इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो.
ज्यांना या लिखाणाची अॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये.
या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही.
इशारा संपला!
---
हा लेख येथे का?
पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी. त्यांची आज्ञा पाळून हे लिखाण येथे देत आहे. ते गोड मानून घ्यावे.
लिखाण करताना ते कायप्पा साठी केलेले असल्याने त्यात विस्तारभय आलेलेले आहे म्हणून लेखाची लांबी कमी आहे. यातील अनेक मुद्दे विस्ताराने चर्चा करण्याजोगे आहेत. तशी मुद्द्याला धरून चर्चा झाल्यास विषय अधिक उलगडला जाऊ शकतो. मिपा वर या विषयावर अनेक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी उदार मनाने यावर अधिक लिहावे. तसेच माझ्या लेखनात काही चुका झाल्या असल्यास दाखवून द्याव्यात व त्यासाठी माफ करावे. गुरूदेवांच्या कृपेने हे लिखाण झाले, यात माझे असे काही नाही. त्यामुळे कोणताही प्रताधिकार नाही. (तुम्ही हा लेख आनंदाने कॉपी पेस्ट करून शेयर करू शकता. मात्र लेखनात बदल करण्यापुर्वी माझी परवानगी आवश्यक राहील)
जप
प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास हे मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत करते करते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात आणि मोठा परिणाम करून जातात. उदाहरणार्थ जप.
आता जप केल्याने कसला काय फरक पडणार म्हणून झिडकारून टाकणे सहज शक्य आहे. पण याच वेळी 'करून तर पाहू या' असा विचारही करता येईल. निव्वळ मनाला शांतता म्हणून हवा असल्यास जप कुठे ही करता येतो. जप केला की चटकन मन एकाग्र व्हायला मदत होते. काही वेळा जप केल्याने आपला आत्मविश्वास वाढला असेही अनुभवास येते. जप हा भक्ती मार्गातला साधनेचा सर्वात सोपा प्रकार आहे. फक्त इष्टदेवतेचे स्मरण, असा जप सहज शक्य असतो. किंवा
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हा सर्वगुरू मान्य जपही करता येतो.
पण जप करण्या आधी त्याची पद्धती व्यवस्थित माहिती करुन घेणे आवश्यक राहील.
जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील तीन प्रमुख प्रकार आपण पाहू या. खालील माहिती वाचल्या नंतर लगेच जप करण्याची घाई करू नये. ज्या प्रकार चा जप गुरू ने दिला असेल तोच करावा. यासाठी योग्य गुरू फार महत्त्वाचा असतो. मन एकाग्र करून जप केला पाहिजे. जप ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ती साधनेतून मिळवावी लागते हे ध्यानात ठेवावे.
तर अशा या जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्रमुख जपांचे प्रकार व परिणाम आपण पाहू या.
वाचिक जप
- वाचेने केलेला जप म्हणजे वाचिक जप. म्हणजे मोठयाने उच्चार करून मंत्रांचे पठण. प्रत्येक शब्द त्यातील वर्ण सुयोग्य प्रकारे अनेकवार उच्चारले जातात. अत्यंत साधी आणि सोपी क्रिया असते. परंतु मनाची एकाग्रता यात अपेक्षित आहे.
वाचिक जप केल्याने मेंदु मध्ये काही घटना घडू लागतात. यामुळे मेंदूतील Broca या विभागावर परिणाम होतो. हा विभाग जप केल्याने उद्दीपित होती असे म्हणतात. ब्रोका हा विभाग मेंदू मध्ये फ्रंटल लोबच्या खाली असतो. ब्रॉडमन एरिया 44 आणि 45 असे त्याचे दोन भाग आहेत. ब्रोका आणि फ्रंटल लोब यांचे एकमेकातील संबंध अजून पूर्णपणे सुस्पष्ट झालेले नाहीत. परंतु ते उद्दिपीत होतात हे आढळते.
पण एरिया 45 हा प्रि फ्रँटल कॉर्टेक्सला जास्त जोडलेला आहे. यांचा संबंध अर्थात भाषा या विषयाशी आहे. आणि वाचिक जप हा भाषेतूनच केला जातो.
त्याच वेळी निर्णय क्षमता हे महत्त्वाचे कार्य फ्रंटल लोब करतो. आणि निर्णय शब्दबद्ध करण्यासाठी ब्रोका विभाग मदत करतो असा त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे सिद्ध झाले आहे.
यानुसार वाचिक जपाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
जप कसा करावा याची शास्त्रशुद्ध विवेचन आपल्या ऋषींनी केलेले आहे. ते ग्रंथ शोधून त्याचे अधिक अध्ययन आपण केले पाहिजे असे वाटते.
उपांशु जप
मन एकाग्र करणे आणि भाषिक केंद्राची मदत म्हणून वाचिक जप कार्य करतो. आता उपांशु जप आणि त्याचे परिणाम पाहू या. वाचिक जपामध्ये मन एकाग्र होण्याची प्राथमिक सवय झाली आहे. त्या पलिकडे पोहचण्याची साधना झाली की मग उपांशु जपाची साधना सुरू होते.
वाचिक जप ही जप साधनेतील पहिली पायरी आहे उपांशु जप ही पुढील. हा जप करतांना जिभेची हालचाल होते परंतु स्वर मात्र निव्वळ आपल्याला ऐकु येतील इतके कमी असतात. याचे कारण म्हणजे आता बाह्य आवाज 'दाबून टाकण्याची आवश्यकता' उरलेली नसते. मनाचा ताबा अधिक प्रबळ झालेला असतो.
अर्थात बाह्य जगात कितीही कोलाहल असला तरी मन स्थिर व एकाग्र असल्याने त्याचा आपल्या साधनेवर परिणाम होत नाही. आणि स्थितप्रज्ञता हे कोणत्याही भारतीय अध्यात्मिक साधनेतील उद्देश्य असते.
उपांशु जप करत असताना मेंदुच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कारण सर्व भाग आपल्याला एकाग्रतेसाठी
मदत करतात. परंतु त्यातीलही मेंदुतील पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर जास्त परिणाम होते असे आढळते.
हा विभाग स्वतः वरील नियंत्रण राखण्याचे कार्य करतो. या शिवाय मनाची एकाग्रता ठेवण्यासही
हा भाग मदत करतो. रोज केलेल्या उपांशु जपाने या भागात कायमचे बदल घडतात. हे बदल एकाग्रता आणि स्व-नियमन यासाठी उपयोगी पडतात. या शिवाय काही प्रमाणात सेरेबेलम या स्मरणशक्तीचे नियंत्रण करणार्या भागावरही या जपाचा परिणाम होतो. तसेच ब्रेन स्टेम म्हणजे मेंदुचा मध्य भाग, हा संदेशांची देवाणघेवाण नियंत्रित करतो. हा भाग उपांशु जपात कार्यरत होतो. उपांशु जपामध्ये हा विभाग एकाग्रतेचे संदेश फ्रंटल लोबला देतो आणि मग फ्रंटल लोबला तसे कार्य करण्याची सवय लागते.
मानस जप
अतीव आनंदही नको आणि दु:खी मन:स्थिती ही नको. स्थितप्रज्ञपणे समत्वाने जगाकडे पाहण्याची दृष्टी आणण्यासाठी आपल्या ऋषींनी अनेक साधना विकसित केल्या होत्या त्यातली प्राचीन साधना म्हणजे जप! स्थितप्रज्ञतेकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. पण स्थितप्रज्ञ राहणे फार अवघड आहे. पण मनाला सवय करून जास्तीत जास्त काळ स्थितप्रज्ञ राखता यावे यासाठी सामान्यजनांचा मार्ग जप हा आहे.
वर आपण वाचिक जप, उपांशु जप व त्याचे मेंदूवरील परिणाम पाहिले आहेत. आता आपण सर्वात उच्च कोटींचा जप म्हणजे मानस जप याचा विचार करू या.
हा जप करताना आपल्याला मिळालेल्या गुरूमंत्रावर संपूर्ण एकाग्रता अपेक्षित आहे. त्यातील प्रत्यके अक्षराचा विचार करायचा आहे. वाचिक जपात इतर आवाज आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मोठ्याने जप करून स्वतः ला या भौतिक जगापासून वेगळे करतो. उपांशु जप करताना बाहेरील आवाजापेक्षा मनातील प्रभावी एकाग्रता वाढलेली असते. पण मानस जपात निव्वळ विचारांच्या आधारे आपण स्वतःला स्थितप्रज्ञतेकडे नेतो.
या एकाग्रतेचा उपयोग आपल्या मेंदुला अनेक प्रकारे होतो. वाचिक जपामध्ये भाषेचे केंद्र उद्दीपित, उपांशु जपात फ्रंटल लोब कार्यरत तसा मानस जपात प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे विभाग काम उद्दिपित होत असावेत. हे दोन्ही विभाग मेंदुमध्ये विचार प्रोसेस करतात. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स कपाळापासून ते ब्रह्मरंध्रा पर्यंत हा पसरलेला असतो. हे दोन्ही मिळून आपल्या विचारांना प्रोसेस करण्याचे कार्य करतात. तसेच यांच्या खालचा भाग स्मृती म्हणूनही काम करतो. इन्फेरियर फ्रंटल जायरस हे आपल्या विचारांचा पैलू बदलण्याचे काम करतात. म्हणजे कल्पना सुचण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत असते. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे दोन्ही मिळून अतिशय प्रभावी कल्पना सुचू शकतात.
या जपात बहुदा ब्रेन स्टेमही काम करत असावा कारण ब्रेन स्टेम सर्वच मेंदुतील कार्याचे नियोजन करत असतो.
अशा रितीने मानस जपाने आपण आपल्या विचार पद्धतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरू शकतो.
मेंदुतील न्युरॉन्स जपाने कसे प्रभावित होतात हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. परंतु त्यावर ठाम असे काही लेखन सहजतेने हाती लागले नाही. तज्ञांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
नियम
आता या माहितीमुळे 'आपणही जप करावा' असे वाटत असेल तर लगेच तसे करू नका. कारण याचे काही नियम आहेत. त्याविषयी अधिक विवेचन पुढील भागात.
जप हा कुठेही करता येतो. परंतु साधना म्हणुन करत असल्यास नियम आवश्यक असतात. म्हणून जप नेहमी गुरूदेवांच्या सल्ल्यानेच करावा. जप या साधनेचे तीन प्रकार वाचिक, उपांशु आणि मानस हे आपण पाहिले.
अजुनही जपाचे प्रकार आहेत परंतु ते योग साधनेत मोडतात व प्राणायाम सहीत करावयाचे आहेत जसे रेचक कुंभक इत्यादी. जप करून मनाची एकाग्रता साधण्याची सोपी युक्ती वापरायची आहे. आपली प्रज्ञा आणि बुद्धी तेज करण्यासाठी याचा वापर व्हायला हवा आहे. जप आणि त्याचा मेंदुच्या भागांवर होणारे परिणाम पाहिले आहेत. तेव्हा भारतीय ऋषींनी जप हा साधन म्हणून वापरला आहे असेही कदाचित म्हणता येईल.
आपले गुरू या जप साधना संदर्भात देतील तो मंत्र जपावा. आपल्या गुरूदेवांच्या मार्गदर्शनानुसार जप करावा.
जप शक्यतो सकाळच्या वेळी करावा. आधी गार पाण्याने स्नान करावे. जप करण्यासाठी एक जागा असेल तर उत्तम. ही जागा नित्य स्वच्छ असावी. या जागेवर बसण्यासाठी सुती वस्त्र असावे. जप करण्याचा संख्या संकल्प सोडणार असल्यास संकल्प सोडल्यानंतर त्याची कोणतीही वाच्यता करू नये. कारण एकदा संकल्प सोडला की सोडला!
जपाआधी कुणाचीही निंदा करू नये. हिंसा क्रोध काम मोह आणि असत्य या विकारातून दूर असण्याचा प्रयत्न असावा. भुक अथवा तहान लागलेली नसावी. मन विचारांवर वाहू लागले तर तर त्याला परत एकाग्रतेकडे आणावे.
जपा आधी कुणाशी वाद असू नये तसेच कुणाचे आशिर्वाद घेऊनही जपास बसू नये.
काही प्रसंगी जप पुर्ण होत नाही. सर्वांना संसारीक बंधने असतात. अशावेळी मनाला त्रास असु नये. चित्त स्थिर असु द्यावे. जप झाला नाही अशी रुखरुखही असू देऊ नये. जे झाले ते ईश्वर चरणी सोडावे आणि स्वस्थ मनाने कार्यास लागावे. जी नियतीची इच्छा त्या प्रमाणे होणार आहे हे ध्यानात असावे. परत पुढील वेळी शांतपणे जपास बसावे. जप करण्या आधी मन निर्भय असावे.
थोडक्यात निर्विकार मनाने जपास बसावे. परंतु ईश्वर आणि गुरू यांच्या प्रति श्रद्धा व विश्वास मनात असावा.
माळ
जपा साठी माळ वापरणार असल्यास माळ एकशे आठ मण्यांची असावी असे म्हणतात. माळ सिद्ध करून घेतल्यास उत्तम. यासाठी निरनिराळे मंत्र आहेत. आपले गुरूजी ही माळ सिद्ध करून देऊ शकतील. जप करताना माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. तसेच माळेचा मध्य - या सुमेरू म्हणतात- तो पार करू नये. त्यावेळी माळ सुलट करून जप पुढे न्यावा. काही वेळा माळ वस्त्राखाली झाकलेली असावी असे म्हणतात. परंतु यावर मतांतरे आहेत.
टिपः माळ कशी वापरावी, कोणत्या बोटांचा कसा स्पर्श करावा या विषयी काही पाठभेदही आहेत. त्यासाठी आपल्या गुरूदेवांचे किंवा गुरुजींची मार्गदर्शन घ्यावे. कदाचित येथे सदस्य ही यावर लिहू शकतील. काही वेळा जप करताना मनावर काही ताण येत आहे असे वाटल्यास जप थांबवावा! मन शांत झाल्यावर परत सुरू करावा.
जप हा आपल्या इष्टदेवतेसाठी आहे तसाच आपल्या आनंदासाठीही आहे हे नित्य ध्यानात ठेवा.
अशा रितीने जप लेख संपन्न झाला.
आपल्याला आपला जप आणि त्यातून मिळणारा आनंद लाभू देत हीच प्रार्थना!
||जय श्री गुरूदेव दत्त||
प्रतिक्रिया
28 Oct 2016 - 10:02 pm | संदीप डांगे
आत्मा म्हणजे फक्त मनुष्यप्राण्याची लोकसंख्या नव्हे! एक चौरस फूटात सात अब्ज बॅक्टेरिया असतील तर सात अब्ज आत्मे झाले की, साधना करत पुढच्या टप्प्यावर जातात, काही परत पहिल्यापासून सुरुवात करतात,
Energy निर्माण होत नाही नष्ट होत नाही फक्त रूप बदलते हे आत्म्याला लागू होत असावे, त्यामुळे जगातली सर्व आत्म्याची संख्या कायम राहत असावी..
28 Oct 2016 - 10:15 pm | प्रचेतस
=))
सात अब्ज बॅक्टेरियांचे आत्मे साधना करताहेत हे दृश्य डोळ्यांसमोर आले.
28 Oct 2016 - 10:25 pm | संदीप डांगे
=)) =))
28 Oct 2016 - 10:21 pm | सतिश गावडे
आत्म्याला साधनेची आवश्यकता नसावी. रँडम सिलेक्शनने फ्री आत्मा कुठेही जन्म घेत असावा. ;)
28 Oct 2016 - 10:29 pm | संदीप डांगे
बुद्ध जातक कथा, चैतन्यप्रभु इत्यादी मागचे सर्व जन्म आठवणाऱ्या महात्म्यांनी सर्व रुपात साधना करत असल्याचे सूचित केले आहे,
जन्म घेण्याचा आणि साधनेचा नेमका संबंध नाही पण कर्म आणि जन्माचा आहे व त्यात सिलेक्शन random वाटत असले तरी कर्माधिष्ठित आहे हे 'मानले' जाते... ;)
28 Oct 2016 - 10:37 pm | सतिश गावडे
पुनर्जन्म आणि कर्म यांचा संबंध जोडला जाऊ लागला की मी त्या विषयावर लिहीणे थांबवतो. कारण तिथे त्या कल्पनेचा नैसर्गिकपणा संपतो. :)
28 Oct 2016 - 10:53 pm | संदीप डांगे
इ हमका पता रहीब... =))
28 Oct 2016 - 11:44 pm | वैभव पवार
सतराव्या शतकात वाघ, सिंहाचा संख्या किती असेल साधारणतः?
29 Oct 2016 - 12:41 am | कपिलमुनी
=))
28 Oct 2016 - 9:54 pm | चित्रगुप्त
पुनर्जन्म, ८४ लक्ष योनींचा फेरा वगैरे सर्व डीटेलवार समजून घ्यायला खालील लेख वाचा:
http://www.misalpav.com/node/23698
29 Oct 2016 - 8:35 am | झपाटलेला फिलॉसॉफर
सद्यःकालात पूर्वी पशु अथवा राक्षस आदि योनीत असणार्या आत्म्यानी मानवी जन्म घेतल्याने सर्वत्र धर्माचा प्रभाव ओसरून अधर्माचे राज्य आले असल्याचे कुठेअतरी वाचले होते