युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग २
युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग ३
टोरा ! टोरा ! टोरा ! अर्थात पर्ल हार्बर-४
१९४१ मधे २४ जानेवारीला अमेरिकन नौदलाचा सचीव फ्रँक नॉक्सने अमेरिकेच्या युद्धसचीवाला म्हणजे हेन्री स्टिमसनला एका कार्यालयीन अहवालात स्पष्टच लिहिले होते, ‘जर जपान व अमेरिकेमधे युद्ध पेटले तर त्याची सुरुवात आपल्या पर्लहार्बर येथील आरमारावरील हल्ल्याने होण्याची शक्यता आहे.’
तीनच दिवसांनी अमेरिकेच्या जपानमधील राजदूताने सांकेतिक भाषेत लिहिलेला एक संदेश अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटला पाठविला. (याच वेळी यामामोटोने त्याची योजना ओनिशीला पत्रात लिहिली होती) त्यात जोसेफ ग्रू म्हणतो ‘ माझ्या कार्यालयात काम करत असलेल्या एका पेरुवंशाच्या कर्मचाऱ्याने जर युद्ध सुरु झाले तर पर्ल हार्बरवर हल्ल्याची योजना जपानमधे तयार होत असल्याची बातमी आणली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला हीच बातमी अनेक स्त्रोतांकडून मिळाली आहे म्हणून महत्वाची वाटते.’
अमेरिकेतील परराष्ट्रखात्याने ही बातमी नौदलाला पाठविली व नौदलाने ॲडमिरल किमेलला पाठविली. ॲडमिरल किमेल हा त्यावेळी अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचा कमांडर-इन-चीफ होता. या पत्रात नौदलाच्या मुख्यालयाने एक टिप्पणीही केली होती (या मुळेच घात झाला असे म्हणायला हरकत नाही) – ‘नौदलाच्या हेरखात्याला या बातमीविषयी खात्री देता येत नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार व जपानच्या नौदलाची आरमारांची सध्याची जागा पाहता नजिकच्या भविष्यात असे काही हो़ऊ शकेल असे वाटत नाही.’
१५ जानेवारीला ॲडमिरल किमेलने त्याच्या एका गोपनीय पत्रव्यवहारात असे युद्ध सुरु झाले तर पर्ल हार्बरवर अचानक हल्ला होण्याची शक्यता दाट असल्याची शंका उपस्थित केली होती. हीच शक्यता १९४१ मधे तयार झालेल्या दोन अहवालातही व्यक्त करण्यात आली होती. त्यातील एक होता ‘‘हवाईमधील हवाईदल’’ व हा लिहिला होता अमेरिकेच्या हवाई एअर फोर्सच्या पाचव्या बॉंबिंग ग्रुपचा कमांडर कर्नल विल्यम फार्दिंग याने. नौदलाच्या मुख्यालयात ऑगस्टमधे पोहोचलेल्या या अहवालात फार्दिंगने स्पष्टच लिहिले होते की जपान सहा विमानवाहूनौकांच्या सहाय्याने असा हल्ला पर्ल हार्बरवर चढवू शकते. या हल्ल्याची वेळ पहाटेची असेल आणि हा उत्तरेकडून होईल. जणू काही भविष्यच सांगितले होते त्याने !
असा हल्ला टाळायचा असल्यास काय करावे लागेल हेही त्याने लिहिले होते. (लष्करी अहवालात प्रश्न व त्याची उत्तरे दोन्ही द्यावी लागतात) तो म्हणतो, ‘अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी हवाई बेटांच्या आकाशात ३६० कोनात टेहळणी करावी. व ती दिवसा तसेच रात्रीही करावी. या टेहळणीसाठी बी-१७ सारखी (चार इंजिने असलेली) लांब पल्ल्याची १८० विमाने लागतील. ही सूचना जर अमलात आणली गेली असती तर यामामोटोचे आरमार हेच सावज झाले असते व अमेरिकेने त्याचा फडशा पाडला असता. दुर्दैवाने त्यावेळी हवाईमधे १८० बी-१७ विमाने नव्हती. व जी काही होती ती फिलिपाईन्समधे तैनात होती. ७ डिसेंबरला तर पर्ल हार्बर येथे फक्त १२ बी-१७ विमाने होती.
१९४०च्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या सांकेतिक भाषातज्ञांनी जपानच्या राजदूतावासांमधे चालणाऱ्या संदेश दळणवळणाची सांकेतिक भाषा फोडली.
यात मुख्य भूमिका बजावली होती जोसेफ रॉशफोर्ट याने - खालील चित्र
गुप्तहेरकारवायांमधील ही एक महत्वाची घटना मानली जाते. योशिकावाने पाठविलेली माहिती व त्याला येणाऱ्या सूचना, जपानच्या मुख्य बेटावरून अमेरिकेच्या राजदूतामधे होणारी संदेशांची देवाणघेवाण, हे सर्व आता अमेरिकेच्या हातात पडू लागले. या माहितीचा ओघ इतका प्रचंड होता की त्याकडे दुर्लक्ष हो़ऊ लागले. कधी कधी तर सात सात दिवस ते संदेश तसेच उकल न होता पडून राहू लागले. काही अधिकारी या यशामुळे फारच हुरळून गेले होते. जपान सरकारची सांकेतिक भाषा फुटली आहे हे जपानला कळू नये म्हणून इतकी काळजी घेतली जाऊ लागली की ज्यांच्यासाठी ती होती त्यांनाही ती नाकारण्यात आली. उदा. ॲडमिरल किमेलला सांकेतीक भाषेची उकल झाली आहे हेच माहीत नव्हते व त्यातून मिळालेली माहीती त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती.
अमेरिका व जपानचे संबंध अनेक स्तरांवर अनेक गोष्टींवर अवलंबून होते. त्यातील एक महत्वाची गोष्ट होती अमेरिकन जनतेचे असलेले जपानी जनतेबद्दल प्रचंड गैरसमज. त्यांचा असा समज होता की ‘जपानी म्हणजे दात पुढे असलेले, गोल भिगांचे चष्मे घालणारे, बुटके व बेंगरुळ रुप असलेले विनोदी लोक होते. ते कामसू होते पण कल्पनादारिद्र्य असलेले होते म्हणूनच ते अमेरिकन वस्तूंची नक्कल करण्यात धन्यता मानतात. काही अती शहाणे स्वयंघोषित तज्ञ तर म्हणत की जपानी माणसांच्या बारीक मिचमिच्या डोळ्यांमुळे ते चांगले वैमानिक हो़ऊ शकत नाहीत. (कारण काय तर म्हणे त्यामुळे त्यांना फार लांबचे दिसत नाही). १९३० साली अमेरिकेच्या दुतावासातील एका अहवालात लिहिले होते, ‘जपानी जनतेच्या कानामागे असलेल्या गायरोस्कोपमधे काहीतरी अनुवंशिक दोष आहे ज्यामुळे त्यांना तोल सावरायला अवघड जाते’.
अनेक गैरसमजापोटी अमेरिकेच्या सेनाधिकाऱ्यांमधे एक प्रकारचा अहंगंड निर्माण झाला होता उदा. जपान हा एक कागदी वाघ आहे, त्यांची युद्धसामुग्री जुनाट आहे. त्यांच्या विमानवाहूनौका अवजड व कमी प्रतिच्या आहेत. त्यांच्या विमानदलात जुन्या व नव्या विमानांची सरमिसळ आहे. युद्धाचा प्रसंग ओढविल्यास एखादे काचेचे भांडे फुटावे तसे या साम्राज्याचे तुकडे होतील. जपानमधील कागद व लाकूड वापरुन उभी राहिलेली शहरे ही तर एखाद्या बाँबिंगमधे कापराप्रमाणे भुरभुर जळतील ( अर्थात ती तशी जळाली त्यामुळे हा गैरसमज म्हणता येणार नाही) जपानची अर्थव्यवस्था ही चीनवर अवलंबून आहे तिने अमेरिकेला आव्हान देणे आत्मघातकी ठरेल. एक ना दोन !
या सगळ्या भ्रामक समजुतींमुळे अमेरिकेचा पर्ल हार्बरचा नौदलतळ एकदम सुरक्षित आहे यावर सगळ्यांचे एकमत होते.. पर्ल हार्बरवरील हल्ल्याआधी फक्त नऊ महिने अमेरिकेच्या नौदलाच्या सचिवाने त्याच्या अहवालात लिहिले होते. ‘या भूतलावर सगळ्यात सुरक्षित, उत्कृष्ट असा आरमारी तळ म्हणूम पर्ल हार्बरकडे बोट दाखवता येईल. त्याच्या इतकी अभेद्य संरक्षण व्यवस्था कुठल्याही तळाला लाभलेली नाही’. क्लार्क बिचसारख्या वार्ताहराने ६ सप्टेंबरला लिहिले, ‘पर्ल हार्बरवर जपानच्या हल्ल्याची शक्यता ही लाखात एक या प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ नाहीच.’ उथळ पाण्याला खळखळाट फार या उक्तीला अनुसरुन बढाया मारल्या जात होत्या, ‘ अभेद्य पर्ल हार्बर ! पॅसिफिकचा जिब्राल्टर !’
हा दृष्टीकोन स्वीकारल्यामुळे जो भ्रम निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी पर्ल हार्बरकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांना अटलांटिककडे जास्त लक्ष द्यावे लागत होते हेही खरे. विशेषत: एका जर्मन पाणबुडीने अमेरिकेची युद्धनौका बुडविल्यावर अमेरिकेतील वर्तमानपत्राचे रकाने अटलांटिकच्या बातम्यांनी भरुन गेले. अटलांटिकच्या युद्धाकडे लक्ष व पॅसिफिककडे दुर्लक्ष हे धोरण ७ डिसेंबर पर्यंत म्हणजे पर्ल हार्बरवरील हल्ल्यापर्यंत चालूच होते. सप्टेंबरमधे ॲडमिरल किमेलने अमेरिकेच्या चीफ नॅव्हल ऑपरेशन्स, ॲडमिरल स्टार्कला लिहिले, ‘पॅसिफिककडे लक्ष द्यायला पाहिजे. सध्याच्या युद्धभूमीचा तो एक विभाग आहे हे विसरता कामा नये.’ यावर स्टार्कने उत्तर दिले, ‘मला व्यक्तिश: असे वाटते आहे की जपानी जहाजे आपल्या हद्दीत शिरणार नाहीत.’’ अटलांटिकडे लक्ष देताना आपला मागचा दरवाजा उघडा आहे याचे भान अमेरिकेला राहिले नव्हते हेच खरे !
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कमांडर गेंडाने फर्स्ट एअर फ्लीटच्या वैमानिकांचे या हल्ल्यासाठी प्रशिक्षण चालू केले. हे काम अत्यंत अवघड होते कारण या काळात वैमानिकांना हे प्रशिक्षण कशासाठी चालले आहे याची कल्पना देण्यात आली नव्हती. त्याहून अवघड होते ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची विमाने एका ताफ्यात (फॉर्मेशन) उडवायची होती. उदा. एकाच ताफ्यात उंचीवरुन टोरपेडो टाकणारी विमाने, लढाऊ विमाने, सूर मारुन बाँबिंग करणारी विमाने उडणार होती. या सर्व विमानांची तांत्रिक मोजमापे वेगवेगळी होती. हा असा ताफा उडवणे फार म्हणजे फार धोक्याचे असते व त्यासाठी फार काळजीपूर्वक आखणी करावी लागते. बरे या ताफ्यात ४०/५० विमाने असणार नव्हती तर शेकड्याने असणार होती. याची तयारी करण्यासाठी वेळ कमी होता. अशा ताफ्याचे नेतृत्व करण्यासाठी ज्याची निवड होणार होती त्याचे विमान चालविण्याचे कौशल्य अचाट लागणार होते तसेच तो शांत, धिरोदत्त स्वभावाचा पाहिजे होता. त्याचे नेतृत्वाचे गूण इतरांपेक्षा सरस हवे होते. गेंडाला अर्थातच असा आधिकारी माहीत होता, ‘कमांडर मित्सुओ फुचिडा.’
फुचिडाचे गेंडासारखे नव्हते. तो वयाच्या ३९व्या वर्षीसुद्धा विमाने उडवीत होता. त्याच्यामागे ३००० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्याच्या शरिराचा एक भाग असल्यासारखा त्याचा विमानावर ताबा असायचा. चीनच्या युद्धात त्याने भाग घेतला होता व तो जपानच्या नौदलातील सगळ्यात कष्टाळू व हुशार वैमानिक म्हणून ओळखला जात असे. गेंडाने त्याला जेव्हा पर्ल हार्बरवरील हल्ल्याबद्दल सांगितले तेव्हा त्याचे बाहू त्या कारवाईत भाग घेण्यासाठी फुरफुरले नसतील तर नवलच. ही जोडी बरोबर जमली होती. कमांडर गेंडा नवनवीन कल्पना मांडायचा तर फुचिडा त्या प्रत्यक्षात उतरवायचा. गेंडाला बुद्धीची इश्र्वरी देणगी होती व अशा माणसांना त्यांच्यापेक्षा बुद्दू माणसांचा तिटकारा वाटतो. ते याच्याबाबतीतही खरे होते. त्याच्याकडे कसलेही छक्केपंजे नसत. सरळ स्वभावाच्या गेंडाने याच गुणावर इतरांचा आदर प्राप्त केला होता व त्याच्याकडे त्याच्या याच गुणांमुळे माणसे आकर्षित होत असत.
फुचिडाला मात्र परमेश्वराने असे व्यक्तिमत्व दिले होते की एखाद्या लोहचुंबकाकडे लोह ओढले जाते त्याच ओढीने त्याच्याकडे माणसे ओढली जात. त्याच्या हाताखाली काम करणारे किंवा बरोबर काम करणाऱ्यांसाठी तो अक्षरश: परमेश्वरासमान होता. त्याची फक्त पूजाच होण्याचे बाकी होते. या मोहिमेसाठी फर्स्ट फ्लीटमधे जपानच्या नौदलातील सर्वोत्कृष्ट वैमानिक व तंत्रज्ञ भरती करण्यात आले होते व अशा माणसांचे नेतृत्व करणे ही काही साधी कामगिरी नव्हती. पण फुचिडाने ती अत्यंत आत्मविश्वासाने व सहज पेलेली. युद्धानंतर फुचिडा एका मुलाखतीत म्हणाला, ‘गेंडा पटकथा लिहायचा व आम्ही ती प्रत्यक्षात आणायचो’..
गेंडाने लिहिलेल्या पटकथेत अचुक बाँबिंगची आवश्यकता प्रतिपादन केली होती. हे करण्यासाठी फुचिडाने कमी उंचीवरुन बाँब टाकण्याची योजना आखली. पहिल्यांदा ही उंची होती १९५० फूट. ती त्याने कमी करुन १५०० फूट केली. हे म्हणजे मृत्युची गाठ घेण्यासाठी सूर मारण्यासारखे होते. परत शेवटच्या क्षणी विमानाचे नाक वर करणे फारच आव्हानात्मक होते पण वैमानिकांनी ते पेलले. हे झाल्यावर त्यांचे बाँब अचुकपणे लक्ष्यावर पडू लागले. हे झाले सूर मारुन बाँबिंग करणाऱ्या विमानांच्या अचुकतेबद्द्ल. उंचावरुन बाँबिंग करणाऱ्या विमानांच्या बाबतीत अचुकता साधणे जास्त अवघड होते. जपानकडे त्या काळात अमेरिकेकडे होती तशी लक्ष्यावर नेम धरायची ‘नॉर्डेन’सारखी यंत्रणा नव्हती. त्यामुळे बाँब केव्हा सोडायचा हे सर्वस्वी माणसाची दृष्टी किती चांगली आहे व त्याचा अनुभव व अचुक अंदाज यावर अवलंबून असायचे. चीनच्या युद्धात जेथे जपानच्या विमानांना प्रतिकार होत नव्हता तेथेसुद्धा ही अचुकता १० टक्क्यापेक्षा जास्त नव्हती.
या सगळ्या अडचणींवर मात फक्त प्रखर, सतत सारावानेच करता येणे शक्य होते. त्याने सगळ्या स्क्वाड्रनपुढे असणाऱ्या विमानांच्या वैमानिकांची व बाँब टाकणाऱ्या वायुसैनिकाची निवड स्वत: केली. शिवाय या दोघांची जोडी कधीच फुटणार नाही असा नियमही करुन टाकला. जपानमधे ज्या ठिकाणी (इझुमी) हा सराव चालायचा तेथील जनतेने शेवटी विमानांच्या आवाजाबद्दल तक्रार करण्यास चालू केली. त्यांनी अजूनही एक मजेदार तक्रार केली ती म्हणजे त्या भागातील कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले होते. खरे खोटे तेच जाणोत. या सर्व सरावाची फळे लवकरच दिसू लागली. २४ ऑक्टोबरला झालेल्या एका परिक्षेत नागमोडी मार्गाने, वेगाने जाणाऱ्या बोटीवर जेव्हा या वैमानिकांनी हल्ला चढविला तेव्हा त्यांना ५०% यश मिळाले. नांगर टाकलेल्या जहाजावर हे प्रमाण ८०% सहज झाले असते.
कमांडर गेंडाने जेव्हा पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्या योजनेबद्दल अकागी नावाच्या जहाजावर फुचिडाशी चर्चा केली होती तेव्हा टॉरपेडो हल्ल्याचाही विषय निघाला होता व त्यात काय अडचणी येऊ शकतात याचीही चर्चा झाली होती. अमेरिकेच्या सर्व युद्धनौका दोन रांगात नांगर टाकून उभ्या असत. पहिल्या रांगेतील जहाजे टॉरपेडोने उडविणे सोपे होते पण दुसऱ्या रांगेतील जहाजांचे काय करायचे हा एक प्रश्न होता. दुसरी एक अडचण होती ती म्हणजे पर्लहार्बरच्या पाण्याची खोली होती फक्त ४० फूट. जपानचे टॉरपेडो पाण्यात कमीत कमी ७० फूट सूर मारायचे व मग सरळ हो़ऊन लक्ष्याकडे धाव घ्यायचे. थोडक्यात पर्ल हार्बरच्या समुद्रात त्यांनी सरळ तळ गाठला असता व ती चिखलात रुतून बसली असती. तिसरी अडचण म्हणजे दुसऱ्या रांगेतील जहाजावर दुसऱ्या बाजूने हल्ला चढविणे कठीण होते कारण त्याबाजूला उंच क्रेन व इतर महाकाय यंत्रे उभी केलेली होती.
जपानचे तंत्रज्ञ दिवसरात्र या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आता असा टॉरपेडो तयार करायचा होता जो पाण्यात जास्त बुडणार नाही किंवा पाण्यात पडल्यापडल्या आडवा हो़ऊन लक्ष्याकडे धाव घेईल. असा टॉरपेडो अजून संशोधित व्हायचा होता. अर्थात फुचिडाने त्याच्या वैमानिकांची प्रशिक्षण थांबविले नव्हते. उथळ पाण्यातील टोरपेडोच्या सरावासाठी कागोशिमाबेची निवड करण्यात आली कारण हे बेट साधारणत: पर्ल हार्बरसारखेच होता. ४००० फुटी ज्वालामुखी हा फोर्ड आयलंडच्या प्रतिकृतीचे काम करत होता तर कागोशिमा शहर हे पर्ल हार्बरच्या इमारतींचे काम करत होते. यामागातायाचे मोठे स्टोअर हे डॉकयार्डच्या इमारतीचे काम करणार होती.
एका पहाटे फुचिडाने त्याच्या वैमानिकांना कागोशिमात रांगेत उभे केले आणि तो म्हणाला, ‘तुम्ही सगळ्यांनी नुकतेच आरमारावरील बॉंबिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता उथळ पाण्यात उभ्या असलेल्या जहाजांवर टॉरपेडो कसे डागायचे याचे प्रशिक्षण तुम्ही चालू करणार आहात........’ फुचिडाने हे वाक्य इतक्या सहजपणे उच्चारले की त्यात काही विशेष आहे असे कोणालाच वाटले नाही. त्याच्या सहाय्यकाला, ले. कमांडर मुराटाला पर्ल हार्बरची कल्पना होती, त्याने नंतर फुचिडाचे कौतुक करताना असे म्हटले आहे की असा कुठल्याही प्रकारचा टोरपेडो तयार नसताना त्याच्या इतके सहज हे कोणीही बोलू शकले नसते. ‘तो एक सर्वोत्कृष्ट नट झाला असता’.
तेथे हजर असलेले वैमानिक खरे म्हटले तर गोंधळून गेले होते. हलत्या लक्ष्यावर अचुक हल्ले करण्याच्या सराव व प्रशिक्षणानंतर नांगरुन पडलेल्या जहाजांवर टॉरपेडो डागण्यात काय विशेष आहे असे त्यांना वाटत होते. पण जेव्हा या प्रशिक्षणात काय करायचे आहे हे फुचिडाने सांगितल्यावर त्यांची वाचा बसली.
फुचिडा म्हणाला, ‘सध्या आपल्याकडे सरावासाठी टॉरपेडो नसल्यामुळे आपण वेगळ्या प्रकारे सराव करणार आहोत.’ त्याने पुढे जे सांगितले ते अतर्क्य होते. त्यांना शहराच्या उत्तरेकडे आकाशात ६५०० फुटांवर एका विशिष्ठ रचनेत उडायचे होते. ठरलेल्या वेळेस त्यांना दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने खाली यायचे होते. किती खाली तर १३० फुटांवर. हे ऐकल्यावर त्या वैमानिकांच्या मनात याला वेड तर लागले नाही ना अशी शंका उपस्थित झाली असेल तर त्यांना दोष देता येत नाही. फुचिडा कुठलाही धोका न पत्करण्यात प्रसिद्ध होता. अत्यंत शास्त्रिय पद्धतीने विचार करुन तो आदेश देत असे. असे असताना त्या शहरावरुन १३५ फुटांवरुन उडत समुद्रावर पोहोचण्याचा त्याचा आदेश त्यांना चमत्कारिक वाटला असणारच ! त्याच्या पुढचा आदेश यापेक्षाही भयंकर होता. समुद्राकडे येताना त्यांना किनाऱ्यावर त्यांना एक टाकी दिसल्यावर त्यांना ६५ फुटांवर खाली उतरायचे आहे. त्या उंचीवर जवळजवळ ताशी ३०० कि. मी या वेगाने जाणाऱ्या विमानाचा तोल सांभाळून त्यांना समुद्रात साधारणत: १६०० फुटांवर असलेल्या लक्ष्याच्या दिशेने टॉरपेडो डागायचा होता. या वेगात, एवढ्या खाली थोडीशी जरी चुक झाली असती तर विमान समुद्रात कोसळले असते हे निश्चित. हा टॉरपेडो टाकल्यानंतर वैमानिकांनी वर येऊन उजवीकडे वळून त्यांच्या तळावर परत जायचे असेही त्यांना सांगण्यात आले.
फुचिडाने त्यांना हेही सांगितले, ‘हे सगळे फार अवघड आहे पण ले. कमांडर मुराटा आपल्याला याचे प्रात्याक्षिक देणार आहे. त्यामुळे हे शक्य आहे याची तुम्हाला खात्री पटेल.’ एवढे सांगितल्यावर त्याने मुराटाला बाजुला घेतले आणि विचारले, ‘तुला हे जमणार आहे ना ?’ अर्थातच हा प्रश्न अवाजवी होता. मुराटा हा जपानच्या नौदलाचा ‘एस पायलट’ होता. त्याने हे सगळे विमान उलटे उडवून करण्याची तयारी दाखवली.
त्या दिवसापासून कागोशिमामधील नागरिकांना असंख्य विमाने त्यांच्या छपरावरुन समुद्राच्या दिशेने उडताना दिसत होती. त्यांच्या आवाजाने कानात दडे बसत होते व त्यातील वैमानिक त्यांना स्पष्ट दिसत होते. फुचिडा त्याच्या वैमानिकांच्या कौशल्यावर त्या दिवशी भलताच खूष झाला. तो लिहितो, ‘ते बघताना माझ्या दृष्टीसमोरच्या त्या शहराची जागा पर्ल हार्बरने घेतली. त्या समुद्रात मला अमेरिकेच्या युद्धनौका दिसू लागल्या. नेव्हाडा, पेनसिल्व्हानिया, साराटोगा, लेक्झिंग्टन, ॲरिझोना या नौका एकामागे एक रसातळास जात असतानाचे दृष्य माझ्या नजरेसमोर तरळू लागले. स्फोटांचे आवाज व तोफांचे आवाज ऐकल्यावर मी भानावर आलो’. हा सराव रोज सुरु झाल्यामुळे त्या शहरातील नागरिक वैतागून गेले. फुचिडाचे वैमानिक मनात येईल तेव्हा सराव करत असत.
इकडे हा सराव चालू असताना गेंडा उथळ पाण्यातील टॉरपेडोंसाठी नौदलाच्या संशोधन विभागाच्या हात धुऊन मागे लागला होता. पण त्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना फळ मिळत नव्हते. त्यांनी त्या टॉरपेडोंना अनेक प्रकारच्या शेपट्या लाऊन बघितल्या पण व्यर्थ, शेवटी त्यांनी हवेत डागल्या जाणार्या टॉरपेडोंना स्थिर ठेवणारी यंत्रणा वापरुन बघायचे ठरविले..................
त्यांना असा टॉरपेडो तयार करण्यात यश मिळाले का.........हे पुढील भागात !
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
11 May 2013 - 8:12 pm | भटक्य आणि उनाड
उत्तम आणी रोचक !!!पुढच्या भागाची प्रचंड वाट बघतोय....
11 May 2013 - 8:22 pm | लॉरी टांगटूंगकर
भाग बेभान जमलाय !!!! पुढच्या भागाची वाट बघतोय... प्लीज लवकर टाका..
11 May 2013 - 8:44 pm | मुक्त विहारि
आवडले..
12 May 2013 - 12:09 am | सुहास झेले
भन्नाट.... पुढचा भाग लवकर येऊ देत :) :)
12 May 2013 - 12:20 am | चिर्कुट
अगदी प्रत्यक्ष डोळ्यासमोर हे नाट्य घडतय असं वाटतय..
पुभाप्र..
12 May 2013 - 1:13 am | मोदक
वाचतोय!
पुभाप्र.
12 May 2013 - 3:21 am | कपिलमुनी
महत्वाकांक्षा असेल तर काहिही करता येते ..हे जपान्यांच्या कार्यपद्धतीमधून दिसते..
त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याची कल्पना येते..
12 May 2013 - 11:18 pm | अभ्या..
जबरदस्त आहे. फुचिडाचे कॅरेक्टर अगदी डोळ्यासमोर उभे केलेत.
(तो सेपिया टोनमधला त्याचा फोटो पाहाताना मात्र डॅनी डेंग्जोप्पा आठवला ;) )
13 May 2013 - 9:58 am | विसोबा खेचर
जबरा..!
13 May 2013 - 10:16 am | सौंदाळा
मस्त
बारीकसारीक तपशिलसुद्धा रोचकरीत्या सांगण्याच्या तुमच्या हातोटीला सलाम!
13 May 2013 - 3:03 pm | अजो
मस्त माहीती. धन्यवाद.
13 May 2013 - 4:22 pm | नन्दादीप
जबर्या.... पुढील भागाच्या प्रतिक्षेत......
13 May 2013 - 10:34 pm | पैसा
नाट्यमय आणि थरारक!
13 Feb 2014 - 10:04 pm | रॉजरमूर
एकदम जबरदस्त लेखमालिका धन्यवाद कुलकर्णीसाहेब ,
बाकी तो वरचा जोसेफ रॉशफोर्ट (पहिलाच फोटो ) हुबेहूब आपल्या शशीकपूर सारखाच दिसतोय विलक्षण साम्य आहे दोघांत ….