दोसतार-७

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 May 2018 - 6:32 am

मागील दुवा : https://misalpav.com/node/42384

आपली पर्यवेक्षक सरांच्या जुलमापासून आपली सुटका केली. आपली सुटका करणे हे त्या माशाच्या तुकडीचे कार्य होते. टंप्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. त्याने या अवस्थेत किमान एक तासभर तर रामाच्या देवळात कीर्तन केले असते.
आपल्याला भगवंताने कोणते कार्य करायला पाठवले असावे हे सांगता येईल का?
यल्प्याच्या या प्रश्नाचे उत्तर टंप्याच काय पण आमच्या तिघांचे पालकही देऊ शकत नव्हते.

शाळा सुरू होते तीच मुळी पावसाच्या सोबतीने. गावात पाऊस सुरू होण्याची तारीख ७ जून. शाळा सुरू होण्याची तारीख पण तीच. पाऊसही अगदी शाळा सुटायच्या वेळेस आला.जणू काय ढगात पावसाचे गेट आणि जमिनीवर शाळेचे गेट एकाच वेळेस उघडले असावे. ढगातून पावसाचे टपोरे थेंब आणि शाळेच्या गेटमधून मुले एकाच वेळेस बाहेर.
आपल्याला जसे जमिनीवरुन ढग दिसतात ना तसेच ढगांनाही वरुन शाळा तशीच दिसत असावी. काळे ढग म्हणजे पावसाने भरलेले ढग. पांढरे ढग म्हणजे रीकामे ढग. तसे खाकी आणि पांढर्‍या रंगाचे म्हणजे मुलांनी भरलेले ग्राउंड. आणि नुसत्या तपकिरी रंगाचे म्हणजे रीकामे ग्राउंड. नुसते पांढरे कापसाचा गोळावाले ढग कुणालाच आवडत नाहीत. तसेच नुसते तपकिरी रंगाचे रिकामे ग्राउंड ढगांनाही आवडत नसावे. आम्ही मैदाना आलो की मग आम्हाला भेटायला पाऊस पण आला. टप्पा टप्प एक एक थेंब नेम धरुन प्रत्येक मुलाच्या डोक्यावर पडला. पाऊस आला तसा जणु वर्गात मुख्याध्यापकांच्या बरोबर कोणीतरी प्रमुख पाहुणे आल्यावर " एक साथ नमस्ते " म्हणताना येतो तेवढ्याच जोरात "हे... " अशा आवाजात पावसाला नमस्ते म्हंटले. पाऊसही लेकाचा त्या स्वागतामुळे खूश झाला . त्याने आमच्या त्या " हे .... " आवाजाला एकदा विजेचा कडकडाट करुन टाळी दिली. बहुतेक आमच्या भागातल्या सगळ्याच शाळांमधल्या मुलामुलीनी एकाच वेळेस " हे ." म्हंटले असावे अगदी कन्याशाळे तल्या मुलीनी सुद्धा. कारण तो विजेचा कडकडाट इतका मोठ्ठा होता की सगळ्याना ऐकू गेला. घरी इतक्या मोठ्याने ओरडले की त्याचा त्रास होतो. पण ढगांचा असा आवाज आला की मग त्रास होत नाही. या कडकडाटाची एक गम्मत असते. एखाद्याला अचानक पाठीमागून त्याला कल्पना नसताना " भॉ.." करून दचकवावे तसे ढग आपल्याला असा कडकडटाचा "भॉ ... " करून दचकवत असावेत. ढग आपल्याला " भॉ..." करुन दचकवतात. आपणही एकदा कधीतरी ढगाला पाठीमागून जावून " भॉ.." करून दचकवायचं. पण ढगाची पाठ शोधायची कशी.
सातवीच्या वर्गात असताना पाण्याचे बाष्पीभवन झाले की त्याचे ढग होतात हे शिकलो होतो. ढगाला पाठ कुठे असते ते मात्र कुठेच सांगीतले नव्हते. त्यावेळेस पाटणच्या शाळेत हा प्रश्नच कुणाला पडलाच नव्हता. अर्थात त्यामुळे काही फरक पडला असता असे नव्हे. पाटणच्या शाळेत कुणी प्रश्न विचारला की मागच्या बाकावरचे रव्या ढाणे आणि दिगू पवार नंतर ओरडायचे. ते म्हणायचे की मुलांनी प्रश्न विचारले की शिक्षकांच्चा पगार कापतात. आणि त्याना पगार कमी मिळतो. त्यामुळे आम्ही प्रश्नच विचारत नव्हतो. या शाळेत तसे काही होत नसावे.
ढगाची पाठ कुठे असते हे विचारल्यावर पाटणच्या शाळेतला गण्या साळुंखे म्हणाला असता " तोंडाच्या विरुद्ध बाजूला. मला खात्री आहे की ढगाचे तोंड कुठे असते या प्रश्नाला त्याने " पाठीच्या विरुद्ध बाजूला" हे उत्तर दिले असते. या गण्याची पण एक गम्मत आहे. तो कधीच कोणत्याच प्रश्नाचे उत्तर सरळ देत नाही. प्रश्न विचारणाराला प्रश्न विचारला की तो पुढचा प्रश्न विचारत नाही असे तो म्हणायचा. एकदा आम्ही शाळेतुन घरी जात असताना आम्हाला एका आजोबानी अत्तर गल्लीतल्या झैबु शेखच्या दुकानाचा पत्ता विचारला. गण्याने सरळ सांगायचे ना की देसाई गल्लीच्या कोपर्‍यावरुन डावीकडे वळालात की दिसेल दुकान. पण सरळ सांगेल तर तो गण्या कसला. त्या आजोबानी " बाळ हे दुकान कुठे आहे विचारल्यावर गण्याने त्यानाच विचारले" कशाला " असे विचारले.
त्या आजोबाने सांगितले " एक निरोप द्यायचाय"
गण्याचा पुढचा प्रश्न " कुणाला"
आजोबा बिचारे चालून उन्हात दमले होते. त्यानीही गण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले " अरे त्या झैबुद्दीनभाई ना द्यायचाय"
"कशाला?" आजोबांचे उत्तर संपायच्या आत गण्याचा प्रश्न तयारच होता.
त्यांचे नातेवाईक आजारी आहेत
कशाने?
त्यांच्या छातीत धडधडतंय
कशाने?
कराडच्या मोठ्या डॉक्टराना दाखवलंय
का?
तेच चांगले आहेत इकडे . पण म्हणताहेत की सातारला न्यावं लागेल म्हणून.
का?
इकडे त्यावरची औषधं मिळत नाहीत.
कसली? गण्याचे प्रश्न चालूच होते. त्याने वर्गात इतके प्रश्न विचारले असते तर बहुतेक सगळ्याच शिक्षकांचे पगार त्या प्रशांमुळे कपात होऊन एकाच दिवसात संपवून टाकले असते.
आजारावरची. अरे बाळा मला त्यंचा पत्ता सांगतोस ना.
मी कुठे म्हणालोय तसे?
त्या आजोबांनी आमच्या दोघांकडेही पायापासून डोक्यापर्यंत नीट पाहून घेतले आणि ते पुढे निघाले.
गण्याने माझ्या हातावर टाळी दिली आणि म्हणाला " बघ बोललो होतो की नाही. आपण प्रश्न विचारत राहायचे समोरचा आपोआप प्रश्न विचारायचे थांबतो.ही युक्ती मला आमच्या समोरच्या वंदूताईने सांगीतलीये.
गण्याचा ही युक्ती वापरायचा पहिलाच यशस्वी प्रयोग त्या आजोंबांवर केला होता.
" शाळेच्या तोंडी परीक्षेत ही युक्ती वापरुन बघणार आहे मी " ते आजोबा बिचारे गण्याचा प्रश्नांना कंटाळून पुढे निघून गेले. त्याना मार्क द्यायचे असते तर त्यानी किती दिले असते कोण जाणे. पाटणची शाळा सोडल्यावर गण्याने ती युक्ती वापरली की नाही हे समजले नाहे. गण्यासारखा एक तरी मुलगा प्रत्येक शाळेत असतोच.
अशी मुले शाळेत घेताना त्यांची तोंडी परीक्षा कशी घेतात हे एकदा मला बघायचंय. या शाळेतही असा एखादा कोणीतरी मुलगा नक्की असणारच.
मला प्रश्न होता की ढगाची पाठ कुठे असते. कुणालातरी विचारावे असा विचार आला पण चुकुन ज्याला विचारावे तो गण्यासारख्या निघाला तर काय या धास्तीन मी तो प्रश्न गिळून टाकला..
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आजोबांचा किस्सा वाचताना मनाला खूप त्रास झाला.

शाम भागवत's picture

7 May 2018 - 1:11 pm | शाम भागवत

तेवढ सोडल तर आत्तापर्यंतची सगळी लेखमाला आवडली.

हा भाग तितका जमला नाही असं मलाही वाटतेय.. बाकी पोरं वात्रट असतातच, त्यामुळे आजोबांचा किस्सा मला फार वेगळा वाटला नाही, पण हसायला पण आल नाही..

(तुम्ही अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत)

सस्नेह's picture

9 May 2018 - 1:31 pm | सस्नेह

वाचतेय..

विजुभाऊ's picture

10 May 2018 - 8:26 am | विजुभाऊ

पुढील भाग
दोसतार-८ https://misalpav.com/node/42589

चौथा कोनाडा's picture

3 Jul 2020 - 1:11 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग वाचला !

आपल्याला जसे जमिनीवरुन ढग दिसतात ना तसेच ढगांनाही वरुन शाळा तशीच दिसत असावी. काळे ढग म्हणजे पावसाने भरलेले ढग. पांढरे ढग म्हणजे रीकामे ढग. तसे खाकी आणि पांढर्‍या रंगाचे म्हणजे मुलांनी भरलेले ग्राउंड. आणि नुसत्या तपकिरी रंगाचे म्हणजे रीकामे ग्राउंड. नुसते पांढरे कापसाचा गोळावाले ढग कुणालाच आवडत नाहीत. तसेच नुसते तपकिरी रंगाचे रिकामे ग्राउंड ढगांनाही आवडत नसावे. आम्ही मैदाना आलो की मग आम्हाला भेटायला पाऊस पण आला. टप्पा टप्प एक एक थेंब नेम धरुन प्रत्येक मुलाच्या डोक्यावर पडला.

व्वा, अतिशय चित्रदर्शी वर्णन ! आमचा शाळेच्या मैदानावरचा पाऊस आठवला !