"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा…
तोहरे प्यारके जहर चढे मितवा…"
'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं.
आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?
तशी ती म्हणाली होती, "अहो, आज आपल्याकडे महिला मंडळाची पार्टी आहे. मिपावर वाचून केलेल्या एकेक पाककृती घरून करून आणणार आहेत सगळ्याजणी. त्यामुळे तुम्ही बगिच्यात फिरा, सिनेमा बघा, काय हवं ते करा. मात्र बाहेरून काही खाऊन येऊ नका बरं, आज घरातच मस्त बेत आहे."
माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.… व्व्व्व्वा. एकट्यानं फ़िरायचं, सिनेमा बघायचा आणि घरी आल्यावर चमचमीत पाककृती.
'आज दुनिया बडी सुहानी ही, कैसी रंगीन जिंदगानी है" … मला मोठ्यानं हे गाणं म्हणावसं वाटू लागलं, पण बेरकीपणानं मी अत्यंत नाइलाज झाल्यासारखा चेहरा करत बsssरं म्हटलं.
मागे मिपावर 'सठयाई गयी सजनवा हमार' हा धागा वाचल्यापासून आपण एकदातरी भोजपुरी पिच्चर बघावाच, असं जे फार वाटत होतं, त्यासाठी आज सुवर्णसंधी चालून आलेली होती.
तर मग संध्याकाळी भोजपुरी पिच्चर बघून परतताना त्यातलं "मारा डंख मारा, डंख मारा बिछुवा" … हे बेफाम गाणं आनंदात म्हणत परतत होतो खरा, पण घरी पोचल्यावर आपल्यापुढे कोणतं ताट वाढून ठेवलेलं आहे, याची तेंव्हा मला सुतराम कल्पना नव्हती.
आता महिलामंडळ घरोघरी पहुचलं असेल, अश्या विचारात फाटकातून आत शिरतो, तो समोर स्त्रैण पादत्राणांचा हाss ढीग, आणि घरातून प्रचंड कलकलाट. मी बेल वाजवताच मात्र एकदम चिडीचूप झालं.
"या, तुमचीच वाट पहात आहेत सगळ्या जणी " … सौ.
"माझी? का बुवा?"… मी.
ते आता त्यांनाच विचारा"…
मी आत शिरतो, तो सगळं भगिनी मंडळ माझ्याकडे 'खाऊ की गिळू' च्या खूंखार नजरेनं बघत होतं. का कुणास ठाउक, त्यांच्याकडे बघून मला मिपावरच्या धाग्यात मीच सुचवलेली 'फुत्कार सर्पिणी', 'गरळ ओकिनी' 'विक्षिप्त विध्वंसिनी' वगैरे नावं आठवली.
" काका तुम्ही का केलंत असं ? का ? का ? का ?…. माझ्याकडे पेंटिंग शिकणारी, हिच्या मैत्रिणीची मुलगी सौंदर्या स्फ़ुंदत स्फ़ुंदत म्हणाली.
… तिचं ते "का ? का ? का ? " बघून मला त्याही स्थितीत 'ही जर मराठी मालिकांमध्ये गेली तर तिथल्या तमाम जानक्या, कल्याण्या आणि मंजिर्यांचा बाजार उठवेल' याची खात्री पटली.
अगं काय, झालं तरी काय? ...मी.
काय काय विचारता ? मी तुमच्याच सांगण्यावरून मिसळपावचं मेंबर व्हायला माझ्या खर्या नावाचं, 'सौंदर्या सौंदत्तीकर' असं आयडी घ्यायला अप्लाय केलं, आणि ते रिजेक्ट झालं… ती पुन्हा स्फ़ुंदत स्फ़ुंदत म्हणाली.
आणि माझापण, 'कामिनी कामतीकर-कामातुरकर' हा आयडी रिजेक्ट झाला… दुसरी.
… आणि माझा 'चंद्रिका चंद्रपूरकर - चंदावरकर' असा. … तिसरी.
आणि माझा पण 'लज्जागौरी लाजरे-बुजरे' असा आयडी रिजेक्ट झाला… चवथी.
मला तर काही कळेचना की यात माझी काय चूक आहे ते.
"अहो, या सगळ्यांनी मिपावर छान छान रेसिपी द्याव्यात आणि खास बायकी लेख वाचावेत, म्हणून आपापली खरी नावं घेऊन अप्लाय केलं होतं, आणि सर्वांचे आयडी रिजेक्ट झाले. आणि याला तुम्हीच जबाबदार आहात" … सौ.
"मीच जबाबदार ? तो कसा? "
" तुम्ही काहीतरी 'नेपोलियन-दासबोध-त्सुनामी' वगैरे नावाचा आचरट लेख लिहिलात ना, तेंव्हापासून बायकी नावाचा अर्ज आला, की त्याच्याकडे संशयाच्या नजरेनंच बघितलं जातं, आणि असे अनुप्रास वाले, किंवा विचित्र आयडी रिजेक्ट केले जातायत म्हणे, एका जाणकार महिलेनं माहिती दिली.
" तरी मी तुम्हाला सांगत होते, की तुमचं लिखाण चित्रकलेपुरतंच ठेवा. काहीतरी बाष्कळपणाचं लिहून तुम्ही तुमचं मिपावरचं रेप्युटेशन खराब करून टाकलंत, त्यामुळे तिथली थोर्थोर मंडळी आताशा तुमच्या धाग्यांना प्रतिसाद पण देईनाशी झालीत, आणि त्यामुळेच आपण मागे अमेरिकेत गेलो, तेंव्हा त्यांनी भेटायचं पण टाळलं… आता तुम्हीच बघा काय करायचं ते… ही.
" आता आम्ही तुझ्याकडे कध्धी कध्धी येणार नाही" असं फणकार्यानं बजावून ते महिला मंडळ बाहेर पडलं, 'अब तेरा क्या होगा कालिये' या विचारानं माझी पाचावर धारण बसली, आणि आमची ही फिल्मी स्टाइलने धावत बेडरूम मध्ये जाऊन पलंगावर पालथी पडून ओक्साबोक्शी ओक्साबक्सू लागली.
सर्हदय वाचकहो, आले ना लक्षात, मज पामरावर कसला प्रसंग गुदरलेला आहे ते? आता आमच्या या घोर पातकाच्या क्षालनार्थ आम्हाला तडकाफडकी काशीयात्रा करावी लागणार, आणि त्यासाठी 'मेकमायट्रिप' वा 'केसरी' मध्ये पापक्षालनेच्छुंसाठी काही 'स्पेशल पापी-प्याकेज टूर टू काशी' आहे का, सर्च करावं लागणार ... तेंव्हा अलविदा.
प्रतिक्रिया
13 May 2013 - 4:27 pm | भावना कल्लोळ
हा हा हा … भन्नाट आणि खुमासदार झाला आहे लेख.
13 May 2013 - 4:44 pm | गणपा
=))
काका, काकुंना शिसादं कळवा. ;)
13 May 2013 - 4:50 pm | राही
पापी-प्याकेज टूर जबरीच. मारिगोल्ड आहेच. शेवंती, अबोली पण असतील.. पण नकोच अबोली नावच नको. पाप रे पाप.
13 May 2013 - 5:20 pm | ढालगज भवानी
मस्त जमलाय लेख. :) गाणं भन्नाट दिसतय. कसं सुचतं हे सगळं ? :)
13 May 2013 - 5:50 pm | प्यारे१
हा हा हा....
चना रे रामो च्यांब्याआ तनाव चना रे रामो चना ;)
(हे उगाच्च)
13 May 2013 - 6:04 pm | स्मिता.
भन्नाट लेख.
हे ब्येष्टच!
13 May 2013 - 10:19 pm | अन्या दातार
चित्रगुप्त ऑन फायर!!
लगे रहो!
13 May 2013 - 10:55 pm | पाषाणभेद
चित्रगुप्तजी रंगांच्या ब्रशप्रमाणे आपल्या हाती लेखणी शोभते! हे शब्दचित्रही भयानक आवडले!
14 May 2013 - 12:27 am | शशिकांत ओक
एका शब्दात केलेले वर्णन सर्व काही सांगून गेले. "आचरट"...
...बाकी पत्नीशी कसे सांभाळून घ्यायचे यात प्रवीण गुप्त चित्रा, तुला नंतर मिपावरील नव्या पदार्थाचा फराळ गालगुच्चा घेऊन कसा मिळाला ते सांगा ना गडे...
14 May 2013 - 1:12 am | पिवळा डांबिस
'स्पेशल पापी-प्याकेज'?
आता काय मिपावर चुंबनोत्सुक सभासदांसाठी हा नवीन उघड-बंद विभाग सुरू झालाय की काय?
नाय म्हणजे, मालकांचं शुभमंगल ठरलंय असं ऐकलं (की झालं देखील कुणास ठाऊक, आम्हाला काही बॉ आमंत्रण नव्हतं!!)
तेंव्हा हा असा विभागदेखील सुरू करायला हरकत नाही!!!
वाजवा रे वाजवा!!!!
:)
14 May 2013 - 3:11 am | बॅटमॅन
अगागागागा =)) =)) =))
तुम्हाला यलोनॉटी म्हणतात त्याची सार्थता पटवणारा प्रतिसाद :)
(पीतचेष्टालु काकांचा व्यजन) बॅटमॅन.
14 May 2013 - 11:16 am | आदूबाळ
+१ अगदी अगदी...
14 May 2013 - 3:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते सिनेमाचं परीक्षण, चित्रपट ओळख असंही काही लिहा की!
तुम्हाला वाढीव पापांत सहभागी केल्याबद्दल माझ्याकडून एक रक्तवारूणी कबूल!
15 May 2013 - 7:23 am | चित्रगुप्त
रक्तवारुणी बद्दल आभार, पण तसले काही घेत नसल्याने बासुंदी, पन्हे, मठ्ठा इ. ची व्यवस्था करता आली तर बघा.
16 May 2013 - 8:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सध्या आमच्याकडे द्राक्ष मस्त आल्येत. द्राक्षांची स्मूदी चालेल का? स्वत्ता करून देईन. ;-)
14 May 2013 - 6:33 am | श्रीरंग_जोशी
मी घाबरलो...
ऑफलाईन होतो, तरीही घाबरलो...
सौ. मालविका अफझलपूरकर अहमदपूरकर लाटणे मोर्चा आणण्यासाठी माझ्या पत्त्याचा कसून शोध घेताहेत अशी खबर गुप्तसुत्रांकडून मिळाली आहे.
लै भारी हो, चित्रगुप्त महोदय!!
14 May 2013 - 6:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार्मात आहात. लगे रहो :)
-दिलीप बिरुटे
14 May 2013 - 11:12 am | nishant
हा हा हा …मस्त खुमासदार लेख..
14 May 2013 - 4:27 pm | विजुभाऊ
ल्ह्या ल्ह्या ल्ह्या
15 May 2013 - 12:31 pm | कोमल
:)) :)) :))

मस्तच..