दोसतार-८

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
10 May 2018 - 8:24 am

मागील दुवा https://misalpav.com/node/42569

अशी मुले शाळेत घेताना त्यांची तोंडी परीक्षा कशी घेतात हे एकदा मला बघायचंय. या शाळेतही असा एखादा कोणीतरी मुलगा नक्की असणारच.
मला प्रश्न होता की ढगाची पाठ कुठे असते. कुणालातरी विचारावे असा विचार आला पण चुकुन ज्याला विचारावे तो गण्यासारख्या निघाला तर काय या धास्तीन मी तो प्रश्न गिळून टाकला.

मुळात ढगाला आपण भॉ... करुन दचकवलं आणि दचकल्यानंतर त्याने जोरात गडगडाट केला तर काय हाही एक प्रश्नच होता.
ढगाच्या गडगडाटाला तसं भ्यायचं काही कारण नव्हतं पण तो जेंव्हा अचानक होतो तेंव्हा पोटात काहीतरी होतं. विशेषतः संध्याकाळी आपण घरी एकटेच असलो की. आई असली की तसले काही वाटत नाही. घरी एकटे असलो आणि पाऊस आला की कसेतरी एकदम घशात काहीतरी दाटून आल्यासारखे होते.उगाचंच कोणीतरी रडवेल असे वाटायला लागतं . रस्त्यावर एकदम अंधार पडतो , म्युन्सिपाल्टीच्या खांबावरचा दिवा दिवाळीतल्या पणतीसारखा वाटू लागतो. आणि सगळा अंधार हळू हळु आपल्या घराकडे यायला लागलाय असे वाटायला लागते. मला आज्जीची आठवण होते. डोके जड की कायसे होते. डोळ्यात भरून येते. मी रडत नाही , पण आतून काहितरी होत असते. पाटणची आज्जी गेली तेंव्हा असेच काहिसे झालं होतं. संध्याकाळ होती, आई कुठेतरी बाहेर गेली होती, मामा शेतावरून आला नव्हता. आज्जी झोपली होती. तीने मला पाणी मागितले. मी पाणी आणायला आत गेलो. जोरात टाळी दिल्यासारखी वीज चमकली आणि ढगांचा गडगडाट झाला. अंधार दाटून आला. मी घागर तिरपी करून पाण्याचा तांब्या भरला आणि आज्जीच्या कॉटपर्यंत घेऊन गेलो. आज्जीचे डोळे सताड उघडे होते. होते.काहीतरी गम्मतीदार सांगताना होतात तसे. मला वाटले आज्जीला काहितरी छान सांगायचे आहे. गम्मतीशीर. पण तीचे डोळे तसेच राहिले. मला भीती वाटली. मी मटकन खालीच बसलो. जमीनीला ला घट्ट चिकटून बसलो. आज्जीच्या त्या सताड उघड्या डोळ्याकडे पहात बसलो. आई कधी आली ते कळालेच नाही. तीने मला घट्ट कुशीत घेतले आणि ती रडू लागली. आई अशी रडत नाही कधी. अगदी शेजारच्या कदम काकूंशी भांडण झाले तरी. फार तर घरातूनच कदम काकुंना काहीबाही बोलत रहाते.
त्या ऐकत नसल्या तरी. आईला रडताना पाहून मलाही जोरात रडावेसे वाटले. पण रडलो नाही. रडत रडतच आई आज्जीला मोठ्यामोठ्यायाने हाका मारू लागली.
ते ऐकून शेजारच्या कदम काकू आल्या. आईशी दुपारीच कशावरुनतरी भांडल्या होत्या ;तरीही. मला वाटले की त्या पुन्हा भांडायला आल्या.
त्यानी आईच्या पाठीवरुन हात फिरवला. तीला कुशीत घेतले. आईशी बोलू लागल्या. तीला पाणी दिले. तोवर मामा आला. धावत जाऊन तो डॉक्टरकाकाना घेवुन आला. डॉक्टरकाकानी नळी कानात घालून आज्जीला तपासले. मान हलवत मामाला काहीतरी सांगितले. ते ऐकून आईला चक्कर आली. वाड्यातले इतर लोकही आले.
तुझी आज्जी गेली रे म्हणताना मामाही रडू लागला. एवढा मोठा तानु मामा रडताना काही वेगळाच वाटत होता. तो नेहमीच माझ्याशी खेळायचा. शेतात पाटाच्य अपाण्यात माझ्यासोबत मस्ती करायचा. त्याला रडताना कधी पाहिलंच नव्हतं. मोठी माणसेही रडू शकतात हे त्या दिवशी कळलं. त्या ढगाच्या गडगडाटाने माझ्या आज्जीला नेलं, मामाला रडवलं आणि आईला....... ती तर त्या नंतर बोलणंही विसरली होती काही दिवस. काहिही विचारलं तर नुसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यानी पहायची.
त्या दिवशी संध्याकाळी झालेला अंधार आणि आलेला पाऊस. बहुतेक आभाळही रडत होते. मला त्याला ओरडून विचारावेसे वाटले. इतके वाईट वाटत होते तर मग का नेलेस आज्जीला.
माझी कापसागत मऊसूत आज्जी पाऊस घेवून गेला. असा गाडगडाट करुन पाऊस आला की मला नेहमी तो कुणाची तरी आज्जी घेवून जातो असेच वाटते.
आज्जी मला गाणं म्हणून दाखवायची. तीने तर हातावर टाळी देत एक गाणेही शिकवले होते.
अटकन पटकन ये गोविंदा
पटकन मटकन खा गोविंदा
दूध लोणी घे गोविंदा
थोडे पोहे, थोडे दही,
थोडी पोळी , थोडा लाडू
थोड्या लाह्या थोडी साखर.
लोणच्याचा खार, तिखट फार.
चकली आहे फार हुशार.
जिरे मिरे लवंग फिरे.
चवीला मीठ थोडेच बरे.
दहीदूध लोणी,आणलं कोणी
बाजूला ठेवा थोडेसे पाणी
आजचा डबा मिसळून गेला
गोपाळ काला गोस झाला.
अटकन पटकन ये गोविंदा
पटकन मटकन खा गोविंदा.
हे गाणे म्हणत ती मला गोपाळकाला करुन द्यायची. मऊसूत हाताने मला भरवायची. आज्जीच्या गोधडीचा , तीच्या लुगड्याचा स्पर्षही तीच्या हातासारखाच मऊसूत लागायचा. मी तर बरेचदा पांघरूण म्हणून आज्जीचं लुगडंच घ्यायचो. अगदी मे महिन्यातही सुद्धा गार वाटायचं ते डोक्यावर घेतल्यावर.
आज्जी मला गाणी म्हणून दाखवायची, टाळ हातात घेवून भजने म्हणून दाखवायची, ती नेहमीच काहितरी गाणी गुणगुणत असायची. देवासाठी वाती वळताना, पोळ्या करताना, अंगण झाडलोट करताना, इतकेच काय तर सकाळी आंघोळ करतानाही ती न्हाणीतुन तिच्या गाण्याचा आवाज ऐकायला यायचा.
जनी जाय पाणीयासी.
मागे धावे र्‍हुषीकेष......
तीचा तो किनरा आवाज मला देघरातल्या छोट्या घंटेसारखा वाटायचा. मी आज्जीला तसे एकदा म्हणालोही होतो. त्यावर ती खूप हसली होती. माझ्या चेहेर्‍यावरुन हात फिरवत म्हणाली होती " अगदी आजोबांसारखा बोलतोस रे "
आज्जी झाडांशी बोलायची. अंगणातल्या तुळशीची पाने तोडताना आज्जी काहितरी मंत्र पुटपुटायची . मी विचारले तर म्हणायची अरे तीलाही जीव असतो पाने तोडताना दुखत असेल तीचा जीव. शेतावरल्या चिंचेशी, अंगणातल्या केळीच्या झाडाशी आज्जी बोलायची, जास्वंदीच्या मोगर्‍याच्या झाडांच्या पानांवरुन हात फिरवायची. म्हणायची ही झाडे मुकी असली तरी बोलतात रे माझ्याशी. देवासाठी फुले तोडताना झाडांची परवानगी मागायची.
शाळेत झाडांना जीव असतो हा शोध जगदीशचंद्र बोसानी लावला हे जेंव्हा शिकलो तेंव्हा मला सर्वात अगोदर आज्जीच आठवली. जगदीश चंद्र बोसांच्याही कितीतरी आधी माझ्या आज्जीला हे माहीत होते.
आज्जी कधीतरी माझ्या पाटीवर चित्र काढून देई,फुलाचे , शिवाजीचे, देवळाचे, डोंगराचे, झाडाचे, गणपतीचे, उंदराचे, हत्तीचे. शाळेत पाटीपूजन असे त्या दिवशी तरे ती खरोखरची मोरावर बसलेली सरस्वती काढून द्यायची. बाकी मुलांच्या पाट्यांवर ४ ४ ४ ४ आकड्याची सरस्वती असायची . माझ्या एकट्याच्याच पाटीवर सरस्वती असायची . आज्जी म्हणायची सरस्वती आहे तर सगळे काही आहे.
आज्जी कधीकधी मला सागरगोटे खेळून दाखवायची, एक गजगा हवेत उंच फेकून बाकी जमिनीवर पडलेले गजगे गोळा करायचा खेळ. ती एकच काय प्ण तीन तीन गजगे हवेत उडवून एका हातात झेलायची आणि त्याच वेळेस जमिनीवरचे पाच सहा गजगे झटक्यात उचलून घ्यायची.
आज्जी खेळत असताना तीचे डोळे चमकत असायची. अगदी गाणे म्हणताना चमकायचे तसे.
ढगाची आज्जी पण अशीच असेल ना कापसागत मऊ. म्हनून तर ढगही कापसागत दिसतात.
शेजारच्या स्वातीने एकदा मला सांगीतले होते की ढगातली म्हातारी जात्यावर पीठ दळत असते तेंव्हा ढगात गडगड होते. मी तीला म्हणालो पण " ढगातल्या देवाला पीठच हवे असेल तर त्याने ते दत्तुच्या गिरणीतून न्यायचे ना. त्यासाठी कोणाच्या आज्जीला का घेवून जायचे?"
जेंव्हा जेंव्हा संध्याकाळी विजेची टाळी देऊन ढग गडगडतात तेंव्हा तेंव्हा मी घाबरतो . ते कुणाची तरी आज्जी घेवून जातात.
मी आईला हे एकदा सांगितले . ती मला खुळा म्हणाली नाही. माझ्या केसांवरून ,गालावरून हात फिरवला, माझी हनुवटी हातात धरली. आणि तिचे डोळे एकदम रानातल्या तळ्यासारखे पाण्याने भरून आले.काठोकाठ.
ढग गडगडायच्या अगोदर मला त्यांना एकदा सांगायचंय. तुम्ही खुशाल गडगडा...पण विजेची टाळी देवून कुणाची आज्जी घेवून जाऊ नका.
विजेची टाळी देवून ढग गडगडले की मला वाटते कोणाची तरी मऊसूत कापसाची आज्जी गेली.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिता's picture

10 May 2018 - 9:58 am | अनिता

ह्र्द्य्य्स्पर्शि!

सस्नेह's picture

10 May 2018 - 11:16 am | सस्नेह

हृद्य !

सिरुसेरि's picture

10 May 2018 - 11:28 am | सिरुसेरि

भावस्पर्शी लेखन

आनन्दा's picture

10 May 2018 - 12:55 pm | आनन्दा

__/\__

शाम भागवत's picture

10 May 2018 - 2:56 pm | शाम भागवत

सुंदर.
पण डोळे कधी पाणावले ते कळलेच नाही.

गाणं खूप छान आहे. माझ्याकडे पण माझ्या आजीची गोधडी आहे, मला अजून आजीचा वास येतो त्या गोधडीत. भरून आलं वाचता वाचता.
हि पूर्ण लेखमाला एका मोठ्या माणसाने लिहिलीये असं वाटतच नाहीये. शाळेतल्या मुलाने जे मनात आलं ते लिहिलंय असं वाटतंय. वयाने मोठं होऊन सुद्धा तुम्ही तुमचं लहानपण छान जपून ठेवलंय.

विजुभाऊ's picture

10 May 2018 - 9:37 pm | विजुभाऊ

धन्यवाद वीणा
माझे लहानपण जपण्यात मिपा करांची खूप मोठी मदत लाभली आहे.

शाली's picture

10 May 2018 - 10:04 pm | शाली

वाह! सुरेखच.
पहिल्या भागापासून वाचेन आणि मग सविस्तर प्रतिक्रिया देईन.
भारी!!!

प्रकाश संतांच्या लंपनची अाठवण झाली, डोळे पाणावले

मनिम्याऊ's picture

11 May 2018 - 1:15 pm | मनिम्याऊ

छान लिहिलंय. वाचताना कुठेतरी लंपन आठवला.

रातराणी's picture

12 May 2018 - 2:49 am | रातराणी

लंपन आठवतोच ही सिरीज वाचताना! पुभाप्र.

विजुभाऊ's picture

14 May 2018 - 10:12 pm | विजुभाऊ

पुढचा भाग : https://misalpav.com/node/42617

पैसा's picture

24 May 2018 - 10:41 pm | पैसा

_/\_

चौथा कोनाडा's picture

4 Jul 2020 - 8:48 pm | चौथा कोनाडा

आजीच्या सहवासाचं वर्णन अतिशय हृदयस्पर्शी.
आजीचे शेवटचे क्षण, आई, मामा आणि कथालेखक यांची अवस्था वाचून कातर व्हायला होते !

घरी एकटे असलो आणि पाऊस आला की कसेतरी एकदम घशात काहीतरी दाटून आल्यासारखे होते.उगाचंच कोणीतरी रडवेल असे वाटायला लागतं . रस्त्यावर एकदम अंधार पडतो , म्युन्सिपाल्टीच्या खांबावरचा दिवा दिवाळीतल्या पणतीसारखा वाटू लागतो. आणि सगळा अंधार हळू हळु आपल्या घराकडे यायला लागलाय असे वाटायला लागते. मला आज्जीची आठवण होते. डोके जड की कायसे होते. डोळ्यात भरून येते. मी रडत नाही , पण आतून काहितरी होत असते.

माझी कापसागत मऊसूत आज्जी पाऊस घेवून गेला. असा गाडगडाट करुन पाऊस आला की मला नेहमी तो कुणाची तरी आज्जी घेवून जातो असेच वाटते.!

व्वा, क्या बात है विजुभौ !