रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.

मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?

हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.

http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...

कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.

धन्यवाद.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

9 Nov 2016 - 2:14 pm | चौकटराजा

आपली अर्थ व्यवस्था थेट कर ( आयकर ) व थेट नसलेले कर या दोन्ही प्रकारच्या कराम्वर अवलंबून आहे. आपण सारेच जण हे दोन्ही कर भरतो . आपल्याला नोकरी असल्याने कोणतीही टाळाटाळ करता येत नाही. तरीही व्याजाचे उत्पन्न सर्रास कमी दाखवणारे ५० टक्क्याच्या वर नोकरीदार करदाते आहेत.
आपल्यातील किती जण आपल्या मेडिकल कन्सल्टटं ना बिलाची पावती मागतो.? किती लोक रंगार्‍याला , सुताराला तीस तीस हजार मजुरीचे देऊन पावती मागतात ? इथे सर्व ठिकाणी आपण काळा पैसा निर्माण करतो. त्यावर थेट नसलेले कर भरले जात असले तरी आयकर भरला जात नाही. फुगेवाडीपुणे येथे एक प्रसिद्ध चहाचे हॉटेल आहे त्यावर नजर ठेवून आयकर
खात्याने धाड टाकली होती. आपल्या आयकर खात्याची पोलिसांची, न्यायव्यवस्थेची औकात ( लायकी) समाजकंटकानी ओळखली आहे त्यामुळे बिन्धास्त आयकर , सेवा कर बुडविणे, सिग्नल तोडणे, अनधिकृत बांधकामे करणे , अतिक्रमण करणे ई अराजक माजले आहे. आपण नोकरशाहीला, राजकारण्याना सरळ करू शकत नाही याची जाणीव मोदीना झाल्याने त्यानी हा प्रशासकीय मार्ग क्रमला आहे.

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 11:37 am | जयंत कुलकर्णी

काळा पैसा का तयार झाला याची कारणे गेल्या ७० वर्षात काय घडत होते यात शोधली पाहिजेत. ज्या काळात ७०% पर्यंत आयकर होता त्या काळात दुसरे काही झाले असते हे मानणे भाबडेपणा होईल. थोडक्यात काय चुका सरकार करणार आणि आपल्याला व आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे दुश्परिणाम भोगावे लागणार... :-(

पैसा's picture

9 Nov 2016 - 11:42 am | पैसा

छोट्या धंदेवाल्यांकडचा काळा पैसा एकूण काळ्या पैशाच्या नगण्य प्रमाणात असावा. त्यातूनही मोठे मासे आधीच सुटून गेले असणार. जेटली अर्थमंत्री असताना क्रिकेट कंट्रोल बोर्डसारख्या मंडळीला काही चिंता नाही. मला वाटते की फक्त राजकीय पक्ष आणि पाकिस्तानी आय एस आय या तडाख्यात सापडतील. बाकी कोणाला फारसा फरक पडत नाही. काळा पैसा तयार व्हायचा तसाही थांबणार नाहीच. कारण वडापाववाले काही रिसिट्स देणार नाहीत की रस्त्यावरचे पोलीस मामा शंभर रुपये घेऊन हेल्मेटशिवाय सोडणे थांबवणार नाहीत.

सोन्याची किंमत वाढली याचा अर्थ मी असा लावत आहे की सोनार लोक आधीच्या तारखेच्या पावत्या देऊन सोने विकत आहेत.

आनन्दा's picture

9 Nov 2016 - 11:45 am | आनन्दा

मला उलटे वाटते.. याउलट जास्तीत जास्त काळा पैसा पांधरा करण्यासाठी तो जनधन किंवा गरीब वस्तीतून फिरवला जाईल, ज्यातून त्यांना काही काळ सुगीचे दिवस बघायला मिळतील.

कै कळ्ळं नाही. २०००० रु कमी का येतील? आणि प्रामाणिकपणे मिळवणारे खर्च का करणार नाहीत?
फाडलेल्या नोटांइतक्या मूल्याच्या सुरक्षित नोटा मिळणारच आहेत.
फरक नक्की कुणाला पडतो?

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 11:57 am | जयंत कुलकर्णी

कदाचित मला नीट लिहिता आले नसेल. समजा मी तुमचे २०००० रुपये काढूनच घेतले तर काय होईल याबद्दल मी लिहिले आहे. बदलायचा वैगेरे प्रश्र्नच नाही.....म्हणजे अर्थव्यवस्थेतील निम्मे पैसे मी काढून घेतले. जसे शेअर मार्केट मधून परदेशी बँका पैसे एकदम काढून घेतात त्याप्रमाणे....

मलाही नीट लिहीता येणार नाहीये. म्हणून सविस्तर लेखाची वाट पहातोय.
पण मी फक्त कायदेशीर मार्गाने मिळालेला पैसा बाळगून असल्याने फरक पडत नाही, असा विश्वास आहे, इतकंच.
जे काढून घेतलेत त्यातले खूप खोटे आहेत, पण म्हणूनच मला माझ्याकडचे बँकेत भरता येणार आहेत.
अन्य प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पळवाटा काढणारे, पळून जाणारे, मोठ्ठ्या प्रमाणात असणारच.
पण बराच सकारात्मक फरक पडेल हे नक्की.

बाकी आज लोकसत्तेत इतका बालिश अग्रलेख (?) कसा आला काय माहीत!

पैसा's picture

9 Nov 2016 - 12:06 pm | पैसा

काळा पैसा सरकारने बजेट तयार करताना हिशेबात घेतलेला नसतो. मात्र प्रत्यक्षात तो बाजारात असतो. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे पैशाचा पुरवठा जास्त असला की त्यामुळे विकत घ्यायच्या वस्तू महाग होणार. आता पुरवठा कमी झाला तर वस्तूंची किंमत योग्य जागी यायला थोडीफार मदत होईल. महागाई कमी होऊ शकेल.

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 12:13 pm | जयंत कुलकर्णी

जेव्हा काळा पैसा अत्यल्प असतो त्या अर्थव्यवस्थेत तुम्ही म्हणता आहात ते एकदम बरोबर आहे. पण येथे म्हणतात की ५० % टक्के आहे. (खात्री नाही) येथे काय होईल याचा विचार करुन पहायला हवा...

काळा पैसा असला समजा ५०% तरी तो बराचसा मालमत्तेच्या स्वरूपात आहे. रोख कॅश फारच थोडी असणार आहे.

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 12:32 pm | जयंत कुलकर्णी

हं हे सम्जू शकतो...

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 12:33 pm | जयंत कुलकर्णी

आकडेवारी माहीत नाही. क्लिंटन यांच्या लेखाची वाट पहावी लागेल...

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 12:39 pm | जयंत कुलकर्णी

पण एकदा मालमत्ता घेतली की तो पांढराच झाला ना ? हे स्पष्ट होत नाही... विचार करायला पाहिजे... :-) म्हणजे समजा मी शेतजमीन घेतली एक लाखाची आणि रेडीरेकनर प्रमाणे त्याचे ६०,००० चेकने दिले आणि चाळीस दिले रोख तर ४०,००० बाजारत आलेना रोख... म्हणजे हे चाळीस अगोदरपासूनच काळ्यामधे होते... बरोबर ना ?

ती जमीन जेंव्हा विकाल तेंव्हा त्यावर होणाऱ्या नफ्यावर आपल्याला भांडवल वृद्धी कर भरावा लागेल. तेंव्हा जेवढी मूळ रक्कम कमी दाखवलं तेवढा जास्त कर पडेल. हीच वस्तुस्थिती जेंव्हा आपण घर विकाल तेंव्हाही होणारच.

पैसा's picture

9 Nov 2016 - 12:51 pm | पैसा

शिवाय जे ४०००० काळे राहिले ते या ना त्या स्वरूपात मार्केटमधे येणार आहेत. त्यातले काही पांढरे सुद्धा होतील पुन्हा. कारण तुम्ही बिल्डरला द्याल त्यातून तो सिमेंट खडी रेती, लेबर यांची बिले देणार आहे. जे सेव्हिंग राहील त्यातून तो पुन्हा जमीन घेईल किंवा बायको पोरांसाठी गिफ्ट घेईल. फार पूर्वी कोणातरी बँकेच्या सीएम्डीच्या घरी बाथरूमच्या माळ्यावर पैशाची बंडले लपवलेली सापडली होती तसे पैसे आता कोणी घरात ठेवत नाही.

जयंत कुलकर्णी's picture

9 Nov 2016 - 12:58 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर ! पण आता हेच ४०,००० पूर्णपणे नष्ट झाले असे मला म्हणायचे आहे... :-)

पैसा's picture

9 Nov 2016 - 1:05 pm | पैसा

त्या ४०००० मधून जो खर्च झाला असेल ते पुन्हा सर्क्युलेशनमधे आलेच असतील. चार ते दहा हजार जे त्याने आणीबाणीच्या खर्चासाठी म्हणून घरात नकद ठेवले असतील तेवढ्याचाच प्रॉब्लेम आहे. त्यातलेही काही सोनार, देवळे, छोटे लोक यांच्या माध्यमातून वाचवले जातील. व्यक्तींना फारच थोडा प्रॉब्लेम आहे. त्यांचे फार नुकसानही होणार नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

11 Nov 2016 - 12:15 pm | हतोळकरांचा प्रसाद

नष्ट झालेले पैसे (म्हणजेच अर्थात हिशेब नसलेली मालमत्ता) हि नष्ट झाली नाही तर ती बाजारात खेळेल आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण व्यवहारातच वापरली जाईल हे गृहीतक योग्य वाटत नाही. सध्य परिस्थितीत तरी तो पैसा १. निवडणूका २. भ्रष्टाचार ३. गुंडगिरी आणि अवैध धंद्यांमधील गुंतवणूक ४. बांधकाम व्यवसायातील गुंतवणूक (तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे यातील काही पैसा परत बाजारात खेळेल पण बऱ्याच प्रमाणात तो परत निवडणुका किंवा भ्रष्टाचार यात येण्याची शक्यता आहेच) ५. शैक्षणिक क्षेत्र (प्रवेशप्रक्रियेतील गैरवापर अर्थात भ्रष्टाचार) ६. कायदा वाकवणे (हे काय हे सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच माहित आहे). या आणि अशा इतर अनेक कामांतच मोठ्या प्रमाणात वापरला जातोय असे दिसतेय आणि यात समाज आणि अर्थव्यवस्थेची मोठी हानी असे नाही का वाटत?

अवांतर : सरकारच्या या निर्णयामागचे कारण अर्थव्यवस्थेतील काळा पैसा काही प्रमाणात तरी बाहेर काढणे हेच एकमेव नसून भारतात मुरवण्यात आलेला खोटा पैसे बाद करणे हे हि महत्वाचे कारण होते असं बऱ्याच अर्थतज्ञांचं मत दिसतंय.

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2016 - 12:29 pm | मार्मिक गोडसे

सरकारच्या या निर्णयामागचे कारण अर्थव्यवस्थेतील काळा पैसा काही प्रमाणात तरी बाहेर काढणे हेच एकमेव नसून भारतात मुरवण्यात आलेला खोटा पैसे बाद करणे हे हि महत्वाचे कारण होते असं बऱ्याच अर्थतज्ञांचं मत दिसतंय.

हेच मुख्य कारण आहे. उगाचच गुप्तता पाळून काळा पैसा बाहेर काढण्याचे नाटक केले गेले. विनाकारण लोकांना व बॅकांना त्रास दिला गेला.

जयंत कुलकर्णी's picture

11 Nov 2016 - 12:30 pm | जयंत कुलकर्णी

एन आय ए आणि Statistical Institute of India, Kolkata यांच्या संयुक्त आभ्यासाचा निष्कर्ष मागच्या वर्सीच जाहीर झाला त्यात कुठल्याही क्षणी ४०० कोटी पेक्षा जास्त बनावट नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत नसतात असे म्हटले आहे....
स्त्रोत : कालची इंडिया टुडेवरील चर्चा.

मलाही कालपासुन हाच प्रश्न पडला आहे..A query:

Lot of blackmoney holders have not declared black money till Oct 16 as per the time frame given by govt.

Before today's decision:
His money was hidden somewhere but definately was geting rotated in the economy in small denominations.

After today's decision:
Only a fool blackmoney holder will go to bank and submit his money. Rather he will prefer to burn the currency.

In this scenario how this decision will help to bring the black money into the white economy?

नाही. या पैसा इकॉनोमीमध्ये येऊन पैसा फ्लड होईल अशी भीती मला वाटते. कारण त्यांना पैसा पडून राहणे परवडणार नाही. त्यामुळे कोणत्यातरी मार्गाने हा पैसा इकॉनॉमीमध्ये आणण्याचा ते प्रयत्न करणार यात शंका नाही. ़किंबहुना हे २ महिने त्यासाठीच दिलेले असावेत. तसेही माझ्याकडे जर काळा पैसा असेल तर तो जाळण्यापेक्षा मी तो वाटेन, आणि त्याबदल्यात लोकांचे गुडविल घेईन.. आणि हाच हेतू असावा असे वाटते.
या व्यतिरिक्त जो काळा पैसा नुसताच पडून आहे पोत्यांमध्ये तो राहिला काय किंवा जळला काय काय फरक पडतो?

अप्पा जोगळेकर's picture

9 Nov 2016 - 2:03 pm | अप्पा जोगळेकर

५०% संपत्ती जी फाडून टाकली याचा अर्थ लोकांची क्रयशक्ती कमी झाली. फक्त त्या लोकांची ज्यांनी कर न भरता पैसे घरात ठेवले होते. हे तेच लोक आहेत ज्यामुळे घरे, जमीन, सोने वगैरे किमती अवाच्या सवा फुगल्या होत्या आणि ओव्हर ऑल महागाई वाढली होती.
जे कर भरत आहेत त्यांची क्रयशक्ती तेवढीच राहिली.
शिवाय पैशांची चण्चण निर्माण झाल्याने मॉरिशस- एफ्डीआय- शेअर मार्केट मार्गे जो पैसा चलन फुगवत होता तो मोकळा होउन बँकांमधे येईल. हे चांगलेच आहे.

पैसा's picture

9 Nov 2016 - 2:32 pm | पैसा

आज शेअर मार्केट पडलंय. सकाळी १५०० पॉइंट्स्ने पडले होते. आता बरेचसे रिकव्हर झाले. ट्रम्प निवडून येणे आणि ५००/१००० च्या नोटा रद्द दोन्हीचा परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर्स जास्त मोठ्या प्रमाणात कोसळले.

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 2:07 pm | मराठी कथालेखक

मजा एका घरात महिन्याला ४०,००० येत असतील त्यातील २०००० रुपायाच्या नोटा तुम्ही फाडून टाकल्या तर काय होईल ? ते कुटुंब २०००० कमी खर्च करणार म्हणजे त्या २०,००० वर अवलंबून असलेल्या लोकांना ते मिळणार नाहीत.

पण याची दूसरी बाजू काळा पैसा बाळगणार्‍यां अतिश्रीमंतांची क्रयशक्ती कमी होईल. त्याने महागाई कमी होण्यास मदत होईल. झालंचतर अर्थिक विषमता किंचित का होईना कमी होईल.

अनुप ढेरे's picture

9 Nov 2016 - 11:41 am | अनुप ढेरे

या निर्णयाचा फटका अंबानी-अदानी-मल्ल्या छाप लोकांना बसणार नाही. त्यांनी ऑल्रेडी तो पैसा बाहेरून फिरवून शेअर बाजार किंवा तत्सम ठिकाणी आणला असणार आहे. पण खासगी कॉलेजवाले, डॉक्टर, बिल्डर, हॉटेलवाले, सरकारी कंत्राटदार, दुकानदार हे लोक जे भरपूर काळा पैसा बाळगतात (आणि भ्रष्टाचाराच्या नावाने श्या घालतात) त्यांना फटक

नाखु's picture

9 Nov 2016 - 12:06 pm | नाखु

बरोबर आहे ज्या अंबानी आणि बिर्ला यांना (करचुकवेगिरी आणि काळा पैसा) या बद्दल शिव्या/दूषणे देणार्यांना वर उल्लेख केलेल्या शिक्षणसम्राट्,मालमत्ता माफिया,सरकारी कंत्राटदार,आणि आडत्+दलाल्+कमीशन एजंट ९थोडक्यात जे मोठ्ठ्या रकमेचे (रोकड) व्य्वहार करतात आणि अर्थात त्याची कोठेही नोंद नसते (त्यामुळे आपसूक कर्+करदायीत्व-लाभार्थी हे होतच नाहीत) त्यांचा आवाकाही मोठ्ठा असेलच की! किमान १००० जरी वाळू माफीया धरले तरी एका मिनि अंबानीइतके तरी असतील्च की.

राजकीय लोकांना यांचेकडून येणारी रसद रोडावेल (चाप बसेल) ही माहीत असूनही असा निर्णय घ्यायचे धाडस केल्याबद्दल तरी नमोंना धन्यवाद देऊयात की.

पांढरापेषा नाखु

ज्यांच्याकडे आहे त्यांनी अर्जंट सोनं घेतलं ओळखीच्या ज्वेलरी शॉप मधून . मुंबईचा डायमंड मार्केट सर्वात मोठं मार्केट आहे कित्येक कोटींचे व्यवहार चालतात . तिथे आज एजन्ट झालेत नवीन कॅश पन्नास लाख पर्यंत एक्सचेंज करून मिळेल त्यासाठी.कारण ज्यांना हवेत त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे . खरा प्रॉब्लेम होणारे तो छोटे उद्योजक ,गैरव्यवहार करणारे ,गुन्हेगार ,बार मध्ये काम करणाऱ्या बायका,अनधिकृत रस्त्यावर गाडी लावून धंदा करणारे लोकं. पण काहीतरी होईल इंडिया इस जुगाड कंट्री . बाकी निर्णय धाडसी आहे पेंडिंग होता घेतला ह्या बद्दल मोदी यांचे अभिनंदन .

या सगळ्यांची बँकामधे खाती असतात आणि आताही ते कितीही पैसे बँकेत स्वतःच्या खात्यात भरू शकतात. काहीच नाही तर झोपडपटीतल्या लोकाना लायनीत उभे करून नोटा बदलून घेतील. कदाचित पुढच्या वर्षी इन्कम टॅक्सच्या जाळ्यात सापडतील एवढंच.

ह्यामुळे सोन्याचा भाव रात्रीतून १३% वाढलाय! ज्वेलरकडे वाढलाय, कमोडिटी मार्केटमध्ये/अधिकृत भाव अजून ३००००+ आहे.

सुबोध खरे's picture

9 Nov 2016 - 1:05 pm | सुबोध खरे

सराफ लोक काही लोकांचा काळा पैसे पांढरा करून देतात. ते असे -- आज घेतलेले सोने दहा दिवसापूर्वी घेतलेले आहे असे दाखवतील ज्यात ग्राहकाला बिल ३००००/- रुपयाचे मिळेल आणि वर १०,०००/- सराफाच्या खिशात जातील. अर्थात हे कुणाला शक्य आहे. ज्याचे उत्पन्न लपवलेले आहे. उदा.वडापाव वाला.
अर्थात हे त्याच्या उत्पन्नात गणले जाईल आणि त्यावरही त्याला कर भरावाच लागेल. शिवाय पुढच्या वर्षी उत्पन्न "कमी" झाले तर आयकर अधिकाऱ्यांची "मेहेर नजर" त्यांच्या वर पडेलच.
पण सरकारी अधिकारी ज्याचा पगार (आणि उत्पन्नाचा स्रोत) माहित आहे त्याने जर भरभरून सोने खरेदी केले तर ते त्याच्या ज्ञात उत्पन्ना पेक्षा जास्त असेल. म्हणजे कर अधिकारी जर सराफांच्या खनपटीला बसले तर सराफाबरोबर असे लोकही बाराच्या भावात जातील.
जर सरकारने ठरवले ( आणि त्यांच्या जवळ पुरेसे प्रामाणिक अधिकारी असतील तर ( आणि तरच) काळा पैसे खणून काढणे शक्य होईल. दुर्दैवाने ७० वर्षे किडलेल्या या समाजव्यवस्थेत असे अधिकारी शोधून त्यांच्या कडून इतक्या मोठ्या प्रमाणावर खटले भरून सज्जड पुराव्यासहित इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट अधिकारी व्यावसायिक राजकारणी याना शिक्षा देवविणे हि इतकी सोपी गोष्ट नाही.( दर एक प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे नऊ भ्रष्ट अधिकरी असावेत असा माझा कयास आहे)
आज बरीच माध्यमे नुसत्या नोटा रद्द केल्याने काय होईल म्हणून काव काव करीत आहेत. परंतु हि स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात आहे. त्याला निकराचा विरोध होणारच आहे.
सर्व सामान्य माणसाला "त्रास" होईल हा आरोप करण्याचा अगोदर साडे चार कोटी बँक खाती(जन धन) उघडली आहेत आणि सामान्य माणसाला या नोटा आपल्या "स्वतःच्या" खात्यात काहीही कष्ट न करता भरता येणार आहेत हि वस्तुस्थिती दृष्टीआड केली जात आहे. ज्याचे उत्पन्न महिना २० हजार पेक्षा कमी आहे अशा माणसाला एक पैसाही कर लागत नाही हि वस्तुस्थिती विसरून गरिबांचे हाल कुत्रा खात नाही हि कोल्हेकुई करणारे राजकारणी त्यांचे दुकान बंद होत असल्याने असे वागत आहेत हे समजून घ्या.
१५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात आणेन हि घोषणा करण्याच्या अगोदर आपली समाजव्यवस्था इतकी किडलेली आहे हे श्री मोदींच्याही कल्पनेत हि नसावे. प्रत्यक्ष राज्यशकट हाती घेतल्यावर हि वस्तुस्थिती लक्षात आली. तरीही ते जे करत आहेत ते अत्यंत स्तुत्य आहे. दुर्दैवाने एकखांबी तंबू चालवणे किती कठीण आहे हे सामान्य माणसांना समजत नाही. त्यातून प्रसार माध्यमांची दुकाने बंद झाल्याने त्यांनी मोठा गदारोळ केला असला तरीही अजून तरी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत

वामन देशमुख's picture

9 Nov 2016 - 1:54 pm | वामन देशमुख

१५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात आणेन हि घोषणा करण्याच्या अगोदर आपली समाजव्यवस्था इतकी किडलेली आहे हे श्री मोदींच्याही कल्पनेत हि नसावे.

"१५ लाख आणून प्रत्येकाच्या खात्यात जमा करीन " अशी घोषणा मोदींनी कधीही केली नव्हती.

"भारतीयांचा परदेशात इतका काळा पैसा आहे कि तो जर परत आणला तर प्रत्येक भारतीयाला १५ लाख रुपये मिळू शकतील." अश्या अर्थाचे केवळ तुलना दाखवणारे, आश्वासनाच्या जवळपासही न जाणारे ते वाक्य होते. संदर्भासाठी हा विडिओ बघा.

हा माझा प्रतिसाद केवळ फॅकच्युअल नोट आहे, आपल्या मताशी असहमती नाही.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 1:15 pm | संदीप डांगे

मी पुढच्या तीस दिवसांपर्यंत क्लायंट कडून कॅश स्वरुपात ५०० व १००० च्या नोटांच्या रुपात पेमेंट्स घेऊ शकतो काय? हे कायदेशीर आहे काय? म्हणजे नोटा आजपासून लीगल टेन्डर नाही म्हणजे सामान्य लोक्स एकमेकांसोबत त्याचे व्यवहार करु शकणार नाहीत काय आजपासून?

अप्पा जोगळेकर's picture

9 Nov 2016 - 1:49 pm | अप्पा जोगळेकर

घेउ शकता. ३० डिसेंबरच्या आत बँकेत भरा म्हणजे झाले.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 1:50 pm | संदीप डांगे

धन्यवाद! अब आयेगा मजा... ;)

पैसा's picture

9 Nov 2016 - 1:54 pm | पैसा

पण ते स्वतःच्या जबाबदारीवर. लीगल टेंडर नाही याचा अर्थ ते घेणे कायद्याने बंधनकारक नाही. बेस्ट म्हणजे चेक किंवा ऑनलाईन एन ई एफ टी पेमेंट घ्या. पैशेबुडव्या क्लायंटसकडून पैसे काढायची नामी संधी आहे! =))

आनंदी गोपाळ's picture

9 Nov 2016 - 1:50 pm | आनंदी गोपाळ

घेउ नका. ते पैसे व्यवहारात चलन नाहीत.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 1:52 pm | संदीप डांगे

अरे...? :(

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 1:54 pm | संदीप डांगे

मला वाटलं की मी बॅन्केत भरु शकतो ना ३० डिसेंबरपर्यंत? मग तोवर मी क्लायंटकडून कॅश घेऊन माझ्या अकाउंटला जमा करु शकतो. हां, काँप्लिकेशन्स जाणवत आहेत, ती कोणती त्याबद्दल इथे जाणकारांना विचारत होतो.

पैसा's picture

9 Nov 2016 - 2:00 pm | पैसा

ते सगळे पैसे ९ तारखेच्या आधी आले होते असे दाखवावे लागेल. ज्या व्यवहाराला पॅन नंबर द्यावा लागतो म्हणजे रु.५०००० च्या पुढे बँकेत पैसे भरणे, असे व्यवहार रोख पैशात टाळावे लागतील.

न विसरता ३० तारखेच्या आत पैसे बँकेत पोचलेच पाहिजेत. चुकून घरी राहिले तर मग पोराना चित्र काढायला द्यावे लागतील.

तसे घेतल्यास त्यांची जबाबदारी तुम्ही आपल्या अंगावर घेत आहात.
ते पैसे ९ तारखेपूर्वीच्या व्यवहारात तुमच्याकडे आले असे सांगून तुम्ही घेत आहात. जर तुमची सेवा 'अत्यावश्यक सेवा' नसेल तर असे घेणे चुकीचे आहे.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 1:57 pm | संदीप डांगे

ते पैसे ९ तारखेपूर्वीच्या व्यवहारात तुमच्याकडे आले असे सांगून तुम्ही घेत आहात. जर तुमची सेवा 'अत्यावश्यक सेवा' नसेल तर असे घेणे चुकीचे आहे.

>> हा खरा मुद्दा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 11:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

तेवढेच नाही...

"इतका मोठा बिझनेस ८ नोव्हेंबर पर्यंत केला आणि त्यानंतर ३० तारखेपर्यंत अचानक माश्या मारत बसावे लागले होते, कायकी बुवा !" हे आयकर अधिकार्‍यांना मोठ्या निष्पाप चेहर्‍याने समजावून देत आहोत, अशी कल्पना करा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ;) :)

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 11:59 pm | संदीप डांगे

सरजी, माझ्या धंद्यात हे नेहमीचं आहे, ;)

कधी जॅकपॉट लागतात किंवा काही महिने तोंड मिळवणी करता करता हालत खराब होते, जॅकपॉट लागला की आयकर वाले विचारायला येतात, उपाशी मरायला लागलो कि कोण कुत्रं विचारत नाही. =))

बादवे, 'एवढी मोठी' वैगेरे लाखो करोडोची ट्रांझाकशन होत नै आपलीकडे,;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Nov 2016 - 11:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

चौकशीत केवळ तोच महिना नाही तर तुलना करायला मागचे अनेक महिने अथवा रक्कम मोठी असल्यास वर्षदोन वर्षाचे ITR-V बघतील.

शिवाय, ट्रांझॅक्शनची लॉटरी ज्याने दिली त्या क्लायंटचीही चौकशी होईलच व ट्रांझॅक्शनच्या प्रोडक्ट/सेवेचा पुरावाही लागेल.

ए ए वाघमारे's picture

9 Nov 2016 - 4:09 pm | ए ए वाघमारे

लीगल टेन्डर नाही म्हणजे सामान्य लोक्स एकमेकांसोबत त्याचे व्यवहार करु शकणार नाहीत काय आजपासून?

बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे लीगल टेन्डर नाही म्हणजे भारत सरकार/आरबीआय ने त्याची गॅरंटी समाप्त केली आहे. काल रात्रिपासून ते कुठल्याही व्यवहारासाठी मान्य नाही. फक्त लोकांना त्रास होवू नये म्हणून ११तारखेपर्यंत थोडी सूट दिलेली आहे.

बॅंकेत पैसे भरणे हा व्यवहार/व्यापार नाही. तसेच नोटा बदलून घेणे हाही व्यवहार नाही. व्यवहारात Transfer of title due to sales/ Provision of service in exchange of a consideration असते.

चेक हे एक Negotiable Instrument आहे.

बायदवे, बहुधा भारतीय रुपया हे नेपाळ व भूतानमध्येही लीगल टेंडर आहे.तिथेही हे लागू होईल.

पाटीलभाऊ's picture

9 Nov 2016 - 1:41 pm | पाटीलभाऊ

भविष्यात याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील हे जाणण्यास उत्सुक...!
पण जे लोक अतिशय दुर्गम प्रदेशात अथवा खेडेगावात राहतात (तसे त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या रकमेच्या नोटा असण्याची शक्यता कमीच आहे...पण तरी...) त्यांच्यापर्यंत हि बातमी पोहोचली गेली पाहिजे जेणेकरून ते सुद्धा नोटा बदलून घेऊ शकतात.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर देशातील नागरिकांच्या मनात शेकडो प्रश्न उपस्थित झाले आहेत. घरातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचं करायचं काय असा यक्ष प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे. या आणि अशाच प्रश्नांनी तुम्ही देखील त्रस्त झाला असाल. पण आता काळजी करु नका. जाणून घ्या 500-1000 च्या नोटांविषयी सगळ्या प्रश्नांची उत्तरं.

notes

1. ज्यांना तात्काळ पैसे हवे आहेत. आणि ज्यांच्याकडे 500-1000 च्या नोटा आहेत त्यांनी काय करावं?

तुम्ही तुमच्या 500-1000च्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून बदलून घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिथं दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला तुमच्या या नोटा बदलून मिळतील.

2. 500-1000च्या नोटा कशा बदलून घ्याल?

तुम्ही 500-1000च्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जाऊन ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र) दाखवून एका दिवसाला 4000 रुपयापर्यंत नोटा बदलता येतील.

उदा. जर तुमच्या कडे 500च्या 20 नोटा असतील म्हणजेच दहा हजार असतील तर त्यापैकी एका दिवसाला तुम्हाला आठच नोटा (4000 रुपयांच्या नोटा) बदलून मिळतील.

3. 500-1000च्या नोटा कधीपर्यंत बदलू शकता?

500 आणि 1000च्या नोटा उद्यापासून 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016पर्यंत बदलू शकतात. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 4 हजारपर्यंतच्या नोटा बदलता येतील. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत 4 हजारपेक्षा अधिक मर्यादा वाढविण्यात येईल.
तसेच जर तुमच्याकडे 500 ते 1000च्या नोटा असतील तर 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँकेत जमाही करता येतील.

4. किती रुपयांपर्यंतच्या नोटा बदलता येऊ शकतात?

तुम्ही एका दिवसात फक्त 4000 रुपयापर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदलून घेऊ शकतात. म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 60,000 रु. पर्यंत नोटा बदलू शकता. 25 नोव्हेंबरपासून नोटा बदलण्याचा मर्यादेत वाढ करण्यात येईल. पण ती नेमकी किती असेल याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही..

5. 11 नोव्हेंबरला एटीएम सुरु झाल्यानंतर किती पैसे काढू शकता?

18 नोव्हेंबरपर्यंत एटीएममधून तुम्ही दररोज 2000 रुपये काढू शकता. त्यानंतर त्याच्या मर्यादेत वाढ करण्यात येईल. तसेच बँकेतून एका दिवसात 10,000 रुपये आणि आठवड्याभरात 20,000 रुपये काढता येतील. एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा केव्हा वाढविण्यात येईल याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. पण नोटांची मागणी सामान्य झाल्यावर पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्यात येईल

6. 500 ते 1000 नोटा कुठे वापरता येतील?

रेल्वे तिकीट काउंटर, विमानतळ तिकीट काउंटर, सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंपवर (इंडियन ऑईल, एचपी, बीपी) 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत वापरता येतील. याशिवाय सरकारी अधिकृत दूध केंद्र, शवदहन गृह येथे या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत 12 वाजेपर्यंत वापरता येतील. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी तुमची सध्यातरी अडचण होणार नाही.

7. एकाच दिवसात वेगवेगळ्या बँकांमधून नोटा बदलता येतील का?

नाही, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे. तिथून तुम्ही नोटा बदलून घेऊन शकतो. जर तुम्ही दुसऱ्या बँकामध्ये नोटा बदलण्यास गेलात तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती देऊन आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. ज्याचं बँकेत खातं नाही त्या व्यक्ती त्यांचे मित्र किंवा नातेवाईकांकडून लिखित मंजुरी घेऊन त्याच्या खात्यातील बँकेतून नोटा बदलून घेऊ शकतात.

8. जर 30 डिसेंबरपर्यंत नोटा जमा नाही केल्या तर?

500 आणि 1000 च्या नोटा तुम्ही 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा नाही करु शकलात तरीही तुमच्याकडे 31 मार्च 2017पर्यंत वेळ आहे. रिझर्व्ह बँक यासाठी एक वेगळं सेंटर अथवा ऑफिस निश्चित करेल. जिथे जाऊन तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करुन तुमचे पैसे जमा करावे लागतील. तसंच त्यासोबत ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे.

9. कधीपर्यंत बंद राहणार एटीएम?

9 आणि आणि 10 नोव्हेंबरला एटीएम बंद राहणार

10. 500 ते 1000च्या नोटा कुठे आणि कधीपर्यंत वापरता येतील?

11 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, विमान तिकीटं, रेल्वे तिकीटं यासाठी या नोटा वापरता येतील.

11. का घेतला सरकारनं हा निर्णय?

काळा पैसा बाहेर येण्यासाठी मोदी सरकारनं हे मोठं पाऊल उचललं.

12. नव्या 2000 आणि 500च्या नोटा कधीपासून मिळणार?

आरबीआयनं स्पष्ट केलं आहे की, नव्या 500 आणि 2000च्या नोटा या 10 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये येणार आहे. तेव्हापासून त्या उपलब्ध असतील.

वरुण मोहिते's picture

9 Nov 2016 - 2:00 pm | वरुण मोहिते

पण बिल पेंडिंग आहेत तर ऑनलाईन व्यवहार सांगा बेस्ट .

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 2:13 pm | मराठी कथालेखक

काळा पैसा बाळगणार्‍यानी जरी बेनामी जमीनीत वगैरे काळा पैसा गुंतवला असेल तरी आता मार्केटमधला काळा पैसा कमी झाल्याने (पुनर्विक्री करताना) या जमिनीचा भाव कमी होईल.
तसेच काळे पैसे रोखीने बाळगणार्‍यांची क्रयशक्ती कमी होईल.
त्यामुळे एकूणातच महागाई कमी होईल.

सहज म्हणून माझ्या मित्राचा फोन आलेला ज्याची ठाणा आणि विक्रोळी ला दोन शॉप आहेत . घेत आहेत पैसे . गम्मत आहे भारतात

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 2:23 pm | मराठी कथालेखक

नोटा घेतल्या नाहीतर त्याचा धंदा बुडेल आजचा...हे कुणाला परवडणार.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 2:35 pm | संदीप डांगे

जुन्या नोटा रद्द केल्यात ही चांगलीच घटना. पण नव्या नोटा सुरु करायला नको होत्या.
त्यापेक्षा सरसकट कॅशलेस व्यवहार व्हायला हवेत. अर्थात धडाधड एका रात्रीत सर्वच बदल केले तर अराजक माजेल.

सुबोध खरे's picture

9 Nov 2016 - 3:06 pm | सुबोध खरे

आज सकाळी मी दवाखान्यात आलेल्या सर्व रुग्णाना 500-1000 च्या नोटा चालणार नाहीत असे सांगितले त्यावर एक सोडून बाकी सगळ्यानी धनादेश दिले.एका धंदेवाल्याने मला या नोटा दोन दिवस चालतील आणि तुम्ही त्या घेतल्या पाहिजेत असा शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला. मी धनादेश घेईन नोटा घेणार नाही असे स्पष्ट सांगितले. यावर तो तणतणत निघून गेला.मुलुंड मध्ये कोणीही रेडिओ लॉजिस्ट अशा नोटा घैत नाही.लोकांचे काळे धन सफेद करण्याची माझी इच्छा नाही.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 3:15 pm | संदीप डांगे

सगळे रुग्ण आधीच चेकबुक सोबत घेऊन आले ह्याबद्दल आनंद वाटला.

बाकी, ह्या नोटा बंद व्हायच्या आधी लोकांचे किती काळे धन आपण सफेद केले असेल ह्याबद्दल आपण काही विचार केला आहे का? कारण मला जरा हे समजलेले नाही.

वर काही लोक म्हणतायत की तुम्ही नोटा स्विकारुन बॅन्केत आपल्या खात्यात थेट भरु शकता. त्यात कोणाचा काळा पैसा सफेद कसा होईल?

दोन रुग्ण संध्याकाळी चेक देऊन रिपोर्ट घेउन जाणार आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 3:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

वर काही लोक म्हणतायत की तुम्ही नोटा स्विकारुन बॅन्केत आपल्या खात्यात थेट भरु शकता. त्यात कोणाचा काळा पैसा सफेद कसा होईल?

पेशंटने त्याच्या काळ्या (त्याने कर न भररेल्या) पैशातून नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) दिल्या तर त्याच्या काळ्या पैश्याचा (पांढरा) उपयोग झाला असे होईल.

अश्या मिळालेल्या नोटा डॉक्टरला (किंवा इतर कोणत्याही व्यावसायीकाला) बँकेत भराव्या लागणार आहेत, अर्थात हे उत्पन्न लपवणे शक्य नसल्याने त्यावर सरकारला योग्य वेळेस योग्य तो कर मिळेल. त्यामुळे अश्या नोटा कायदेशीरारित्या स्विकारणे शक्य असले तरी तो नैतीक गुन्हा समजायला हरकत नाही. कारण तसे करण्याने काळा पैसा वापरात आणायला मदत होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

असे असले तरी ही चोरवाट फार मोठ्या रकमेसाठी वापरता येणार नाही.

कारण, भूतकाळातील व्यवसायाच्या उत्पन्नापेक्षा या वर्षी अचानक खूप जास्त उत्पन्न दाखविले व त्यावर कर देण्याची तयारी दाखवली; तरीही आयकर विभाग उत्पन्नाच्या स्त्रोताच्या वैधतेबद्दल चौकशी करू शकतो व त्यात गडबड दिसल्यास कायदेशीर कारवाई करू शकतो.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 3:42 pm | संदीप डांगे

जरा कन्फुजिंग आहे. सदर नोटा ह्या कर न भरलेल्या स्रोतातून आल्या आहेत कि नाही हे तपासण्याची कोणतीही पद्धत नाही. बॅन्क ३० डिसेंबरपर्यंत नोटा स्विकारत आहेत. म्हणजे त्या डिसेंबर ३० पर्यंत वैध आहेत. कारण त्यानंतर बॅन्कसुद्धा स्विकारनार नाहीत.

नैतिकतेचा मुद्दा अवांतर आहे असे वाटते.

"कायदेशीर की बेकायदेशीर" हा एवढा मुद्दा घेतला तर कशी परिस्थिती असेल?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 3:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा प्रश्न प्रिएम्प्ट करून त्याचे उत्तर वर अगोदरच दिलेले आहे :)

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 3:46 pm | संदीप डांगे

आपल्या दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी आले. उत्तराबद्दल धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 4:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

डॉ खरेंचा नोटा न स्विकारण्याचा मुद्दा वैधता आणि नैतिकता अश्या दोन्ही दृष्टीने बरोबर होता, म्हणून त्या दोन्हींचा उल्लेख केला...

१. वैधता / कायदेशीरपणा : पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आणि नंतर रिझर्व बॅकेच्या परिपत्रकात ८ तारखेच्य मध्यरात्रीनंतर नंतर कोणत्या स्थानांना जुन्या नोटा स्विकारता येतील याची यादी दिली आहे. त्या यादीत खाजगी क्लिनिक्स नाहीत. त्यामुळे खाजगी क्लिनिक्सने त्या नोटा स्विकारणे हे बेकायदेशीर आहे. (या अटीमागचा मुख्य उद्येश काळा पैसावाल्यांना त्यांचा काळा पैसा वापरायला मदत होऊ नये हाच आहे.)

२. नैतिकता : सरकारच्या आदेश असो की नसो, काळा पैसेवाला त्याच्या काळ्यापैशाचा व्यवहारात उपयोग करत असावा असा संशय असला तरी (विशेषतः सद्य परिस्थितीत असा संशय घेणे योग्य होईल) त्याला मदत करणारी कृती करणे नैतिकतेला धरून होणार नाही. (रुग्णाचा पैसा पांढरा असला तर तो आज डॉक्टरला चेक देऊन, उद्यापासून ३० डिसेंबरपर्यंत आपल्या जुन्या नोटा स्वतःच्या बँक खात्यात भरू शकतो. म्हणजे रुग्णाची अडचण होण्याचा प्रश्नही येत नाही.)

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 4:07 pm | संदीप डांगे

या अनुषंगाने जयंत काकांनी मांडलेला मुद्दा योग्य ठरतो असं वाटतं

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेगळ्या शब्दांत सांगायचे तर...

सरकारी यादीत असलेल्या जागा सोडून इतर ठिकाणी रद्द झालेल्या नोटा स्विकारल्या गेल्या नाही तर सरकारला (काळ्या पैशाची) पावती ज्याच्या नावे असायला पाहिजे त्याच्या नावे फाडता येईल. :) ;)

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 12:04 am | संदीप डांगे

या संदर्भात 'बिल न देता पैसे घेणारे डॉक्टर्स' यावर खरेंनी एक प्रतिसाद दिलाय तो असा की ते पैसे बँकेत भरून त्यावर कर भरला कि ते काळे राहत नाहीत, तो प्रतिसाद आणि आता हा नैतिकतेवाला प्रतिसाद याची सांगड कशी घालायची?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2016 - 3:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबद्दल असे म्हणता येईल :

१. वैध व्यवहारात पैसे देणार्‍या व्यक्तीने जर ते पैसे;
(अ) अवैध मार्गाने कमावलेले असतील किंवा
(आ) वैध मार्गाने कमावलेले पैसे करविवरणापासून लपवून त्यावरचा कर चुकविलेला असेल;
तर त्या व्यक्तीच्या हाती ते काळे (अवैध) पैसे होतात. अर्थातच, त्या काळ्या पैशांसाठी ती व्यक्ती जबाबदार व गुन्हेगार ठरते.

२. वैध व्यवहारात पैसे घेणार्‍या व्यक्तीला त्या पैश्याचा स्त्रोत काळा की पांढरा आहे हे विचारायचा कायदेशीर हक्क सर्वसाधारणपणे नसतो. किंबहुना,सर्वसाधारण नागरिकाकडे त्या स्त्रोताच्या खरेपणाची खात्री करण्याची साधने असण्याची शक्यताही नगण्य असते. त्यामुळे, त्याने ते पैसे (उत्पन्न) योग्य प्रकारे आपल्या करविवरणार दर्शवून त्यावर योग्य तो कर भरला, की पैसे घेणार्‍याची कायदेशीर जबाबदारी संपते. अर्थातच, त्याच्या हातातील पैसे पांढरे (वैध) असतात.

३. अवैध व्यवहारात, कोणत्याही प्रकारचे (काळे किंवा पांढरे) पैसे हस्तांतरीत झाले तरी ते गुन्हेगारी पैसे असतात आणि दोन्हीही पार्टी गुन्हेगार असतात.

=========================

टीप : सद्या चर्चा उत्पन्नकराबद्दल (आयकर, इनकम टॅक्स) चालली आहे. आपल्या उत्पन्नावर योग्य रितीने योग्य कर भरला की ते पांढरे (वैध) होते. त्यावरचा कर चुकविला की ते काळे (अवैध) होते.

म्हणजेच, जी व्यक्ती आपल्या उत्पन्नातील सर्व किंवा काही पैसे काळे बनवते ती कायद्याने गुन्हेगार असते.

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 3:57 pm | संदीप डांगे

एग्झॅक्टली. अगदी करेक्ट आहे हे.

म्हणूनच कोणाकडच्या नोटा ह्या काळा पैसाच असतील अशी पूर्वग्रहदूषित दृष्टी योग्य नव्हे.

सुबोध खरे's picture

10 Nov 2016 - 6:38 pm | सुबोध खरे

मुळात माझ्याकडे दरोडेखोर जरी आला आणि माझा इलाज करा म्हणाला तरीही मी त्याला नाकारू शकत नाही.
त्याच्याकडे असलेले पैसे त्याने तुरुंगात असताना केलेल्या सक्तमजुरीचे मोल आहे कि दरोड्यातून मिळालेले आहेत हे विचारण्याचा मला अधिकार नाहीच.
मग राहतो मुद्दा केवळ मी "घेतलेल्या" पैशाचा. ती त्याचा नेहमीच्या मूल्यात इलाज केला आणि ते पैसे बँकेत भरले आणि त्यावर कर भरला तर ते पैसे अनैतिकही नाहीत आणि अवैध हि नाहीत.

संदीप डांगे's picture

10 Nov 2016 - 7:05 pm | संदीप डांगे

बरोबर आहे तुमचे.

"कोणाचे काळे धन सफेद करण्याची माझी इच्छा नाही" असे म्हणत आपण एका धंदेवाल्याला नोटा नकोत असे सांगितलेत. फक्त रात्री पंतप्रधानांनी घोषणा केली 'म्हणून' दुसर्‍या दिवशी तुमच्याकडे येणारा एखादा धंदेवाला काळे पैसे बाळगून आहे असे समजणे जरा अति होतंय असं वाटलं.

असो.

सुबोध खरे's picture

10 Nov 2016 - 7:31 pm | सुबोध खरे

आपली गल्लत होते आहे आणि आपले मत अज्ञानातून किंवा पूर्वग्रहातून येत आहे असे वाटते.
परवा रात्री सरकारने या नोटा अवैध आहेत म्हणून जाहीर केले आहे तेंव्हा असे चलन घेणे हे बेकायदेशीर आहे. ( आज सकाळी वृत्तपत्रात आले आहे कि खाजगी दवाखाने ११ तारखेपर्यंत या नोटा घेऊ शकतात) पण काल सायंकाळी मी त्याला स्पष्टपणे सांगितले कि मी चेक घेईन. किंवा १०० च्या नोटाही चालतील. मी त्याची सोनोग्राफी करायला नकार दिला नाही.
उद्या एखादा दरोडेखोर म्हणाल कि मी तुम्हाला त्याच किमतीचे सोने देतो तर मी ते स्वीकारणार नाही. चलनी नोटेच्या वर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याबरोबर त्या चलनाच्या मुल्याची "हमी" असते आणि असे "वैध" चलन नाकारणे हा गुन्हा आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. सोने किंवा रद्द केलेल्या नोटा हे "वैध" चलन नाही.
एखादा धंदेवाला काळे पैसे बाळगून आहे असे समजणे हा माणूस मी त्या नोटा "घेतल्याच पाहिजेत" असे गुर्मीत सांगत होता आणि चेक देण्यास सांगितले असताना मी पण धंदा करतो इ शहाणपणा शिकवायला लागला.दिवस भरात बाकी सर्वच्या सर्व रुग्णांनी चेक दिलेले आहेत. ते आज मी बँकेत भरले. ( त्यातला कुठला बाउंस होऊ नये एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना)

मार्मिक गोडसे's picture

10 Nov 2016 - 7:39 pm | मार्मिक गोडसे

सोने किंवा रद्द केलेल्या नोटा हे "वैध" चलन नाही.

अगदी बरोबर

सप्तरंगी's picture

10 Nov 2016 - 8:47 pm | सप्तरंगी

IT डिपार्टमेंटने दिल्ली च्या दुकानांवर धाड टाकली पैसे स्वीकारल्यामुळे, असे नुकतेच वाचले, तेंव्हा तुमचा पैसे न स्वीकारायचा निर्णय योग्यच आहे. एकवेळ नंतर पैसे देईन च्या बोलीवर मोफत उपचार केलेला बरा. फोन नंबर पत्ता चे रजिस्टर असले तर cheque बाउन्स झाला तर काही करता येईल तुम्हा सर्वानाच .

सुबोध खरे's picture

11 Nov 2016 - 9:53 am | सुबोध खरे

तुम्ही म्हणता आहेत ते बरोबर आहे.
मला दिलेल्या चेक्स ची मी फोटोकॉपी काढून ठेवलेली आहे आणि शिवाय बँकेची पावतीहि आहेच पण चावट पणा करणाऱ्या एखाद्या रुग्णाने मुद्दाम दुसरी सही केली असेल तर सही जुळत नाही म्हणून चेक परत येईल आणि त्याची निस्तरपट्टी मात्र मला करावी लागेल. १०००-२००० रुपयाच्या चेकसाठी पोलीस स्टेशनला खेटे घालणे शहाणपणाचे ठरेल का हाच विचार करतो आहे.
२०१२ मध्ये २०० रुपये संध्याकाळी आणून देतो, ५०० रुपये उद्या देतो म्हणून रिपोर्ट घेऊन गेलेल्या रुग्णांनी एका वर्षात माझे २०,०००/- रुपये बुडवलेले आहेत. डेंग्यूने अत्यंत आजारी असणाऱ्या रुग्णाचा उपचार थांबू नये म्हणून मी त्याच्या खिशातले पैसे संपू नयेत म्हणून त्याला एक पैसे हि न घेता रिपोर्ट दिला यानंतर त्याने आजतागायत तोंड दाखवलेले नाही. अशा सगळ्या रुग्णांचे फोन नं माझ्या कडे आहेत. हि माणसे फोन उचलत नाहीत किंवा पैसे उद्या आणून देतो सांगतात किंवा रॉंग नंबर सांगतात. ( गरज सरो आणि वैद्य मरो हि म्हण सार्थ आहे)
यानंतर मी रोख पैसे दिल्याशिवाय रिपोर्ट देणे बंद केले.
हा स्वतःचा अनुभव असताना परवाच्या दिवशी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मी चेक घेतलेले आहेत. परत तशी फसवणूक होऊ नये अशी इच्छा आहे. अन्यथा चेक चे पैसे मिळाल्यावर चार दिवसांनी रिपोर्ट घेऊन जा असे सांगायची पाळी माझ्यावर येऊ नये एवढीच इच्छा आहे.
(एका रुग्णाने कोलकाता येथी AT PAR "नसलेला" चेक दिला आहे. घाई गडबडीत ते पाहिले नाही)

अप्पा जोगळेकर's picture

9 Nov 2016 - 4:45 pm | अप्पा जोगळेकर

वर काही लोक म्हणतायत की तुम्ही नोटा स्विकारुन बॅन्केत आपल्या खात्यात थेट भरु शकता. त्यात कोणाचा काळा पैसा सफेद कसा होईल?
असे मीच म्हटले होते. माझे म्हणणे चुकीचे होते. दुसर्‍याचा काळा पैसा सफेद होईल आणि जबाबदारी अकारण आपल्यावर येईल हे बरोबर असावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 4:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आणि तो पैसा तुमच्या नेहमीच्या उत्पन्नापेक्षा जास्त असला तर आयकर विभागाला संशय येऊन तुमची "चौकशी" होऊ शकते !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2016 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुसरा डबल सर्जिकल स्ट्राईक... यावेळेस अतिरेक्यांच्या- व भ्रष्टाचार्‍यां-विरुद्ध एकत्रित सर्जिकल स्ट्राईक

GPS चा प्रश्न अर्धवट राहिला

असे प्रश्न अर्धवट ठेऊन शत्रूला (पक्षी : काळाबाजारवाले* आणि अतिरेकी) गोंधळलेले ठेवणे आणि तो गाफील असताना आपल्या जाळ्यात पकडणे याला "उत्तम रणनीति म्हणतात ! ;) :)

* सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे...

(अ) हे समजले तरी अतिरेकी उघडपणे आरडाओरडा करू शकत नाहीत;

(आ) काही भ्रष्टाचारी लोक हे न समजल्याने किंवा समजूनही अत्यंत गोंधळलेले असल्याने सरळ-तिरका थयथयाट करण्याइतके बुद्दू आहेत; आणि

(इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्‍या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))

सद्या या कारवायीविरुद्ध कोण सर्वात जास्त थयथयाट करतो आहे, त्याच्याकडे संशयाने पाहण्याइतकी जनता हुशार आहे...

+११११

सही रे सई's picture

9 Nov 2016 - 9:53 pm | सही रे सई

(इ) इतर काही भ्रष्टाचारी संभावितपणे मुका मार खावून गप्प आहेत किंवा वरवर या कारवायीची स्तुती करत आहेत. पण त्यांच्या भूतकाळावरून त्यांचेही बरेच नुकसान झाले आहे हे पण जनता जाणून आहे. त्यांची "सर्जिक स्ट्राईक झालाच नाही" असे म्हणणार्‍या पाकिस्तानसारखी अवस्था झाली आहे =))

वरती कोणीतरी म्हणत होत कि आमच्या नेत्यांनी/साहेबांनी याची स्तुती केली आहे.. सुज्ञास सांगणे न लागे.

सुबोध खरे's picture

9 Nov 2016 - 3:22 pm | सुबोध खरे

कालपर्यंत नोटा कायदेशीर होत्या आणि ते घेणे मला कायद्याने बंधनकारक होते.कुठून आणले हे सांगणे त्याला बंधनकारक नव्हते आज नोटा रद्द झालेल्या आहेत.

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 3:22 pm | संदीप डांगे

माझ्या बॅन्केकडून आलेला मेलः

Dear Customer,

Following the government announcement to discontinue Rs. 500 and Rs. 1000 notes, bank branches will be closed today, November 9, 2016 and ATMs will be closed on November 09 - 10, 2016.
Rest assured, your money is safe, and steps are being taken for smooth servicing of requests. You can deposit these denominations at any time at Cash Deposit Machines between November 11 and December 30, 2016, and during working hours at branches from November 10 to December 30, 2016.
Warm regards,

Team X Y Z Bank.

तुषार काळभोर's picture

9 Nov 2016 - 3:41 pm | तुषार काळभोर

हे ब्येष्ट झाले. मला रात्री १२ला जाऊन येसबीआयच्या सीडीएम मध्ये पैसे भरणे परवडेल!!

मराठी_माणूस's picture

9 Nov 2016 - 3:40 pm | मराठी_माणूस

ATM मधे उद्या सकाळी किती वाजे पासुन नव्या नोटा मिळु शकतील ?

संजय पाटिल's picture

9 Nov 2016 - 4:58 pm | संजय पाटिल

ATM चालू झाल्यापासून..

मला जर जुन्या नोटाच्याबदल्यात नवीन नोटा नको असतील आणि ते पैसे माझ्या खात्यात जमा करायचे असतील तर एका वेळी किती पर्यंत भरु शकतो.

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 5:19 pm | मराठी कथालेखक

no limit

धनावडे's picture

9 Nov 2016 - 5:37 pm | धनावडे

धन्यवाद

ट्रेड मार्क's picture

9 Nov 2016 - 11:57 pm | ट्रेड मार्क

२.५ लाखाच्यावर पैसे जो कोणी भरत असेल तर त्याच्या स्रोताची वैधता तपासली जाईल. जर का पैसे भरणाऱ्याला वैधता सिद्ध करता आली नाही तर त्या पैश्यांवर टॅक्स आणि २००% पेनल्टी लावली जाणार आहे. त्यामुळे त्या मार्गाने पण काळा पैसावाल्यांचा बँड वाजवलाय. अर्थात तुमच्याकडे वैध मार्गाने आलेले पैसेच असतील त्यामुळे प्रश्न नाही.

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2016 - 7:06 pm | ज्योति अळवणी

मास्टर स्ट्रोक! थोडा गोंधळ थोडे दिवस असेल. पण खरंच छान निर्णय आहे. फक्त सध्या आठवड्याला 20000 काढता येतील अशी माझी माहिती आहे. Deposit कितीही करता येतील.

नोटा फक्त सेव्हिंग्ज अकाउंटलाच जमा करता येतील की करंट, सॅलरी, फिक्स्ड डिपॉझिट, क्रेडिट कार्ड इत्यादी कोणत्याही अकाउंटला पैसे भरता येतील?

संदीप डांगे's picture

9 Nov 2016 - 7:38 pm | संदीप डांगे

कोणत्याही,