युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ५
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ६
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ७
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ८
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-९
यॉर्कवरील शूर अमेरिकन सैनिक.......
धुराचा जाड थर..........
हल्ल्याच्या दुसऱ्या फेरीत "बॅटलशिप रो" वर हल्ला चढविण्यात आला. हा हल्ला बाँबर, उंचावरुन हल्ला करण्यार्या विमानांनी व लढाऊ विमानांनीच केला कारण सावध झालेल्या शत्रूवर टॉरपेडो डागणार्या विमानांनी हल्ला चढविणे आता मुष्कील होते. या हल्ल्यात जपानी विमानांचे लक्ष्य होते तोडमोड झालेल्या युद्धनौकांचा पुरता नाश करणे. इतका की त्यांची दुरुस्ती नजिकच्या काळात हो़ऊ शकणार नाही. जपानच्या वैमानिकांच्या दुर्दैवाने काळ्या धुराचा इतका जाड थर तयार झाला होता की त्यांना खालचे काही दिसेनासे झाले होते. त्यांनी नाईलाजाने त्यांचे लक्ष मग इतर नौकांकडे वळविले.
बॅटलशिप रो (हा एक सात नौकांचा गट होता).....
याच हल्ल्यादरम्यान जपानी वैमानिकांच्या नजरेस पळून जाणारी नेव्हाडा नावाची २९००० टनी युद्धनौका पडली. एखाद्या कोकरावर वाघ झडप घालतो त्याप्रमाणे जपानी विमानांनी नेव्हाडाला घेरले व तिची लंगडतोड चालवली. या नौकेला पहिल्या हल्ल्यातच टॉरपेडोने एक ४० फूटी भले मोठे भगदाड पडले होते. त्याही परिस्थितीत ती निसटून समुद्रात जायचा प्रयत्न करत होती. पर्लहार्बरमधे ही नौका बुडवून बाकीच्या नौकांचा निसटण्याचा मार्ग बंद करायची ही नामी संधी जपानी वैमानिकांनी हेरली.
नेव्हाडावर घिरट्या घालणारी जपानी विमाने........
नेव्हाडाची भडकलेली आग..........
ही नौका जर तेथे बुडती तर तिला बाहेर काढण्यास अनेक महिने लागले असते व तेवढा काळ पर्ल हार्बर निरुपयोगी झाले असते. जी जहाजे आत होती ती बाहेर जाऊ शकली नसती व जी बाहेर समुद्रात होती ती या बंदराला लागू शकली नसती. असे झाले असते तर समुद्रात असलेल्या जहाजांना इंधन भरता आले नसते ना दुरुस्ती करता आली असती. हे उमजल्यामुळे जपाने विमानांनी या नौकेवर मोठ्या त्वेषाने हल्ले चढविले. त्यांनी या नौकेवर पाच बॉंब टाकण्यात यश मिळवले पण त्यांच्या दुर्दैवाने ती नौका अजूनही तरंगत होती व खुरडत बाहेर जायचा प्रयत्न करत होती. त्या नौकेचा प्रमुख रेअर अॅडमिरल फरलॉंगने दोन साध्या जहाजांच्या मदतीने ही नौका अखेरीस बाहेर ओढून काढली चॅनेलच्या दुसऱ्या टोकाला तिला उभी केली.
तिच्यावर पडलेल्या बॉंबनी या नौकेवर अनेक आगी लागल्या. तिच्यावरील पाण्याचे पाईप फुटल्यामुळे आता तिच्यावर पाणीही नव्हते. ज्या बोटींनी तिला बाहेर ओढून काढले होते त्या बोटींनी तिच्यावरील आगी विझवल्या. पुढे हीच नौका दुरुस्त हो़ऊन सर्वात प्रथम परत युद्धात भाग घेती झाली. ९ वाजून ४५ मिनिटांनी दुसरा हल्ला संपुष्टात आला. हा हल्लाही यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या हल्ल्यात अमेरिकेच्या विमानतळांचा नाश करण्यात जपानला जास्त यश मिळाले. दोन्ही हल्ल्यात जास्त परिणामकारक कुठला झाला हे सांगणे तसे कठीण आहे. पहिल्यात नौका नष्ट झाल्या तर दुसर्यात अमेरिकेचे हवाई सामर्थ्य खच्ची करण्यात जपानला यश मिळाले.
पहिल्या हवाईहल्ल्यात भाग घेतेलेली विमाने त्यांच्या जहाजांवर साधारणत: दहा वाजता परतली. दोनच तासांनी दुसर्या हल्ल्यातील विमाने परतायला सुरवात झाली. समुद्रातील हवामान लहरी असते. ही विमाने परतण्याच्या वेळी समुद्राने उग्र स्वरुप धारण केले होते त्यामुळे या परतणार्या विमानांना नौकांवर उतरताना बरेच अवघड गेले. या हल्ल्यांनी उत्तेजित झालेल्या वैमानिकांच्या हातून असंख्य चुका झाल्या व अनेक विमानांची तोडमोड झाली.. ती मोडलेली विमाने समुद्रात ढकलून येणाऱ्या विमानांना जागा करावी लागली. सोर्यूवर उतरताना ले. सादो यामामोटोला एक टायर फुटलेल्या अवस्थेत कसे उतरायचे हा प्रश्न पडला होता पण सोर्यूवरील त्याच्या मित्रांनी त्याचा दुसरा टायरही बंदुकीने फोडला व तो सुखरुप खाली उतरला.
सोर्यूवर वैद्यकीय आधिकारी व त्यांची साहाय्यक जखमी सैनिकांच्या उपचारासाठी जय्यत तयारीत होते. उतरलेल्या विमानांना पडलेली भोके पहाताच त्यांना बरेचजण कॉकपीटमधे जखमी झालेले असणार असे वाटत होते परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही वैमानिक किंवा गोलंदाज जखमी झालेला दिसला नाही. अकागीवर मात्र एक जखमी झालेला आधिकारी त्याच रात्री मरण पावला. त्याला सन्मानाने बंदुकीच्या सलामीत समुद्रात निरोप देण्यात आला.
झुईकाकू वर एक दुर्घटना घडली ज्यातून या युद्धाची मानसिक तयारी कुठल्या पातळीवर झाली होती हे कळते. ले. मासाओ सातो झुईककूवर परतल्यावर पहिल्यांदा घाईघाईने रेडिओच्या खोलीत गेला. त्याला रस्ता चुकलेल्या दोन वैमानिकांची काळजी वाटत होती. काहीच क्षणात त्याचा त्यांच्याशी संपर्क झाला. ते झुईकाकूचे अक्षांशरेखांश विचारत होते. सातोला काही बोलता येईना कारण नौकेवरून कुठलाही संदेश प्रसारित करण्यास बंदी होती. त्याने त्या दोन वैमानिकांचा शेवटचा संदेश ऐकला तो असा ‘आमचे इंधन संपत आले आहे. उत्तर का मिळत नाही याची आम्हाला कल्पना आहे. लवकरच आम्ही समुद्रात कोसळणार आहोत. बेन्झाई ! बेन्झाई ! बेन्झाई!!!’
अशा काही घटना वगळल्यास जपानचे नुकसान तुलनेने काहीच नव्हते. २९ विमाने प्रत्यक्ष युद्धात नष्ट झाली तर किरकोळ समुद्रात भरकटली किंवा उतरताना मोडली. बाकी सर्व विमाने सुखरुपपणे त्यांच्या तळावर परतली. एकंदरीत पर्लहार्बरवरील हल्ला अत्यंत यशस्वी झाला असे म्हणावे लागेल. अकागीवर या विजयामुळे उत्साहाचे वातावरण पसरले. साधारणत: ११ वाजता या विजयाचा शिल्पकार फुचिडाने अकागीवर आपल्या विमानाला ब्रेक लावले. तेथे कमांडर गेंडा त्याच्या स्वागतासाठी अतुरतेने वाट बघत होता. फुचिडा उतरल्यावर त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केले. ते अनेक मिनिटे चालले होते हे सांगायची गरज नाही. फुचिडाचे अभिनंदन करुन झाल्यावर गेंडा परत ब्रिजवर गेला तर फुचिडाने त्याच्या विमानांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्यांचे अहवाल सादर करण्यासाठी बैठकीसाठी पाचारण केले.
या बैठकीसाठी विमानांच्या डेकवरच सोय करण्यात आली होती. एका मोठ्या फळ्यावर पर्ल हार्बरचे रेखाचित्र काढण्यात आले होते. त्यावर माहीत असलेल्या सर्व जहाजांच्या जागा रेखाटल्या होत्या. परत आलेल्या प्रत्येक वैमानिकाने त्याने टाकलेल्या बॉब व केलेल्या नुकसानीची नोंद केली. थोड्याच वेळात त्या दोन हल्ल्यांमधे झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होत गेले. फारच मोठा विध्वंस घडवून आणला होता त्या हल्ल्यांनी! कल्पनेच्या पलिकडे! एवढ्यावरच संतुष्ट न होता प्रत्येक वैमानिकानी परत जाऊन उरलेले काम पूर्ण करण्याची तयारी दर्शविली.
तिसऱ्या हल्ल्यात त्यांची योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता होती परंतु ही संधी त्यांनी वाया घालाविली. ती कशी ? या बैठकीनंतर अॅडमिरल नागूमोने फुचिडाला त्याच्या कार्यालयात सवीस्तर अहवाल देण्यासाठी पाचारण केले. फुचिडला अजून एक हल्ला चढवून अमेरिकेच्या उरलेल्या नौका व उरलेले सैन्य नष्ट करायचे होते. (अर्थात हे मूळ योजनेप्रमाणेच होते) त्याने नागूमोला अहवाल दिला की त्याने अमेरिकेचे विमानदल नष्ट केले होते व आता जमिनीवरुन होणार्या विमानभेदी तोफांचा मारा सोडल्यास त्याच्या विमानांना कसलाही अडथळा होणार नव्हता.
नागुमोच्या चेहऱ्यावर ध्येयप्राप्तीचा आनंद मावत नव्हता व त्याने तो लपविण्याचा प्रयत्नही केला नाही. जपानचे आधिकारी शक्यतो आपल्या कुठल्याही भावना दिसू देत नाहीत पण ही वेळच वेगळी होती. त्याने फुचिडा व त्याच्या सहकाऱ्यांचे तोंड भरुन कौतुक केले पण लवकरच फुचिडाच्या लक्षात आले की ॲडमिरल त्याला तिसऱ्या हल्ल्यासाठी परवानगी देण्याची टाळाटाळ करत आहे.
नागुमो हा जपानच्या सेनादलातील एक पारंपारिक पद्धतीने विचार करणारा सेनाधिकारी होता. आपण पाहिलेच आहे की तो प्रथमपासून या पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्या विरुद्ध होता व केवळ कर्तव्य म्हणून त्याने यात भाग घेतला होता. दुसरे म्हणजे त्याला त्याचे आरमार सुखरुपपणे जपानला परत न्यायचे होते. हे आरमार नष्ट झाले असते तर त्याच्या कारकीर्दीवर काळा डाग पडला असता व त्याला ते कुठल्याही परिस्थिती नको होते. एक विजयी वीर म्हणून त्याला जपानला परत जायचे होते. अॅडमिरल तामॉन यामागुचीने तिसरा हल्ला चढविण्यासाठी त्याची विमाने सोर्यू व हिर्यूवर तयार आहेत व उडण्याची आज्ञा द्यावी असे वारंवार सांगितले. सोर्यूवरील उघडझाप करणारे दिवे वारंवार ही आज्ञा मागत होते परंतु उत्तर येत नव्हते. गेंडानेही प्रयत्न करुन बगितले पण त्यालाही यश आले नाही. शेवटी फुचिडाने स्वत: नागुमोला पटविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ! या वेळी सगळ्यांना यामामोटोची प्रकर्षाने आठवण झाली. तोच असा एकमेव माणूस होता जो नागुमोला पटवून देऊ शकला असता किंवा त्याला कमीतकमी आज्ञातरी देऊ शकला असता.
एका तासाच्या आत अमेरिकेतील सर्व वृत्तपत्रातील रकाने या बातमीने भरुन गेले. ‘नौकांचे प्रचंड नुकसान’ ‘जपानच्या नौदलाचा हल्ला’ ‘फोर्ड आयलंडवर आगीचे थैमान’ ‘प्रतिकार झाला नाही’ ‘पर्ल हार्बरच्या सर्व नौकांचे पलायन’ अशा अनेक खर्या खोट्या बातम्या छापून आल्या.
या तिसर्या हल्ल्यासाठी परवानगी नाकारल्याबद्दल नागुमोवर प्रचंड टीका झाली. एवढेच काय युद्धानंतरही अमेरिकन अभ्यासकांनीही ही त्याची फार मोठ्ठी चूक झाली असे प्रतिपादन केले परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पर्ल हार्बरवर हल्ला हा यमामोटोच्या एका मोठ्या योजनेचा भाग होता. पॅसिफिकमधे इतर ठिकाणी लवकरच भीषण युद्धाला तोंड फुटणार होते. यामामोटोने त्यामुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांवर सगळे निर्णय सोडले होते. नागुमोला त्या युद्धासाठी त्याच्या नौकांपैकी एकही गमावून चालणार नव्हते. दुर्दैवाने नागुमो जरा जास्तच सावधगिरी बाळगत होता असे बऱ्याच जणांचे मत पडले.
नागुमोच्या अती सावधगिरी का बाळगत होता ? त्यालाही कारणे होती व ती त्या काळात संयुक्तिक होती. जपानचे हे युद्ध तुलनेने एका गरीब राष्ट्राचे युद्ध होते. आक्रमक भाषा करणे, उत्तेजित होत त्वेषाने भाषण करणे व वस्तुस्थितीचे भान असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेची जहाजे नष्ट झाली तर अमेरिका त्याच्या दुप्पट नौका कमी कालावधीत बांधू शकत होते. जपानला आत्ताच अनेक गोष्टींचा तुटवडा भासत होता. उदा. खनिजे, मशिन्स, इंधन एक ना दोन. नागुमोने स्वत:ला एक प्रश्न निश्चितच विचारला असणार – माझे एखादे जहाज नष्ट झाले तर मला त्या बदल्यात दुसरे मिळणार आहे का ? याचे उत्तर नकारार्थी आल्यावर पुढचा निर्णयही नकारार्थी आला. कितीही कटू असले तरीही हेच सत्य होते. जुगाराच्या एखाद्या टेबलावर आयुष्यात एकदाच एका पत्याने कोटी रुपये जिंकलेल्या माणसाची जी मनस्थिती होते तीच नागुमोची झाली. त्याने आपले पत्ते गोळा करुन घर गाठायचा निर्णय घेतला. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या फुचिडा व गेंडासारख्या आधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी त्याच्याकडे अनेक वचने तयार होतीच्. ‘यादान ताईटेकी’ तो म्हणाला. ‘निष्काळजीपणा यशावर बोळा फिरवू शकतो!’
हा निर्णय बदलत नाही म्हटल्यावर त्या आरमाराने शांतपणे जपानची वाट धरली. फुचिडा या निर्णयाने नागुमोवर इतका नाराज झाला की परतीच्या आख्ख्या प्रवासात नागुमोशी तो एक शब्दही बोलला नाही.
इकडे ओहाअ बेटावर मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्या रविवारी दुपारी तीन वाजता तारवाल्याने ॲडमिरल किमेलच्या हातात वॉशिंग्टनवरुन आलेली एक तार सुपूर्त केली. ही आली होती जनरल जॉर्ज मार्शल याच्याकडून. आश्चर्य म्हणजे ही तार नागरी खात्याच्या सेवेतून पाठविण्यात आली होती. त्यातील मजकूर वाचल्यावर किमेलला हसावे का रडावे हे कळेना. त्याने रागाने त्याचा बोळा करुन ती तार कचऱ्यात फेकली. त्यात ‘जपानबरोबर बोलणी फिसकटली असून जपान सकाळी ७.३० वाजता निर्वाणीचा इशारा देणार आहे त्यामुळे पर्लहार्बरवरील सर्व फौजांनी दक्ष रहावे’ असा मजकूर होता.
अर्थात सगळ्या गोंधळाचा विचार करता यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही अमेरिकन वैमानिकाला जपानी विमानाचा पाठलाग करुन त्यांच्या तळाचा पत्ता काढता आला नाही. या सगळ्या नौका उत्तरेला फक्त २०० मैलांवर होत्या. अमेरिकन विमानदलांना फसविण्यात जपानला चांगले यश आले होते. पहिला हल्ला त्यांनी दक्षिणेकडे येऊन केला असल्यामुळे अमेरिकेन विमानदलाचे सगळे लक्ष दक्षिणेकडेच लागले होते. (विमानवाहू नौकांचा हा एक मोठा फायदा होता. म्हणजे त्या समुद्रावर कुठेही उभ्या करता येत व विमाने कुठल्याही दिशेने आपल्या भक्षावर हल्ला चढवू शकत).
ओपाना.......
ओपाना रडार केंद्रावर इलिअट आणि लॉकार्ड अजूनही जपानच्या विमानांचा मार्गाचे आलेखन करत होते. त्या आलेखावरुन स्पष्ट होत होते की ही विमाने कुठेतरी उत्तरेला परत जात होती. दुर्दैवाने या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. (त्या काळात ही रडार नव्यानेच तयार झाली होती व त्यांच्यावर कोणी जास्त विश्वास ठेवत नसे.) असो एक गोष्ट मात्र खरी की अमेरिकेच्या सेनाधिकार्यांनी दक्षिणेला आपले लक्ष एकवटले होते.
ओहाअ बेटांवर त्या काळात जपानी वंशाच्या नागरिकांची लक्षणीय संख्या होती. बेटावर अफवांचे पेव फुटले. काही नमुने बघा –उसाच्या शेतातून जपानी कामगारांनी उस कापून बाणाच्या खुणा तयार करुन विमानांना बंदराचा मार्ग दखविला’ जपानी वंशाच्या नागरिकांनी होनोलुलु ते पर्ल हार्बरच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी केली’ या सगळ्या हास्यास्पद अफवा होत्या. असले काहीही झालेले नव्हते हे एफ्.बी. आय्नेच नंतर स्पष्ट केले ते बरे झाले. जपानी स्थलसेनेचे आक्रमण केंव्हाही होण्याची शक्यता असल्यामुळे जनरल शॉर्टने हजारो सैनिक त्या बेटांवर तैनात केले. सात डिसेंबरचा उरलेला दिवस या सैनिकांनी अत्यंत विचित्र मानसिक अवस्थेत घालवला. घाबरलेले, अतीउत्तेजित सैनिक कुठल्याही हालणाऱ्या वस्तूंवर विचार न करता बंदुका चालवत होते. जे वैमानिक जपानी विमानांच्या मागावर पाठविण्यात आले होते त्यांचीही विमाने या सैनिकांनी पाडली. ज्या बोटी समुद्रातून सैनिकांना वाचविण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांच्यावरही मरिन्सनी दादागिरी केली.
गोंधळाचे सगळ्यात चांगले उदाहरण शोधुनही सापडणार नाही. एंटरप्राईज नौकेवरील सहा विमानांना रात्री उशीर झाला म्हणून ओहाअवर उतरण्यास सांगण्यात आले. ही विमाने, त्यांचे लुकलुकणारे दिवे लाऊन जेव्हा हिकॅमवर आली तेव्हा खालच्या विमानभेदी तोफांच्या तावडीत सापडली. काही समजायच्या आतच त्यांच्यावर तोफा डागण्यात आल्या. यातून त्यांची सुटका झाली ना झाली तेवढ्यात ते नॅव्हल यार्डावरील तोफांच्या तावडीत सापडले. त्यानंतर पेनसिल्व्हानियावरील तोफांच्या. यातील एका विमानाचा वैमानिक, कॅ. शुमाकारने तीन विमाने समुद्रात कोसळताना बघितली. एका वैमानिकाने पॅराशूटने बाहेर उडी मारली परंतु दुर्दैवाने तो नंतर इस्पितळात मृत्यु पावला. तीन वैमानिक नशिबवान ठरले. जेम्स डॅनियलने यातून बाहेर पडण्यासाठी वेगळीच युक्ती वापरली. खालून जेव्हा तोफांचा मारा सुरु झाला तेव्हा त्याने सरळ त्या तोफांच्या दिशेने सुर मारला व प्रखर दिव्यांनी त्या चालविणाऱ्या सैनिकांना आंधळे केले व दुसऱ्याच क्षणी तो ढगात नाहीसा झाला. थोड्यावेळाने तो सुरक्षितपणे तेथेच उतरला.
पर्ल हार्बरवरील हल्ल्याची जी चौकशी नंतर झाली त्यात साक्ष देताना किमेल म्हणाला, ‘जपानने आपला विश्वासघात केला ही बाब सोडल्यास एक मान्यच करावे लागेल की या हल्ल्याची आखणी फार विचारपूर्वक व काळजी घेऊन केली गेली होती’
झालेल्या सगळ्या नुकसानीचा विचार केल्यास असे आढळले की जपानने ८ युद्धनौका बुडविल्या किंवा जायबंदी केल्या. ३ हलक्या क्रूझर, ३ डिस्ट्रॉयर व चार इतर नौकांचा नाश केला होता. त्याचे एकत्रित वजन भरले ३ लाख टन. याशिवाय त्यांनी हिकॅमचा हवाईतळ धुळीस मिळवला होता. २३१ पैकी ६४ विमाने पूर्णत: नष्ट केली होती तर ७९ विमाने जायबंदी केली होती. याखेरीज नौदलाची निम्मी विमाने त्यांनी नष्ट केली होती ते वेगळेच. हे एवढे नुकसान का झाले? जपानने अमेरिकेला बेसावध पकडले हे एक कारण तर होतेच पण दुसरे महत्वाचे कारण होते त्यांनी विकसित केलेले टॉरपेडो.
अमेरिकेच्या सामरिक तज्ञांना पर्ल हार्बरच्या उथळ पाण्यात टॉरपेडो काम करणार नाहीत याची खात्री होती. जपानी तज्ञांचे म्हणणे उलटे होते व ते शक्य आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले व तसे करुन दाखविले. अमेरिकन सेनाधिकार्यांना त्यांच्या नौकांचे चिलखत अभेद्य आहे याची खात्री होती तर जपानी विमानदालानी ते चूक आहे हे सिद्ध करुन दाखविले. त्यांनी हवेतून १६ इंची बॉंब टाकले. हे बॉंब खरे तर त्यांच्या नौका वापरायच्या. हे सगळे खरे असले तरी जपानचा विजय हा पूर्ण नव्हता कारण त्यांच्या तावडीतून अमेरिकेच्या सर्व विमानवाहू नौका निसटल्या होत्या. त्यातील एन्टरप्राईज ही नौका नशिबानेच वाचली. फुचिडाने पहिला हल्ला चढविला तेव्हा ती फक्त २०० मैलांवर होती. (वेक बेटांवरुन परत येताना तिच्या बरोबर असलेल्या युद्धनौकांमधे इंधन भरण्यात आलेल्या अडचणींमुळे त्या आरमाराला उशीर झाला होता त्याचा फायदा असा झाला) जपानी वैमानिकांना ओहाअ बेटावरील इतर व्यवस्थांचा नाश करण्यात अपयश आले होते हेही नाकारुन चालणार नाही. त्यामुळे या बोटी आता दुरुस्त करता येणार होत्या. शिवाय तेलाच्या मोठ्या टाक्या त्यांनी उध्वस्थ केल्या नाहीत. या जर नष्ट करण्यात आल्या असत्या अमेरिकेच्या पॅसिफिकमधील आरमाराला पर्ल हार्बर सोडून अमेरिकेला परतावे लागले असते व पॅसिफिक जपानच्या ताब्यात कित्येक महिने राहिले असता.
अमेरिकेच्या नशिबाने इंधनाच्या टाक्यांजवळ नांगर टाकलेली इंधनाची बोट एकही बॉंब न पडता वाचली. ही नौका जर पेटली असती तर पर्ल हार्बरचा सर्व इंधनाचा साठा नष्ट झाला असता. जपानच्या पाणबुड्यांची कामगिरीही निराशाजनक झाली. या कामगिरीविषयी जपानी आधिकारी कुठलेही स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. ७ डिसेंबरला अॅडमिरल किमेलकडे फक्त ९ पाणबुड्या होत्या. त्याविरुद्ध जपानी २५ मोठ्या पाणबुड्या व ५ दोन माणसांच्या पाणबुड्या युद्धात उतरल्या होत्या. हा ३० पाणबुड्यांचा ताफा नागुमोच्या आरमाराआधीच पॅसिफिकच्या पाण्याखाली हालचाली करत होता. हवाई हल्ला होण्याआधीच या पाणबुड्यांनी ओहाअ बेटाला वेढा घातला होता. या पाणबुड्यांकडून भरीव कामगिरीची आशा होती. त्यांच्यावर विमानांनी अर्धवट सोडलेले काम पूर्ण करायची जबाबदारी होती तसेच समुद्रात पडलेल्या विमानांच्या वैमानिकांची सुटका करण्याची त्यांची जबाबदारी होती. दुर्दैवाने या पाणबुड्यांचे नौसैनिक प्रशिक्षित नव्हते किंवा ते वैमानिकांएवढे पेटलेले नव्हते असेच म्हणावे लागेल. परतणारी एन्टरप्राईज नौका तर या पाणबुड्यांसाठी एक उत्कृष्ट लक्ष्य होते पण त्यांना तिच्यावर एकही टॉरपेडो डागता आला नाही. या पाणबुडी दलाने केलेला प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यात आला. थोडक्यात एवढे मोठे पाणबुडीदल पॅसिफिकमधे पर्लहार्बरजवळ असले तरीही त्याचा तसा काहीच उपयोग झाला नाही. यातील एक मोठी पाणबुडी व चार छोट्या पाणबुड्या नष्ट करण्यात आल्या.
जपानमधे प्रकाशित झालेले पोस्टकार्ड.........
अमेरिकन जनतेला पर्ल हारबर्वर झालेल्या हल्ल्याचा जेवढा धक्का बसला तेवढाच धक्का जपानच्या जनतेला बसला. त्यांनाही या हल्ल्याची बिलकुल कल्पना नव्हती. ही बातमी जपानला पोहोचल्या पोहोचल्या वातावरण देशभक्तीने भारावून गेले. जपानमधील प्रत्येक रस्त्यावर वर्तमानपत्र विकणारे ही बातमी ओरडून त्या जनतेला सांगू लागले. प्रत्येक तासाला नवीन बातमी फुटत होती. जपानच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या, माईनिचीच्या अग्रलेखात संपादकांनी गर्जना केली, ‘ एक कोटी जपानी जनतेची आगेकुच सुरु होण्याची वेळ आली आहे. आजवर आम्ही ज्याची वाट पहात आहोत तो क्षण आलेला आहे...........
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
एका अमेरिकावारीत येथे भेट द्यायचा विचार आहे..........
प्रतिक्रिया
14 Jun 2013 - 8:37 pm | पैसा
अतिशय थरारक लढाईचे तेवढेच थरारक आणि तपशीलवार वर्णन!
17 Oct 2017 - 8:04 pm | अमरेंद्र बाहुबली
खुपच थरारक!
17 Oct 2017 - 8:33 pm | मोदक
थरारक वर्णन..