त्झुगझ्वांगच्या पहिल्या भागात आपण निम्झोविचचा सामिशविरुद्धचा डाव बघितला होता. ह्या दुसर्या भागात अलेखिन आपल्या भेटीला येतोय तो पुन्हा निम्झोविच बरोबरच!
अलेखिन हा पोझिशनल खेळाचा महारथी होता. मोहोर्यांची आपसातली संगती ही कोणत्या प्रकारचं रसायन निर्माण करु शकते ह्याची कल्पना त्याच्या काही चमकदार डावांमधून येते, हा डाव त्यापैकीच एक आहे! 'अंडर द गन्स' असं या डावाचं नामकरण बुद्धीबळाच्या जगतात झालेलं आहे ते उगाच नाही. चला डाव बघूयात.
अलेखिन (पांढरा) वि. निम्झोविच (काळा) - १९३० साली हा डाव खेळला गेला.
फ्रेंच डिफेन्स
1. e4 e6
2. d4 d5
3. Nc3 Bb4 काळ्या पट्टीतल्या उंटाने पांढरा घोडा पिन केला. आता काळ्याची इ४ मधले प्यादे खाण्याची धमकी आहे!
4. e5 प्यादे पुढे सरकवले. आता पांढर्याची जबाबदारी ह्या प्याद्याला टिकवण्याची आहे अन्यथा पटाच्या मध्याचे नियंत्रण जाईल!
c5 काळ्याने डी४ मधल्या प्याद्यावर चढाई केली. ह्या खेळीने काळ्यासाठी डी६ हे घर कमकुवत झाले आहे.
5. Bd2 पांढर्याने उंट मधे घालून घोड्याचा पिन सोडवला. Ne7 काळ्याची किल्लेकोटाची तयारी.
6. Nb5 अलेखिनने ताबडतोब डी६ ह्या घराकडे घोडा दौडवला! Bxd2+ डी६ चा बचाव काळा सध्यातरी करु शकत नाही. त्याने उंटांची मारामारी करणे पसंत केले.
7. Qxd2 वजिराने काळा उंट मारला. O-O काळ्याचा किल्लेकोट पूर्ण. निदान राजा तरी पटाच्या मध्यातून बाजूला गेला.
8. c3 प्याद्यांची तटबंदी करुन घेणे जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे ही खेळी तसाही डी६ जागेवर घोडा कधीही जाऊ शकतो त्यामुळे त्याची घाई नाही! b6 काळ्याचा पांढर्या पट्टीतला उंट त्याच्याच प्याद्यांमुळे जखडला गेलाय त्याला मोकळे करण्याची धडपड.
9. f4 ई५ मधल्या प्याद्याला जोर दिला. पटावरच्या जास्तीच्या जागेचेही महत्त्व आहेच. Ba6 उंट बाहेर निघाला.
10. Nf3 दुसरा घोडा हलवून पांढर्याने त्याची मोहोरी विकसित केली. उंटाने घोडा मरण्याचा धोका नाहीये कारण त्यामुळे पांढर्याचा पांढरा उंट बी५ अशा मोक्याच्या जागी येऊन बसतो. Qd7 पांढर्या घोड्यावर दुहेरी हल्ला.
11. a4 प्याद्याने घोड्याला जोर दिला. शिवाय हत्तीलाही मोकळीक मिळायला सुरुवात झाली.
Nbc6 पांढर्या घोड्याला हुसकावून लावणे हे खरेतर जास्त महत्त्वाचे आहे पण बी३ हे घर पांढर्यासाठी कमकुवत झाले आहे त्याचा फायदाउठवण्याच्या मिषाने हा घोडा पुढे काढला. (इथे खरंतर सी४ अशी प्याद्याची खेळी काळ्यासाठी उत्तम होती कारण त्याने पांढर्या पट्टीतल्या उंटाची घोड्याला मिळणारी मदत मधेच खंडित झाली असती - रसद तोडणे! आणि घोड्याला हालचाल करणे भाग पडले असते.)
12. b4 ए५ हे घर धरुन प्याद्याने त्या घोड्याची दौड रोखली! cxb4 प्याद्यांची मारामारी. पण त्याने तसे काही साध्य होत नाही. इथे पुन्हा सी४ खेळला असता तरी डाव चालू राहिला असता. शिवाय सी स्तंभ मोकळा झालाय तिथे हत्ती येऊन बसण्याची शक्यता आहे ते वेगळेच!
13. cxb4 Bb7 उंट मागे जातो त्याला घोड्यात रस नाहीये.
14. Nd6 आहा! शेवटी पांढर्याचा घोडा डी६ मधे आलाच. f5 राजाच्या बाजूला प्याद्याची खेळी.
15. a5 ए स्तंभातल्या प्याद्याची बढत. Nc8 आता डी६ मधल्या घोड्याला हुसकवण्याचे प्रयत्न सुरु झालेत काळ्याचे.
16. Nxb7 शेवटी काळ्याचा तो उंट मारलाच. Qxb7 वजिराने घोडा मारला. इथे आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काळ्याची बरीचशी प्यादी आणि मोहोरी पांढर्या घरात आहेत आणि त्याचा पांढरा उंट नाहीये त्यामुळे पांढर्याच्या पांढर्या उंटाची सद्दी सुरु होणार!
17. a6 काळ्या वजिराला हुसकावले. Qf7 वजिराला अतिशय कमी जागा आहे. त्यातही घोड्याला परतीची वाट हवी म्हणून ई७ हे घर मोकळे ठेवले वजिराने.
18. Bb5 काळ्या घोड्यावर हल्ला. आता सी स्तंभ आणि त्यातही सी६ हे घर हा हल्ल्याचा केंद्रबिंदू झालाय!
N8e7 काळ्याच्या एका घोड्याचे दुसर्याला घोड्याला पाठबळ!
19. O-O पांढर्याने किल्लेकोट केला आणि हत्ती सी स्तंभाच्या दिशेने आणण्याची व्यवस्था केली.
h6 राजाच्या बाजूला काळ्याची एक सावधगिरीची खेळी. पांढर्याचा दुसरा घोडा अचानक जी५ मधे वगैरे वजिराला त्रास द्यायला येऊ नये म्हणून!
20. Rfc1 हत्तीची सी स्तंभात रवानगी. Rfc8 काळ्यानेही त्याचा हत्ती आणला.
21. Rc2 हत्ती दुसर्या पट्टीत. दुहेरी हत्ती - पुन्हा एकदा मागल्या डावाप्रमाणेच पोटंट काँबिनेशन!
Qe8 काळ्या वजिराने घोड्याला जोर दिला. खरेतर इथे घोड्यामागे वजीर पिन होणे असाही एक परिणाम झालाय पण आता तरी निम्झोविचचा त्याला इलाज नाही! घोडा मागे घेऊनही तसे काही साधत नाही कारण मग रिकाम्या सी स्तंभातून आधी हत्ती आणि त्यामागे उंट व वजीर असे मान्यवर जिभल्या चाटत आत घुसतात आणि डावाचा चट्टामट्टा होतो!
22. Rac1 दुसरा हत्ती आणला. डबलिंग् द रुक!
Rab8(?) काळ्याची ही खेळी शंकास्पद वाटते. काय कारण समजत नाही कदाचित फक्त वाट बघणारी खेळी असावी. त्यापेक्षा हत्ती सी७ हे जास्त योग्य होते.
23. Qe3 वजीर हत्तीच्या मागे आणण्याची तयारी सुरु केली अलेखिनने. खरेतर आधीच्या खेळीत Rac1 ऐवजी वजीर सी १ मधे आणून हत्ती ए ३ आणि मग सी३ असे करणे जास्त झटपट झाले असते. किंवा कदाचित त्याचा वजीर ए३ आणि मग ए४ असा आणून उंटाच्या मागून घोड्यावर दबाव आणायचा इरादा देखील असेल!
Rc7 हत्ती दुहेरी करणे सुरु झाले निम्झोविचचे.
24. Rc3 वजिरासाठी पहिल्या पट्टीत जागा करतोय पांढरा.
Qd7 काळ्या राजाला बचावात आणण्यासाठी वजीर पुढे सरकला आणि आठवी पट्टी रिकामी केली.
25. R1c2 पांढर्याचा दुसरा हत्ती पुढे आला.
Kf8 सिंहासन सोडून राजा जेव्हा युद्धात उतरतो तेव्हा एकतर हातघाईची लढाई आलेली असते किंवा इतर सर्व मोहोरी चेपली गेलेली असतात. इथे दुसरी परिस्थिती आहे!
26. Qc1 दोन हत्ती आणि त्यामागे वजीर अशी एका स्तंभात मजबूत बांधणी झाली अलेखिनची - हीच ती प्रसिद्ध अलेखिन गन - म्हणून डावाचे नाव - अंडर द गन!
Rbc8 हत्ती दुहेरी झाले काळ्याचे.
आता स्थिती अशी आहे की काळ्याचा सी६ मधला घोडा हलू शकत नाही कारण वजीर पिन झालाय. त्याचे दोन्ही हत्ती आणि घोडा व वजीर सगळे त्या सी६ मधल्याघोड्याच्या दिमतीला बांधले गेलेत. एकजरी मोहोरे जागा सोडून हालले तरी डाव कोसळणार आहे!
ह्या स्थितीत सगळी बरोबरी आहे. आता पांढर्याने एकजरी जोर जास्त लावून घोड्यावर हल्ला केला तरी सगळे संपणार आहे!
27. Ba4! उंटाची सुंदर खेळी! आता बी५ अशी पांढर्याची धमकी आहे. प्यादे पुढे आले की घोडा मेलाच!
b5 निम्झोला दुसरा पर्यायच नाहीये.
28. Bxb5 उंटाने प्यादे मारुन पुन्हा उंट जागेवर.
Ke8 काळ्या राजाचा डाव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न.
29. Ba4 उंट पुन्हा मागे जातो. बी५ असे प्यादे पुढे रेटण्याची पांढर्याची धमकी आहेच!
Kd8 शेवटी एकदाचा राजा मदतीला पोचला! निम्झोला हायसे वाटले असेल कदाचित पण क्षणभरच!
आता इथे अलेखिनचा दर्जा दिसून येतो. त्याला बी ५ अशी प्याद्याची खेळी करुन चालत नाही! कारण मग इतका वेळ उंटाने वजिरासमोर पिन करुन ठेवलेला घोडा लागलीच सुटा होऊन बी८ असा मागे जातो आणि डाव बरोबरीकडे वाटचाल करतो कारण काळ्याचे दोन हत्ती आणि वजीर व राजा मिळून स्थिती वाचवतात. एकच खेळी आणि डाव इकडे किंवा तिकडे झुकणार!
30. h4!! अलेखिनची अप्रतिम खेळी. ही एक असामान्य वेटिंग मूव आहे. काळ्याच्या स्थितीचा तराजू आता एका काडीची वाट बघतोय! राजासकट त्याची सगळी मोहोरी त्या सी६ वरच्या घोड्यापाशी खिळून आहेत - एखाद्या मरणासन्न रुग्णापाशी डॉक्टर्स जमावेत तशी! एकजरी हालला तरी भीषण मारामारी सुरु होणार आणि काळा हरणार. आता काळ्याकडे फक्त प्यादीच हलवण्याची मुभा आहे. थोड्याच वेळात त्या प्याद्यांच्या खेळी संपतील आणि मग कोणते तरी मोहरे हलविण्याखेरीज गत्यंतर नाही. निम्झोविचला उमगले की तो त्झुगझ्वांगची शिकार झालाय. त्याने डाव सोडला!!
1-0
जवळपास सगळी मानांकित मोहरी पटावर असताना आणि सकृतदर्शनी डाव तुल्यबळ वाटत असताना डाव जिंकणे हे असामान्य खेळाचे लक्षण आहे! अलेखिनची ३० नंबरची खेळी ही पटाचा प्रत्येक क्षणी नव्याने विचार सुरु ठेवण्याची क्षमता दाखवते. मागल्याच खेळीला असलेली स्थिती आता नाही ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.
हा संपूर्ण डाव इथे बघता येईल.
किंवा खाली दिलेल्या खिडकीत एकेक खेळी करुन संपूर्ण डावाचे विश्लेषण वाचत आनंद घेता येईल.
Play Online Chess[Event "San Remo"][Site "San Remo"][Date "1930"][Round "?"][White "Alexander Alekhine"][Black "Aron Nimzowitsch"][Result "1-0"][WhiteELO "2685"][BlackELO "2063"][EventDate "?"][ECO "C17"][WhiteElo "?"][BlackElo "?"][PlyCount "59"]1. e4 e6 2. d4 d5 3. Nc3 Bb4 4. e5 c5 5. Bd2 Ne7 6. Nb5 Bxd2+ 7. Qxd2 O-O 8.c3 b6 9. f4 Ba6 10. Nf3 Qd7 11. a4 Nbc6 12. b4 cxb4 13. cxb4 Bb7 14. Nd6 f515. a5 Nc8 16. Nxb7 Qxb7 17. a6 Qf7 18. Bb5 N8e7 19. O-O h6 20. Rfc1 Rfc8 21.Rc2 Qe8 22. Rac1 Rab8 23. Qe3 Rc7 24. Rc3 Qd7 25. R1c2 Kf8 26. Qc1 Rbc8 27.Ba4 b5 28. Bxb5 Ke8 29. Ba4 Kd8 30. h4 1-0document.getElementById("cwvpd_1304101816").value=document.getElementById("cwvpg_1304101816").innerHTML;document.getElementById("cwvfm_1304101816").submit();
-चतुरंग
(आगामी - पुढल्या लेखात डेविड ब्रॉन्स्टीनचे काही अप्रतीम डाव.)
ता.क. अॅक्टिव विंडो एंबेडीकरणाचे माझे काही प्रयत्न असफल झाल्यानंतर राजेश घासकडवी यांनी एका नवीन साईटसंबंधी मला कळवले आणि त्याचा वापर करुन मी वर दिलेली खिडकी यशस्वीपणे एंबेड करु शकलो. यामुळे लेख समजायला सोपे जाईल. घासूगुर्जींचे शतशः आभार! :)
-रंगा
प्रतिक्रिया
30 Apr 2011 - 12:09 am | चतुरंग
अशा तर्हेची खिडकी एंबेड करण्यात अखेर यश मिळाले.
अॅक्टिव विंडो एंबेडीकरणाचे माझे काही प्रयत्न असफल झाल्यानंतर राजेश घासकडवी यांनी एका नवीन साईटसंबंधी मला कळवले आणि त्याचा वापर करुन मी वर दिलेली खिडकी यशस्वीपणे एंबेड करु शकलो. यामुळे लेख समजायला सोपे जाईल. घासूगुर्जींचे शतशः आभार! :)
-रंगा
30 Apr 2011 - 1:59 am | धनंजय
खेळ खेळून बघितला. मजा आली.
30 Apr 2011 - 7:33 am | खालिद
रंगाकाका
इथे फक्त पटच दिसतो. मोहरी नाही दिसत. (उगाच कुणी 'मोहरी दिसत नसतील तर जिरे बघा' असा पाणचट टाकू नये. :) )
पण डाव फ्रिट्झ वर अॅनॅलिसिस सकट खेळून बघितला.
मजा आली.
धन्यवाद डाव आणि समालोचनासाठी.