आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी..
ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत..
वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी..
रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे.
हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे.
अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे.
ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी.
दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे..
या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची.
अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले...
दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच.
बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती.
कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा.
पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........
.
.
.
चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर..
- तुमचा अभिषेक
प्रतिक्रिया
28 Apr 2013 - 7:14 pm | शैलेन्द्र
:) सुंदर
28 Apr 2013 - 7:16 pm | मुक्त विहारि
आवडले..
28 Apr 2013 - 7:24 pm | चाणक्य
आवडले लिखाण
28 Apr 2013 - 7:30 pm | आशु जोग
हे पूर्वी वाचले आहे
28 Apr 2013 - 8:18 pm | तुमचा अभिषेक
कसे शक्य आहे, कालच लिहिले आणि आज इथे प्रकाशित केले.
लेखातील घटना खुद्द माझ्याशीच घडली असल्याने इतर कोणी कुठे लिहिणे शक्यही नाही.
पण हा, हाच अनुभव मी मागे एकदा म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वी ऑर्कुटसमूहांवर थोडक्यात लिहून सिगारेट पिणार्या मुलींकडे समाजाचा बघायचा दृष्टीकोण कसा असतो या आशयाचा एक धागा काढला होता.
28 Apr 2013 - 8:26 pm | टवाळ कार्टा
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट??
28 Apr 2013 - 8:43 pm | निनाद मुक्काम प...
28 Apr 2013 - 8:47 pm | टवाळ कार्टा
=))
28 Apr 2013 - 8:49 pm | सोत्रि
करेक्ट नेमके हेच म्हणायचे आहे!
ती मुलगी सिगरेट पिते म्हणून तिला कटाप केल्यावर पुन्हा तिला बघण्याची हुरहुर का लागावी?
-(सध्या सिगारेट पिणे सोडलेला) सोकाजी
28 Apr 2013 - 10:17 pm | तुमचा अभिषेक
मला वाटते यावरच मी हा लेख लिहिलाय..
की खरेच मुलांनी सिगारेट ओढली तर चालते अन मुलींनी ओढली तर त्यांना वेगळ्या नजरेने बघितले जाते असे का?
आणि हे सहजच घडते म्हणून माझ्याशीही झाले जे मी प्रामाणिकपणे कबूल केले.
माझा पुढचा मुद्दा वैयक्तिक घेऊ नका पण उद्या आपल्यापैकी कोणाला समजले की आपला मुलगा सिगारेट ओढतोय तर जास्त धक्का बसेल की आपली मुलगी सिगारेट ओढतेय हे समजल्यावर मोठा धक्का बसेल?
28 Apr 2013 - 8:38 pm | श्रीरंग_जोशी
कथा / व्यक्तिचित्रण छान रंगले आहे.
शब्दांवर चांगली पकड दिसत आहे.
केवळ सिगारेट 'पिणारी' ऐवजी सिगारेट 'ओढणारी' मुलगी अधिक बरे वाटले असते.
28 Apr 2013 - 10:22 pm | तुमचा अभिषेक
ह्म्म कदाचित "ओढणारी" समर्पक शब्द असावा.. माझ्या तोंडात "पिणारी" हा शब्द येतो जो लेखनात उतरला.. जो अगदीच चुकीचा नसल्याने राहू देऊया.. :)
बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. या प्रकारच्या शैलीत हे पहिलेच लेखन माझे .. साशंक मनानेच प्रकाशित केलेले..
30 Apr 2013 - 10:33 am | विश्वनाथ मेहेंदळे
प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात. हिंदीत पितात.
1 May 2013 - 11:31 am | तुमचा अभिषेक
धूम्रपान बद्दल काय म्हणाल? ;)
1 May 2013 - 2:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मग धूर पिणे म्हणा, सिगारेट नाही :-)
ह्याह्याह्या !!!!
1 May 2013 - 6:45 pm | श्रीरंग_जोशी
फुंकणे हे क्रियापदही वापरले जाते बोलीभाषेत.
1 May 2013 - 8:38 pm | तुमचा अभिषेक
किंवा कश मारणे...
चहा पिण्याला देखील मुंबईत चल एक कटींग मारूया बोलतात...
1 May 2013 - 11:31 pm | बॅटमॅन
त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार "फुकणे" असा आहे ;)
1 May 2013 - 11:56 pm | सुबोध खरे
फुंके -सिगरेट ओढणारे
थुंके - गुटखा/ तंबाखू खाणारे
शिंके- तपकीर ओढणारे
भुंके - काहीच वापर न करता तंबाखू वापरणार्यानवर भुंकणारे
2 May 2013 - 2:28 am | बॅटमॅन
भुंके - विशेष आवडले :)
2 May 2013 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे
सरस !
2 May 2013 - 3:34 am | श्रीरंग_जोशी
माझ्या हातून त्याचे नकळत शुद्धीकरण झाले :-(.
त्यापासून बनणारे विशेषण - फुकाडा. (वा.उ. - तो लै फुकाडा गडी हाय).
28 Apr 2013 - 10:18 pm | NiluMP
किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर.. ->हो ना
28 Apr 2013 - 10:32 pm | अग्निकोल्हा
हा लेख म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात एसीची झुळुक आहे.
निव्वळ अप्रतिम.
29 Apr 2013 - 6:18 am | शुचि
हे खासच!!
29 Apr 2013 - 8:26 am | इन्दुसुता
होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........
कथेतिल नायकाला ( कथा तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला ) ही सिगरेट्ची सवय कधी जडली म्हणे ... तिला सिगरेट ओढताना पाहिल्यानंतर की आधीपासून? :D :D
कृ. ह.घे.
बाकी केवळ मुलगी सिगारेट ओढते म्हणून तिला कटाप करणे ( सोत्रिंचा शब्द्प्रयोग) काही पटले नाही बुवा!!!
29 Apr 2013 - 12:17 pm | मन१
लेखन आवडले.
<काडी मोड ऑन>
हल्लीच्या पोरी नाही त्या गोष्टीत बरोबरी करु पाहतात हेच खरे.
करायचीच असेल तर तर कामात करा ना म्हणाव. हापिसात येउन नाही त्या गप्पा, नट्टापट्टा अन् अशा सिग्रेटी.
काय हे.
<काडी मोड ऑफ>
30 Apr 2013 - 6:35 am | शुचि
टाकली काडी??? :-X
30 Apr 2013 - 6:05 pm | मन१
पण कै लांबलाच नै ना उपधागा :(
29 Apr 2013 - 12:21 pm | रितुश्री
हा ही लेख मस्तच...
29 Apr 2013 - 12:22 pm | खबो जाप
मी पण रिलायंस मध्येच होतो BHQ मध्ये, रोज जेवणानंतर अगदी जीन्स पासून पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीना / स्त्रियांना सिगारेट ओढत BHQ च्या समोरच्या पायऱ्यांवर बसलेले बघितले आहे,
त्यात काय गैर आहे सिगारेट ओढणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
फक्त मी स्वतः ओढत नाही आणि कुणी सुटते पैसे नसतील आणि सिगारेट साठी पैसे मागितले तर मी देवू शकत नाही म्हणून सागतो बस्स ….
29 Apr 2013 - 12:47 pm | अप्पा जोगळेकर
सिगरेट पिताना काही मुली अत्यंत मोहक आणि स्टायलिश दिसतात असे वैयक्तिक मत.
चांगला चान्स सोडलात.
29 Apr 2013 - 6:30 pm | ढालगज भवानी
सिगरेटच्या जाहीरातींचे ग्लॅमर त्याला कारणीभूत असावेसे वाटते.
29 Apr 2013 - 8:49 pm | टवाळ कार्टा
मलातर सिग्रेट पिणार्या मुली जाम आवडतात ;)
29 Apr 2013 - 9:42 pm | अग्निकोल्हा
सिगारेट ओढणार्या काही मुलि खरोखर सिडक्टीव वाटतात.
30 Apr 2013 - 9:54 am | इरसाल
पण त्यांच्या बरोबर ओष्ठ्संपर्क करायला गेलो तर आधी कडवट गंध मग कडवट चव येते. आणी माझ्यासारख्या सिगारेट न ओढणार्यासाठी ते ईईईईई असे असते.
30 Apr 2013 - 10:47 am | विश्वनाथ मेहेंदळे
मी असेच काहीसे लिहिणार होतो. पण सिगारेट ओढणाऱ्या मुलीशी आजवर ओष्ठ्संपर्क न झाल्याने केवळ अंदाज करू शकलो असतो. बरे झाले तुम्ही लिहून टाकले ;-)
(धुम्रगंधरसविरहितओष्ठ्संपर्कातूर) विमे
30 Apr 2013 - 11:26 am | नन्दादीप
"गुडन गरम" नावाचा एक सिगारेटचा प्रकार असतो... ती सिगारेट ओढून ओठांवरून जीभ फिरवली की साखरेसारख गोड गोड लागत म्हणे....... ;)
1 May 2013 - 12:54 am | विश्वनाथ मेहेंदळे
प्रॉब्लेम "गुडन गरम" न मिळण्याचा नसून ओठ* न मिळण्याचा आहे.
* इथे "गरम गुडिया" अशी तद्दन भिकार कोटी करण्याची इच्छा आवरून धरली आहे.
30 Apr 2013 - 11:29 am | बॅटमॅन
आम्हीही ;)
4 May 2013 - 3:21 pm | ज्ञानोबाचे पैजार
फोटो जालावरुन साभार
30 Apr 2013 - 10:52 am | तुषार काळभोर
;-)
30 Apr 2013 - 11:07 am | अग्निकोल्हा
मग तुम्ही सुध्दा सिगारेट ओढायला लागा.
अवांतरः- मला आइस्क्रिम खाणार्या काहि मुलिसुध्दा सिडक्टिव्ह वाटतात.
30 Apr 2013 - 11:19 am | अग्निकोल्हा
टर्नऑन होण्याचे टाळा ;)
30 Apr 2013 - 5:48 pm | तुमचा अभिषेक
सिगारेट पिताना मुले सुद्धा स्मार्ट अन डॅशिंग दिसतात..... या अन अश्याच विचारांच्या आहारी जाऊन पाकिटावर कर्करोगाने मराल असे लिहिले असूनही पोरं पितातच.. असो, हा वेगळा विषय झाला.. :)
29 Apr 2013 - 1:51 pm | rupali5678@yahoo.com
अरे वा.........एक अविस्मर्निय असा अनुभव येतो...........
29 Apr 2013 - 9:06 pm | कालिन्दि मुधोळ्कर
आमच्या ऑफिसात तळ्घरामधे एक बार होता व वरच्या मजल्यावर चहाचे दुकान. एकदा नेहमीप्रमाणे दुपारी बार मधे गेलेले असताना एक मुलगा आला. मग रोजच बार मधे आमची द्रुष्टाद्रुष्ट होत असे. एकदा अचानक कामानिमित्त वरच्या मजल्यावर जाणे झाले. तर तिथे हा मित्रांबरोबर चहा पित होता. त्याने नजर चुकवली. बस्स. तिच शेवट्ची नजरानजर हो...
29 Apr 2013 - 9:33 pm | प्यारे१
एक मुलगा चहा पितो ह्या मुद्द्यावर .... अरेरे!
एकदा त्याच्याबरोबर प्यायचा चहा. व्यसन कसं लागलं विचारायचं.
हळूहळू सांगायचं ना चहा नको पिऊ म्हणून. थोड्या दिवसांनी आपसुकच फक्त बार मध्येच भेटला असता.
'प्या पण प्रेमानं' हा संदेश द्यायला हवा होता.
मूळ लेखाबद्दल सुद्धा थोडं हेच. ;)
29 Apr 2013 - 10:21 pm | श्रिया
छान लिहिलय. आवडलं.
29 Apr 2013 - 11:00 pm | बॅटमॅन
सिगरेट ओढणारी मुलगी कशी काय दिसली नाही म्हंटो मी. सिगरेट पिणार्याच मुली दिसतात बॉ आजकाल :(
29 Apr 2013 - 11:03 pm | टपरी
मी पण B -BLOCK च्या बाहेर बऱ्याच वेळा मुलीना सिगारेट ओढताना पाहिलं आहे .आजकाल मुलींनी सिगारेट ओढणे common झाल आहे . त्यात धक्का बसण्या सारखं काही नहि.
30 Apr 2013 - 9:49 am | सुबोध खरे
kiss a non smoker & taste the difference
30 Apr 2013 - 10:57 am | अक्षया
लेखन आवडले. :)
30 Apr 2013 - 12:23 pm | तिमा
मुलींनी सिगरेट ओढणे आणि मुलांनी ओढणे यांत एक फरक आहे. सिगरेट ओढणार्या स्त्रियांच्या बाळांनाही त्यापासून धोका असतो. पुरुषांच्या बाबतीत फक्त त्यांनाच धोका असतो.
30 Apr 2013 - 5:42 pm | तुमचा अभिषेक
असे काही असल्यास ते गरोदरकाळातले असावे ना..
अवांतर - अशी ही बनवाबनवी चित्रपटातील बिडीचे डोहाळे लागलेला स्त्रीवेशातील लक्ष्या आठवला.
1 May 2013 - 8:10 pm | ढालगज भवानी
अहो गरोदरकाळ कसला. मूल नीट "कन्सीव्ह" व्हावे म्हणून स्त्रिया व पुरुषही एकेक वर्ष धूम्रपान सोडतात असे ऐकून आहे. "कन्सीव्ह" मिस्टर आहात कुठे? पुरुषही सोडतात.
30 Apr 2013 - 7:37 pm | निनाद मुक्काम प...
सिगरेट व त्यानंतर कॉफी ह्यामुळे जो दुर्गंध निर्माण होतो त्यामुळे मला तर एकदा मळमळून आले.
मी सिगरेट पिते ह्या निकषावर मुली नाकारल्या नाही , तर मला त्याचा वास असह्य होतो.
ही माझी वैयक्तिक समस्या होती,
मात्र सिगरेट पिणारे अनेक मित्र ,मैत्रिणी होते व अजूनही आहेत.ज्या दिवशी युरोपात उपहार गृह व बंदिस्त खोल्यांमध्ये सिगरेटी फुंकणे कायदेशीररीत्या दंडनीय अपराध ठरवला तेव्हा झक मारून कार्यालयांना स्मोकींग रूम
निर्माण केल्या. तेव्हा आमच्या सारख्यांच्या जीवात जीव आला
30 Apr 2013 - 2:05 pm | आतिवास
मला वाटलं (फक्त) 'एक' सिगरेट ओढून, थांबलेली मुलगी (- पुन्हा कधीच सिगरेट न ओढणारी) अशी काहीशी गोष्ट असावी! पण गोष्ट तर वेगळीच निघाली :-)
30 Apr 2013 - 5:40 pm | तुमचा अभिषेक
हा हा.. भलत्याच अवाजवी अपेक्षांनी कथा वाचायला घेतलीत आपण.. ;)
30 Apr 2013 - 4:42 pm | शिलेदार
सुन्दर लिहीलय मला वाटत की उगीचच नको त्या गोष्टीचा बोबाटा करण्यापेक्षा मूळ भावना समजून घेणे महत्वाचे आहे.
तुम्ही खुप सुन्दर पात्र रन्गवली आहेत अगदी डोळ्यासमोर उभ राहत.रविवारची संध्याकाळ फार मस्त रन्गवली आहे.
मला वाटत की नायकाचा अपेक्षा भन्ग न त्या मुलीला खुपणारी नायकाची नजर न तीला जाणवणार गिल्ट हे स्पष्ट होत.
खुप छान लिहीलय
खुप खुप शुभेछा!!!
1 May 2013 - 12:07 pm | सोत्रि
खिक्क...
- (कसलाही गिल्ट न जाणवणारा) सोकाजी
1 May 2013 - 6:38 pm | पैसा
आवडले!
2 May 2013 - 11:45 am | शिल्पा ब
गोष्ट चांगली ए पण लोकांच्या प्रतिक्रियाच पहा ना !! ओठ तिचे, शिग्रेट तिची, फुकणार ती, काय प्रोब्लेमलं तर तिला अन बाकीच्यांनाच काळजी.
बाकी शिग्रेटी, दारु अन सोडा म्हंजे कोक, पेप्सी वेग्रे हे प्रकार गिळल्याने, फुंकल्याने काय काय रोग होतात हे माहीत असुनसुद्धा हौस फिटत नसेल तर आपलं काय जातंय म्हणुन मी कै कोणाला सांगायला जात नै...उलट दोन कश मारावे वाटले तर ते फुकुन अन उरलेली शिग्रेट देउन "काय तो मेला वास" म्हणुन लांब निघुन जाते.
4 May 2013 - 7:58 am | विश्वनाथ मेहेंदळे
तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमचा EQ हाय आहे, म्हणून तुम्हाला जमते हे असे व्यवस्थित वागणे.
4 May 2013 - 10:34 am | शिल्पा ब
अर्थातच. आमचं वागणं दुसर्या कोणासाठी नसतं. लोकांच्या व्यक्तिगत बाबीत उपदेश करायची आमची सवय नाही.
4 May 2013 - 3:35 pm | मृणालिनी
सिगारेट कुणीच पिऊ नये..... स्त्री असो वा पुरुष. आणि सिगारेट ओढणाऱ्या मुलांकडे देखील 'टपोर्याला' पहाव तसच पाहिलं जातच न? आणि ती एक वाईट सवय आहे. मग मुलाला लागली काय किव्हा मुलीला लागली काय...दोघांनाही दोन कानफाटात देऊन ती सवय मोडायला लावली पाहिजे.
4 May 2013 - 3:46 pm | बॅटमॅन
अगायायायाया, कोण आहे रे तो शिग्रेटी फुंकतोय्/तेय? कुणाची एवढी डेरिंग की साला मधुरातै आज्ञा देत असताना शिग्रेट पिईल? दोन कानफटात किंवा पोकळ बांबूचे फटके दिल्या जातील.
(गॉथमचा मुतव्वा) बॅटमॅन.
17 Jun 2015 - 5:43 am | रुपी
लेखन आवडले..
17 Jun 2015 - 8:52 am | स्वीत स्वाति
अजुन बरेच काही लिहाय्चे आहे या लेखावर .
पण सध्या बिझि आहे ..
17 Jun 2015 - 12:54 pm | शि बि आय
छान वाटले . .
पण काही प्रश्न मनात आले ?
१) ती सिगरेट ओढते म्हणून तुम्ही नजर चोरत होतात मग ट्रेन मध्ये तुमच्याकडे सिगरेट काय करत होती बुआ ?
२) जर तुम्हीहि सो कॉल्ड "फुंके" होतात मग आधी नजर का चोरत होतात?
17 Jun 2015 - 7:36 pm | प्रणित
आता एक नविन कथा येउ दे
एक मॅगी खाणारी/बनवणारी मुलगी
:)