योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
21 Nov 2016 - 3:50 pm

विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर

तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते. पण पन्नाशीला टेकल्यावर आधी असलेल्या सवयींना मुरड घालुन आणि ऊन वारे लागुन… वास्तवाचे टक्के टोणपे खाउन रिजीड झालेल्या शरीराला आणि मनाला वळण लावायला वेळ लागतो.वयानुरुप शिबीरे बदलत असतीलही.

याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेले 'विवेकानन्द केन्द्राचे योग शिबीर' असेच बरेच काही शिकवुन गेले.

पिंपळद येथील १५ मे ते ३० मे, २०१६ या कालावधीतील योग शिबीरासाठी माबोकर मैत्रीण मंजूताई यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला. पण घरुन निघताना निश्चय डळमळीत होउ लागला होता. माझ्या मुलाला घेऊनच मी हे शिबीर अटेंड करायचे असल्याने आनि त्याने ऐन वेळी नकार दिल्याने एकटीनेच जावे की जाउ नये अश्या द्विधा मनःस्थितीत जाण्यास तर निघाले. कधी नव्हे ते इतकी ऑफीशियल सुट्टी मिळाली होती. तिचा मस्त घरी आराम करत विनियोग करायचा की कुठल्याही शिबीरतल्या (ऐकीव)काटेकोर नियमात स्वतःला अडकवुन घ्यायचे या विचाराने अगदीच जीवावर आले होते. पण एस टी चे बुकिंग झाले होते, त्यामुळे नासिकपर्यंत तर जाऊ.. तिथे बहिणीकडे मुलाला पोचवुन पुढचे पुढे पाहु अश्या काहिश्या मनस्थितीत असतानाच पुणे सोडले.
संपूर्ण प्रवासात बहिणीशी/ मंजूताईंशी फोनवर बोलणे होत होते. शेवटी त्या दोघीनी अतिशय आग्रह धरल्याने १५ दिवस स्वतःला केंद्राच्या ताब्यात देउ... नाही आवडले तर ४ दिवसात कलटी मारु असा सुज्ञ विचार केला. नाशिक- ठक्करबाजारस्टँडवर मंजूताई, त्यांचे मिस्टर आणि आणखी एक जण उभे होते. त्यांनाही माझ्याच एस टीत बसवुन त्र्यंबकेश्वर येथे भर दुपारी साधारण दीड्च्या सुमारास पोहोचलो. तिथे दुपारचे जेवण घेउन स्पेशल गाडीने पिंपळद येथे दुपारी ३:३० ला पोहोचलो. डोंगराच्या कुशीतले छोटेसे गाव बघितल्यावर अर्धा थकवा दुर पळाला. तरी आता पुढचे १५ दिवस इथे काढायचे आहेत या भावनेने हृदय व्याकुळ झाले.

चक्क १५ दिवस... सकाळी ५ ते रात्री १० हे लोक आपल्याला कसे एंगेज ठेवणार ही उत्सुकता होती, आणि ती वारंवार मंजूताईंना मी बोलुन ही दाखवली होती. हॉलवर सामान टाकले आणखी ३-४ लेडीज आमच्या आधीच आलेल्या होत्या.संध्याकाळ झाली. ६:३० च्या सायंप्रार्थनेसाठी सर्वांनी एकत्र यायचे अशी सुचना आली. हॉलमधे डॉट ६:३० च्या ठोक्याला धीरगंभीर आवाजात सायंप्रार्थना सूरु झाली.आद्य शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक सुरु झाले.शालिनीताईंच्या गोड हळुवार आवाजात 'मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं ... हे शब्द कानी पडले आणि मनातल्या सगळ्या शंका कुशंकांचे निरसन झाले. आणि आपण अगदीच काही वनवासात येउन पडलो नाही याचा दिलासा वाटला.

दुसर्या दिवसापासुन सकाळी ५:३० ते रात्री ९:३० असे आमचे रुटीन सुरु झाले. आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मधुन बाहेर आल्यावर, नाही म्हटले तरी सुरवातीचे ३-४ दिवस इथल्या परिस्थितीशी, कार्यक्रमसंहितेशी आणि सर्वच सदस्यांशी जुळवुन घेणे कठीणच गेले! पहाटे ५:३० च्या योगाभ्यासासाठी पावणेपाच ला उठणे अनिवार्य होते. मुळात पहाटे उठण्याची सवयच नव्हती. नाईलाजाने पहिल्या दिवशी पावणे पाच ला उठलो. टीम मधे असल्यावर मिळते जुळते घेणे ही पहिली पायरी. स्नानादी शौचाविधींसाठी नंबर लावणे, एका गावातल्या असतील तर एकमेकींसाठी नंबर लावणे, इथे एकमेकांचे इगो आडवे येणे, ते सांभाळून घेणे ...हे सगळे सग़़ळे प्रकार झाले. बरोब्बर ५:२० ला योगेश्वर हॉलमधे हजर जहालो. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेले असुनसुद्धा इथे सर्वच जण शिबिरार्थी असल्याने सर्वजण समान लेव्हल ला आहोत हे समजले. मीराताईंची शिस्त/अनुशासनचे प्रथम दर्शन. पण कुठेही अतिरेक नव्हता. जबरदस्ती नव्हती.
ओंकाराचा ८ वेळा जप.. ओम सहनाववतु...झाल्यावर शालिनीताईंनी मधुर आवाजात प्रात:स्मरण सुरु केले आणि शरिरावर एक सुखद अनुभुतीची लाट उमटली. सामूहिक उपासनेचा परिणाम काय असतो तो कोणीही न सांगता अनुभवयास आला आणि त्याचबरोबर आपण इथे येण्याचा निर्णय अचुक होता याची खात्री पटली.

पहिल्याच दिवशी योगासने, सुर्यनमस्कार करतांना आपल्या शरीराची लवचिकता नष्ट झाली आहे याची प्रथमच जाणिव झाली. ७ वाजेपर्यंत योगाभ्यास संपवून आम्ही गीतापठणाला बसलो. गीतेतील कर्मयोगाच्या २६ श्लोकांचे संकलन आणि सुरेल चालीत त्याची आळवणी. यानंतर आमची 'चैतन्य', 'उत्साह', 'कौशल्य' , 'दृढता' अश्या वेगवेगळ्या गणात विभागणी झाली. . आम्ही ३० जण होतो.
सात्विक विचारांना पोषक असे सात्विक भोजन-अल्पाहार झाला. त्यानंतर ८ वाजता योगेश्वर हॉलसमोर जमायचे होते. आता वेळ होती श्रमसंस्काराची! सुरवातीला देशभक्तीपर गीत म्हणुन जोरजोरात नारे लावले. मग प्रत्येक गटाला कामे वाटुन देण्यात आली. योगेश्वर हॉल, आपापले निवास, बागकाम, आणि अन्नपुर्णा अशी साफसफाईची कामे होती. आणि मग खराटे, झाडुन, कुदळ, फावडे अश्या आयुधांसहित एकेक ग्रुपने नियोजित जागी कुच केली. सर्वच मन लावुन कामे करत होतो.

यानंतर ९ ते १० एक तासाची सुट्टी.. त्यात आपापल्या निवासस्थानी जाउन स्नानादी कर्मे उरकायची. फ्रेश होउन बरोबर १० वाजता योगेश्वर हॉल येथे जमायचे. तिथे १० ते ११ वाजेपर्यन्त विचारप्रवर्तक असे मा. विश्वासजी, मा दिक्षितजी, मा.सुजाताताई, मा. श्रीनिवासजी, मा. भानुदासजी यान्चे सेशन्स असायचे. सेशननंतर ,आज काय शिकलो यावर 'मंथन ' होई. गणशः चर्चेचे विषय वाटुन देत. ११ ते १२ अशी आपापल्या गटात चर्चा करुन कुणीतरी एकाने आपल्या गटाचे प्रतिनिधीत्व करत समोर जाउन तो विषय १० मिनीटात मांडायचा अशी संकल्पना होती. मग ते कधी मौखिक होत, तर कधी छोट्याश्या नाटिकेच्या स्वरुपात, तर कधी संपूर्ण गणाने समोर जाउन तो विषय मांडायचा अश्या स्वरुपाचे होत. मंथनाचे विषय आधी झालेल्या सेशनवर आधारीत असत तर कधी स्वामी विवेकानंदांच्या , एकनाथजी रानडे यांच्या पुस्तकातील काही लेखांचा संदर्भ घेउन असत.

यातुन टीम बिल्डीन्ग ची भावना होतीच. आपल्या टीमला रिप्रेझेंट करायचे तर ते उत्कृष्टच असले पाहिजे या हेतुन हिरीरीने भाग घेतला जायचा. चारीही टीम्समधे हेल्दी कॉम्पीटीशन असायची. यातुनच टीममधील काही अबोल सदस्यांना बोलके करणे, त्यांचे ही विचार समजावुन घेणे, त्यांना प्रतिनिधित्व करण्यास उद्युक्त करणे या सर्व प्रकारांनी सभाधीटपणा वाढला, आत्मविश्वासात वृद्धी झाली.

१२:३० ला भोजनासाठी अन्नपुर्णेत जायचो. तिथे ही गणशः भोजन वाढायची सेवा असायची. भोजनापुर्वी,ओम ब्रह्मर्पणम... हा श्लोक, त्यानंतर "प्रभो सेवाव्रत्या भक्त्या.. असे श्लोक सुजाताताई आमच्याकडुन गाउन घ्यायच्या. कडकडुन भुक लागली असतांना...समोर ताट भरलेले असतांना हे श्लोक म्हणणे संयमाची परिसिमा वाटायची. पण आता त्याची इतकी सवय झाली की आपापल्या घरी गेल्यावर, अगदी ऑफीसात सुद्धा टिफीन उघडला की आधी नकळत हात जोडले जातात ... आणि मुखी शब्द उमटतात. दुपारी भोजनासाठी १च तास आणि त्यात गणानुसार वाढायची सेवा. त्यामुळे काही वेळेस उशीर व्हायचा. तर दुसर्या गणातले मेम्बर आम्हाला वाढण्यासाठी थांबायचे. इतका सर्वांमध्ये एकोपा निर्माण झाला.

भोजनानंतर १ ते २:१५ विश्रांतीची वेळ. सव्वा दोनला वाजता परत योगेश्वर हॉलला गीतपठणासाठी जमायचे होते. दुपारची थोडीफार घेतलेली वामकुक्षी सोडुन भर २ वाजता परत हॉलवर जायचे सुरवातीला शिक्षा वाटायची. एकीकडे गीतपठणासारखा आवडता विषय होता. नंतर सवयीचे झाले. गीतपठणातील बारकावे, संस्कृतचे उच्चार, श्वासाचे चढउतार हे सर्व शिकायला मिळाले. पदावलीतल्या सगळ्याच गीतांमध्ये इतका गोडवा आहे आणि त्या तिघी ताई इतक्या समरसून शिकवायच्या की त्यात गुंगून जायचो, हा तास संपूच नये असे वाटायचे. लिंगाष्टक, श्रीनामनारायण, श्रीगणेशपंचरत्नस्तोत्र ' गिरकर उठना, चंदन है इस देश की मिट्टी, तन्मय हो जा मेरे मन, दिव्य ध्येय की ओर तपस्वी( केंद्र प्रार्थना), स्वामीजींवर रचलेले ' मूर्त महेश्वर...' ही माझी आवडती गीते.

त्यानंतर ३ वाजता चहा व्हायचा. मग पुन्हा एक अभ्यासपुर्ण सेशन. यात अष्टांग योग, भगवदगीता, योगीक जीवनपद्धती असे विषय होते. ४:३० पासुन पुन्हा योगाभ्यास. आता आसनानवर हळु हळु पकड येत होती. योगासने घाईघाईत करायची नसतात., अंतिम स्थितीत टिकुन राहणे हे जास्त महत्वाचे असते हे समजले. यानंतर खाऊ वाटप होई. खाऊ म्हणजे भाजके शेंगदाणे, फुटाणे, असं काही! मग निसर्गभ्रमणासाठी अर्धा तास राखुन ठेवलेला असे. यात काही ग्रुप जवळच्या टेकडीवर फिरायला जात. तर काहीजण तिथेच छोट्याश्या लायब्ररीत पुस्तके चाळत बसत.

त्यात एक दिवस तिथुन जवळच असलेल्या विवेकानंद केंद्र चालवत असलेल्या शाळेत गेलो. वळणावळणाचा रस्ता, प्रदुषण मुक्त हवा आणि निसर्गरम्य वातावरणात असलेली ही टुमदार शाळा. तिथेच बसून सायंप्रार्थना म्हटली. केंद्रातली सायंप्रार्थना म्हणजे अंतर्मुख होण्याची अवस्था. विलक्षण भावविभोर , अष्टसात्विक भाव जागृत करण्याची ताकत तिच्यात आहे.
रात्रीच्या भोजनानंतर ८ वाजता 'प्रेरणेतून पुनरुत्थान' हा माझा आवडता उपक्रम असायचा. यात विविध सामूहिक खेळ, अभिनय गीत, गुणदर्शन...! अभिनय गीतात चुकूनही सिनेमातील गाणी न घेता बालगीते घेतली होती. त्यामुळे आमचे कित्येक वर्षांपूर्वी हरवलेले निरागस शैशव पुन्हा अनुभवयास मिळाले. भन्नाट अनुभव होता तो!

त्यानंतर विश्वासाजींनी, सुजाता ताईंनी, प्रियाताईनी सांगितलेल्या बोधपर गोष्टी. या कधी अरुणाचलच्या असायच्या तर कधी शिलास्मारकाच्या, तर कधी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण ठाकूरजींच्या जीवनातल्या. एखाद्या लहान मुलासारखे आम्ही त्यांच्याभोवती बसून या गोष्टी ऐकण्यात मग्न होत असू. त्यानंतर 'हनुमान चालीसा' होऊन प्रियादीदी संपूर्ण दिवसाचे अवलोकन करत. दिवसाभरातले संपूर्ण कर्म 'श्रीकृष्णार्पणमस्तु' करून आम्ही झोपायला जात असू ते दुसर्या दिवशी काय शिकायला मिळणार/ ऐकायला मिळणार या उत्सुकतेनेच..

८ दिवसातच इतके रमलो की आता ८ दिवसांनी शिबीर समाप्ती आहे या विचाराने सुद्धा हुरहुर वाटायला लागली.
मधे एक दिवस आमची त्रिम्बकेश्वरला पिकनिक झाली.आम्ही काही जणांनी पहाटे 3 किमी चालत जाणे पसंद केले. तिथे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही सर्वांनी ' लिंगाष्टका' चा पाठ केला.नाष्टयाचे पैकेट्स सोबत घेतले होते, तिथे नवीनच झालेल्या म्हाळसादेवी मंदिराच्या आवारात बसून गप्पागोष्टी करत नाश्ता झाला. मीराताईंचे गाव ते, त्यांनी गावाबद्दल माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या.

15 दिवसाच्या कालावधीत काय शिकलो नसेल? योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आवर्ती ध्यान, त्राटक, योगिक जीवनशैली, याबरोबरच आमच्याकडून जलनेती, वमन करून घेतले गेले.
गंमत म्हणजे, या वास्तव्यात टी व्ही, रेडीओ, वर्तमानपत्र ई कुठल्याच मीडियाशी संबंध आला नाही. मोबाईल, नेट ही अगदि जरूरिपूरते वापरत होतो, त्यामुळं विलक्षण मानसिक शांती मिळाली.

एक परिपूर्ण योगिक जीवनशैलीचा परिपाठ आम्हाला तिथेच मिळाला.
असो. तर ही झाली पार्श्वभुमी!

खाणे- पिणे, नोकरी करणे, फार फार तर वाचनाचा छन्द जोपासणे...असा आयुष्याला एक एकसुरीपणा आला होता. आपले ध्येय काय, कशासाठी आपण जन्माला आलो आहोत वै वै काही प्रश्न मधुन मधुन पडायचे. त्याची उत्तरे या शिबिराने दिली.

खरं तर ' व्यष्टी ते समष्टी' या प्रवासाची छोटीशी झलक शिबीरातच मिळाली, नाही का! सुरवातीला आत्मकेंद्री असलेलो आम्ही प्रत्येक जण या 15 दिवसात दृष्टी व्यापक होऊन दुसर्याचा, समाजाचा अगदी विश्वाचा विचार करत होतो. अशा अनेक प्रवर्तक विचारांची, आत्मानुभवाची शिदोरी घेऊन पिंपळदहुन निघालो.
आमच्यातल्या कित्येकांनी तर आपल्या गावी परतल्यावर कार्यास सूरूवात देखील केली. माझ्यासारखे काही जण वैयक्तिक पातळीवर तिथले विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहोत.

*******
विवेकानंद केंद्राच्या शिबिरांच्या तारखांमध्ये सहसा बदल होत नाही.
पिंपळद येथील हे शिबीर दरवर्षी १५ मे ते ३० मे या कालावधीत असते.
२० जून ते २९ जून जम्मूजवळ 'नागदंडी' येथे योगा शिबीर असते
ऑगस्ट मध्ये ८ ते १४ ऑगस्ट स्पिरिच्युअल रिट्रिट हे शिबीर कन्याकुमारी येथे असते
नंतर डिसेंबर मध्ये कन्याकुमारी येथे २७ ते ३० डिसेंबर असे ३ दिवसाचे युवा शिबीर असते.
तसेच १ ते १५ डिसेंबर योगा शिबीर असते.
पुन्हा फेब्रुवारी मध्ये १९ ते २५ फेब्रुवारी अध्यात्म शिबीर कन्याकुमारी येथे आहे.

कन्याकुमारी किंवा काश्मीरच्या शिबिराचा नोंदणी फॉर्म त्या वेबसाइट वर दिला आहे.
फी नॉमिनल असते. आणि ती ऑनलाईन किंवा तिथे प्रत्यक्षात गेल्यावर करता येते.
फक्त रजिस्ट्रेशन आधी करून ठेवावे.
http://www.vivekanandakendra.org/ अधिक माहिती इथे मिळेल.

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

21 Nov 2016 - 5:58 pm | कलंत्री

सारगर्भ माहिती असल्यामूळे परत परत वाचून समजावुन घ्यावी लागत आहे. तुमचे कष्ट आणि सांगण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.

अजया's picture

21 Nov 2016 - 6:48 pm | अजया

खूप छान माहिती.

शशिधर केळकर's picture

21 Nov 2016 - 6:52 pm | शशिधर केळकर

छान आहे अनुभव. ३० नवीन लोकांबरोबर १५ दिवस राहाणे, ते ही शिस्तीच्या वातावरणात आणि सुरुवातीला द्विधा मनःस्थिती असताना हे खरेच विशेष.

आता दरवर्षी करणार का हे शिबिर? शिबिराहून परतल्यावर, नेहेमीचे रूटीन सुरू झाल्यावर शिविरात केलेल्या गोष्टींपैकी काही रोज चालू ठेवता येतात का?

आर्या१२३'s picture

22 Nov 2016 - 12:00 pm | आर्या१२३

धन्यवाद. हो नक्कीच! दर वर्षी पिम्पळद शिबीर तर करणारच.. त्याचबरोबर कन्याकुमारी, नागदन्डी येथिल शिबीर अटेन्ड करण्याचा मानस आहे.

<<शिबिराहून परतल्यावर, नेहेमीचे रूटीन सुरू झाल्यावर शिविरात केलेल्या गोष्टींपैकी काही रोज चालू ठेवता येतात का?<<
अगदी अगदी! दिवसातुन एकदा विशेष करुन सकाळी प्रत्येकी एक आसन, कमित कमी १२ सुर्यनमस्कार, प्राणायाम तसेच जेवणापुर्वी "ओम ब्रम्हार्पणम... ' म्हणणे , जेवणानन्तर १० मिनिटे वज्रासनात बसणे, सन्ध्याकाळी हनुमान चालिसा, रात्री 'श्रीकृष्णार्पणमस्तु' इतके तरी जमतेच. जलनेती /वमन हे ही महिन्यातुन एकदा सुटीच्या दिवशी घरच्या घरी करता येते.

विवेकपटाईत's picture

21 Nov 2016 - 8:26 pm | विवेकपटाईत

लेख आवडला.

सुरेख माहिती. धन्यवाद आर्या.

आर्या१२३'s picture

22 Nov 2016 - 11:52 am | आर्या१२३

सर्वांचे मन:पूर्वक आभार !

अतिशय सुरेख व उपयोगी माहिती.

आर्या१२३'s picture

29 Nov 2016 - 11:32 am | आर्या१२३

थॅन्क्स कबीरा! __/\__

आर्या१२३'s picture

29 Nov 2016 - 11:34 am | आर्या१२३

yoga1

सस्नेह's picture

29 Nov 2016 - 11:56 am | सस्नेह

उत्तम माहिती !
याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम झाला, जीवनशैलीमध्ये काही फरक पडला काय, हे समजून घ्यायला आवडेल.

विशाल कुलकर्णी's picture

29 Nov 2016 - 12:40 pm | विशाल कुलकर्णी

सुरेख अनुभव !
१९९४ साली विवेकानंद पुरम,कन्याकुमारी येथील केन्द्राच्या मुळ ठिकाणी एक २१ दिवसाचे योग आणि प्राणायाम शिबीर अटेंड केले होते त्याची आठवण झाली. SIS (Sync in Silence) असे त्या कोर्सचे नाव होते. दिनक्रम साधारण वरीलप्रमाणेच होता. मला केंद्राची एक गोष्ट खुप आवडली होती. ते कधीच समाजसुधारणेच्या, संस्कृती किंवा विकासाच्या गप्पा मारत नाहीत. त्यांचा संपूर्ण भर स्वयं-सुधारणेवर असतो. आपण सुधारलो (प्रत्येकाने जर स्वतःला सुधारायचे ठरवले ) तर समाज आपोआप विकसीत होत जातो. समाज सुधारण्यासाठी आधी स्वतःला सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. हे आणि इतके साधे सरळ सुत्र आहे विवेकानंद केंद्राचे. त्यामुळे मी मनापासून जोडला गेलो होतो केंद्राशी. १९९५ मध्ये सहा महिने केंद्राच्या अरुणाचल प्रदेशातील निवासी शाळांपैकी एका शाळेत बदली शिक्षक म्हणून इंग्रजी शिकवायचे काम सुद्धा केले आहे मी. ते सहा महीने म्हणजे आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहेत माझ्या.
जुन्या आठवणी ताज्या केल्यास. धन्यवाद !

आर्या१२३'s picture

1 Dec 2016 - 1:21 pm | आर्या१२३

अरेव्वा! विशाल! खुप छान वाटल तुझा प्रतिसाद पाहुन.
<<समाज सुधारण्यासाठी आधी स्वतःला सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. हे आणि इतके साधे सरळ सुत्र आहे विवेकानंद केंद्राचे.<< एका वाक्यात किती गहन, सारगर्भ बोलुन गेलास!
६ महिने अरुणाचल मधे होतास हे वाचुन खुप आनन्द झाला. (आता मन्जुताई तिथेच आहेत.)
तुझे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.

मंजूताई's picture

29 Nov 2016 - 2:51 pm | मंजूताई

अभिनंदन! एक येऊ देत तुमच्या त्याकाळातल्या अनुभवांवरचा लेख !

विशाल कुलकर्णी's picture

30 Nov 2016 - 3:10 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद. लिहीन सवडीने :)