आठवणीतले गाव- मनमाड...!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जनातलं, मनातलं
1 Dec 2011 - 9:27 am

अगदी रखरखीत उन्हाळ्यात आम्ही मनमाडला आलो
फुफाट्यातून नागड्या पायाने चालता चालता तळपाय भाजल्याची अजूनही आठवण आहे
मनमाडला कसे आलो तर फारसे आठवत नाही .
परंतु आम्हाला छत्रे हायस्कूल मध्ये टाकले एवढे आठवते.
छान ईमारत होती. दगडी ईमारत. नि पुढे भव्य पटांगण.
तेव्हा त्या शाळेत सुत-कताई होती.
सुत कताई कशाशी खातात काहीच माहित नव्हते.
कापसाचा चेंडू एवढा बोळा देऊन टकळीने त्यातून सुत कातायचे असे काहीतरी होते.
ते सगळे बघून जाम बोर झालो. कंटाळून गेलो .
शाळा बदलली नि मला वाटते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो .
मला आठवतेय ती शाळा रेल्वे स्टेशनजवळ होती
घरापासून तशी बरीच लांब होती.पण तेथे सूतकताई नसावी.म्हणून आनंद होता
सकाळची शाळा
कारण सकाळी सकाळी १०च्या दरम्यान काशी एक्स्प्रेस धाड धाड करीत स्टेशन मध्ये घुसताना दिसे .तेव्हा इंजिन मधून काळ्या धूरांचा लोंढा बाहेर पडताना नि तो बघायला खूप मजा वाटायची. त्या धुराचे मस्त काळे काळे कुरळे कुरळे धुराचे झुपके अस्ताव्यस्तपणे आभाळात तरंगत रहायचे.
नि गाडीची कर्णकर्कश्य शिटीने क्षणभर सराना धडा देणे बंद करावे लागायचे. .
शाळेच्या खिडकीतून हे बघायला खूप छान वाटायचे. त्या धुराचा छान वास झिरपत राहायचा.
अशावेळी सर मोठ्या आवाजात कविता म्हणत असत
खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या
कुणा गावचे पाटील आपण
कुठं चालला असा
ही शिव ओलांडून तिरसा
अशी ही मस्त कविता शिकवीत राहायचे . नि त्याचवेळी आमच्या कवितेच्या चिंधड्या उडवीत ही काशी एक्स्प्रेस गाडी धाडधाड करीत स्टेशनात घुसत असे
ऐन पावसाळ्यात गुरुजी एक कविता शिकवीत असत .ती कविता मला एकदम आवडून गेली.
उसळत घुसळत फेसाळत जल धावे चोही दिशांनी
आले नवे नवे पाणी

ह्या कवितेने मला खूप भारुन टाकले. कधी पावसाळ्यात असे पाणी मला दिसले की मला ही कविता आठवून जाते
नि मी अगदी हरवून जातो

मनमाडला तर रूळा जवळच्या चाळीचाळीतून घरासमोर दगडी कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या दिसत नि त्या कोळशाच्या धुराचा वास मस्त वाटे
मनमाडची आठवण आली की मला त्या दगडी कोळशाच्या शेगडीतून वेलांटत थिरकणारा धूरच दिसू लागतो नि त्याचा वास मला येऊ लागतो
आमचे घर चंदनवाडीत होते..ऑफिस कडून बाबाना जागा तेथे मिळाली होती. तेथे सगळी बकाल वस्ती होती. त्यावेळी तर होती .आता माहित नाही.
मनमाडची हवा तशी गार होती. थंडीत छान थंडी होती .
मला आठवतेय आम्ही मनमाडला मे मध्ये आलो. मनमाडलाही उन्हाळा कडक होता. पाणी खराब असावे.
मला वाटतेय विहिरीचे पाणी. सगळा उन्हाळा मी तापाने हैराण झालो होतो. चक्क मुदतीचा ताप .
अन्नावर वासना नाही. नि पाहुण्याची ही धमाल. नि मी गादीवर कण्हत पडलेलो. आणि सगळे आंब्याचा रस खाण्यात गुंतलेले.
कधीकधी सगळे चोरून आईस्क्रीमपण खात असावे नि माझ्या समोर अगदी गप्प
जसे आपण त्या गावचेच नाही.
मलातर जाम राग नि राग यायचा.
मग कधीतरी आई तिन्ही सांजेला माझी किरकिर काढायची . त्या किरकिर काढण्याने मला खूप बरे वाटायचे . एक काळ्या कपड्याची चिंधी वळून ती तेलात बुडवून तिला पेटवायची नि तिला शिव्या देत देत किरकिर काढायची. बारीक बारीक आगीचे ठिपके पू पू असा चिक्तार करीत जमिनीवर पडायचे नि आई तिला शिव्या देत माझी किरकिर काढायची .अशा ह्या किरकीरीची आठवण जेव्हा जेव्हा मला येते तेव्हा मला खरेच खूप बरे वाटते.मन हरवून जाते .
ते दिवसच तसे होते
कातर दिवस होते.
संध्याकाळी घरातले दिवे मिणमिण जळत असत.
बाहेर देखील छोटे छोटे बल्ब खांबावर थेंब होऊन ठिपकत असत.
रात्री किर्र शांतता असे.त्यामुळे सगळां माहोल गोठून गेल्यासारखा वाटत राही
रातकिडे किरकिरत असत
कोठेतरी भुताच्या गप्पा हलक्या आवाजात चाचपडल्या जात असत
देवाजवळची निरांजानही फार प्रसन्न नव्हती वाटत मला नि अशात तापाने बेजार.म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीना भुताटकीचा मस्त वास येत असे.

अशावेळी अंगावर पांघरून घेऊन मस्त झोपण्यात जी मजा वाटे तिचे मी काय वर्णन करू. ....?
कधी कधी आम्ही बाबांच्या ऑफिसात जात असू. ऑफिस रेल्वे स्टेशन वरच होते
संध्याकाळची वेळ असायची .छान झुळझुळ हवा गोंजारत असायची . स्टेशन वर जत्रा भरली असे वाटत राही. गर्दी ,गोंधळाचे एक निराळेच रसायन असायचे गाडी उभी असायाची
संध्याकाळी स्टेशन बघणे मोठे मजेचे असायचे.बाहेर एखादी मालगाडी उभी असायची .इंजिन मधून वाफा बाहेर पडत असायच्या. २-३ कावळे हवेत तरंगत असायचे .त्यांचे काळेपण देखील मन मोहून घ्यायचे.गुलमोहराचे एखादे झाड लाल लाल फुले घेऊन मस्त उभी असायचे असे ह्या स्टेशनचे .छान चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे आहे .
प्रत्येक गावाची एक निराळीच चव असते. माझे डोळे बांधून जरी मला माझ्या अनेक गावत घेऊन गेलात तर मी पटकन त्या गावाचे नाव सांगेल ,
अशी अशी चव मग हे हे गाव .मनमाडची चव निराळीच होती.
ह्या चवीने निराळेच भास आपल्याला होऊ लागतात . तुम्ही तुमच्या गावची चव आठवून बघा. नि एक चवीचे गाव डोळ्यासमोर नाही आले तर मला विचारा
मनमाडची चव निराळीच होती.
आणि चंदन वाडीची तर अजून निराळी .
मनमाड म्हटले की मला त्या चाळी आठवू लागतात नि सकाळी सकाळी त्या शेगडीतील दगडी कोळशाचा धूर नि पाट्यावर जांभळ्या नि चांदीच्या रंगाचे बोटभर लांबीचे मासे घासताना ,त्यांचे खवले काढताना त्या स्त्रियां दिसू लागतात. नि मला मनमाड दिसू लागते.
सकाळी सकाळी किंवा पहाटे पहाटे मला कोंबड्याची बांग ऐकू यायची . नि ती बांग मला स्वप्नात घेऊन जायची. कोंबड्याची बांग मला पहाट आठवून जन्म घेते.
एक बिनधास्त असे गाव म्हणजे मनमाड .
पाकीटमाराचे गाव म्हणजे मनमाड
बकाल गाव म्हणजे मनमाड
तरीही मनमाडची आठवण आली की मला ते गाव आवडून जाते.
मनमाडच्या आठवणी दाटून येतात .नि मला मनमाड दिसू लागते.
मनमाड म्हणजे गावपण नसलेले गाव
गावपण नसलेले गाव म्हणजे मनमाड
अनेक गावचे माणसे येऊन झालेले गाव म्हणजे मनमाड
सरमिसळ गाव
तरीही ते गाव .
माझे आवडते गाव . आठवणीतले गाव.
एखादे वांड पोर जसे आईला प्रिय असते तसे माझे आवडते गाव.
जेथे माझे बालपण हरवून गेले .जुन्या आठवणीत सेव्ह झालेले हे गाव.
आठवणीतले गाव .

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पियुशा's picture

1 Dec 2011 - 9:40 am | पियुशा

मस्त चालु आहे मालिका येउ द्यात अजुन !
मला तुमच्या स्मरणशक्तिचे खरच कॉतुक वाट्ते :)

जाई.'s picture

1 Dec 2011 - 9:43 am | जाई.

छान आठवणी

प्रभाकर पेठकर's picture

1 Dec 2011 - 2:11 pm | प्रभाकर पेठकर

आठवणीतील गावात शाळेच्या पलीकडे काही विशेष मुद्दा दिसला नाही. गावाचे वर्णन कोठे आहे?
शाळेच्या मुद्यानंतर कथा उगीचच वाढविल्यासारखी वाटली.
पालीची ओढून-ओढून मगर करण्याचा प्रयत्न असे म्हणता येईल.

आठवणीतले गाव म्हंटल्यावर शाळा, स्टेशन, नदी, खेळण्याची ठिकाणे, प्रेमप्रकरणे असतील तर भटकण्याच्या जागा, बाजार, विशिष्ट सणवार, गावच्या जत्रा, गावच्या प्रथा, गावकर्‍यांचे स्वभावविशेष, स्थानिक पिके, फळफळावळ, एस्टी स्टँड अशा अनेक गोष्टींचे वर्णन यावे. सोबत छायाचित्र असतील तर अधिक परिणामकारक होईल.

पुढील, आठवणीतल्या गावांसाठी शुभेच्छा...!

अशोक पतिल's picture

2 Dec 2011 - 7:34 am | अशोक पतिल

छान अनुभव ! लहानपनी आगगाडीने जाताना मनमाड, नादगाव ही स्टेशने लागायची. गाडी तिथे ३०-४० मिनीटे थाबायची. इजिन मधे कोळसा वा मोठ्या पाइपने पानी भरायचे. गाडी मधॅ सर्व बाकड्या खाली शेगदान्याची टरफले पड्लेली असायची. हा तुमच्या भावविश्वातील सुखद अनुभव आहे.