दोसतार- १६

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Oct 2018 - 5:55 am

मागील दुवा दोसतार १५ - https://www.misalpav.com/node/43124

वर्गात कवितेचा उत्सव सुरू होता.
वर्गा बाहेरून त्यावेळे कोणी गेले असते तर त्याला एकाच वेळेस दहा बारा रेडीओ ऐकतोय असे वाटले असते.
शाळा सुटल्याची घंटाही आम्हाला कुणालाच ऐकू आली नाही आणि त्या अगोदर झालेले" अभ्यासाची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत " हे प्रकटनही ऐकू आले नाही.आम्ही कविता म्हणतच राहिलो. आख्ख्या शाळेच्या इतिहासात झाले नसेल आज प्रथमच कोणालाच घरी जायची घाई नव्हती. तास असाच अजून चालूच रहावा , शाळा उगाच लवकर सुटली.

एकदाची पुस्तके आले. नव्या पुस्तकाचा वास काही वेगळाच होता. त्याच्या पानंचा करकरीत पणा. कुठे कुठे न कापता तशीच राहिल्यामुळे जोडून राहिलेली पाने. एक वेगळीच मजा असते. दसर्याला नवे कोरे कपडे घालून आपट्याची पाने वाटायला जातो ना तसे काहिसे वाटते. नव्या कोरे कपडे त्यांच्या करकरीत पणामुळे कुठेतरी बाहीत नाहीतर मानेवर टोचत असतात. पण त्यांच्या कडकपणामुळे आपल्या काहीतरी भारीच वाटत असते. नव्या पुस्तकांचेही तेच. पुस्तके आली त्या बरोबरच त्याला कव्हरे घालायचा एक मोठ्ठा जंगी कार्यक्रम असतो. सगळी पुस्तके एका गठ्ठ्यात ठेवायची. त्या शेजारी कातरी डिंक जाड ठळक उठणारे पेन , आखायला पट्टी पेन्सील, असे साहित्य घेवून मांडा ठोकून बसायचे. शेजारीच मग दुकानदाराकडून मागून आणलेले खाकी कागद ठेवायचे घ्यायचा. अगोदर खाकी कागद पसरवून ठेवायचा,गठ्ठ्यातून पुस्तक घ्यायचे. त्याच्या करकरीत पानांवरून एकदा हात फिरवायचा, मग पुस्तक बरोब्बर मधोमध उघडून सपाट करायचे. ते कागदावर ठेवून त्याच्या आकारा नुसार दुमडायला जागा ठेवून कागद कापून घ्यायचा. कात्रीने कागद एका रेषेत कापता येत नाही. त्यासाठी सोप्पी आयडीया म्हणजे दोरा वापरायचा. कागद कापायचा असतो तेथे पेन्सीलने रेष मारायची त्यावर दोरा ठेवून तो आतल्या बाजूला येईल असा कागदाला दुमड मारायची. दोर्याचे एक टोक पायाच्या अंगठ्याने दाबून धरायचे. आणि दुसर्या टोकाला धरून आडवे ओढायचे. कागद बरोब्बर रेषेत कापला जातो. ही आयडीया मला तानुमामा ने शिकवली . तो तर पाटणला शेजारपाजारच्या सगळ्या मुलांच्या पुस्तकाना कव्हरं घालून द्यायचा.
एकदा कागद कापून झाला की मग खरं काम सुरू होतं पुस्तक कागदाच्या अगदी बरोब्बर मधोमध ठेवायचं. चारही बाजूला दुमडायला सारखीच जागा ठेवायची. पुस्तकाची शिवण जेथे येईल तिथे कागदाची घडी घालायची मग पुढच्या आणि पाठीमागच्या पानाच्या कडेवर कागद दुमडून घ्यायचा. जेथे कागदाच्या दुमडीवरचे कोपरे उडवायचे.
आता महत्वाचा भाग म्हणजे बरोब्बर मधोमध जो भाग येतो त्या दुमडीवरचेही कोपरे उडवायचे. आता कागदाच्या बाजूच्या छोट्या कडा आतल्या बाजूला दुमडून मग वरच्या आणि खालच्या बाजूच्या पट्ट्या दुमडायच्या. मग पुस्तक त्या खाकी कागदाच्या कव्हरमधे एकदम बंदीस्त होते. लहान बाळाला आंघोळ घातल्यावर त्याच्या हातापायाला ताण देवून व्यायाम करत वेखंड आणि जॉन्सनची पावडर लावून त्याला झबलं टोपलं चढवून दुपट्यात बंदीस्त करुन झोपवाने तसे. या नंतर पुस्तकावर जाड पेनाने नाव लिहायचे. अगोदर पुस्तकाचे. त्या नंतर आपले.
हे काम नीट पाहून करावे लागते. एकदा नावे चुकली की की वर्षभर बट्ट्याबोळ. संगीताचे असेच झाले . तीच्या पुस्तकावर चुकीची नावे पडली होती. भुगोलाचे पुस्तक म्हणून घ्यावे तर उघडल्यावर फुटके हौद अन गळक्या तोट्यांची नाहीतर काळ काम वेगाची गणीते निघायची, इंग्रीजीचे पुस्तके घ्यावे तर त्यात संयुक्त राष्ट्रसंघा ची स्थापना यायची आणि मराठी कविता वाचायला पुस्तक उघडावे तर त्यात वसईच्या तहाची कलमे निघायची.
पुस्तकाना एकसारखी कव्हरे घातली की असे होणारच. पुस्तकावरच्या चित्रावरून त्याच्या आत काय असते हे सहज समजते.मुखपृष्टावर इतकी छान छान चित्रे असताना खाकी कव्हर घालून ती झाकून का ठेवायची . पाटणच्या आज्जीला एकदा मी विचारले होते. ती म्हणाली आपण पुस्तकानाच नव्हे तर माणसानाही कव्हरे घालत असतो. मनात आत जे असते ते चेहेर्यावर दिसू नये म्हणून आपण त्यावर कव्हर घालून वागत असतो. पण त्यामुळेच तर एकमेकांशी नीट वागू बोलू शकतो. मग स्वतःशीच हसली. थोडावेळ थांबून म्हणाली अरे काय आहे ना कव्हर असले की पुस्तक नीट रहाते, आतल्या पानांना धक्का लागत नाही. कव्हर म्हणजे पुस्तकासाठी सुरक्षा कवच असते. यामुळे ती सुरक्षीत रहातात.आपण माणसे तरी काय वेगळे असतो. कव्हरामुळे सगळी पुस्तके एक सारखी दिसतात . आता हे बघ ना तुमच्या शाळेत गणवेश घालता ना त्यामुळे तुम्ही शाळेतली मुले ओळखू शकता. पण त्यामुळे एक गम्मत होते सगळी मुले सारखीच वाटायला लागता.
हे मात्र खरे होते. गणवेश घातला की सगळी सारखीच दिसायची. लांबून पाहिली तर पालकांनाही ओळखू येणार नाहीत इतकी.
अरे आपण माणसे आपल्या विचारांना देखील गणवेश घालतो. तसे पाहिले तर प्रत्येक माणूस वेगळा असतो. पण तो आपल्यापुढे येतो तो आचार विचारांचे कव्हर घालून
आपण माणसांना त्यांनी पांघरलेल्या विचारांच्या कव्हरवरुन एक समजतो आणि ते निघतात वेगळेच.
आज्जी काय म्हणायची ते समजायचं नाही. पण काहितरी नेहमीपेक्षा वेगळेच होते.
खाकी कागद जाड असतो . खाकी रंगामुळे पुस्तके एकसारखी दिसतात. त्यापेक्षा वर्तमानपत्राचे कव्हर घातले तर त्यावरच्या बातमी वरून पुस्तक ओळखता येते.
पण त्याने एक गम्मत होते. कव्हरावरची बातमी आणि पुस्तकाचा विषय जुळेल असे नाही. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकाच्या कव्हरवर " भविष्यात मानव अंतराळात जाणार........ अशी बातमी, तर भौतीकशास्त्राच्या पुस्तकाच्या कव्हरवर पुसेगावच्या जत्रेत राम संकीर्तनाचा संकल्प अशी काहीशी.
पण एक आहे त्यामुळे निदान पुस्तक कोणते आहे ते तरी ओळखू यायचे. यावेळेस दुकानदाराने चित्र असणारी लेबले दिली होती. त्यावर स्वतःचे आणि विषयाचे नाव लिहायचे होते. नाव लिहीताना ते नीट कोरून लिहावे लागते.
नवी पाठ्यपुस्तके आली त्याचबरोबर नवे दप्तर आणि कंपासही घेतला. लालपिवळा बॉक्स त्यातले ते दोन काचेरी त्रिकोण आणि अर्धगोल कोणमापक , छोटीशी सहा इंची पट्टी आणि चकचकीत स्टीलचे करकटक आणि कंपास. त्यात व्यवस्थित टोक केलेला पेन्सीलीचा तुकडा. कंपासमधे एक वेळापत्रक असे लिहीलेला चौकटी आखलेला कागदही होता. त्यात कोणता तास कधी आहे ते लिहायचे होते. मी आणि आईने रात्री उशीरा साडे दहा पर्यंत जागून पुस्तकाना कव्हरे चढवली. नव्या दप्तरात ठेवली. दप्तर अगदी बालभारतीच्या पुस्तकावरच्या चित्रात ठेवले असावे तसे दिसत होते.
वर्गात सगळ्यानी अशाच काहीना काही कल्पना लढवल्या होत्या. कोणी योग्याने तर पुस्तकांना रंगीत कागदाची कव्हरे घातली होती. मराठीच्या पुस्तकाला आकाशी, इंग्रजीच्या पुस्तकाला पिवळा, इतिहासाला तपकिरी त्याचे नीट लावलेले दप्तर पहात रहावे असे असायचे.
पुस्तके आल्यामुळे आता शाळा नीट सुरू झाली. सगळ्या शिक्षकाना मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करायची घाई होती. त्यांना पहिली घटक चाचणी जवळ आली होती. अभ्यास जणू काळ काम वेग या गणीती सूत्राप्रमाणे चालायला लागला होता. एक मजूर एक भिंत दोन दिवसात बांधतो तर दोन मजूर तीच भिंत एका दिवसात बांधू शकतील. आमच्या डोक्यात अभ्यासाची भिंत बांधन्यासाठी सगळे शिक्षक भरभरा अभ्यास शिकवत होते. पण त्या काळकामवेगाच्या गणीतात भिंतीला कुठेच काही समजून घ्यायचं नव्हते. इथे प्रत्येक मुलाच्या डोक्यात तो अभ्यास बसवायचा होता. तिथे भिंत बांधताना सगळया विटा सारख्याच आकाराच्या असतात इथे गणीताच्या आणि मराठीच्या विटांचे आकार बहुतेक वेगळे असावेत. मराठी कविता लगेच्च समजायची, पण चतुष्पदी चे एक उदाहरण शिकवायला पूर्ण तास लागायचा. आणि सगळीच मुले काही सारखी नसतात. कुणाला लग्गेच समजते तर कोणाला दोनतीन सांगून समजते. बरे एखादा विषय असता तर गोष्ट वेगळी होती. शिक्षकाना निदान एकच विषय असतो. आम्हाला इथे गणीत , मराठी , इंग्रजी, भुगोल, भौतीक शास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र , चित्रकला, हे सगळेच विषय. प्रत्येक विषयाचा गृहपाठ वेगळा. काळकाम वेगाच्या गणीताचे उदाहरण देताना प्रत्येक मजूर स्वतःच्या वेगळ्या विटा घेवून भिंत बांधतो असे कुठेच सांगीतलेले नव्हते.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

20 Oct 2018 - 7:16 am | सुधीर कांदळकर

चित्रदर्शी, तो काळ जिवंत होतो त्यामुळे वाचकालाही नॉस्टॅल्जिक करणारे लेखन. तीन भाग वाचायचे राहून गेले होते. काही वेळा भाग उतरवतो आणि नंतर वाचतो. काही कारणामुळे वाचायच्या अगोदर री-स्टार्ट करावे लागले की वाचायचे राहून जाते. आत्ताच ते भाग वाचले. फळ्यावरचे इनामदार सरांनी न पुसलेले चित्र, एका वेळी वाजणारे अनेक रेडिओ वगैरे फारच आवडले.

धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

20 Oct 2018 - 1:37 pm | टर्मीनेटर

छान लिहिताय.

विनिता००२'s picture

20 Oct 2018 - 3:14 pm | विनिता००२

सुरेख !!

पुस्तकांना मी प्लास्टीक पेपरची, पिशव्यांची कव्हर घालायचे. :)

विजुभाऊ's picture

22 Oct 2018 - 9:16 am | विजुभाऊ

_/\_

एक वाचनीय लेखमालिका. कधी संपूच नये असं वाटणारी.

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2020 - 8:32 pm | चौथा कोनाडा

मस्तच !
कव्हरपुराण भारी आवडलं, आम्ही रद्दीतल्या चकचकित इंग्रजी मासिकांतली रंगीत पानं कव्हर घालयला वापरायचो !
नट-नट्यांची कव्हरं घातली की फटके पडायचे !
बालपण आणि शाळाजीवन नॉस्टॅल्जिक करणारे शैलीदार लेखन.