दुसरी नि तिसरीची परीक्षा देऊन मी एकदम चौथीत गेलो . जामखेड सारख्या छोट्या गावातून हे सहज जमून गेले . बाबांची बदली झाली... .थेट पुण्याला..!!
काय करावे समजत नव्हते.पुणे तसे मोठे शहर होते.जागा मिळेल की नाही हे देखील माहित नव्हते.
शेवटी निर्णय झाला : नाशिकला जाऊन राहण्याचा.
नाशिक म्हणजे आईचे माहेर
मामा तेथेच रहात. होते
दहीपूल . !!
आम्ही नासिकला आलो. सहा मामा आजी आजोबा नि त्यात दोघा मामांचे लग्न झालेले .
आणि रहायला फक्त दोन खोल्या
एकत्र राहणे शक्य नव्हते.
आई म्हणाली मी माहेरी राहणार नाही.आपण भाड्याचे घर घेऊ.
भाड्याचे घर घेतले. मामा आधाराला होतेच.
बाबांनी शुक्ल वाड्यात भाड्याने घर घेतले . जागा माडीवर होती.दोन खोल्या होत्या .पण बर्यापैकी मोठ्या होत्या.
नगरपालिकेचा भोंगा ,घड्याळ गल्लीच्या टोकावर होते.नगरपालिकेच्या जागेत मस्त उंच असे टॉवर होते .त्यात मोठ्च्या मोठे घड्याळ रात्री साडेआठला भोंगा होई.
मला तर त्या भोंग्याची भीतीच वाटत असे. नि खूप उदास वाटत असे.
दिवस उन्हाळ्याचे तरी हवा थंड होती नाशिकची
भद्र्कालीवर आंब्याची रासची रास असायची.त्या गावठी आंब्याचा सुगंध मस्त झिरपत असायचा.
भद्रकालीची कधीतरी आठवण आली की मला आंब्याचा सुगंधच येत असतो .
दादाची तब्येत जरा अशक्त होती .वैद्यांनी त्याला रोज आंबा द्या असे सुचवले होते.
आई रोज त्याला आंबा खावयास द्यायची.हे छान स्मरतेय.
आम्हाला घराजवळ नगरपालिकेची शाळा होती.शाळा नंबर अकरा.
त्याला जळका वाडा देखील म्हणत. .मोठीच्या मोठी शाळा. खरे म्हणजे प्रचंड वाडाच .
त्यावेळी चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा. एकदम अवघड. तेथे बोरूने लिहिणे पण होते.खर्डा वही होती.
धोतर घातलेले गुरुजी होते. अगदी धड्यातले पंतोजी वाटत .
धोतर
शर्ट
त्यावर काळा कोट
डोक्यावर काळी पुठ्याची टोपी.
भरघोस मिशा. बोडी-लाईन बॉलींग तशी नजर.
एकदम मारकुटे.
खेड्यातले शाळेचे दिवस मोठे मजेत गेले होते. मास्तर मोठे मायाळू नि माझ्यावर प्रेम करणारे होते .
माझा एक मामा त्याच शाळेत सातवीला होता.
शप्पत त्याचा आधार वाटत होता.
एकदा सहज त्याच्याशी बोलत होतो.
मास्तरने बघितले नि मला दबदबा पाठीत धपाटे मारले.
का मारले हे अजूनही मला समजले नाही.
शुक्ल वाडा छान होता.त्यांच्याही घरात सात -आठ मुले असावीत.त्या वाड्याला छान पडवी होती.नि त्या पडवीत झोपाळा होता.
त्या झोपाळ्यावर बसून संध्याकाळी मुले परवचा म्हणत असत.
पावकी
निमकी
पाऊनकी
मी कधी जिना चढता चढता हे सर्व कानी पडायचे नि माझ्या पोटात गोळाच उठायचा. ..!
वाटायचे किती ही पोरे हुशार...!!
कसे सगळे पाढे छान लयीत म्हणतात ही ..?
कसे होणार आपले. ..??
नि चौथी म्हणजे बोर्डाची परीक्षा ..
मला चांगले आठवतेय .आईने तेथे कोकिळा व्रत केले होते. गावाच्या बाहेर जाऊन कोकिळेचे दर्शन घ्यायचे .मगच जेवावयाचे.
त्यावेळी नाशिकचे सी.बी.एस. किंवा कोर्टाजवळ गच्च झाडी नि जंगलच होते. कोर्टाजवळ कोठेतरी आईची एक मैत्रीण राहत होती.
आई त्यानिमित्ताने तिच्याघरी जाई.
नासिक म्हटले की मला आईचे कोकिळा व्रत आठवते.
नि मला खूप सुख देऊन जाते.
एकदा मी नि मामा कोठून तरी येत होतो. रस्त्याने म्हणजे आड्ग्ल्लीने आम्ही येत होतो.
एक मुलगा म्हणजे मला वाटतेय १०.१२ वर्षाचा असावा.हातात दोन टिनचे टिफिन नि तोंडात बिडी .बिडीचे झुरके घेत मस्त चालला होता.
मी मामाला म्हणालो -कारे ,बिडी ओढणारे पोरे मवाली असतात ना ..?
मामाने माझ्याकडे डोळे वटारून बघितले.
पण माझे बोलणे त्याला ऐकू गेले असावे.
त्याने ते डबे खाली ठेवले.
अगदी अभिताभ बच्चन स्टाईलने .तोंडातली बिडी फेकली.
हलकेच जवळ आला.
त्याने मामाच्या कमरेला मिठी मारली.नि डोके नको तेथे लावून पाय ओढले. मामा खाली पडला .
नासिक म्हंजे मवाल्यांचे गाव .असेच माझ्या डोक्यात घट्ट बसले.
शुक्ल वाडा सुटला.कसा सुटला.? का सुटला ..?काहीच आठवत नाही.
मग कोठावर घर मिळाले. गायधन्यांचा वाडा. वाड्याच्या बाजूलाच सरदारजींची धर्मशाळा.
कोठ छान दोन मजली उंच होता.जवळूनच गोदावरी नदी वाहत होती.अतिशय सुंदर बांधलेली नदी म्हणजे नाशिकची चौपाटी होती.
दुपारी दुपारी बायका धुणे धुण्यास नदीवर येत. धुणे धूत असताना ते बघणे म्हणजे मोठी मौज वाटे. साबणाचा फेस सापासारखा पाण्यावर तरंगत असे .
नदी म्हणजे चौपाटीच होती.मे मध्ये पाणीपुरीचे स्टोल मकाजी कोंडाजिचा चिवडा भेळ असे छान मिळत असे.
एक शेर चिवड्यावर एक शेर चिवडा फुकट अश्या कुणा चिवडेवाल्याच्या पाट्या लागलेल्या आठवणीत आहेत .
नदीकिनारीच मोठमोठ्या पत्र्यांचे दुकाने लागत. तेथे आईस्क्रिम मिळत असे. पॉटमधले आईस्क्रिम बनविताना बघण्याची मौज काही निराळीच वाटे.
जवळच काळाराम मंदिर तसे नारो शकराचे देऊळ होते.सीता गुंफा होती.
पंचवटी होती. सगळेच वातावरण कुंभमेळ्यांसारखे भरलेले नि भारलेले होते.
सितागुम्फेत शिरायचे म्हणजे मलातर मोठीच भीती वाटे. कोणी पाप केलेतर तो गुंफेत अडकून जातो असे म्हणत.
हट्टीपणा म्हणजे पाप असेल तर आम्ही पक्के हट्टी होतो. आणि अडकून पडू असे खूप वाटत होते.
नाशिकला पाऊस तर कहर पडायचा. मोठा पूर नदीला यायचा.एकदा तर कोठाच्या खाली तीन-चार फुटापर्यंत पाणी चढले होते.नि आता महाप्रलय होतो की काय असे वाटून गेले होते.
नासिकला पूर बघणे हे अतिशय थ्रील होते.माणसे खास पूर बघण्यास येत सरकारवाड्याच्या सात पायर्याला पाणी लागले की आख्खे नासिक बुडणार असे सगळे म्हणत .
मामा बरोबर आम्ही नदीवर जात असू. ते व्हिक्टोरिया ब्रिजखाली पोहत नि आम्ही त्यांचे कपडे सांभाळीत बसत असू.
एके दिवशी आम्ही असेच नदीवर गेलेलो. कोणीतरी पुलावरून उडी मारीत होते.एका बाजूला खूप खोल पाणी आहे.पट्टीचे पोहणारे बरोबर तेथे उडी मारीत .एकाने अशीच उडी मारली.
नि बराच वेळ झाला तरी तो वर येत नाही म्हणून खूप गर्दी झाली. ज्याने उडी मारली तो पाण्यात हरवून गेला होता. अशाही घटना घडत.
नाशिकचे दिवस म्हणजे दररोजची दिवाळीच वाटे.
अभ्यासाची मात्र मला सतत कटकटच वाटत असे.
दररोज कोणी ना कोणी मामा आमच्या घरी झोपायला येत असत. त्यामुळे हसणे खिदळणे
नुसती मौज असे.
मग हलकेच नाशिकचे दिवस संपून गेले. चौथीची बोरडाची परीक्षा पास झालो .
नाशिक सुटले . बाबांची बदली मनमाडला झाली होती.
एक दिवशी आम्ही मिरजेला निघून गेलो.
आजीतर खूप रडली .आजोबांचे डोळेपण भरून आले.
.आमचे सुखाचे दिवस संपून गेलेत असेच वाटू लागले
माहेर सुटल्याचे दुख मी आईच्या डोळ्यात बघत होतो . ..!
प्रतिक्रिया
19 Jan 2012 - 9:08 am | मराठी_माणूस
छान स्मरणरंजन. हा साधारण कोणता कालखंड होता ?
खालील वाक्य सध्याच्या नाशिकच्या स्थितीचे योग्य वर्णन करणारे आहे.
19 Jan 2012 - 9:22 am | प्रचेतस
नासिक माझे आजोळ.
नासिकची खादाडी तर माझ्या खास आवडीची.
संध्याकाळी गावात जाऊन शालिमारजवळील शौकीन भेळ हाणणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव. डोळ्याची पापणी मिटायच्या आत भेळ बनून तिचा पुडा आपल्या हातात. भेळ खाल्यानंतर झटका पाणीपुरी तर मस्ट. चणे, बटाट्यावर तिखट ओतून त्याचा लगदा बनवायचा, मग पुरीत भरून त्यावर बर्फाळलेले थंडगार पाणी ओतायचे असा झटका लागतो ना की आहाहा.
कधी भद्रकालीजवळच्या सायंतारा मध्ये साबुदाणा वडा खायला जायचे, शेंगदाणा चटणीबरोबर गरमागरम वडा खाणे म्हणजे स्वर्गसुखच, मग तिथे जवळच असलेला राउतचा डबलजीरा मसाला सोडा मारायचा.
रविवार कारंजावरचे अननस सरबत विथ आईसक्रीम पण बेस्ट.
आणि ती पंचवटीवरची अंबिकाची काळा रस्सा असलेली मिसळ कोण विसरेल. फारशी तिखट नसलेली पण एकदम झणझणीत अशी ती मिसळ तर लै भारी.
19 Jan 2012 - 12:01 pm | सागर
वल्ली मित्रा,
आता मला तुझ्या भव्य दिव्य व्यक्तीमत्त्वाचे रहस्य कळाले. ;)
शालिमारजवळील शौकीन भेळ हाणणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव. डोळ्याची पापणी मिटायच्या आत भेळ बनून तिचा पुडा आपल्या हातात. भेळ खाल्यानंतर झटका पाणीपुरी तर मस्ट. चणे, बटाट्यावर तिखट ओतून त्याचा लगदा बनवायचा, मग पुरीत भरून त्यावर बर्फाळलेले थंडगार पाणी ओतायचे असा झटका लागतो ना की आहाहा.
नाशिक प्रेमात पडावे असेच आहे.
पुण्याइतकेच मला नाशिक देखील आवडते. किंबहुना तितकेच परिचयाचे आहे ,
मला एमजी रस्त्यावरच्या, वकीलवाडीतील पंचवटी हॉटेलसमोरचे पाहुणचार अजूनही आठवते. अगदी घरचे जेवण मिळते तिथे :)
19 Jan 2012 - 12:24 pm | प्रचेतस
पाहुणचार मला कसे बरे आठवत नाही?
पंचवटीत तर खूप वेळा जेवलेलो आहे आणि हो ती मेनरोडवरची सुरती कढी भेळ पण लै भारी. परत ते देवळाली क्यांपातील गरिबदासाची भजी पण एकदम झकास. ;)
19 Jan 2012 - 3:34 pm | सागर
पाहुणचार मला कसे बरे आठवत नाही?
अरे पंचवटी हॉटेलच्या अगदी समोरच आहे. थोडे आतल्या बाजूला असले तरी पाहुणचार असा फलक मात्र तिथे आहे. सध्या ते सुरु आहे की नाही याबद्द्ल कल्पना नाही. पण पाहुणचार ज्या पद्धतीने चालायचे त्याची आठवण करता अजूनही ते सुरु असावे :)
19 Jan 2012 - 9:36 am | मराठमोळा
आठवणी चांगल्या असतात,
पण हा लेख पाहून एखाद्या शाळकरी पोराने नाशिक (नासिक नव्हे) वर निबंध लिहिल्यासारखे वाटले. :)
कृ. हलके घेणे. :)
बाकी नाशकातली सातपूर एमआयडीसी मधील 'शामसुंदर' मिसळ, शालीमारजवळची गार्डन मिसळ आणि मुगाचे भजे, पाववडे, कॉलेजरोड, गंगापूर रोडची हिरवळ, नवश्या गणपतीचं मंदीर, नाशिकरोडचं मुक्तीधाम आणि तिथली भेळ-वडापाव, दत्तमंदीर, विजय ममता थिएटर, दसक-पंचक, गोदावरीवरचा धबधबा, सोमेश्वर, निसर्गरम्य त्र्यंबकेश्वर रोड, कसरत करून घेणारे पांडवलेणी, नॅशनल थर्मल पॉवर प्लँट (इथे एंट्रंसला टाकाऊ वस्तूंपासून मोठा शक्तीमान बनवला आहे), सिडकोमधली वर्दळ, हे सगळं डोळ्यासमोरून तरळुन गेलं. :)
19 Jan 2012 - 9:30 am | मराठी_माणूस
योग्य निरिक्षण
19 Jan 2012 - 9:33 am | प्रकाश१११
प्रतिक्रिया वाचली. ह्या आठवणी शाळकरी मुलाच्याच आहेत.नासिकपण माझे आजोळ.नेहमीच नाशिकला जाणे होते.
आजचे काही संदर्भ येऊ नयेत हे कटाक्षाने पाळले. वल्लीजिनी लिहिलेले सर्व मला माहित आहे.अंबिका मिसळ आज कालचीच आहे.
समजून घ्याल ही अपेक्षा .
19 Jan 2012 - 10:45 am | मराठी_माणूस
गावाच्या नावात सातत्य ठेवा.
19 Jan 2012 - 9:53 am | ५० फक्त
छान आठवणी, एवढ्या जवळच्या लोकांत लहानाचे मोठे झालात, खुप खुप भाग्यवान आहात.
19 Jan 2012 - 10:43 am | पियुशा
मस्त आठवणी ,लिहीत रहा वाचत आहे :)
19 Jan 2012 - 12:06 pm | सागर
प्रकाशजी,
अगदी भावपूर्ण लेख आहे.
नाशिकचे दिवस म्हणजे दररोजची दिवाळीच वाटे.
या मताशी मी अगदी सहमत आहे.
माझ्या आयुष्यातील कित्येक आनंदाचे क्षण नाशिकमधेच मला मिळाले आहेत.
अजून अनुभव वाचायला आवडतील.
नाशिकचे काळाराम मंदीर , गंगापूर डॅम, सोमेश्वर, कॉलेज रोड, मेन रोड, वकीलवाडी आणि पांडवलेणी या ठिकाणी मी खूप वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे नाशिकशी एक घट्ट भावनिक नाते माझेही जुळलेले आहे.
19 Jan 2012 - 1:29 pm | उदय के'सागर
नाशिक म्हणजे दिवाळी.... अगदी १००% खरे. त्यात तुमचं बालपण अगदी नाशिक मधे(गावात - जुन्या नाशकात) गेलं ... तिथे तर खरचं दररोजच दिवाळी आहे असं वाटतं.
दहिपुल, फुल-बाजार, सराफ्/कापड बाजार, मेन-रोड, एम.जी. रोड, तिवंधा ते दामोदर टॉकिज, सायंतारा-भद्रकाली ते फुले-मार्केट, शालीमार ह्या रस्त्यांवर तर कधिही फिरतांना असं वाटत कि दिवाळी - दसरा तोंडावर आलाय आणि लोकांची खरेदी साठी गडबड चालु आहे :) ... अर्थात सद्ध्या वाढत्या लोकसंख्येमुळे ह्या जागा त्या मानाने छोट्या वाटु लागल्यात आणि कचरा/घाण सहाजीकच जास्तच जाणवतो , पण लहानपणी ह्या गोष्टिंच काहि ज्ञान वा गांभीर्य नसल्यामुळे मजा वाटायची इथे फिरतांना, खरं तर आजहि ह्या (घाण/ गर्दी) गोष्टींकडे जरा दुर्लक्ष केलं तर तसाच बालपणिचा अनुभव येतो. :)
(बाकि नाशिकची कलिकेची यात्रा - नवरात्रं हा हि एक अविस्मरणिय अनुभव आहे, पण एवढ्यात तिथे फारच म्हणजे 'अशक्यं' गर्दी असते त्यामुळे तिथे अगदि बिल्कुल जावे वाटत नाहि. )
19 Jan 2012 - 2:29 pm | मराठी_माणूस
तिवंध्या पर्यंत जाउन तोंड गोड करणार्या बुधा ला विसरलात का ? :)
19 Jan 2012 - 7:30 pm | उदय के'सागर
कसं विसरेन, अत्ता परवाच - संक्रांतीला आठवण आली होती बुधाची :) तसे म्हंटले तर ह्या वाटेवरचे असे बरेच खाऊ-घरं आहेत ;) ... जसं कि,
मेनरोड - सुरती फरसाण (कढीभेळ), भगवंत राव, पांडे मिठाई (दुध) ... आणि बरेच
एम.जी. रोड - कुलकर्णिज पाव-भाजी, डेरी - डॉन... आणि बरेच
दहिपुल - रमेश दुग्धालय :)
(बाकि बर्याचश्या ठिकाणांचा उल्लेख येथे झाला आहेच अगोदर)
काय हो, कशाला मला ह्या खादाड आठवणी काढायला उकसवलत :P ... हि खादाडी अता कशी शमवावी (especially नाशिक मधे नसतांना :() ?
19 Jan 2012 - 8:10 pm | प्रचेतस
ओ ते मकाजी, माधवजी, कोंडाजीचा कोणीच कसा काय उल्लेख केला नाय बरे.
त्यात स्टेट बँकेवरचा आदर्श समोसा, कापसे की बादशाही कुल्फी एकदम अफलातून.
19 Jan 2012 - 3:05 pm | सुधीर मुतालीक
नाशिक आता खूपच बदललंय!म्हंजे आपलं लिखाण वाचताना जे डोळ्यासमोर आले त्या पेक्षा खूप वेगळं. मी ९१ साली नाशकात आलो. त्यानंतरच्या वीस वर्षातच प्रचंड बदल झालाय. त्यामुळे तुम्ही केलेलं वर्णन खूप छान वाटलं. आपल्याला माहिती असलेल्या ठिकाणाची नवीन ओळख होताना मजा येते. तुम्ही छान लिहिलंय. हल्ली गेल्या दोन तीन वर्षात एक नवीन मिसळीचा स्पॉट झालाय आणि तो बऱ्यापैकी मान्यता पावलाय. मखमलाबादमध्ये आहे. नाशिक मध्ये मखमलाबाद ची मिसळ म्हणुन फेमस आहे. मिसळ तर चांगली असतेच, पण आणखी एक मजा येते ती तिथे पर्यंत ड्राइव्ह करण्याची. ड्राइव्ह कमी असतो, फार फार तर वीस मिनिटाचा पण एग्दम सेक्सी ! खूप मजा येते.
19 Jan 2012 - 3:42 pm | मराठी_माणूस
एका महत्वाच्या जागेचा उल्लेख आला नाही तो म्हणजे "मेहेर". खुप "हॅपनिंग स्पॉट" होता. ते गेल्यावर तिथली शानच गेल्या सारखी वाटते.
राजदूत हॉटेल, त्या पुढचा तो विशाल वटवृक्ष (गेला बिचारा)
येवलेकर मळ्याच्या जवळची शेते . त्याच्या आसपास आलो कि थंडगार हवा यायची.
19 Jan 2012 - 7:01 pm | तिमा
जुन्या काळची माणसे नाशिकला जाण्याबद्दल 'नाशकास ' जाणे असे का म्हणत ?
19 Jan 2012 - 7:58 pm | प्रकाश१११
सर्वांचे अगदी अगदी मनापासून आभार.आपण सर्व नाशिकचे .नाशिकला गेलेले.राहिलेले. आपणाला नाशिक खूप आठवून गेलेले दिसतेय. आणि आपण खूप हळवे झालेले दिसताय.
आपण लिहिलेल्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेच.नाशिकला मी नेहमीच जात असतो.ह्या आठवणी फार जुन्या आहेत. चौथीच्या मुलास जे दिसले ते चित्रित करण्याचा
प्रयत्न केला आहे.त्यात कोठे जुने नि नवे प्रसंग एकत्र होऊ नये ह्याची काळजी घेतलीय. सगळे प्रामाणिकपणे आणि अगदी खरे चितारण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा गंगेवरची मिसळ होती.पण कधी खाल्ल्याचे आठवत नाही. मकाजिचा चिवडा किंवा आईस्क्रीम कधीतरी खाल्ल्याचे आठवते.
आणि त्यावेळी कोठे असे खाणे शक्यही नव्हते.
आता खूप हादडत असतो तो भाग निराळा.
गोल्फ ग्राउंड त्यावरची सर्कस . हे सगळे सगळे बघितले आहे.
आमच्या लहानपणी वकील वाडी होतीच.परंतु गोळे कॉलनीपण असावी असे वाटते. डाक्टर करमरकर पण होते .अतिशय नेक परंतु कडक डाक्टर . त्यांचे पुत्र वी .वी. करमळकर क्रिकेटचे लिखाण करीत असत.
असो .खूप लांबन होईल.
परत कधीतरी.अशाच आठवणी.
19 Jan 2012 - 8:55 pm | गणेशा
काका ..
तुमची ही स्मरण रांगोळी खुप आवडते..
प्रत्येक ठिपक्या वरती वसलेल गाव, तेथील आठवणी .. त्या आठवणींनी त्याच काळात जावुन एक होणे ..
अप्रतिम ..
संपुर्ण रांगोळी ऐकायला खुप आवडेल ..