कधीकाळी झालेल्या कविता

यकु's picture
यकु in जे न देखे रवी...
23 Dec 2011 - 4:20 am

कधीकाळी झालेल्या कविता

(1)

वेळही अशी ती होती
उगवती न फटफटलेली
पक्षीही तुरळक जागे
नुकतेच जरा फडफडले

माणसे होऊन जागी
चालली खाया वारा
या शांत पहाट वेळी
ती मला भेटते म्हटली

आलीच पहा ती आली
येताच तिला ओळखले
मी मनात माझ्‍या गुपचूप
सांगूच नको मी म्हटले
ती बसली अगदी चुपचूप

अशी दोघे गुपचूप बसता
बोलणे खुंटले अ‍गदी
पण बोलून काही ना येता
ती कसली भेट म्हणावी

सावरुन मी हे वदलो
डोळ्यात तुला साठवण्‍या
मी रात्र-पहाट ही केली
पाहून घेऊ दे आता
तुज सुंदर शांत सकाळी

ते वस्त्र रंग गुलाबी
मुखचंद्र अनावरण करता
ह्रदयास हुडहूडी भरली
नजरेस तिच्या त्या वरता

बोलास काही ना सुचले
ते मूक-मूक गलबलले

शेवटी तिने पाहियले
त्या निष्‍ठुर घटिकायंत्री
मी येते आता म्हटली
मी येते आता म्हटली

ही कविता आम्ही एका यक्षिणीवर फिदा झाल्यानं उद्भवली होती हे वेगळं सांगायला नकोच. ती यक्षिण नंतर कुठल्यातरी नाडीवैद्याच्या शालीला पदर बांधून आगीभोवती फिरली म्हणे! हे कळालं तेव्हा दुधो नहाओ पुतो फलो म्हणून (मनातल्या मनात) आम्ही मोकळे झालो. आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्‍याचा वहीम होता म्हणे (हो, मी तेव्हा त्यांना कॉलनीभर आमचे सासरे असेच म्हणत असे). तर असो.
कुणाला कविता कळली नसेल तर सांगतो की - कवितेत वर्णन केलेली भेट होण्‍यापूर्वी आम्ही एकमेकांना समोरासमोर पाहिलं नव्हतं.
पुढे-पुढे जिथं ही भेट झाली ती पूर्ण जागा विकत घेऊन ती संरक्षित स्मारक करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. पण ती जागा कोर्टाच्या जागेत मागे असल्याने प्लॅन बारगळला.

आज ही कविता विनोदी वाटते. याचे सगळे श्रेय बालभारती, युवकभारती ही पुस्तकं रचणार्‍यांना जाते. आता उगाच यमक जुळवण्‍यासाठी गुपचूप-चुपचूप असे शब्द वापरल्यावर, अनघड घडामोडी व्यक्त करण्‍यासाठी बालभारती, युवकभारतीतल्या जुन्या क‍वींच्या टायली मारल्यावर प्रेमकविता पण विनोदी होणार नाय तर काय होईल?

- पण जेव्हा कविता होत असत तेव्हा मी माझ्‍या मित्राला चहा पाजवण्‍याच्या मिषाने टपरीवर नेऊन हळुच त्याच्या कानात कविता ओतत असे. नंतर त्यानं चहाच सोडला म्हणे!
बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.

(2)

मौनाच्या अभेद्य काळ्या पत्‍थराआडून
स्फुरणांच्या नाजुक झुळझुळीचे गीत
असेच चुकून माकून कधीतरी ऐकू येते

हे गीत इतकं चंचल की
मुखड्याचा अर्थ लागतो न लागतो
तोच त्यानं सम देखील गाठलेली असते

या गीताला शब्द देणं हा खरा गुन्हाच
पण या शब्दांना आर्जवं करुनही
न उजवताच परत पाठवावे लागणे
ही खरी निर्लज्ज नामुष्‍की

शब्द बिचारे
लादलेल्या अर्थाच्या प्राक्तनाचे ओझे वाहात
कागदावर उतरतात
शब्द उतरूनही मी मात्र
त्या मौनाच्या अभेद्य काळ्या पत्‍थरालाच कान लाऊन असतो

नंतर पुढे कविता कशा होतात ते थोडं पाहिलं होतं तर ही कविता झाली होती.

(3)
शब्द शब्द मुका
अर्थ सदा वांझोटा
वादाच्या हाती सदा
संवादाचा खराटा

मेंदूत भरली विचारांची जळमटे
त्यात फडफडती कल्पनांचे किडे
शोधती सदा तत्त्वांचे आधार
हा सगळा उधारीचा बाजार

प्रज्ञा कुपोषणाने मेली
बुद्धी पोटामागे गेली
मन बसले गाणी गात
फिडलवाल्या नीरोची त्याची जात

आणि काही लोक म्हणे चंद्रावर गेले
उद्या सूर्यावरही जातील; आणखी कुठेही मसणात जातील
पण या आतल्या जगाचं काय?

कविता होत नसल्याने चिडून उगाच बळंबळं केलेली ही कविता.

हास्यकरुणअद्भुतरसशांतरसनाट्यइतिहासकथाकवितामुक्तकव्युत्पत्तीविनोदराजकारण

प्रतिक्रिया

स्पा's picture

23 Dec 2011 - 10:05 am | स्पा

मस्त रे... :)

गवि's picture

23 Dec 2011 - 10:09 am | गवि

तिसरी जाम आवडली रे यशवंता...तुला आख्खी आर.सी. लागू..

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 10:33 am | अन्या दातार

बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.

हे वाचून खपल्या गेले आहे. :bigsmile: :bigsmile:

मन१'s picture

23 Dec 2011 - 5:35 pm | मन१

सहमत.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Dec 2011 - 10:56 am | मिसळलेला काव्यप्रेमी

शेवटच्या २ कविता खुप आवडल्या.
बाकी प्रेमात पडल्यावर होणार्‍या कविता या नेहमीच फक्त कविला आवडतात, असे कां? ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Dec 2011 - 11:23 am | llपुण्याचे पेशवेll

चायला येवढ्या सुंदर कविताना इतके कमी प्रतिसाद! छ्या!

मनीषा's picture

23 Dec 2011 - 12:17 pm | मनीषा

अरे वा ! मस्तच झाल्यात ... कविता .
अशाच अधून मधून होऊ द्यात . :)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2011 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्‍याचा वहीम होता म्हणे

हे वाचून एकदम आम्हाला 'जीत' मधला सण्णी पाजी आठवला ;)

कविता झकासच.

कपिलमुनी's picture

23 Dec 2011 - 12:59 pm | कपिलमुनी

"बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होतात "

जबर्‍या ..खतरनाक !!

पैसा's picture

23 Dec 2011 - 1:02 pm | पैसा

दुसरी कविता आवडली. जरा शब्दबंबाळ आहे, पण चालेल! पहिली वाचून ह.ह.पु.वा. तिसरी परत जिलेबी! एकूण पाकृ आवडलीच पण!

स्वातीविशु's picture

23 Dec 2011 - 1:03 pm | स्वातीविशु

ते वस्त्र रंग गुलाबी
मुखचंद्र अनावरण करता
ह्रदयास हुडहूडी भरली
नजरेस तिच्या त्या वरता

वाह्, वाह...३हि कविता छान झाल्या आहेत.

सोनल कर्णिक वायकुळ's picture

23 Dec 2011 - 3:37 pm | सोनल कर्णिक वायकुळ

तिसरी भन्नाट आवडली....कडक.

इन्दुसुता's picture

23 Dec 2011 - 8:55 pm | इन्दुसुता

पहिली कविता कुठ्ल्या वयात केली आहे याचे भान ठेउन वाचली तर अजिबात विनोदी वाटत नाही. त्या वयातील कवितेची जाण, शब्दांची जाण, शब्दांची निवड त्या वयाला शोभेल अशीच आहे.
त्या कवितेबद्दल तुम्ही काहीसे अपोलोजेटीक आहात असे जाणवते, तसे तुम्हाला वाटावयाचे काही कारण नाही असे सांगू इच्छिते.
लहानपणीच्या गोष्टी आणि खेळ मोठे झाल्यानंतर कदाचित पोरकट किंवा विनोदी वाटू शकतील पण लहान पणी तो एक जिवंत अनुभव असतो... तुमची इथे दिलेली पहिली कविता सुद्धा तशीच.
दुसरीतील शेवटची ओळ भावली अतिशय.

मनिष's picture

25 Dec 2011 - 12:58 am | मनिष

कधीकाळी 'झालेल्या' कविता...कितीतरी आठवणी चाळवल्या गेल्या. ती intensity, तो हळवेपणा आता नाही, पण यशवंतच्या कविता वाचल्यावर काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. तेंव्हा काय विचार केला होता, काय मनस्थिती होती ते सगळे आठवले...जमल्यास इथे नवीन धाग्यात डकवतो जमेल तसे!

थांकू रे यशवंत! :-)

वेगळाच प्रयोग. जाम आवडल्या सर्व.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2011 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रासंगिक कविता आवडल्या......! :)

-दिलीप बिरुटे

स्मिता.'s picture

26 Dec 2011 - 7:59 pm | स्मिता.

पहिली कविता वाचून हसायलाच आले. दुसरी आणि तिसरी आवडली. मधलं गद्य स्पष्टिकरण पण जबरा!

यकु's picture

26 Dec 2011 - 8:43 pm | यकु

धन्यवाद दोस्त हो!
:)

राघव's picture

26 Dec 2011 - 11:26 pm | राघव

तिसरी कविता अतिशय आवडली! :)

राघव

नगरीनिरंजन's picture

27 Dec 2011 - 11:30 am | नगरीनिरंजन

दुसरी आणि तिसरी छान आहेत.
कविता "होतात" याच्याशी सहमत आहे पण काहींच्या बाबतीत पोरं होतात तशा होत नाहीत तर जुलाब होतात तशा होतात.
कवितांच्या वासानेही चक्कर येणारे माझे काही मित्र कविता होत असेल तर डायपर लावा म्हणतात.
:smile:

प्यारे१'s picture

27 Dec 2011 - 12:10 pm | प्यारे१

कविता छान 'झाल्यात'

>>>>तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.

म्हणूनच विंदांसारखा एखादाच. सांगायचं ते सांगून झालं. आता बस्स म्हणणारा.
बाकीचे बरेच 'लिज्जत पापड' ;)
पापड सुरवातीला खाल्ला की खुसखुशीत असतो. नंतर सादळला की नाही चांगला लागत.
(कुणाचा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही.)