जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
14 Dec 2018 - 9:20 pm

जे सत्य सुंदर सर्वथा....: ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

काल रात्री मोठा पाऊस झाला. मी थांबलो होतो तिथे उकाडा व डासांमुळे झोप नाही लागली. जवळजवळ रात्रभर जागाच होतो. पहाटे चारला संस्थेतले एक जण बघायला आले. मग काही वेळ त्यांच्यासोबत बोलत बसलो. पहाटेच्या अंधारात फिरून आलो. संस्थेच्या कामाविषयी आणखी गप्पा झाल्या. नंतर त्यांनी अगत्याने माझ्यासाठी पोहे बनवले. पहाटेही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे चांगला उजेड व्हायला वेळ लागला. त्यामुळे १९ नोव्हेंबरला रोजच्यापेक्षा थोडं उशीरा निघालो. निघतानाही रवीजी आणि मुलांनी खूप उत्साहाने मला निरोप दिला. सेवालयमधली ही भेट ह्या मोहीमेतला कदाचित सर्वांत मोठा अनुभव होता. इतकं काही बघायला आणि समजून घ्यायला मिळत आहे! आणि सेवालयात आल्यावर परत जाणं कठीण असतं हे ऐकलं होतं, त्याचाही अनुभव आला. तसंच हवामानही वेगळंच आहे व रात्रभर आराम न झाल्यामुळे थोडा थकवा वाटतोय. तसा आजचा टप्पा छोटाच आहे- फक्त ७६ किलोमीटर जायचं आहे. पुढच्या शनिवारपर्यंत मोठा टप्पा नाही आहे. आता हळु हळु मोहीमेचा शेवट जवळ येणार आहे.

हसेगांववरून निघाल्यावरच रस्त्यावर पाणी व चिखल असल्याचं दिसलं. पण आतली गावं असूनही रस्ते चांगले आहेत. हसेगांव लातूरच्या अगदी जवळ आहे. काल रात्री सेवालयाच्या हॅपी इंडियन व्हिलेजवरून लातूरचे दिवेही दिसत होते. पण जसा ही सगळी समस्या आहे- समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या अगदी जवळ असूनही एचआयव्हीसोबत जगणारे लोक दूर असतात, जणू परके असतात, तसंच शहराच्या इतकं जवळ असूनही हे केंद्र शहरापासून दूरच आहे. असो. मला अहमदपूरला जायला लातूरला जाण्याची गरज नाही. गावातले रस्ते विचारत जाईन. रवीजींनी जसं सांगितलं आहे, तसं विचारत गेलो. हायवेच्या जवळ येत असताना एक वळण चुकलं. त्यामुळे थोड्या लांबून म्हणजे बाभळगावातून जावं लागलं. महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली आहे की महाराष्ट्रात उघड्यावर शौच बंद झालं आहे. पण माजी मुख्यमंत्र्यांचं गावच अजून बाकी आहे हे कळालं. पण बाभळगांववरून चांगला रस्ता मिळाला आणि लवकरच नांदेड हायवेला आलो. इथे एक गंमत झाली! दुचाकीवरून जाणारे एक जण मला बघून थांबले व त्यांनी माझी विचारपूस केली. जेव्हा मी सांगितलं की, मी १४ दिवसांमध्ये ११६५ किमी सायकल प्रवास करतोय, तेव्हा त्यांनी चक्क माझ्यासोबत एक सेल्फी घेतली!! आता इतकंच बाकी राहिलं होतं! ह्याआधी माझ्यासोबत अशी सेल्फी कधी घेतली गेली होती, हे जरा आठवलं. तेव्हा आठवण झाली की, जेव्हा मी लदाख़मध्ये सायकल चालवत होतो, तेव्हा लामायुरूला पोहचल्यानंतर काही जणांनी अशी सेल्फी घेतली होती! तेव्हा ही मोहीमसुद्धा त्या कोटीची मोहीम बनतेय तर! वा!

आज खूप दिवसांनंतर चांगला हायवे मिळाला आहे आणि खूप दूरवरचे बोर्डस दिसत आहेत. नागपूर, जबलपूर आणि अगदी कोलकाता किती दूर आहे, हेही दिसत आहे. माझ्या प्रवासातला शेवटचा मुख्य टप्पा असलेलं अकोलाही त्यात आहे! थोड्याच दिवसांमध्ये तिथे पोहचेन. मला चांगला रस्ता मिळाला आहे आज, पण ह्या विषयावर जे लोक काम करत आहेत, त्यांची वाट कधी सोपी होणार, हा मात्र प्रश्नच आहे... रस्त्यावर पायी जाणारे काही वारकरी/ भाविक दिसत आहेत. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेत होतो, तेव्हा एकाने मला चक्क विचारलं, तुम्हीच तिकडे सोलापूरकडे सायकल चालवत होता ना? कदाचित मला त्यांनी बघितलं असेल! आज पावसाचं वातावरण आहे, पावसासाठी माझी तयारी आहे, पण पाऊस आला नाही. अर्थात् ऊन्हापासून आराम मिळाला.

ढगाळ वातावरणात मस्त दृश्ये चालू असताना लातूर रोड, चाकूर आणि मग शिरूर ताजबंद अशा गावांना मागे टाकत आरामात अहमदपूरला पोहचलो. अहमदपूरमध्ये मला कस्तुरबा गांधी महाविद्यालयात जायचं होतं, पण चुकून पहिले महात्मा गांधी महाविद्यालयात जाऊन आलो. कस्तुरबा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी काही वेळ बोललो. माझ्या प्रवासाचं स्वरूप व उद्दिष्ट सांगितलं. ह्या विषयाबद्दल सांगितलं. महाविद्यालयाच्या प्राचार्यांसोबतही भेट झाली. इथे आणखी काही कार्यक्रमाचं नियोजन न झाल्यामुळे लवकरच मोकळा झालो. अहमदपूरमध्ये माझ्या बाबांचे एक स्नेही आहेत. बाबा डॉक्टर आहेत व त्यांचे पेशंटस "चारो ओर फैले हुए हैं". तशा एका काकांकडे आज मुक्काम करेन. आणि आज मला चांगला आराम करावाच लागेल. काल रात्री झोप झालेली नाही. अर्थात् सायकल चालवताना काही अडचण आली नाही. संध्याकाळी अहमदपूरमध्ये काही पत्रकार व आयसीटीसी काउंसिलर सूर्यवंशीजींना भेटलो. थोड्या वेळ बोलणं झालं, त्यांनी स्वागतही केलं आणि फोटोही घेतले गेले. आज ७६ किमी झाले व आता मोहीमेतील सहा दिवस बाकी आहेत.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ९. अहमदपूर ते नांदेड

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजजीवनमानअनुभवआरोग्य