मुंबईची रेल्वे लोकल(उपनगरीय रेल्वे सेवा) हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. १६ एप्रिल १८५३ साली पहिल्यांदा भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वात पहिले रेल्वेची गाडी धावली ती मुंबईतच. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा रेल्वेचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जी काही मुंबईची प्रगती झाली,विकास झाला त्यात मुंबईच्या लोकल रेल्वेचा मोठा वाटा आहे. जरा का मुंबईत रेल्वे नसती तर मुंबईची कशी आणि किती प्रगती झाली असती याबाबत शंकाच आहे. मुंबईच्या दळणवळणाचा विचार केल्यास रेल्वेचा प्रवास मुंबईमध्ये अतिशय स्वस्तातला आणि कमी वेळात होणारा आहे. (जर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर traffic असेल तर रेल्वेने कमी वेळात पोहोचतो असा स्वतःचा अनुभव आहे). त्यामुळेच मुंबईत रेल्वेच्या जवळ असणाऱ्या घरांना जास्त भाव असतो. realestateवाले आपल्या जाहिरातीत स्टेशन पासून १० मिनिटेअंतरावर वगैरे जाहिरातीत लावत असतात.
सध्याचा मुंबई लोकलचा प्रवास मात्र जीवघेणा झाला आहे. रोज मुंबई लोकलमधून सुमारे ७५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर सरासरी रोज किमान २-३ तास तरी प्रवास करतो(जाऊन येऊन). त्यातही पुढे रिक्षा बस असेल तर विचारायलाच नको. पूर्वी लोकलने प्रवास करणारी लोक जी आता म्हातारी झाली आहेत त्यांनाही प्रवासाची दगदग सहन होत नाही. मागे व्हात्साप्प वर एक मेस्सागे होता, “ मुंबईत माणसं प्रवासाची salary घेतात बाकी जॉब वगैरे अंधश्रद्धा आहे.” सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करणे हे अर्ध रक्त आटवणारे आहे. कितीही प्रयत्न केले तरी या गर्दीवर काही उपाय आहे असे मला वाटत नाही. कारण मुंबईची लोकसंख्या हि फुगत चालली आहे आणि जागा कमी आहे. कितीही रेल्वेचे डबे अथवा गाड्यांची संख्या वाढवली तरी काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे तुडुंब भरून जाणारी गर्दी , होणारे अपघात , डब्यात होणारी भांडणे हे चित्र अजून काही वर्षे तरी बदलेल असे वाटत नाही. आपले रेल्वे मंत्री काही चांगल्या उपाययोजना करत आहेत पण त्यामुळे काही चित्र बदलेल अशी शक्यता नाही.
मी दररोज कामाच्या निमित्ताने लोकलने प्रवास करतो. मिपावरील बरेच लेख मी गाडीत बसून, उभे राहून वाचलेले आहेत. लोकलच्या प्रवासाबद्दल काही माहितीपर लेख लिहावा असे बरच दिवसापासून मनात होते. जेणेकरून रेल्वेने प्रवास करणार्यांना याचा उपयोग होईल. माझा रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव हा जेमेतेम ६-७ वर्षांचा आहे. लोक नोकरीची ३०-४० वर्षे रेल्वेने प्रवास करत आहेत , करत राहतील त्यामानाने माझा अनुभव तोकडा आहे, त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी यात भर घालावी अशी विनंती.
या धाग्याचा विस्तारभयास्तव तीन भागात विभागण्याचा विचार आहे.
१) मुंबई लोकल रेल्वेची मुलभूत माहिती
२) प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव आणि फुकटचे सल्ले
३) महत्वाच्या स्थानकांची माहिती, आजूबाजूचा परिसर आणि प्रेक्षणीय स्थळे
मुंबई लोकल रेल्वेची मुलभूत माहिती
तर मंडळी मुंबई लोकलने प्रवास करणे येरागबाळ्याचे काम नाही. पण तरीही सवयीने तुम्हाला कुठे कसे जायचे याची माहिती झाली, प्लॅटफॉर्म क्रमांक समजले , दिशा समजल्या कि लोकल प्रवास करणे कठीण नाही. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी m-indicator या एका उपयुक्त app ची ओळख करून देतो. जर मुंबई लोकलने प्रवास करणार असाल , करत असाल, तर नक्की हे app download करा. सचिन टेके नावाच्या एका मराठी मुलानेच हे app तयार केलेले आहे, यात मुंबईच्या सर्व मार्गावरील लोकल, बस, मेट्रो यांचे वेळापत्रक, तिकिटाचे दर याची माहिती अक्षरशः एका क्लिक वर मिळते. आता यावर पुण्याच्या PMT चे वेळापत्रकही मिळते. इतरही शहरात या app चा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.
मुंबई लोकल हि मुख्यत्वे भारतीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येते.
लोकलच्या चार मुख्य lines आहेत. (वरील नकाशा बघा, नकाशाच्या सहाय्याने संदर्भ घेऊन वाचल्यास चांगले समजेल, नकाशा आंतरजालावरून साभार , जर इथे दिसत नसेल तर ही लिंक बघावी )
१) सेन्ट्रल लाईन- (याला मेन लाईन असेही म्हणतात). ही लाईन छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST पूर्वीचे विक्टोरिया टर्मिनस अथवा VT) ते कल्याण (K) पर्यंत आहे आणि पुढे ती दोन दिशेला दुभागली जाते. एक कल्याणपासून कर्जत(S) पर्यंत आणि पुढे कर्जत ते खोपोली(KP) पर्यंत. कर्जत पासून मुंबई लोकलचा प्रवास संपतो पुढे हि लाईन पुण्याकडे- दक्षिणेला जाते. यामुळे या स्थानकाचे indication ‘S’ असे करतात.
दुसरी कल्याणपासून कसाऱ्यापर्यंत(N) आहे. इथे लोकलचा प्रवास संपतो आणि हि लाईन उत्तरेकडे – मनमाडमार्गे नाशिकच्या दिशेने जाते.
खालीलप्रमाणे एकूण ४८ स्थानके क्रमाने येतात.
CST-मस्जिद बंदर – sandhurst रोड- भायखळा – चिंचपोकळी-करी रोड-परळ-दादर-माटुंगा-सायन(शिव)-कुर्ला-विद्याविहार-घाटकोपर-विक्रोळी-कांजुरमार्ग-भांडुप-नाहूर-मुलुंड-ठाणे-कळवा-मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली-ठाकुर्ली-कल्याण.
दक्षिण दिशेला- कल्याण-विठ्ठलवाडी-उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर-वांगणी-शेलू-नेरळ-भिवपुरी रोड-कर्जत ते पुण्याकडे
कर्जत ते खोपोली-पळसदरी-केळवली-डोलावली-लौजी-खोपोली.
कल्याणपासून उत्तर दिशेला- आंबिवली-शहाड-टिटवाळा-खडवली-वाशिंद-आटगाव-खर्डी-कसारा.
दादर ते मुंबई CST या भागात ऑफिस बिल्डिंग जास्त (commercial area) आहेत, दादर पासून ठाण्याकडे आणि पुढे कल्याण डोंबिवली ते कर्जत कसारा पर्यंत नागरी वस्ती जास्त आहे. त्यामुळे सगळी गर्दी सकाळी दादर ते CST या स्थानकांकडे वळलेली असते.
CST ते मुलुंड हि स्थानके BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतात तर ठाण्यापासून पुढे ठाणे जिल्ह्यात येतात.
मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना UP trains आणि बाहेर जाणाऱ्या गाड्यांना DOWN trains म्हणतात. एक्सप्रेस ट्रेनचे थांबे हे साधारणतः (सर्व गाड्यांना लागू नाही) कर्जत, कसारा, कल्याण , ठाणे, दादर या स्थानकांवर असतात.
२) वेस्टर्न लाईन – हि चर्चगेट(C) पासून सुरुवात होऊन आता याचा पल्ला थेट डहाणू रोड (DN) पर्यंत गेला आहे. हि सरळसोट आहे ही कुठेही दुभागालेली नाही. डहाणू ला लोकल प्रवास संपतो पुढे हि लाईन सुरतकडे जाते.
या लाईन वर सुमारे ३६ स्थानके आहेत. स्थानकांचा क्रम अश्या प्रकारे आहे:
चर्चगेट –मरीन लाईन्स- चर्नी रोड- ग्रांट रोड- मुंबई सेन्ट्रल- महालक्ष्मी- लोवर परेल-elphinston रोड- दादर- माटुंगा रोड- माहीम- बांद्रा- खार रोड- सांताक्रूझ –विलेपार्ले-अंधेरी-जोगेश्वरी-गोरेगाव-मालाड-कांदिवली-बोरीवली-दहिसर-मीरा रोड-भाईंदर-नायगाव- वसई रोड- नालासोपारा-विरार-वैतरणा-सफाळे-केळवे रोड-पालघर-उमरोली-बोईसर-वाणगाव-डहाणू रोड
इथे दादरच्या ते चर्चगेट मध्ये commercial ऑफिस बिल्डिंग खूप आहेत. सध्या अंधेरी आणि परिसरातही ऑफिसेस वाढली आहेत. तरी दादर ते अंधेरी आणि पुढे या परिसरात residential भाग जास्त आहेत. त्यामुळे सेन्ट्रल प्रमाणे इथेही सगळी गर्दी सकाळी दादर ते चर्चगेटच्या दिशेने वाहत असते.
इथे बोरीवली पर्यंत BMC ची हद्द आहे त्यापुढे दहिसरपासून पालघर जिल्हा (पूर्वीचा ठाणे जिल्हा ) सुरु होतो.
मुंबईला येणाऱ्या तसेच मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्यांचे थांबे साधारणतः (सर्व गाड्यांसाठी नाही) चर्चगेट,मुंबई सेन्ट्रल,दादर,अंधेरी,बोरीवली या स्थानकांवर वर असतात.
३) हार्बर लाईन – हि थोडी वेडी वाकडी आणि समजायला थोडी कठीण आहे.
CST पासून चालू होऊन ती sandhusrt रोड ला वडालाकडे वळते आणि पुढे कुर्ला-वाशीमार्गे पनवेलला जाते.
तसेच अंधेरी पासून चालू होऊन महिममार्गे वडाल्यास जाते. आणि पुढे कुर्ला-वाशीमार्गे पनवेलला जाते.
मध्य रेल्वेचे लोकमान्य टिळक टर्मिनस(जे हार्बर लाईन वर नाहीये) हार्बरच्या टिळकनगर या स्थानकाला लागून आहे. हे सोडल्यास बाकी कुठल्याही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा या लाईनशी संबंध येत नाही.
४) ठाणे–वाशी/पनवेल लाईन (नवी मुंबईसाठी)
पहिले फक्त मालवाहतुकीसाठी असलेली लाईन पुढे २००४ नंतर प्रवासी वाहतुकीसाठी खुली झाली. यामुळे नवी मुंबईचा विकास झपाट्याने झाला. नवी मुंबईच्या घराच्या किमती वाढल्या, ऑफिस बिल्डिंग वाढल्या, तिथल्या कॉलेजेसना ठाणे-मुंबईचे विद्यार्थी मिळू लागले. या स्थानकांची रचना देखील आपल्या सेन्ट्रल आणि वेस्टर्नच्या स्थानाकांपेक्षा वेगळी आणि थोडी ऐसपैस आहे.
सुरुवातीला हि लाईन फक्त ठाणे –वाशी एवढीच मर्यादित होती. नंतर तिला आता पनवेललाही जोडण्यात आले आहे. ठाणे ते तुर्भेपर्यंत असणारी लाईन पुढे दुभागून एक मार्ग वाशीकडे तर एक मार्गिका पनवेल कडे जाते. पुढे ह्या मार्गावर पहिले पेणपर्यंत आणि पुढे अलिबाग पर्यंत लोकल नेण्याचा रेल्वेचा विचार आहे असे समजते.
कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्या या पनवेलला थांबतात मात्र पुढे ठाण्याला येण्याचा मार्ग हा दिव्यामार्गे आहे , कोकण रेल्वे ठाणे –वाशी/पनवेल या मार्गावरून येत नाही.
या मार्गावरची लोकलची वारंवारता चांगलीच वाढली आहे पूर्वी अगदी अर्ध्या तासाने असणार्या गाड्या सकाळी गर्दीच्या वेळी ५-७ मिनिटाच्या फरकाने असतात तर इतर वेळीही सुमारे १० मिनिटाने असतात. पण गर्दी थोडीही कमी झालेली नाही , गाड्या तुडुंब भरून जातात.
५) डहाणू-पनवेल ,दिवा-वसई रोड गाड्या-
याची वारंवारता फार कमी आहे, नीट वेळ बघून जावे लागते. काही ठराविक प्रवासी या गाडीने प्रवास करतात पण तरीही या गाड्यांना गर्दी असते. मुंबईत राहणाऱ्या अर्ध्या लोकांना असा काही रेल्वे मार्ग आहे हे देखील माहिती नसेल. डोंबिवलीच्या आधी लागणारे कोपर स्थानक बनविल्यापासून लोकांची चांगली सोय झाल्याचे समजते. दिवा आणि कोपर हि दोन main लाईन वरील स्थानके या लाईनशी जोडली गेली आहेत. काही एक्ष्प्रेस गाड्या आणि मालगाड्या या मार्गाने जाताना दिसतात.
एका लाईन वरून दुसऱ्या लाईनला जाण्यासाठी महत्वाची जंक्शने:
१) दादर : सेन्ट्रल वरून वेस्टर्नला जाण्यासाठी आणि vice-versa
सेन्ट्रल दादर आणि वेस्टर्न दादर हि दोन वेगवेगळी स्थानके आहेत आणि ती तीन पुलांनी जोडलेली आहेत. त्यामुळे सेन्ट्रल लाईन वरून वेस्टर्न अथवा vice-versa
जायचे असेल तर दुसर्या लाईनच्या स्थानकावर येऊन गाडी पकडावी लागते. इथेच लोकांचा गोंधळ होतो. बरेच वेळा वेस्टर्नच्या फलाटावर उभे राहून कल्याण गाडीची वाट बघणारे लोक मी बघितले आहेत.
२) कुर्ला : इथे दादरप्रमाणे दोन वेगेवेगळी स्थानके नाहीत. शेवटचे दोन प्लॅटफॉर्म हार्बरसाठी आहेत.
३) अंधेरी ते माहीम: हि स्थानके वेस्टर्न आणि हार्बरला सामाईक आहेत आणि पुढे माहीम पासून हार्बर लाईन वेगळी होते. असे जरी असले तरी हार्बर आणि वेस्टर्नचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत. अंधेरीला नुकतेच प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वर हार्बर गाड्यांसाठी खुले केले आहेत जे पहिले ९ आणि १० साठी होते.
४) ठाणे : ठाण्याचे प्लॅटफॉर्मक्रमांक ९ आणि १० हे वाशी गाड्यांसाठी आहेत बाकी १ ते ६ सेन्ट्रल रेल्वेसाठी आहेत.
५) याशिवाय तुम्हाला रस्ता माहिती असेल तर एलीफिनस्तन रोड आणि परळ हि दोन स्थानकेही पुलावरून जाऊ शकता. माटुंगा आणि माटुंगा रोड ही दोन स्थानके z-bridge ने (काही लोक s-brigde म्हणतात)जोडलेली आहेत. पण सध्या हा पूल दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवलेला आहे काही दिवसांनी पुन्हा चालू करतील. लोवर परेल आणि करी रोड स्थानकेही चालायच्या अंतराइतकी जवळ आहेत.
६) मेट्रो/मोनो रेल्वे : यातील मोनो रेल्वेचा फारसा काही उपयोग झालेला प्रवाश्यांना दिसत नाही. अत्यंत गाजावाजा झालेली हि ट्रेन सध्या तोट्यात आहे अश्या बातम्या आहेत. चेंबूर ते वडालाच्या दरम्यान हि मोनोरेल धावते ज्यामुळे काही मर्यादित लोकांना याचा उपयोग होतो. तिचा विस्तार जेव्हा दादर भागात होईल, KEM हॉस्पिटल वगैरे भाग टप्यात आले कि मग काहीसा उपयोग आहे असे म्हणता येईल. एकदा main लाईनला जोडले अथवा जवळ नेले तरच मोनो रेलचे पुनरुत्थान होईल नाहीतर कठीण आहे.
मेट्रो रेल्वे : जेव्हा मेट्रो रेल्वे सुरु झाली होती तेव्हा मी दोन वर्षांपूर्वी त्यावर मी एक धागा काढला होता. मेट्रो रेल्वेचा मात्र लोकांना खूप फायदा झालाय. घाटकोपर ते अंधेरी आणि पुढे वर्सोवा पर्यंत जाणारी लोकांच्या खूप उपयोगाची आहे. घाटकोपर सेन्ट्रल रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक हि जोडलेली आहेत म्हणजे अक्षरशः मेट्रोमधून उतरल्यावर तुम्ही घाटकोपरच्या १ नं. स्थानकावर येता. अन्धेरीलाही दोन्ही स्थानके जोडलेली आहेत पण इथे थोडे चालावे लागते. पुढच्या भागामध्ये मेट्रोचा उपयोग कसा करावा यावर सविस्तर लिहीन.
पूर्व-पश्चिम दिशा आणि प्लॅटफॉर्मक्रमांक :
साधारणतः रेल्वे हि दक्षिण मुंबई ते ठाणे अथवा बोरीवली अशी दक्षिणेकडून उत्तर दिशेने धावते. त्यामुळे मुंबईच्या उपनगरांचे पूर्व पश्चिम असे भाग पडतात. आता कुठल्या बाजूला पूर्व भाग येतो आणि कुठल्या बाजूला पश्चिम भाग येतो ही दिशा समजणे लोकांना अवघड जाते यासाठी काही क्लुप्त्या सांगतो तरीही कळले नाही तर सहप्रवासी किंवा पोलीस/ स्टेशन मास्तर भेटला तर विचारा. बहुतेक स्थानकांवर पूर्व/ पश्चिम अश्या पाट्या लावलेल्या आहेत पण त्या पुलांवर आहेत फलाटावर नाहीत, पण त्या आपल्याला दिसत नाहीत किंवा आपले लक्ष जात नाही.
तुम्ही चर्चगेट/ CST दिशेने तोंड करून उभे असाल तर उजव्या बाजूला पश्चिम भाग येतो आणि डाव्या बाजूला पूर्व भाग येतो.
जर तुम्ही कल्याण/कसारा/कर्जत अथवा बोरीवली/ विरार/डहाणू दिशेने तोंड करून उभे असाल तर उजव्या बाजूला पूर्व विभाग येतो आणि डाव्या बाजूला पश्चिम विभाग येतो.
प्लॅटफॉर्मना क्रमांक हे पश्चिमेकडून पूर्वेकडे दिलेले आहेत.
त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ हा पश्चिम दिशा दर्शवतो तर ४,६, १० जेवढे असतील तेवढे हे पूर्व दिशेला असतात. कधी कधी पश्चिम दिशेला नव्याने तयार झालेल्या फलाटाला क्रमांक १ न देता ७/८ असे नवीन क्रमांक देतात , असे अपवाद सोडल्यास पश्चिमेकडील पहिला प्लॅटफॉर्म हा १ नंबरच असतो.
तसेच प्लॅटफॉर्म नं. १,२ हे स्लो गाड्यांसाठी असतात तर पुढचे (नेहमी नाही, एखादे स्थानक किती मोठे आहे त्यावर ठरते) फास्ट गाड्यांसाठी असतात.
तिकीट खरेदी आणि पर्याय :
तिकिटाचे सर्व दर तुम्हाला m-indicator वर तुम्हाला एका क्लिकवर मिळतील.
किमान भाडे Rs.५ आहे पण प्लॅटफॉर्म तिकीट मात्र आता १० रुपये केले आहेत.
म्हणजे ठाणे ते मुलुंड तुम्ही ५ रुपयात जाता येते पण नुसते प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासाठी १० रुपये मोजावे लागतील.
रिटर्न तिकीटाची सुद्धा सोय आहे. परतीच्या प्रवासासाठी ते तिकीट दुसर्या दिवशीपर्यंत लागू असते.
हापिसात जाणारी लोक मात्र पासचा वापर करतात. पास एका महिन्याचा आणि तीन महिन्याचा असे मिळतात. तीन महिन्याचे जास्त स्वस्त असतात हे सांगण्याची गरज नाही.
आगाऊ पास मात्र देत नाहीत म्हणजे ज्या दिवशी पास संपत असेल त्याच्या दुसर्या दिवसापासून पास मिळतो पण त्या आधी एक दिवस आधी जरी गेलात तरी पुढच्या तारखेचा देत नाही असा अनुभव आहे. आता online सुद्धा पास काढायचा पर्याय उपलब्ध आहे( मी तरी असा काढला नाहीये)
college मधील मुलांना वयाच्या २५ शी पर्यंत पासावर सुमारे ४०% सूट मिळते(आमच्यावेळी तरी होती).
फर्स्ट क्लासचा नेहमी पास काढतात, तरीही एका वेळेसाठी फर्स्ट क्लासचे तिकीट काढणारे महाभागही मी पहिले आहेत. तुम्हाला कंपनीकडून खर्च मिळणार असेल तर वेगळी गोष्ट आहे.
तुम्ही मुंबईत फिरायला आला असाल तर एक ४४० रुपयांचा tourist पास मिळतो ज्यायोगे तुम्ही फर्स्ट क्लासनी मुंबईच्या कुठल्याही लाईनवर (उपनगरीय सेवेच्या अंतर्गत येणारी सर्व स्थानके) तीन दिवसांसाठी प्रवास करू शकता.
तिकीट काढायचा पारंपारिक उपाय म्हणजे तिकीट खिडकीवर लाईन लाऊन तिकीट काढणे. पण याला सुद्धा बरेच जलद पर्याय आलेले आहेत. फक्त फर्स्ट क्लासच्या लोकांना तिकीट काढायला लाईन लावावी लागत नाही.
ATVM म्हणजेच automatic ticket vending machine:
हि खरी वापरासाठी लोकांना किचकट वाटतात पण एकदा सवय झाली कि मात्र वापरायला अतिशय जलद आहेत. मी आता सवयीने अक्षरशः ५ सेकंदात तिकीट काढू शकतो. त्याचा वापर करण्यासाठीचा डेमो येथे मिळेल. त्यासाठी तुम्हाला smart कार्ड खरेदी करावे लागते जे तिकीट खिद्दकीवर मिळते. ५० रुपये डीपोझिट आणि ५० रुपये वापरायला असे १०० रुपयांना मिळते. पुढे तुम्ही ५० ते ५०० रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता.
लोकांना वापरता येत नाही म्हणून काही वेळा रेल्वेचे लोक गर्दीच्या वेळी स्वतः बसून तुम्हाला तिकीट काढून देतात. यात काही मायनस पोइन्टस आहेत ते म्हणजे तुम्हाला तिकिटाच्या slab नुसार तिकीट मिळत नाही. उदा. दादर ते अंधेरी हे तिकीट तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला तेवढेच तिकीट मिळते, इथे जर का तुम्ही तिकीट खिडकीवर काढलेत तर ते तुम्हाला बोरीवली पर्यंतचे मिळेल कारण दादरपासून अंधेरी ते बोरीवली तिकिटासाठी १० रुपयेच लागतात. तसेच तुम्ही एकाच वेळी दोन अथवा जास्त तिकिटे काढलीत तर त्यासाठी एकच तिकीट येते ज्यावर दोन किंवा जास्त तिकिटांची नोंद असते. म्हणून मग अश्यावेळी प्रत्येकासाठी वेगवेगळी तिकिटे काढत बसावी लागतात. हे दोन दुर्गुण वगळता ATVM मशीन अत्यंत सुलभ आणि जलद आहे.
अधिकृत रेल्वे तिकीट केंद्रे:
रेल्वेने काही लोकांना फ्रांचायझी देऊन रेल्वे तिकीट counters( म्हणजे proper stall/दुकाने असतात) काढायला दिले आहेत.
तुम्हाला स्टेशन परिसराबाहेर हटकून असे counters दिसतील. यात प्रत्येक प्रवासामागे तुम्हाला १ रुपया ज्यादा द्यावा लागतो (कायदेशीररीत्या त्याचा उल्लेख तुमच्या तिकिटावर असतो काळजी नसावी) म्हणजे रिटर्नला २ रुपये जास्त द्यावे लागतात.
तुम्हाला घाई गर्दी असेल अथवा तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. गर्दीच्या वेळी मात्र मोठ्या स्टेशनजवळ या counters वरही गर्दी होते.
प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव आणि माहिती , गाडी गर्दीच्या वेळी गाडी कशी पकडावी यासारखे सल्ले पुढच्या भागात तोवर आपली रजा घेतो, आणखी काही माहिती हवी असल्यास आणि काही उणे दुणे राहिल्यास लक्षात आणून द्यावेत.
क्रमश:
प्रतिक्रिया
18 Jun 2016 - 11:38 pm | अंतु बर्वा
लेख आवडला. मुंबईतच बालपण गेलं असल्याने पटकन रिलेट झाला. जमल्यास टिप्स दिल्यात जसे ओवरब्रिज पाशी येणार्या डब्यात usually जास्त गर्दि असणे ई.तर नवीन माणसांना त्याचा फायदा होइल.
18 Jun 2016 - 11:40 pm | कवितानागेश
नवीन लोकांसाठी उत्तम माहिती.
19 Jun 2016 - 12:14 am | अभ्या..
भारीच कि,
हि माहिती अशी समजावून द्यायलाच हवी, आमच्या सारख्या गावठी माणसांची फार त्रेधा उडते हो. वर आमचे हुंबईकर मित्र अरे वेस्ट नाही ईस्ट, मेन नाहि वेस्टर्न असे कंफ्यज करतात.
पण कितीही समजावून सांगितले तरी मला हे कळणार नाहि कारण देवाने मला कंपास दिलाच नाही.
19 Jun 2016 - 12:17 am | अभ्या..
आणि आपण भेटलोय बहुतेक,
मी वेस्टर्न प्लाफा वर कल्याण लोकलची वाट पाहत होतो तेव्हा.
19 Jun 2016 - 12:59 am | रेवती
अवघड वाटते हे समजायला. मुंबैतच लहानाचे मोठे झालेले लोक्स आयुष्यभर प्रवास करतात पण बाहेरून गेलेले या प्रवासाशी ज्याप्रकारे जुळवून घेताना पाहिलेत त्यांचे नेहमी कौतुक वाटते.
19 Jun 2016 - 2:43 am | धनंजय माने
मुंबई आणि मुंबईकर (त्यांच्या नेव्हर से डाय स्पिरीट सह) नेहमीच कौतुकाचा विषय आहेत.
भाई, ये ये स्टेशन कौनसी साइड म्हटल्यावर बरोबर समजावून सांगणारे, पायावर पाय पडल्यावर मस्त शिव्या देणारे, चुकल्यावर रस्ता सांगणारे आणि लल्लन दिसल्यावर व्यवस्थित कापणारे मुंबईकर आणि त्यांची लाइफलाइन लोकल.
मिस यु मुम्बै!
19 Jun 2016 - 3:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्यारे काकाशी सहमत.
-दिलीप बिरुटे
19 Jun 2016 - 8:01 pm | धनंजय माने
गूड. अशीच सहमती दाखवत जा.
20 Jun 2016 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही कसली सहमती दाखवतो. आयडी तोच आहे का याची खात्री करायची होती.
आता आपली भेट थेट पुढचा आयडीच्या प्रतिसादाला तो जर बूक केला असेल तर..... =))
-दिलीप बिरुटे
20 Jun 2016 - 10:13 am | धनंजय माने
मालकांना कळवुनच आलो आहे. काळजी नसावी.
आणि बिरुटे मास्तर मोठे व्हा च!
19 Jun 2016 - 4:03 am | आदूबाळ
दादरबद्दल सहमत आहे. मी कधीच एका झटक्यात इच्छित फलाटावर पोचत नसे. एक दोन टल्ले तर फिक्स. (अपवाद फक्त पूर्व/टीटी बाजूने सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा. त्याचं प्रवेशद्वार वेगळं असल्याने अलगद पोचत असे.)
19 Jun 2016 - 6:26 am | कंजूस
चांगली आणि संपूर्ण माहिती गोळा केली आहे.बाहेरून मुंबई पाहाण्यास कोणी आलाच नातेवाइकाकडे तर तो इथला माणूस बरोबर नेतो परंतू स्वत: लोकल प्रवासाचे धाडस करू शकणार नाही.
#रोजचे टुअरिस्ट तिकीट: याचाही काही उपयोग करता येत नाही या गर्दीमुळे.
#मु्ंबईकडे येणाय्रा गाड्यांना अप गाड्या म्हणतात.
19 Jun 2016 - 7:31 pm | साधा मुलगा
इथे जरा गोंधळ झाला बघा, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाण्यांना UP तर मुंबईकडून बाहेर जाणाऱ्या गाड्यांना DOWN trains म्हणतात. आपले बरोबर आहे.
@ संपादक मंडळ ह्या आणि बाकी लहान सहान चुका मी दुरुस्त करू शकतो का?
19 Jun 2016 - 7:06 am | मुक्त विहारि
उत्तम माहिती
धन्यवाद
19 Jun 2016 - 7:15 am | खेडूत
छान माहिती..
गाववाल्यांना बरीच कामाला येईल.
19 Jun 2016 - 7:26 am | सुनील
रोजचा लोकल प्रवास टळून आता बरीच वर्षे झाली असली तरी एकेकाळी तो आयुष्याचा अविभाज्य घटक होता.
लेख आवडला.
काही तपशिलातील चुका (फारशा महत्त्वच्या नाहीत तरीही ...)
इथे स्टेशनांचा क्रम शहाड-आंबिवली असा हवा.
नेरळ आणि त्यापुढील स्थानके रायगड जिल्यात येतात.
दहिसरदेखिल मुंबईतच आहे. पालघर जिल्हा त्यापुढे.
माझा अनुभव मोनो, मेट्रो आणि AVTM येण्याच्या पूर्वीचा. त्यामुळे याबाबतीत माझा पास.
पुलेप्र.
19 Jun 2016 - 7:07 pm | साधा मुलगा
चुकून चूक झाली
हे लिहायचे राहिले लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
इथे आपण दोघेही थोडे चुकलो, आत्ताच मी तपासून बघितले तर दहिसर मुंबई उपनगरात येते, मीरा रोड आणि भाईंदर ठाणे जिल्ह्यात येते आणि पुढे पालघर जिल्हा लागतो.
19 Jun 2016 - 7:59 pm | नूतन सावंत
हेच लिहिणार होते.
19 Jun 2016 - 9:04 am | असंका
सुंदर ..अप्रतिम...माहितीचा खजिना!!!
अनेक धन्यवाद!
19 Jun 2016 - 9:19 am | एस
आधी वाखु साठवलीये. धागा सावकाशीने वाचेल.
21 Jun 2016 - 11:26 am | राजो
वाचेल कि वाचेन?
24 Jun 2016 - 3:24 pm | एस
वाक्यात कर्ता स्पष्टपणे उद्धृत नसल्यामुळे क्रियापदाचे रूप प्रथमपुरुषी की तृतीयपुरुषी असायला पाहिजे (पायजेल?) हा प्रश्न गैरलागू ठरतो. तसेही मिपावर व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची चर्चा करायची असेल तर संबंधितांनी हुच्चभ्रू संस्थळांवर जावे.
19 Jun 2016 - 9:26 am | उल्का
शनिवारी काढलेले रिटर्न तिकीट सोमवार पर्यंत चालते. पण अपेक्षित असते की त्यावर तुम्ही एकच रिटर्न प्रवास करावा. :)
तिकीट खरेदी केल्यावर रिटर्नची तारीख बघून खात्री करणे चांगले. कोणत्याही क्षणी नियम बदलू शकतात.
पुढच्या भागात फलाटाच्या उंचीविषयी सावधानतेचा इशारा लिहायला विसरू नका.
पुलेशु.
19 Jun 2016 - 9:36 am | भंकस बाबा
मी जवळजवळ बारा वर्षे लोकलने प्रवास करून नोकरी केलि, शेवटी या प्रवासाल कंटाळून नविन कमी पगारची नोकरी पकडली. आज पण सकाळी 9ते 10 या वेळात कोणी मालाडहुन मुंबईला जाण्यास सांगितले की पोटात गोळा येतो, आणि त्यात जर दादरला उतरून सेंट्रलने प्रवास करायचा असेल तर फेफर्र्, अटैक , जुलाब असे सर्व होते
19 Jun 2016 - 9:42 am | आतिवास
स्त्रियांसाठी राखीव डबे असतात आणि ते नेमके कुठं असतात या माहितीची लेखात भर घालता आल्यास उत्तम. लेडीज स्पेशल ट्रेन्स अजून चालू आहेत का नाही हे माहिती नाही.
तसेच विशेष गरजा असणा-या व्यक्तींसाठी (अपंग हा शब्द पुरेसा आणि योग्य वाटत नाही) देखील राखीव डबा असतो. त्याचीही माहिती द्यावी ही विनंती.
20 Jun 2016 - 11:05 am | अजया
लेडिज स्पेशल सुरु आहेत अजूनही.मला सेंट्रलच्या माहिती!सकाळी आठ वाजता आणि साडेआठच्या आसपास दोन कल्याण छशिट लेडिज स्पेशल आहेत.संध्याकाळी पाच वीस आणि सहाला छशिट कल्याण लेडिज स्पेशल आहेत.सर्व स्लो गाड्या आहेत या.
लेडिज डबा बारा डबा गाडीच्या सुरूवातीला शेवटी आणि मध्ये असतो.तसे प्लॅटफॉर्मवर चित्र असते.
अपंगांच्या डब्याचे पण चित्र असते.यात अपंग आणि एक जण सोबत असे चढु शकतात.
जय सेन्ट्रल;)
19 Jun 2016 - 9:45 am | गवि
मस्त लेख. नवीन प्रवाशांना उपयोगी. जुन्यांना रंजक.
येऊदे अजून.
19 Jun 2016 - 11:37 am | विवेकपटाईत
लेख आवडला. दिल्लीतही राजीव चौक, केंद्रीय सचिवालय या स्थानकांवर गाडीत घुसणे आणि बाहेर पडणे म्हणजे एक दिव्य आहे. पटेल चौक स्थानकावर गाडीत शिरण्यासाठी ३-४ गाड्या सोडाव्या लागतात. एक मात्र चांगले दर तीन मिनिटात एक मेट्रो येतेच.
19 Jun 2016 - 12:39 pm | भाते
म्हणजे अजुन पुण्यात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अस्तित्वात आहे तर! कधीही पुण्याला नातेवाईकांकडे गेलो तर एकतर ते त्यांचे दुचाकी / चारचाकी वहान बाहेर काढतात किंवा सरळ रिक्षाचा प्रवास. पुण्यात अजुन तरी सुदैवाने कधी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरण्याची वेळ आली नाही आहे.
लेखातली सविस्तर माहिती आवडली. छान.
19 Jun 2016 - 12:43 pm | सतिश गावडे
होय. मात्र ती मुंबईएव्हढी सोयीची नाही. पुण्यात स्वतःचे वाहन, शक्यतो दुचाकी असणे केव्हाही चांगले.
19 Jun 2016 - 12:41 pm | सतिश गावडे
दहा वर्षांपूर्वी मी वापरलेल्या युक्त्या:
१. एक वर्ष गोरेगांव ते चर्चगेट असा प्रवास केला. बसायला जागा अर्थातच भेटायची नाही. थोडे निरिक्षण केल्यावर लक्षात आले, एका गाडीला एका विशिष्ट डब्यात भजनी मंडळ असते. ती गाडी आणि तो डबा पकडायला सुरुवात केली. त्यांच्या ठेक्यावर अभंग पुटपुटायला लागलो. आणि मला बुड टेकण्यापुरती जागा देवाच्या दयेने मिळू लागली.
२. एक वर्ष भांडूप ते छशिट असा प्रवास केला. एके दिवशी विकांताला सकाळी भांडूप वरुन ठाण्याला जाताना छशिट वरुन ठाण्याला जाणारी लोकल ठाण्यावरुन काही वेळाने पुन्हा छशिटला जाते हा शोध लागला. तिथुन पुढे सकाळी भांडुपवरुन ठाण्याला जाणारी लोकल पकडू लागलो. त्याच लोकलने ठाण्याहून काही वेळाने छशिटकडे. भांडूपला छशिटकडे जाणार्या लोकलमध्ये चढता येत नाही ही समस्या कायमची मिटली.
19 Jun 2016 - 7:16 pm | गामा पैलवान
सगा,
तुमच्या दुसऱ्या युक्तीस डाऊन-अप अशी संज्ञा आहे. फार पूर्वीपासून डोंबिवलीवाले कल्याण लोकल पकडून डाऊनप करायचे, तर मुलुंडवाले ठाणेगाडीवर करायचे. भांडूपहून केल्याचं ऐकिवात नव्हतं. पण तुम्ही ती चिकाटी दाखवलीत! :-)
आ.न.,
-गा.पै.
21 Jun 2016 - 10:15 am | प्रमोद देर्देकर
बघ आपल्या संतांनी म्हंटलेलंच आहे की "देवाचिया द्वारी उभा क्षणभरी" जास्त नको फक्त क्षणभर. आणि तुला त्याचा लगेच लाभ झाला. आणि तु म्हणे की मी देव मानत नाही.
पम्या कळ(ला)वेकर.
पळा आता सगा चार शब्द फेकुन मारतंय आता.
19 Jun 2016 - 6:28 pm | साधा मुलगा
थोडे उणे दुने राहणार असे गृहीत होते, ते लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
गाड्यांच्या वेळा, गर्दी, राखीव डबे याबद्दल सविस्तर विस्ताराने पुढच्या भागात लिहीन.
पुन्हा एकदा धन्यवाद!!
19 Jun 2016 - 7:13 pm | गामा पैलवान
सामु,
लेख अत्यंत यथोचित आहे. मुंबईकर नेहमी लोकलला शिव्या देतो. तो कधीच असा लेख लिहिण्याच्या फंदात पडणार नाही. तेव्हा मुंबईबाहेरच्या कोणी मनावर घेतलं तरच असा काही लेख उत्पन्न होऊ शकतो! :-) ते काम तुम्ही केलंत. धन्यवाद.
लेखात एकंच विदा राहिलेला दिसतो. तो म्हणजे वाशिंद आणि आटगाव यांच्या मध्ये आसनगाव हे स्थानक आहे.
बाकी गर्दीच्या युक्त्या आणि निरीक्षणं नंतर लिहीन.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2016 - 7:20 pm | तिमा
इतकी वर्षे मुंबईत राहूनही 'छशिट' या शब्दाने क्षणभर गंडलो. पण जात्याच मुंबईकर असल्याने अर्थ कळला.
व्ही.टी. नांव बदलताना 'बोरीबंदर' हे मूळ नांव असतानाही , ह्या छशिप्रालि पक्षाने हे छशिट नांव जबरदस्तीने लादले.
19 Jun 2016 - 11:10 pm | गामा पैलवान
तिमा,
तुम्हाला छशिप्रालि म्हणजे शिवसेना अभिप्रेत असेल तर चुकीची दुरुस्ती करायला हवी. बोरीबंदराचे छशिट कलमाडींनी केले.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2016 - 9:06 pm | अत्रुप्त आत्मा
बहुत धन्यवाद. धागा साठवून ठेवत आहे.
19 Jun 2016 - 9:33 pm | नमकिन
मासिक पास शेवटच्या दिवसाच्या ३ दिवस आधी काढू शकतो.
तसेच तिकीट काढल्यावर १ तासाच्या आत प्रवास सुरु करावा लागतो व मध्येच ऊतरुन वेळाने पुढे प्रवास केला ( एकदिशा मार्ग) व तपासनिसाने पकडल्यास दंडात्मक कारवाहीस पात्र ठरतो.
गाड़ीत हल्ली पुढिल स्थानकाची उद्घोषणा होत असल्याने नवागतांची चांगली सोय झाली आहे.
काही अलिखित नियम- गाड़ीत शिरताना खांबाच्या उजव्या बाजुने चढावे व उतरताना उजव्या बाजुने (पिछे मुड़ झाल्याने) उतरवले जाते.
उतरताना पुढे उतरणाराच उभा आहे याची खात्री करावी, स्वतः पुढे असल्यास मागे विचारावे व जागा करुन द्यावी वा ऊतरुन परत चढावे.
पहिल्या वर्गाच्या डब्यात चौथ्या सीटवर बसता येत नाहीं, दरवाजात ३-४ लोक उभे, जास्त नाहीं.
गाड़ीत मतभेद झाल्यास मारामारी करु नये, प्रसंगी पब्लिक धुलाई होण्याची शक्यता जास्त. असे मतभेद झाल्यास 'आजही गांव से आया क्या?' हे वाक्य विषय बदलण्यास लागू पडते.
विरार ट्रेनमध्ये बोरिवली तसेच बोरिवली ट्रेनमध्ये अंधेरी पर्यंतच्या लोकांनी चढू नये, अन्यथा शेवटच्या स्थळी घेऊन जातात.
19 Jun 2016 - 10:49 pm | आदूबाळ
फर्स्ट क्लासचा पास काढण्यासाठी लायनीत उभं राहावं लागत नाही. थेट खिडकीत जाऊन मिळवता येतो.
(हा खरोखर नियम आहे की मी मारामारीची रिक्स घेत होतो?)
19 Jun 2016 - 11:05 pm | गामा पैलवान
आदूबाळ,
प्रथम श्रेणीच्या तिकिटेच्छुकांना द्वितीय श्रेणीच्या रांगेत उभे राहायची गरज नसते. त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग असते. मात्र प्रथम श्रेणीचं तिकीट सहसा कोणी काढत नाही, कारण ते फार महाग पडतं. त्यामुळे प्रथम श्रेणीच्या तिकीटाची रांग बघायला मिळंत नाही. खिडकीवर प्रथम श्रेणीसाठी स्वतंत्र रांगेची सूचना स्पष्ट शब्दांत नसून केवळ मोघम निर्देश असतो. ही माहिती बरीच जुनी आहे त्यामुळे चूकभूल देणेघेणे.
आ.न.,
-गा.पै.
20 Jun 2016 - 1:29 pm | आदूबाळ
ओह! असं आहे होय!
20 Jun 2016 - 5:26 am | कंजूस
मुंबईबाहेरचे लोक लोकल प्रवास करत नाहीत तरी त्यांना पहिला पंचवीस हजार व्होल्टसचा झटका पहिल्या दिवशीच बसू नये यासाठी मुंबईत येणारी त्यांची गाडी संध्याकाळी असेल तर बेरिवली/कल्याणला उतरून लोकलने पुढे जावे.सकाळी येणारी असेल तर शेवटच्या मुंबई सेंट्रल/सिएसटीला उतरून पुन्हा तिकीट काढून मागे येणं सोयीचं पडतं.
20 Jun 2016 - 7:34 am | टवाळ कार्टा
=))
20 Jun 2016 - 8:45 am | असंका
लाख मोलाचा सल्ला!!
20 Jun 2016 - 10:58 am | सस्नेह
आणि धमाल प्रतिसाद !
20 Jun 2016 - 12:44 pm | आदिजोशी
स्वतःची जाहिरात करतोय असं म्हणतील लोकं, पण लेखाच्या अनुषंगाने हे नवोदितांस उपयोगी पडेल असे वाटते...
निर्लज्जपणाचे फायदे केवळ ऑफिसमधेच नव्हे तर इतरत्रही होतात. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लोकल ट्रेन्स. इथे तर निर्लज्जपणाचा कळस करावा लागतो. मुंबईतल्या माणसांना पडणार्या स्वप्नातही ते स्वतःला विंडो सिट वर बसलेलं बघत नाहीत. किमानपक्षी दोन सिट्सच्या मधल्या जागेत धक्के न खाता उभं राहता यावं इतकीच माफक अपेक्षा मुंबईकराची असते. पण ती सुद्धा अनेकवेळा पूर्ण होत नाही.
दरवाजातच मुर्खासारखे लटकणारी लोक, उतरायचं नसूनही मधेच उभे राहणारे, भयाण वासाची तेलं डोक्यावर थापून आलेले भैय्ये, अशक्य गोंगाट करणारे गुजराथी, आपल्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवणारे कंपू आणि साक्षात गणपती, विठ्ठल, श्री राम इत्यादि देवाधिकांना कानात बोटं घालायला लावणारी भजनी मंडळं ह्यांच्या सोबत प्रवास करणं आणि लोकांचे घाम पुसत पुसत इच्छितस्थळी पोहोचणं ही काय सर्कस आहे ते मुंबई बाहेरच्या लोकांना कळणार नाही. पण हा अनुभव लाखो मुंबईकर रोजच घेत असतात. ट्रेनमधे शिरण्यापासून आपल्याला संघर्ष करत करत मुक्कामी पोहोचायचे असते.
घटना २ - सामान्य दॄष्टीकोन
स्थळ - फलाट
वेळ - सकाळी ८:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधीही
पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे येतो आणि तुमच्या ऐवजी तो गाडीत चढतो. तुम्ही ट्रेनच्या सोबत धावत धावत दरवाज्यापाशी येता. दरवाज्यात खांब धरून उभा असलेल्या माणसाला विनंती करता.
तुम्ही - अंदर चलो अंदर चलो...
खांबधारी माणूस - अरे जगा नहिये भैय्या...
तुम्ही - अरे अंदर जगा है, मेरेको दिख रहा है इधरसे...
खांबधारी माणूस - इधरसे दिखता है तो उधरसे जाओ...
तुम्ही - अरे ऐसा कैसा बात करता है तुम... कमसेकम पैर तो अंदर रखने दो...
(आता ती पाय ठेवायची २ इंच x २ इंच जागा त्याने पुढल्या स्टेशनवर चढण्यार्या मित्रासाठी ठेवलेली असते.)
खांबधारी माणूस - अरे किधर दिखताय तुमको जगा?
तुम्ही - यार कबसे खडा हुं, दो ट्रेन छोडा इसके पहलेका.
खांबधारी माणूस - तो एक ट्रेन और छोड. नेक्स्ट ट्रेन पूरा खाली हे, उसमे चढो...
(तरी तुम्ही कसे बसे दांडा पकडता. पण पाय कुठे ठेवायचा हा प्रश्न उरतोच. ट्रेन सुटते. भूतदयेने लोकं तुम्हाला वर खेचून घेतात.)
खांबधारी माणूस - साला मरने का है क्या? खाली फोकट हमारा खोटी करेगा...
लोकांनी आपला जीव वाचवल्याचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही अख्खा प्रवास उभ्याने करतात. काही लोकं पार शेवटच्या स्टेशनवर उतरायचं असूनही तुमच्यापुढे पॅसेजमधेच उभी राहतात. त्यामुळे चढणारी-उतरणारी सगळी मंडळी तुम्हाला धक्के देत, शिव्या घालत चढतात-उतरतात. तुम्ही फुकटात कंप्लीट बॉडी मसाज मिळाला (आजूबाजूला भैय्ये असतील तर ऑईल मसाज) असं समजून गप गुमान आपल्या स्टेशनवर उतरून मान खाली घालून घरी जाता.
-----------------------------------------------------------------------------------------------------
घटना २ - निर्लज्ज दॄष्टीकोन
स्थळ - फलाट
वेळ - सकाळी ७:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधिही
पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे जाऊ पाहतो. तुम्ही त्याला आणि तुमच्या पुढच्याला कोपर मारून अजून पुढे जाता. धावत्या ट्रेन मधे चढता. दरवाज्याचे हँडल धरून उभे राहता. आत जाण्याची मोहीम सुरू होते.
तुम्ही - चले ए शाहरूख, अंदर चल...
खांबधारी माणूस - अंदर जगा नहिये
तुम्ही - बंदर की तरह खंबे पे क्या लटकता है, अंदर चल...
खांबधारी माणूस - अरे भैय्या बोलाना जगा नहीं है...
तुम्ही - ए भैय्या कोणाला बोलतो रे... च्यायला उतर प्लॅटफॉर्मवर दाखवतो तुला...
खांबधारी माणूस - अरे वैसा भैय्या नहीं रे...
तुम्ही - अंदर चल अंदर चल...
(तुमच्या पुढे एक भैय्या उभा आहे)
तुम्ही - ए भैया तेरेको किधर उतरने का है?
भैय्या - अंधेरी...
तुम्ही - तो अभिसे इधर कायको खडा है? बगिचे में आया क्या घुमने को? पिछे हट...
भैय्या - अरे मगर अंदर जगहा नही है...
तुम्ही - तुम साला हजारो लोग रोज आताय फिरभी मुंबई में जगा होताय ना...
भैय्या - कितनी भीड है...
तुम्ही - साला तुम लोग काई भीड है... अब गाव में खत डाल और बोल की और भैय्ये मत भेजो...
तुमचा आवेश बघून एक दोन माणसं तुम्हाला जागा करून देतात. दरवाज्याच्या पॅसेज मधून सिट जवळच्या पॅसेजमधे पोहोचायचा पहिला टप्पा पार पडला. हळू हळू सरकत सरकत तुम्ही सिट्स जवळ येता. तीन जणांच्या सिट वर चक्क तीनच माणसं बसलेली आहेत. त्यातला एक अंगाने जरा रूंद असल्याने बाकिचे लोक 'कसं सरकायला सांगायचं?' असा विचार करून दुसरं कुणी उठायची आशाळभूतपणे वाट बघत उभे असतात.
तुम्ही - थोडा सरकके लो...
विंडोवाला बाहेर बघत असल्याचे दाखवून अथवा झोपेचे सोंग घेऊन तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. २-३ नंबरचे केवळ जागच्याजागी हलतात.
तुम्ही - थोडा सरकके लो...
बसलेला - और कितना सरकेगा? इतनाही जगा है...
ह्या अशाच उत्तरांमुळे लोकं बसायचा नाद सोडून बाजुला उभे राहिलेले असतात. त्या सगळ्यांचा नजरेत 'आता काय करशील लेका' हे स्पष्ट दिसत असतं. अशावेळी पुढचा मागचा विचार न करता सरळ त्या उरलेल्या १ इंचाच्या पट्टीवर टेकून घ्यावे. बसताना तिसर्या सिटवरच्या माणसाला नीट घासून, दाबून बसावे.
बसलेला - अरे क्या करताय...
तुम्ही - बस थोडासा सरको... (असं म्हणून त्याला अजून थोडे आत दाबावे)
बसलेला - अरे धक्का क्यों मारताय...
तुम्ही - धक्का खानेका नै है तो फर्स्ट क्लास में जाओ. टिकीट हमने भी निकाला है.
एकदा टेकायला जागा मिळाली की मग बसायला मिळण्याचे चान्सेसही वाढतात. बाजुच्याला दाबत रहायचे विसरू नये. अन्यथा त्या १ इंचाच्या पट्टीवर फार वेळ बसल्यास अर्धशिशिचा त्रास संभवतो.
गाडी थोडी जरी हकली तरी निर्लज्जपणे मिलीमिटर मिलीमिटर लढवत सिटवर हळू हळू पसरायला लागायचं. १-२ स्टेशन्स गेली की तुम्हाला किमान टेकायला तरी मोप जागा झालेली असते. आणि मधेच कुणी उठला तर मधे उभ्या असलेल्या माणसाला सिट ऑफर करण्याचा अगोचरपणा न करता उठणारा माणूस पूर्ण उठायच्या आधीच आतच जागा ताब्यात घावी. मोहीम फत्ते.
अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवर शिरायच्या आधीच आपला भिडस्त स्वभाव बाजूला ठेवावा आणि निर्लज्जपणा अंगी बाणवूनच गाडीत चढावे, म्हणजे प्रवास कुठचाही असो, सुखाचा होईल.
20 Jun 2016 - 3:24 pm | नंदन
अचूक निरीक्षणं! लेखही आवडला - पुढील भागांची वाट पाहतो.
=)) =))
इथे सतत सावध राहणं महत्त्वाचं आहे; कारण गनीमांच्या गोटात केवळ जागेची वाट पाहत उभे असलेले लोकच असतात असं नाही, तर 'राँग डायरेक्शन'कडे तोंड करून बसलेले लोकही कधी कधी चपळाईने त्यातल्या त्यात, जरा अधिक बरी जागा मिळवायच्या मागे असतात.
20 Jun 2016 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
_/\_ :) युक्त्या आवडल्या गेल्या आहे.
-दिलीप बिरुटे
20 Jun 2016 - 1:29 pm | कंजूस
हे सर्व संवाद वेस्टर्न नावाच्या गाड्यांत फार होतात.सेंट्रलचे लोक/प्रवासी कीव करावे इतके नम्र आणि माघार घेणारे तसेच सोशिक, जागेवर कोणी बसायचे हे अलिखित नियम पाळणारे असतात.सेंट्रलचा माणूस वेस्टर्नला कधी गेला आणि दादार ते विरार जात असेल तर कांदिवलीला उठून उभा राहतो दुसय्राला जागा देण्यासाठी तेव्हा सर्व भयचकित आश्चर्याने विचारतात "नया है क्या?"
20 Jun 2016 - 4:02 pm | पक्षी
वेस्टर्न चे लोक्स खूपच माजोरडे असतात. गर्दीच्या वेळी जर तुम्ही चर्चगेट - विरार लोकल पकडली आणि तुम्हाला दादर ला उतरायचा असेल तर दादरला चढणारी वेस्टर्न ची पब्लिक उतरू देत नाही. पण सेन्ट्रल ची पब्लिक असे करीत नाही.
20 Jun 2016 - 3:03 pm | मित्रहो
एका अजून जरुरीची माहीती हवी असते पण ती तशी मिळत नाही ती म्हणजे तुमचे स्टेशन कोणत्या बाजूला येनार. विशेषतः तुम्ही उतरनारे स्टेशन लहान असेल आणि पुढचेच स्टेशन मोठे असेल तर अधिक त्रास होतो. ही माहीती सरावाशिवाय येत नाही. सोपा उपाय म्हणजे पुढच्या स्टेशनवर उतरुन परत यायचे.
तसेच स्लो लोकल, फास्ट लोकल विषयी माहीती हवी. स्लो मधे माणसे चढत उतरत असतात त्यामुळे गाडीत जागा होते पण प्रवासाला वेळ लागू शकतो.
तसेच चर्चगेट किंवा सीएसटीला संध्याकाळी आधी चढनाऱ्यांना चढू द्यायचे असते नंतर उतरनाऱ्याने उतरायचे.
23 Jun 2016 - 3:25 am | शुंभ
लोकल गाड्यांच्या डब्यांच्या वर जो पेंटोग्राफ असतो , तो ज्या ज्या डब्यांवर असतो, त्या डब्यात प्रवासामध्ये अधून मधून घुरर S S घुरर असा आवाज येतो.
याचा आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो, या साठी युक्ती अशी की, मोटरमन आणि गार्ड पासून २ , ५ , ८ आणि ११ व्या डब्यावर असा पेंटोग्राफ असतो (मोटरमन आणि गार्ड कडून २,५ , ८ , ११ वे डबे तेच येतात, जो डबा मोटरमन कडून दुसरा तो गार्ड कडून मोजल्यावर ११ वा इ. ), असे डबे वगळून गाडीत चढायचे.
20 Jun 2016 - 4:36 pm | पी. के.
खुप मेहनत घेतलीयं.
पास सहा महिन्याचा ही भेटतो.मागच्या वेळी दर वाढनार होते त्या वेळी काढला होता.
20 Jun 2016 - 4:38 pm | समीरसूर
अतिशय उत्कृष्ट लेख! खूप छान माहिती मिळाली.
मुंबई मला नेहमीच कन्फ्युज करते. इस्ट, वेस्ट, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर.....खूप गोंधळ उडतो. तिकिटांच्या रांगा, लोकलमधले विविध प्रकारचे घामाचे वास, सगळीकडे प्रचंड गर्दीच गर्दी, सगळीकडे बोलली जाणारी धेडगुजरी हिंदी...मला मुंबई झेपलीच नाही. एखादा महिना कसाबसा काढून मी मुंबईला रामराम ठोकला. आपल्याला पुण्याचा निवांतपणा खूप आवडतो. चितळेंच्या "एक ते चार बंद" वर आपण बेहद्द खुश! अर्ध्या तासात पुण्याच्या मुख्य भागात आरामात पोहोचता येते. शिवाय थोडं बाहेर पडलं की सह्याद्रीच्या रांगा आहेतच डोळ्याचं पारणं फेडायला. तरी गेल्या १५ वर्षांत पुणे खूप बदललं; नाहीतर पूर्वीच्या पुण्याची खुमारी औरच होती. माझं १९९९-२००० च्या काळात स्वप्न होतं. प्रभात रस्त्यावर बंगला, संध्याकाळी फर्गसन रस्त्यावर फिरायचं, सकाळी 'वैशाली'मध्ये मसाला डोसा, शनिवारी नीलायममध्ये पिक्चर, बंगल्याच्या एका खोलीत निवांत लेखन करायचं...साला जम्या नय. :-(
मुंबईचे लोकं मला फार आवडतात (त्यांचं हिंदी सोडून). लोकलमध्ये हयात घालवल्यानंतरही कमालीचे ताजेतवाने आणि उत्साही असतात. मदत करायला तत्पर असतात. सहसा गंडवत नाहीत.
लहानपणी 'शान'मधलं मजहर खानचं "आते जाते हुए मैं सब की खबर रखता हूं." हे गाणे पाहिल्यानंतर मला मुंबईचं कमालीचं आकर्षण वाटलं होतं आणि ते पुढे कित्येक वर्षे अबाधित होतं आणि आजही आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला, बांद्रा, चर्चगेट, भांडूप अशी ही नावे मला खूप ग्लेमरस वाटायची. अजूनही वाटतात. 'शान'मध्ये मजहर खान अमिताभ आणि शशी कपूरला विचारतो "ये किस्सा कहीं खार-बांद्रा के आसपास तो नही हुआ था?" हे ऐकून मला अजूनही अंगावर एक अशी गोड शिरशिरी येते. मोठमोठाले हिंदी सिनेमाचे नट, त्यातल्या त्यात अमिताभ, झुळझुळीत कपडे घालणाऱ्या त्या सुंदर सुंदर नट्या, तो झगमगाट...मी मुंबईच्या प्रेमात पडलो होतो. 'शान'मधली बिंदिया गोस्वामी आणि परवीन बाबी अशाच रेशमी नट्या होत्या. नंतर 'तेजाब' पाहून माझं मुंबईप्रेम अगदी उफाळून आलं होतं. त्यातला मुन्ना, त्याची बेदरकार वृत्ती, मुकुटबिहारीला बुकलून काढण्याचा दम, माधुरीचं थिरकणं...सगळंच भलतंच आवडलं होतं; अजूनही तितकंच आवडतं. मुंबई माझ्यासाठी नेहमीच एक तेजस्वी, अढळ ताऱ्यासारखी अप्राप्य राहिली आहे. संपत्ती, दारिद्र्य, ग्लेमर, चाकरमाना वर्ग, उंच उंच इमारती, झोपडपट्ट्या, नट-नट्या, लखलखाट, वेग, लोकल्स, मोठमोठ्या महागड्या गाड्या, समुद्र, बीचेस, खाड्या, सिनेमा...सगळंच अद्भुत आणि तरीही एखाद्या चकव्यासारखं. कधीही हातात न येणारं. कधीही नीट न समजणारं.
लहानपणी माझ्या गावात मुंबई म्हणजे अमेरिकेएवढी दूर वाटायची. अंतर होतं जवळपास ४५० किमी. पण त्या लहानशा गावात 'स्क्रीन' नावाचं एक साप्ताहिक मिळत असे. ते मी घेत असे कधीमधी. आमच्या गावात ते कसं मिळायचं आणि कोण घ्यायचं हे मला अजून न उलगडलेलं कोडं आहे. त्यात हिंदी सिनेमाची पोस्टर्स असायची. 'कयामत से कयामत तक', 'अवाम', तेजाब'...आणि बरेच सिनेमे. त्यात असलेले मुंबईचे उल्लेख वाचून मी हरखून जायचो. हळूहळू मुंबईचं हे अप्रूप कमी झालं, गारुड मात्र अजून आहे.
20 Jun 2016 - 5:38 pm | कंजूस
मुंबई - पुणे जोडणाय्रा डेक्कन,सिंहगड इक्सप्रेसच्या रिझर्ल्ड डब्यांत हीच परिस्थिती होत चालली आहे.अत्यंत केविलवाणा प्रयत्न करून सांगावे लागते बसलेल्यांना की आमचे रिझर्वेशन आहे.तेव्हा तोंड वाकडे करून सरकून बसायला जागा देतात.खिडकीच्या बाहेरच काय हातातला मोबाइलही पाहता येत नाही कारण तोंडासमोर कोणाचं पोट अथवा *** असतो.
20 Jun 2016 - 7:38 pm | हुप्प्या
पूर्वी लोकलची व्यवस्था पहाणारे अत्यंत बेपर्वा आणि माजोरडे असत. माहिती लपवण्याकडे कल असे. अमुक गाडी उशीरा येत आहे ही घोषणा अगदी शेवटच्या क्षणी होत असे. लोक स्टेशन मास्तरच्या ऑफिसबाहेर घोटाळत, गयावया करून मास्तरांना माहिती विचारत. सरळ सरळ घोषणा करून तुमची गाडी ह्या कारणाने खोळंबली आहे, गाडी कल्याणला पोचलेली आहे पण अमक्या कारणाने पुढे जाऊ शकत नाही असे स्पष्ट सांगितल्याने काय आकाश कोसळणार होते देव जाणे! अशा वागण्याने लोकांचे हाल होत असत, विशेषतः पावसाळ्यात. हल्ली काय स्थिती आहे माहित नाही. मोबाईल वगैरेमुळे माहिती सहज उपलब्ध होत असावी अशी आशा.
१५-२० वर्षांपूर्वीही लोकलने कामावर जाणे हा एक तापदायक प्रकार होता. गुरांसारखे लोक कोंबलेले असत. त्यात पत्ते, भजने वगैरे डोकेदुखी. तिकिटाची लाईन हा तर एक वेगळाच विषय. जेवढी लाईन मोठी तेवढे तिकिट देणारे कर्मचारी संथ असावेत असा काही संकेत असावा. मधेच लाईन बंद करुन टाकणे, ताटकळत असणार्या लोकांना शिव्याशाप देत दुसर्या लाईनीत जाऊन ताटकळण्याशिवाय उपाय नसे. शनिवार-रविवारी लग्न, सिनेमा नाटक, नातेवाईकांना भेटणे, गणपती ह्याकरता तिकिटे घ्यायलाच लागत आणि बर्याचदा मनस्तापही. कित्येकदा तिकिट देणारे कर्मचारी गप्पात रंगलेले असत. आपण तिकिट देण्याकरता बसलो आहोत हे विसरुन ते अन्य कुणाशी तरी गप्पा हाणत. अत्यंत संतापजनक! आणि बोंब मारली तर "तुला तिकिट देणारच नाही. कर काय करायचे ते" असा आडमुठेपणा होण्याची शक्यता.
सीझन पास, महिन्याचा वा ३ महिन्याचा हा एक सोयीचा प्रकार होता. कधीतरी त्याकरता फोटो लावणे सक्तीचे झाले तेव्हा फोटोच्या दुकानांची चांदी झाली. काही फिरतीवरील लोक एकच पास घेऊन तो आपापसात वापरत त्यावर उपाय म्हणून असे केले असावे.
उल्हासनगर ह्या रम्य नगरात कुण्या चतुराने लोकलने बिना तिकिट जाण्याकरता विमा काढला होता. त्याचे हप्ते भरायचे आणि बिन्धास बिनातिकिट जायचे. दंड झालाच तर विमा कंपनी भरणार अशी काही योजना होती असे ऐकिवात आहे. खरेखोटे तो झुलेलालच जाणे!
एकेकाळी (४०-५० वर्षे मागे) हा प्रवास सुसह्य होता हे कुणाला खरे वाटणार नाही. आता काय स्थिती आहे ह्याची कल्पनाही करवत नाही. आणि प्रत्यक्ष प्रवास करण्याची वेळ येऊ नये अशी देवाकडे प्रार्थना!
20 Jun 2016 - 7:48 pm | प्रदीप साळुंखे
उपयोगी लेख
20 Jun 2016 - 8:16 pm | सचु कुळकर्णी
कुठलाहि भाषिक किंवा प्रांतिक मुद्दा न समजावा सहज म्हणुन विचारतोय.
काहि दिवसांपुर्वि 'जाने भि दो यारो' हा चित्रपट पुन्हा पाह्ण्यात आला, एका फ्रेम मध्ये 'मरिन लाईन्स' स्टेशन चि पाटि दिसते त्यात हिंदि किंवा मराठी (देवनागरी) ईंग्लिश आणि गुजरातीत 'मरिन लाईन्स' लिहिलेले असते. १९८३ चा चित्रपट आहे.माझा इतक्यातच गेल्या १५ वर्षात मुंबईशी संबध आलाय आणि मि तरि गुजरातित रेल्वे स्टेशन चि पाटि नाहि बघितलिय. ह्याचा संबध कदाचित १९६० पुर्वि मुंबई आणि गुजरात चा काहि भाग ह्याला मुंबई प्रांत म्हणायचे म्हणुन असेल. असो लेखात छान माहित देण्यात आलिय.
20 Jun 2016 - 9:19 pm | हुप्प्या
पूर्वी पश्चिमी उपनगरातील स्टेशनावर गुजराथी पाट्या असत (चर्चगेट ते विरार). भाषिक अस्मिता फार जागृत नसल्यामुळे असेल बहुधा! स्टेशनचे बोर्ड कुठल्या भाषेत असावेत याबद्दल निश्चित संकेत नव्हते आणि राजकारणी ह्यात फार लक्ष घालत नव्हते. हिंदीतले नाव सगळ्यात मोठे असे. इंग्रजी, मराठी व गुजराथी कमी आकारात असे. कधीतरी कुणीतरी बाकी राज्यातले धोरण आणि महाराष्ट्रातले धोरण ह्यातली विसंगती अधोरेखित केली असेल आणि त्यामुळे ते बदलले असेल.
स्टेशनवर गाडी येण्यापूर्वी वा अन्य घोषणा होत असत त्याही तीन तीन भाषातून ऐकणे ही कित्येकदा डोकेदुखी होत असे. विशेषतः मोठ्या स्टेशनात.
20 Jun 2016 - 10:18 pm | खटपट्या
रेल्वे स्थानकावरील पाट्या, आणि मुळ नावांची इंग्रजी आणि हींदीमधे केलेली भाषांतरे हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. उदा. मराठी = शहाड, हींदी = शहद ??
21 Jun 2016 - 7:08 am | हुप्प्या
सायनला कुणीही शीव म्हणताना ऐकलेले नाही. पण पाटीवर शीवच लिहितात.
कर्जतला करजत असे लिहिलेले पाहिल्याचे आठवते. कुठल्या भाषेत ते तसे होते ते माहित नाही.
हिंदीत ळ नसल्यामुळे कलवा, वडाला, विक्रोली, भायखला, चिंचपोकली हे व्हायचे. बाकी हिंदीकरणात काय मोडतोड व्हायची ते आठवत नाही.
बहुतेक उपनगरी स्टेशनांची नावे अगम्य आहेत. कुठल्याही भाषेत त्याचा अर्थ लागत नाही. भांडुप काय, कांजूर काय, विक्रोळी काय, डोंबिवली, आंबिवली, खडावली, खर्डी, टिटवाळा (ह्या नावावर अनेक विनोद बनले असणार ह्याची खात्री आहे! इंग्रजीत अडाणी असल्यामुळे त्यातील गंमतीपासून मी वंचित राहिलो!), कळवा, मुंब्रा, कसारा, वांगणी, नेरळ इ. विद्या विहार, शीव, दादर, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ हे अपवाद म्हणता येतील.
25 Jun 2016 - 11:09 pm | खटपट्या
26 Jun 2016 - 3:53 am | हुप्प्या
ही गावांची नावे असल्याची "नवी" माहिती दिल्याबद्दल आभारी आहे!
सर्व स्थानकांच्या नावाची कहाणी आहे का? हे नवीन आहे. कसारा, खर्डी, खडवली, कर्जत आणि वांगणी ह्या शब्दांचे अर्थ वा कहाणी सांगता का?
कुर्ला, वडाळा, घाटकोपर, गोवंडी, चेंबूर, वाशी ही सगळी नावे अगम्य आहेत.
26 Jun 2016 - 8:18 am | खटपट्या
खालील लींकवर बरीच माहीती आहे मुंबैतील स्थानकांच्या नावाबद्दल.
http://homegrown.co.in/how-train-stations-in-mumbai-were-named/
http://goanand.com/travel/Mumbainames.htm
गूगल केल्यास अजुन माहीती मिळेल.
26 Jun 2016 - 10:16 am | अभ्या..
लिंक मस्तय.
डोंबिवली म्हणजे डोंब लोकांची आळी काय?
26 Jun 2016 - 12:46 pm | टवाळ कार्टा
डोंब उसळेल आर
26 Jun 2016 - 3:26 pm | हुप्प्या
वरील लिंका बर्यापैकी निरुपयोगी आहेत. मालाड हे मालाड स्टोनवरून पडले आहे. डोंबिवली हे डोंब लोकांच्या वस्तीवरून पडले आहे वगैरे अर्थ बिनबुडाचे आहेत. डोंबिवलीत डोंब लोक होते ह्याला काय पुरावा? आणि डोंब वस्ती होती तर डोंबगाव असे काही न होता वली का चिकटवले? त्याचा अर्थ काय? मग कांदिवली, आंबिवली, बोरिवली ह्यांचे काय?
गुगल करुन काही निष्पन्न होणार नाही. आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार? मुंबई परिसरात गावांची जी नावे आहेत ती ज्या भाषांवरून पडली आहेत त्या बहुधा नष्ट झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच अर्थ इतका सहजासहजी कळणार नाही. तो एक संशोधनाचा विषय आहे. पुण्याजवळही अशीच अगम्य नावे आहेत. येरवडा, दापोडी, बोपोडी, मळवली, कामशेत, वानवडी, हडपसर, फुरसुंगी, निगडी ही नावेही अशीच.
26 Jun 2016 - 6:33 pm | अभ्या..
डोंबिवलीत राहता वाट्ट्टं? ;)
असो.
अर्थ माहीत नसला किंवा काहीच अर्थ नसला तर तसं सांगा ना. आम्हाला काय पुरावा मागता. संशोधनाचा विषय आहे म्हणता मग कुणीतरी संशोधन केले असेलच ना. ते सांगा.
लोक मोहेम्जोदारोच्या लिप्याचे अर्थ लावलेत हो. अशी काय मुंबई जुनीय की काहीच पुरावा नाही.
26 Jun 2016 - 8:16 pm | हुप्प्या
हो मी डोंबिवलीचा आहे. आणि जातीने डोंबही आहे! पण आमच्या जातीचे लोक गठ्ठ्याने एका गावात का रहातील? त्यांचे काम हे वध करणे. प्रेताची विल्हेवाट वगैरे. अशा लोकांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय उपलब्ध होईल अशी परिस्थिती डोंबिवली गावात प्राचीन काळी होती ह्याला काहीही पुरावा नाही.
===अर्थ माहीत नसला किंवा काहीच अर्थ नसला तर तसं सांगा ना. आम्हाला काय पुरावा मागता.
अर्थ माहित नाही असे अनेक लोकांनी म्हटले आहे. मीही. मी पुरावा मागत नाही आहे तर पुरावा नसल्याचे निदर्शनास आणत आहे ह्याची नोंद घ्यावी.
==लोक मोहेम्जोदारोच्या लिप्याचे अर्थ लावलेत हो. अशी काय मुंबई जुनीय की काहीच पुरावा नाही.
हे विधान करण्यापूर्वी थोडा शोध घ्यायला हवा होता आपण. मोहेन्दजारोची लिपी पूर्णपणे उलगडलेली नाही. अनेक मते आहेत.
माझे असे मत आहे की ज्याअर्थी मराठीत ह्या आणि अशा नावांचे अर्थ लागत नाहीत त्या अर्थी ती नावे लुप्त झालेल्या कुठल्यातरी भाषेतील आहेत.
मराठी भाषेत असे शब्द आहेत ज्याचे अन्य कुठल्या भाषेतील शब्दांशी नाते लागत नाही. उदा. झाड. तशीच ही गावांची नावे. नाही म्हणायला दक्षिणेत गावांची नावे हळ्ळी (कन्नड) वा पल्ली (तमिळ) ह्या प्रत्ययाने संपतात.वरील काही गावांत आढळणारा वली हा प्रत्यय ह्या जातकुळीतला असेल असे मत एका तज्ञाने मांडले आहे.
25 Jun 2016 - 7:29 pm | साधा मुलगा
पश्चिम रेल्वेचा इतिहास पाहिलात तर त्याची सुरुवात बॉम्बे-बरोडा & सेन्ट्रल इंडिया कंपनी म्हणून सुरुवात झाली होती, त्यामुळे मराठी , हिंदी ,इंग्रजी सोबत गुजुरती पाट्याही होत्या हे त्यामागचे मूळ कारण.अधिक माहितीसाठी विकिपीडियावरील ही लिंक पहा. मलाही काही छान माहिती मिळाली.चर्चगेट च्या पुढे कोलाबा नावाचे स्टेशन होते १९३३ सालापर्यंत ही एक नवीन माहिती मला मिळाली. ही रेल्वेसेवा पुढे १९५१मध्ये इतर पश्चिम राज्यांच्या रेल्वेसेवेशी जोडून पश्चिम रेल्वे बनवण्यात आली.
बाकी तीन भाषांमधून होणाऱ्या घोषणेबाबत सहमत.
पुढील स्टेशन ‘वांद्रे’, अगला स्टेशन ‘बांद्रा’, नेक्ष्त स्टेशन ‘बॅंड्रा’ याला काही अर्थ नाही.
23 Jun 2016 - 3:30 am | शुंभ
(हाच प्रतिसाद वर भलतीकडेच पडला आहे, कृपया तो उडवावा )
लोकल गाड्यांच्या डब्यांच्या वर जो पेंटोग्राफ असतो , तो ज्या ज्या डब्यांवर असतो, त्या डब्यात प्रवासामध्ये अधून मधून घुरर S S घुरर असा आवाज येतो.
याचा आजारी किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो, या साठी युक्ती अशी की, मोटरमन आणि गार्ड पासून २ , ५ , ८ आणि ११ व्या डब्यावर असा पेंटोग्राफ असतो (मोटरमन आणि गार्ड कडून २,५ , ८ , ११ वे डबे तेच येतात, जो डबा मोटरमन कडून दुसरा तो गार्ड कडून मोजल्यावर ११ वा इ. ), असे डबे वगळून गाडीत चढायचे.
24 Jun 2016 - 12:57 pm | टवाळ कार्टा
किडामुंगीचा प्रवास झालाय लोकलचा प्रवास
24 Jun 2016 - 1:43 pm | avinash kulkarni
मुंबईच्या रोजच्या प्रवासाने आपण किती ताकदवान आहात ते कळते. डॉक्टरन कडे जायची गरज राहत नाही .
24 Jun 2016 - 3:46 pm | एक शुन्य
नवीन व्यक्तीसाठी घाम फोडणारा प्रवास
26 Jun 2016 - 6:16 am | बंड्याभाय
फारच उत्तम व माहितीपूर्ण लेख.
जुने दिवस आठवले, कॉलेजची सहा आणि नोकरीची चार अशी दहा वर्षे लोकल ने प्रवास केला. नंतर सुदैवाने (की दुर्दैवाने) खंड पडला. आता तर सवय सुटली आहे. नातेवाईकंकडे जायचे झाल्यास उलट दिशेने प्रवास करण्यास प्राधन्य देतो.
प्रामाणिक पणे सांगायच झाल्यास लोकल चा प्रवास सुटल्याने खालील तोटे झाले.
१) सकाळी अर्ध्या तासात आवरायचो, आता कुठे लोकल पकडायची आहे म्हणून आरामात आवरतो.
२) दिवसातून किमान चार ते सहा वेळा जिने चढ उतार केल्याने आपोआप व्यायाम व्हायचा, आता व्यायाम व्हावा म्हणून कचेरिचे जिने चढ-उतर करतो.
३) सगळ्यात महत्वच म्हणजे मित्र भेटायचे आणि थेट संवाद व्हायचा, आता फक्त WhatsApp वर.
असो, पुढील लेखातून अधिक मार्गदर्शन आपेक्षित. तूर्तास धन्यवाद.
26 Jun 2016 - 12:52 pm | गामा पैलवान
लोकहो,
आता सुरसुरी आलीये तर लिहूनच टाकतो आठवते ती माहिती.
१. बोरीबंदर : बोरीची झाडं होती. जवळ बंदर आहे. म्हणून बोरीबंदर. इथे पुढे व्हिक्टोरिया टर्मिनस नामे स्थानक ब्रिटिशांनी उभारलं. पुढे याचं १९९५ च्या आसपास कलमाडींनी छत्रपती शिवाजी टर्मिनस केलं. मी मात्र यास गोब्राह्मणप्रतिपालक-क्षत्रियकुलावतंस-प्रौढप्रतापपुरंदर-सिंहासनाधीश्वर-महाराजाधिराज-छत्रपति-श्रीशिवाजीमहाराज टर्मिनस असं संबोधतो.
२. मशीद : इथे शनवारतेल्यांची म्हणजे बेणे इस्रायली यहुद्यांची मशीद आहे. जवळच्या साम्युअल स्ट्रीटवर. कोकणात सिनेगॉगला मशीद म्हणतात.
३. स्यांडहर्स्ट रोड : माहीत नाही. नाव बदलून डोंगरी ठेवायला हवं.
४. भायखळा : भाया नावाच्या माणसाचे खळे म्हणजे शेत होते ते भायाखळे.
५. चिंचपोकळी : चिंच आणि पोकळीची झाडं चिक्कार. पोकळी म्हणजे काय ते माहीत नाही.
६. करी रोड : माहित नाही. बदलून लालबाग करा.
७. परळ : परळी सारखं नाव.
८. दादर : म्हणजे जिना किंवा भुयार
९. माटुंगा : मातंगशाला यावरून पडलं. मातंग = हत्ती
१०. शीव : म्हणजे गावची वेस. सायन हा आंग्लोच्चार आहे.
११. कुरला : कुरल्या नामे खेकड्यांवरून पडलं. (जवळंच चेंबूर आहे चिंबोरीवरून पडलेलं, पण ते खाडीमार्गावर आहे.)
१२. विद्याविहार : सोमय्या न्यासाची शिक्षणकेंद्रे आहेत.
१३. घाटकोपर : घाटाचं कोपर. म्हणजे काय ते माहित नाही. कोपर हे नाव मुंबईच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी दिसतं.
१४. विक्रोळी : मूळ नाव विखरोळी. अर्थ माहित नाही.
१५. कांजूरमार्ग : अर्थ माहित नाही. कांजूर सारखे अंजूर हे गाव भिवंडीपाशी आहे.
१६. भांडूप : अर्थ माहित नाही. तत्सम नावही सापडलं नाही.
१७. नाहूर : अमाना. पहूर, माहूर, इत्यादी तत्सम नामे.
१८. मुलुंड : मूळ नाव मुळुंद. अमाना.
१९. ठाणे : श्रीस्थानक. अगदी रेल्वे सुरू व्हायच्या आधीपासूनही हे स्थानकच आहे.
२०. कळवा : अमाना. कळवे मूळ नाव. बहुतेक हे एक भौगोलिक नाव आहे.
२१. मुंब्रा : मुंबरे. मुंब ही भौगोलिक संज्ञा वाटते. मुंबई, मुंबके इत्यादि गावे कोकणात आहेत. मुंबरे वरून मुंबरकर आडनाव आहे.
२२. दिवा : मूळ नाव दिवे. परिसरात अंजूर दिवे आणि केवणी दिव अशी दोन इतर गावे आहेत.
२३. कोपर : अमाना
२४. डोंबिवली : अमाना
२५. ठाकुरली : अमाना. ठाकरांवरून पडलेले दिसते.
२६. कल्याण : कोणाचं कल्याण ते माहीत नाही.
नाशिक फाटा धरूया.
२७. शहाड : अमाना. बहुतेक शहा + हाट म्हणजे रॉयल मार्केट असावे. महाड सारखे वाटत्ते.
२८. आंबिवली : आंबीची आवली म्हणजे ओळ. अमाना.
२९. टिटवाळा : अमाना. काश्मिरात टिथवाल नावाचे गाव आहे.
३०. खडवली : खडाची आवली. अमाना.
३१. वाशिंद : अमाना.
३२. आसनगाव : कसलेसे आसन असावे. अमाना.
३३. आटगाव : आट म्हणजे आड का? एखादी विहीर होती काय?
३४. खर्डी : मूळ नाव खरडी. अमाना.
३५. कसारा : एखादे कासार म्हणजे तळे होते काय?
कल्याणहून पुणे फाटा धरूया.
३६. विठ्ठलवाडी : आधुनिक नाव दिसते. अर्थ उघड आहे.
३७. उल्हासनगर : स्वातंत्र्योत्तर सिंधी निर्वासितांच्या वसाहती बांधल्या. त्यावेळी उल्हास नदीवरून नवं नाव ठेवलं.
३८. अंबरनाथ : इथल्या सुप्रसिद्ध हेमाडपंती शिवमंदिरावरून पडलं.
३९. बदलापूर : अमाना. मात्र रेल्वे स्थानक कुळगावात आहे.
४०. वांगणी : अमाना. वांग किंवा वेंग हा शब्द कोकण, विदर्भ व आंध्रात अनेक गावांत आढळतो.
४१. शेलू : अमाना. बहुतेक शिला म्हणजे टणक खडक यावरून पडलं. कल्याणजवळ शिळफाटा हे तत्सम नाम आहे.
४२. नेरळ : अमाना.
४३. भिवपुरी : भिवा नावाचा कोणी राजा होऊन गेला असावा.
४४. कर्जत : मूळ नाव करजत. कर आणि जत ही दोन नावे जोडून केलेले वाटते. नगर जिल्ह्यात याच नावाचे एक गाव आहे.
४५. पळसदरी : अर्थ उघड आहे.
४६. जामरुंग (केबिन) : जांबरुख म्हणजे जांबवृक्ष अर्थात जांबाची झाडे होती.
४७. ठाकुरवाडी (केबिन) : अर्थ उघड आहे.
४८. मंकी हिल : अउआ. बदलून मर्कटवाडी करायला हवं!
४९. खंडाळे : खंडाचे आळे? अमाना. रायगड आणि सातारा जिल्ह्यात हेच नाव आढळते.
५०. लोणावळे : लोणाचे आळे? की लोणाची आवळी? अमाना.
आता खोपोली फाटा पकडूया.
५१. केळवली : अमाना.
५२. डोलवली : अमाना.
५३. लावजी : म्हणजे काय?
५४. खोपोली : खोपवली? खोपाची ओळ?
आता करजत पनवेल फाटा.
५५. चौक : ?
५६. दांड : दंड? का आजून काही? ;-)
५७. शेडुंग : निवडुंग सारखं नाव वाटतं. या नावाची वनस्पती आहे का?
५८. पनवेल : पानवेलींवरून पडलं.
नेरळ माथेरान रेल्वेवरील स्थानके जुम्मापट्टी, वॉटर पाईप, अमन लॉज पूर्णपणे नवीन नावांची आहेत. तर माथेरान म्हणजे डोंगराच्या माथ्यावरील रान.
हुश्श ! उरलेली नावं नंतर.
आ.न.,
-गा.पै.
26 Jun 2016 - 6:53 pm | टवाळ कार्टा
कायप्पावरचे ज्ञान ़ का??
26 Jun 2016 - 10:10 pm | गामा पैलवान
टका,
माझं सर्व ज्ञान कुठून कुठून गोळा केलेलं असल्याने स्रोत आठवत नाही.
आ.न.,
-गा.पै.
26 Jun 2016 - 7:15 pm | कंजूस
मुंबईत राजीव चौक स्टेशन का नाही?