दो बोटी चिरा गल्ली म्हणजे ऐस- पैस रोडच होता . तिथेच आमचे घर होते. भाड्याचे.
मी सांगतोय ती नगरची आठवण आहे.
घरात खुपसा अंधार होता. पण तेथे एक छान होते.घरात वीज होती. बटन दाबले की भळकण प्रकाश सांडायचा
बटन खाली-वर करणे नि त्या प्रकाशाची गंमत बघणे.
आमचा छान खेळच होऊन गेला होता.
असे करण्यात खूप मजा वाटत होती
लहान होतो. शिशु वर्गात.
बाबांनी छान अंकलिपी आणली होती. त्यात मस्त चित्रे होती.
हत्ती ,घोडा,कोंबडा ,कावळा .काय नि काय
त्यांचा गुळगुळीतपणा मी गालावरून फिरवायचो आणि असे सारखे सारखे करण्यात किती मजा यायची
मग ही मजा मी पुन्हा पुन्हा घ्यायचो .
पुस्तके वाचण्यासाठी असतात हे माहीतच नव्हते.
ती बघण्यासाठी असतात .
त्यांचा वास छातीत भरून घ्यायचा म्हणजे किती मस्त वाटायचे. हे सर्व मला सुख देत होते.
अंकलिपीत अ, ब ,क ,ड, आहे
१,२,३,४, आहेत
मला काही घेणे-देणे नव्हते.
अंकलिपी जवळ हवी.नि त्यातली चित्रे बघायला हवीत .एवढेच सुख मला खूप होते.
बाबांच्या सरकारी कागदावर त्यांच्या सारखे गिचमिड काढणे मला छान जमू लागले होते
आणि असे फराटे मारून मी बरेचशे बाबांचे कागद खराब करीत होतो.
कधी कधी मार पण खात होतो
आणि मला असे करण्यात खूप आनंद वाटत होता .
खूप मजा येत होती
दो बोटी चिरा गल्ली खूप मस्त होती . दुपारी चारच्या दरम्यान नगरपालिकेच्या पाण्याची गाडी गल्लीतून जात असे.
गाडीच्या मागे जाळीदार पाईप असे त्यातून रस्त्यावर पाण्याचा फवारा फिरे नि एक छान सुगंध मातीचा येत असे.
तेव्हा खूप छान वाटत असे.
संध्याकाळच्या कोवळ्या सावल्या गोळा होत असत. हवेत छान गारवा असे.
नि पाखरांची भिरी आभाळात दिसे .
आमची संध्याकाळ लडिवाळ होऊन जाई.
आई देवाजवळ निरांजन लावे.
त्या प्रकाशात आईचा चेहरा किती प्रसन्न दिसे.
कधी नगरची आठवण आली की मला अशी आई आठवून जाते.
नि काळीज गलबलून जाते.
आई शेगडीवर कधी आंबेमोहर भात लावी नि त्या भाताचा सुगंध घरभर दरवळे.
तूप मेतकुट भात असा छान बेत असे. .
त्या काळी नगरला टांगे होते. टांग्याचे घोडे अगदी उमदे वाटायचे .काळे- ढवळे .मस्त घोडे .
टांग्याची आठवण काढतोय पण टांग्यात कधी बसल्याचे आठवत नाही.
कदाचित टांग्याची आठवण हरवून गेली असेल .
कधी कधी रोडवर घोड्याची मस्त लिद दिसे. हिरवी गार .बघायला खूप छान वाटे.
अजून एक आठवण म्हणजे घोड्यासाठी गल्लीच्या टोकाला पाणी पिण्यासाठी हौद बांधलेले असत
कधी कधी टांगेवाले घोड्याना पाणी पाजताना दिसत.
घोडे पाणी पिताना आम्ही त्यांच्याकडे बघत बसत असू
कधीकधी आम्ही रेल्वे स्टेशनवर जात असू .तेथील बाकावर बसून गाडी आली की तिची गम्मत बघत बसत असू .
रेल्वे स्टेशनवर एक निराळेच चैतन्य असे . चाय वाल्याचा आवाज .वडेवाल्याचा आवाज .
त्या आवाजालां एक निराळाच नाद ,लय नि चंव होती .
त्या बाकाच्या मागे एक गुलमोहराचे झाड होते .
त्याची लाल फुले छान वाटत . .
गाडी गेली की सगळा शुकशुकाट होत असे.
गाडीचा काळा काळा धूर आभाळात रेंगाळत असे.
तो जाम्भळा रेशीम धुराचा गुंतवळा बघणे खूप आनंद असे .
त्या दगडी कोळशाचा खरपूस वास मस्त वाटे
कधी कधी घरी जात असताना स्टेशन जवळच्या चाळीसमोर दगडी कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या दिसायच्या नि त्याचा वास आसमंतात रेंगाळत असायचा.
अजूनही कधी कधी त्या आठवणीचा गंध मला येत असतो.
कधीतरी आम्ही हरणे पाटलांच्या शेतात हुरडा खाण्यासाठी गेल्याचे आठवते.
नगरकडे हुरडा पार्टी म्हणजे मोठी मौज असे
ज्वारीचे कणसे शेकोटीत घालून भाजायचे नंतर त्याची दाणे हाताच्या तळव्याने चोळून अलग करून लसणाच्या चटणी बरोबर खाण्याची जी मौज असे त्याचे वर्णन काय करावे. ..?
त्या हुरडयाची आठवण आली की अजूनही तोंडाला पाणी सुटते.
नि किती काळ गेलाय हुरडा कधी मिळालाच नाही.
हरणे पाटील तसे नगरपासून थोडेशे दूर छोट्या खेड्यात राहत होते.
हरणे पाटील ह्यांचे आम्ही हरणे पाटील असे नाव का ठेवले त्याची मजेशीर आठवण आमच्या खिशात आहे .
हरणे पाटील अतिशय शांत वाटत .
नि त्यांच्या घरी एक हरीण पाळलेले होते.
आम्हाला कधी त्या हरिणाची आठवण आली तर आम्ही पाटलांच्या घरी चल म्हणत असू.
कधी दादा कोठे कोठे म्हणायचा .
तर मग मी म्हणायचो हरणे पाटीलकडे नि त्यांचे नाव पडले हरणे पाटील....!!
एकदा असेच श्रावणात त्यांच्या घरी गेलो.
मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वागत केले.
झाडाखाली तीन -चार खाटा ठेवल्या होत्या .
त्यावर सतरंज्या टाकल्या होत्या .आम्ही सर्व त्या खाटांवर बसलो होतो.
सकाळची वेळ होती .
आजूबाजूला ४-५ बकर्या बे बे करीत झाडपाला खात होत्या. खूप छान वाटत होते.
थोड्या वेळात एका ट्रे मध्ये ५-६ साबुदाण्याच्या खिचडीने भरलेल्या डिश कोणीतरी घेऊन आले.
खिचडी म्हणजे अगदी आमचा जिवकी-प्राण
सगळ्याना खिचडी दिली .
आम्ही चमच्याने खिचडी तोंडात टाकली नि एकदम त्यातली सगळी मजा गेली.
ती खिचडी साखर टाकून केलेली.
गोड शिर्यासारखी...!
आणि आम्हीतर तिखटाचे मारे.
मी तर खिचडी बाजूला ठेवली.
आईने डोळे वटारले .....,
पण ती गोड खिचडी खाणार कोण ....?
श्रावणात कधी कधी मला त्या खिचडीची आठवण येते. नि आईचे डोळे वटारणे
मला आठवतेय नगरपासून जवळच रामेश्वर होते. खूप खोल दरी. खाली पायर्या उतरून जावे लागे.
दरीच्या तळाशी एकदम भयानक वाटे. सर्वत्र भीतीचा गच्च काळोख पसरलाय असे वाटे . .
दरीच्या कोपर्याला वरून पाणी कोसळत असे.
त्या कोसळणार्या पाण्याला जो दगड मारेल नि त्या धबधब्याला ज्याचा दगड लागेल तो ह्या जगाचा राजा होईल अशी एक आख्याईका होती.
सीतेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा रामाने बाण मारून हा पाण्याचा धबधबा निर्माण केला होता.
हा धबधबा कधी आटत नाही.
नगर जिल्हा म्हणजे दुष्काळाचा गाव नि तेथे हा धबधबा म्हणजे खरोखरच नियतीचे वरदान .
मग आम्ही सर्वांनी दगड मारून ह्या जगाचा राजा होण्याचे प्रयत्न केले.
माझा दगड पाच फूटपण गेला नाही.
मला छान आठवतेय आई सायकल शिकत होती . मी आणि आई गावाच्या बाहेर गेलो होतो.
सर्वत्र शुकशुकाट होता.
आणि एकदम धस्स झाले एका गाईच्या वासराला ३-४ कुत्र्याने फाडून ठेवले होते. वासरू जमिनीवर मरून पडले होते.
हे दृश्य अजूनही कधीतरी माझ्या स्वप्नात येते नि मला घाम फुटून जातो .
नगरची आठवण आली की मला हे सगळे दिसायला लागते.
नि रामेश्वर किती लांब असेल असे वाटू लागते....
हुरडयाची चव आठवून जाते
नि आभाळात वेलांटी घेत जाणारा तो दगडी कोळशाचा जांभळा धूर मला दिसू लागतो ..
दुपारी पाण्याचे फवारे मारीत जाणारी गाडी दिसू लागते
नि एक थंड थंड आठवण मन चिंब करून जाते . ..!!
प्रतिक्रिया
10 Nov 2011 - 10:29 am | पियुशा
व्वा व्वा मस्त लिहिलत हो :)
रामेश्वर म्हनजे डोन्गरगण का? कारण तिथे पन एक सितेची न्हानि अन धबधाबा आहे
दो बोटी चिरा गल्ली कोनत्या भागाबद्द्ल लिहिलेल आहे मला तर नाही माहित ,बहुतेक आता वेग्ळ नाव असेल त्या भागाच
10 Nov 2011 - 11:09 am | नगरीनिरंजन
तुमच्या आठवणींमध्ये नगर खूपच कमी आले आहे. माझ्या आठवणींचे मोहोळ उठवण्याचे काम मात्र तुमच्या लेखाने चोख केले.
10 Nov 2011 - 11:18 am | छोटा डॉन
आता मोहोळ उठलेच आहे तर लेख येऊद्यात ननीशेठ :)
मुळ लेखही उत्तम ...
- छोटा डॉन
10 Nov 2011 - 11:49 am | योगप्रभू
प्रकाशजी,
आपण नमूद केलेली 'दो बोटी चिरा' ही गल्ली अथवा रस्ता नसून एक मशीद आहे. त्याचे ठिकाण कोर्ट गल्लीच्या मागे आहे. तिला दो बोटी चिरा म्हणण्याचे कारण म्हणजे त्या मशिदीत असलेल्या एका दगडाच्या चिर्यात केवळ दोन बोटे मावतात. (लहान मुलापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत कुणाचीही केवळ दोनच बोटे. प्रयत्न करुनही तिसरे बोट मावत नाही) अर्थात आपल्या बालपणी आपण या मशिदीजवळ राहात होतात त्यामुळे त्याला 'दो बोटी चिरा गल्ली' म्हणणे चुकीचे नाही, पण नगरकरांमध्ये या नावाने गल्ली असल्याचे माहीत नाही.
शेतातील हुरडा, ही आयुष्यभर लक्षात राहणारी आठवण. कुणी शेतकरी मित्रान बोलवले तर दुग्धशर्करा योग, पण एरवीही आपण हा आनंद घेऊ शकतो. नगरजवळ हिसळक-निम्बळकजवळ (एमआयडीसी) 'साईबन' येथे, दौन्ड रस्त्यावर पान्जरपोळ येथे, अकोळनेर रस्त्यावर 'रानवारा' येथे आणि अन्य ठिकाणी अजुनही समोर भाजलेल्या कणसांच्या हुरड्याची लज्जत घेता येते. गावात हिरवागार व गोड असा तयार 'सुरती हुरडा'पण विकत मिळतो. तो आणून घरी कढईत भाजायचा, पण हा अगदी शेवटचा पर्याय आणि दुधाची तहान ताकावर पद्धतीचा. हुरड्याची खरी मजा शेतातच.
असो, छान लिहिता. बालपणीच्या जुन्या नगरबद्दल आणि व्यक्तीचित्रांबाबत अजून येऊद्या.
10 Nov 2011 - 7:58 pm | यकु
औरंगाबाद जवळ्च (दौलताबाद घाटातील दरीत) हिरण्य रिसॉर्ट नावाचे एक मस्त हॉटेल आहे.
हुरडा, मांडे खायचे असतील तर एकदम ब्येश्ट जागा.
मांडे वगैरे तर अगदी आपल्या समोरच तयार केले जातात.
एकदम हिरवेगार आणि शांत हॉटेल.
दरीत असलेल्या हा हॉटेलच्या वरच्या बाजूला मोमबत्ता तलाव आहे.
खाण्याची ऑर्डर द्यायची आणि मस्त तलावाच्या बाजूने फिरुन यायचं..
आणखी एक व्हॅल्यू अॅडीशन म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी हिरण्यच्या शेजारील डोंगराच्या पडसावलीतुन प्रकट होणारा निद्रिस्त बुद्ध दाखवला जातो.
डोंगराच्या सिल्हौटीतुन दिसणारा असा निद्रिस्त बुद्ध चीन मध्ये एके ठिकाणी आणि दुसरा हिरण्यजवळच दिसतो असे हॉटेलवाला सांगतो. तो त्या चीनमधल्या निद्रिस्त बुद्धाचा फोटोही दाखवतो.
10 Nov 2011 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर
व्वा मजा आली वाचताना. बालपणीचा काळ सुखाचा. मस्त लिहीलं आहे.
10 Nov 2011 - 12:14 pm | मदनबाण
झकास ! :)
10 Nov 2011 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतांना मजा आली.
-दिलीप बिरुटे
10 Nov 2011 - 1:20 pm | विलासराव
मस्त आठवणी आहेत.
आम्ही नालेगावात अमर धामच्या समोर रहात होतो.
मी त्यावेळेस बालवाडीत जायचो गांधी मैदानात.
आम्ही रहायचो त्या मालकाच्या म्हशी होत्या.
एकदा माझ्या वडीलांनी माझ्या मोठ्या बहीनीला म्हशीला शिंगे किती? असे विचारले. तर ती म्हणे एक. मग परत तिला खाली जाउन म्हैस बघायला पाठवले तरी तिचे उत्तर एकच. असे २-३ वेळेस झाले.
मग वडील तिच्याबरोबर गेले तेव्हा तिने शेपटी दाखवली. नंतर बरीच वर्ष आम्ही तिला चिडवायला विचारायच आक्के म्हशीला शिंगे किती?
मि खुप लहान होतो तरीही मला कटलेले पतंग पकडायला केलेली धावपळ आठवतेय. लहान असल्याने माझ्या हातात कधीही पतंग यायचा नाही. आई मला समजावयाची पण मी काही ऐकत नव्हतो. मग शेजारच्या एखाद्या मोठ्या मुलाला माझी दया येई आनी एखादा पतंग मला मिळे. मग तो फाटेपर्यंत मग तो उडवत बसायचो. आनी फाटला की मग तोंड बारीक करुन आईकडे आलो की तिच्या लक्षात यायचे.
मग कधीतरी ती मला नवीन पतंग घेउन द्यायची.
पुढे मग ११-१२ वी अहमदनगर कॉलेजला केले. आनी मग ईंजीनिअरींग विखे पाटील ईंजी. विळद घाट येथे केले. आयुश्यातील बराच काळ नगरला घालवला आहे. त्यामुळे बर्यावाईट खुप आठवणी आहेत
10 Nov 2011 - 1:22 pm | ५० फक्त
आठवणी आवडल्या, पण मुळ कुळ कवीचे असल्याने तुम्ही ' माझे बालपण ' हा निबंध सुद्धा कवितेच्या वाटेनं लिहिला आहे असं वाटलं.
एकुण लिखाण आवडलं,
येत्या जानेवारीत हुरडा कट्टा करुयात. नगरचे आजी,माजी, भावी, नगर माहेर असलेले, सासर असलेले व इतर सर्व) मदत करतील अशी अपेक्षा आहे.
11 Nov 2011 - 11:12 am | प्रकाश१११
सर्वांचे मनापासून आभार.ज्याना नगर आठवले नि जुन्या आठवणीत हरवून गेले.रमले.
नि सर्वांनी छान प्रतिसाद दिलात . आभार. .!!
11 Nov 2011 - 11:12 am | प्रकाश१११
सर्वांचे मनापासून आभार.ज्याना नगर आठवले नि जुन्या आठवणीत हरवून गेले.रमले.
नि सर्वांनी छान प्रतिसाद दिलात . आभार. .!!