आठवणीचे छोटे छोटे तुकडे –

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जनातलं, मनातलं
24 Jan 2012 - 12:14 am

माहीम ..!!

छोटी छोटी गावे ,शहरे सोडून आम्ही एकदम मुंबईला आलो. थेट अगदी माहिमला.
अगदी छान परिसर
सीतला देवी टेम्पल रोड.
ज्योती सदन .
घरापासून चर्च हाताच्या अंतरावर.
घर आवडले. छोटे परंतु टुमदार. हॉलला ग्यालरी नि एक खिडकी .बेड रूमला दोन खिडक्या.किचनला एक खिडकी.
पण गम्मत अशी की खिडक्याना गज नाही.खिडकीचे दार उघडले कि मोकळ्या मोकळ्या नि नागड्या खिडक्या .
मला तर भीतीच वाटायची .कारण घर पहिल्या मजल्यावर. दहा फुटावर जमीन
रात्री कोणी घुसले तर. ..?
त्याच दरम्यान रामन राघवन खून करीत सुटलेला
रात्री फुटपाथवरच्या झोपलेल्या माणसाच्या डोक्यात दगड किंवा तीक्ष्ण हत्याराने वार करून मारत सुटला होता .
नि तेव्हा तो कुणालाही मिळत नव्हता.
त्यामुळे मी तर फार घाबरून गेलो होतो. तो खिडकीतून कधीपण घुसेल नि आपल्याला मारेल असे वाटत राही.
पहाटे पहाटे बाजूच्या ईमारतीतून मला घुबडा सारखा आवाज यायचा. पहाटे पहाटे असला आवाज म्हणजे मला तर भीतीच वाटायची .
एके दिवशी जिवाचा कान करून आवाज ऐकत बसलो .
तो आवाज घुबडाचा नव्हता.
कोणी तरी माणूस व्हाट टू डू..? व्हाट टू डू ..?? म्हणत असायचा .
नि त्याचा एकत्र उच्चार वाट्डू SSS वाट्डू SS सारखा म्हणजे घुबडासारखा यायचा तसा मला तरी वाटायचा ...
परंतु असे कोण म्हणतोय ..?हे मला शेवट पर्यत समजले नाही.
ते गुपितच राहून गेले ...

प्रथम काही दिवस मी नि बाबा
आई नासिकला.
ज्या दिवशी आम्ही त्या घरात प्रवेश केला त्याच दिवशी सोसायटीची काही माणसे घरी आली.
घर विकत घ्यायचे का ..?म्हणाली .
भाव अगदी कमी होता. तेरा हजार रुपयात एक बेड रूम हॉल किचन .!!
बाबा म्हणाले -विचार करून सांगतो. ..!
अर्थात हे आम्हास तोंड पुसले विचारले गेले होते. खालचे तीन फ्ल्याट नि आमचा फ्ल्याट कुणा मोठ्या आसामीला दिलां गेलां होता.
नावाजलेले मंत्री साहेब होते ते .
दुपारी मी मोकळाच असायचो.खूप भटकून घेतले. शिवाजी पार्क.जवळचा समुद्र.
एवढा मोठा समुद्र. मी प्रथमच बघत होतो.
माझ्यासारख्या मुलाला मुंबई म्हणजे स्वप्न नगरीच वाटायची.
प्रथमच शिवाजी पार्कवर म्याच पण बघितली.मला आठवतेय विजय मांजरेकर ,रमाकांत देसाई ,सुभाष गुप्ते ही मंडळी शिवाजी पार्कवर दिसली.
विजय मांजरेकर बद्दल आमच्या मनात तर अति आदर होता. नि मला चांगले आठवतेय.शिवाजी पार्कवर विजय मांजरेकर आला नि सगळे टाळ्या वाजवून गणपती बाप्पा मोर्यांचा नारा सुरु केला. होता

मला आठवतेय विजय मांजरेकर ने केन ब्यारीग्टनचा उडालेला झेल घेईल का..? असे कोमेंटर म्हणत होता. कोमेंटेटरला मांजरेकर झेल पकडेल की नाही ह्याची खात्री नव्हती. आणि विजय मांजरेकरने तो अप्रतिम झेल घेतला. नि प्रचंड टाळ्याच्या गडगडाटात आख्खे स्टेडीयम दुमदुमून गेले.हे अर्थात आम्ही नाशिकला गंगेवर रेडिओवर ऐकल्याचे छान स्मरतेय.
भरपूर प्रेक्षकांची गर्दी. उस्फुर्त टाळ्या. काळ्या फळ्यावर खडूने लिहिलेला धावफलक आणि मस्त धावा असल्याकी त्या फळ्याला फुलांचा हार.

त्यावेळी चंद्रावर गेलेले नील आर्मस्त्रांग ह्यांची मिरवणूक उघड्या गाडीतून काढण्यात आली ती मिरवणूक सीतला देवी टेम्पल रोडवरून गेली.त्या प्रचंड गर्दीत मीपण उभा होतो.मी त्याचे दर्शन झाले .धन्य धन्य वाटले .

माटुंगा रोडला रेल्वे फाटकाच्या समोर मला वाटते एक छोटेसे हॉटेल होते नि त्यासमोर एक झाड होते.त्या झाडाखाली संध्याकाळी बरीच नवीन मराठी पुस्तके निम्म्या किमतीला मिळत.
मी कधी ती चाळून बघे.
अप्रतिम छपाईची पुस्तके बघून मी थक्क होत असे.
मौज प्रकाशनाची जबरदस्त पुस्तके
मग मी तेथून कितीतरी पुस्तके खाऊचे पैसे साठवून विकत घेतलीली .मला आठवतात दुर्गा बाईंचे : व्यासपर्व.
पु.शी.चे :सावित्री .
रा,भी.चे :मजल दरमजल
ए व्ही.जोशीचे -काळोखाचे अंग .
विद्याधर पुंडलिकाचे : पोपटी चौकट.
पोपटी चौकट तर मला रद्दीच्या दुकानात मिळाले.अतिशय पिवळे पडलेले.
कोण ब्वा हे पुंडलिक [?] .
मला तर काहीच माहित नव्हते.
पण त्यांची भाषाशैली नि आजी शरण येते..!! ही कथा वाचून मी थक्क झालो होतो .
आणि गंमत म्हणजे सध्या जे प्रकाश हॉटेल आहे .शिवाजी पार्कला त्याच्या जवळ एक रद्दीचे दुकान होते.अजूनही ते तेथेच आहे. तेथे सत्यकथेचे अंक अगदी नवीन कोरे म्हणजे न वाचलेले चार आण्यात मिळाले.
चित्र वगैरे नसलेले हे मासिक मला माहित पण नव्हते. मात्र मला ते मासिक खूप आवडून गेले.
माहिमला संध्याकाळी मी फिरायचोच. त्यावेळी जयवंत दळवी ह्यांची चक्र कादंबरी भरपूर गाजत होती .
माटुग्याला फिरताना मला त्यातील काही पात्रे दिसतात का ह्याची खूप उस्तुकता होती.
त्यावेळेस माटुंग्या जवळ आणि माहीम जवळ बरीच मोठी झोपडपट्टी होती. तसे मधुमंगेश कर्णिक ह्यांची माहीमची खाडी पण बरीच चर्चेत होती.
त्यावेळी मराठी साहित्य असल्या कादंबर्यानि पार भारून गेले होते. मला वाटते त्याच दरम्यान चक्र कादम्बरीवर हिंदी सिनेमा निघाला होता.

भरपूर अभ्यास .थोडासा व्यायाम . मस्त फिरणे.हाच माझा उद्योग होता.
आमच्या घराजवळ मोगल लेन होती.नि तेथे विंदा नि श्री.ना. पेंडसे राहत होते असे माझ्या ऐकिवात होते .
त्या निवांत गल्लीतून कधी फिरताना त्यांचे कधी दर्शन होईल का ..?असे सारखे वाटायचे.नि मी तर मनाने अगदी श्रीमंत होऊन जायचो.......!!

[परत कधीतरी ]

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मुंबईत .. मनाने श्रीमंत होउन जगण्याची मजाच काही और.

लेखमाला खुपच ह्रद्यस्पर्षी आहे... आवडली.

त्यावेळी चंद्रावर गेलेले नील आर्मस्त्रांग ह्यांची मिरवणूक उघड्या गाडीतून काढण्यात आली ती मिरवणूक सीतला देवी टेम्पल रोडवरून गेली

खरेच आर्मस्ट्राँगची मुंबईत मिरवणुक निघाली होती ? माझ्यासाठी हे नविनच आहे.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jan 2012 - 1:28 am | प्रभाकर पेठकर

माहीम, तेही 'त्या' काळातले. बर्‍याच आठवणी असतील. तेंव्हाची मुंबई आणि आजची मुंबई ह्यात जमिन अस्मानाचे अंतर आहे.
पण लेखात म्हणाव्या तेवढ्या आठवणी आणि म्हणाव्या तशा आलेल्या वाटल्या नाहीत. असो.

नील आर्मस्ट्राँगच्या मिरवणूकी बाबत मीही साशंक आहे. खरच अशी मिरवणूक झाली होती मुंबईत?

नील आर्मस्ट्राँग त्याचे सहकारी चांद्रयात्री बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांच्यासह मुंबईत आला होता, तारीख होती ऑक्टोबर २६, १९६९. ही बातमी वाचा.
त्यानंतरही नोव्हेंबर १९९५ मध्ये तो पुन्हा भारत भेटीला आला होता.

पण या आठवणींच्या कालखंडाविषयी जरा गोंधळायला झालं, कारण '"त्याच दरम्यान चक्र कादम्बरीवर हिंदी सिनेमा निघाला होता" असं म्हंटलंय, पण आर्मस्ट्राँग १९६९ मध्ये मुंबईत आला, चक्र कादंबरीवर त्याच नावाचा हिंदी सिनेमा निघाला १९८१ मध्ये.

लेख आवडलाच. बर्‍याच गोष्टींची पुन्हा उजळणी झाली. धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

24 Jan 2012 - 12:05 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. बहुगुणी.

नील आर्मस्ट्राँग बद्दलची बातमी नजरेतून सुटली होती असे म्हणावे लागते आहे. कदाचीत ते माझे अकरावीचे वर्ष होते म्हणून असेल (तिथेही फारसा प्रकाश पडला नाहीच).

रेवती's picture

24 Jan 2012 - 4:33 am | रेवती

लेख आवडला.

पियुशा's picture

24 Jan 2012 - 9:44 am | पियुशा

प्रकाशजी ,
तुमची ही सिरिज पहिल्या भागापासुन वाचत आहे ,अगदी गुन्तवुन ठेवले आहे ,मस्त लिहीता तुम्ही :)
लिहीत रहा ,वाचत आहे :)
पु.भा.प्र. !

उदय के'सागर's picture

24 Jan 2012 - 1:02 pm | उदय के'सागर

कसं काय बुवा तुम्हाला एवढं लक्षात राहतं, कमाल आहे. तुमच्या स्मरण-शक्तीला सलाम.

[मला तर भुतकाळातलं (विशेषतः बालपणातलं) काहि लख्खं/स्पष्टं पणे आठवत असेल तर ते म्हणजे आई-बाबांच्या हातचा (कधी पायाचा ही) खाल्लेला मार :D :D :D]