दोसतार...३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Apr 2018 - 9:39 am

मागील दुवा : https://misalpav.com/node/42267

थत्ते मास्तर खिडकी जवळच्या ओळीत गेले, तिथल्या मुली आता बाकावरुन उठुन दुसर्‍या बाजुला आल्या. हनुमानाचे लंकेची केली असेल तशी वर्गाची गत झाली होती. थत्ते मास्तर जसे खिडकी जवळ गेले तसे त्या प्रसंगनायकाने अपीने त्या झुरळाने पुन्हा एकदा उड्डाण केले. वर्गाच्या लंकेतून थेट खिडकीबाहेर.
या हनुमान उड्डाणाने त्याची आणि आमची , सर्वांचीच लंकेतून सुटका झाली होती.

पण झाल्या प्रकारामुळे आम्ही मात्र धास्तावलो होतो. हा टंप्या कधी काय करेल ते सांगता येणार नाही.
या सगळ्या गडबडीत मला पडलेला प्रश्न मात्र सगळेच विसरले होते. ते आपी झुरळ हे झुरळ होते की झुरळीण हे टंप्याने कसे ओळखले असावे? त्या आपीला मिशा होत्या तरीही तो त्या झुरळाला " ती " असेच म्हणत होता. तो तास संपेपर्यंत सगळेच हळूहळू हसत होते. थत्ते मास्तर पण बहुतेक धास्तावले असावेत. ते त्या नंतर उरलेला तासभर मुलींच्या ओळींकडे फिरकले सुद्धा नाहीत. ते अर्थात बरेच झाले नाहीतर काहिही नसताना पुन्हा तो ईईईईईईईई चे समूह गीत सुरू झाले असते.या मुलींची एक गम्मत आहे नाही. एरवी शिक्षकानी समूह गीत म्हणायला सांगीतले के समूह गीत गाताना नुसतीच तोंंडे हलवतात. ही आयडीया एल्प्याचीच. गाण्याच्या तासाला त्याने शोधून काढलेली. एल्प्याला गाण्याचा भयंकर कंटाळा. तेही बरंच आहे म्हणा. त्याला गाताच येत नसावे बहुतेक कारण तो सुखकर्ता दुखहर्ता आणि कुरबानी कुरबानी एकाच चालीत म्हणतो . चाल कसली म्हणा... बीनचाल च म्हणायला पायजेल त्याला. मनाचे श्लोक आणि पुस्तकातील " भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे... बांधव आहेत ..." हेच काय तो नीट म्हणू शकतो. ते ज्या चालीत म्हणायचे असते त्याच चालीत तो गाणीही म्हणतो. गाण्याच्या तासाला एकदा मटंगे बाईनी आम्हाला समूह गीत शिकवले " आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान..." असे कायकी ते गाणे होते. शाळेत यलप्पा तवनप्पा हत्तरगीकर म्हणून कोणतरी शाळेचे ट्रस्टी ;पाहुणे येणार होते त्यांच्या समोर गायचे होते. अचानकच हे ठरले होते म्हणे. पाहुण्यांसमोर गाणे ही कुणाच्या डोक्यातली आयडीया काय माहीत पण आमच्या शाळेत मात्र ही नेहमीच असायची. अगदी परीक्षेचे परीक्षक आले तरी त्यांच्या समोर समूह गान व्हायचेच. त्या दिवशी काय झाले माहीत नाही पण वर्गात उपस्थिती फार कमी होती. कायतरी श्रावणी शनवार की भोंडल्याच्या स्पर्धा असं कायतरी होतं. म्हणून वर्गातल्या मुली दुसर्‍या शाळेत गेल्या होत्या. आमी पोरं पोरं एकटेच होतो. मास्तर पण शिकवायच्या ऐवजी वर्गात पुस्तकं आणून वाचत बसले होते. शिपाई बोलवायला आला की पाच मुलाना हेडमास्तरानी बोलावलय म्हणून. कुणालाच काय कळेना कशाला बोलावलंय ते. शिपायानेच एक्या ( ए के. जुनं नाव अज्या कुलकर्णी ) वायझेड ( येशा झिरपे), शिर्‍या , मी , टंप्या आम्हाला बोलावलं. आम्ही गेलो म्हणून आमच्या मागोमाग एल्प्या पण आला. हेडमास्तरांच्या कार्यालयात गेल्यावर तेथे मटंगे बाई दिसल्या . एल्प्याला बघून त्यानी जरा मान " नको नको "अशी हलवली पण हेड अमास्तरांच्य अपुढे त्यांचे काही चालले नसावे.
मटंगे बाईनी आम्हाला गायनवर्गात नेले. तेथे येशाला तबला काढायला लावला. आणि त्या पेटी काढून बसल्या. आणि आम्हाला गाणे सांगू लागल्या " आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान...' अधे मधे शब्द न बोलता ... आ.... ओ... असे म्हणायचे होते. गाणे समजावून दिल्यावर आम्ही गायला लागलो. येशा तबल्यावर कायतरी ढाम ढुम टुक ट्रीक ट्रीक असले आवाज काढत बसला. गाणं मस्त रंगलं होतं . मजा येत होती मटंगे बाईना कायतरी त्यातलं आवडलं नसावं. त्यानी एल्प्याला जरा थांबायला सांगीतले. यल्प्या गायचं थांबला बाकीचे सगळे गाऊ लागले. बाकीचे म्हणजे आम्ही तीनच जणं. गाणं मस्त चाललं होतं तीन चार वेळा गायला लावून बाईनी आमची चांगली तयारी करुन घेतली. यल्प्याचे " मी काय करु बाई..." चे भुणभुणे चाललेच होते. बाईनी त्याला काहितरी सांगितले यल्प्याने मान डोलावली. तुम्ही इथेच थांबा पाहुणे आले की मी बोलावते तुम्हाला असे सांगून बाई वर्गाबाहेर गेल्या. बाईनी यल्प्याला काय सांगीतले आणि यल्प्याने त्याचे भुणभुणे इतक्यात कसे थांबवले याची आम्हाला उत्सुकता होतीच. बाई गेल्या तशा यल्प्याने सांगीतले की बाईनी त्याला संगीतले की गाणे न म्हणता ,तोंडातून कसलाही आवाज न काढता नुसतेच तोंड हलव म्हणजे समूह गीत गाताना तुझा आवाज येणार नाही पण तू गातो आहेस असेच सर्वाना दिसेल. टंप्याला ही आयडीया तर एकदम भारीच वाटली. कसं वाटते रे बीन आवाजाने गाताना. टंप्याला मज्जा वाटायला लागली. नुसतंच तोंड हलवायचं आणि गायचं नाही म्हणजे भारीच की. त्या टी व्हीवर बघीतलेल्या चॅपलीनच्या पिक्चरगत की रे. मूका पट .
लै भारी वाटतय. आपण गातो तेंव्हा बाकीचे कसे गातात ते ऐकुच येत नाही. पण असे नुसती तोंड हलवायला लागलो की बाकीच्यांचं गाणं ऐकायला येतं. ते येशा बघं कसलं भन्नाट वाजवतय. एकदम बेष्ट. खत्रीच की. कधीतरी रतनखत्री वगैरे नावे कुणाकडून ऐकल्यावर खत्री म्हणजे लै भारी हा यल्प्याचा लै भारी साठी ठरलेला शब्द.आणि हा शिर्‍या पण कसला भारी आ..... करतो. लैच भारी.
तितक्यात शिपाई आम्हाला बोलवायला आला. ते काय नाव की हत्तरगीकर पाहुणे आले होते. टेबल खुर्च्या आणि टेबलावर स्टीलचा तांब्या आणि फुलपात्र. फ्लॉवरपॉट मधे प्लास्टीकची फुले वगैरे जय्यत तयारी करुन ठेवली होती. स्पीकर च्या पेटीची बटणे हलवून स्पीकरमधून कू आवाज काढत कापसे सरानी स्पीकर चालू असल्याची खात्री करुन घेतली. आम्हाला गाणाराना एक माईक एक माईक येशाला तबल्यासाठी दुसरा एक पेटीसाठी असे तीन माईक ठेवले होते. आम्ही सगळे उंची नुसार उभे राहिलो. कडेला शिर्‍या , दुसर्‍या कडेला मी आणि बरोबर मधोमध यल्प्या. मटंगे बाई काही बोलणार इतक्यात हेड मास्तर प्रमूख पाहुण्याना घेवून आले. कापसे सरानी फुर्र..... शिट्टी फुंकली आणि गाणे सुरू झाले. मटंगे बाइंच्या पेटी आणि येश्या चा तबल्याच्या आवाज स्पीकर मधून येवू लागला. मात्र गाणे कुणालाच ऐकू येईना. कापसे सरानी धावत येवून पुन्हा एकदा स्पीकरमधून कुई... आवाज करत स्पीकर चालू असल्याची खात्री केली. पेटीचा आवाज येत होता, तबल्याचा आवाज येत होता आमची तोंडे हलताना दिसत होती पण कोणाचाच आवाज येत नव्हता. हे काय गौडबंगाल आहे हे हेडमास्तराना समजत नव्हते. ते रागारागाने एकदा आमच्या कडे एकदा मटंगे बाइं कडे एकदा कापसए सरांकडे आणि एकदा ओशाळे हसून प्रमुख ट्रस्टी पाहुण्यांकडे पहात होते. त्यांच्याकडे बघुन मला तर गणपतीच्या देखाव्यात इकडून तिकडे मान फिरवणार्‍या तुकारामाच्या देखाव्यातील ऋषीमुनींच्या पुतळ्याचीच आठवण झाली. मला खरे तर शिर्‍याचे गाणे ऐकायचे होते मी यल्प्याची आयडीया वापरली. गाणे न गाता नुसतेच शब्दानुसार तोंड हलवत होतो.पण मला त्याचेही गाणे ऐकू येत नव्हते. त्याने ही बहुधा तीच आयडीया वापरली असावी. टंप्याचा पण आवाज येत नव्हता.
हेडमास्तर रागारागाने मटंगे बाईंकडे पहात होते, बाई आमच्या कडे रागारागाने पहात होत्या. आरसा वापरून उन्हाचा कवडसा परावर्तीत करावा तसा त्या हेडमास्तरांचा राग आमच्याकडे परावर्तीत करत होत्या. संपूर्ण गाणे भर आमची नुसतीच तोंडे हलत होती, अगदी आ ओ करायच्या वेळेस सुद्धा पूर्ण आकार होत होते. पेटी वाजत होती, तबला वाजत होता. गाणे मात्र कुणालाच ऐकु येत नव्हते, मुळात गाणे कोणी म्हणतच नव्हतं तर ऐकू तरी कसं येणार. आमच्यापुढे अजून दुसराच एक प्रश्न होता. एका ठरावीक ओळ तीन वेळा म्हंटल्या नंतर गाणे संपवायचं होतं. आता कुणी गातंच नाहिय्ये तर ती ओळ तीनदा म्हणणार तरी कशी. गाणं थाबायलाच जमत नव्हतं आम्ही मूकपटात चालू असावं तसं नुसतंच तोंडे हलवत गाणे म्हंटल्यासारखं करत होतो. गाणं थांबायचं नावच घेत नव्हतं. प्रमुख पाहुणे बिचारे गाणे आत्ता थांबेल नंतर थांबेल असा विचार करत उभेच होते. त्यांच्या स्वागताला उभे राहीलेले हेंदरे मास्तर आणि काळबोले बाई हातात हार आणि गुच्छ घेऊन ताटकळत उभे होते, हेडमास्तर रागारागाने थरथरत होते. प्रमुख पाहुणे बसत नाहीत म्हणून सगळे शिक्षक उभे होते. मुलेही बसत नव्हती.
कापसे सराना काय झाले असावे याचा अंदाज आला असावा. त्यानी गाण्यात एका ठिकाणी जरा पेटी तबला एखादा सेकंद थांबला असेल तो टाईम पकडून त्यानी जीव खाऊन शिट्टी फुंकली. शिट्टीच्या त्या फुर्र आवाजाने तबला बंद पडला, पेटीही पुन्हा वाजली नाही. हा मोका साधून म्हादू शिपायाने एकदम बोलो भारत माता की ...असे म्हंंटले. त्यावर पोरानी ही हात उंचावून जोरात जय म्हंटले आणि आमचे समूहगीत संपवले.
मटंगे बाईनी आम्हाला गायन वर्गात चला अशी खूण केली. पण त्याकडे लक्ष्य न देता काय व्हायचं ते होऊ दे म्हणत आम्ही मुलांमधे जाऊन बसलो.
क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

हाहाहाहाहा! हसून हसून मुरकुंडी वळली! एकच नंबर.

आनन्दा's picture

5 Apr 2018 - 1:52 pm | आनन्दा

भन्नाट!

सस्नेह's picture

5 Apr 2018 - 9:28 pm | सस्नेह

लोलच लोल !
मटंगेबाईंचे थोबाड बघण्यालायक झाले असेल नाही ? =))

विजुभाऊ's picture

5 Apr 2018 - 10:21 pm | विजुभाऊ

:)

अश्शीच आम्ही एका मारकुट्या सरांची जिरवली होती. २६ जानेवारीला पोलिस ग्राउंडवर कवाईतीसाठी डंबेल्स ची कवायत करायची होती. त्यासाठी मास्तरने खूप छळलं होतं.त्या दिवशी डंबेल्सचं पोतं ग्राउंडवर वाहून नेऊ लागलो, नंतर हळुच गर्दीत सटकलो व लांबून मास्तरची मजा पाहीली. कुणीच भाग घेतला नाही.
आजही मला काही मास्तरांच्या तोंडात द्यावीशी वाटते .

पैसा's picture

17 Apr 2018 - 4:49 pm | पैसा

=))

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Apr 2018 - 8:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

हेड मास्तरांची फजिती केलीत एकदम, भारीच. येउंद्या अजुन

चौथा कोनाडा's picture

29 Jun 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा

नुसतंच तोंडे हलवत गाणे म्हंटल्यासारखं करत होतो.

खतरनाक किस्सा आहे राव !
धमाल हसलो !!!