हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे.
का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस !
मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत ! सालार अघिलीने लिहिलेले !
आपण गावात, माणसात राहतो की विचार न करणार्या मुडद्यांबरोबर शवागारात असा संभ्रम माझ्या मनात उभा राहिला आहे ! माणसाला बंदिवासात टाकणार्या हुकूमशाच्या दडपशाहीला कंटाळून, वैतागून आपल्या बागेतल्या, दररोज ज्याचे गाणे कानाला गोड लागते त्या बुलबुलाला कवी म्हणतोय, आता मला तुझी नेहमीची शीळ गोड लागत नाही. असेल तुझ्यात हिंम्मत तर माझ्या बांधवांच्या मनात या जुलूमा विरूद्ध पेटून उठायची इच्छा निर्माण कर......
शेवटी टाकलेले गाणे ऐकायला मात्र विसरू नका !
स्वैरार्थ !
हे बुलबुलांनो उठा !
तुमच्या आक्रोशाने,
जागू दे माझ्या ह्रदयातील वेदना.
तुमच्या वेदनेच्या हुंकाराने,
अग्नीवर्षाव होऊ दे
आणि होऊ देत पिंजर्यांचे तुकडे
हे बुलबुल तुझ्या गाण्यात असु दे,
सुर मानवाच्या मुक्तिचे !
चिडलेला अग्नी श्वासांचा,
अन्यायाला वेढू दे ज्वाळांत.
जुलूम, जालीम शिकार्याचा,
घरटी उधवस्त या वादळात.
देवा, विश्वा, हे निसर्गा,
आमच्या रात्रीची पहाट होऊ दे.
या वसंत ऋतूत
फुले फुललीच नाही
का माझ्या डोळ्यातून
बरसत आहे पाणी.
हा तुरूंग,
माझ्या भग्न ह्रदया सारखा,
गुदमरलेला आणि अंधारा !
तुझ्या श्वासांच्या निखार्याने,
या पिंजर्याला आग लागु दे.
आत्ताच खुडू नकोस
निसर्गा माझ्या या फुलाला,.
बघ जरा या फुलाकडे.
त्याला जरा उमलू दे.
हे निष्ठूर बुलबुल,
आटप तुझा आर्त आक्रोश.
आता तरी !
येथे ऐका ऑर्केस्ट्रा
येथे ऐका जुन्या पद्धतीचे...
जयंत चिंतामण कुलकर्णी.
प्रतिक्रिया
17 Sep 2011 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
बहोत खुब!...फोटो,लेखन,२ही गाणी..सर्वच अवडले... :-)
काव्याचा स्वैरार्थ वाचताना,मला मोरे सरांच्या ''मुस्लिम मनाचा शोध'' या ग्रंथातील अरबी काव्याच्या स्वैरार्थाची खुप अठवण झाली...रचनांमधे बराच सारखेपणा आहे...
अवांतरः-पहिल्या फोटूतला बुलबुल ज्या कळ्यांवर बसलाय,त्यात खुप पाणी असते.लहानपणी आंम्ही त्या कळ्या(कळे)तोडायचो,आणी पुढचं टोक बारीक उडवुन दाबल्या,की रंगपंचमीच्या न्याचरल पिस्तुलचं काम येकेक कळी करायची...ह्ही ह्हा..ती अठवण आली... :-D
19 Sep 2011 - 4:44 am | बाळकराम
हे पुस्तक मला वाटते हमीद दलवाईंच आहे? मोरे सरांचं ( तुम्हाला सदानंद मोरे अभिप्रेत आहेत का?) नाही.
18 Sep 2011 - 11:41 am | पैसा
भावानुवाद आणि गाणे दोन्ही आवडले. 'सालार अघिली' आणि त्याच्या रचनांबद्दल जास्त माहिती द्याल का? म्हणजे नक्की कोणत्या पार्श्वभूमीवर त्याने हे गीत लिहिले, या गाण्याला इराणचं स्वातंत्र्यगीत का म्हटलंय, वगैरे कळलं तर गीताचा आस्वाद जास्त चांगल्या प्रकारे घेता येईल.
18 Sep 2011 - 12:24 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
खरे तर हे गाणे फार जूने आहे पण काही वर्षापूर्वी खोमेनींच्या राजवटी विरुद्ध वापरले गेले. तो संघर्ष तुम्हाला माहीत असेलच.
19 Sep 2011 - 9:24 am | ऋषिकेश
विमनस्क मनस्थिती आणि काहि करून दाखवण्याची उर्मी अश्या दोन परस्परविरोधी भावना एकत्रितपणे छान उतरल्या आहेत.
मुळातले गाणे कोणत्या भाषेत आहे? अनुवाद जरा खटकतो आहे