युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ४
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ५
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ६
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ७
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-८
उड्डाण ............
दोन फ्लेअरचा अर्थ बरोबर उलटा होता. त्याचा अर्थ होता ‘अमेरिकेच्या फौजांना बेसावध पकडण्यात अपयश आलेले आहे’. याचाच अर्थ असा होता की प्रथम बाँबर विमानांनी हल्ला करावा. या तथाकथित चुकीच्या संदेशामुळे बाँबर विमानांचा प्रमुख ले. कमांडर काकुइचि ताकाहाशीने मानसिक तणावात जास्त विचार न करता त्याच्या विमानांना हल्ल्याचा इशारा दिला. मुराटाला हा हल्ला चुकीचा असावा याचा अंदाज आला होता, परंतू त्याच्या हातात आता त्याच्या लक्ष्याच्या दिशेने झेप घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणजे आता क्रम बाजुला राहून दोन्ही हल्ले एकाच वेळी चालू झाले. अमेरिकन सैन्य बेसावध होते म्हणून ठीक नाहीतर ही चूक भलतीच महाग पडली असती.
फुचिडाला ही चूक लक्षात येण्यास काही क्षण लागले असतील पण त्याची नजर आता खाली पसरलेल्या बेटांवर रोखली गेली. ते दृष्य बघून तो स्वत:वरच खूष झाला. खाली विमाने एका रांगेत खेळण्यासारखी लावून ठेवलेली दिसत होती. खाली कसलीच हालचाल दिसत नव्हती सगळे कसे शांत शांत होते. तेवढ्यात सूर्याची किरणे क्षितिजावर अवतरली. शुभाशुभावर विश्वास असणाऱ्या फुचिडाला हे शुभ लक्षण न वाटल्यास नवल. अर्थात पुढे काय होणार आहे याची बिचाऱ्याला कल्पना त्या वेळी असायचे कारण नव्हते.......
जपानच्या सर्व बाँबर (५१) व सर्व लढाऊ (४३) विमानांना हवाईची हवाईताकद नष्ट करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. एका क्षणात ही विमाने मूळ फॉरमेशनपासून वेगळी झाली आणि एकाच वेळी त्यांनी हिकॅम हवाईतळ, व्हीलर फिल्ड हवाईतळ व फोर्ड बेटावरील नॅव्हल एअर स्टेशनवर त्वेषाने हल्ले चढविले.
व्हिलर फिल्डवर अमेरिकेची अत्यंत भेदक अशी हवाई ताकद एकवटली होती. (फुचिडाला माहिती होती त्यापेक्षा दुप्पट विमाने तेथे होती). त्या हवाईतळाचा प्रमुख कर्नल विल्यम फ्लडने हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी अगोदरच मातीचे १० फूट उंचीचे १०० बंकर्स बांधले होते पण त्या दिवशी सकाळी त्याचे न ऐकता जनरल शॉर्टने ती विमाने बाहेर एका रांगेत कमीतकमी जागेत कोंबून ठेवली होती. त्याला बेटांवरील जपानी घातपाती कृत्यांची अत्यंत भीती वाटत असणार. ही सगळी विमाने एकत्र गोळा करुन त्यावर अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला होता. त्या पहाऱ्यात काही रणगाडेही सामील होते. या बाबतीत त्याला दोष द्यायचा का नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण जपानच्या घातपाती कृत्यांची धास्ती अमेरिकन सेनाधिकाऱ्यांनी त्या काळात घेतली होती हेही खरे आहे कारण ती त्याच तीव्रतेची असत.
सकाळी अंदाजे ८ वाजता २५ जपानी बाँबर विमानानी व्हीलर फिल्डवर घाला घातला. आपले बाँब खाली टाकल्यावर त्यांनी आपला मोर्चा तेथे उभ्या केलेल्या विमानांच्या रांगांकडे वळवला. मशिनगनच्या माऱ्याने त्यांनी त्या विमानांची चाळण उडवली. थोड्याच वेळात त्यांना या कामात झिरो विमानांचीही मदत मिळाली. हे करताना ते इतक्या खालून उडत होते की त्यांच्या चाकांना खांबावरच्या तारा गुंडाळल्या गेल्या.
जमिनीवरच नष्ट झालेली अमेरिकन विमाने........
एक विमान पेटले की तेथे आगीचा डोंब उसळत असे. त्या ज्वाळांचा स्पर्श शेजारच्या विमानाला झाला की त्याचीही तीच गत होत असे. थोड्याच वेळात त्या हँगरसमोरील जागेत ज्वालामुखी फुटला आहे असा भास व्हायला लागला. अमेरिकन वायुदलाचा प्रतिकार होवो अथवा न होवो, जपानी वैमानिकांनी त्यांची प्रत्येक हल्ल्याची फेरी ही त्याची शेवटची फेरी असेल असे गृहीतच धरले होते. ले. तामोत्सु एमा असाच एक २८ वर्षाचा तरुण वैमानिक होता, झुईकाकू विमानवाहू नौकेवर त्याची नेमणूक झाल्याझाल्या, आता आपली आपल्या बायकोची व मुलीची गाठ पडणार नाही हे ओळखून त्याने स्वत:चे मृत्युपत्र तयार केले होते. त्याची ही पहिलीच मोहीम होती व त्याची या हवाई युद्धाची कल्पना म्हणजे अमेरिकन विमानांशी आकाशात जोरदार मारामारी होणार, त्याच्या प्रशिक्षणाचा कस लागणार इ इ. अशी होती. प्रत्यक्षात जेव्हा त्याला कसलाही विरोध झाला नाहे तेव्हा त्याला धक्काच बसला. आकाशात शत्रूची विमाने नव्हती आणि खालूनही तोफांचा मारा नव्हता. त्याच्या तुकडीतील कित्येक विमानांनी परत परत त्या लक्ष्यावर फेऱ्या मारल्या पण त्यांपैकी एकही विमान पाडले गेले नाही. ‘मला तर माझ्या सरावाचीच आठवण झाली’.
धिप्पाड, रुबाबदार ब्रि. जनरल हॉवर्ड डेव्हिडसन १४व्या पर्सुट विंगचा प्रमुख होता. जेव्हा हल्ला सुरु झाला तेव्हा तो त्याच्या स्नानगृहात त्याच्या चेहऱ्याला दाढीचा साबण फासत होता. बाँबचा आवाज ऐकून तो तसाच बाहेर धावला. व्हिलर फिल्डचा विध्वंस पहात असताना, त्याच्या दोन मुली हिरवळीवर शांतपणे दोरीच्या उड्ड्या मारत असताना बघताच त्याच्या पोटात खड्डा पडला. त्यातील एक तर शांतपणे बॉंबचे तुकडे गोळा करत होती. त्यांना कसेबसे घरात कोंबून तो त्याच्या विमानांकडे धावला व तेथे त्याने उग्र स्वरुप धारण करुन प्रतिकारासाठी विमाने (शिल्लक असलेली) तयार करण्याचा आदेश दिले. चौकशी करणाऱ्या रॉबर्टसन समितीसमोर साक्ष देताना तो म्हणाला, ‘विमानांमधे आम्ही दारुगोळाच भरला नव्हता. ज्या हँगरमधे आम्ही दारुगोळा साठवला होता त्यालाच आग लागल्यामुळे ही उपलब्धही नव्हता.’ दारुगोळा नसताना ती विमाने उडविण्यातही तसा काही अर्थ नव्हताच म्हणा. या पहिल्याच हल्ल्यात वायुसैनिकांच्या बरॅक्सवरही बाँब पडले व कित्येक सैनिक जागेवरच ठार झाले तर अनेक जायबंदी झाले. अनेक रक्तबंबाळ सैनिक एकमेकांना सुरक्षित जागी जाण्यास मदत करताना दिसत होते. काही जण मधेच मरुन पडत होते. आरडाओरडा, किंकाळ्या, रक्ताचा वास (रक्तालाही एक प्रकारचा वास असतो), इतरस्त्र उडणारे बाँबचे छर्रे असा सगळा गोंधळ माजला होता.
व्हिलर फिल्डवर असे भीषण हल्ले चालू असताना आश्चर्यचकित झालेल्या अमेरिकन सैनिकांनी मोठ्या शौर्याने प्रतिकार केला, परंतु सगळी परिस्थितीच त्यांच्या विरुद्ध होती. चांगली विमाने बाजूला काढत असताना समुद्रातून काळ्या धुरांचे काळे ढग आकाशात चढत होते. त्यांच्यासमोर आता विमानांचे भंगार पडले होते. जपानी विमानांनी तीस टक्क्याहून विमाने नष्ट केली होती व उरलेली विमाने उडण्याच्या परिस्थितीत नव्हती.
जपानचे मित्सुबिशी बाँबर -
इकडे हिकॅम विमानतळावर काही वेगळे घडत नव्हते. तेथे ७० बाँबर विमाने अशीच एकत्र उभी केली गेली होती. त्यांचीही अशीच कत्तल झाली. या विमानांमधे प्रसिद्ध बी-१७ विमानेही होती. या विमानांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. ती इतकी अभेद्य होती की त्यांना ‘फ्लाईंग फोर्ट्रेस’ असे म्हणत. या विमानांचा धसका जपानी वैमानिकांनीही घेतला होता. (अर्थात या प्रकारची फक्त १२ विमाने तेथे होती.) ही विमानेही तेथेच दाटीवाटीने रांगेत लावलेली होती. त्या सकाळी कानठळ्या बसविणारा आवाज करत जपानी विमाने त्या आकाशात अवतरली आणि उत्तरेकडून त्यांनी हिकॅमवर हल्ला चढवला. क्षणात त्यांनी फॉर्मेशन सोडून आपापल्या लक्ष्यावर झेप घेतली.
हवाईच्या हवाईदलाचा प्रमुख मे. जनरल फ्रेडरिक मार्टीनने त्याचे मुख्यालय हिकॅमवर नुकतेच हलविले होते. त्याचा सैनिकात लोकप्रिय असणारा चीफ-ऑफ-स्टाफ मॉलिसन हल्ल्याच्या वेळी दाढी करत होता. आवाज ऐकताच त्याने घाईघाईने आपला गणवेष चढविला व तो त्याच्या कार्यालयात धावला. पोहोचल्या पोहोचल्या त्याने जनरल शॉर्टच्या चीफ-ऑफ-स्टाफला, कर्नल वॉल्टर फिलिप्सला दूरध्वनी केला व जपानने हिकॅमवर हल्ला केला ही कटू बातमी सांगितली. फिलिप्सचा अर्थातच त्या बातमीवर विश्वास बसला नाही.
‘काय झाले ? तुझे डोके ठिकाणावर आहे का ? रात्रीची अजून उतरली नाही का ? मॉलिसन जागा हो !’
मॉलिसनने चिडून त्याच्या टेलिफोनचा रिसिव्हर येणाऱ्या आवाजाच्या दिशेला धरला. ते आवाज ऐकल्यावर फिलिप्सची अखेरीस खात्री पटली.
‘ऐकू येतेय मला.’ तो इतका गोंधळून गेला होता की त्याच्या तोंडातून अत्यंत विनोदी वाक्य बाहेर पडले.
‘बर मी असे करतो की तुझ्याकडे माझा संपर्क आधिकारी पाठवतो’
मॉलिसनला काय बोलावे हे सुधरेना. तेवढ्यात त्याच क्षणी मॉलिसनच्या कार्यालयाचे छप्पर कोसळले व त्याचा मोठा आवाज फिलिप्सला दुसऱ्या टोकाला ऐकू गेला. जनरल मार्टीन मॉलिसननंतर १० मिनिटांनी मुख्यालयात पोहोचला व नेहमीप्रमाणे जिन्याच्या दिशेने जाऊ लागला. मॉलिसनने सगळे कार्यालय तोपर्यंत तळमजल्यावर हलविले होते.
‘जनरल वर जाऊ नका ! येथेच थांबलास तर तुला दोन मजल्याचे संरक्षण तरी लाभेल’ मार्टीनने त्यातील विनोद बाजूला ठेऊन मॉलिसनच्या टेबलाचा ताबा घेतला व काम चालू केले. मॉलिसनला त्याच्या जनरलची अत्यंत काळजी वाटत होती. त्याची तब्येतीची सदैव कुरकुर चालू असायची. आत्तासुद्धा त्याचा आतड्यातील एक व्रण उघडा पडून त्यातून आत रक्तस्त्राव होत होता. त्याचा पांढरा फटक पडलेला भकास चेहरा, या हल्ल्यामुळे होता की होणाऱ्या वेदनेमुळे हे सांगणे कठीण होते. पण शेवटी तो एक फौजी होता.
‘त्यांच्या विमानवाहू नौका कुठे आहेत ते प्रथम शोधले पाहिजे’ त्याने आदेश दिला. एक लक्षात घ्या की त्याने एकंदरीत हल्ला बघून नौकांच्या बाबतीत अनेकवचन वापरले होते. त्याला त्याचा अनुभव सांगत होता की त्याला एकापेक्षा जास्त विमानवाहू नौकांशी सामना करावा लागणार.
पुढे झालेल्या चौकशीत मार्टीनने सांगितले, ‘ मी ताबडतोब रेअर ॲडमिरल बेलिंगरला (नौदलाच्या विमानदलाचा प्रमुख) दूरध्वनी केला. तुम्हाला माहितीच असेल या प्रकारचा शोध घेण्याचे काम नौदलाचे असते. आवाज इतका भयंकर होता की आम्हाला आमचे बोलणे नीट ऐकू येत नव्हते. त्याने मला सांगितले की शत्रूच्या विमानवाहू नौकांचा शोध कुठल्या दिशेला घ्यायचा हेच कळत नाही आहे कारण विमाने सर्व दिशेने येत आहेत.’ अर्थात ते माहीत असते तरीही काही फरक पडला नसता कारण त्यांच्याकडे हे काम करण्यासाठी लागणारी विमानेच आता उपलब्ध नव्हती.
आठच महिन्यापूर्वी (३१ मार्च १९४१) त्या दोघांनी म्हणजे बेलिंगर व मार्टीन यांनी एक गोपनीय अहवाल वर पाठवला होता., त्यात त्यांनी जपान हवाईपासून ३०० मैलाच्या आत आपल्या विमानवाहू नौका उभ्या करुन पर्ल हार्बरवर हल्ला चढवू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर त्यांनीच एक उपायही सुचवला होता. त्यांच्या मते लांब पल्ल्याची विमाने वापरुन समुद्रात खोलवर टेहळणी केल्यास हा धोका टळू शकत होता. दुर्दैवाने त्यासाठी लागणाऱ्या विमानांची संख्या जास्त होती व जी काही थोडीफार होती ती या कामासाठी उपलब्धही करुन देण्यात आली नव्हती. हा अहवाल इतका अचूक होता की जणू काही त्या दोघांनी भविष्यच वर्तवले होते. त्यांचे नशीब की ते दोघे त्याच योजनेच्या तडाख्यात सापडले.
फोर्ड आयलंडवर ॲडमिरल बेलिंगरची टेहळणी करणारी फक्त दोन तीनच विमानेच उड्डाण करण्याच्या परिस्थितीत होती. तंत्रज्ञ जिवावर उदार हो़ऊन विमाने दुरुस्त करायची पराकाष्ठा करत होते पण त्यांच्या कामात नियमांचा व कार्यप्रणालीचा प्रचंड अडथळा येत होता.
या बाबतीत कमांडर रॅमसेने त्याच्या आठवणीत सांगितले, ‘एक जुने खोड जेथे विमानांचे सुटे भाग ठेवले होते तेथे कार्यरत होते. अनेक वर्षांच्या सवयी जाता जात नाहीत.’ जेव्हा तंत्रज्ञ सुटे भाग आणायला तेथे गेले तेव्हा या पठ्ठ्याने अगोदर सही घेऊन या तरच देता येतील असे सांगितले. प्रकरण इतके चिघळले की ॲडमिरल स्वत: तेथे बंदुकीला संगिनी लावलेले मरीन्स घेऊन गेला व बंदुकीच्या धाकाने त्याने तेथील सामान उचलले.’
अर्थात अशी उदाहरणे फारच विरळ होती. जवळजवळ सगळ्यांनीच प्रसंग ओळखून या आपत्तीला तोंड दिले. मॉलिसनला हिकॅम हवाईतळावर एक अनुभवी वैमानिक माहिती होता. हा माणूस दारुमुळे विमान उडावायला वैद्यकिय कारणांमुळे अपात्र ठरला होता. तो किरकोळ कामे करायचा. या पठ्ठयाने कुठूनतरी एक मशिनगन मिळवली व येणाऱ्या जपानी विमानांवर फैरी झाडायला सुरवात केली. शेवटी त्याने त्याच्या खांद्यावरुन फैरी झाडताना मॉलिसनने स्वत: पाहिले. थोड्याच वेळात हा वैमानिक ठार झाला. पण हिकॅमवर असलेल्या अनेक माणसांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली व त्याचा मृत्यु सगळ्यांनाच चटका लावून गेला.
हल्ला होण्याआधी काहीच मिनिटे कॅप्टन ब्रूक ॲलनला त्याच्या बायकोचा फोन आला. पॅसिफिक वातावरण निवळले का ? ती तिकडे येऊ शकते का हे विचारण्यासाठी बिचारीने तो फोन केला होता. ब्रूक स्वत: हिकॅमवरील एका बाँबिंग स्क्वाड्रनचा प्रमुख होता. त्याची पत्नी सहा महिन्याची गर्भार होती त्यामुळे त्याने तिला आत्ताच न येण्याचे सुचविले व लवकरच तो तिची इकडे यायची सोय करेल असे वचनही त्याने शेवटी दिले. त्याने तो रिसिव्हर खाली ठेवला आणि स्फोटाचा पहिला आवाज झाला. हा जपानचा हल्ला असणार हे उमजून त्याने प्रथम त्याचे बी-१७ हवेत उडविण्याचा निर्धार केला. त्याला जपानी वैमानिकांचा समाचार घ्यायचा होता. त्याने धावपट्टीवर धाव घेतली तेव्हा जपानी विमानांनी तेथे हैदोस मांडला होता. पहिला बाँब पडला तोच दुरुस्तीच्या हँगरवर. दुसऱ्याने पुरवठा केंद्र उध्वस्त केले. त्या इमारतीतील खिळे, नटबोल्ट इ. सामान हवेत बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे उडत होते. व्हीलर फिल्डवर झाले त्याप्रमाणे येथेही सामान्य सैनिकांची अपरिमीत हानी झाली. त्यांची न्याहारीची वेळ असल्यामुळे अनेकजण टेबलावर बसले होते. तेथेच बाँब पडाल्यामुळे अनेकजण जागेवरच ठार झाले. त्या इमारतीतून रक्तबंबाळ सैनिक खुरडत बाहेर येताना त्याला पाहवत नव्हते. भांबावून ते एकमेकांना हे काय चालले आहे हे विचारत होते, शिव्याशाप देत होते. त्यातील कित्येकांना हे काय झाले हे कधीच समजणार नव्हते कारण आता त्यांच्या वर आकाशातून मशिनगनचा मारा होणार होता.
काही बाँब पाणी पुरवठा केंद्राच्या पाईपवर पडले. आगीचा हा ज्वालामुखी विझवण्याची आशा आता मावळत चालली होती. ॲलन जेव्हा तळावर पोहोचल तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एका मागून एक विमाने आगीच्या भक्षस्थानी पडत होती. या सगळ्या गोंधळातच ॲलनने एका बी-१७ च्या कॉकपीटमधे उडी मारली व ते विमान उडावयचा प्रयत्न केला. त्याने तीन इंजिने सुरु करण्यात यश मिळवले पण चौथे काही केल्या चालू होत नव्हते. त्याने तो नाद सोडून ते विमान आगीपासून वाचविण्यासाठी दूर नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जपानी झिरो खाली झेपावली व त्यांनी आपल्या मशिनगनन चालू केल्यामुळे त्याला त्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. हे सगळे होत असताना पाहिलेले एक दृष्य मात्र ॲलनच्या स्मरणातून कधीच गेले नाही. एक वायुसैनिक एका उभ्या असलेल्या विमानातून येणाऱ्या जपानी विमानांवर दातओठ खात मशिनगन चालवत होता. मशिनगन चालवत असताना त्या विमानाला आग लागली आहे हेही त्याच्या लक्षात नव्हते. या शूर सैनिकाचे नाव कॅप्टन ॲलनला कधीच कळाले नाही. तो ठार झाला का जिवंत आहे हेही त्याला कधीच कळले नाही.
इकडे अमेरिकेहून फिलिपाईन्सकडे निघालेली १२ बी-१७ विमाने हिकॅमवर इंधन भरण्यासाठी थांबणार होती, ती आकाशात अवतरली आणि या लढाईत सापडली. या विमानांच्या ताफ्यामुळे अगोदरच एक घोळ झाला होता. जपानचा हल्ला होण्याआधी एक तास जोसेफ लॉकार्ड व जॉर्ज इलिअट या दोन रडारवर काम करणाऱ्या सैनिकांना जपानी विमाने दिसली होती.
इलिअट
त्यांचे रडार होते काहूका पॉईंटवर. ही जागा ओहाअ बेटाच्या उत्तर टोकावर आहे. त्या रडारवर काम करताना त्यांना अचानक प्रखर ठिपक्यांची रांग रडारवरच्या पडद्यावर दिसू लागली. ती इतकी तीव्र होती की लॉकार्डला वाटले की रडारमधे काही गडबड आहे. त्याने प्रणालीप्रमाणे ते तपासलेही पण त्यात त्याला काही दोष आढळला नाही. शेवटी ही उडणारी विमाने असतील हे ठरवून त्याने इलिअटला त्या वस्तूंच्या प्रवासाचे आलेखन करायला सांगितले. ‘आम्ही ते काम ती विमाने १३६ मैलांवर असताना चालू केले. जेव्हा ती १३२ मैलांवर पोहोचली तेव्हा मात्र आम्ही माहितीकेंद्राला दूरध्वनी केला.
त्यांचा हा फोन घेतला ले. कर्मीट टायलरने !.
‘ठीक आहे. त्याची काळजी करु नका.’ त्याला काही अमेरिकन विमाने त्या दिशेने यणार आहेत याची कल्पना होती. त्याने अर्थातच असा अंदाज बांधला की रडारवर दिसाणारी ती विमाने हीच असावीत. या केलेल्या अंदाजाने ले. टायलर आयुष्यभर शांत झोपू शकला नाही.
टायलर
त्यावेळी ७ वाजून १५ मिनिटे झाली होती म्हणजे फुचिडाला पर्ल हार्बरवर पोहोचायला अजून ४५ मिनिटे होती. पर्ल हार्बरला फुचिडाचा प्रतिकार करता येणे अजूनही शक्य होते. अमेरिकन विमाने आकाशात उडूही शकली असती व नौकाही सुरु हो़ऊ शकल्या असत्या. या रडारच्या संदेशावर जर लक्ष दिले गेले असते तर काहीही होणे शक्य होते. (काही तज्ञांचे म्हणणे असे आहे की ही विमाने जपानची आहेत हे कळाले असते तरी काही फायदा झाला नसता).
असो. आत्तातरी तो बारा विमानांचा ताफा मे. ट्रूमन लॅन्डनच्या नेतृत्वाखाली पर्ल हार्बरच्या त्या धगधगत्या युद्धकुंडात प्रवेश करणार होता. १४ तासाचा अत्यंत रटाळ व कंटाळवाणा पण अवघड अशा प्रवासाच्या अंतीम चरणात ते आले होते. काही विमानांचे इंधन धोक्याच्या पातळीवर आले होते. ती सगळी विमाने एकत्र उडत नव्हती. सगळ्या विमानांच्या तोफा कॉस्मोलिनमधे माखलेल्या होत्या. (गंजप्रतिरोधक ग्रिज सारखे एक वंगण). ढगांचे आवरण फोडून ओहाअवर उतरण्यासाठी ही विमाने खाली आली आणि त्यांना ६ ते ९ जपानी विमानांनी दक्षिणेतून त्यांना गाठले. लॅन्डनला वाटले अमेरिकन विमाने त्यांच्या स्वागतासाठी आली आहेत. तसे तो त्याच्या मायक्रोफोनवर बोललाही. हा विचार त्याने बोलून दाखविला आणि त्याच क्षणी त्याच्यावर मशिनगनमधून गोळ्यांचा वर्षाव झाला. तेवढ्यात त्या वैमानिकांना त्या विमानांवरचा उगवता सूर्य दिसला आणि त्यांना उमगले की हा काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे. लॅन्डन वैतागून म्हणाला, ‘ साले हे तर जपानी आहेत !’
लॅन्डनने ताबडतोब त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी एक तीव्र वळण घेतले. त्याच्या नशीबाने तो परत ढगात घुसल्यामुळे जपानी वैमानिकांना तो दिसला नाही. थोड्याच वेळात त्याचे विमान ओहाअ बेंटावर आले. खाली हिकॅम विमानतळ धुराने वेढला होता व मधूनच ज्वाळा त्या ढगातून बाहेर झेपावत होत्या. त्याने कंट्रोल टॉवरला उतरण्याचा संदेश पाठवला आणि त्याने ६००० फूटांवरुन खाली येण्यासाठी शेवटचा वळसा मारायला सुरवात केली. कंट्रोल टॉवरकडून उत्तर आले ‘तुझ्या मागावर तीन जपानी विमाने आहेत.....‘ लॅन्डनने मागे बघितले तर खरोखरीच तीन विमाने त्याच्या मागे शिकारी कुत्र्यासारखी लागली होती. यातच भरीस भर म्हणून खालून अमेरिकेच्या विमानविरोधी तोफाही गर्जत होत्या. त्याने झटक्यात निर्णय घेऊन विमान खाली घेण्यास सुरुवात केली......
अमेरिकेच्या या १२ बी-१७ वैमानिकांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी त्यांची विमाने अखेरीस जमिनीवर उतरवली. एक बेलोवर उतरले तर एक हालेवियावर व इतर लॅन्डनसारखी सरळ हिकॅमच्या ज्वालामुखीत उतरली...
हल्ल्याची पहिली फेरी झाल्यावर त्या आकाशात आता थोडी शांतता पसरली. जपानी विमानांच्या फेऱ्या कमी झाल्या व ते त्यांच्या जहाजांवर परतायला लागले. परत जातांनाही आर्थात त्यांनी त्यांच्या विमानवाहूनौकांचा पत्ता लागू नये म्हणून पुरेपुर काळजी घेतली होतीच. त्यांनी आता फॉर्मेशनमधे न उडता परतीची वाट धरली. वेगवेगळ्या दिशांना उडत त्यांनी शेवटी ओहाअच्या वायव्य दिशेला २० मैलावर भेटायचे ठरवले होते. अगोदर पोहोचलेली बॉंबर विमाने तेथेच आकाशात घिरट्या घालत होती कारण त्यांना त्यांच्या लढाऊ विमानांना बरोबर परत घेऊन जायचे होते. (या लढाऊ विमानांची दिशा मार्गदर्शक यंत्रणा विशेष चांगली नसल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली होती.) समजा अमेरिकन विमानांनी त्यांचा पाठलाग केला असता तर त्यांचा ‘कात्रज‘ करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर योजना आखल्या होत्या.
ले. सादाओ यामामोटो म्हणतो, ‘आम्ही पश्चिमेला ३० मैल गेलो व तेथून परत उत्तरेकडे गेलो. मला तर आम्ही चुकलो की काय अशी भीती वाटत होती.’ सोर्यूवरच्या टोरपेडो विमानाचा वैमानिक म्हणाला, ‘आमच्या नौकांची जाग गुप्त राहण्यासाठी आम्हाला दक्षिणेकडे (बोटीच्या विरुद्ध दिशेला) जाऊन मग परत वळण्याचे आदेश होते.’
टॉरपॅडो विमानांनी प्रथम युद्धभूमी सोडली. त्यांचे टॉरपेडो टाकण्याचे काम झाल्यावर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लढाऊ विमानांची नेमणूक केली गेली होती. निसर्गानेही टोरपेडो विमानांना या हल्ल्यादरम्यान चांगलीच साथ दिली होती. वारे पूर्वे\कडे वहात होते व त्यामुळे धूर त्यांच्या विमानांपासून दूर जात होता. त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांची लक्ष्ये स्पष्ट दिसत होती. हे वारे जर उलटे वहात असते तर त्यांच्या समोर ते धुराचे ढग आले असते व त्यांना खालचे काही दिसू शकले नसते.
जपानच्या डाईव्ह बाँबर विमानांनीही चांगली कामगिरी बजाविली. ८ वाजून १० मिनिटांनी त्या विमानांचा प्रमुख कमांडर काकुइची ताकाहाशी याने त्याच्या विमानातून संदेश प्रसारित केला, ‘फोर्ड आयलंड, हिकॅम व व्हीलरवर बॉंबिंग यशस्वी. शत्रूचे मजबूत नुकसान झालेले आहे.’ त्याचे फकत एकच विमान नष्ट झाले होते. लढाऊ विमानांपैकी फक्त तीन विमाने धारातिर्थी पडली. या नुकसानीच्या तुलनेत त्यांनी शत्रूचे जे नुकसान केले होते ते अतीभयंकर होते. बेलोज हवाईपट्टीवर तर उडण्यासाठी विमान धावू लागले की झिरो त्यांना नष्ट करत.
फुचिडाने स्वत: उंचावरुन बाँबिंग करणाऱ्या विमानांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्याच्या वैमानिकांकडून त्याने जरा जास्तच सराव करुन घेतला असणार. प्रत्येक विमानात लक्ष्यावर टाकायला फक्त एकच बाँब होता व तो कुठल्याही परिस्थितीत लक्ष्यावरच पडला पाहिजे अशी त्याची सक्त ताकीद होती. मग त्या लक्ष्यावरुन कितीही फेऱ्या मारावयास लागल्या तरी चालतील असा त्याचा स्पष्ट आदेश होता. ‘एकही बाँब वाया जाता कामा नये‘ त्याने त्याच्या वैमानिकांना बजावून सांगितले होते. त्याच्या वैमानिकांनी त्याची आज्ञा तंतोतंत पाळळी. स्वत: फुचिडाने कॅलिफोर्निया नावाच्या नौकेवर तीन फेऱ्या मारल्या व शेवटी बॉंब टाकला.
बाकिच्या वैमानिकांनी परतीचा रस्ता धरला पण फुचिडा मात्र त्या युद्धभूमीवर घिरट्या घालत जपानी विमानदलाने शत्रूच्या केलेल्या नुकसानीचा अंदाज घेत होता कारण त्याच्यावर अहवाल सादर करण्याची जबाबदारी होती. पहिल्या हल्ल्याची तीव्रता जरा ओसरल्यावर खालून होणारा विमानभेदी तोफांचा मारा अत्यंत तीव्र झाला. धुराच्या ढगामुळे खाली फार स्वच्छ दिसत नव्हते. त्याने तरीही महत्वाच्या बाबींची नोंद केली. काय दिसले त्याला –
टॉरपेडो आणि बाँबनी त्या बंदराचे एका मोठ्या शवगृहात रुपांतर केले होते. सगळीकडे प्रेते विखरुन पडली होती. माणसे सैरावैरा धावत साखळ्यांवरुन खाली उतरायचा प्रयत्न करत होती. काही जण पाण्यात उड्या मारुन किनाऱ्यावर पोहोचायचा प्रयत्न करत होती. सगळ्या दिशांनी वेढणाऱ्या ज्वालापासून ते स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यात उड्या मारलेले सैनिक तेलाच्या तवंगात गुदमरु नये म्हणून निकराचा प्रयत्न करत होते. जवळ जवळ सगळ्या नौका बुडत होत्या किंवा आगीने वेढल्या गेल्या होत्या. ८ वाजून ५५ मिनिटांनी फुचिडाला दुसऱ्या हवाई हल्ल्यासाठी विमाने उडणार आहेत असा संदेश मिळाला. तो हल्ला ओहाअ बंदराच्या पूर्व भागात होणार होता. तेवढ्यात त्याला फोर्ड आयलंडवर त्याची दुसरा हल्ला करणारी विमाने दिसली. त्याला त्यांचेही नेतृत्व करण्याचा मोह झाला पण त्याची आवश्यकता नव्हती. जेव्हा फुचिडा परत फिरला तेव्हा त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती पण त्याला जपानच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. त्याने झोपलेल्या एका महाशक्तीला जागे केले होते व जपानचे भविष्य आता या राक्षसी ताकदीच्या मर्जीनुसार बदलणार होते व तसे ते बदललेही.
हल्ल्याची पहिली फेरी संपून अर्धा तास संपतोय ना संपतोय तोच दुसऱ्या हल्ल्याची विमाने त्या आकाशात अवतरली. या अर्ध्या तासात आमेरिकन फौजांना त्याच्या धावपट्ट्या साफ करायच्या होत्या, दुरुस्त करायच्या होत्या व येणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायची तयारी करायची होती. तो आता कुठल्याही क्षणात कोसळायची शक्यता होती. आख्ख्या पर्ल हार्बरवर एकच गडबड उडाली. मुंग्या ज्या प्रमाण वारुळात काम करतात त्याच प्रमाणे सर्व धट्टीकट्टी माणसे कुठल्या ना कुठल्यातरी कामाला जुंपली गेली. ही धडपड थांबली जेव्हा १७० जपानी विमानांनी हल्ला चढविला तेव्हा. ओहाअवर परत तेच नाट्य रंगू लागले. विमानांचे कर्णकर्कश आवाज, कानठळ्या बसविणारे बाँबचे आवाज, आग, जखमी सैनिकांचे विव्हळणे, गोंधळ, रक्तपात, विमानभेदी तोफांच्या गर्जना, सु...सु आवाज करत जाणारे लोखंडाचे तुकडे, पत्याचे बंगले कोसळावेत तशा कोसळणाऱ्या इमारती, आक्रोश.............तेच ! परत परत तेच !
पहिला हल्ला व दुसरा हल्ला..........
या दुसऱ्या हल्ल्यांनाही अमेरिकन सैनिकांनी मोठ्या शौर्याने तोंड दिले. एकही गोष्ट आज त्यांच्या बाजूने नव्हती तरीही त्यांनी धीर सोडला नव्हता. पण आता ते पहिल्या धक्क्यातून सावरले. आश्चर्याच्या धक्क्याचा फायदा जो पहिल्या हल्ल्याच्या जपानी वैमानिकांना झाला तो आता दुसऱ्या फेरीच्या वैमानिकांना होत नव्हता. त्याचे चटके आता त्यांना जाणवायला लागले. विमानविरोधी तोफा आता बऱ्याच अचूक मारा करायला लागल्या होत्या. शिवाय काळ्याकुट्ट जाड धूरामुळे त्यांना आता खालचे दिसणेही कठीण जात होते.
२८ वर्षाचा ले. फुसाटा इडा एक लढाऊ विमानाचा वैमानिक होता. तो सोर्यूवरील तिसऱ्या एअर कंट्रोल ग्रुपचे नेतृत्व करत होता. बुटका पण रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला हा वैमानिक खुशालचेंडू वृत्तीचा होता. दारु म्हणजे त्याची आवडती बाब ! हाही चीनच्या युद्धात चांगलाच अनुभव घेऊन आला होता. त्याच्या दुर्दैवाने जेव्हा त्याने त्या दिवशी सकाळी सोर्युवरुन उड्डाण केले तेव्हा त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या आयुष्यातील तो शेवटचा सूर्योदय ठरणार होता. खर म्हटले तर त्याच्या आयुष्याचा आता फक्त एकच तास राहिला होता. कनेहोएच्या विमानतळावर त्याच्या विमानाला तोफेच्या गोळ्याचा तुकडा लागला. त्या तुकड्याने त्याच्या विमानाच्या इंधनटाकीला भोक पाडले व त्यातून इंधनाच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्याच्या विमानाची उंची झपाट्याने कमी हो़ऊ लागल्यावर त्याला निश्चितच त्याने सकाळीच जे त्याच्या सैनिकांना सांगितले ते वाक्य आठवले असणार. तो म्हणाला होता, ‘खरा सामुराई शेवटच्या क्षणी काय करतो हे महत्वाचे असते. समजा हल्लादरम्यान माझ्या विमानाच्या टाकीला भोक पडले तर मी क्षणाचाही विचार न करता शत्रूवर जाऊन धडकेन.’
सच्च्या सामुराईला शोभेल असा निर्णय त्याने त्या दिवशी सकाळी घेतला. इडाने त्याच्या सहकाऱ्यांना विमानांचे फॉर्मेशन सोडण्याचा इशारा केला व त्याचा इरादा स्पष्ट केला. दुसऱ्याच क्षणी त्याचे विमान खालच्या आगीच्या लोळात नाहीसे झाले. ले. इयोझो फुजिटा म्हणतो, ‘त्याला मी शेवटचे पाहिले तेव्हा त्याने खाली सूर मारण्यास सुरवात केली होती. थोड्याच क्षणात त्याचे विमान कनेहोएच्या एका हँगरवर जाऊन आदळले’.
हा त्याग करणारा इडा काही एकमेव वैमानिक नव्हता. हिकॅमवर अशाच दोन वैमानिकांनी हाराकिरी केली होती. पुढे होणाऱ्या कामिकाझे हल्ल्याचा हा पायाच होता असे म्हणावे लागेल..........
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
1 Jun 2013 - 8:28 am | प्रचेतस
युद्धस्य कथा रम्यः म्हणतात ते चुकीचेच, किती भीषण संहार आहे हा.
1 Jun 2013 - 8:40 am | मराठीप्रेमी
तुमच्या सर्वच लेखमाला अत्यंत वाचनीय असतात. या सगळ्या जग बदलवून टाकणार्या घटना आमच्यापर्यंत मराठीत पोहोचवत आहात याबद्दल धन्यवाद.
1 Jun 2013 - 10:02 am | सुहास झेले
भारीच....सगळं कसं डोळ्यासमोर घडतंय असं वाटतंय. अर्थात तुमची जबरदस्त आणि अद्भूत लिखाणशैली त्यासाठी कारणीभूत आहे हेवेसांनल..
पुढचा भाग लवकर येऊ द्यात :)
1 Jun 2013 - 10:51 am | जेपी
तपशीलवार लिखाण वाचतान पापणीही लवत नाही
1 Jun 2013 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर प्रवाही लिखाणाने युद्धाचे भिषण प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले !
पुढचा भाग लवकर टाका.
1 Jun 2013 - 4:12 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
1 Jun 2013 - 4:53 pm | बाबा पाटील
आता अमिरिकेने केलेल्या प्रतिकाराचा,अणुहल्याचा भाग लवकर टाका,वाट पाहतो आहे.
1 Jun 2013 - 5:41 pm | जयंत कुलकर्णी
त्याच्या आधी मिडवेच्या युद्धाबद्दल लिहावे लागेल............:-)
2 Jun 2013 - 3:09 pm | मुक्त विहारि
झाला आहे..
14 Jun 2013 - 7:34 pm | नितिन महाजन
photo disat nahi aahet.