या नृत्याचा त्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम झाला. एचआयव्हीच्या एआरटी ट्रीटमेंटला त्यांच्या शरीराने अधिक चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. ही मुलं कमी आजारी पडतात, असं निदर्शनास आलं.
सेवालयच्या कार्यकर्त्यांमधल्या प्रणीलजींसोबतही छान गप्पा झाल्या. तेसुद्धा मास्टर इन सोशल वर्क आहेत व गेल्या अनेक वर्षांपासून सेवालयसोबत जोडलेले आहेत. माझ्या काही मित्रांचेही ते मित्र आहेत! आज त्यांच्याप्रमाणे अनेक जण आपला व्यवसाय करत करत सेवालयसाठीही काम करतात. एका पॉझिटीव्ह मुलाचे वडील इथे आले व आता ते इथले ऑल राउंडर आहेत- ड्रायव्हिंगपासून किचनपर्यंत सगळी कामं करतात. खरं तर ह्याला काम म्हणता येणार नाही. आई मुलाची काळजी घेते, तेव्हा आईसाठी ते कामच नसतं. अगदी सहज गोष्ट असते. इथेही सगळं बघून हेच जाणवतंय. आणि अशा कार्यकर्त्यांच्या मोठ्या यादीत माझे परभणीचे मित्र डॉ. पवन चांडकही आहेत. परभणीत जेव्हा एचआयव्हीचं बालगृह बंद झालं व अनेक मुलांच भविष्य संकटात आलं, तेव्हा त्यांच्या प्रयत्नांनी ती मुलं इथे आली. तेव्हापासून डॉ. चांडक सेवालयसोबत जोडले गेले. त्यांची HARC संस्था (ज्याविषयी आधीच्या लेखांमध्ये बोललो आहे) सेवालय व इतर बाल गृहांना अनेक प्रकारे मदत मिळवून देते. त्यांची आरोग्य तपासणी करतात, त्यांच्यासाठी पोषक आहार उपलब्ध केला जातो व मुलींना सॅनिटरी नॅपकिनही दिले जातात. हे सगळं काम बघून मीसुद्धा त्यात थोडा हातभार लावण्यासाठी छोटं डोनेशन केलं.
मुलांसोबतही गप्पा झाल्या. त्यांनी गाणी म्हंटली, त्यांच्या आवडीचे खेळ खेळले. त्यातच रात्र झाली. आणि एकदम पाऊस सुरू झाला. हवामान अगदी बदललं. पण कार्यकर्ते सावध होते, त्यांनी सर्व व्यवस्था केली. मुलांची काही अडचण होणार नाही, ह्याची काळजी घेतली. आज हे काम खूप पुढे जात आहे, पण तरीही समाजाच्या भेदभावाची काळी छाया अद्याप गेलेली नाही. त्यामुळे कोणतीही समस्या असो, त्याचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत समाज त्याविषयी जागरूक होत नाही. आपण सर्वांनी हे समजून घ्यायला हवं. गैरसमजांविषयी जागरूक व्हायला हवं व काय बरोबर आहे, हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
सेवालयविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व सहभागासाठी संपर्क करण्यासाठी:
Amhi Sevak Sanstha, Sevalay At/Post: Hasegaon
Tal: Ausa Dist: Latur, Maharashtra.
Email: sevalayravi@gmail.com
contact@sevalay.org
Contact: 9503177700, 9970093457
Web: http://sevalay.org/about-us/
पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग