http://misalpav.com/node/17366 भाग एक
http://misalpav.com/node/17540 भाग दोन.
http://misalpav.com/node/17837 भाग तीन
डिसक्लेमर : लेखाद्वारे पोलीस यंत्रणेचे जनरलायजेशन करावयाचा लेखकाचा कुठलाही हेतु नाही. भाषा शक्यतो संयमित करण्याच्या प्रयत्न केला आहे. धन्यवाद.
त्यावरून रक्त खाली ठिपकत होते.तिचा हातही रक्ताळलेला होता. तिच्या उजव्या बाजूला फरशीवर, अर्ध-नग्नावस्थेत ,छिन्नविछिन्न झालेला , मृतदेह पडला होता.......
**************************************************************
शास्त्रीनगर पोलीस चौकीत, दररोजच्या प्रमाणे, आजही रेलचेल होती, नेताजी चौका मधल्या आन्टीच्या धंद्या वरचे एक-दोन 'बुंगारी' लॉक-अप मध्ये होते. एक रेडिओ-टेप चा संशयित चोर, एक सायकल चं टाळ सराईत पणे काढणारा आणि इतर काही तंटा-बखेड्याच्या निमित्ताने जमा झालेली मंडळी, मात्र मनोरुग्णालयातील प्रकरणाची कुठे ही वाच्यता नव्हती. तसेही नेमकं काय झालय ? याची थेट कल्पना, काही मंडळी शिवाय इतर कोणालाही नव्हती. हवालदार माने त्याच घटनेचा लेखी रिपोर्ट बनवत होते. अर्ध्या तासांपूर्वी पि.आय. दौंदे नी , डि.बी. हवालदार रमाकांत करता बोलावणे पाठविले होते.निरोप जाऊन एक तास भर आणि दुपारचे दोन वाजत आले तरी रमाकांत चा अजून पत्ता नसल्याने दौंदेसाहेब थोडेसे विचलित झाले होते. एकदाचा रमाकांत ने साहेबांच्या केबीन मध्ये येऊन 'जयहिंद' केला आणि दौंदेनी मानें ना केबीनमध्ये बोलावले.
दौंदे : माने ! लेखी रिपोर्टचे नंतर पाहू. सध्या रमांकात ला तोंडी माहिती द्या.
माने : हो साहेब, तुम्ही सकाळी सातच्या सुमारास फोन केल्यावर मी , रात्रपाळी चे सब-इन्स्पेक्टर झा साहेब आणि लेडी कॉन्स्टेबल पाटील असे तिघे घटनास्थळी गेलो. मनोरुग्णालयातील , स्त्री-वार्डातल्या, तळमजल्यावरील, खोली क्रं सहा मध्ये खुन झाला होता. खून करणारी महिला व मृतदेह तेथेच होता. तेथील कर्मचार्यांमुळे मृतदेहाची ओळख पटली. ते शव तिथेच काम करणार्या एका वॉर्डबॉयचे होते. आम्ही फोटोग्राफर आणि अँब्युलन्स मागवून घेतली. फोटोग्राफर घटनास्थळी हजर होईपर्यंत सकाळचे नऊ वाजले. तिथे झा साहेबांनी केलेल्या प्राथमिक तपासणी नुसार ,रात्री तीनच्या सुमारास, बलात्कार करण्याच्या इराद्याने हा वॉर्डबॉय त्या खोलीत शिरला असावा व त्याला प्रतिकार करताना महिलेच्या हातून हा खून घडला असावा असे वाटते.
दौंदे : माने, बलात्कार झाला हे मेडिकल रिपोर्ट शिवाय नक्की सांगता येणार नाही. तिथे त्या महिलेने काही स्टेटमेंट दिले का ? शिवाय तिथे काय काय सापडले ते सांगा.
माने : तिने फक्त गुन्हा कबुल केला, इतर कुठल्याही प्रकारच स्टेटमेंट केले नाही, शिवाय कुठल्याही प्रकारचा आगळा प्रकार केला नाही. उलट तिनेच आम्हाला ज्या शस्त्राने खून केला ते ताब्यात दिले , आम्हाला तिथे एक रक्त लागलेला लोखंडी सळई सारखा टेकू , दोन वापरलेली इंजेक्शन्स, एक रिकामी इंजेक्शन ची बाटली, एक अर्धी संपलेली देशी ची क्वार्टर आणि एक बिडी बंडल सापडले आहे. ते इंजेक्शन म्हणजे भुल देण्याचे औषध आहे, असे पंचापैंकी एक असलेल्या थेरपिस्ट ने सांगितले. शिवाय अंथरुणावर झटापट झाल्याचे , पांघरुणांचा चुरगळा झाल्याचे दिसत होते, महिलेच्या अंगावरील सलवारचा काही भाग फाटलेला होता. मृतदेहाच्या अंगावरील कपडे रक्ताळलेले व महिलेच्या अंगावरील सलवार पॅन्टवर रक्ताचे शिंतोडे आहेत. त्या महिलेने बलात्कार, खून झाल्यानंतर कपडे पुन्हा घातले असावेत असे वाटते,पण तिने तसे काही म्हटले नाही.
दौंदे : पुढे ?
माने : आम्ही तिथेच त्या महिलेला, नाव सुनंदा, वय साधारण..
दौंदे : हे डिटेल्स रिपोर्ट मध्ये आहेत ना ? आता पुढे सांगा !
माने : आम्ही तिथेच त्या महिलेला अटक केली , दहाच्या सुमारास फोटोग्राफर ने आपले काम संपविले. आम्ही रितसर पंचनामा केला.वॉर्डबॉयचे प्रेत ससुनच्या अँब्युलन्स मध्ये टाकले. त्या अँब्युलन्स मध्ये मृतदेहाबरोबर दोन सेवक होते.त्याच्या मागे जीप मध्ये झा साहेब, मी, लेडी कॉन्स्टेबल आणि संशयित आरोपी असे निघालो. बदाम चौकात आम्हाला दोन रिक्षा आडव्या आल्या. त्यांपेकी एका रिक्षाने समोरून धडक मारली आणि आम्हाला काही कळायच्या आत, त्या दोन रिक्षांमधुन साधारण आठ ते दहा हत्यारबंद इसम बाहेर पडले. सर्वांनी चेहरा झाकला जाईल असा रुमाल बांधला होता. काही लोकांच्या हातात तलवारी होत्या व तीन इसमांकडे गावठी कट्टे होते. झा साहेबानी आपली रिव्हॉल्वर काढण्याआधी च त्यांच्यावर वार करण्यात आले, त्यांनी तो वार वाचवण्याच्या नादात हातावर घेतला . त्यांच्या हातातून रक्त वहायला लागले होते.
त्या मंडळी नी त्यांची रिव्हॉल्वर हस्तगत केली. काही मंडळी जीपच्या मागच्या दिशेने गेली. तिथे लेडी कॉन्स्टेबल च्या डोक्यावर तलवारीची मुठीने प्रहार केला, त्यांच्या डोक्यातून रक्त आले त्यानंतर ती मंडळी संशयित आरोपीला जीपमधून बाहेर ओढु लागले. ती जागेवरून हलायला तयार नव्हती, कोणीतरी तोंडावरचा रुमाल सरकावत ' अग मी बाळ्या आहे , बाळ्या आहे ! ' असा आवाज आल्यावर ती उठली. त्यानंतर तिला एका रिक्षात घालण्यात आले. त्या रिक्षात एका ड्रायव्हरसकट केवळ तिघे जण बसले होते. ती रिक्षा शास्त्रीनगर च्या दिशेने गेली आणि दुसरी येरवड्याचा दिशेने. या सर्व गडबडीत अँब्युलन्स केव्हाच निघून गेली होती, पुढे मी झा साहेबांना आणि लेडी कॉन्स्टेबल ला ससुनला निघालो. पण लेडी कॉन्स्टेबल ची हालत पाहून मी त्या दोघांना जवळच निता पार्क च्या एका अॅक्सिडंट इस्पितळात दाखल केले. आणि इस्पितळातून तुम्हाला फोन केला.
दौंदै : ठीक आहे ! मी विचारणा केलेली माहिती मिळविलत का ?
माने : हो साहेब , त्यातील एक रिक्षा नागपुर चाळीतल्या पाचव्या गल्लीत सापडली. आणि दुसरी येरवडा मंडईच्या शेजारच्या 'चित्रा' थिएटरच्या पार्किंग मध्ये, दोन्ही रिक्षा ताडीवाला रोड, कपिला गार्डनच्या पार्किंग मधुन आज सकाळीच चोरीला गेल्याची नोंद आहे. बाळ्या नावाचा एका पेशन्टला आज सकाळीच मनोरुग्णालयातून साधारण सहा-साडेसहाच्या सुमारास सोडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यासाठी आम्ही नागपुर चाळीत गेलो असता तो आम्हाला नागपुर चाळीतल्या घरी सापडला नाही, त्याच्या गार्डियन ला रोशन नावाच्या राशन-दुकानवाल्याला ताब्यात घेतले आहे, पण तुम्ही सांगीतल्या प्रमाणे कुठल्याही घटनेची डायरीत नोंद केली नाही.
दौंदै : त्याला राहु दे जरा चार दिवस, राशनात भेसळ सापडली म्हणून अटक केली आहे अशी नोंद करा डायरीत ! आणि माने, बाकीच्या गोष्टींची जर का डायरीत नोंद केलीत तर तुम्हा तिघांची नोकरी जाईल की ! एक साधी स्त्री आरोपी संभाळता येत नाही तुम्हाला. एक काम करा तो लेखी रिपोर्ट आणी जप्त केलेल्या सर्व वस्तु आणा इथे .
भेदरलेले माने केबीन मधून बाहेर गेले.
रमाकांत : साहेब !
त्याचे बोलणे मध्येच तोडत दौंदैं नी त्याला चुप रहाण्याचा इशारा केला.
माने : साहेब या वस्तू..
दौंदे : हम्म ! ठेवा इथे !! आता एक काम करा . जरा चार दिवस सुट्टी घेवुन गावाकडे जाऊन या ! ( त्यांनी समोरच्या फाईलमधून चार पाकिटे बाहेर काढली ) , हे घ्या , एक त्या झा च्या मड्यावर घाला, एक त्या लेडी कॉन्स्टेबल ला द्या आणि चार दिवस तोंड जरा बंद ठेवा म्हणा अन्यथा नोकरी जाईल म्हणून सांगा. एक पाकिट ससुन मध्ये गोडबोले साहेबांना पोहचत करा. मृतदेहाचा 'पोस्ट-मार्टेम' राखून ठेवायला सांगीतलेला आहे म्हणावं साहेबांनी. या आता !
(माने निघुन गेल्यावर दौंदैंनी रमांकातकडे पाहिले. ) काय रमाकांत ? एक वेडा झालेला टिनपाट तरुण असे काही करू शकतो यावर विश्वास बसतो का ?
इतका वेळ गप्प बसलेल्या रमाकांत ने तोंड उघडले.
रमाकांत : वेडा की प्रेमवेडा ? नागपुरचाळीतील पोर डेरिंगबाज आहेत, पण मुर्ख नाहीत ! केवळ चार तासांत मनोरुग्णालयातून खबर काढून, ' किडनॅपिंग ' अरेंज करणे सोप्पे नाही.
दौंदै : आतलं कोणीतरी " इन्व्हॉल्व्ह " असु शकते .तुझा काय अंदाज ?
रमाकांत : अगदी मान्य , पण पोलीसांवर वार करण्याची हिंम्मत सध्या फक्त...म्हणजे मी जराशी माहिती काढून आणली आहे साहेब...थेट नागपुर चाळीचा सबंध असला तरी हे काम सुपारी देवून केलेले आहे.
दौंदै : तुर्तास आतले जरा वेळ राहू देत , पण तरी ही असे का वाटते तुला ?
रमाकांत : एक म्हणजे गावठी कट्टे सध्या फक्त युपी, बिहार वरून भैय्यावाडीत येतात, तिथुन ती ताडीवाला रोडच्या पोरांमार्फत मिळतात. एखाद्या मोठा गुन्हेगार असेल तरच ती काही दिवसांपुरती त्याला देण्यात येते. त्यासाठी भर-भक्कम रक्कम घेण्यात येते. पकडला की पाठ सोडवता यावी म्हणून, कधे-मधे केवळ धमक्यांपुरती ती वापरली जातात, पण वापरणारे सहसा लोकल गुन्हेगार असतात, तिथे एखादा पठडीचा गुन्हेगार असता तर त्याने माने ला जिवंत सोडला नसता. नुकतीच, जुन्नर ला, अश्याच एका केस मध्ये सापडलेले गावठी कट्टे आणि गुन्हेगार ताडीवाला रोड ची च आहेत. दुसरे म्हणजे बाळ्या नागपुरचाळीत रहायला आहे. म्हणजे संशयाचा काटा थेट तिथल्या गुन्हेगारां कडे, खबर्यांकडे जाणार. म्हणजे सगळ्यांनाच त्रास !! माझे स्वतःचे तिथे सहा-सात खबरे आहेत.
दौंदै : म्हणूनच तुला बोलावले आहे.
रमाकांत : पण साहेब हे पाकिटाचे राजकारण मला समजले नाही.
दौंदै : आज सकाळी मनोरुग्णालयाच्या मुख्य अधिकार्याचा फोन आला होता. ' प्रकरण दाबा ' म्हणून. गांगरून ' पॅन्ट पिवळी झाली होती त्याची म्हणून फोन केला मला ! नाहीतर आतच सगळं संपविले असते साल्याने ! आपल्याला खबर पण लागू दिली नसती ! एक वार्डब्वॉय लेडीज वार्ड मध्ये अर्ध नग्नावस्थेत मृतावस्थेत सापडल्यावर अजुन काय होणार ? म्हटल **** इतके लागतील, देतो म्हणाला ! नाही कसा म्हणणार ! भो***चं, ***मंत्र्यांचा माणुस आहे. आणि तसे ही तुरुंगात, हॉस्पीटल मध्ये, सरकारी, प्रशासकीय कार्यालयात लैंगिक अत्याचार हा काही नवीन प्रकार नाही. इथे फक्त इंजेक्शन्स, प्रेग्नंट झालेले पेशन्टस किंवा कैदी, इतकाच काय तो फरक ! पण त्या पोरांनी घात केला आहे.जर का या प्रकरणातलं सत्य बाहेर आले तर आपण सगळेच शेकल्या जाणार आहोत !
रमाकांत : वॉर्डबॉयच्या कुटुंबाचे काय ?
दौंदै : ते मॅनेज केले आहे मी, असाही बायको ला लई मारायचा तो वॉर्डबॉय. त्याची नोकरी मिळेल तिला. शिवाय तिला पण मोठ्ठ पाकिट दिले आहे , मरताना तेव्हढं एक भलं करून गेला तिचं !
रमाकांत : आणि आपलं काय ? पाकिटशिवाय !
दौंदै : सांगतो, एक काम कर , त्या पोरीला आणि त्या बाळ्या ला माझ्या दिघी च्या फ्लॅटवर आण ! पुढचे तुला माहीत आहेच . तुला डिबी तून क्राइम घ्यायची जबाबदारी माझी. आणि हे सर्व आज रात्री १० च्या आवरायचे म्हणजे क्राइमच्या पत्रकाराला द्यायला माझ्याकडे बातमी असेल.
**************************************************************
सर्कल वाढले की मलई पण वाढते, हे रमाकांत ला चांगलेच ठावूक होते. 'क्राइम' च्या त्या मलईच्या नुसत्या आकड्याने खूष झालेला रमाकांत साहेबाच्या केबिन मधून तो बाहेर आला खरा, पण त्या विचारातून बाहेर आला नाही. बाळ्याचे 'एनकाऊंटर' होणार हे त्याला कळले होते, पण सुनंदा चे साहेब नक्की काय करणार ? साहेबांना त्याचा काय फायदा ? हे त्याला कळेना आणि दुसरे म्हणजे ही कामगिरी म्हणजे अवघड जागीच दुखणं होते. ज्या नागपुर चाळीतील खबर्यांच्या जीवावर तो एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून ओळखला जात होता , नेमके त्यांनाच नडायचे होते. एक तर नागपुर चाळीतील पोरं फुटणे म्हणजे मुष्कील होते आणि साहेबांनी चार तासाच्या आत खबर आणि रिझल्ट काढायला सांगितला होता. त्यातल्या त्यात एक किमान खबर मिळण्यासारखे एक नाव त्याला आठवले.
शादाब ! वर्षभरापूर्वी शादाब ला रमाकांत ने रंगे-हाथ गांजा विक्री करताना पकडले आणि त्याच्या मार्फत आख्खी टोळी हाती लागली होती. त्या प्रकरणात शादाब ला रमाकांत ने वाचविले, त्याचा च मोबदला घ्यायची आज वेळ होती. येरवड्यातल्या , गुंजन थिएटर शेजारच्या, पेट्रोलपंपासमोर , 'डॉन ' हॉटेल त्या काळी खबर्यांचा बसण्याचा ठिय्या होता, जुजबी क्वार्टर्स ची ब्रॅन्ड्स आणि चकण्याला नदीचे मासे , अर्थात त्याचा ही हफ्ता जायचाच चौकीला ! त्या दिशेने रमांकात ने गाडी ला किक मारली आणि थेट " डॉन " मध्ये जावुन बसला. सवयीप्रमाणे ' मोगल मोनार्च ' ची क्वार्टर मागविली आणि पहिल्या पेगच्या चुस्क्याबरोबर, पीत बसलेल्या, शादाब कडे नजर टाकली. भेदरलेला शादाब , गप उठून रमाकांत च्या टेबलावर जाऊन बसला.
रमाकांत : लगता है तेरा केस फिर खोलना पडेगा ..
शादाब : क्या साब ! कुछ गलती हो गया क्या ?
रमाकांत : क्या आजकल तेरे से कुछ आ नही रहा है !
शादाब : बोलो ना साब ! हुकूम करो सिर्फ !
रमाकांत : आजकल नागपुरचाल में क्या हो रहा है ?
शादाब ने लगेच तोंड उघडले नाही. इकड आड तिकड विहीर ! अशी त्याची गत झाली. बरीच बात-चित झाली, सरते शेवटी , नागपुर चाळीतील कोणाला ही कळु देणार नाही या मुख्य अटीवर, 'अॅरिस्ट्रोकॅट' च्या दोन क्वार्टर पोटात गेल्यावर, पाकिटाच्या अमिषामुळे, तासाभरात सगळं काही ओकून बसला. अर्धी लढाई जिंकल्याच्या अविर्भावात रमाकांत डॉन मधुन बाहेर आला, गाडीला किक मारली आणि मग त्याच्या लक्षात आले की शादाब ने दिलेला पत्ता कुठला होता. 'बर्माशेल झोपडपट्टी' चा ! कुख्यात गुंड साखरे बाई चा हातभट्टीचा धंदा, कानडी-मराठी मजुरांची चारशे घरांची वस्ती, भर दुपारी जिथे पोलीस जरी हफ्ता मागायला गेला की हातात कोयता घेवुन बायका अंगावर चालून येतात, एयरपोर्टला जाणार्या मुख्य रस्त्याच्या बाजुन, एखादा फाटा फुटावा अश्या खिंडी एव्हढ्या ! नव्हे पांदी एव्हढ्या चिंचोळ्या रस्त्यातून ज्या वस्ती त एन्ट्री करावी लागते ती वस्ती ! कार्पोरेशन, एयर-फोर्स ला त्या वेळी पाच वर्षात जी वसाहत उठवता नाही आली ती झोपडपट्टी ! सिव्हील ड्रेस मध्ये, जीव मुठीत आणि शर्टाच्या आत रिव्हॉल्वर लपवून जावे लागणार होतं.
तासाभरात, सात-आठ अनोळखी माणसे बर्माशेल च्या झोपडपट्टीत मध्ये, शोधक नजरेने फिरायला लागली. स्वत: रमाकांत आणि त्याच्याच सर्कल ची काही डिबीवाली ! कारण चौकीला खबर लागु द्यायची नाही असा सक्त आदेश च दिला होत दौंदै नी. चौकीतला एखादा हवालदार नेला तर आणखी पाकिट वाटावी लागली असती. खुद्द मानें नी केव्हाच एस.टी. पकडली होती.आणि त्याच मानेंनी रोशन च्या घरातून जप्त केलेला 'बाळ्या' चा फोटो त्याच्या वरच्या खिशात होता. गल्ल्या-गल्ल्यातून, पत्र्यांच्या शेड मधून नजरा फिरत होत्या. 'बाळ्या' च्या अटकेवर संपूर्ण केस ची भिस्त असल्याने रमाकांत काळजीत होता. शिवाय बाळ्या, सुनंदा, त्याच दिवशी रात्री तिथून सटकणार आहेत अशी ही खबर शादाब ने दिली होती.शेवटी एकदाचा बाळ्या एका दुकानातून बाहेर पडताना दिसला.
एकटाच होता ! रमाकांत ने खात्री करण्याकरिता त्याची नजर चुकवुन खिशातला फोटो काढुन बघीतला. पण फोटोकडे बघून पुन्हा बाळ्याकडे बघताना ' बाळ्या' नेच त्याला बघीतले. दोघांची नजरा-नजर झाली. बाळ्या ला कळून चुकले की हा आपलाच माग काढत आहे, मागे वळत त्याने पावलांचा वेग वाढविला, तस-तशी त्याचा मागावर असलेली रमांकात ची पावले ही झपाझप चालायला लागली. शेवटी एका खोलीपाशी बाळ्या थबकला. रमाकांत आणि बाळ्यामध्ये केवळ वीस ते पंचवीस फुटांचे अंतर राहिले असावे. दरवाजा उघडला गेला आणि त्या दिशेला वेगाने चालत असलेल्या रमाकांतचा हात नकळत पॅन्टमध्ये लपविलेल्या रिव्हॉल्वर कडे गेला. ते पाहुन दरवाजा त उभ्या असलेल्या सुनंदाचा हात धरून बाळ्या पळायला लागला. एक माणुस जावू शकेल अश्या गल्ल्या, वाळणी वर टाकलेले कपडे, मध्येच काम करण्यार्या बायका यामधून वाट काढताना, तिघांची सैरभैर उडत होती, तरी ही बाळ्या सुनंदा चा वेग जास्त होता. सरते शेवटी रमाकांत ने " थांब ! थांब ! ' असे म्हणत दोन राउण्डस हवेत फायर केले. फायरिंग च्या आवाजाने दोघे ही अजुन बेफाम धावु लागले.सैराभैरा धावत, त्या चिंचोळ्या एंन्ट्रीतून ते दोघे बाहेर आले आणि त्याच वेळी मुख्य रस्त्यावर वेगाने एक ट्रक जात होता. ब्रेक च्या कर्णकर्कश्श आवाजाने आणि त्या दोघांच्या किंकाळ्यांनी परिसर दुमदुमून गेला. ट्रकच्या धक्क्याने दोघेही वीस पंचवीस फुट उडाली . सुनंदा, डोक्यावर पडुन जागेवरच खलास झाली आणि ट्रकच्या चाकाखाली आलेला बाळ्या जखमी अवस्थेत अर्ध्या तासाने 'सुनंदाSSS ! सुनंदाSSS! ' असे तरफडत-तरफडत तिच्याच शेजारी मरण पावला.
त्याच दिवशी संध्याकाळी चौकीला आलेला 'क्राइम' चा पत्रकार दोन बातम्या घेउन गेला.
एक : ट्रक च्या समोर उडी घेवून वेडसर तरुणी ची आत्महत्या !
दोन : सातार्या चा कुप्रसिद्ध गुंड " बाळ्या काकोडकर " पोलिसाशी चकमकीत ठार !
आज या घटनेला सतरा-अठरा वर्षे झाली असतील,पण ही कथा येथे संपत नाही. त्यानंतर चार दिवसांनी सोडण्यात आलेल्या रोशन काकांना , दोन वर्षांनी समजले की 'बाळ्या' चे काय झाले, त्या आधी ते त्याच शास्त्रीनगरच्या चौकातल्या पोलीस चौकीत " मिसिंग ' विभागाला जवळपास दररोज चकरा मारत होते. आजपासुन आठ वर्षापुर्वी त्यांनी बाळ्याच्या बहिणीचे रितसर चांगल्या ठिकाणी लग्न लावुन दिले ,आज ती सुशिक्षित आहे आणि सुखाने नांदत आहे. तिच्या लग्नानंतर पंधरा दिवसाने थोडेसे समाधान हाती घेवुन रोशन काका गेले. त्यांनीच मरणोत्तर मंडळाला दिलेल्या दुकानाच्या जागी आज 'जिम' आहे.
पण हि कथा येथे ही संपत नाही, सहा वर्षापुर्वी , शादाबची, त्याच्याच ग्रुप च्या पोरांनी, गुंजन थियेटर शेजारच्या, पेट्रोल पंपावर, त्याच 'डॉन ' हॉटेल समोर , भर दुपारी अक्षरश: खांडोळी केली. प्रकार इतका भयानक होता की , त्याच्या पासुन पंधरा फुटावर उभ्या असलेल्या, " हॉट" गर्लफ्रेन्ड च्या चेहर्यावर , त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले. तो मेला आहे, याची खात्री करण्यासाठी ती दोन पोरं पंचवीस मिनीटे रिकाम्या झालेल्या पंपावर उभी होती. नंतर स्वता चौकीला हजर झाली.
पण ही कथा येथे ही संपत नाही. रितसर पणे 'क्राइम'ला बदलुन गेलेला रमाकांत चा चार एक वर्षापुर्वी एक्प्रेस हाय-वे ला अपघात झाला. तो स्वता आणि त्याच्या बरोबर अजुन चार पोलीस ही जागीच ठार झाले. चुराडा झालेल्या इन्डिका मुळे अंतिम कार्यासाठी 'प्रेत' ही धड हातात मिळाले नाही. रमाकांत जाताना अनुक्रमे ११ व ७ वर्षे वयाच्या दोन मुली मागे सोडुन गेला.
पण हि कथा येथे ही संपत नाही. मुंबई ला स्मगलर्संना पकडण्यासाठी असलेल्या स्पेशल स्क्वाड मध्ये बदली होवुन गेलेल्या आणि बक्कळ कमाई केलेले पि.आय. दौंदै आज भुसावळ मध्ये एका खाजगी मठा मध्ये कुष्ठ रोगाचा इलाज करुन घेत आहेत आणि त्यांना तिथे भेटायला जाणारा एकच माणुस म्हणजे स्वेच्छा-निवृत्ती घेतलेले हवालदार माने !! .
प्रतिक्रिया
31 May 2011 - 3:49 pm | किसन शिंदे
आयला त्या दौंदैच्या.....
फुक्कट त्या बाळ्याच्या प्रेम-कहाणीची वाट लावली..
हा भागही मस्तच!
31 May 2011 - 4:17 pm | प्यारे१
मस्त स्पीड आणि सुप्पर्ब लेखनशैली.....!!!
पण तितकीच कथा म्हणून करुण आणि विदारक :(
मान गये सुशि आपलं सुहास.. ;)
31 May 2011 - 4:48 pm | साबु
सहा वर्षापुर्वी , शादाबची, त्याच्याच ग्रुप च्या पोरांनी, गुंजन थियेटर शेजारच्या, पेट्रोल पंपावर, त्याच 'डॉन ' हॉटेल समोर , भर दुपारी अक्षरश: खांडोळी केली
- मी गुन्जन समोर P O Nedlloyd मधे होतो कामाला तेव्हा हा खुन झालेला. त्याच्यामागे ही कहाणी होती हे आजच कळाले.
मति गुन्ग झाली वाचुन
31 May 2011 - 6:07 pm | टारझन
__/\__
31 May 2011 - 6:36 pm | स्मिता.
डोक्याला मुंग्या आणणारी कथा आहे. आणि त्यातही सत्यकथा म्हटल्यावर आणखीच त्रास होतो.
31 May 2011 - 6:45 pm | रश्मि दाते
यालाच म्हणतात देवा़जीचा न्याय्,सगळी पापं इथेच फेडावी लागतात्,म्हणुन न्हणते बाबारे लोकांना आप्ल्या लेखनाची इतकी वाट पाहाय्ला लावायचे पाप करु नकोस बाबा,;).
बाकी कथा म्स्त जमलीय्.लिहीत रहा वाट पाह्तेय पुढच्या लेखनाची.
31 May 2011 - 6:57 pm | सहज
.
31 May 2011 - 7:06 pm | llपुण्याचे पेशवेll
हम्म... विदारक सत्य. सोसायची तयारी सगळ्यांचीच असते असे नाही.
31 May 2011 - 7:50 pm | गणेशा
सुन्न करणारी कथा ...
सत्यघटना म्हणुन तर खुपच बैचेन करुन गेली ...
31 May 2011 - 7:51 pm | प्रसन्न केसकर
कल्पनेतली असो की वास्तवातली, तिचा परिचय संयत भाषेत करुन देणे हे मोठं आव्हान असतं. समर्थपणे पेललस रे.
1 Jun 2011 - 3:52 am | गोगोल
खरे आहे का खोटे?
31 May 2011 - 9:24 pm | आनंदयात्री
कथेचा शेवट वाचून वाईट वाटले. या भागातल्या मटेरिअल मध्ये २-३ भाग सहज झाले असते, आधी फुलवलेल्या प्रेमकथेवर अन्याय झाल्यासारखे वाटले.
अर्थात कथानक आणि मांडणी दमदार आहे यात वादच नाही.
1 Jun 2011 - 11:15 am | sneharani
कथा एकदम वेगवान झालीये, सुन्न झाले वाचुन!
कथेची मांडणी एकदम सुरेख!
1 Jun 2011 - 11:17 am | sneharani
कथा एकदम वेगवान झालीये, सुन्न झाले वाचुन!
कथेची मांडणी एकदम सुरेख!
1 Jun 2011 - 2:03 pm | ५० फक्त
कथा मस्तच, फक्त शेवटच्या भागात थोडी गुंडाळल्यासारखी वाटली, जरा फास्ट गेली स्टोरी. पण लिखाण एकुण जबरदस्तच.
कालच याच एरियात ऑफिससमोर अजुन एक हल्ला झाला आहे, त्यामुळे आज वाचताना कुठेतरी रिलेट होत होते.
1 Jun 2011 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते
छान!
6 Jun 2011 - 1:25 am | टुकुल
डोक सुन्न झाल.. कथेचा प्रवाह चांगला ठेवला आहेस सुहास.
--टुकुल
6 Jun 2011 - 12:38 pm | चेतन
सुहास चारही भाग वाचुन काढले. भन्नाट लिहलयं
चेतन
अवांतरः फक्त ते पि.आय. दौंदै आज भुसावळ मध्ये एका खाजगी मठा मध्ये कुष्ठ रोगाचा इलाज करुन घेत आहेत हे काही पटलं नाही
6 Jun 2011 - 7:52 pm | पैसा
सुन्न करणारे आणि प्रभावी, प्रवाही लेखन!
7 Jun 2011 - 11:09 am | VINODBANKHELE
अप्रतिम.........................
तोड्लस मित्रा.........................
7 Jun 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
वाचकाला एक वेगळाच अनुभव देणारे लेखन.
हटके लिहिण्याची तुझी शैली कायमच आवडते हे पुन्हा सांगायला नकोच.