थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४
एकही गोळी न झाडता तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवला, तर तो जास्त महत्त्वाचा असतो. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या तेथील बदलत्या जनमताची साक्ष देणाऱ्या आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीवरून कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही, हा पाकचा बचाव देशाची मान खाली घालायला लावणारा आहे. पाकनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावलेली आहे. कारण दुसऱ्या देशात झालेल्या दहशतवादाची पाळेमूळे पाकमध्ये खोलवर रुजलेली आहेत,’ असे पाकमधील विचारवंत आज जाहीरपणे म्हणत आहेत. पठाणकोट हल्ल्यात ना केवळ पाकी दहशतवादी आढळून आले, तर ज्या दहशतवादी संघटनेवर बंदी आहे, तीच संघटना या हल्ल्याची सूत्रधार असल्याचे उघडकीस आल्याने, आपली जगात नाचक्की झाली, अशी भावना आहे. आणखी किती काळ अशा संघटनांना पाक आश्रय देणार? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. जे दहशतवादी पाकमधील हजारो नागरिकांच्या हत्येलाही जबाबदार आहेत, त्यांना पाठीशी का घालायचे? असा प्रश्न पाकमधील सर्वसामान्य विचारत आहेत. पाकमधील बदलत्या जनमानसाचा आढावा घेतल्यास, तेथील जनतेलाही आता पाकने आपली भूमिका बदलावी, असे तीव्रपणे वाटत असल्याचे दिसून येते.
2008 मध्ये मुंबईवर जे युद्ध पाकने लादले होते, त्यात आपला हात असल्याचे पाकी सरकारने तसेच लष्करानेही नाकारले होते. हिंदुस्थानने पुरेसे पुरावे दिल्यानंतर काही संशयितांची धरपकड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मात्र, पठाणकोट प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकी पंतप्रधान शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून दोनदा संभाषण साधत, निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर पाकने काहीही खळखळ न करता, जैश-ए-मोहम्मद सह मसूद अजहरवर कारवाई केलेली आहे. हिंदुस्थान आमच्यावर खोटा आरोप करत आहे, आम्हीही दहशतवादाला बळी पडतो आहोत, अशी भूमिका पाकने घेतलेली नाही, हे लक्षणीय. तसेच पाकी लष्कर तसेच सरकार दोघेही समन्वयाने पठाणकोटप्रकरणी योग्य ती कारवाई करत, हिंदुस्थानबरोबरची द्विपक्षीय चर्चा सुरू कशी राहील, यासाठी प्रयत्नात असल्याचे दिसून येते आहे. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करत, लष्कराने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा विचार केलेला दिसतो, असे नक्कीच म्हणता येते.
पाकने 2002 साली जैश-ए-मोहम्मदवर बंदी घातल्यानंतर तिने अल-कायदा तसेच अफगाणी तालिबानी यांच्याशी संपर्क साधत अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या. मसूद अजहर काही वर्षे जणू अज्ञातवासातच होता. 2013 साली त्याने दूरध्वनीवरून आपल्या समर्थकांशी संवाद साधत पुन्हा सक्रीय होणे पसंद केले. जैश-ए-मोहम्मद या संघटनेवरील त्याची पकड निसटली आहे, असा जो दावा केला जात होता, तो मुझफ्फराबाद येथील त्याच्या रॅलीने खोटा ठरवला. पडद्याआड राहून त्याने जिहादी कारवाया सुरूच ठेवल्या असल्याचे यामुळे सिद्ध झाले.
हफीझ सईद तसेच मसूद अजहर यांना पाकने आश्रय दिल्याने, तेथील जे काही थोडेफार विचारवंत आहेत, ते आता सरकारवर दबाव आणत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारच्या भूमिकेने पाकविरोधात वातावरण निर्माण होत असून, देशाच्या प्रगतीसाठी ते अत्यंत घातक असे आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही ते कसे धोक्याचे आहे, हे पटवून दिले जात आहे. आता दहशतवाद हा केवळ काश्मीरप्रश्नासंदर्भात मर्यादित राहिलेला नसून, संपूर्ण पाकच त्याच्या पकडीत आला आहे, हे त्यांना उमगलेले आहे.
दहशतवादी संघटनेवरील पाकची पकड पूर्णपणे निसटलेली आहे. दहशतवादाचा भस्मासूर आता पाकमध्येच आत्मघाती हल्ले घडवून आणत तेथील जनतेला घातपाती कारवाईत निष्पाप जेव्हा बळी पडतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना काय यातना होतात, याची जाणीव करवून देत आहेत. त्यामुळेच देशाच्या सुरक्षेला अशा संघटना धोकादायक असल्याची जनतेची भावना बळावत चालली आहे. त्यामुळेच पठाणकोटप्रकरणी पाक सरकार तसेच लष्कर हिंदुस्थानला योग्य ते सहकार्य करेल, तसेच दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रक्रिया सुरळीत सुरू राहील, याची काळजी घेईल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे. अर्थात पाकमध्ये मोदी यांनी जो थांबा घेतला होता, त्याचे वर्णन माध्यमे आता ‘मोदी डिप्लोमसी,’ असे करत आहेत. म्हणूनच शरीफ यांनी तत्परतेने कोणतेही कारण पुढे न करता, मसूद अजहरच्या मुसक्या आवळल्या, हे स्पष्ट झाले आहे.
पाकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकला हिंदुस्थानबरोबर चर्चा सुरू ठेवायची असून, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मसूद अजहर याला हिंदुस्थानच्या ताब्यात देण्याबाबतही हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास तो हिंदुस्थानचा नैतीक विजय ठरणार आहे.
गुरुवारी, दि. 14 रोजी पेशावर येथील एका अवैध चलन विनिमय केंद्रावर छापा घालून 45 जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यासाठीची मोहीम फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए), काऊंटर टेरिरिझम डिपार्टमेंट (सीटीडी), पोलीस यांनी संयुक्तपणे राबवली. दहशतवादी संघटनांना येथून निधी पुरवला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. हवाला तसेच हुंडी या पारंपारिक पद्धतीने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवली जात होती. अन्य एका कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या तिघा सदस्यांना एका खासगी शिक्षण संस्थेतून अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थानने पठाणकोटप्रकरणी जे पाच मोबाईल क्रमांक पाकी तपासयंत्रणांना दिले होते, त्याआधारे ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
त्याचवेळी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिका दौऱ्यावर असलेल्या जनरल राहील शरीफ यांना पठाणकोटप्रकरणावरून कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे. तसेच येणारी काही दशके दहशतवादामुळे अफगाण तसेच पाक या दोन्ही देशांना त्याच्या झळा पोहोचतील, असे सूचक व्यक्तव्य केले आहे. जनरल राहील शरीफ यांचा हा दुसरा अमेरिकी दौरा असून, या दौऱ्यात पाक लष्कर दहशतवादाविरोधात नेमकी काय भूमिका घेते आहे? आयला संपविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखत आहे? तालिबान्यांविरोधात नेमकी काय कारवाई केली? याची उत्तरे अमेरिका मागेल. त्याचवेळी तालिबान्यांशी पाकने चर्चा करावी, अशीही अमेरिकेची अपेक्षा आहे. अर्थात काबूल आणि पाक यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने, ही चर्चा होईल, असे सध्यातरी वाटत नाही. अफगाणमधील अशांततेला पाकची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याचे मानले जाते. तालिबान्यांना रोखण्यास पाक कमी पडले, असे वॉशिंग्टनचे मत आहे.
या सर्व घटनांची सुसंगती लावल्यास, खुद्द पाकमध्ये दहशतवादाविरोधात जनमत आहे. पाकमधील सर्वसामान्यांना शांतता हवी आहे. अमेरिकेकडून फारसे काही पदरात पडणार नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच जनतेला किमान पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जो काही आवश्यक निधी आहे, त्यासाठी पाक चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. चीनला जो सीपीईसी प्रकल्प उभा करायचा आहे, त्यासाठी काश्मीरप्रश्न सुटणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे.
(क्रमशः)
संजीव ओक
प्रतिक्रिया
21 Jan 2016 - 10:31 pm | खेडूत
बाकी ठीकाय.
विक्रुत अतिरेक्यांचे फोटो हटवावेत असे सुचवतो...
पेपर्वाले सुधारणार नाहीत. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
21 Jan 2016 - 10:42 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
पाकिस्तानात कॉलेजमधील नव्या निरपराध्यांंचे बळी घेण्याच्या घटनाक्रमाला प्राधान्य मिळाल्याने या विषयाला कमी महत्व मिळते आहे असे वाटते आहे... भारताच्या बाजूने हवाईदलाच्या ढिलाईवरही भाष्य हवे...
काही काळापुर्वी सादर केलेल्या "कोण हा ब्लडी पायलट ऑफिसर?" धाग्याची आठवण काहींना व्हावी...
पुढील लेख क्र 5 अंतिम असेल....
21 Jan 2016 - 10:46 pm | शशिकांत ओक
संपादकीय मंडळाने निर्णय घ्यावा.
21 Jan 2016 - 11:07 pm | पैसा
त्यातल्या त्यात चांगल्या बातम्या म्हणायच्या.
21 Jan 2016 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
अफगाणमधील अशांततेला पाकची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याचे मानले जाते.
वस्तुस्थिती एकदम याविरुद्ध आहे. ते वाक्य खालीलप्रमाणे असेल तर वस्तुस्थितीला धरून होईल...
"अफगाणमधील अशांततेला पाकची सक्रिय भूमिका जबाबदार असल्याचे मानले जाते."
हे आंतरराष्ट्रिय स्तरावरही फार काळापासून गुपित राहिलेले नाही. फक्त अमेरिकेसकट इतरांकडून त्याकडे सोईस्कर डोळेझाक केली जात होती, इतकेच.
अफगाणिस्तानातील अनेक भारतिय उपवकिलातींवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी तेथिल पोलिस मुख्यालयाने उघडपणे पाकिस्तानी सैन्यावर टाकली आहे. नेहमी मवाळ विधाने करणारा अफगाणिस्तानही आता याबाबत उघडपणे कडक भूमिका घेऊ लागला आहे.
पठाणकोट हल्ल्याबाबत पाकिस्तानने काही हालचाली केल्या असल्या तरी मसूद अजहर अटक केलेली नाही तर तो सुरक्षेच्या कारणासाठी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात (protective custody) आहे. लष्कराच्या या कारवाईचा मुख्य उद्येश "मसूद अझहर नवाझ शरीफच्या मुलकी सरकारच्या ताब्यात जाऊन लष्कराचे अतिरेक्यांशी असलेले घनिष्ट संबंध पुराव्यांसकट उघड करू नये" हाच आहे.
मुलकी सरकारला धाब्यावर बसवून पाकिस्तानी लष्कराने कारवाई करावी आणि मुलकी सरकारने त्याबाबत सारवासारव करत स्वतःची अब्रू वाचविणारी विधाने करावी, हे पाकिस्तानमध्ये काही नवीन नाही. सद्या याचीच पुनरावृत्ती झाल्याने भारतिय सरकारने पाकिस्तानबरोबरची बोलणी स्थगित केली आहेत. मात्र, नवाझ शरीफ यांची पाकिस्तानी लष्करासमोर अधिक कमकुवत स्थिती होऊ नये यासाठी याबाबत भारत सरकारकडून फार कडक विधाने केली जात नसावीत.
22 Jan 2016 - 12:03 am | शशिकांत ओक
'तालिबान्यांना रोखण्यास पाक कमी पडले', असे वॉशिंग्टनचे मत आहे. या संदर्भात ते वाक्य असावे.
22 Jan 2016 - 12:42 am | डॉ सुहास म्हात्रे
पाकिस्तानानेच अमेरिकेच्या मदतीने सोविएट रशियाचा अफगाणिस्तानात पराभव करण्यास तालिबानला जन्माला घातले. सोविएट रशिया अफगाणिस्तानातून मागे गेल्यावर अमेरिकेने अफगाणास्तान मधून लक्ष काढून घेतले असले तरी अफगाणिस्तानला स्वतःचे पडद्याआडचे मांडलिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे काही गुप्त राहिलेले नाहीत. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करण्याआधी दोन दिवसांत पाकिस्तानने तेथून (तालिबान्यांच्या नावाखाली काम करणारे) काही हजार (?७५,०००) आय एस आय, पाकिस्तानी सैनिक व तालिबान्यांना पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी चित्राल व गिलगिट येथे हलवले होते. या कारवाईला "एअरलिफ्ट ऑफ इव्हिल" असे संबोधले जाते.
त्यानंतर, आजवर पाकिस्तानी लष्कर तालिबान्यांच्या वेगवेगळ्या फुटिर तुकड्यांचा आपला स्वार्थ साधण्यासाठी उपयोग करून घेत आहेच... याचे मुख्य कारण असे की यातल्या अनेक तुकड्या अल्पकालीन स्वार्थाकरीता बाजू बदलणार्या भाडोत्री टोळ्या (मर्सिनरीज) आहेत. या टोळ्या व पाकिस्तानने आपला विश्वासघात केला म्हणून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करणार्या टोळ्या, अश्या सर्वच दलबदलू मोटेला एकत्रपणे तालिबान म्हटले जाते. या स्थितीतून होणार्या गोंधळ-गैरसमजांतून मिळणारा स्ट्रॅटेजिक-राजकिय फायदा लुटण्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा हातखंडा आहे... इतर जागतिक सत्ताही त्यांच्या तात्कालीन सोईप्रमाणे तिकडे डोळेझाक करतात किंवा डोळे वटारण्याचे नाटक करतात.
मुत्सद्देगिरीद्वारा दिली गेलेली (डिप्लोमॅटिक) वक्तव्ये शब्दशः घेऊ नयेत, प्रचलित परिस्थितीप्रमाणे त्यांचा अर्थ बदलत असतो, हे सार्वकालीक सत्य आहे !