... काय म्हणतील!

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
14 May 2016 - 1:58 pm

... काय म्हणतील!

आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात.

मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

समजा चुकून तुम्ही रडारवर आलात, तिकडची फ्रीक्वेंसी- इकडची फ्रीक्वेंसी नाही जुळली तर कमीत कमी 2 दिवस आणि जास्तीत जास्त आठवडाभर खड़खडाट ऐकण्याची तुमची तयारी असली पाहिजे. नॉइज कॅनसलेशन साठी मग काही कारण नसताना शॉपिंगला घेऊन जाणे, पैसा नाम शोहरत सब मोहमाया है हे स्वतःला बजावून एखादी सरप्राइज सहल काढणे, त्यात डिनरला बाहेरच थांबणे ( सरप्राईज सहलीला नेल्यावर परत येताना काही नाही रात्री खिचडीच केलीस तरी चालेल असं म्हणणं म्हणजे आतापर्यंत कमावलेल सगळ पुण्य अक्कलखाती जमा करणे) अशी सगळी कसरत करावी लागते. एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.

अशा एखाद्या अनुभवातून गेलेले सगळे नवरे लोक मंदिरात देवापुढे शांत हात जोडून नमस्कार करतात. मनोभावे प्रार्थना करतात तुझं सुरक्षाकवच असंचं बरोबर राहू दे. तिथं जर तुम्ही सुंदर दिसते म्हणून बायकोकडे ( किंवा इतर कुठे) टक लावून बघत बसलात तर तिथल्या तिथे "अहो काय हे मंदिरात आलोय आपण. देव/देवी काय म्हणेल?" असा प्रश्न कम विधान आलंच म्हणून समजा. हा प्रश्न आहे असं चुकूनही समजू नका. आजकाल मी माझ्या बायकोशी बोलताना ती मला प्रश्न विचारत नाही, विधानचं करतीये असं ग्रुहीत धरतो. त्यामुळे माझे बरेच प्रश्न सॉल्व झालेत असं मला वाटतं.

तर या काय म्हणतील अध्यायात बरेचदा लोक काय म्हणतील हे आवर्तन येतं. यात लोक म्हणजे कोण हे मला आजतागायत कळलेले नाही. म्हणजे बघा बायकोला आवडती म्हणून कधी भेळ घेऊन या घरी. त्याचं कौतुक नसतं त्यांना. त्यांना काळजी कुठल्या गाडीवरून आणली, लिफ्टमधुन येताना वरच्या मजल्यावरच्या सोनीनी तर नाही पाहिले, दार उघडताना शेजारनीने तर नाही पाहिले या. बर आता या काय समस्या आहेत का? तुम्हीच सांगा ऑफीसजवळच्या गाडीवरून आणली म्हणाव तर काय म्हणतील ऑफीसमधले लोक. घराजवळच्या गाडीवरून आणली तर काय म्हणतील बिल्डिंगमधले लोक! सोनीसारखी फिगर नाही म्हणून सोनीजवळ रडताना तिन सांगितल म्हणून जंक फुड टाळायचं माझ्या बायकोने केलेलं प्रॉमिस मला कसं माहीत असेल. अशा वेळी तिला मी दिसलो भेळपुरीचं पुडक नाचवताना तर ती टवळीची आपलं ते हे चवळीची शेंग म्हणजे सोनी काय म्हणेल. शेजारीन तर टपलेलीचं असते टोमणे मारायला.

"काय ग लकी आहेस! तुझ्या ह्यांच्या बरं बाई लक्षात रहात असं काहीबाही आणायला. आमचे हे तर कुठं म्हणून वाट वाकडी करत नाहीत."

आता यात टोमना काय आहे? चांगली नवऱ्याची स्तुती ऐकून कॉलर ताठ करायची सोडून ही माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघते आणि शेजारनीची तोंडभर हसून बोळवण करते. च्यामारी पैसे माझे, भेळपुरी माझी, घर माझं, फिगर माझी आपलं ते हे माझ्या बायकोची आणि हे कोण लोक काय म्हणतील म्हणून आम्ही भेळ खायची नाही. शुद्ध अन्याय आहे हा.

या काय म्हणतील अध्यायात अजून एक कष्टदायक प्रकार म्हणजे घरी कुणी येणं. तुम्हाला सांगतो माझी बायको लहान होती अगदी तान्ही तेव्हा रहायची त्या चाळीतल्या एक काकू त्यांच्या मावस भावाच्या मुलाच्या की मुलीच्या दिराच्या लग्नाला जवळच येणार आहेत म्हणल्यावर हिने सरळ घर स्वच्छ केले पाहिजे हा फतवा काढला. बरं आता त्या नक्की घरी येतो असंही काही म्हणाल्या नसताना एवढा त्रागा करून घर आवरायची काय गरज? पण काकू काय म्हणतील असं घर बघून हे पालुपद ऐकवत बायको घरभर फिरते आणि झाडू घेऊन मी मागे मागे. बरं यावर माझ्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना म्हणजे लग्नाच्या दिवशी काकुंचा फोन आला की सांगून टाकायचे जरा काम आलं म्हणून बाहेर आलोय. वेळ होईल थोडा. (तुम्ही निघा हे सबटायटल असतं या संवादाचं). अरे हाय काय नाय काय. बात खतम. पण नाही हा उपाय सुचेपर्यंत बायकोच्या डोक्यात स्वच्छता अभियानाचा किडा भिनलेला असतो त्यामुळे "बरं दिसतं काते" एवढ्या तीन शब्दात माझ्या सुपीक कल्पनेला नापाक केलं जात. काय म्हणतील नंतर बरं दिसतं काते आलं की तुमच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजलीचं पाहिजे.
माझे कुणी नातेवाईक आले की काय होतं याचं वर्णन मी अजिबात करत बसणार नाही.

तर मुद्दा हा आहे की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं कुठल्याशा पुस्तकात मी वाचलंय. तर अशा या प्राण्याने उठसुठ हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं विचार करत बसण्यापेक्षा सरळ बस्तान बांधून हिमालयात जावे. त्यातल्या त्यात आजुबाजुला कमी मनुष्यप्राणी असतील अशा ठिकाणी जाऊन रहावे. हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत. पण ते महत्वाचं नाही. मनातल्या भावना व्यक्त होणं महत्वाचं आहे. एक विनंती आहे माझ्या बायकोला यातलं काही कळू देऊ नका. अहो उद्या ती माझ्या गळ्यात पडून म्हणाली, "एवढी का मी दुष्ट आहे?" तर ... काय म्हणतील? बरं दिसतं काते?

धोरणइतिहासविनोदजीवनमानराहणीमतसल्लामाहितीसंदर्भमदतवादविरंगुळा

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2016 - 2:09 pm | कानडाऊ योगेशु

लेख चांगला लिहिला आहे. काय म्हणतील ह्यावरुन गुरु ठाकुरची ही कविता आठवली.पण लोक काय म्हणतील

रातराणी's picture

14 May 2016 - 2:19 pm | रातराणी

काय हे? खुसखुशीत नाय तर नाय गेला बाजार खिक्क तरी प्रतिसाद द्यायचा. श्या. ;)

संजय पाटिल's picture

14 May 2016 - 3:20 pm | संजय पाटिल

बरं हे घ्या...
खिक्क!!!

चाणक्य's picture

14 May 2016 - 2:16 pm | चाणक्य

छान हलकाफुलकं लिखाण. आवडलं.

रातराणी's picture

14 May 2016 - 2:21 pm | रातराणी

धन्यवाद! :)

सस्नेह's picture

14 May 2016 - 2:23 pm | सस्नेह

हे हे हे !

चला आता मी डोळे मिटायला मोकळी ;)

सस्नेह's picture

14 May 2016 - 2:34 pm | सस्नेह

एवढ्यात ? :)

रातराणी's picture

14 May 2016 - 9:01 pm | रातराणी

कायमचे नाय गो. उगी उगी :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 May 2016 - 2:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी
बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते.

चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील?

पैजारबुवा,

रातराणी's picture

14 May 2016 - 9:07 pm | रातराणी

वसुधैव कुटुम्बकम. त्यामुळे आमच्या घराला भिंती नाहीत. ;)

तुम्हांला हे कसं काय लिहिता आलं?

बादवे, खिक्क्! :-)

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 3:14 pm | किसन शिंदे

शमतहे! ऎलतीरावरून पैलतीरावरचे कसे पाह्यलेत?

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 4:22 pm | टवाळ कार्टा

खिक्क...कुच तो गडबड है

रातराणी's picture

14 May 2016 - 9:08 pm | रातराणी

काय नाय दुसरा चष्मा घातला ;)

यशोधरा's picture

14 May 2016 - 3:27 pm | यशोधरा

खुसखुशीत! खिक्क!

उगा काहितरीच's picture

14 May 2016 - 4:00 pm | उगा काहितरीच

आयडीशी विसंगत लिखाण . ;-) रच्याकने चांगलं लिहीलंय .

अभ्या..'s picture

14 May 2016 - 4:31 pm | अभ्या..

असं आप्ल्याआपल्यातले चव्हाट्यावर आणू नये हो. बरे दिसते का हे?

जव्हेरगंज's picture

14 May 2016 - 4:50 pm | जव्हेरगंज

सुरुवात वाचून मला वाटलं एखादा डुआय उघडा पडला की काय ;)

खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

पैसा's picture

14 May 2016 - 9:27 pm | पैसा

बायकोची परवानगी घेतली होती का?

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 9:29 pm | टवाळ कार्टा

आणि बायकोनेच लेख लिहून घेतला असेल तर???

पैसा's picture

14 May 2016 - 10:13 pm | पैसा

रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक!

मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 10:24 pm | टवाळ कार्टा

डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

ख्याक

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2016 - 10:44 pm | कानडाऊ योगेशु

डिक्टेट हा शब्द आधी डिटेक्ट असा वाचला.!
खिक्क! ख्वॉक्क!!

पैसा's picture

14 May 2016 - 11:07 pm | पैसा

=))

रातराणी's picture

15 May 2016 - 9:06 pm | रातराणी

पैसा तै नी मला रातराणी तै वगैरे म्हणलेले पाहून डोळे पाणाव्ले. पुढचं काही मी वाचलं नाही ;)

पैसा's picture

16 May 2016 - 2:30 pm | पैसा

तुम्ही मुल्गी आहात असे म्हणता ना, म्हणून तै म्हटलं. नको तर राह्यलं. "अरे दादुस" म्हणेन. हाकानाका!

रातराणी's picture

16 May 2016 - 10:50 pm | रातराणी

तेच तर तुमच्या मनातला सौंशय इतक्या लवकर मिटल्याचे पाहून डोळे पाणावले ;)

अजया's picture

15 May 2016 - 10:10 am | अजया

=)))))
छान आहे डिक्टेशन ;)

बोका-ए-आझम's picture

15 May 2016 - 10:27 am | बोका-ए-आझम

चांगलं लिहिलं आहे.

हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नीलमोहर's picture

16 May 2016 - 2:15 pm | नीलमोहर

अन झेपत नाहीत तर घ्यावे कशाला सत्राशेसाठ डुआयडी ? त्यात आणि बेअरिंग सांभाळायचीही मारामार.

टवाळ कार्टा's picture

16 May 2016 - 2:25 pm | टवाळ कार्टा

तुम्ही क्लास घेणार का? ;)

नीलमोहर's picture

16 May 2016 - 2:54 pm | नीलमोहर

अशे आप्ले शिक्रेत नाय ओप्न कलाचे..
ल्ल्लूलूउउऊऊ काय असेल ते :p

अजून पर्यंत माझा एकही डूआयडी कुणीही ओळखला नाहीये. ही हा हा. लावते का पैज ;)

पैज लावायला पाहिजे होती नीमोंनी. ;-)

एक एकटा एकटाच's picture

15 May 2016 - 10:28 am | एक एकटा एकटाच

हा हा हा

सहिए

रातराणी's picture

15 May 2016 - 9:03 pm | रातराणी

धन्यवाद!

पद्मावति's picture

16 May 2016 - 1:57 pm | पद्मावति

खुसखुशीत!

नाखु's picture

16 May 2016 - 2:08 pm | नाखु

घर (चक्कर) घर की.....

आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद...

टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

रातराणी's picture

16 May 2016 - 11:01 pm | रातराणी

फारच कर्णमधुर दाद! :)

खुसखुशीत आणि खिक्क खुप झाल्या मुळे आणि त्या लोकांचे अधीच अभार मानुन झाल्यामुळे

अवडेश

रातराणी's picture

16 May 2016 - 11:02 pm | रातराणी

तुमचे स्पेशल आभार :)

वेल्लाभट's picture

16 May 2016 - 4:46 pm | वेल्लाभट

खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे

हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत

या वाक्यात.... दर्द आहे दर्द...
हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही.
वा वा. पुरेपूर हसलो.

रातराणी's picture

16 May 2016 - 11:03 pm | रातराणी

मला उनक मध्ये घेतल तर मी उनक लोकांना अजून टिप्स देईन बर का ;)

टवाळ कार्टा's picture

25 May 2016 - 11:18 pm | टवाळ कार्टा

उनकसंस्थापक सध्ध्या सात्विक आहार समीतीच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत ;)

एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.

हे एकदम पटलं.

पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा.
:-))

मृत्युन्जय's picture

26 May 2016 - 10:17 am | मृत्युन्जय

ठीकठाक जमलाय. दुसरा कुणाचा असला असता तर छान म्हटले असते पण तुमच्याकडुन अपेक्षा जास्त आहेत :)

चिनार's picture

26 May 2016 - 11:24 am | चिनार

मस्त जमलाय !!!