हडळीचा आशिक
जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते,
“ मला एक वचन द्या. माझ्या नंतर तुम्ही कुन्नाकुन्नाच्या म्हणून प्रेमात पडणार नाहीत! आणि तुम्ही तसे काही केलेच, तर मी दररोज रात्री तुम्हाला छळेन. पछाडून सोडेन.”
एवढे पवित्र शब्द बोलून, बयेने कायमचे डोळे मिटले.मग काय! पुढे कित्येक महिने हितोशी बाईमाणसाला टाळायचा. दूरदूर राहायचा. पण नशीब ते नशीबच! त्याच्या जीवनात परत प्रेमाचा बहर आला. चैतन्य सळसळू लागले. त्याने लग्नाची तयारी सुरु केली.
..... आणि तेव्हाच त्याच्या मृत बायकोच्या हडळीने आपला शब्द खरा करायला सुरुवात केली. ती रात्रीबेरात्री त्याला छळू लागली. नाही नाही ते प्रश्न विचारून पिडू लागली . ‘तू....तू.... फसवलेस मला!’ म्हणून त्रागा त्रागा करू लागली.
त्यावर हितोशी शांतसमजूतदारपणे तिला उत्तर द्यायचा, “ मी वर्षानुवर्षे तुझे आराधन केले. माझे सर्वस्व तुला देऊ केले. तू मात्र मला झिडकारत गेलीस. मृत्यू पंथाला लागल्यावर माझ्याशी लग्न केलेस. ते हि ठीक. पण आता परत आयुष्याने मला सौख्य उपभोगण्याची,आनंदाने जगण्याची संधी दिली आहे तर , ती मी का घेऊ नये?”
पण हडळीला असली कारणं ऐकण्यात विंट्रेस नव्हता. दररात्री ती त्याचा छळ मांडायची. आली कि, त्याने दिवसभरात काय काय केले, ते डिटेलवार सांगायची. अगदी त्याने आपल्या भावी पत्नी बरोबर काय हितगुज केले, तिला कशी मिठी मारली, कसे तिचे चुंबन घेतले इत्यादी इत्यादी. बिचारा हितोशी हैराण होऊन गेला. संध्याकाळ झाली कि त्याला हिव भरल्यासारखे व्हायचे. रात्रीची झोप तर पार उडून गेली!
शेवटी तो झेनगुरु बाशो यांच्याकडे गेला.
बाशोंनी सगळी कथा शांतपणे ऐकली. म्हणाले, “हडळ भारी चतुर आहे. वादच नाही!”
“ अहो, पण मी भारी परेशान झालोय! त्या हडळीला अगदी बारीकसारीक सगळ्या गोष्टी माहित असतात. तिच्यामुळे, माझे माझ्या भावी पत्नी बरोबरचे संबंध बिघडायची पाळी आलीय. तिच्या बरोबर साधं बोलायचीही मला भीती वाटतेय. तिच्या बरोबरच्या एकांतात तर मला अगदी चोरटया सारखं वाटतंय!”
“ काळजी करू नकोस. तुझी या हडळी पासून जरूर सुटका होईल!” बाशो आश्वस्तपणे म्हणाले.
त्या रात्री हडळ अवतरली.तिने तोंड उघडायच्या आधीच हितोशी म्हणाला, “ तू फार हुशार, चतुर आहेस. चल आज आपण एक पैज लावू. तू सदासर्वकाळ माझ्यावर नजर ठेवून असतेस. बरोबर? तर आज मी जे काही केले दिवसभरात, त्या बद्दल तुला एक प्रश्न विचारतो. जर तू बरोबर उत्तर दिलेस, तर मी माझ्या भावी पत्नीचा तत्काळ त्याग करीन. एवढेच नव्हे, तर पुन्हा चुकूनही दुसऱ्या बायकोचा विचारही करणार नाही. पण तुझे उत्तर चुकले, तर तू मात्र कधीही परत इथे फिरकायचे नाहीस. अन जर आलीसच, तर तू कायमची या अंध:कारात भरकटत राहशील. अंतराळातील देव तुला शाप देतील!”’
“एकदम मान्य!” हडळ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली.
“आज दुपारी मी एका वाण्याच्या दुकानात गेल्तो. तिथल्या गव्हाच्या पोत्यातून मी मूठभर गहू हातात घेतले!”
“होय, पाहिलेय मी ते!” हडळ म्हणाली.
“तर माझा प्रश्न: माझ्या मुठीत गव्हाचे नेमके किती दाणे होते?”
आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देणे कदापि शक्य नाही, हे त्या हडळीस कळून चुकले. काहीतरी चुकीचे पचकलो, तर कायमचे अंध:कारात भटकावे लागेल, हि भीती होतीच! म्हणून तिने तिथून कायमचा काढता पाय घेतला.
दोन दिवसांनी हितोशी बाशोंकडे गेला. म्हणाला, “मी तुमचे आभार मानायला आलोय!”
बाशो म्हणाले, “ तुझ्या अनुभवाने तुला जे धडे शिकवलेत, ते कायम लक्षात ठेव. एक : हडळ परतपरत येत राहिली, कारण तू तिला घाबरत होतास. घाबरू नकोस. असल्या शापांपासून मुक्त व्हायचे असेल, तर एकच कर – दुर्लक्ष! आपण विचार करत गेलो कि शाप माजत जातात! विचार थांबव, शाप मरून जातील! दोन: हडळीने तुझ्या अपराधभावाचा गैरफायदा घेतला. जेव्हा जेव्हा आपल्याला अपराधी वाटू लागते, तेव्हा तेव्हा आपल्याही नकळत आपण स्वतःला शिक्षेस पात्र ठरवत जातो. मला अमुकतमुक साठी शिक्षा मिळाली पाहिजे, असे आपणच ठरवत जातो. हे स्वतःशी कधीही होऊ देऊ नकोस! आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे, जर खरेच कुणाचे कुणावर प्रेम असेल, तर ती व्यक्ती अशा भ्रामक अटी, बंधनं घालित नाही! जर खरेच प्रेम जाणून घ्यायचे असेल तर, आधी दोघांनी परस्परांचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य उमजून घेतले पाहिजे! प्रेमातले ते पहिले पाऊल! मग पुढे संदेह रहात नाही! प्रेमात उणेपण येत नाही!”
[ झेन परंपरेतील बाशोंच्या कथा! हि कथा मला Paulo Cohlo च्या पुस्तकातही वाचायला मिळाली. दुर्दैवाने पुस्तकाचे नेमके नाव आता आठवत नाहीये. कुणा बहुगुणी मिपाकरास सुगावा लागल्यास धागा टाकावा.]
प्रतिक्रिया
30 Apr 2015 - 6:53 pm | पैसा
मस्त कथा! अशाच येऊ देत आणखी!
30 Apr 2015 - 7:00 pm | एस
मस्त कथा. हे बाशो हायकूवालेच का?
30 Apr 2015 - 7:02 pm | सूड
वाखूसाआ.
30 Apr 2015 - 7:13 pm | जेपी
+1
आवडली कथा
30 Apr 2015 - 7:45 pm | टवाळ कार्टा
आवडेश
30 Apr 2015 - 7:45 pm | चुकलामाकला
आवडली.
30 Apr 2015 - 7:57 pm | अजया
आवडली कथा.
30 Apr 2015 - 7:59 pm | वेताळ
येवु द्या अजुन
30 Apr 2015 - 8:12 pm | एक एकटा एकटाच
आवडली.
30 Apr 2015 - 9:49 pm | यशोधरा
आवडली कथा. अजूनही लिहा.
30 Apr 2015 - 9:59 pm | रेवती
कथा आवडली.
30 Apr 2015 - 10:11 pm | मास्टरमाईन्ड
आवडलं आपल्याला
मस्तच.
1 May 2015 - 12:33 am | रुपी
तुमची या प्रकारावर चांगलीच पकड आहे. नावं सोडून दिली तर अनुवादित असं काही वाटत नाही.
येउ द्या आणखी!
1 May 2015 - 2:12 am | श्रीरंग_जोशी
रुपककथा आवडली.
शीर्षक जरा खटकलं. कथेची नायिका मेल्यावर म्हणजे हडळ बनल्यावर तिचा विधूर पती तिचा आशिक राहिला होता का? खालील शीर्षके कशी वाटतात?
1 May 2015 - 2:33 am | खटपट्या
मस्त कथा !!
अजुन येउदेत.
1 May 2015 - 6:05 am | hitesh
.
1 May 2015 - 8:48 am | नाखु
रूपक कथा अजून पोतडीतून येऊ द्या..
1 May 2015 - 8:59 am | नूतन सावंत
सुरेख रूपककथा.मनाला आवरले कि सगळे आवरते घेता येते,हे पुन्हा एकदा पटले.दुर्लक्ष करणे हा सर्व बाबींवर चा उपाय आहे.अजून वाचायला आवडतील.
1 May 2015 - 1:35 pm | सतिश गावडे
मस्त कथा !!!
1 May 2015 - 2:11 pm | तिमा
कथा आवडली. 'हितोशी' नांव वाचल्यावर इथल्या एका आयडी ची आठवण झाली.
1 May 2015 - 5:40 pm | होबासराव
आणि त्याच्याच दुसर्या आय डी चि सुध्दा... हडळ !!
1 May 2015 - 3:05 pm | स्पंदना
मस्त!!
लिहीत रहा तर्री ताय!
1 May 2015 - 3:24 pm | झकास
खूपच छान !
वरती रुपी यांनी म्हट्ल्याप्रमाणे अनुवादित वाटत नाही.
paulo coelho ह्यांच्या blog वर ही गोष्ट वाचली आहे.
1 May 2015 - 5:29 pm | प्राची अश्विनी
कथा आवडली पण कथा इथे संपत नाही .
हितोशीचे लग्न होते , काही वर्षे आनंदात जातात . पुढे तो अजून एका मुलीच्या प्रेमात पडतो, नवऱ्याचे बदललेले वर्तन त्याच्या बायकोच्या लगेच लक्षात येते. जरा शोध घेतल्यावर त्याचे कारणही तिला कळते, ती त्याला समजावते, आदळ-आपट करते, भांडते पण त्याचे ठरलेले उत्तर असते ," माझे तुम्हा दोघींवर प्रेम आहे आणि खरेच कुणाचे कुणावर प्रेम असेल, तर ती व्यक्ती अशा भ्रामक अटी, बंधनं घालत नाही. प्रेम मुक्त असते. " शेवटी हताश होऊन बायको त्याला शाप देते की , " तू कधीच सुखी होणार नाहीस." आणि त्याला सोडून निघून जाते. पण काय गम्मत !हितोशी त्याच्या नवीन बायकोबरोबर आनंदाने राहू लागतो. त्याच्यावर त्या शापाचा काही परिणाम होत नाही . त्याच्या पहिल्या बायकोला आश्चर्य वाटते , ती बाशोकडे जाते आणि याचे कारण विचारते. बाशो म्हणतो, "आता त्याला कुठचाही शाप लागू होणार नाही . एकदा का माणसाच्या मनातील अपराधाची टोचणी नाहीशी झाली की त्याला कुणाचेच शाप बाधत नाहीत. आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करण्यापासून त्याला कुठलीही शक्ती थोपवू शकत नाही . आता हितोशीला समजावणे कठीण आहे. तू त्याचा नाद सोडून दे. "
आणि खरोखरच पुढे हितोशी शंभर लग्ने करतो आणि शंभर वर्षे सुखाने जगतो .
1 May 2015 - 5:42 pm | शिव कन्या
प्राची अश्विनी..... कल्पना आणि विचार विस्तार येकदम चरचरीत!
1 May 2015 - 6:00 pm | शिव कन्या
श्रीरंग जोशी.... होय, तुम्ही सुचवलेली टायटल्स थोड्याफार फरकाने माझ्याही डोक्यात आल्ती.
पण जरा नीट विचार केला.....हडळ म्हणजे आपलाच त्रासदायक भूतकाळ! आणि या ना त्या कारणाने आपण त्यात एखाद्या आशिकासारखे गुंतून पडतो. म्हणून घेतले. अर्थात..... आपापले टायटल घालून वाचू शकतो आपण!
1 May 2015 - 9:50 pm | सतिश गावडे
क्लास !!!
1 May 2015 - 6:05 pm | शिव कन्या
वाचत असल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आभार.
2 May 2015 - 10:55 am | पाटील हो
मस्त कथा.
2 May 2015 - 1:34 pm | अभिरुप
अतिशय छान रुपककथा..आवडली
2 May 2015 - 3:58 pm | कविता१९७८
मस्त कथा
2 May 2015 - 10:55 pm | सिरुसेरि
हडळ म्हणजे अपराधी भावना हेही लक्षात आले .
4 May 2015 - 8:36 am | जयनीत
अतिशय सुंदर कथा.
धन्यवाद.
4 May 2015 - 9:40 am | किसन शिंदे
कथा आणि प्राची ताईंची उपकथा दोन्ही आवडल्या.
हे वाक्य आवडलं!
5 May 2015 - 11:53 am | खंडेराव
ही कथापण आवडली.
बाशोची एक हायकु आठवली..पुराणे तळे, बेडुक मारी उडी, पाण्याचा ध्वनी..
5 May 2015 - 2:43 pm | प्रियाजी
कथा आणि उपकथा दोन्ही आवडल्या. वाखू साठविली आहे. खूप मोठे तत्वज्ञान अगदी थोडक्यात. खूप छान.
5 May 2015 - 10:11 pm | द-बाहुबली
वा.
@प्राची अश्विनी...
=)) जबरा.
7 May 2015 - 8:04 pm | अंतु बर्वा
छान कथा. आवडली...
पण माझ्या बालबुद्धीस पडलेला प्रश्न असा: जर हडळीला त्याच्या दिवसभरातील एकुण एक गोष्टी कळत असतील तर तिला हेही ठाउक असेलच ना की हा बाबाजी त्या बाशो कडे जाउन आलाय आणी त्यांनी काय सल्ला दिला ते?
10 May 2015 - 5:16 pm | शिव कन्या
अंतु बर्वा, वाचल्या बद्दल धन्यवाद आणि प्रश्नाबद्दल अभिनंदन. नेमका हाच प्रश्न मलाही पहिल्यांदा वाचला तेव्हा पडला होता. [ एकूण बाल बुद्धीसच सतेज प्रश्न पडतात!] विचारांती असे लक्षात आले, हडळीस सगळे जरी माहित असले, तरी मुठीत दाणे किती या प्रश्नाचे उत्तर मात्र तसे कुणालाही माहित नाही. मेख तिथे आहे. तिने काहीही उत्तर दिले तरी ते चुकीचे गणले जाणार होते. कारण तिचे म्हणणे बरोबर आहे हे सिद्ध करायला तिच्यापाशी काहीच साधन नाही. म्हणून, कुठल्यातरी फुसक्या कारणाने कुणी कुणाला वेठीस धरू नये. तसे केल्यास, शेरास सव्वा शेर फुसकी कारणे लोक शोधून काढतातच. साधे आहे!
9 Jun 2015 - 9:32 am | मनीषा
कुठल्यातरी फुसक्या कारणाने कुणी कुणाला वेठीस धरू नये. तसे केल्यास, शेरास सव्वा शेर फुसकी कारणे लोक शोधून काढतातच. साधे आहे!
अगदी सहमत
कथा आवडली.
8 Jun 2015 - 6:44 pm | शशांक कोणो
हाय तर्री ताई
कशी आहेस ? मस्त आहे ग कथा .
9 Jun 2015 - 10:35 am | नक्शत्त्रा
कथा!!!!अजुन येवु देत कथा ....
9 Jun 2015 - 10:41 am | विशाल कुलकर्णी
आवडेश ...