[खूप जुन्या जुन्या दादाने सांगितलेल्या लहानपणीच्या आठवणीचे तुकडे गोळा करीत बसलोय. गोष्टीवेल्हाळ दादाने अगदी लहानपणीच्या आठवणी.सांगितल्यात .त्या आठवणी म्हणजे आमच्या सर्वांच्या जिवाभावाच्या अगदी आजच्या वाटाव्या ईतक्या ताज्या वाटत आहेत .मन लांबवले की हाताला लागतील असे वाटून जातेय. ह्या आठवणीत तुम्ही रमलात सुखावलात तर धन्य वाटेल. कदाचित आपल्याही काही लडिवाळ आठवणी आठवू लागतील. ...बघा..वाचा !!]
अगदी लहान होतो. ४-५ वर्षाचा. मला आठवून जातेय माझे एक गाव. नाव -श्रीगोंदा. नगर जिल्ह्यात असलेले. आम्ही रहात होतो ते अगदी गावाबाहेर. जंगलच वाटावे असा परिसर.
त्याकाळी वीज नव्हती.रात्री नुसता काळोख.
घरात ओगल्यांचे हिरवे कंदील.
कंदील म्हटले म्हणजे मला तो हिरवा कंदिलच डोळ्यासमोर येतो.
घर म्हणजे बंगलाच अगदी नदी ओलांडून गेले की हाकेच्या अंतरावर बंगला होता. सरकारी बंगला.
आजूबाजूला वस्ती नाहीच . अवाढव्य आवार.
संध्याकाळी काजवे दिसायचे.
दूरवरच्या शेतातील झोपडीत दिव्याचा मिणमिण प्रकाशाचा ठिपका अंधार अधिक भयान करायचा .
बाबा बर्याच वेळा फिरतीवर
घरी आम्ही चार भावंडे नि आई.
सोबत रात्री जागले असायचे. तेवढीच सोबत.
एकदा सकाळी सकाळी जाग आली .उठलो. अंगणात गेलो. बघतोय तर अंगणात ४-५ कोंबड्या मस्त दाणे टिपत हुंदडत होत्या. करमत नव्हते म्हणून घरात कोंबड्या आल्या. सकाळी सकाळी त्याना झाकलेल्या डालग्याजवळ जाऊन माकडछाप दंत मंजनने दात घासत कोंबड्यांची किलबिल ऐकत बसायचो.मस्त वाटायचे. मग ४-५ दिवसात कोंबडा आला. पांढरा शुभ्र. तुरेबाज कोंबडा. संध्याकाळी त्याला चुलीवरून ओवाळून ठेवला.
असे का ..?
अशाने तो कोठे पळून जात नाही.
सकाळी सकाळी त्याच्या मस्त बांगेने आमची झोप उघडायची तेव्हा किती मस्त वाटायचे.
कधी कधी कोंबड्या पांढरी शुभ्र अंडी द्यायच्या.
किती मस्त अंडी होती.
छोटी छोटी गोजिरवाणी.
मी ओंजळीत घेऊन त्यांचा मस्त सुगंध घ्यायचो.
आई आम्हाला दुधात अंड कालवून द्यायची .
दुधावर अंड्यातील पिवळ्या बलकांचे छोटे छोटे पिवळे ठिपके तरंगायचे
ते आंम्हाला मुळीच आवडत नसे.
छी किती घाण वाटायचे. .
कोंबडीची एक अपघाती घटना आमच्या बंगल्यात घडली. कधीकधी ती आठवली की मन कासावीस होते.
बंगल्याला जो व्हरांडा होता त्या व्हरांड्याला हिरव्या रंगाच्या लाकडी जाळया मारलेल्या होत्या.रेल्वे क्वार्टरला असतात तशा
बाहेर कोंबड्या खेळत होत्या .कशी कुणास ठाऊक कडेची जाळी धपकन पडली .नि त्यात एक कोंबडी जखमी झाली. तिला पाणी पाजले असे काही काही खूपसे केले .शेवटी तिने आपले हातपाय लांबवले. कोंबडी गतप्राण झाली
तेव्हा ही पाखरे मरतात ह्याची जाणीव आम्हाला होती .
मला आठवतेय की एका झाडाखाली आम्ही माती उकरून खड्डा तयार केला नि त्यात ती कोंबडी ठेवून तिच्यावर माती लोटली .
चांगला डोंगर तयार केला नि त्यावर जास्वदिचे फुल ठेवले .
वाईट तर वाटले .दुख झाले मग सहज थोड्यावेळाने तेथे गेलो तर खड्डा उकरून ठेवलेला . खड्डा मोकळा होता .
काहीतरी भूताटकीचा प्रकार असावा असे वाटून आम्ही गप्प बसलो .
अशाही घटना घडत होत्या
श्रीगोंदा म्हणजे भूतांचा गाव वाटत होता .
अशाही घटना घडत .पण आम्ही हे सर्व पटकन विसरूनही जात असू .
विसरण्यात देखील एक मजा असते.
मग दुखं देखील हसू लागते.
.कधी कधी मामा यायचा.मग नुसती मजा असायची.
बाबांनी आम्हाला दोन छोट्या सायकली आणल्या होत्या. माझी अगदी छोटी घंटीवाली .दादाची स्पोकवाली पण तीन चाकी .सायकल. मामा मोठ्या सायकलला दोरी बांधून आमच्या दोघांच्या सायकलला गाठ बांधून र्रेल्वेच्या डब्यासारखी जोडून सायकलने आम्हाला नदी किनारी घेऊन जायचा, तेव्हां किती मस्त वाटायचे, नदीवर अगदी धमाल यायची. पाणी एवढे स्वच्छ की नदीचा नितळ तळ स्वच्छ दिसायचा. आम्ही त्या वाळूत झरे खोदत बसायचो. तिथे पाणी यायचे.
काय जादू असायची कुणास ठाऊक. ....?
नदीवरून परत येता येता मामा एखादी कविता गुणगुणायचा.
कवी यशवंताची ती कविता होती -
"अजुनी कसा येईना पर्धान्या राजा
किरकिरती रातकिडे झाल्या तिन्ही सांजा "
मामा कविता म्हणे तेव्हा एक छान दृश्य डोळ्यासमोर उभे राही. त्याचे गुणगुणणे मस्त वाटे.
संध्याकाळ झाली आहे. रातकिडे किरकिरू लागली आहेत .अजून गायीच्या धारा काढायाच्या आहेत. पर्धान्या राजा अजून येत नाही म्हणून तिचा जीव कासावीस होत आहे.
आमचे दिवस छान चालले होते.
रंगी बेरंगी फुलपाखरासारखे गिरकी घेत झुलत होते.
अंगणात खूप गारगोटे होते.
पांढरट रंगाचे. अंधारात एकमेकावर घासले की छान प्रकाशाच्या ठिणग्या उडत.
ठिणग्यांची जादू आम्हाला समजली `होती. आम्ही रात्री अंधारात जाऊन गारगोटे एकमेकाला घासत असू. नि ठिणग्याची चकमक बघत बसू .
कधी कधी आई संध्याकाळी आंबेमोहर तांदूळ शेगडीवर ठेऊन त्याचा भात बनवीत असे . त्या भाताचा सुगंध घरभर पसरे. दूध-साय भात म्हणजे आमची मस्त मजा होती.
काही काही जीवघेण्या घटना घडत होत्या.
एके दिवशी आईची मैत्रीण पहाटे पहाटे स्टेशनवर उतरली. टांग्याने एकटीच येत होती नदी ओलांडली नि तिला त्या माळवदावर एक दिवा तरंगताना दिसला. एवढी घाबरली की तिला तापच भरला . काय झाले म्हणून तिलां भेटणे झाले. तिची हकीगत ऐकून दुसर्या दिवशी पहाटे पहाटे बाबा नि त्यांचे दोन मित्र काय प्रकार आहे म्हणून बघावयास गेले. कालचीच घटना त्याना दिसली.
दिवा तरंगताना दिसू लगला. थोडीशी घाबरगुंडी उडाली. पण मनाचा हिय्या करून त्या दिव्याचा पाठलाग केला.
दररोज एक फकीर पहाटे पहाटे मशिदीत जात असे. अंगावरची हिरवट काळसर कफनीने अंधारात काहीच दिसत नसे . फक्त दिवा.
गूढ उकलले. बाईचा ताप पळून गेला.
असा हा प्रकार अशा रोमांचकारी आठवणी
मग आम्ही गावात घर घेतले.
गावाच्या बाहेर बंगल्यात आई जाम घाबरायची.
घर भाड्याचे
माडीवरचे.
ते घरपण भूताटकीने पछाड्लेय असे समजले.
आईला कोठेही भूत दिसायचे .तो काळच तसा होता .भुताने झपाटलेला ..!!
त्यात आमच्या ४-५ कोंबड्या माळवदावर उंडारत असायच्या. मी ४-५ म्हणतोय त्यातली एखादी आज लक्षात आहे. त्यातील एक कोंबडी आजारी होती.मलूल झाली होती. खिन्नपणे बघत बसलेली मला आठवते. काय झाले होते तिला कुणास ठाऊक. .?मरता मरता मला तिच्या मानेतून अंडे पडले असे वाटत होते. हा सगळा लहानपणचा भास आहे. पण तो भास मला अजूनही खरा वाटतोय..तेव्हा मी ४-५ वर्षाचा होतो .नि लहानपणीचे सर्व भास पक्के असतात. ते पुसले जात नाही कधीसुद्धा
.
श्रीगोंदा म्हटले म्हणजे मला हे सगळे दिसू लागते.
मामाचे गाणे -अजून कसा येईना पर्धान्या राजाच्या ओळी माझ्या भोवती फेर धरू लागतात .. नि मन जुन्या आठवणीत हरवून जाते ....
प्रतिक्रिया
7 Nov 2011 - 9:33 am | शिल्पा ब
स्मरणरंजन आवडले. मी सुद्धा ३-४ वर्षांची असताना श्रीगोंद्या होते. अंधुक आठवणी आहेत.
एक पायाने अधु असलेला दुकानदार होता त्याच्या दुकानात जाउन "गुजी गुजी ssss" म्हणजे गोळी गोळी केलं की एक गोळी द्यायचा. :)
घरमालकांची एक बरीच मोठी मुलगी मला वन टु शिकवायची. टेन पर्यंत बरं असायचं पण इलेवन नंतर टुलेवन यायचं.
7 Nov 2011 - 10:22 am | प्रचेतस
तुम्हाला श्रीगोंद्यात असे म्हणावयाचे आहे का?
7 Nov 2011 - 1:51 pm | स्पा
मी सुद्धा ३-४ वर्षांची असताना श्रीगोंद्या होते
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
7 Nov 2011 - 2:09 pm | किसन शिंदे
स्पाऊचे दात पडतायेत बहूतेक आता! ;)
8 Nov 2011 - 4:50 pm | वपाडाव
स्पावड्या, कुणाशी पंगा घेतो बे?
7 Nov 2011 - 10:01 am | पैसा
आपण अगदी लहान असतानाच्या आठवणी पुसल्या जात नाहीत. मला सुद्धा घर म्हटलं की मी लहान असताना ज्या घरात राहिले तेच आठवतं. एवढंच काय, कधीतरी स्वप्नातसुद्धा ते घर दिसतं!
7 Nov 2011 - 10:12 am | जाई.
आठवणी छान लिहिल्यात
7 Nov 2011 - 12:52 pm | ५० फक्त
लहानपणाच्या आठवणी छानच असतात, फक्त एवढंच की येताना डोळ्यात पाणी घेउन येतात.
''शरिरात ७०% पाणी असतं पण आपल्याला काहि लागल तर रक्तच का बाहेर येतं...???
आणी आपल्या ह्रद्यात १००% रक्त असतं मग आपलं ह्रद्य दुखावल तर डोळ्यात पाणीच का येतं ??'' साभार चेपुवरुन. ( एका मिपाकरानंच शेअर केलेलं आहे तिथं )
7 Nov 2011 - 3:08 pm | मदनबाण
मस्त लिहलय...
7 Nov 2011 - 3:36 pm | इंटरनेटस्नेही
मस्त लिहिलेय.
7 Nov 2011 - 3:37 pm | निनाद मुक्काम प...
मस्त लेख झालाय
मालगुडी डेज च्या आठवणी ताज्या झाल्या.
निष्पाप ,भाबडे बालपण तेही जर रम्य खेड्यात गेले तर त्यात मजा आहे.
शहरी बालपण ही एक सजा असते .
हे माझे निरीक्षण नसून ठाम मत आहे.
8 Nov 2011 - 5:13 pm | चेतन सुभाष गुगळे
<< शहरी बालपण ही एक सजा असते .
हे माझे निरीक्षण नसून ठाम मत आहे. >>
तुमच्या मताचा आदर आहे. परंतू माझा स्वानुभव याच्या अगदी उलट आहे. काही शहरेही अतिशय रम्य असतात. विशेषतः ज्या श्रीगोंदा ह्या गावाचा उल्लेख ह्या लेखात आलाय ते ज्या अहमदनगर जिल्ह्यात आहे त्यातल्या शहरी भागात माझे आजोळ (आईच्या बाजूचे) तर अहमदनगरातीलच वेगवेगळ्या खेड्यांमध्ये आमचे इतर नातेवाईक वसलेले होते / आहेत. त्यामुळे शहर व खेडे या दोन्ही ठिकाणी बालपणाचा काळ व्यतीत केला आहे. त्याशिवाय मी जिथे राहत आहे ते निगडी हे ठिकाणही शहरी भागच आहे. अर्थात तीन दशकांपूर्वीची निगडी व आजची निगडी यात फार फरक पडलाय हे ही तितकेच खरे.
आताची अनेक शहरे मानवी चेहरा हरवत चालली आहेत. अहमदनगर मध्ये ही आता पूर्वीप्रमाणे फारसे जायला आवडत नाही. पण माझ्या बालपणी निदान मी अनुभवलेली ही दोन शहरे (पिंपरी-चिंचवड व अहमदनगर) अतिशय रम्य होती इतके नक्की. त्यांच्याशी निगडीत माझ्या अनेक सुखद आठवणी आहेत.
9 Nov 2011 - 4:09 pm | वपाडाव
नगरच्या रम्य आठवणी काय हॅरी पॉटरच्या कुपीतुन नेल्या का निगडीत???
9 Nov 2011 - 4:12 pm | चेतन सुभाष गुगळे
माझ्या या आधीच्या प्रतिसादातील शेवटच्या वाक्यात निगडीत हा शब्द संलग्न या अर्थाने वापरलाय.
7 Nov 2011 - 7:55 pm | गणेशा
ऑफिस ला आज आल्याआला हा लेख वाचनात आला..
छान वाटले..
माझ्या गावचे माझे बालपण.. मस्ती सगळे आठवले...
धन्यवाद..
श्रीगोंद्या ला बर्याच दा जाणे झाले आहे पण आता परिस्थीती खुप वेगळी आहे..
असो ..
तरीही
"झाल्या तिन्ही सांजा " हे शिर्षक खुप समर्पक वाटते आहे ह्या लेखाला .. कसे वाटते आहे तुम्हाला ?
7 Nov 2011 - 7:07 pm | विलासराव
माझे ५वी,६वी चे शिक्षण महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा येथेच झाले आहे. माझी आत्या पारगाव(पानाचे) येथे असल्याने आजही तिकडे जाणे होते. आम्ही शनी चौकात तेली गल्लीत रहात होतो तेंव्हा. ते दिवस फारच मजेत गेले.
8 Nov 2011 - 10:37 am | प्रकाश१११
सर्वांचे अगदी मनापासून आभार.
ज्याच्या हे वाचून आठवणी जागृत झाल्या.
त्याबद्दल मला खूप समाधान वाटते आहे
धन्यवाद .!!
8 Nov 2011 - 10:37 am | प्रकाश१११
सर्वांचे अगदी मनापासून आभार.
ज्याच्या हे वाचून आठवणी जागृत झाल्या.
त्याबद्दल मला खूप समाधान वाटते आहे
धन्यवाद .!!
8 Nov 2011 - 11:31 am | नगरीनिरंजन
सुंदर लेख. खूप आवडला.
लहानपणीचे सगळे भास आणि सगळ्या आठवणीसुद्धा पक्क्या असतात.
माझ्या आईचं बालपण श्रीगोंद्यात गेलं. माझे आजोबा तिथे मामलेदार होते. तीसुद्धा त्या नदीच्या वगैरे अशाच आठवणी सांगत असते.