हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ’अभिनव भारत’ हा क्रांतिदेवतेच्या मंदिराचा पाया, शचिंद्रनाथ संन्यालांच्या प्रेरणेतुन निर्माण झालेली ’हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेना’ हा त्या मंदिराचा गाभारा तर राशबिहारीबाबु व नेताजींची ’आझाद हिंद सेना’ हा मंदिराचा कळस मानावा लागेल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेतुन, परिश्रमातुन आणि नियोजनातुन स्फोटक विद्या हिंदुस्थानात आली आणि नव्या शतकाच्या पहिल्याच दशकात कोलकत्त्याच्या माणिकतल्ला येथे पहिला हिंदुस्थानी बॉम्ब तयार झाला. बंगालच्या छाव्यांना जणु नवे खेळणेच सापडले. शिक्षा, तुरुंगवास, मृत्यु वगैरेचे काडीमात्र भय नसलेली बंगाली मुले या नव्या शस्त्राकडे आकर्षित झाली नसती तरच नवल.
याच शस्त्राचा वापर बंगालच्या संतप्त क्रांतिकारकांनी किंग्जफोर्ड या जुलमी न्यायाधीशावर करायचा निश्चय केला. स्वातंत्र्याची आराधना हाच सर्वोच्च गुन्हा ठरवुन समोर येणाऱ्या प्रत्येक तरुणाला जास्तीत जास्त कडक व भयंकर शिक्षा देणारा किंग्जफ़ोर्ड हा क्रूर न्यायाधीश सरकारी प्रशंसेस पात्र ठरला व बढतीवर मुझफ्फरपुर येथे नियुक्त झाला. त्याची जुलुमी कारकिर्द संपवून टाकण्याचा निश्चय बंगाली क्रांतिकारकांनी केला. ही कामगिरी उत्साहाने स्विकारली ती ’वंदे मातरम’ या शब्दाचा ध्येयमंत्र म्हणुन अंगिकार केलेल्या खुदिराम बोस नावाच्या १८ वर्षाच्या युवकाने व त्याने आपला सहकारी म्हणुन आपला धाडसी मित्र प्रफुल्ला चाकी याची निवड केली.
खुदिराम बोस. एक अत्यंत देशाभिमानी युवक. मात्या पित्यांचे छत्र वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच हरपले. मात्र अशा परिस्थितीत मार्ग भरकटून चुकीच्या रस्त्याला न लागता त्याने क्रांतिमार्ग अंगिकारला. "आपला भारत देश हा विद्वत्तेचा, संस्कृतिचा, ज्ञानाचा असे म्हटले जाते; मग या देशात हे लालतोंडे इंग्रज कशाला? या देशातील जनतेला आपल्या मर्जीने जगण्याचेही स्वातंत्र्य का नसावे?" या विचाराने खुदिराम अस्वस्थ झाला.
एकदा खुदिरामने एका मंदिरात काही माणसे पालथी पडलेली पाहिली. विचारले असता त्याला असे कळले की त्या माणसांना व्याधी जडल्या होत्या आणि देव दर्शन देउन जो पर्यंत व्याधीमुक्त करित नाही तोपर्यंत ते देवाला साकडे घालीत असेच राहणार होते. एक दिवस मीही असाच इथे पडलेला दिसेन असे खुदिरामने म्हणताच मित्रांनी आश्चर्याने त्याला कोणती व्याधी जडली आहे अशी विचारणा केली. खुदिराम उद्गारला ’मला, तुम्हाला आणि समस्त हिंदुस्थानवासियांना एक भयंकर व्याधी जडली आहे आणि ती म्हणजे पारतंत्र्य!" या व्याधीतुन मुक्ती ही मिळवावीच लागेल. खुदिरामने स्वत:चे आयुष्य क्रांतिकार्यात झोकुन दिले.
२८ फेब्रुवारी १९०६ रोजी मिदनापुरात भरलेल्या शेतकी प्रदर्शनानिमित्त साऱ्या भारतातून लोक जमले असता खुदिरामने सत्येंद्रनाथ लिखित अत्यंत प्रक्षोभक अशा ’सोनार बांगला’ च्या प्रती वाटल्या व त्याला अटकही झाली मात्र त्यातून तो सुटला. पुढे त्याने आपले क्रांतिकार्य गुप्तपणे पण नेटाने चालुच ठेवले. टपाल लुटणे, हत्यारे जमविणे वगैरे कृत्ये त्याने बिनबोभाट केली इतकेच नव्हे तर एकदा चक्क लेफ्टनंट गव्हर्नरच्या खास गाडीखाली स्फोटही घडवायचा प्रयत्न केला. बंगालच्या भडकत्या वणव्याला विझविण्यासाठी हिंदु-मुसलमान फूट पाडण्यासाठी सरकारने फाळणी घोषीत केली आणि दडपशाही आरंभिली. वंदे मातरम हे देशभक्त वर्तमानपत्र बंद करण्यात आले.
२६ ऑगस्ट १९०७ रोजी या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी बंगाली युवक रस्त्यावर उतरले होते, त्यांना पोलिसांनी प्रत्यवाय केला. आम्ही शांततापूर्ण निदर्शने करित असता आम्हाला अटकाव का असे सुशिलकुमार सेन या युवकाने विचारताच पोलिसांनी त्याच्यावर हल्ला चढवला व प्रत्युत्तरादाखल सुशिलनेही त्या पोलिसाला चोप दिला. त्याला अटक झाली व सुनावणी किंग्जफोर्डपुढे होताच त्याने सुशिलला फटक्यांची शिक्षा सुनावली. या क्रूर इंग्रजाला कंठस्नान घालण्याचा निश्चय बंगाली युवकांनी केला व तो मान खुदिरामला मिळाला.
अपुरी यंत्रणा, तुटपुंजी साधन सामुग्री, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पोलिस व गुप्तचरांची करडी पाळत यामुळे अनेक कट दुर्दैवाने फसले, मूळ योजलेल्या ऐवजी अनेकदा चुकिच्या व्यक्तिवर अनवधानाने हल्ले केले गेले व नेमकी व्यक्ती वाचली असे अनेकदा घदले. हुतात्मा खुदिरामच्या बाबतीतही नेमके हेच घडले. धाडसी हल्ला झाला खरा, पण त्या वाहनात बॅरिस्टर केनेडीची पत्नी व मुलगी होत्या, त्यामुळे किंग्जफोर्ड बचावला. मात्र त्या ह्ल्ल्याने चवताळलेल्या सरकारी यंत्रणेने घरपकड सुरू केली. प्रफुल्ला चाकी सुदैवी! त्या हुतात्म्याने पोलिसांनी पकडायच्या आधीच स्वत: वर गोळी झाडुन घेतली व हौतात्म्य पत्करीत कटाची माहिती मिळवायचा पोलिसांचा मार्ग बंद केला. पाठलाग चुकवित लपत छपत निसटणारा खुदिराम मात्र पाठलागाने दमलेल्या, भागलेल्या व अत्यंत भुकेलेल्या स्थितीत बाजारात खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या हाती सापडला.
ज्या नीच माणसाने माझ्या देशबांधवांवर जुलुम केले त्याला मी मारला आणि त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आणि चाकीचीच आहे असे अखेरपर्यंत ठणकावुन सांगत हुतात्मा खुदिराम बोस वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी हौतात्म्य स्विकारल्याच्या आनंदात ताठ मानेने फासावर गेला. न्यायाधिशाने फाशी सुनावल्यावर त्याला काही सांगयचे आहे का असे विचारताच तो म्हणाला, "होय! मला बॉंबची माहिती सांगायची आहे" या उत्तराने न्यायासन निरुत्तर झाले. हुतात्मा खुदिराम हसतमुखाने हातात गीता घेऊन व मुखाने वंदे मातरमचा मंत्रघोष करीत फासावर गेला. वय होते अठरा वर्षे आठ महिने नऊ दिवस. हौतात्म्य दिनांक ११ ऑगस्ट १९०८, मंगळवार. स्थळ मुझफ्फरपुर कारागृह. आज हुतात्मा खुदिरामच्या हौताम्याची शताब्द्यपूर्ती! हुतात्मा खुदिराम आणि हुतात्मा प्रफुल्ल चाकी यांच्या स्मृतिस सादर अभिवादन.
त्या तेजस्वी बलिदानाला शंभर वर्षे पूर्ण होत असतानाच आज त्या दिवशी आवर्जुन उल्लेख केला पाहिजे तो त्या बलिदानाचे अलौकिकत्व वर्णन करणाऱ्या एका अजरामर हौतात्म्यगीताचा - ’ऍक बार बिदाय दे मा’. हसत हसत आनंदाने हौतात्म्य पत्करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाचे मनोगत व्यक्त करणारे हे हौतात्म्य गीत बंगालच्या आबालवृद्धांच्या ओठावर दशकानुदशके राहिले तर त्यात नवल ते काय? या मूळ बंगाली गीतावर आधारीत मराठी रचना कवी कुंजविहारी यांनी केली आणि ती महाराष्ट्रात सर्वतोमुखी झाली होती - ’भेटेन नऊ महिन्यांनी’. अर्थात हे भाषांतर नव्हते तर समविचारी, नेमक्या त्याच भावना व्यक्त करणारे गीत होते.
’ऍक बार बिदाय दे माऽ’ हे गीत लोकगीतकार व क्रांतिकवी नझरुल इस्लाम यांचे आहे. बंगालमधील साहित्य क्षेत्रातील ’कल्लोल युग’ ज्या तीन कवींच्या नावे लिहिले गेले त्यापैकी नझरुल इस्लाम हे एक (ते तीन कवी होते : जितेंद्रनाथ सेनगुप्त, मोहितलाल मुजुमदार आणि नझरुल इस्लाम), कल्लोल युग हे क्रांतिकारी व बंडखोर विचारसरणीच्या कवींचे मानले जाते. या कवींच्या रचना धगधगत्या नसल्या तरच नवल! नझरुल हे स्वत: ’सेनापती’ होते व युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले पहिलेच क्रांतिकवी असावेत . कवी नझरुल यांची गाणी ’नझरुल गीती’ या नावाने बंगालात प्रसिद्ध असून त्यांचे अनेक कार्यक्रम होत असल्याचे वाचनात आहे. हुतात्मा खुदिरामच्या व हुतात्मा प्रफुल्ला चाकीच्या हौतात्म्यशताब्दी सन्मानार्थ मूळ बंगाली गीत व त्याचा भावार्थ सांगण्याचा हा एक प्रयत्न.
ऍक बार बिदाय दे माऽ, घुरे आशी!
आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी
- फासावर जाणारा पुत्र आपल्या आईला सांगतो आहे, की निरोप दे आई, मी आता अलौकिक प्रवासाला निघालो आहे पण मी परत येणार, नक्की येणार. आपल्या अंतिम ध्येयासाठी कामी येणार या समाधानात मी तर हसत हसत फाशीचा दोर एखाद्या हारासारखा गळ्यात घालुन घेईन आणि माझे हौतात्म्य सारे भारतवासीय डोळे भरून पाहतील (मात्र त्या क्षणी तू शोक करू नकोस)
कोलेर बोमा तैरी करे दांडियेछिलाम रास्तार धारे
बडो लाटके मारते गिये, मारलाम आर एक इंग्लंडबाशी
- काय दुर्दैव सांगु? खास बनवलेला बॉंब सज्ज करुन आम्ही रस्त्याच्या कडेला दबा धरून लाटसाहेबाची प्रतिक्षा करीत होतो. तो क्षण साधला खरा पण प्रत्यक्षात चुकुन तो (म्हणजे किंग्जफोर्ड) वाचला आणि भलतेच कुणी ईंग्रज मारले गेले! ज्यासाठी सगळा बेत रचला तो क्रूरकर्मा अखेर मारला गेलाच नाही तर उलट कुणी भलतेच मृत्युमुखी पडले याची खंत आहे. उगाच कुणा इंग्रजाच्या कुटुंबियांना हात लावणे हे कुठल्याही क्रांतिकारकांच्या तत्त्वात बसणारे नव्हते.
हाते दिये थाकतो छोरा, तोर खुदी कि पडतो धरा माऽगो
रक्त माश एक करिताम, देखतो जगत बाशी
- पकडलो गेलो त्या प्रसंगी जर माझ्यापाशी एखादा सुरा असता तर मी पकडलो गेलोच नसतो; उलट त्या सुऱ्याने पकडायला आलेल्या गोऱ्यांची खांडोळी केली असती आणि रस्त्यावर त्यांच्या रक्तमांसाचा सडा पडलेला दिसला असता, मी सरकारच्या हाती पडलो नसतो. इथे मृत्युचे भयही नाही आणि जीवनाची आसही नाही तर केवळ ध्येयाची आसक्ति आहे! विलक्षण योगायोग असा कि अगदी पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै १९०९ मध्ये हुतात्मा मदनलाल धिंग्राने जेव्हा वायलीचा वध केला तेव्हा त्याने आपल्या पिस्तुलाव्यतिरिक्त बाहीवर एक सुराही लपविला होता. उद्देश हाच की शस्त्र हे यंत्र आहे, चुकुन ते बिघडले तरी आपला कार्यभाग सिद्धिस जाणे हे महत्त्वाचे, नंतर आपले काय व्हायचे ते होवो. हुतात्मा खुदिरामच्या मनातली ती तळमळ इथे व्यक्त केली आहे. पकडला गेल्याचे दु:ख नाही पण कार्य अर्धे राहिले ते पुरे झाले नाही याचा खेद आहे. म्हणुनच हे गीत जरी हुतात्मा खुदिरामला उद्देशुन असले तरी ते प्रत्येक क्रांतिकारकाच्या भावना व ध्येय व्यक्त करणारे आहे.
शनिबार बेला दाष्टार पोरे जोर्जकटेते लोक ना धारे माऽगो
होलो अभिरामेर द्वीप चालान मा खुदिरामेर फाशी
- शनिवारी सकाळी दहा वाजून गेल्यावर न्यायालयाचे काम सुरू झाले. अभियोगाच्या निकाल जाहीर होणार होता, सगळे न्यायालय तो निकाल ऐकायला जमलेल्या लोकांनी खच्चून भरले होते. माझ्यावर भरलेल्या अभियोगात मला दोषी ठरविण्यात आले आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. माझा इथला प्रवास आता संपणार!
बारा लाख तेत्रीश कोटी रोईलो मा तोर बेटाबेटी माऽगो
तादेर निये घर करिश माऽ बऊदेर करिश दाशी
- आई ग, मी तर चाललो, पण उरलेले तेहेतीस कोटी बारा लाख हिंदुस्थानी जन हे तुझेच पुत्र, कन्या,जावई आणि सुना आहेत; आता तुझी सेवा त्यांच्याकडूनच घडेल. इथे कवीला दोन अर्थ अभिप्रेत आहेत. एक म्हणजे हुतात्मा खुदिराम आपल्या आईला म्हणजे भारतमातेला सांगतो आहे सांगतोय की माझी सेवा इथेच संपली तरी तुझ्या सेवेत खंड पडणार नाही; एकाहुन एक सरस असे सुपुत्र तुझ्यावर सर्वस्व ओवाळुन टाकायला उभे राहतील. दुसरा अर्थ असा की एक मुलगा आपल्या आईला अखेरचा निरोप घेताना सांगतोय की आई आता लेकाची वा सुनेची हौस तु या उरलेल्या मुलांमध्येच पाहा कारण तुझा मुलगा तर लग्न, संसार या सगळ्या पलिकडचा आहे आणि तो तुला ते सुख या जन्मी तरी देऊ शकत नाही. १९६४ साली आलेल्या ’शहिद’ या हुतात्मा भगतसिंहांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात फाशी जाण्यापूर्वी हुतात्मा भगतसिंहाच्या भावना व्यक्त करताना प्रेम धवन लिहुन गेले:
" तु न रोना के तु है भगतसिंह की मा, मरके भी लाल तेरा मरेगा नही;
घोडी चढके तो लाते है दुल्हन सभी, हसके हर कोई फासी चढेगा नही"
क्रांतिकारक हे सुद्धा सुपुत्रच होते आणि मातृऋणाची त्यांनाही जाणिव होती मात्र त्यांनी सख्ख्या आईपेक्षा हिंदमातेलाच आई मानले! जाताना आपल्या जन्मदातीला दिलासा देताना तो क्रांतिकारक म्हणतोय, की आता जातोय पण लवकरच परत येइन कारण अजुन तुझी सेवा करायची बरिच बाकी आहे.
दशमाश दशदिन पोरे जन्म नेबे माशिर घरे माऽगो
ओ माऽ तॉखन जदि ना चिनते पारिश देखबे गोलाय फाशी
आई, जातोय पण दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी (म्हणजे नऊ महिने व नऊ दिवस भरल्यावर) मी मावशीच्या पोटी जन्माला येणार आहे! इथे पुन्हा आईच्याच पोटी जन्माला येईन असे न म्हणता मावशीच्या पोटी जन्माला येईन असे लिहिले आहे कारण एकतर इथे कवीला पुनर्जन्माच्या कल्पनेपेक्षा कर्तव्यपूर्तीसाठी पुनरावतार अभिप्रेत आहे. दुसरे असे की हुतात्मा खुदिरामची आई त्याच्या बालपणीच गेली होती, तेव्हा त्याला पुन्हा तीच्या पोटी जन्म घ्यायला तीच हयात नव्हती. पण स्वातंत्र्य मिळे पर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेणार आणि पुन्हा पुन्हा देशकार्यास्तव मरण पत्करणार हे निश्चित.
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी! किती भयंकर कल्पना आहे, की मुलगा आपल्या आईला आपल्या गळ्यावरील फाशीच्या दोराचे व्रण हीच ओळख पटवुन देतोय आणि पुन्हा जन्माल्या आल्यावरही अभिमानाने गतजन्मीचे फाशीचे व्रण गळ्यावर वागवतोय आणि आपल्या आईला ती आपल्याला नव्या अवतारात ओळखायची जन्मखूण सांगतोय. ही जन्मखूण म्हणजे पुन्हा याच मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा शस्त्र धारण करून पुन्हा फासावर जाणार असल्याचेच जणु द्योतक आहे. केवळ हुतात्मा खुदिरामच नव्हे तर असंख्य क्रांतिकारकांची हीच भावना होती. म्हणूनच हे एक अजरामर हौतात्म्यगीत आहे असे मला वाटते.
दिव्य हुतात्मे आणि त्यांच्या अलौकिक हौतात्म्याचे, त्यांच्या धेयासक्तिचे, त्यांच्या मानसिकतेचे आणि वज्रनिश्चयाचे वर्णन करणारे हे अजरामर गीत लताबाईंच्या काळीज हेलावून टाकणाऱ्या आवाजात येथे ऐका.(कवी काझी नझरुल इस्लाम, संगीत अपरेश लाहिरी - बप्पी लाहिरी यांचे तिर्थरूप; चित्रपट सुभाष चंद्र)
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 12:55 am | मदनबाण
फारच सुरेख लेख..
या क्रांतीसूर्यास माझे अभिवादन..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
11 Aug 2008 - 1:55 am | बेसनलाडू
(नतमस्तक)बेसनलाडू
11 Aug 2008 - 7:16 am | विद्याधर३१
त्या क्रन्तिसूर्याला माझे लक्ष लक्ष प्रणाम.
विद्याधर
12 Aug 2008 - 6:54 pm | चिन्या१९८५
अतिशय सुंदर लेख्!!!!!!!!!ही माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद!!!!!!
11 Aug 2008 - 1:28 am | बिपिन कार्यकर्ते
सर्वसाक्षी, तुम्ही अत्यंत हृदयस्पर्शी लिहिले आहे. खुदिराम बोस यांच्या स्मृतिला लक्ष लक्ष अभिवादन. वयाच्या केवळ १८व्या वर्षी असे जीवन आणि त्याहून दिव्य असा मृत्यू. तुम्ही लिहिलेही छान आहे.
व्यक्त इतकेच करू शकतो आहे. बाकीच्या भावना व्यक्त करण्याच्या पलिकडच्या आहेत.
या लेखाच्या अनुषंगाने असा विचार मनात आला की शाळेत असताना याच खुदिरामांबद्दल धडा होता पण तो इतका नीरस पद्धतीने लिहिला आणि शिकवला गेला की मला प्रश्न पडला की हे तेच खुदिराम बोस का? जर शाळेत इतिहास असा लिहिला आणि शिकवला गेला तर? विद्यार्थ्यांना आवडेलच पण एक राष्ट्रिय भावनाही तयार होईल. नाही तर खुदिराम बोस फक्त बंगाल पुरतेच राहतात आणि वासुदेव बळवंत फडक्यांना वाली फक्त महाराष्ट्र.
http://en.wikipedia.org/wiki/Khudiram_Bose
बिपिन.
11 Aug 2008 - 9:37 am | विसोबा खेचर
मिपाला श्रीमंत करणारा अतिशय सुरेख लेख....
काव्यपंक्तिही सुरेख, गाणं ही हृदयाला हात घालणारं!
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी!
नि:शब्द!
(नतमस्तक) तात्या.
11 Aug 2008 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी!
खरंच चटका लावून गेली ही ओळ!
केवढं हे देशप्रेम आणि किती उदात्त त्याग केला या सर्व वीरांनी, म्हणून आज आपण स्वतंत्र देशात रहातो. त्या सर्वांना माझा विनम्र प्रणाम!
11 Aug 2008 - 12:18 pm | स्वाती दिनेश
हुतात्मा खुदिराम आणि असंख्य क्रांतीकारकांच्या भावना व्यक्त करणारा अतिशय हृदयस्पर्शी लेख.
स्वत:च्या अवघ्या अस्तित्वाचीच स्वातंत्र्यासाठी होळी करणार्या क्रांतिसूर्याला नम्र अभिवादन,
स्वाती
11 Aug 2008 - 12:26 pm | आनंदयात्री
वा सर्वसाक्षी, किती तरी दिसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. सुंदर लेख, गाण्याचा भावार्थ आवडला. शतशः धन्यवाद.
11 Aug 2008 - 12:48 pm | सहज
खुदिराम बोस यांच्या हौतात्माची बातमी "अमृत बाझार " पत्रीका (5-9-1908)
स्थळ मुझफ्फरपुर कारागृह व त्या समोरील खुदिराम बोस यांचा पुतळा पहायला इथे टिचकी द्या
नतमस्तक.
11 Aug 2008 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते
दुवा दिसत नाही. 'नॉट फाऊंड' एरर येतेय.
बिपिन.
11 Aug 2008 - 1:04 pm | मनिष
वाचून अंगावर काटा आला...खूप भावस्पर्शी लेख आहे.
"त्या" लोंकाना जागा दाखवली पाहिजे, इ. इ. लिहिणार्यांनी जरा कविचे नाव काळजीपुर्व़ वाचावे.
हेच म्हणतो! :)
11 Aug 2008 - 1:47 pm | रामदास
पंधरा ऑगस्टच्या निमीत्ताने अशाच एका विषयावर मी लेख लिहिणार होतो.आता त्याची आवश्यकता वाटत नाही.ह्या सुंदर लेखातून तुम्ही ते काम पूर्ण केले आहे.
आता ह्या पोवाड्यात मी फक्त जी जी रं जी म्हणणार आहे.
आत्मस्तुतीचा धोका पत्करून काही ओळी इथे देत आहे.
कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला.
आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
स्वातंत्र्य दिनाच्या जवळपास हा लेख लिहून साधलेले औचीत्य कौतुकास्पद आहे.
11 Aug 2008 - 2:02 pm | बिपिन कार्यकर्ते
पोवाडा तर चांगलाच होता. पण, 'जी जी रं' सुद्धा ग्रेट.
कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला.
आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
क्या बात है..
बिपिन.
11 Aug 2008 - 9:09 pm | चतुरंग
ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी.
फारच सुंदर! क्या बात है!!
चतुरंग
11 Aug 2008 - 3:07 pm | अन्जलि
सर्वसाक्शिजि तुमचा लेख वाचुन थरारल्यासारखे झाले. खुप सुन्दर. अशा गोश्टी जर मुलाना सान्गित्ल्या तर नक्किच
फायदा होइल. १५/८ अणि २६/१ ह्या दिव्साचे महत्व त्याना खरया अर्थाने कळेल असे वाटते. तसेच रामदास ह्यानि दिलेला प्रतिसाद पण मनाला भावला. अतिशय सुन्दर.
11 Aug 2008 - 9:08 pm | चतुरंग
केवढा त्याग! केवढे देशप्रेम! काय हे हौतात्म्य! सारंच थक्क करुन टाकणारं, डोळे दिपवून टाकणारं!
शेवटची ओळ तर अक्षरशः काळजावरुन सुरा फिरवून गेली!!
निशःब्द आणि नतमस्तक!!
चतुरंग
11 Aug 2008 - 10:18 pm | सर्किट (not verified)
नझरूल इस्लाम ह्यांच्या गीताने अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला.
सर्वसाक्षी, धन्यवाद !
- सर्किट
11 Aug 2008 - 10:18 pm | विसोबा खेचर
ऍक बार बिदाय दे माऽ, घुरे आशी!
आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी
मध्यमातली एक सुंदर विराणी!
'मा' या अक्षरावरची स्वरवेल अशी बंधली आहे की खरंच कुणा मुलाने आपल्या आईला हाक मारावी, मतृत्वाच्या कुशीत शिरावं, त्या पदराखाली मुसमुसत दडावं, अगदी शेवटचंच! आईच्या कुशीत शिरून ते मुसमुसणं महत्वाचं कारण मग जगासमोर हासत हासत फाशी जायला त्यामुळेच बळ येतं!
आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी
'आमि हाशी हाशी' म्हणतांना दिदीने खास बंगाली ढंग आणि लयीचं वजन किती सुरेख सांभाळलं आहे! 'पोरबो फाशी' च्या स्वरावलीतली इन्टेन्सिटी जीव कासावीस करते. 'आई, बघ गं..' या हाकेतली जी आर्तता आहे ना, अगदी तीच आर्तता दिदीने 'देखबे' ह शब्द उच्चारताना दाखवली आहे! केवळ जबरदस्त!
आज दिवसभरात हे गाणं खूप वेळा ऐकलं, पुन्हा पुन्हा ऐकलं. छ्या! खूप अस्वस्थ करून टाकणारं गाणं!
म्हणून आत्ता हे चार शब्द खरडून थोडीशी अस्वस्थता इथे उतरवायचा प्रयत्न केला आहे!
(पुन्हा एकदा नि:शब्द!) तात्या.
13 Aug 2008 - 1:19 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्याशी सहमत.
खाली मनिषचा प्रतिसाद पाहून यूट्यूब वर ते गाणे ऐकायला गेलो, पण पूर्ण ऐकू नाही शकलो म्हणजे ऐकवलं नाही गेलं माझ्याच्याने. साक्षीजींचा लेख आणि त्या गाण्याची पूर्वपिठिका माहित झाल्याने, आणि लताबाईंनी इतके सुंदर गायल्याने, जो काही एकत्रित इफेक्ट आला तो फारच अस्वस्थ करणारा होता.
बिपिन.
12 Aug 2008 - 4:55 am | इत्यादि
Tumcha lekh vaachun attyant anand zala. Hrudaysparshi ani marmasparshi bhashantar kele aahet aapan. Tatya ni link dilemule ha albhya laabh milala. Asech lihit rahave. Aaple Bangali bhasha ani manase hyanchyabaddal cha sanmaan baghun kautuk vatate.
Ityaadi
12 Aug 2008 - 6:01 am | चतुरंग
आपल्या भावना समजल्या आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.
(एक विनंती - कृपया मराठीतून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करावा. मराठी टंकन अतिशय सोपे आहे. इथे मदत आहे.)
चतुरंग
12 Aug 2008 - 6:32 am | प्राजु
सर्वसाक्षी..
इतका सुंदर लेख १५ ऑगस्टच्या निमित्ताने वाचायला मिळावा यासारखं सुदैव कोणतं!!!
केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा. गाण्याची शेवटची ओळ तर सुन्न करून गेली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2008 - 12:49 pm | मनस्वी
केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
12 Aug 2008 - 9:59 am | उपटसुंभ
प्रत्येक ओळीवर असंख्य कविता ओवाळून टाकाव्यात..!
शेवटच्या ओळीसाठी प्रतिक्रिया न देणं उत्तम..!
देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला लेख..!
सर्वसाक्षी तुमचे अनंत ऋणी आहोत..!
12 Aug 2008 - 11:38 am | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
मिपाला श्रीमंत करणारा अतिशय सुरेख लेख....
अगदी बरोबर आणि आम्हा सर्व वाचकांना सुद्धा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
12 Aug 2008 - 12:33 pm | मनिष
यू ट्युबवर हे गाणे इथे बघता येईल!
13 Aug 2008 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद, मनिष. तू एक खूप छान दुवा शेअर केला आहेस.
बिपिन.
12 Aug 2008 - 10:51 pm | यशोधरा
अतिशय सुरेख लेख आणि काव्यपंक्ति. अर्थ विशद करुन सांगितल्याबद्दल आणि लतादीदींच्या आवाजात गाणे ऐकण्यासाठी गाण्याचा दुवा दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
13 Aug 2008 - 2:05 pm | पद्मश्री चित्रे
लोकसत्तेत भारत सरकार तर्फे वाहण्यात आलेली श्रध्दंजली व त्या वरील या ओळी वाचुन पुर्ण गाणं समजुन घेण्यची इच्छा होती , ते अचानक पुर्ण झाली.. धन्यवाद.
याच वाटेवरची -
मनी धीर धरी, शोक आवरी जननी
भेटेन नऊ महिन्यांनी....
अशी एक सुरेख कविता आहे..
13 Aug 2008 - 2:11 pm | II राजे II (not verified)
निशब्द होतो मी जेव्हा जेव्हा क्रांतीवीरांची जिवनी वाचतो मी !
त्याच्या स्वप्नातील भारत शोधता शोधता तीळ तीळ मरतो मी !
असेल नसेल तेस्वाहा करुन देशासाठी प्राण देणा-याच्या समोर नतमस्तक मी !
डोळ्यात पाणी भरुन पुन्हा क्रांतीची वाट पहाणारा सामान्य नागरीक मी !!
नेहमीच तुमचे लेखन अस्वस्थ करुन जाते... धन्यवाद... काही ना काही कारणामुळे .. तुम्ही क्रांतीविरांची माहीती प्रकाशीत करता व त्या क्रांतीकारांचे विचार व जिवन नव्या पिढीला त्यांच्याच सामान्य भाषेत भेटत राहतात.. !
अनेकानेक धन्यवाद.
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!