वेळ आहे कुणाला?

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
14 Oct 2011 - 9:25 am

मेंढरं ?
मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही?
आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही. त्यानंतर येणारे सरकार ‘आम्ही जनलोकपाल सुधारित करून त्यातील नियम थोडे फार शिथिल करू’ याच मुद्द्यावर निवडून येतील, हे काय कुणी भविष्यवेत्त्याने आम्हांला सांगायला हवंय का? मग का म्हणून मेणबत्त्या घेऊन मिरवत जायचं? का म्हणून चौकात जमून घोषणा द्यायच्या? का म्हणून आपला बहुमुल्य वेळ वाया घालवायचा?
ज्यांना घसा साफ करायचा आहे ते जातील मोर्च्यात ओरडायला. ज्यांना काही छंद किंवा विरंगुळा सापडत नाही ते जातील पाखरं पाहायला अन् त्यांची पिसं मोजायला. एकत्र जमण्याचं ह्यांना निमित्तच लागतं बरं का. त्यांच्या मनात आपला भारत स्वच्छ व्हावा असं ठासून रुतलेलं नसणार बहुतेक. एक ओरडला की दुसऱ्यानं बेंबीचा देठ ताणून घसा मोकळा करायचा. अन् एकानं मेणबत्ती पेटवली की बाकीच्यांनी मशाली घेऊन संध्याफेरी काढायची. हा सगळा प्रसिद्धीचा स्टंट वाटतो किंवा मरगळलेल्या जीवनावरची धूळ झटकण्याची फुंकर वाटते. तेच तेच करून ऐकून पाहून एक प्रकारचं साचलेपण येत जातं. जीवनाचा खळखळाट कायम राहिला तरच धबधब्याखाली भिजण्याची मौज येते. म्हणूनही कदाचित तुम्ही म्हणता ती मेंढरं मेंढपाळांमागे निघत असतील, धबधब्याखाली नाचत असतील. मुळात हे जे काही दिसतं आहे तो उथळत्या पाण्याचा खळखळाटच आहे. थोडंफार नाचायला बागडायला मिळालं की कोणीही अंग मोकळं करून घेतच असतो की...
असे नाचत येणारे हवशे नवशे गवशे हेरून काही पुढारी या खळखळाटी गंगेत हात धुवून घेत पवित्र होऊन जातात, पावन होऊन जातात, त्यांना घावन देखील पुढे मिळते. पण त्यांची ही चलाखी ना गंगेच्या ध्यानात येते ना त्या खळखळणाऱ्या पाण्याच्या लक्षात येते. जेव्हा ही मेंढरं भानावर येतात तेव्हा निवडणुका होऊन भलतेच लोक खुर्चीत बसलेले आढळून येतात, त्यांच्या हाती छडी असते व ते आता लोकशाहीच्या मेंढपाळाची भूमिका बजावणार असतात व त्यांची ठोकशाही अमलांत आणणार असतात. ज्यांना प्रामाणिक समजून आपण व्होट दिलेले असते, त्यांच्यातच आता खोट दिसू लागते अन् मतदानापूर्वी घेतलेली नोट आठवू लागते...
मग विचार येतो, जे आपण बदलू शकत नाही त्याची इत्यंभूत माहिती हवीच आहे कशाला? अशी मुद्देसूद इन्फोर्मेशन डोक्यात ठेवून एमपीएससी/युपीएससी द्यायचीय कोणाला? महागाई हीऽऽऽऽऽ वाढलेली असतांना कामधाम सोडून या अशा लष्कराच्या भाकरी थापायला कुणी सांगितलेय? त्या पेक्षा जे जे होईल ते ते पहावे असे तटस्थ राहिले तर बिघडले कुठे?
पण एक मात्र जरूर नक्की. या सर्व सिस्टीमच्या मुळाशी आपणच आहोत. आपण स्वतःच ‘नेक’ वागलो तर समोरचा ‘पैसे फेक’ म्हणेलच कसा? आपलेच हात शेणाने माखलेले असतांना ते घोषणाबाजीत वर उंचावून टीव्ही कॅमेऱ्यांना दाखवायचे कशासाठी? त्याऐवजी ती लाचेच्या शाईत रंगलेली बोटं व्होट मशीनचे योग्य बटन दाबण्याकामी वापरात आली तर नक्कीच फरक पडेल. याविषयी जागरूकता केली गेली तर आपल्याला ही नको असलेली यंत्रणा हमखास उलथवून टाकता येईल. पण हो... सीध्या उंगलीने योग्य ते बटण दाबण्यापूर्वी आपण टेढ्या उंगलीने घी काढलेलं नसलं पाहिजे... क्या समझे भिडू?
*************************** डॉ. श्रीराम दिवटे (पुणे) Shriram.divate@gmail.com
(पूर्वप्रसिद्धी- लोकमत-ऑक्सिजन पुरवणी. १४/१०/२०११.)

धोरणसमाजजीवनमानअर्थकारणराजकारणप्रकटनविचारलेखप्रतिक्रियावाद

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Oct 2011 - 9:45 am | श्री गावसेना प्रमुख

सीध्या उंगलीने योग्य ते बटण दाबण्यापूर्वी आपण टेढ्या उंगलीने घी काढलेलं नसलं पाहिजे... क्या समझे भिडू?५०० रुपये फुली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2011 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, व्यवस्थेतेतील खेदजनक गोष्टींबद्दल काय आणि किती बोलायचं. सालं आपण काहीही विचार करा. आपलं त्या मेंढराप्रमाणे चाललेलं असतं. एखादी मेंढी कळप सोडून नव्या मार्गाने निघाली की ती भांबावल्यासारखी होते आणि पुन्हा कळपात आले की तिला कोण आनंद होतो नाय का ? तसं आपलंही झालंय. अपवाद असलेली माणसंच मग मोठी होतात. असो,

बाकी, डॉक्टर साहेब, लोकमतमधील लेखनाबद्दलही अभिनंदन. लिहित राहा..!

-दिलीप बिरुटे