बुद्धिबळाच्या पटावर काहीवेळा अशी स्थिती येते की खेळाडूने कोणतीही खेळी केली तरी डाव हारण्याकडेच वाटचाल होते. ह्या स्थितीतून डाव मागे फिरू शकत नाही! अशा स्थितीला त्झुगझ्वांग असे म्हटले जाते. (मूळ जर्मन असलेल्या शब्दाचा अर्थ 'चाल करण्याची अनिवार्यता' असा आहे.)
या लेखात आपण अशा दोन अतिशय प्रसिद्ध त्झुगझ्वांग डावांबद्दल माहिती माहिती करून घेणार आहोत.
एक मनोरंजक बाब अशी की दोन्ही डावात प्रसिद्ध खेळाडू एरॉन निम्झोविच याचा सहभाग आहे! पहिल्या डावात निम्झोविचने प्रसिद्ध जर्मन खेळाडू फ्रेडरिक सामिश ह्याच्याविरुद्ध त्झुगझ्वांग वापरून डाव जिंकला आहे तर दुसर्यात अलेखिन ह्या दिग्गजासमोर तो त्झुगझ्वांगलाच बळी पडला आहे!
फ्रेडरिक सामिश (पांढरा) वि एरॉन निम्झोविच (काळा) - राणीचा भारतीय बचाव - निम्झोविच वेरिएशन
डावाची सुरुवात राणीच्या भारतीय बचावाने झाली. (आकड्यांसमोर लिहिलेली पहिली खेळी पांढर्याची.)
1. d4 Nf6
2. c4 e6
3. Nf3 b6
4. g3 Bb7 पांढर्या कर्णात येऊ पाहणार्या उंटाला प्रतिस्पर्धी म्हणून निम्झोविचने त्याचाही उंट कर्णात बसवला
5. Bg2 Be7
6. Nc3 O-O किल्लेकोट करुन राजा सुरक्षित
7. O-O d5 डी५ ह्या खेळीने पटाच्या मध्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया पुढे नेली.
8. Ne5 c6 काळ्याने डी ५ मधल्या प्याद्याला जोर दिला.
9. cxd5 cxd5 ह्या खेळीचे विश्लेषण आवश्यक आहे. डावाच्या मध्यात तणाव निर्माण झालाय तो तसाच टिकवणे खरेतर पांढर्याच्या फायद्याचे आहे. परंतु सामिश प्याद्यांची मारामारी करतो. ह्याने दोन गोष्टी झाल्या. एकतर तणाव कमी झाला त्यामुळे काळ्याचे पटाच्या मध्यावरचे स्थान पक्के व्हायला मदत होईल आणि सी ४ ह्या घराचा उपयोग काळा पुढेमागे त्याचे ठाणे म्हणून करू शकतो.
10. Bf4 a6 वरती उल्लेख केलेले c4 ठाणे .a6 आणि.b5 ह्या खेळ्यांनी मजबूत करणे हा काळ्याचा उद्देश आहे
11. Rc1 b5
12. Qb3 Nc6 घोड्याची ही खेळी फसवी आहे. ए५ मार्गे सी४ असा प्रवास करुन घोडा मजबूत स्थितीत जाण्याची धमकी देतोय. काय होते ते बघा -
13. Nxc6 सामिश तो घोडा मारतो! पांढर्याचा उत्तम स्थितीत बसलेला घोडा एका अप्रगत काळ्या घोड्यासाठी खपला आणि डावाचं सारथ्य काळ्याकडे सरकलं! अशा खेळ्या त्यांचा परिणाम एकदम दाखवत नाहीत तर एखाद्या विषासारख्या हळूहळू भिनत जातात! Bxc6 काळ्याच्या उंटाने घोडा मारला.
14. h3 Qd7 एच ३ ही उदासीन खेळी आहे. पांढर्याने डावाचे सुकाणू घेणे जरुरीचे आहे. त्याने मोहोर्यांची प्रगती करण्याऐवजी वेट अँड वॉच असा बचावात्मक खेळ केला. काळ्या वजिराने उंटाला जोर दिला आणि दोन्ही हत्ती समन्वयात आणले.
15. Kh2 Nh5 राजाची खेळी - पुन्हा एकदा पांढर्याची नकारात्मक खेळी. त्याचा फायदा घेत काळ्याने घोडा उंटावर घातला.
16. Bd2 काळा उंट मागे गेला. f5! पांढर्याच्या राजाकडची बाजू आता मोकळी झाली काळ्याने त्याचे प्यादे एफ५ असे पुढे सरकवत जागेचा ताबा घेतला!
17. Qd1 सामिशने वजीर मागे नेला, ई३ असे प्यदे खेळून पुढे आलेल्या घोड्याला मागे हटवणे हा उद्देश.
b4! घोड्यावर हल्ला. दोन उद्देश - घोडा मागे रेटणे आणि बी५ घरावरचा जोर हटवून आपल्या उंटाला ती जागा मिळवून देणे.
18. Nb1 घोडा हटला. बघा डावाची अवस्था, नकारात्मक खेळ्यांमुळे एकेक करुन पांढर्याची सगळी मोहोरी पहिल्या रांगेत येऊन बसली आहेत! Bb5 काळ्याच्या पांढर्या पट्टीतल्या उंटाने मोक्याची जागा धरली. आता पांढरा लागलीच ई३ खेळू शकत नाही कारण उंटाने एफ१ मधल्या हत्तीचा वेध घेतला जातोय!
19. Rg1 Bd6 पांढर्याने हत्ती हलवून ई प्याद्याच्या बढतीची वाट मोकळी करुन घेतली.
20. e4 प्यादे पुढे सरकले. आता काळा घोडा हलवायलाच लागणार तो एफ६ मधे मग इ५ खेळून काळ्या उंटावर आणि घोड्यावर एकदम हल्ला करायचा आणि दोन्हीपैकी एक मटकवायचे असा साधा सरळ प्लॅन आहे सामिशचा!
fxe4! निम्झोविचची आश्चर्यकारक खेळी. घोड्याचे बलिदान! उद्देश? येईलच लक्षात! ;)
21. Qxh5 वजिराने घोडा मटकावला. Rxf2 हत्तीने प्यादे मारले - आता फायदे बघा - घोड्याच्या बदल्यात दोन प्यादी मिळाली, पटाच्या मध्याचा ताबा मिळाला, सातव्या पट्टीत हत्ती घुसला!
22. Qg5 वजिराला परतीची वाट करुन देतोय पांढरा Raf8 डबल हत्ती! बुद्धीबळातले पोटेंट काँबिनेशन!!
23. Kh1 पुन्हा एकदा राजाची नकारात्मक खेळी R8f5 शांतपणे दुसरा हत्ती आत घुसला, पांढर्या वजिरावर हल्ला!!
24. Qe3 पांढर्या वजिराची माघार. Bd3 काळ्याचा उंट आणखीन आत सरकून बसला. घोड्यावर दाब. वजिराची घुसमट. हत्तींची कुचंबणा अशा त्रिविध तापात पांढरा हेलपाटलाय!!
25. Rce1 हत्ती हलवला. h6!! अत्यंत सुंदर खेळी - वेटिंग मूव. पांढर्याने डाव सोडला!!!
कारण स्थिती त्झुगझ्वांगची आहे.
पांढरा काहीही खेळला तरी डाव कोलमडतोय.
कसे ते पहा.
- पांढर्याने ए३ असे प्यादे पुढे टाकून घोड्याला वाट करुन द्यायचा बेत केला तर काळा ए५ खेळून त्या प्याद्याला जोर देतो. प्याद्याची मारामारी झाली तर घोड्याला पुढे यायची घरे पुन्हा बंद होतात!
- काळ्या पट्टीतला उंट सी१ मधे जाऊ शकत नाही कारण घोड्याचा जोर जातो आणि उंटाने घोडा पडतो.
- हत्ती ई पट्टी सोडून गेला की काळा हत्ती ई७ मधे येतो आणि आता पांढरा वजीर अडकला!
- राजाशेजारचा दुसर्या हत्तीला तर बिचार्याला एकमेव जागा आहे आणि ती सुद्धा पांढर्या पट्टीतल्या उंटाने धरली आहे!
- राजा Kh2 हलवला तर - R5f3 आणि वजीर अडकला. उंटाने हत्ती मारता येत नाही कारण तो पिन झालाय!
- जी४ असे प्यादे हलवले तरीही R5f3 आणि वजीर अडकला. उंटाने तो हत्ती मारला तर आरएच२ अशी मात!
हा डाव इथे संपूर्ण खेळून बघता येईल.
-(क्रमश: - पुढल्या भागात अलेखिनचा डाव!)
प्रतिक्रिया
19 Apr 2011 - 9:29 pm | प्रास
मस्त लेख!
चाली नि त्यांचं स्पष्टिकरण झकास! त्झुगझ्वांग म्हणजे अगदी लफडं आहे, त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते.
पुढल्या डावाच्या प्रतिक्षेत......
20 Apr 2011 - 5:50 pm | चतुरंग
विशेषतः ह्या तुमच्या वाक्यावरुन -
त्यात अडकलो नि सुरुवात आपण करायची असेल तर हार नक्की पण त्याही परीस्थितीत डावाची सुरुवात प्रतिस्पर्धी करणार असेल तर कदाचित बरोबरीची शक्यता वाटते -
त्झुगझ्वांग म्हणजे डावाचा काहीतरी प्रकार असावा अशी तुमची समजूत झालेली दिसते. हा डावाचा प्रकार नसून पटावर उद्भवणारी स्थिती आहे. एखादा खेळाडू त्या स्थितीत जातो ते मोहोर्यांच्या विशिष्ठ हालचाली होत होत.
ह्यात आपण सुरुवात करणे किंवा प्रतिस्पर्ध्याने करणे असे काही नाहीये. जो कोणी त्यात अडकेल तो हरणारच. बरोबरीची शक्यता शून्य!
20 Apr 2011 - 8:31 pm | प्रास
नक्कीच माझ्या प्रतिक्रियेमध्ये वापरलेला 'डाव' शब्द चूक आहे आणि तिथे 'पटावरील परिस्थिती' असंच हवं आहे.
तसं बुद्धिबळ खेळून फार वर्षाचा काळ लोटलाय पण इथे तुमचे काही मागील लेख वाचल्यावर अनेक वर्षांपूर्वी कानावरून गेलेल्या काही शब्दांची उजळणी होऊ लागलेली आहे हे निश्चित.
माझ्या थोड्याफार माहिती प्रमाणे त्झुगझ्वांग ही परीस्थिती जवळ जवळ डावाच्या शेवटी उद्भवते कारण याच काळात तुमच्याजवळ असलेल्या खेळ्यांची संख्या मर्यादित होते आणि त्या मर्यादित खेळींतून तुम्हाला अशाच खेळी कराव्या लागतात की ज्यामुळे तुमच्या हातातून सामना निसटू लागतो आणि तुम्ही आपले पटावरील वर्चस्व घालवता किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बुडत्याचा पाय खोलात जाऊ लागतो.
जेव्हा तुमच्याजवळ अशा खेळी टाळण्याच्या दृष्टीने पर्याय उपलब्ध असतील तर त्या पर्यायी खेळी करण्याचाच प्रयत्न होतो आणि त्याच वेळी प्रतिस्पर्धी तुम्हाला त्या खेळी करायला लावण्याचाच प्रयत्न करेल. मात्र पटावर काही वेळेला अशी स्थिती येते की त्झुगझ्वांग स्थितीत आपण असताना प्रतिस्पर्धकाला अनिवार्य खेळी करावी लागत असेल तर काही विशिष्ठ स्थितींमध्ये क्वचित प्रसंगी बरोबरीची संधी येऊ शकते असं वाटतं. अर्थात तशी संधी न मिळणे आणि अनिवार्यतेने चुकीच्याच खेळी करून पराजय स्विकारणे हाच अर्थ इथे अभिप्रेत असेल तर तुमचं मत मान्य.
20 Apr 2011 - 9:06 pm | चतुरंग
हे तुमचे वाक्य थोडे गमतीदार आहे.
अधिक बारकाईने बघितले तर असे दिसेल की त्झुगझ्वांगची परिस्थिती उद्भवल्यामुळे डाव शेवटाकडे येतो. येथे कार्यकारण भाव महत्त्वाचा आहे. बुद्धीबळात डावाचा शेवट प्रेडिक्टेबल नसतो, जसा उदा. बॅडमिंटन मध्ये असतो की १५ गुण झाले की गेम संपणार. कोणत्याही एखाद्या अचाट बलिदानाने किंवा एखाद्या अतिशय चुकीच्या खेळीने डाव अचानक शेवटाकडे जाऊ शकतो.
'त्झुगझ्वांग आणायचा आहे' असे ठरवून खेळता येत नाही. डावाच्या चालू स्थितीतच हळूहळू परिस्थिती त्या दिशेने जाऊ शकते आणि एकाएकी तो दिसू लागतो, आणि गमतीचा भाग असा की दोन्ही खेळाडूंना बर्याचदा ती स्थिती येईपर्यंत ते घडलेले समजत नाही. :) कमालीची अनिश्चितता आणि प्रचंड निर्मितीक्षमता ह्या दोन खांबांवर बुद्धीबळाचा डोलारा उभा असतो आणि म्हणूनच प्रत्येक डाव हा एकमेव असतो!
(अधिक उहापोह आपण खवमधून करु शकतो.)
19 Apr 2011 - 10:01 pm | धनंजय
वर्णन मस्तच आहे.
(चेसगेम्स डॉट कॉमवरील अॅनिमेशन नसते, तर मला ढोबळमानानेही समजायला कठिण गेले असते. )
19 Apr 2011 - 10:17 pm | गणपा
अगदी सहमत. ते अंक आणि रोअमन अक्षरांनी उलट गोंधळ होतो माझा.
-(अँटीचेस चँपियण) गणा
19 Apr 2011 - 10:41 pm | अन्या दातार
>>ते अंक आणि रोअमन अक्षरांनी उलट गोंधळ होतो माझा.
आखाती देशात राहिल्याचा परिणाम का हो?? ;)
20 Apr 2011 - 1:50 am | प्राजु
मस्त वर्णन!
20 Apr 2011 - 12:41 pm | बिपिन कार्यकर्ते
बेष्टं!
20 Apr 2011 - 4:56 pm | नरेशकुमार
मस्त आहे, खेळुन पाहिले , मजा आली
.
.
एकदा चेक करा.
20 Apr 2011 - 5:44 pm | चतुरंग
असं म्हणायचं आहे, परंतु गोंधळ होऊ शकतो हे लक्षात घेऊन काळ्याच्या उंटाने असा बदल केला आहे.
अतिशय बारकाईने डाव वाचून खेळून बघितल्याबद्दल धन्यवाद! :)
1 May 2011 - 4:42 am | राजेश घासकडवी
लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा त्या साईटवर काही कारणाने जाता येत नव्हतं. आज मात्र खेळून बघता आलं.
पांढऱ्याला आपल्या सर्व सैन्याची माघार घ्यायला लावली हे जबरदस्तच. त्यांनंतर सर्व नाकी बंद करून मस्त कोंडी केली.
मला आत्तापर्यंत झुग्झ्वॅंगची माहिती होती ती एंड गेम मध्ये, जेव्हा राजा आणि काही प्यादी शिल्लक असतात तेव्हा. पण जवळपास सर्व सैन्य शिल्लक असताना प्रत्येकाला रोखून धरणं अचाटच.